मदालसोपाख्यान/अध्याय दुसरा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

तो कुवलयाश्व जावुनि गालवमुनिसह तदाश्रमीं राहे, तों सूकररूप असुर मुनिचें धर्षण करावया पाहे. ॥१॥ तों गालवशिष्यांहीं त्या पाहुनि फ़ार गलबला केला; तन्मतिस खररवें दे भय, जेंवि श्येनगल बलाकेला. ॥२॥ अश्वीं चढोनि धांवे नृपसुत होवूनि तप्त कोपानें, त्या सूकरासि ताडी चंद्रार्धाकार तीव्र रोपानें. ॥३॥ आत्मत्राणार्थ करी आश्रय तो मूढ दैत्य अटवीतें, फ़टवीतें विधिबळ ज्या, रक्षिल कसि पूजिलीहि सटवी तें ? ॥४॥ लंघुनि महावनाचळ पळतां, गांठावय खळा किटिला, दिव्याश्व तयामागें राजकुमारें धनुर्धरें पिटिला. ॥५॥ निबिडांधकारगर्तीं सूकर घाली उडी, तयामागें रागें तो कुवलयही, पक्षीश्वर वंचिल जसा नागें. ॥६॥ नृपसुत मागें लागे, जेंवि वधाया महाहितें विवर, तत्तेजासि न परि, जरि भंगद रविच्या महाहि तें विवर. ॥७॥ गेला पाताळीं, कीं त्याचें द्वारचि तसें महाबिळ तें, पाहे प्रकाशवर पुर; सर्वत्र श्रेय साधुला मिळतें. ॥८॥ करुनि प्रवेश, पाहे नृपसुत अतिरम्य शून्य परि पुर तें, स्त्रीतें विलोकुनि पुसे, उत्तर ईक्षणहि ती न करि पुरतें. ॥९॥ ती स्त्री प्रवेशली ज्या प्रासादीं सत्वरा, तयामाजी नि:शंक कुमार शिरे, द्वारीं स्थापूनि तो महावाजी. ॥१०॥ रत्नकनकपर्यंकीं पाहे तो रतिसमा नवी रमणी; अवलोकिला तिणेंही सहसा हा स्मरसमान वीरमणी. ॥११॥ पर्यंकावरुनि उठे, त्यातें अवलोकितांचि ती मोहे, जळपवनाद्युपचारें स्वस्था तीची सखी म्हणे, ‘ हो हे. ’ ॥१२॥ होय मुहूर्तें सावध, मधुर पुसे सर्व वृत्त तीस, ‘ तूं कोणाची ? कां या शून्यपुरीं क्लेशपात्र होतीस ? ’ ॥१३॥ वृत्त प्रेमें पुसतां सुदती स्वसखीमुखाकडे पाहे, ती बोले, " पुरुषवरा ! वृत्त क्लेशद इचें असें आहे:- ॥१४॥ गंधर्वांचा राजा, विश्वावसु, जिष्णुचा सखा आहे, त्याची मदालसाख्या कन्या धन्या, बहु प्रिया, बा ! हे. ॥१५॥ जो वज्रकेतुदानव, तत्सुत पाताळकेतु या नावें, या पाताळीं वसतो, कळिकाळें ज्यासि मित्र मानावें. ॥१६॥ उद्यानगता हे त्या दुष्टें, हरिणी वृकें, तसी धरिली; मत्प्रियसखी मदांधें, प्रकटुनि माया तमोमयी, हरिली. ॥१७॥ येत्य त्रयोदशीचा निश्चय केला इला वरायाचा, ‘ शूद्र श्रुतिस, मज तसा हा ’ म्हणुनि इणेंहि बा ! मरायाचा. ॥१८॥ भेटोनि सुरभि वदली, ‘ वत्से ! धरिं तूं मदुक्तिचें स्मरण, हा दानवाधम तुला पावेल न, वांछितीस कां मरण ? ॥१९॥ या नरलोकगतातें भेदील शरेंकरूनि जो मर्मीं, तो सत्वर तव भर्ता होवुनि, घालील तुज महाशर्मीं ’॥२०॥ मीं या मदिराक्षीची आली, मत्तात विंध्यवान् जाण, मत्पति पुषकरमाली, शुंभें केला रणीं गतप्राण. ॥२१॥ गत्यर्थ तीर्थयात्रा करितां, फ़िरतां मनुष्यलोकांत, कळलें, हे ज्या दुष्टें केली मग्ना हरूनि शोकांत, ॥२२॥ पाताळकेतु दानव मानवलोकीं वराहतनुधारी, मुनिरक्षणार्थ कोणीं केला खरबाणविद्ध अविचारी. ॥२३॥ तछोध करुनि सत्वर आलें तें वृत्त ईस कळवाया, पळवाया चिंतेतें, दुर्जनवदनें समस्त मळवाया. ॥२४॥ पुससि इच्या मूर्छेचें कारण जें, तेंहि सांगत्यें, परिस; परि सत्य गमो ईस त्वद्दर्शन बहु, न अमृत यापरिस. ॥२५॥ हे प्रीतिमती झाली, दर्शन होतांचि, या तुझ्या रूपीं; कीं मानसींच हंसी रमती, न रमे कदापि ती कूपीं. ॥२६॥ जेणें दानव वधिला, त्याची व्हावी मदालसा भार्या; कार्याकार्य न जाणे, यास्तव मूर्छेसि पावली आर्या ! ॥२७॥ आलें, आमरण इणें भोगावें दु:ख, हें इच्या भागा, कीं चित्त तुझा ठायीं, भर्ता तो अन्य गा ! महाभागा ! ॥२८॥ सुरभीचें वचन मृषा होवूंचि नये कधीं असें आहे, या हे रूपा भुलली, चित्तीं चिंता सुदु:सहा वाहे. ॥२९॥ ईच्या प्रीतिस्तव मीं आल्यें धांवोनि, पावल्यें खेद, कीं आपल्या सखीच्या देहांत स्वल्पही नसे भेद. ॥३०॥ जरि हे अभिमत - पतितें शुभदैवेंकरुनि पावती धीरा ! वीरा ! तरि मीं करित्यें तप, पावाया भवाब्धिच्या तीरा. ॥३१॥ निजवृत्त सांग सुमते ! येथें आलासि कोणत्या कार्या ? तूं कोण ? देव किंवा दानव, गंधर्व, नाग कीं, आर्या ! ॥३२॥ मानुषगति पाताळीं नाहीं, रूपहि असें मनुष्याचें, मदनचि गमसी, धारण जरि पुष्पांच्या नसे धनुष्याचें. ॥३३॥ म्यां कथिलें तत्व जसें साधो ! तूंही यथार्थ सांग मला, पाताळीं शून्य पुरीं चतुरा ! कार्य प्रवेश कां गमला ? " ॥३४॥ तो तीस म्हणे, " अमळप्रज्ञे ! करुनि स्थिर स्वचित्तातें, श्रवण करा, पाठविलों मीं मुन्यवनार्थ शत्रुजित्तातें, ॥३५॥ मुनिरक्षणार्थ कवची, कोदंडी गालवाश्रमीं होतों, जों त्यासि म्हणें, ‘ बापा ! तूं न मनीं गालवा ! श्रमी हो; ’ तों ॥३६॥ आला सहसा दैत्य स्वीकारुनि उग्र रूप कोलाचें, म्यां हृदय भेदिलें निज बाणें त्या तापसार्तिलोलाचें. ॥३७॥ होतां विद्ध पळाला, त्यामागें धांवलों हयारूढ, शिरला गर्ती प्राणत्राणार्थी विप्रशत्रु तो मूढ. ॥३८॥ माझा वाजीश्वरही शिरला गर्तीं तया खळामागें, ज्यातें न मन म्हणे ‘ श्रम झाला बहु धांवतां, जळा मागें ’. ॥३९॥ भ्रमलों तमांत बहु मीं, मग झालों पाहता प्रकाशातें, तुज पाहुनि, पुसिलें, परि न वदुनि आलिस इच्या सकाशातें. ॥४०॥ तुज अनुलक्षुनि आलों या प्रासादांत कुंडले ! सुमते ! मीं सत्य मनुष्य मधुप, देवासुरपन्नगादि जे, सुम ते ". ॥४१॥ श्रवण असें होतां, ती हर्षे, लाजे मदालसा कन्य, वदनीं सुस्मित वाहे, पाहे स्वसखीमुखाकडे धन्या. ॥४२॥ ती कुंडला म्हणे, ‘ तूं वीरा ! वदलासि सत्य, मन ईचें तरिच तुतें अनुसरलें; वरुनि सरा, वन वसेल न नईचें. ॥४३॥ चंद्रातें पावुनियां तपनद्युति पावती अधिक कांति; क्षांति श्रेष्ठा, धन्या भूति मिळे, धृति भटा, कविस शांति. ॥४४॥ त्यांचि अधम तो वधिला, कां मिथ्या कामधेनु बोलेल ? कन्याकरग्रह करीं, हर्षें गंधर्वराज डोलेल. ’ ॥४५॥ राजकुमार म्हणे, ‘ सति ! मीं आहें नाथवान्, कसें स्वमतें हें कन्यारत्न वरूं ? गुरुलंघन यांत मन्मना गमतें ’. ॥४६॥ आलि म्हणे, ‘ न वद असें, होसिल न, इतें वरूनि, अपराधी; देवी हे दुष्प्रापा, म्हणुनि करावी कदापि न परा धी ’. ॥४७॥ नृपसुत म्हणे, ‘ बहु बरें, देवीवचनहि अलंघ्य, सांगाल विहितचि, तें कर्म करिल न गुरुजनाचे प्रफ़ुल्ल कां गाल ? ’ ॥४८॥ या कुवलयाश्ववचनें बहु हर्षें सालि कुंडला भरली, गंधर्वेश्वरकुलगुरु तुंबरुतें तेधवां मनीं स्मरली. ॥४९॥ स्मरतांचि कळे, आणी पाताळीं वत्सलत्व तुंबरुतें; धेनुहि धांवे, न म्हणे, ‘ करुनि विलंब, स्वतोक हुंबरु तें ’. ॥५०॥ तो तुंबरु संपादी दोघांच्या सुविधिनें विवाहातें, वंदूनि आखुवाहा, हंसवृषभवाहसह विवाहातें. ॥५१॥ तुंबरु गेल्यावरि ती स्वसखीतें कुंडला म्हणे ‘ आले ! त्वद्हृदयीं, सद्गुण जे, ते सर्व सुखें वसावया आले. ॥५२॥ तुज न लगे शिकवावें, स्नेहें देत्यें परंतु आठवुनी, पतिभजनीं सुख पावो तव मति, शीतांत जेंवि पाठ वुनीं. ॥५३॥ पति परमेश्वर याच्या भजनीं अनुकूलबुद्धि हो भावें, लोभावें न तनुसुखीं, त्वां संपादूनि कीर्ति शोभावें ’. ॥५४॥ त्या नृपपुत्राहि म्हणे, ‘ तुज सर्वज्ञासि काय सिकवावें ? स्रेहें वदत्यें, स्त्रीसह पुरुषार्थत्रय जपोनि पिकवावें. ॥५५॥ स्त्रीयोगें पुरुषाचे साधति धर्मार्थकाम, सत्या गी हे श्रुतिची, सात्विक घे, राजस कीं ईस तामस त्यागी. ॥५६॥ दोघें चिरकाळ तुम्हीं सतत सुखें पुत्रपौत्रसह नांदा, तुमच्या यशासि सज्जन सेवूत, चकोर ते जसे चांदा. ॥५७॥ सफ़ल मनोरथ झाले, स्वस्थ मनें जातसें तप कराया. हेंचि परम मधुर मना माझ्या, अमृतहि गमे सपक राया ! ’ ॥५८॥ स्वसखीतें आलिंगुनि, तत्पतितें नमुनि, कुंडला गेली. हेलिस्यंदनतुरगीं घेवुनि हृष्ट प्रियें प्रिया केली. ॥५९॥ निघतांचि पुराबाहिर, ये दुर्भति तालकेतु सह-सेन; गर्जुनि म्हणे, ‘ तुज वधुनि कां मीं, होवूनि मुदित, न हसेन ?’ ॥६०॥ त्या वीरवरें त्वाष्ट्रें भंगुनि पाताळकेतु़च्या अनुज्या, विजयश्रीसह नेली गंधर्वक्षोणिजानिची तनुच्या. ॥६१॥ समरीं मुहूर्तमात्रें दंत्यचमूच्या करूनि घातातें, सस्रीक नमुनि, कळवी वीर कुवलयाश्व वृत्त ताता तें. ॥६२॥ सुतविजयें भूपाच्या आनंदा त्रिभुवनीं नसे जोडा, थोडा स्वप्राण प्रिय वाटे त्या, त्यापरीस तो घोडा. ॥६३॥ ताताज्ञेनें बैसोनि दिव्याश्वीं, सर्वदाहि साधु निघे, पूर्वाह्रींच महिवलयगत विश्वाशीं तदिष्ट साधुनि घे. ॥६४॥ क्षितिपर्यटन करुनि, तो स्वजनीं करि अमृतवर्ष वीरमणी, क्रीडुनि रम्योपवनीं, मणिभवनीं बहुत हर्षवी रमणी. ॥६५॥ यापरि वर्तत असतां, रम्याश्रम रविसुतातटीं पाहे, ज्यांत महामुनिरूपें मायावी ताळकेतु तो आहे. ॥६६॥ त्यासि न जाणुनि, भेटे शत्रुजिदात्मज; तयासि तो खोटा मोटा गोड वरि, कठिन आंत, गुळें घोळिला जसा गोटा. ॥‍६७॥ राजसुतासि खळ म्हणे, ‘ तुज कांहीं प्रार्थना असे, परिस, परि भंग तिचा न करीं; तूं दाता, कल्प जो, तयापरिस. ॥६८॥ बा ! धर्मार्थ करावा यज्ञ, असें जाहलें असे चित्त, परि शुचि तप मात्र असे, इतर नसे लेश संग्रहीं वित्त. ॥