मनतरंग/कम्युनिकेशन गॅप
Appearance
< मनतरंग
युगायुगाचे बंध झुगारून आज सिपना नदी नुस्ती उफाणतेय. माजावर आलेल्या वाघिणीसारखा तिचा खर्जातला धुमसता आवाज. जणू दुर्गेशनंदिनी. कठोर देखणे रूप घेऊन काळावर धडका देत धावणारी आणि तिच्या अल्याड अडकलेले आम्ही.चार दिवसांपूर्वीची सकाळ. समोर उभा होता आमच्या स्वागतासाठी सागाचा घनदाट परिवार. डोंगराला पाठ देऊन उभी असलेली कुटुंबातील वडीलधारी झाडे, रुंदबंद पानांवर खानदानी नर्म हासू घेऊन उभी होती. त्यांच्या पुढ्यात कुटुंबातील प्रौढ झाडे अदबीने उभी. साऱ्यांचेच माथे चांदणफुलांच्या नाजूक जाळीने सजलेले. आणि पायाशी उभी आहे चिमुकल्या झाडांची दाट पिलावळ. सेमाडोहच्या परिसरात आल्यावर वाटले की हिरव्या पानेरी समुद्राच्या तळाशी, निवान्त राज्यात आम्ही आलोय. हऱ्याभऱ्या वनखात्याच्या हरितसंकुलात शिरताना 'सिपना' पार करावी लागते, सिपन म्हणजे सागाचे झाड, सिपना... सागाच्या घनदाट बनातून वाहणारी नदी. 'सिपना' च्या चंद्राकार पात्राच्या काठाने तंबूवजा विटा नि सिमेंटच्या राहुट्या उभ्या आहेत.सिपना डोंगरावरून उड्या घेत येते. त्यामुळे तिच्या प्रवाहात एक घुमता नाद आहे. तो नाद ऐकत, भवतालचे निवांतपण तनामनात रुजवीत काही लिहावे, लिहवून घ्यावे यासाठी लोकसंख्या शिक्षण विकास कार्यक्रमांतर्गत २०-२२ लेखक एकत्र आले आहेत. डोळ्यांनी भरभरून साठवून घेतले तरच लेखणीतले प्राण जागणार. कागद, पेन सारे काही जवळ आहे पण डोळे या घनघोर हिरवाईने बावरून गेलेले. कान वाघाची डरकाळी ऐकायला आसावलेले. मधूनच मोरपंखांची क्षणभरच लकाकून सुम्म होणारी सळसळ. माकडांची वर्दळ मात्र बिनधास्त. हे सारं निरखताना भोवतालच्या डोंगरातील कोरकूशी बातचीत करताना दोन दिवस कसे गेले कळले नाही. इथे आल्यापासून आकाश पावसाळी ढगांनी घेरलेले होते. रिपरिपही सुरू होती. दिवसा थोडीफार उघडीप असे, पण रात्र मात्र धुवाधार पावसाची. त्यातून सागाच्या रुंद आणि दडस पानांवर थेंब पडले की त्याचा आवाज अधिकच घुमटदार बने. माझ्या लहानपणी नवरात्रात शेजारच्या घरी मंत्रजागर केला जात असे. एकासमोर एक असे, आठ दुणे सोळा वेद जाणणारे गुरुजी बसत. आधी एक गट काही मंत्र गाई. त्यानंतर दुसरा गट. चढाओढीने हे मंत्र गायले जात. त्या साग वनातल्या पाऊसरात्री मंत्रजागराची सय जागवून गेल्या.
तिसऱ्या दिवशी पहाटे जाग आली ती सुसाट वेगवान आवाजाने. तो आवाज होता सिपनेचा, सिपनेच्या पात्राजवळ काही रुंद डेऱ्याचे अर्जुन वृक्षही आहेत. त्या अर्जुन वृक्षांना कवेत घेऊन सिपना फणफणत, फेसाळत, उड्या मारीत धावत होती.
