मनतरंग/उत्तराच्या शोधातले प्रश्न

विकिस्रोत कडून



 अकाली वठलेल्या जुईसारखी ती समोर उभी होती. करपलेला सावळा रंग निस्तेज झालेला. उद्ध्वस्त डोळे, कपाळाला टिकली नाही. मळखाऊ रंगाच्या साडीचा दोन्ही खांद्यांवरून घेतलेला... जणू काहीतरी झाकण्यासाठी अंग भरून घेतलेला पदर. जमिनीत शिरणारी नजर.
 "ताई ओळखलंत का ? ही नमिता आहे" तिच्या आईने मला प्रश्न केला.
 "ओळख कशी विसरीन ? पण हिचं लग्न केलंत? आणि हे असं कधी घडलं?"
 गेल्याच वर्षी महाविद्यालयातून खेळात, नाटकात, वक्तृत्व स्पर्धेत भरपूर बक्षीसं पटकावणारी आणि विद्यापीठाच्या परीक्षेत आमच्या महाविद्यालयातून पहिली येणारी नमिताच ना ही ? "शिक्षण अर्ध्यातनं सोडून का केलंत लग्न ? यंदा बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असती ही!" माझ्या प्रश्नाच्या भडिमाराने तिची आई गांगरून गेली. हे प्रश्न माझ्या तोंडूनही आपोआप सुटलेले होते.
 ...मला क्षणभर आठवली दोन वर्षांपूर्वीची नमिता. तजेल तुळशीच्या झाडासारखा सावळा रंग. विलक्षण बोलके, तेजस्वी डोळे. महिरपदार ओठ, दाट केसांची पाठीच्या खालपर्यंत झुलणारी वेणी. एन.सी.सी त चमकणारी, स्नेहसंमेलन गाजवणारी ती नमिता आणि माझ्या समोरची, विशीच्या आत वैधव्याच्या शापाने निस्तेज झालेली नमिता.
 मी तिला आणि तिच्या आईला बसायला सांगितले. तिच्या आईला शांत होऊन नीटपणे काय ते सांगण्याची विनंती केली. प्रत्येक शब्द उच्चारताना त्यांचा ऊर भरून येत होता. एक वाक्य धड बोलणे शक्य नव्हते. नमिता मात्र गोठलेल्या बर्फासारखी बसून होती.
 ...गावातील एका बँकेच्या अधिकाऱ्याने नमिताला वक्तृत्व स्पर्धेत बोलताना पाहिले होते. धडाडीने बोलणारी, स्वच्छ आणि नेमक्या शब्दांत आपला विषय मांडणारी ही तरतरीत मुलगी कोण ? त्याने सहज चौकशी केली. आणि ती त्याच्या जातीतली निघाली. एक तर ही जात महाराष्ट्रात क्वचितच आढळणारी. त्यातून शिकलेल्या मुली शोधून मिळणे कठीण. या अधिकाऱ्याचा धाकटा भाऊ पुण्यातील एका कारखान्यात कामाला होता. इंजिनियरिंगचा डिप्लोमा झालेला असल्याने पगारही भरपूर होता. घरातला धाकटा मुलगा म्हणून लाडावलेला. आपल्या भावासाठी ही मुलगी योग्य नव्हे तर अतियोग्य आहे हे पाहून त्याने नमिताच्या वडिलांच्या घरी घिरट्या घालायला सुरुवात केली. तिचे वडील सरकारी शाळेत चपराशी म्हणून काम करणारे. लग्नासाठी जवळ पैसा तर हवा ना ? त्यामुळे त्यांनी नकार दिला. परंतु हुंडा न देता, चार पैसे खर्च न होता लेकीचे लग्न होतेय म्हटल्यावर त्यांनीही होकार दिला आणि महाविद्यालयाची दुसऱ्या वर्षाची पायरी न चढताच नमिता बोहोल्यावर चढली.
 पहिले चार महिने बरे गेले. परंतु नवऱ्याला रात्री खोकला येत असे, भूक लागत नसे. पण 'दुसरी भूक' मात्र आवरत नसे. दोन दिवसांचे माहेरपणही कधी मिळाले नाही. खोकल्याबरोबर तापही येऊ लागला आणि डॉक्टरांनी निदान केले की नवऱ्याला एड्सची लागण झाली असून केस अखेरच्या टप्प्यावर आहे. विवाहानंतर अवघ्या चौदा महिन्यात नमिता वैधव्याचा कोरा पट्टा घेऊन माहेरी आली. एन.सी.सी च्या शिबिरात, महाविद्यालयात एड्स या महाभयानक रोगाबद्दल नमिताने ऐकले, वाचले होते आणि म्हणूनच तिने माहेरी आल्यावर आईजवळ आग्रह धरला की तिचीही एच.आय.व्ही. टेस्ट करावी. वडिलांना कसलीही कल्पना न देता मायलेकींनी पॅथॉलॉजिस्टकडून शरीरविकृती प्रयोगशाळेतून तपासणी करवून घेतली. तपासणीचा निकाल सकारात्मक होता. कोणताही अपराध नसताना, कोणतीही चूक नसताना एका निष्पाप... निरागस मुलीच्या शरीरात नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणातून 'एच.आय.व्ही' विषाणू शिरले होते.
 नमिताच्या मनात एकच विचार होता आत्मघाताचा. या विचाराची चाहूल लागल्यामुळे आई बावरून गेली होती. वडिलांच्या कानांवर ही गोष्ट जाताच ते नमिताच्या वडील दिराचा खून करण्याची भाषा दारूच्या नशेत बोलू लागले. दारूचे व्यसन अधिक वाढले. धाकटा भाऊ बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्गात होता. त्याला भीती वाटते आहे की, बहिणीचा रोग आजूबाजूच्या लोकांना कळला तर लोक आपल्याला बाजूला टाकतील. समाजात बदनामी होईल. लग्न झालेल्या मोठ्या दोघी बहिणींना या बाबतीत एक अक्षरही कळता कामा नाही. असा धाक त्याने सर्वांना घातला आहे. नमिताला तात्काळ लांबच्या महिलाश्रमात ठेवावे. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या विमापॉलिसीचे पैसे बँकेत ठेवून येणाऱ्या व्याजात तिची सोय करावी आणि भविष्यात त्यानेही त्यात पैशाची भर टाकून हा प्रश्न कायमचा सोडवावा. पण नमिताला तात्काळ इथून दूर... दूर पाठवावे हा त्याचा हेका.
 ...हे सारे प्रश्न घेऊन अकाली वठलेल्या जुईवेलीसारखी नमिता आणि तिची आई माझ्यासमोर उभ्या आहेत. उत्तर शोधण्यासाठी माझ्यासमोरच नव्हे तर समाजासमोर... संस्कृतीसमोर उभ्या आहेत. उत्तर शोधण्यासाठी मदत करणार आहोत ना आम्ही ? आज एक नमिता समोर आहे पण गावागावांतील अशा नमितांची संख्या वाढतेय याचे भान ठेवणार आहोत का आम्ही ?

■ ■ ■