Jump to content

मनतरंग/अन्नदा...शांकभरी नि फास्ट फूड!

विकिस्रोत कडून



 दिवाळीतल्या थंडीचा सुखद गुलाबी काटा आता चांगलाच बोचू लागलाय. डिसेंबरमधल्या थंडीला 'चावरी' म्हणतात ते उगाच नाही ! मार्गशीर्षातली थंडी पडायला लागली की शेतंभातं, परसबागा टवटवीत भाज्यांनी रसरसायला लागतात. तऱ्हेतऱ्हेच्या शेंगा, चवळी... मटकी... मुळ्याच्या डिंगऱ्या, गवार, उसावरच्या शेंगा, भेंडी, मुळा, गाजर, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी. त्यांच्या जोडीला डोळ्यांना मोह घालणारी हिरवीगार मेथी, पालक, चवळाई, आंबटचुका, शेपू, पोफळा, तांदुळजा, माठ घोळ अशा अनेक पालेभाज्या. दुधी भोपळा, चक्रीभोपळा, लाल भोपळा, काकड्या, ढब्बू मिरची, मटार, कर्टूली... शेकडो तऱ्हेच्या भाज्यांनी मंडई फुलून जाते आणि याच काळात शांकभरीचे नवरात्र वाजतगाजत दारात येते.
 या नवरात्राची कथा अशी. हजारो वर्षांपूर्वी प्रचंड दुष्काळ पडला. माणसे अन्नविना मरू लागली. त्यावेळी या देवीने आपल्या देहातून तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती निर्माण केल्या. त्या वनस्पती खाऊन माणसांना जगणे शक्य झाले. 'आत्मदेह समुद्भव' असे आत्मविश्वासाने आश्वासन देत अन्न निर्माण करणारी ही देवी. तिची आठवण 'शाकंभरी' नवरात्राच्या निमित्ताने ठेवली जात असावी.
 निसर्ग आणि आमचे सणवार यांचे नाते अगदी जिवाभावाचे. मार्गशीर्ष आला की लग्नाचा मौसम सुरू होतो. सुगी हाती आल्याने खिशात चार पैसे खुळखुळायला लागले असतात. अशावेळी लग्नाचा बार उडवणे सोयीचे असते. थंडीची लाट आली की धुंधुर्मास आठवतो. चमचमीत खिचडी, तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरी, हिरव्याकंच मिरचीचा झणझणीत खुडा, पांढऱ्या ढोबळ्या वांग्याचे भरीत; असा पाणीदार बेत आणि हा खाण्याचा सजाबाजा सूर्यमहाराज क्षितिजाआडून डोकावण्या आधीच उरकायचा. आजकालच्या शीघ्रवेगी जगण्यात धुंधुर्मास फक्त 'कालनिर्णय' कॅलेंडरवरच उरलाय आणि माझ्यासारख्या आजीच्या गोष्टीत जाऊन बसलाय. पण आज पन्नाशीसाठीचा उंबरठा गाठणारे दूरवर पल्याड पोचले की तो गोष्टींतून ही हरवणार आणि कदाचित २१ व्या शतकातल्या दिनदर्शिकेवरूनही !
 याच काळात गुजरातमध्ये उंधियोची धमाल असते. अर्थात या धरित्रीच्या गर्भागारात शिजणाऱ्या पदार्थाची चव पाहायची तर शेतातच जायला हवे. कच्ची केळी, तऱ्हेतऱ्हेच्या शेंगा... वालपापडी, चवळी, तुरीचे दाणे, कोनफळ, रताळी, बटाटे... जी जी भाजी हाती लागेल ती सुरेख मडक्यात बुडाला तेल घालून घालायची. शेंगादाणे हवेतच. त्यात मीठमिरचीचा ठसका. मग ते मडके खड्ड्यात निखाराघालून ठेवायचं. मडक्याचे मातीचे झाकणही चिक्कणमाती लावून बंद करायचे. वरून निखारा पसरायचा आणि मग खुशाल शेतात हिंडायला जायचे. अचानक नाकाला खमंग वास येऊ लागतो की आपोआप पाय उंधियोच्या दिशेने जाऊ लागतात. असे म्हणतात की सर्व प्रकारच्या सुगंधाचे अत्तर तयार करता येईल, परंतु पहिल्या पावसाच्या स्पर्शाने बहरलेल्या मातीच्या गंधाचे... मृद्गंधाचे अत्तर कोण तयार करू शकणार ? तसेच धरित्रीच्या उबदार स्पर्शाची चव उंधियो, हुर्डाहुळा यासारख्या शेतातल्या पदार्थांनाच येणार !!
 आमच्या शरीराची आणि मनाची नाळ या मातीत पुरली आहे. यंत्रांची, नवनवीन शोधांची भेंडोळी वाढत गेली तरी, पोट भरण्यासाठी आम्हांला धरणीवर, मातीवर निर्भर राहावे लागणार ! शेवटी 'अन्नदा' (अन्नदायिनी) तीच, हरितलक्ष्मी तीच ! व्हिटॅमीनच्या गोळ्या खाल्ल्या तरी, पिठलं नि भाकरीच्या चवीच्या गोळ्या कोण तयार करणार ? आणि जोवर 'अन्न' हे आमचे जीवन आहे तोवर 'शांकभरी' आमच्या तनामनात, नसानसात, सणावारात जिवंत राहणारच !

■ ■ ■