मनतरंग/घर
Appearance
< मनतरंग
"ताई एस.टी. स्टँडवर एक पोरगी संध्याकाळपासून एकटीच हिंडत होती. चुकलेली असावी. तिला दोन रिक्षावाल्यांनी बळजबरीने रिक्षात घालून नेलया. आमी पोलिसांत फोन केला वता. पण त्ये काई दाद घेत न्हाईत. तुमी फोन करा, नाय तर काय तरी व्हईल."
हा फोन खरा की उगाचचा उद्योग ? असा प्रश्न मनात आला, तरीही हात आपोआप फोनकडे वळले आणि शंभर नंबर फिरवला गेला. पोलिस स्टेशनला अनामिकाच्या फोनबद्दल सांगितले आणि योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन खणाणला, एक पत्रकार सांगत होते, 'ताई, दोन रिक्षावाल्यांनी एका मुलीला उचलून रानात नेली नि तिच्यावर जबरदस्ती केली. पहाटे पाचच्या सुमारास मुलगी सापडली. तुम्ही रात्री पोलिस स्टेशनला फोन केला होता म्हणे ! तिला भेटायला चलणार का? मीही जातोय."
फोन ऐकून सुन्न झाले. रात्रीच्या फोनकडे मी दुर्लक्ष केले असते तर ? त्या मुलीला दडपणातून बाहेर काढणे आवश्यक होते. मी पोलिस स्टेशनमध्ये गेले.
...अंगावर गुलाबी केशरी छिटाचे ढगळसर परकर पोलके. उंची बरी, बारकुडी अंगयष्टी. जेमतेम केसांची घट्ट वेणी. तेलकट चेहरा. बावरलेले... घाबरलेले... हरवलेले उदास डोळे. जेमतेम तेरा चौदाची असावी. अंग चोरून बाकावर बसलेली, मी तिथे गेल्यावर भवतालची गर्दी कमी झाली, चारपाच पोलिसांनी एकटीला प्रश्न विचारायचे, म्हणजे गर्दीच की.
"बेटा तू या गावची नाहीस. कशी आलीय इथं. कुठं जायचं होतं तुला? चुकीच्या एस.टीत बसलीस का ? मला सांगशील सगळं ?..." आवाज शक्य तितका मऊ करीत मी प्रश्न केला.
तिने माझ्या डोळ्यात रोखून पाहिले. त्यात अविश्वास होता.
"घाबरू नकोस मी पोलिस नाही. मी तुझी मावशी वा बाई समज. आणि रीतशीर सगळं सांग." मी
हळूहळू ती मोकळी झाली, बीडजवळच्या बऱ्यापैकी मोठ्या गावात तिचे वडील राहतात. ते हॉटेलात काम करतात. रोज ७०/७५ रुपये मिळवतात. त्यांना दोन बायका आहेत. पहिलीला दोन मुली आणि दुसरीला तीन मुली, एक मुलगा. ही पहिलीची धाकटी. तिची आई पाटोद्याजवळच्या खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाई म्हणून काम करते. पहिलीच्या दोन्ही मुली, दुसरीच्या तिन्ही मुली नि मुलगा, दुसरी नि वडील असे एकत्र राहतात. ही मुलगी सहावीपर्यंत शिकली. घरकामासाठी सातवीतून घरी बसवले. वडिलांना दारूचा नाद. खाणारी माणसं आठ. सावत्र आई कामाला जात असे. तिला पहिलीच्या मुलींची अडचण होई. मुलीच्या लग्नाचे वेळी बाप लागतोच, या विचाराने मुलींची आई दरसाली मुलींना कपडे करी. थोडे फार पैसे पाठवी. पण मुलींनी बापाच्या दारात राहावे असे तिला वाटे. पण मुलींना सावत्र आई जाच करी. काम खूप पडे. ना डोक्याला तेल, ना पोटभर अन्न. त्यात सावत्र आईच्या शिव्या, मार, उपाशी ठेवणं वगैरे आलंच.
दोन दिवसांचा उपास नि भरपूर मार यांनी वैतागलेली ती बीडपर्यंत चालत आली. एस.टीत बसल्यावर एवढा थकवा आला नि झोप लागली की. मांजरसुंब्याला उतरून गाडी बदलण्याचे भान राहिले नाही. जाग आली तेव्हा संध्याकाळ दाटून आलेली. गाडीतून उतरली आणि लक्षात आले की सारे नवे आहे. गाव, माणसं, भवतालचा परिसर. पोटात भुकेचं काहूर आणि हातात फक्त दोन रुपयांची चिंधाटलेली नोट. ती गच्च पकडून दुकानांसमोरून एक फेरी मारली. शेवटी दोन रुपयांची तीन केळी घेऊन खाल्ली.
रात्र चढत होती. स्टँडवरची गर्दी कमी होऊ लागली. काही रिक्षावाल्यांचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तिला चहा पाजला. चिवडा दिला. एक जण म्हणाला, त्याच्या घरी घेऊन जातो. घरात बायको, मुलं आहेत. दुसऱ्या दिवशी पाटोद्याच्या गाडीत बसवून देऊ. तिला घेऊन रिक्षाजवळ येताच दुसऱ्या रिक्षावाल्याने रिक्षात कोंबले नि रिक्षा सुसाट पळवली.
रात्री केलेला फोन एका रिक्षावाल्यानेच केला होता असं कळलं. त्या तेरा-चौदाच्या बाळीला बलात्कार केला, की तसा प्रयत्न केला यातला फरकही कळत नव्हता.
"या पोरी बी लई मोकाट सुटल्यात. कशाला घराभाईर पडावं ? सावतर झाली तर मायच की. चार दिवस जेवण केलं नाय तर मरत न्हवती."
"ताई, तुमी काय बी म्हना. बायांनी जपूनच ऱ्हावं. वय काय ते लेकराचं? लई भोगलं बाळानं. गांगरून गेलंया. पण घर सोडलं की असंच व्हनार."
खाकी वेशातली मतं. तीही माणसंच की.
वैद्यकीय तपासणीनंतर मुलीला पोटद्यास, सख्या आईकडे पोहोचविण्याचे ठरले, तिच्याजवळ एका कार्यकर्त्याला ठेवून मी घरी परतले. परतताना मनात शब्द ठेचाळत होते...घुमत होते.
बाईने वा मुलीने घर सोडू नये... घर सोडू नये... घर... घर घर, चार भिंतीचे. माया देणारे, सुरक्षितता देणारे. केवळ स्त्रीलाच नव्हे तर घरात राहणाऱ्या सर्वांना सुरक्षितता देणारे.
घर केवळ दगडविटांनी रचलेल्या चार भिंतीचे असते का ? त्यात राहणारी माणसे एकमेकांशी भावबंधाने जोडलेली असतात. नाती धर्माची असोत वा कर्माची, किंवा रक्ताची. त्यांच्यात मनाचे जोडलेपण नसेल तरी ती दगडमातीची, निर्जीव बनतात. त्यांची तुमच्यावर बांधीलकी राहात नाही.
घर म्हटले की त्यात राहणारे पतिपत्नी, मुलं, आजी-आजोबा अशी माणसे किमान असणारच. त्यांच्यात परस्परांबद्दल ओढ हवी, विश्वास हवा. असतो का तो ? पतीला पत्नीबद्दल संशय, पत्नीला पतीबद्दल, सासूला सुनेबद्दल विश्वास नाही आणि सुनेला सासूबद्दल ओढ नाही. ही नाती फक्त शब्दांची. विधिनियमांनी जखडून बांधणारी पण ही बांधीलकी फक्त बाईला.
कॅनडाला गेले होते तेव्हा सॅस्कॅटूनच्या शासकीय महिला प्रगती केंद्राला भेट दिली. तिथे घराचे 'घरपण' टिकावे, कुटंबातले नातेसंबंध सुखद आणि हवेहवेसे राहावेत यासाठी अनेक छोटी माहितीपत्रके हाती आली. त्यात 'संवेदनक्षम पिता बनवण्यासाठी' असे सुरेख माहितीपत्रक होते. पतिपत्नीच्या संवादाचा वा विसंवादाचा घरावर, चिमुकल्यांवर होणारा परिणाम, विविध उदाहरणे, व्यंगचित्रे यांतून रेखाटला होता.
खरे तर घर... वा कुटुंब निर्माण केले स्त्रीनेच. मातृत्वाची जबाबदारी तिच्यावर सोपवून, निसर्गाने जणू 'भविष्यकाळा' चे बीज तिच्या उदरात पेरले. जर घरातील स्त्री सुजाण, आपल्या उबदार पंखांत सर्वांना सामावून घेणारी असेल तर ते घर सर्वांचे राहते. अंभंग राहते. पण 'घर'च तिचे राहिले नाही. तिला तिचा अधिकार... सन्मान मिळाला नाही तर तो होतो 'कोंडवाडा.'
त्या मुलीला एक बाप, दोन आया आणि पाच भावंडं होती, डोकं टेकायला एक खोली होती. पण तिला मिळालं होतं का घर ? माया देणारं, अडीअडचणीच्या वेळी आधार देणारं... सुरक्षितता देणारं... ?
असं घर कितीजणींना मिळतं ?...
■ ■ ■