मनतरंग/अदिवासींना आम्ही केले वनवासी

विकिस्रोत कडून
 मेळघाटातल्या घटांग डोंगरातले अगदी उंचावर वसलेले ते गाव. सेमाडोह या विदर्भ मध्यप्रदेशाला जोडणाऱ्या राजरस्त्यावरच्या खेड्यापासून तीन चार कोसांवर असलेले. चिखलदरा परिसरातील व्याघ्रप्रकल्प सुरू झाल्यावर, या परिसरातील अनेक खेडी उठविली गेली. आज या अभयारण्यातील वाघांची संख्या वाढून शहात्तरवर पोचली आहे. मात्र सीमेवरील काही खेडी अद्याप उठलेली नाहीत. अशा खेड्यांपैकी एक 'माखला'. त्याला भेट देऊन कोरकूचे जीवन जवळून पाहावे यासाठी आम्ही निघालो.
 या वर्षीचा पावसाळा मनमुक्तपणे बरसलाय. साग, आवळा, मोह या झाडांची गर्दी असलेले डोंगर, पानांचे दाट पिसारे ऐलपैल पसरून, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे आहेत. सातपुड्याच्या डोंगराचा हा भाग. धुक्याची तलम ओढणी माथ्यावर पांघरून उभे असलेले हे डोंगर पाहताना नजरेवर जणू कोणी चेटूकच करते. पंचवीस तीस अंशांच्या कोनात वळणारे, घनदाट उंच उंच झाडांच्या दाटीतून वळणावळणाने उंच उंच चढत राहणारे, अत्यंत निरुंद रस्ते.
 एका बाजूने उंच उंच हिरवी भिंत, तर दुसऱ्या बाजूला डोळे फिरावेत अशी दरी. अधूनमधून उड्या घेत, लडखडत धावणारे धबधबे. काठाने गुलाबी जांभळ्या, निळ्या रानफुलांची दाटी, गालातल्या गालात खुदखुदणारी. मधूनच रानकपाशीची पिवळीजर्द थोराड फुले. ही रंगबावरी किमया पाहताना आमच्यातला एकजण दर पाच मिनिटाला जीप थांबवून कॅमेरा सरसावीत असे. पण फोटो मात्र एकही नाही. शेवटी कॅमेरा बंद करून, तो बॅगमध्ये बंद करतानाचे त्याचे शब्द,
 "फोटो तरी कोणकोणते नि किती काढावेत ? त्यापेक्षा भवतालचे सारे नजरेत साठवून घ्यावे. अंतरात गोंदवून घ्यावे. डोळे मिटून मनाचे बटन दाबले की या सुंदर आठवणींच्या चित्रांची माळ नजरेसमोरून आपोआप थिरकत जाईल."
 वळणे घेत घेत आम्ही माथ्यावर पोचलो. ज्वारी, मक्याची लहान लहान शेते दिसू लागली. समोरून एक पोरसवदा अदिवासी बाई, कडेवर अत्यंत अशक्त, पांढुरके, काटकुळ्या हातापायांचे मूल घेऊन शेतात शिरताना दिसली. दुसऱ्या क्षणी उतरत्या छपराच्या कौलारू झोपड्या नजरेच्या टप्प्यात आल्या.
 हे गाव दोन वर्षांपूर्वी विधानसभेत गाजले. मुलांच्या कुपोषणामुळे. गाव कोरकूवस्तीचे. दोन गवलांची... गवळ्याची घरे आणि एक गोंड अदिवासीचे. बाकी कोरकूंची गावात सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेत गेलो तर दोन-तीन शिक्षक शाळेत होते. बाकीचे मुलांना गोळा करण्यासाठी डांगात गेले होते. कोरकूची घरे समांतर ओळीत, बांबूच्या भिंती. आत जाण्यासाठी जेमतेम तीन फुटी दरवाजा. खिडकीची बात नसेच. मात्र प्रत्येक घरात दगडी जाते. झोपडीला लगटून ओटा आणि अंगण. शेणाने सुरेख सारवलेले. भिंतीवर तांदूळपीठ आणि लाल मातीच्या चित्राकृती. मनाला हजारो वर्षे मागे घेऊन जाणाऱ्या.
 पहिल्या झोपडीत शिरलो. तीन महिला बसलेल्या. मी नाव विचारले. त्या नुसत्याच हसत होत्या. आमच्या सोबत रमेश धुर्वे नावाचा आदिवासी शिक्षक होता. त्याने 'विहीइमा...विहीइमा' असे दोन तीनदा सांगितले. विहीइमा म्हणजे सांगा, उत्तर सांगा. उत्तर आले.
 "सुमुरतीजी... मीरा... सांती"
 चाळिशीची कोरकू स्मृती, तिशीतल्या मीरा नि शांती समोर होत्या. यांच्या घरातील पुरुष मोठ्यांच्या घरची जनावरे चारतात. एका जनावराचे वर्षाला १२ किलो धान्य... कोदु कुटकी...मिळते. या भागात पेरण्यासाठी सपाट जमीन आहे कुठे ? या भागात कोदूची भाकरी व कुटकीचा भात खातात. हे कुठेही उगवणारे तृणधान्य आहे.या भागातल्या अदिवासींना व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेवरील भागात रस्त्याचे, वनिकीकरण प्रकल्पाचे काम मिळते. पण ते फारच थोड्यांना, दारिद्र्य कपड्यांतून... डोळ्यांतून क्षणोक्षणी जाणवत राहते.
 शाळेत भरपूर मुले होती. एका वर्गात आम्ही गाणे सांगितले. मी नजरेने मुले मोजली. पंचवीस मुली आणि तेवीस मुलगे. प्रत्येक वर्गात हेच प्रमाण. "दर, मुलामागे मिळणारे तीन किलो तांदूळ आणि मुलीला मिळणारा रोजचा रुपया याचा खूप आधार आहे या लोकांना." एक शिक्षक सांगत होते.
 माखला डांगात रोज एक बस येते. सायंकाळी एक बस खाली जाते. चुकून जरी बस चुकली तर दहा किलोमिटर्सचा उभा चढाव लागतो. दोन शिक्षिकाही नव्याने रुजू झाल्या आहेत. पण कोरकू माणसे इतकी चांगली की त्यांच्याकडून कधीच त्रास होत नाही.
 सरपंच सोमा कोरकू सांगत होता. "बाई, आता खूप बरे दिवस आहेत. पंधरा बरस पहेले धारणी, परतवाडाके बेपारी नमक लेकर आते. दो मटका शहद के बदले एक सेर नमक दे जाते. सागाका झाड तोडनके दो-चार रूपये. धूपकालने हम कैसे रहते क्या कहू ?..." या खेड्यात हिंदी समजते. मराठीचे वळण नाही. जवळच मध्यप्रदेश आहे. आता शाळेत जाणाऱ्या लेकरांना तांदूळ मिळतात. पोरींना जास्तीचा रोजी रुपया भेटतो. बस येते. रस्ता झालाय.
 "आम्हांला आठदहा लेकर होनार. त्यातली तीन चार बचनार. कुपोषणाने ती मरायचीच. आता साळा आली, बस आली, रेडू आला म्हणून सरकारला कळलं की शाळेतली समदी पोरं रोगट हाय ते. आता दोनचार सोडली तर सगळी पोरं गट्टू झालीत."
 सोमा बोलत होता. माझ्या मनात आले. हे आदिवासी म्हणजे या भारताची मूळ प्रजा. आदिकाळांपासून या देशात राहणारी माणसे, पण आमच्या 'सुसंस्कृत' होण्याच्या, नागर होण्याच्या हव्यासापायी आम्ही त्यांना सतत दूर लोटले. त्यांच्या मनाचे पापुद्रे उलगडून पाहण्याचा क्वचित प्रयत्न झाला असेल, पण त्यांना राष्ट्राच्या मध्यवर्ती धारेत आणण्यासाठी काय केले आम्ही ? आदिवासींना 'वनवासी' केले, सीतामाईला केले तसे. मग, भवतालची विलक्षण देखणी अशी रेशमी हिरवाई मनाला बाभळीच्या विखारी काट्यांगत टोचू लागते. एकच बोल घुमत राहतो-
 ...आदिवासींना आम्ही केले वनवासी. सीतामाईला केले तसे...

■ ■ ■