मनतरंग/गोरे पान उरी केळीचे फाटते

विकिस्रोत कडून

 त्या दिवशी रात्री अलकॉम (अल्टर्नेट कम्युनिकेशन्स फोरम) आणि माध्यम या स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेला, 'इलयुम मल्लम' हा चित्रपट छोट्या पडद्यावर पाहण्याचा योग आला. या दोनही संस्था, कम्युनिकेशनच्या... संवादाच्या विविध माध्यमातून परिवर्तनाचा विचार सर्वांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत असतात. या शब्दाचा अर्थ आहे, पाने आणि काटे. पाने काट्यावर पडली काय किंवा काटे पानांवर पडले काय, परिणाम एकच फाटतात पानेच!! काट्यांना काय त्याचे?
 पल्लवी जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात चार मैत्रिणींची कथा आहे. शांता, पार्वती, लक्ष्मी आणि श्रीदेवी या त्या छोट्याशा गावातल्या चार मुली. हातमागाच्या कारखान्यात रोजंदारीवर जाणाऱ्या, कारखान्यात जाताना... येताना चौघीही बरोबर असत. एक तीळ चारजणीत वाटून खाणाऱ्या. अगदी जीवश्च कंठश्च मैत्रिणी. त्यांनी नुकतेच बालपण ओलांडले आहे. नव्या वयासोबत स्वप्नांचे झुले डोळ्यात झुलू लागतात. मनही चंचल बनते. मनात नवे विचार नवे अनुभव, नवे प्रश्न यांचे तरंग उठू लागले आहेत. घरातून-समाजातून सतत सांगितले जाते की मुलींनी मान खाली घालून चालावे. स्त्रिया सोशीक असतील तरच घर सुखी राहते. थोडे फार शिकलेल्या, घाम गाळून घरासाठी पैसे मिळविणाऱ्या या पोरींना ही शिकवण बोचत राहते. आम्ही पुरुषांइतकेच कष्ट करतो. घरासाठी चार पैसे मिळवतो. मग आम्ही मार का खायचा? अपमान का सोसायचा? रोज दारू पिऊन येणाऱ्या व मुलांदेखत त्यांच्या आईला गुरासारखे बडवणाऱ्या बापाला शांता.. पल्लवी अडवते आणि चार शब्द सुनावते. त्या क्षणी बापाच्या नजरेत उमटलेला संताप, तुच्छता तिला अस्वस्थ करते. या काळात त्यांच्यातली पार्वती हिचा विवाह होतो. मधुर स्वप्नांचे नाचरे सूर ओंजळीत घेऊन पार्वती सासरी जाते. हुंड्यातील न दिलेल्या रकमेसाठी तिचा सतत छळ होतो. बापाकडे पैसा नाही. सासरी मार आणि उपासमारीचा मारा. अवखळ, गोड, गुणगुणत चालणारी पार्वती, या त्रासाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेते. तिच्या या अघोरी मृत्यूची जखम शांताचे मन सोलून काढते. आता फक्त तिघी मैत्रिणी उरतात. रानातील एकाकी रस्ता या सैरभैर मुलींना बोचू लागतो. त्यांच्यातला मनमोकळेपणा हरवून जातो. गावातल्या तरूण टवाळांचे टोळके कायम झाडाखाली पत्ते खेळत, बिड्या ओढत बसलेले असते. या बेकार पोरांचा उद्योग एकच, स्त्रियांची छेड काढणे. त्या टोळक्याचा म्होरक्या या मैत्रिणींची उद्धटपणे छेड काढतो. शांता खाड्कन् त्याच्या थोबाडीत मारते. एका मुलीने, भर रस्त्यात, मित्रांसमोर केलेल्या अपमानाने उखडलेला तो 'दादा' मित्रांना हाताशी धरून एक दिवस कामावर चाललेल्या शांताच्या व मैत्रिणींच्या अंगावर दारूची बाटली रिकामी करतो आणि गावात अफवा उठवतो की या तिघी दारू पितात, आणि त्यांचे पुरुषांशी संबंध आहेत. या मुलींची निरागसता जाणणारा, त्यांना मदत करणारा नावाडी या अफवेला बळी पडतो. त्या संध्याकाळी या मैत्रिणींना पल्याड पोचवताना त्यालाही दारूचा वास आलेला असतो. पाण्याने अंग धुतले तरी कपड्यांचा वास कसा जाणार ? घर, गाव समाज... या सर्वांपासून एकाकी पडलेल्या तिघी निराशेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात, शांता, लक्ष्मी कधीच परत न येण्यासाठी समुद्रात शिरतात पण श्रीदेवीला मात्र धीर होत नाही. या दोघींचे निरागस, निष्प्राण देह पाहून गाव जागे होते. श्रीदेवी धाई धाई रडून सर्वांसमोर सत्य ठेवते. गाव पस्तावते. शांता-लक्ष्मीच्या मृत्यूनंतर गावाला मुलींच्या कोवळ्या आणि निरपराधी तना-मनाची साक्ष पटते.
 त्या बेशरम टोळक्याच्या म्होरक्याची पत्नी आपल्या अपराधी नवऱ्याला घरात घेत नाही. एवढेच नाही तर वैधव्याचे कपडे घालून, ज्या हातमाग कारखान्यात या मैत्रिणी जात असत तिथे जाते. आता त्या ठिकाणी असते फक्त श्रीदेवी, एकटी... हरवलेली. पण ही नवी मैत्रीण मिळाल्यावर तिला भास होतो की शान्ता, पार्वती, लक्ष्मी नव्या रूपात, नव्या जोमाने नवे धाडस घेऊन परतल्या आहेत.
 ही कथा मातृसत्ताक जीवनव्यवस्थेच्या खुणा आजही ज्या प्रांतात आढळतात त्या केरळातली आहे. मग इतर भागातील स्त्रियांच्या अनुभवाबद्दल काय बोलावे?
 तो चित्रपट पाहताना, चित्रपटाचे नाव वाचून आठवत होती, कवी कांतांची कविता -

"गोरे पान उरी केळीचे फाटते...."


■ ■ ■