मनतरंग/हर वीर था भारतवासी !!

विकिस्रोत कडून

  बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातला 'जागतिक चषक-वर्ल्डकप' स्पर्धेचा सामना रंगात आलेला. नव्यानेच या क्षेत्रात प्रवेश करणारा बांगलादेशसारखा संघ, पाकिस्तानसारख्या बलदंड संघाला जेरीस आणतोय हे पाहून प्रेक्षकांना स्फुरण चढलेले. एकजण, टी.व्ही. पाहणाऱ्याला ओरडला.
 "अरे, जरा कारगिलकी न्युज भी देखो. झी न्यूज लावा. बघा कारगिलला काय चाललं ते !"
 "यार पाकिस्तानको भी अभीच टाईम मिला क्या ? बघ बाबा घुसखोर कारगिलमध्ये किती आत घुसले ते ?" दुसरा पुष्टी देतो, "फर्नाडिसबाबाला कोणता डास चावला रे ? आपण तर यार त्यावर लई खूश होतो. पण अशात काहीही उलटसुलटं बोलायला लागलेत हे फादर !" तिसऱ्याची टिप्पणी. गेल्या पंधरा दिवसांपासून टी.व्ही. वर क्रिकेट...द्रविड...सचिन...गांगुली यांची चलती आहे.
 तरुणपिढीचे हे संवाद ऐकताना माझे मन थेट सदतीस वर्षे मागे गेले. माझ्या पिढीने तरुणाईत पाऊल नुकतेच रोवलेले होते. आपला देश, राष्ट्र, संस्कृती यांच्याबद्दलच्या भावना अतिशय तजेल, संवदेनशील होत्या. स्वातंत्र्यानंतर भवतालच्या आशियाई राष्ट्रांशी दोस्ती करण्याची भूमिका भारताने घेतली होती. 'हिंदी चिनी भाई भाईचे' स्वर आसमंतात घुमताहेत तोवरच चीनने हिमालयावर स्वारी करून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. हिमालयाच्या सीमेवर चीनने सैन्य आणून उभे केले. आत घुसखोरी करून रस्ता बांधला. तेव्हाचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना लोकक्षोभाला समोरे जावे लागले. आम्हां भारतीयांचा युद्धाचा पहिलाच अनुभव...सैन्याजवळ ना गरम कपडे, खाण्यापिण्याची रसद. अनुभव नवा. पण अत्यंत हलाखीच्या अवस्थेतही आमचे जवान ध्येयधुंद होऊन लढले. या जवानांना भारतीय जनतेनं अपरंपार नैतिक बळ दिले. पंडित नेहरूंच्या उपस्थितीत गायलेले लताजीचे गीत...

"ऐ मेरे वतनके लोगो जरा आँखोंमे भर लो पानी..."

आजही या गाण्यातले शब्द...स्वर मन थरारून टाकतात.
 मात्र त्या काळातला एक अनुभव नेहमी स्मरतो. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आक्रमणाची हवा पोहचवावी या हेतूने भारलेले आम्ही काहीजण ग्रामीण भागात भारताचा नकाशा घेऊन हिंडत होतो. आम्ही राष्ट्र सेवा दलाचे ६-७ जण. माझं नुकतंच लग्न झालेलं. त्यातून जातीबाहेरचे लग्न. उत्सुकतेपोटी बैठकींना भरपूर बायका-पुरुष येत. 'चिनी आक्रमणाचा फार्स' त्यावेळी रामभाऊ नगरकर आणि दादा कोंडके सादर करीत. त्यातील काही गाणी आधाराला घेऊन आम्ही अभिनयासह भाषणाद्वारे हा विषय लोकांपर्यंत नेत होतो.
 एका खेड्यात मला मध्येच अडवीत एका आजींनी प्रश्न केला. "अगं सुने, आताच लगीन झालंया, तुझां वानीकिनीचा संवसार करायचा सोडून भटकभवानीसारखी कशापायी हिंडतीस गं ? हिमालयामंदी लढाया जायची गरजच काय ? आमचा संकरबाप्पा आनि त्याचे नंदी. भैरवगण समदे हायेत ना तिथं. तो चिनी की फिनी कवाच खल्लास करून टाकला असल त्यांन...बोल, काय हाय तुझं म्हणनं ?" आजींच्या प्रश्नाला होतं का माझ्याजवळ उत्तर ? १९६५ मध्ये पाकने आमच्यावर युद्ध लादले. १९६४ मध्ये पं.नेहरू स्वर्गवासी झाले आणि पाकिस्तानाने युद्धाचा डाव टाकला. 'जय जवान, जय किसान' ही पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी दिलेली घोषणा प्रत्येक भारतीयाने हृदयात झेललीही. लहानथोरांनी शुक्रवारी भात खाणे सोडले. आमच्या जवानांनी थेट लाहोरपर्यंत रणगाडे भिडवले. भारतीय संस्कृतीचा गाभा माणुसकीचा आहे. आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून आम्ही, पुनश्च आमच्या सीमेवर परतलो. पण या युद्धात एक नीतिमान, अत्यंत सुजाण पंतप्रधान गमवावे लागले.
 त्यानंतर अवघ्या सहा वर्षात पाकने बांगला देशवर चढाई केली. ती तर आम्ही सहजपणाने परतवून लावली. भारताच्या रणवीरांनी बांगलादेश स्वतंत्र केला. पण बाहेरच्या राष्ट्रांनी आमची सीमा नेहमीच धगधगती ठेवली. कधी शिखिस्तानला उचलून धरून तर कधी श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांना घुसवून. आज सुमारे २८ वर्षानंतर, भारतातील लोकशाहीवादी सरकार अवघ्या एका मताने पडल्याचा आणि भारतीय पंतप्रधान या मातीतून उगवलेला असावा की परकीय असावा या राजकीय वादाचा फायदा घेऊन, पाकने हजारो भाडोत्री आणि काही घरातले घुसखोर कारगिल, पूंछ, द्रास सीमेवरून भारतात घुसवले. १९६२, १९६५, १९७१ साली भारताच्या विशाल एकात्म मनाने नैतिक बळ जवानांना दिले होते.
 धारातीर्थी पडलेल्या जवानांची अर्थी... त्यांच्या पत्नीचे भकास डोळे... आईवडिलांचे दुर्दम्य मनोबल टी.व्ही. वरून पाहात असताना पुन्हा मनात ओळी उगवतात...

"कोई शीख कोई जाट मराठा
कोई बंगाली कोई मद्रासी
सरहदपे मरनेवाला हर वीर था भारतवासी..."


■ ■ ■