मनतरंग/जगणे आणि शिक्षण

विकिस्रोत कडून

 लाल दिव्याच्या सिग्नलपाशी आमची गाडी थांबली. लगेच गजरे विकणारी लहान मुले, सायंकाळची दैनिके विकणारी मुले गिऱ्हाइकांना गाठण्यासाठी त्या मोटारींच्या गर्दीतून भिरभिरू लागली. इतक्यात माझे लक्ष त्या चटपटीत मुलीकडे गेले. हातात गाडी पुसण्यासाठी मऊ फ्लॅनेलचा कपडा घेऊन गाडी पुसण्यासाठी ती पुढे आली होती. काळीसावळी, पाणीदार मासोळी डोळ्यात भरभरून काजळ घातलेले. झगझगीत नायलॉनचा ड्रेस. ओठ रंगवलेले मानेपर्यंत लोंबणारे झुम्मक झुलते डूल.
 "साब, एक मिनट मे कार चकाचक करदेती. सिर्फ दो रुपये, साब पढती हूँ मैं, नहीं मत कहेना..." "कौनसे. क्लास मे हो" मी प्रश्न विचारला आणि ती क्षणभर अडखळली. 'कौनसे स्कूलमे पढती हो...? सच जाती हो...?" पुन्हा माझा प्रश्न. मग मात्र तिनं माझ्याकडे काहीसे रागावून पाहिले. तिच्या हातात दोन रुपये पडले होते. ती दिसेनाशी झाली. तरीही माझ्या मनात मात्र रेंगाळत राहिली. हातात तान्हुलं घेऊन पोटासाठी भीक मागणाऱ्या बायका अशा लाल दिव्याच्या थांब्यापाशी नेहमी दिसतात. पण, भीक न मागता गाडी पुसून पैसे गोळा करणारी ही मुलगी. तरीही तिच्याबद्दलचा अविश्वास का मनात उगवला ? तिच्या पोषाखामुळे ? 'शिक्षण आणि पोषाख, शिक्षण आणि वागण्याची रीत यांच्यात नाते असते का ? असावे का ? आणि जगण्याच्या धकाधकीत ते नाते आम्हांला बांधता येते...? आकंठ इच्छा असली तरीही...?
 "भाबी, ते अमूक अमूक पी.एस.आय. तुम्हाला भेटायचं म्हणतायेत. कधी घेऊन येऊ ?" आमच्या कार्यकर्त्याने विचारले.
 "आता दिवाळीच्या घाईत कुठे भेटणार ?" माझी अडचण मी सांगितली.
 "पण त्यांची अडचण त्यांनी कोणाजवळ सांगावी ? काढा एक तास." या आग्रहापुढे मी मान तुकवली.
 "ताई, आठ दिवसांखाली, आमच्या एवढ्याशा गावातल्या एस.टी. स्टँडमागच्या बाजूला असलेल्या एका घरावर आम्ही भर दुपारी धाड टाकली. एका घरवाल्या बाईला तिच्या घरातल्या चार पोरींसह पकडले. काय सांगू तुम्हाला, त्या दोन बाया शिकलेल्या आहेत. एक विधवा आहे. नवरा अपघातात मरण पावला. दोन लहान पोरं आहेत. सासरच्यांचा आधार नाही. माहेरी फक्त दोन भाऊ आहेत, ते विचारीत नाहीत. पोरांच्या शिक्षणासाठी या बाईला हा मार्ग शोधावा लागला. बी.ए. झाली ती लग्नानंतर. जेमतेम पंचेचाळीस टक्के मार्कस् आहेत. तिला कोण देणार नोकरी ? दर दर भटकली. शेवटी या घरवाल्या बाईने तिला ही वाट दाखवली. तिचे पितळ उघडे पडले तर बहिणीकडे ठेवलेल्या मुलांचा आधार तुटेल. बहिणीकडे शिक्षणासाठी लेकरं ठेवली आहेत. महिन्याला आठशे रुपये पाठवते. धाईधाई रडून विनवतेय की, असे करू नका. काय करावं ते मलाही सुचेना. गाव लहान आहे. काही गवगवा होण्यापूर्वी तुमच्या संस्थेत ठेवून घ्याल का ? निदान तिच्याशी बोला. तिला काही मार्ग दाखवाल का ?" तो तरुण अधिकारी कळकळीने बोलत होता.
 "आणि दुसरीचं काय ?" मी नकळत विचारले.
 "ती नखरेलपणाला आणि चैनीला चटावलेली खेड्यातली मुलगी आहे. ताई शिक्षणामुळे चांगले संस्कार होतात ही संकल्पनाच आता बदलावी लागणार बहुदा. खेड्यातली मुलगी १० वीला बरे मार्कस् पडले म्हणून बापाने तालुक्याला शिकायला ठेवली. पण मैत्रिणींच्या नादाने टी.व्ही. वरच्या झी, सोनी या चॅनेल्सचा धांगडधिंगा पाहायला चटावली. नको तो धीटपणा दाखवला, मग व्हायचे तेच झाले. गर्भ पाडून घेण्यासाठी शहरात गेली. घरच्यांना कळले. त्यांनी घरातून हाकलून दिले. या बाईचा पत्ता शोधीत आमच्या तालुक्याला आली. कॉलेजही करते नि हा धंदाही ! मुलगी हुशार आहे. पश्चात्ताप झालाय. तिच्याशीही बोला. या मार्गातून दूर जाण्याची, कष्ट करण्याची इच्छा दोघींना दिसतेय. मीही मदत करायला तयार आहे. चुकीच्या वाटेन पुढे जाण्याआधी दोन पावलांतच मागे फिरल्या तर उद्याचे जीवन बरे जाईल... ताई दिवाळीनंतर भेटतो. प्लीज विचार

करा..."
 सामाजिक न्यायाची जाणीव ठेवणारा पोलीस अधिकारी पाहून मलाही कौतुक वाटले.
 पण काय उत्तर आहे आमच्याजवळ ? शिक्षण आणि जगणे यांचे नाते आहे का शिल्लक ? अशा असंख्य शिक्षित स्त्रिया आहेत. पण ते शिक्षण म्हणजे... त्यात जगण्याच्या रीती, नीती यांचा ताळमेळ आहे का ?
 ज्या देशात दोन वेळच्या भाकरीसाठी 'शील' विकावे लागते त्याला 'राष्ट्र' म्हणायचं का?

■ ■ ■