मनतरंग/या ओल्या...करुण कडांचे भान हवे!

विकिस्रोत कडून



 दसरा जवळ आला की, फटाक्याचे आवाज घुमू लागतात. यंदा तर राजकीय दसरा-दिवाळीही त्याच सुमारास आली होती. आनंदाचे-उत्सवाचे तुफानही आगदी दोनशे पन्नास किलो मिटर्सच्या वेगाने धावले. हा आनंद स्वाभाविक आहे हे खरेच. पण तरीही या आनंदाला स्पर्श असलेल्या करुण ओल्या कडांचे भानही आपण सामान्य माणसांनी ठेवायला हवे.
 ओरिसाच्या समुद्रकिनाऱ्याला बेभान वादळी झंझावाताने झोडपून काढले. त्यात नद्यांच्या पुराचे थैमान. चाळीस फुटांपेक्षाही उंच समुद्री लाटांनी किनाऱ्यावरच्या गावांना बेसहारा केले. एक कोटी माणसे या वादळाने बेघर झाली आहेत. आमचे जवान केवळ कारगिल सीमेवरच लढून देशाचे रक्षण करीत नाहीत तर नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या जीवांना मृत्यूच्या दाढेतून काढण्याचे कामही तेच करतात आणि तेही अत्यंत शिस्तीत. भूकंप झाल्यानंतर सैन्यातील अधिकाऱ्यांसमवेत जवानांनी केलेल्या कामाचा झुंजार वेग, त्यातील शिस्त जवळून पाहता आली होती. हे सगळे खरे पण आम्ही आमच्या दिवाळीच्या चैनीत, फटाक्यात थोडी काटकसर करून ओरिसातील बांधवांसाठी मदत पाठवणार आहोत का ? क्लिंटन यांनी अकरा कोटी डॉलर्स दिले. ते महत्त्वाचे आहेच. पण तरीही भारतातल्या चिमुकल्या खेड्यातील शाळेतल्या मुलाने आपल्या खाऊतली व फटाक्यातली बचत करून अकरा रुपये पाठवले तेव्हा ती रक्कमही अकरा कोटींएवढीच महत्त्वाची असते. पण असा विचार कोणी बोलून दाखवला की लगेच कोणीतरी शहाणपण शिकवते,
 "अहो, ही मदत नेमक्या लोकांपर्यंत पोचते का ? की मध्येच हडप-गडप ?"
 "अहो, या मंत्र्याच्या खिशात गेलेले कोट्यवधी रुपये आधी काढा नि मग सामान्य माणसांच्या भावनेला आवाहन करा. त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाहीत. लक्ष फक्त आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांवर !"
 एकूण काय, गेल्या काही वर्षांत आमच्या चालल्या आहेत. अनुकंपा... करुणा... वेदना... दुःख हे शब्द 'लेखात' वापरण्याइतकेच कार्यक्षम राहिले आहेत. एकूण जीवनच इतके 'फास्ट' वेगवान झाले आहे की, माणूस समोर येणाऱ्या क्षणातले सुखच फक्त पाहतो. हा क्षण, या क्षणातले सुख उपभोगले नाही तर जणू हातातून खूप काही निसटून गेले-हरवले अशी भावना माणसाच्या मनात येते. दिसणाऱ्या, हाताला...डोळ्यांना...कानांना स्पर्श करणाऱ्या सुखामागे माणूस लागला आहे. पण 'मना'चे काय ? मनाचेही सुख असते, समाधान असते, तृप्ती असते. ती मिळवण्याचा विचार करतो का आम्ही ?
 वर्तमानपत्रात बातमी वाचली. लातूर परभणी येथील तरुणांनी 'बचपन बचाओ' आंदोलनाच्यावतीने पणत्या घेऊन शोभायात्रा काढली. फटाके म्हणजे दिवाळीचा आनंद. किती मोठ्या आवाजाचा बॉम्ब उडवता, किती वेळ वाजत राहणारी फटाक्यांची माळ उडवली यावर दिवाळी किती जोरात साजरी केली याचे मोजमाप. फटाके तयार करण्याच्या अत्यंत धोकादायक व्यवसायात सर्वात जास्त बालमजूर काम करतात. अनेकांचे डोळे निकामी होतात, दारू हाताळल्याने कातडीचे रोग होतात, हे सारे का करायचे ? तर दोनवेळा भाकर पोटात जावी म्हणून. त्यात अवघे बालपण जळून-करपून जाते. म्हणून ते फटाके लोकांनी विकत घेऊ नयेत, घरातील लहान मुलांपर्यत या बाल मजुरांची व्यथा जावी म्हणून हे 'जनजागृती अभियान'.
 "अहो, जर फटाक्याचे कारखाने बंद झाले तर खाणार काय ते ? उलट फटाके भरपूर विकत घेऊन मुलांना मदत केलेली चांगली." अशी मखलाशी करणारेही भेटतात. पण मग असे का होऊ नये ? बालमजुरांना शिक्षण मिळावे, दोन वेळचे अन्न मिळावे, त्यांचे बालपण त्यांना अनुभवता यावे यासाठी प्राथमिक शाळेतील मुलांचे प्रबोधन करायला हवे. गाण्यांतून, गोष्टींतून, नाटुकल्यांतून. त्यांनी फटाके उडवणे कमी करावे, टाळावे आणि किमान दहा रुपये या 'बचपन बचाओ' जन अभियानाला द्यावे. तेरेदेस होम्स, युनिसेफ आणि अनेक स्वयंसेवी संस्था हे काम करतात. परंतु सर्व राष्ट्रांनी यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे.
 पंडित जवाहरलाल नेहरूचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून साजरा करण्याची प्रथा पाळली जाते. ती हळूहळू रूढी बनू लागली आहे. आपणास दिसणारे बालमजूर, अनाथ मुलं, त्यांचे परिस्थितीमुळे होणारे शोषण पाहिल्यास असे समारंभ केवळ उपचारादाखल केले जातात हे लक्षात येते. ज्या मुलांच्या आयुष्याला आकार व आधार मिळायला हवा, ती मुलं स्वतःच्या चिमुकल्या हाताने आपली भाकरी मिळवतात व स्वावलंबनाचे धडे कोवळ्या वयातच गिरवायला शिकवतात. अशी मुलं खरं तर बालकदिनाच्या दिवशी कुठे तरी कामावर जुंपलेली असतात.
 जोपर्यंत बाल कामगारांचे प्रश्न काही प्रमाणात सुटणार नाहीत तोपर्यंत 'बालदिन' खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येणार नाही. पं. नेहरूंच्या जन्मदिनी आम्ही 'बालदिन' ठरावीक पद्धतीने एक 'विधी' म्हणून साजरा करतो पण तो खऱ्या अर्थाने कधी 'साजिरा' होणार?

■ ■ ■