चहा घेण्यासाठी संकुलाच्या उपाहारगृहात आलो तर कळले की सिपना नदीवरच्या पुलावरून किमान पुरुषभर पाणी वाहत आहे. आभाळ फाटावे तसा दिवसाही पाऊस कोसळत होता. सिपनेचे पाणी चढतच चालेले. त्यात कालपासून विजेनेही असहकार पुकारलेला. त्या अंधाराला मिट्ट म्हणावे की किट्ट म्हणावे यावर लेखकांची चर्चा सुरू होती. बाटलीत रॉकेल नि झाकणांला भोक पाडून त्यात जुन्या कपड्याची वात लावून पेटलेली दिवली. जेमतेम उजेडाची. त्यात लेखण्या चालाव्यात कशा ? दिवसभर चढत्या पाण्याकडे पाहताना उरातली धडधड वाढलेली होतीच. पलीकडच्या तीरावरची... अवघ्या चाळीस पन्नास मिटरवरची माणसे फक्त दिसताहेत. अंधारात तीही नाहीशी होतात. सेमाडोह या गावाचा एक चिमुकला भाग, गावापासून तुटून बाजूला पडलाय... 'साहेब, आज खिचडीच खावी लागणार. काल दुपारी गिरणीवर गहू पाठवले. सकाळी पीठ आणणार होतो, पण... मॅडम, चार सालाखाली सिपनेचा पूर करेक्ट सहा दिवस उतरला न्हवता. आमाले तर दोन दिस दाना खाया मिळाला नव्हता. चहाची पत्ती संपलीय. पण घाबरू नका. सागाची पान टाकून बी चा करता येतो...'
अंधार मिट्ट वा किट्ट होता की नाही कुणास ठाऊक ! पण अंगावर घोंघावत येणारा मात्र होता. मनासमोर उलगडत येत होती घराची लाखो चित्रे. एका लेखकाला तर मानससरोवरातील घटना आठवल्या. ही सिपना आपल्या झोपड्यापर्यंत तर येणार नाही ना ?... मग गटांगळ्या खाताना काय होत असेल? वगैरे, वगैरे.
आज संवादाच्या विविध साधनांनी आम्ही एकमेकांशी जोडलेलो असतो. मग ते रस्ते असोत वा विजेरी दिवे, रेडिओ वा टेलिफोन, वर्तमानपत्रे वा दूरदर्शन. अशा अनेक भौतिक यंत्रांनी आमच्यातले डोळ्यांना दिसणारे अंतर कमी केले आहे. साधा टेलिफोन नादुरुस्त झाला तर आम्हांला तुटल्यागत वाटते आणि इथे तर ना वीज, ना रस्ता, ना टेलिफोन. वायरलेस सुद्धा नदीच्या पलीकडे. तुटलेपणाची चिरत जाणारी जाणीव अनुभवताना मनात आले, या डोंगरातल्या डांगातून... कोरकूच्या वस्तीला ते डांगा म्हणतात... कशी राहात असतील ही माणसे ? कसा साधत असतील एकमेकांशी संवाद ? संवाद म्हणजे आधारच. जगण्यासाठी धीर देणारा, प्रेरणा देणारा. हिंमत देणारा.
वैरीण झालेल्या नदीमुळे तुटलेल्या संवादाचे कारण निसर्गाचा कोप असेल पण एकत्र राहणाऱ्या... एका घरात राहणाऱ्यांच्या मधले संवादही तुटलेले असतात. शेजारी झोपणाऱ्या, गरजेपोटी एकमेकांत शरीराने गुंतणाऱ्या पतिपत्नीमध्ये शेकडो कोसांचे अंतर असते. उफाणलेली सिपना दोन दिवसांत शांत होईल. मग रस्ताही सुरू होईल. निसर्गाने निर्माण केलेली 'कम्युनिकेशन गॅप' एक ना एक दिवस सांधता येते. पण मनांनी... धर्मानी... जातींनी निर्माण केलेली कम्युनिकेशन गॅप कधी नि कशी सांधली जाणार...?...?
■ ■ ■