मनतरंग/एक बसन्ती नाते
८ मे १९९४ चा दिवस. त्या भव्य, निर्मनुष्य पण रंगीबेरंगी मोटारींच्या वेगाने शहारणाऱ्या रस्त्यावरच्या प्रत्येक कोपऱ्यावर फुलांचे देखणे थवे, हारीने मांडून काही महिला उभ्या होत्या. एक तर इथे माणसे, तीही शांतपणे उभी असलेली क्वचितच दिसणार. मग तरीही या महिला कोण ? हा प्रश्न माझ्या मनात. तो दिवस मातृसन्मान दिवस... 'मदर्स डे' होता. हरेक मूल मग ते सत्तरी ओलांडलेले का असेना, त्याच्या नव्वदीतल्या आईला या दिवशी भेटणारच ! अगदी चिमुकले पिल्लू त्याच्या तिशीतल्या 'माय' ला फुले नि शुभेच्छा देणार. मला तर ती कल्पना...विशिष्ट दिवशी आईचा जाणीवपूर्वक सन्मान करण्याची कल्पना अगदी हृदयापासून भावली. आमच्याकडे ज्या घरातील पुत्रवती स्त्री मरण पावली असेल तिच्या नावाने भाद्रपद कृष्ण नवमीस सौभाग्यवंती पुत्रवतीस जेवण देण्याची प्रथा आहे. त्याला 'आईनवमी' म्हणतात. पण त्यात कारुण्य असते. मृत आईची ती आठवण असते. पण ८ मे हा दिवस युरोप-अमेरिकत उत्साहाने साजरा होतो तो मातृसन्मान दिवस म्हणून. गेल्या काही दिवसांपासून व्हॅलेंटाईन डे...प्रेमबसंती दिवस साजरा करण्याची चर्चा दूरदर्शन, वर्तमानपत्रे यांतून होताना दिसली. त्यामुळे मी अनुभवलेला मातृदिवस मला आठवला. त्या दोन-तीन दिवसातला उत्साह पाहून त्यावेळी मीच माझ्या मुलांना फोन करून मनातला आनंद त्यांच्यापर्यंत पोचवला होता.
नाते मनाचे असते तसे तनाचे असते. तसेच ते विचारांचे असते. याची जाणीव या विशेष दिवसांच्या निमित्ताने करून घ्यायची असते आणि करून द्यायचीही असते. १४ फेब्रुवारी हा 'व्हालेंटाईन डे' तरुणाईच्या गालावर गुलाबी रंग असतोच. ती गुलाबी माधुरी व्यक्त करणे मात्र अती अवघड. शब्दसुद्धा जुळताना दगडासारखे कठोर वाटायला लागतात. अशावेळी आपल्या मनातल्या 'माणसा'ला फुलांची भेट देऊन प्रेमाची बसंती चाहूल जाणवून देणे सोयीचे नि सोपेही. त्यासाठी तर हा दिवस ! पण भावनेचा जेव्हा बाजार मांडला जातो तेव्हा त्यातील कोमलता संपून जाते. तरुणाईत प्रवेश केला की मानवी मनाला बसंती मोहर फुटू लागतो. एखादी व्यक्ती सतत डोळ्यासमोर येऊ लागते. हे नैसर्गिक असले तरी निसर्गाला माणसाने तरी मोकाट सोडून चालणार नाही. नैसर्गिक भावनांचे सामाजिकीकरण करून त्याला नैतिक, सांस्कृतिक आधार द्यावा लागतो, बळ द्यावे लागते.
भारतीय मातीने प्रेमाला मूल्य मानले आहे. म्हणूनच मूळ महाभारतात अस्तित्वात नसलेली 'राधा' प्रीतीचे मधुगंध घेऊन श्रीकृष्णाशी जोडली गेली. ज्या तत्त्वासाठी माणूस समर्पित होण्यासाठी तयार होतो त्याला आपण 'मूल्य' म्हणतो. कवी गोविंदाग्रजांच्या 'प्रेम आणि मरण' या कवितेत विजेवर जीव टाकणारा वृक्ष म्हणतो, “क्षण पुरे एक प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा' आणि मृत्यूला कवटाळतानाही तो अखेरच्या क्षणी बहरून जातो.
प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी ! ही ओळ आम्हीही चाळीस वर्षांपूर्वी समर्पून प्रेम केले तेव्हा सतत आळवली. इतकेच काय प्रेमाची बांधीलकी तनापेक्षा मनाची असते हा संस्कार कवितांतून भवतालच्या वातावरणातून मिळाला. अशा किती तरी ओळी -
"काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या वेशीवर उभे दिवसाचे दूत ।"
"गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच ती विलसतसे लाली ।"
"रेशमी पदरात या अग्निफुले मी वेचिली
धुंद होऊन चालताना वेदना ओलांडली ।"
आज 'व्हॅलेंटाईन डे' या एका मधुर पाश्चात्त्य बसंती दिवसाचे अनुकरण करताना आमच्या मातीतून उगवलेल्या संस्कारांची आठवणही ठेवायला हवी. आज प्रेमाला 'मूल्य' आहे का ? ते केवळ शरीराशी...त्याच्या आकार उकारांशी जोडलेले आहे. गदिमा एका ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणतात, शरीराच्या जवळिकेतून मनाच्या बांधीलकीपर्यंत... आत्मिक नात्यापर्यंत कसे पोचलो हे कळलेच नाही. प्रेमातही प्रवास शरीराच्या माध्यमातून सुरू झाला तरी त्याचा न संपणारा शेवट हृदयात्म्यापर्यंत, मनापर्यंत असतो. म्हणूनच प्रेयसीला वचन देताना भा. रा. तांब्यांच्या ओळी तनामनात घुमवायच्या असतात,
"...तिन्ही सांजा सखे मिळाल्या
देई वचन तुला
आजपासून जीव अधिक तू मला..."
"दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचेऽऽऽ"
■ ■ ■