६९॥ साहित्य दक्षिणेचें नसतां, करिती वृथा कवि न यज्ञ, दे हें कंठविभूषण, पितृसम दाता, न तूं अविनयज्ञ. ॥७०॥ बापा ! महाप्रतापा ! विप्रावनपुण्यकर्मदक्षा ! या, उदकीं स्तवूनि वरुणा यें, तों वस आश्रमासि रक्षाया ’. ॥७१॥ ग्रीवाभूषण देवुनि, नमुनि, म्हणे कुवलयाश्व, ‘ चापातें, सजुनि करीं बसतों, जें कर्तव्य, करीं विशंक बापा ! तें. ’ ॥७२॥ हर्षें कपटमुनि करी मज्जन यमुनेंत, शत्रुजिन्नगरीं जाय, तसा तो शोकीं पडुनि, जसा जीव होय खिन्न गरीं. ॥७३॥ भेटुनि शत्रुजितातें, गंधर्वेश्वरसुतासमक्ष ‘ महा - झाला घात ’ म्हणे, ‘ यश ज्याचें दुग्धाब्धिच्या सम क्षम हा ! ॥७४॥ त्वत्पुत्र कुवलयाश्व ब्राम्हणमुख्यप्रजावनामूळें, बापा ! मायावि - वरें दैत्यें हृदयींच भेदिला शूळें. ॥७५॥ प्राणोत्क्रमणीं मज हें कंठविभूषण दिलें बळें नमुनीं, तैशा समयीं घ्याया दान सदय मीं न कां वळेन मुनी ? ॥७६॥ त्या शूद्रतापसानीं अग्नि दिला, जरि धरूं न दे वाजी, रडला तरि, दैत्यानें नेला बंधन करून देवाजी ! ॥७७॥ हें म्यां विलोकिलें बा ! कारण दु:सहतरोग्र तापाचें. झालें प्राप्त फ़ळ मजहि माझ्या बळिपूर्वजन्मपापाचें ! ॥७८॥ उत्तरकार्य करीं बा ! सविवेका क्षम न शोक घेराया; मज नि:स्पृहा कशाला हें भूषण ? तूं विलोक, घे राया !’ ॥७९॥ ऐसें बोलोनि, पुढें भूषण ठेवूनि, निघोनि तो जाय. राय क्षोणिवरि पडे, प्रियसुतशोकें म्हणोनियां ‘ हाय.’ ॥८०॥ राज्ञीला शोक जसा ताप, तसा पापिया न रौरव दे. अंत:पुरजनचि न तो, ‘ हा ! हा ’ ऐसें अशेष पौर वदे ! ॥८१॥ प्रियशोकें प्राणातें तत्काळ सती मदालसा सोडी. भूप म्हणे, ‘ शोच्य नव्हे हा मत्सुत, सुयश सुगतितें जोडी. ॥८२॥ मुनिरक्षणासि जैसा, तैसा न प्राणरक्षणा जपला; खपला अपलायनकर, बहुधा बहुजन्म साधु हा तपला. ॥८३॥ जैसी मदालसेची कोणाचीही असी प्रसू नाहीं, हे पूजिली सुराहीं, देवी दुर्गा जसी, प्रसूनाहीं,॥८४॥ राज्ञीहि उठोनि म्हणे, ‘ श्रितरक्षक विष्णुचक्र वत्सा ! जें, तें तुज धन्य म्हणेल, स्वर्गीं त्रिदशांत शक्रवत् साजें. ॥८५॥ जरि गेलासि न पुसतां, तरि वत्सा ! मीं करीन कां रुसवा ? मरुनि रणीं, त्वां माझा केला बा ! धन्य या जगीं कुसवा. ॥८६॥ वत्से ! मदालसे ! हा तुजसह तव कांत सुचिर नांदावा. चांदा वाटो प्रियसख, यासीं द्विजपाळ करिल कां दावा ?’ ॥८७॥ सस्त्रीक नृप विवेकें क्षम जाळायास होय देहातें, दाहोत्तर स्नुषेतें, त्या पुत्रातेंहि तोय दे हातें. ॥८८॥ यापरि दु:सहशोकीं बुडवुनि महिपतिस, महि, मायावी हर्षें फ़ार; दया कां त्या, करितां घात, अहिसमा यावी ? ॥८९॥ तो यमुनेतूनि निघे असुर, म्हणे, ‘ कार्य करुनि मीं आलों, झालों कृतकृत्य, तुवां केलें साहित्य, बहु सुखें धालों. ’ ॥९०॥ ऐसें बहु मधुर वदे, दे आज्ञा त्यासि, नमुनि हरिवरि तो बसुनि पुरा ये, ज्यातें स्वप्नीं पाहोनि, भीति अरि वरितो. ॥९१॥PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg