Jump to content

मनतरंग/सुभगा...सुखदा!

विकिस्रोत कडून

  मी घरच्या फाटकातून आत शिरले. तुळशी वृंदावनासमोर त्या उभ्या होत्या. हात जोडलेले. चेहऱ्यावर निरामय शांती. डोळे मिटलेले. वृंदावनातले निरांजन तेवणारे, कपाळावर हळदीकुंकवाची नुकतीच रेखलेली बोटं. उदबत्तीचा मंद गंध आणि भवताली दवात न्हालेली ताजी सकाळ. त्यांनी डोळे उघडले नि माझ्याकडे पाहून मंदपणे हसल्या. सकाळचा प्राजक्ती गंध मला वेढून गेला.
 "किती दिवसांनी आलात ! आलात की येत जा ना. तुम्ही भेटलात की मनाला खूप बरं वाटतं." त्या बोलल्या आणि माझेच मन... डोळे आतल्या आत भरून आले.
 तीन वर्षांपूर्वी वकीलसाहेब हे जग सोडून गेले. जाण्यापूर्वी सहा महिने त्यांना रक्ताचा कॅन्सर झालाय हे लक्षात आले होते. असे काही निदान झाले की भवतालच्या, जवळच्या माणसांच्या मनाची आतल्या आत तयारी होत असते. तरीही ती व्यक्ती नसण्याची कल्पना सुद्धा मन पिळवटून टाकणारी असते. त्यातून तीस-बत्तीस वर्षे जिने समर्पित भावनेने साथ दिली, तिच्या मनाची थरथर कशी सांगावी ?
 निदान झाल्यापासून वकीलसाहेब ताईंशी सतत बोलत. नवनवीन विचार सांगत. त्यांनी खूप वाचावे म्हणून आग्रह धरीत. मुलांना पुस्तके आणून आईला द्यायला लावीत. तसे ते भाविकच. अरविंद, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, विनोबाजी यांचे विचार त्यांना विशेष भावत. त्या शेवटच्या सहा महिन्यात त्यांनी आपल्या पत्नीच्या मनात काही भूमिका गोंदवली.
 ... मनोरमा, आपण मरतो म्हणजे इथले अस्तित्व संपते. देवाला प्रिय होतो. आपल्याला निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना शरीराचे वेगळेपण दिले तरी दोघेही माणूसच. दोघांचे मन सारखे. भावना, संवेदना, इच्छा, आकांक्षा... सारे सारखे. दोघांनाही निसर्गाने बुद्धी दिली आहे. दोघांच्या व्याधी सारख्याच. दोघेही चुका करणार, त्या दुरुस्त करणार. सुखाचा, निवांत शांतीचा शोध घेणार. माणसे माणसाशिवाय जगूच शकत नाहीत. साथसंगत हवी, आधार हवा.
 गेली तीस वर्षे मला पत्नी म्हणून पदोपदी साथ दिलीस. माझे घर शाकारलेस... फुलवलेस आणि आता मला आधी बोलवणे आलेय. एक आग्रही विनंती...शेवटचा हट्ट मी करणार आहे, पुरवशील ना? मी गेल्यावर सौभाग्यालंकार उतरावयाचे नाहीत; तुझी साग्रसंगीत तुळशीची पूजा, सण... व्रते सारे साजरे करायचे. अगं, शेवटी आपण परमेश्वराजवळ जाणार ना? मग अशुभ होऊन का जायचे ? सौभाग्य हे केवळ पतीशी जोडलेले नसते. ते आपल्याशी, आपल्या विचारांशी... आपल्या वर्तनाशी... आपल्या राहणीशी जोडलेले असते. तुझ्या स्वरातील गीता ऐकता ऐकता शेवटचा श्वास घ्यायचाय मला...
 करशील ना माझा हट्ट पूर्ण ?
 ...आणि ताई वकीलसाहेबांचा हट्ट अत्यंत आत्मीयतेने पुरवीत आहेत. इतकेच नाही तर स्वीकारलेला वसा, न उतता न मातता, या प्रसंगाला सामोऱ्या जाणाऱ्या इतर भगिनींनाही देत आहेत. त्यांच्या प्रसन्न हसण्याला कदाचित करुणेची किनार असेलही. पण त्यामुळे त्यांचा चेहरा अधिक निरामय... प्रशांत वाटतो. एरवी कशा दिसल्या असत्या त्या ? कोरा चेहरा, डोळ्यातून टपटपणारे कारुण्य, रुखेफिके कपडे, अवतीभवती एक किर्र उदासी. पण आज ताई, त्यांची मुले, सुना, लेक, जावई, नातवंड.. अवघे घर प्रसन्नपणे उभे आहे.
 ...ताईंना वकीलसाहेबांची आठवण येतच असेल. कधीकधी आठवणींनी डोळे भरून येत असतील, मन कशातच लागत नसेल. पण हे सारे व्यक्तिगत, आतल्या आत. त्यामुळे परिसरावर अशुभाची सावली नाही. काही माणसे इतक्या सहजपणे परिवर्तनाची लय पकडून पुढे जातात. अशा वेळी आठवतो त्या तालुक्याच्या गावचा प्रसंग. गोपाळ गणेश आगरकरांच्या सामाजिक परिषदेच्या शताब्दीच्या वेळचा. एका पुरोगामी गृहस्थाकडे आम्हांला संध्याकाळी चहाला बोलावले. आम्हांला म्हणजे कुशाक्कांना, त्यांच्या बरोबर आम्ही. कुशाक्कांनी स्वातंत्र्य संग्रामात दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला होता. गृहस्थांच्या सुनेने सुरेख पोहे केले होते. गप्पांच्या रंगात पोह्यांची चव अधिक खमंग झाली. निघताना या पुरोगामी गृहस्थांनी सुनेला आठवण दिली, 'अगं, कुंकू लावलंस का ?'
 तिने मला, सुनीताला कुंकू लावले. आणि ती कुंकवाचे बोट कुशाक्कांच्या कुंकू लावलेल्या प्रसन्न कपाळावर टेकवणार इतक्यात सासरेबुवाच्या तोंडून जमिनीतून धार उसळून यावी तसे शब्द बाहेर आले 'अगंऽऽअगंऽऽ'. ती सून बिचारी दचकून थबकली. कुशाक्कांच्या गळ्यातले मंगळसूत्र, माथ्यावरचे कुंकू, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अक्षरश: कोमेजून गेले. कुशाक्कांचे सतत कामगारांसाठी लढणारे पती, अप्पा गेल्या वर्षीच अचानक गेले होते. मृत्यू म्हणजे जीवनाची एक अपरिहार्य नैसर्गिक अवस्था हे मानणाऱ्या कुशाक्कांनी पतीच्या मृत्यूचा सहजपणे स्वीकार केला होता.
 "वयाच्या विसाव्या वर्षी मी मंगळसूत्र स्वीकारले होते. ते आता माझे लेणे आहे. तो माझा दागिना, माझे सौभाग्य आहे. ते माझ्या सोबतच येणार." अशी भूमिका घेऊन कुशाक्काने नवी वाट चोखाळली होती आणि आज पायात काटा रुतला तोही आपल्या माणसाने पेरलेला !!
 सुभग दिसणे, प्रसन्न राहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष. हा अधिकार कुणाच्या असण्या-नसण्याशी का जोडायचा? जेव्हा एखादी व्यक्ती वा वस्तू एखाद्याच्या मालकीची होते, तेव्हाच त्याच्या असण्या-नसण्याचे अधिकार त्याच्या मालकीच्या व्यक्तीचे होतात. कालप्रवाहाच्या ओघात असे घडले असावे आणि त्यातून सतीप्रथा, केशवपन, एका लाल लुगड्यात बाईला लपेटणे, ती अशुभ मानणे वगैरे आले असावे. शिक्षणातून समोरचे क्षितिज उजळत जाते. तसे घडले आणि मग राजा राममोहन राय, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी रांग क्षितिजाला उजळत गेली. ही झाली काही इतिहासाने नोंदवलेली नावे. पण आज उजळती रांग एकेरी न राहता समृद्ध... विशाल होत चालली आहे.
 बारा तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट. राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी तीस बत्तीस युवकयुवतींचा जत्था घेऊन मी अन्नामलाई विद्यापीठात गेले होते. मधुरिकाही त्यात होती. जेमतेम अठरा-एकोणीस वर्षांचे वय. विलक्षण गोड तरीही धारदार आवाज. ऐकणाऱ्याला भारून टाकणारा, समूहगीत, सुगमसंगीत, समूहनृत्याला पार्श्वगायन यांची मुख्य जबाबदारी तिच्यावर होती. महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने केली जाणार होती. आमच्या गटाने भारतीय पोषाखातील विविधता सजवायचे ठरवले.

"युग की जडता के खिलाफ एक इन्किलाब है
हिंद के जवानों का इक सुनहेरा ख्वाब है
भारतीय सांस्कृतिक क्रांती, मानवीय सांस्कृतिक क्रांती ॥"

 हे गीत ढोलकी... पेटीवर गात गटागटाने जायचे होते. मुलींना मी सजवीत होते. इतक्यात मधुरिका काहीशा अस्वस्थपणे माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अस्वस्थता होती. "ताई मी बंगकन्या होतेय. भांगात सिंदूर कशी भरू मी? माझे मिस्टर लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात ब्रेन ट्यूमरने गेले..." तिचा स्वर जड झाला होता.
 "आण, मी भरते तुझ्या भागात सिंदूर... लग्नानंतर चार महिन्यात नवऱ्याला ब्रेन ट्यूमर होणे हा तुझा का दोष आहे ? आणि काही पापबीपच लागणार असेल ना, तर ते मला लागेल. तुला नाही." तिच्या भागात सिंदूर भरीत मी बोलले. बंद कडी उघडावी तसे मधुरिकाला झाले असावे. नंतरच्या चारपाच दिवसात खळाळणारी, वादावादी करणारी, स्कर्ट...पंजाबी ड्रेस घालून लालचुटूक टिकली कपाळावर रेखून मुक्तपणे वावरणारी मधुरिका. अन्नमलाईहून परतताना हैदराबाद - मनमाड रेल्वेत आम्ही सर्वजण. औरंगाबाद यायला थोडा वेळ उरलेला. जो तो आवराआवरी करणारा. मधुरिका कुठे दिसेना. खरे तर ती समोरच होती... अंगभर नेसलेली फिकट राखाडी रंगाची साडी. कपाळावर टेकलेली बारीकशी काळी टिकली. दिसेल न दिसेल अशी. माझ्या डोळ्यांतले प्रश्नचिन्ह तिने वाचले असावे.
 "बाई, एक लक्ष्मणरेषा तुमच्या आधाराने ओलांडली मी. खूप काही हाती आलं. नवं बळ मिळालं. माझी खात्री आहे की मी आज ना उद्या नवी दिशा शोधीन. जिथे समाधान असेल आणि मी सुभगा असेन... सुखदा असेन."

■ ■ ■