मनतरंग/गौराई आमची बाळाई

विकिस्रोत कडून



 अन्न वस्त्र आणि निवारा देणारी अवनी म्हणजे पृथ्वी. अवनी आणि स्त्री यांचे नाते तनामनाचे आहे. आमचे सण, उत्सव, व्रते ही देखील या नात्यावर बेतली गेली आहेत. वसंताची चाहूल लागते ती धरणीतून उगवणाऱ्या झाडांनाच. हेमंतात पानझडीने शुष्क झालेल्या उजाड फांद्यांमधून वसंतऋतूची चाहूल फेब्रुवारीच्या अध्यामध्यात झुळकून जाते नि अंजिरी रंगाची कोवळी मखमल फांद्यांच्या अंगांगातून उगवू लागते, लवलवू लागते. पाहतापाहता कळ्याचे घनदाट धुमारे पळस, गुलमोहर, शंखासुर यासारख्या वृक्षांवर झळकू लागतात. एकीकडे दिवसा उन्हाचा ताप वाढत जातो पण श्यामल संध्याकाळी झुळझुळणाऱ्या झाडावरून मंदपणे वाहत येणारे, मनाला नाजूक धक्के देणारे सुगंधी वारे तरुणाईचा तजेला देऊन सांगतात की, वसंतऋतू अंगणात येऊन उभा राहिलाय. त्याच्या स्वागतासाठी सज्ज रहा.
 या वसंताचे स्वागत म्हणजे भूमीच्या वसंत ऋतूचे स्वागत. ते मनोभावे करण्याची परंपरा स्त्रीनेच निर्माण केली. स्त्रियांच्या व्रतात तृतीयेला विशिष्ट मान आहे. हरितालिका व्रत भाद्रपद तृतीयेला असते तर सहा महिन्यांनी येणारी चैत्रगौरही तृतीयलाच विराजमान होते. भाद्रपदात हरितवस्त्रांकिता गौरीचे स्वागत तृतीयेपासून सुरू होते. मनाजोगा जोडीदार मिळविण्यासाठी तप करणारी उमा 'अपर्णा...' पानेही न खाता अन्नपाणी त्यागणारी तपस्विनी होते. शेवटी तृतीयेला जोडीदाराच्या मनातील 'माणूस' जागा होतो, तीच उमा-गौरी भाद्रपदातील सप्तमीला कृषिलक्ष्मीच्या रूपाने घराघरांतून येते. अष्टमीला सोळा भाज्या, पंचपक्वान्नाचे भोजन घेऊन तृप्त होते आणि नवमीला कृषिसमृद्धीचा आशीर्वाद देऊन परत जाते. वसंतातील गौर मात्र शंकरासह माहेरपणासाठी येते. चांगली महिनाभर विश्रांती घेते. अक्षयतृतीयेला कृषिसंपदेच्या तयारीसाठी रानात परतते.
 चैत्रगौरीच्या सणाला दोलोत्सव असे म्हणतात. तृतीयेला तिला शंकरासह झोक्यावर बसवतात आणि तिची पूजा करतात. सोयीनुसार, विशेषकरून मंगळवारी, शुक्रवारी घराघरातून चैत्रगौरीची देखणी सजावट करून हळदीकुंकू समारंभ करतात. उन्हाळ्याची तलखी जाणवू लागली असते. घराघरातून नवे माठ गार पाण्यासाठी येतात. चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचा प्रसाद, कैरी घालून केलेली खमंग डाळ आणि गंधगार पन्हे असा असतो. कुमारिका आणि सुवासिनींची भिजवलेल्या हरबऱ्यांनी ओटी भरतात. हरबऱ्याची सुगी नुकतीच हाती आलेली असते. गुळाच्या ढेपाही येऊ लागलेल्या असतात. आणि कैऱ्यांचे झुमते डूल झुलवीत आंब्याची झाडेही सावली देत उभी असतात. खरीप आणि रब्बी अशा दोन सुग्या पिकवून थकलेली कृषिलक्ष्मी, चैत्रगौरीच्या रूपाने जणू विश्रांतीला माहेरी येते आणि ग्रीष्माचे भेदून टाकणारे अंगार अंगांगात साठवून घेण्यासाठी पुन्हा रानात जाते. सूर्याला बीजस्वरूप मानले आहे. पृथ्वीला अग्निगर्भा म्हणतात. जमीन जेवढा अंगार झेलून घेईल तेवढी वर्षाऋतुतले पाणी साठविण्याची शक्ती तिच्यात येते आणि त्या पाण्याच्या बळावरच रब्बीची पिके - गहू, हरबरा, करडई, ज्वारी यांची शेते बहरून येतात.
 चैत्रात, कोकणात 'गौरीचे गाणे' म्हणण्याची प्रथा आहे. चैत्रात अंगणात एकेक कोपरा सारवून त्यावर नवनव्या रांगोळ्या घालण्याची प्रथाही कोकणात आहे. त्याला चैत्रांगण म्हणतात. चैत्रगौर केवळ महाराष्ट्रात नाही तर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकातही विविध रूपाने मांडली जाते. एकूणच उत्तर प्रदेशात 'गणगौर' सामूहिक रीतीने साजरी करतात. उत्तरेत पौर्णिमेच्या दिवशी नवा महिना सुरू होतो. महाराष्ट्रात फाल्गुन कृष्णप्रतिपदेस गौर बसते. उत्तरेत होळीच्या राखेचे १६ मुटके करतात व शेणाचे १६ ठिपके करतात. भिंतीला १६ हळदीचे नि १६ कुंकवाचे ठिपके देऊन त्याच्या खाली राख आणि शेणाचे मुटके मांडतात. हे मुटके गौरीचे रूप. पहिल्या दिवशी गहू, साळ, सरकी, ज्वारी, हरबरा, जवस, तूर आदी ७ धान्ये मिसळून दोन रंगविलेल्या कुंड्यांतून पेरतात. पहिल्या दिवशीची पूजा गव्हाच्या ओंब्यांनी होते. दुसऱ्या दिवशी ज्वारीचे कणीस गौरीच्या मुखवट्याजवळ ठेवतात. त्याला शंकर म्हणायचे. गाणी म्हणत विहिरीवर जाऊन पाणी आणून ते कुंड्यांतून शिंपडतात. महाराष्ट्रात गौर माहेरी येते त्या दिवशी गणगौरीचे थाटात विसर्जन होते. महाराष्ट्रात गणपती बरोबर गौर येते. 'गण' आणि 'गौरी' यांच्यातील अनुबंधाची झलक शोध घ्यायला लावणारी आहे.
 एकूण काय तर गौरीचा सण मातीच्या सुफलीकरणासाठी. शेण, राख, ही महत्त्वाची जंतुनाशक खते. म्हणूनच स्त्रियांना अनेक व्रतांत, विधीत शेण लागते. आंध्रात संक्रातीला कुमारिका शेणाचे गोळे करून त्याला हळदी कुंकू वाहतात. त्यावर फुल खोचतात. ते गोळे रांगोळीवर ठेवून त्याभोवती फेर धरून नाचतात. त्याला 'गोबम्मा' म्हणतात.
 भूमी, पाणी आणि सूर्य यांच्या अनुबंधातून भूमी सुजलाम सुफलाम होते. भूमी वर्षानुवर्षे फलते आहे फुलते आहे. तीही थकत असेल ना ? तिलाही विसावा हवाच ! तिचेही लाडकोड पुरवायला हवेत. पण भूमीचे सर्जनाचे कष्ट जाणणार कोण ? सर्जनाच्या कळा आकंठ अनुभवणारी स्त्रीच !

■ ■ ■