मनतरंग/आई... पहिला गुरू

विकिस्रोत कडून

 समाजातील व्यक्तींना भवतालचा निसर्ग आणि मानवी समाज यांची नेमकी ओळख करून देऊन त्यांच्यावर सुखी, समृद्ध आणि शांतीमय जीवन जगण्याचे संस्कार करणारी महत्त्वाची दोन माध्यमे म्हणजे आई आणि गुरू. पहिली गुरू आईच असते.
 पानांची हिरवाई, आभाळाची निळाई, चमचमत्या चांदण्यात खेळणारा चांदोमामा, सिंहाला, माणसांनी टाकलेल्या जाळ्यातून सोडवणारा इटुकला उंदीर...या नि अशा अनेकांची ओळख आई करून देते. तिची काऊचिऊची गोष्ट-घरटे कसे बांधावे, ते स्वच्छ कसे ठेवावे, बाळाला आंघोळ कशी घालावी, घाण कशी करू नये...हे सारे शिकवते. 'आई' या शब्दाला, त्या व्यक्तीला समाजजीवनात सन्मान होता. 'मला माझ्या पित्याचे नाव माहीत नाही. मी जाबाली या मातेचा मुलगा सत्यकाम आहे' असे सांगणारा मुलगा 'आई' ने घडवला. संस्कार देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईला पिढ्यान्पिढ्या, आईकडून मिळत असे. अशा घरांतील आयांमध्ये वाचनातून, भवतालच्या संस्कारातून सामर्थ्य अधिक समृद्ध होई.
 परंतु 'आई' हे संस्कार देणारे समर्थ माध्यम गेल्या शेकडो वर्षांपासून अनिष्ट रूढी आणि परंपरांमुळे निस्तेज झाले आहे. आई ही 'एक बाई' आणि बाईचे स्थान समाजात खालच्या दर्जाचे. तिला शिक्षणाचा अधिकार नाही. तिने प्रश्न विचारायचे नाहीत. तिचे कर्तृत्व स्वयंपाकघर आणि माजघरात. संधी मिळाली तरच तिच्यातली ऊर्जा प्रगट होई. ज्या ऊर्जेमुळे सभोवतालचे जग चकित होई. अर्थात ही संधी लाखात एखादीलाच लाभे. त्यातूनच मग महाराष्ट्राचे भाग्य घडवणारी जिजाई, येसूबाई, अहिल्यादेवी, झाशीची लक्ष्मीबाई सारख्या वीरांगना प्रकाशात आल्या. समाजातल्या सर्वसामान्य घरातील प्रत्येक आईत ऊर्जा आहे. पण ती प्रकट करण्याची संधी तिला मिळते का ? मिळत नसल्यास का मिळत नाही ? आईचा स्त्री म्हणून शिक्षणाचा अधिकारच धर्माने, समाजातील रूढी पंरपरांनी नाकारला. तिचा धर्म विद्या, कला यांपासून तोडला गेला. पूजापाठ करणे, पंरपरेने शिकवलेल्या आरत्या, देवाची गाणी, क्वचित भजने म्हणणे, देवादिकांच्या कथा मनोभावे समोर येतील तशा ऐकणे, पती व कुटुंबासाठी कष्टणे यांत ती बांधली गेली. पुराणातील गार्गी, मैत्रेयी, अनूसया, विष्पला यांच्या कथा सामान्य घरातील स्त्रीच्या नाहीत. ज्यांना वर्ण, घराणे, संपत्ती यांच्या मोठेपणामुळे संधी मिळाली अशांच्या आहेत. खूपदा सांगितले जाते की 'स्त्री' ची मुंज होत असे. होत असेलही. ज्या गर्भातून प्रजानिर्मिती व्हायची तो गर्भाशय पवित्र करण्याचा उद्देशही त्यामागे असू शकतो. एकीकडे म्हणायचे की, "कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति !" तर दुसरीकडे स्त्री कोणाची आई आहे, कोणते बीज तिने उबवले यावर तिचा दर्जा वा मोठेपण ठरवायचे ! तिचे मातृत्व हा तिचा अधिकार राहिला नाही. तिच्या निर्णयाला किंमत शून्य आणि म्हणूनच अशी लाखो चिमणी...कोवळी फुले काट्याकचऱ्यात, रस्त्या-उकिरड्यावर फेकली जातात. पण प्रेमाने उचंबळून येणारा पान्हा उरात कोंडून, थरथरत्या हाताने काही दिवसांपूर्वी जगात आलेला जीव रस्त्यावर टाकताना तिच्यातल्या 'आई'ला झालेल्या यातनांचे वळ कोणाच्या मनावर उमटतात ?
