मनतरंग/पंजाबी 'त्रिंजन' मराठी 'अंगणा' तही येईल!
Appearance
< मनतरंग
२७ जानेवारी १९९५ ची संध्याकाळ. आजही आठवत राहणारी. महिलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी बंगलोरमध्ये परिषद भरली होती. अनेक व्यक्ती आपल्याला शब्दांच्या, चित्रांच्या, गीतांच्या... माध्यामातून भेटत राहतात. पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा... पाहण्याचा... ऐकण्याचा सुनहरी योग आला की मन अगदी तृप्त होते.
"तू खुदको बदल, तू खुदको बदल
तबही तो जमाना बदलेगा
तू बोलेगी पूँह खोलेगी
तबहीं तो जमाना बदलेना"
"जिस देश में औरत अपमानित और नाशाद है।
दिलपे रखकर हात कहिये क्या देश वो आझाद है ?"
"मै सरहदपे खडी दीवार नही हूँ
मै तो हूँ दीवार की दरार, सब का स्वागत
करनेवाली ।"
या कार्यशाळेत जकार्ताच्या सुप्रहाती आणि ताती कृष्णवती या मुस्लिम महिलांनी आपल्या देशातील स्त्रियांचे प्रश्न मांडले. आहे ना मजा ? सुप्रहाती - सुप्रभाती कृष्णवती संस्कृत शब्दाशी, भारतीय भाषांशी नाते सांगणारी नावे आणि त्यांचा देश इंडोनेशिया. स्थलांतरचा लोभ दाखवून अशियातील तरुण स्त्रियांना फसवणाऱ्या अनेक एजन्सीज आहेत. आपल्या घराला दोन वेळच्या रोटीसाठी वा भावंडाच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या देहाचे हाल करीत पैसा पुरविणारी स्त्री, स्वत:च्या शब्दांत दुःख सांगू लागते तेव्हा काळही गोठून जातो. ती मैत्रीण सांगत होती-ज्या स्त्रिया निघृण प्रकारांना विरोध करतात, अशांच्या नावांची काळी यादी हाँगकाँगमध्ये तयार केली जाते. त्या यादीतील महिलांना नोकरीच्या बाबतीत मदत करण्यात येत नाही. ती मैत्रीण विचारीत होती, घरकाम, मुलांना साभाळणे, वृद्धांची सेवा करणे अशा कामांच्या नावाने परदेशात नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या, नकार दिल्यास बेदम मारणाऱ्या मालकांची काळी यादी कोण तयार करणार ?
हे सारेच प्रश्न मन उसवणारे आहेत आणि त्यासाठी स्त्रियांनी एकत्र येऊन 'त्रिंजन' भरवायला हवे. ज्यात मोकळेपणाने प्रश्न मांडता येतील. दु:ख मोकळे करता येईल. तिथे येणाऱ्या स्त्रिया नसतील सासवा, सुना... जावा... नणंदा. त्या असतील एकमेकींना साक्ष देणाऱ्या, एकमेकींना दिलासा देणाऱ्या, विश्वास... शक्ती देणाऱ्या मैत्रिणी. हे पंजाबी 'त्रिंजन' मराठी अंगणातही भरवता येईल की!!
■ ■ ■