 अशी ही प्रत्येक आई संस्काराचे पहिले आणि महत्त्वाचे माध्यम. तीच जर अडाणी, निरक्षर, दुर्बल आणि अंधश्रद्धांनी घेरलेली असेल तर तिच्याकडून कोणते संस्कार मुलांकडे जाणार ? आमच्यावर जातीयतेचा, धर्मांधतेचा पहिला संस्कार कळत-नकळत आईच करते. 'तुझ्या मित्राला पाण्यापर्यंत आणू नको, हलक्या जातीचा आहे ना तो ? एवढंही कळत नाही ? आमक्या धर्माच्या मैत्रिणीकडे जायचं नाही. मैत्री शाळेपुरतीच ठीक आहे. आपल्यावाल्यांशी मैत्री करावी' असे येताजाता कोण आपल्याला सांगते ?
 आणि म्हणूनच स्त्रीशिक्षण सर्वात महत्त्वाचे. आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे स्त्रीशिक्षणाची ? जेमतेम ३२ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. ६८ टक्के स्त्रिया निरक्षर, या ३२ टक्क्यांतील कित्येकींना केवळ सही करता येते म्हणून साक्षर म्हणायचे. ग्रामीण भागातील माता-पालकांचे प्रबोधन व्हावे, त्यांच्या दैनंदिन जगण्यातील अडचणी समजून घ्याव्यात, त्यावर मार्गदर्शन करावे, हा हेतू समोर ठेवून जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून महिला प्रबोधन प्रकल्पाची बांधणी झाली. हा प्रकल्प सुरुवातीला औरंगाबाद, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड या स्त्रीशिक्षणात अत्यंत मागास असलेल्या जिल्ह्यांत सुरू झाला. १९९८ पासून त्यात जालना, बीड, धुळे व गडचिरोली या चार जिल्ह्यांची भर पडली. या प्रकल्पास जागतिक बँकेकडून मदत मिळते. असे असले तरी या प्रकल्पाद्वारे कागदोपत्री महिला मेळावे भरल्याची नोंद आहे. काही प्रमाणात झाले आहेत. या महिलांच्यात जाणीव जागृत करण्यासाठी १० गावांतून एक महिला सहयोगिनी नेमली होती. तिला प्रवासभत्ता म्हणून पाचशे रुपये महिना प्रकल्पाद्वारे दिला जाई. परंतु या स्त्रिया संघटित होऊन अधिक प्रवासभत्ता मागतील या भयाने, शासनाने अवघ्या वर्षभरात हा अत्यंत दूरदर्शी आणि सर्वस्पर्शी कार्यक्रम बंद केला. वास्तविक पाहता या सहयोगिनी गावोगावी भेटी देत. पालकांना भेटत, शाळेत न जाणाऱ्या मुलांचे प्रश्न समजावून घेत. ज्यामुळे गावातल्या शेवटच्या 'आई' पर्यंत शिक्षणाचे महत्त्व, घरातील स्त्रीचे महत्त्व, दूरदर्शनवर काय पाहावे, काय पाहून नये, काय खावे इत्यादी अनेक विषय पोचत. परंतु मुळात शासनालाही 'आई' चे मुलाशी असलेले नाते कुठे कळले आहे ?

"माय आणि माती
दोघीही महान्
जग हे लहान, दोघीपुढे"

■ ■ ■