मदालसोपाख्यान/अध्याय तिसरा

विकिस्रोत कडून

<poem>

पाहुनि राजसुतातें, बहु आशी, बहु करूनि गौरव, दे; विस्मित होवुनि भेटे, ‘ भद्रं, ’ समस्त पौर वदे; ॥१॥ विस्मित होवुनि, वंदुनि, वृत्त पुसे कुवलयाश्व तातातें. कथिति, गळां पडुनि, रडुनि, जें दारूण वृत्त, तातमाता तें. ॥२॥ चित्तीं नृपपुत्र म्हणे, ‘ मजकरितां त्यागिला स्वकाय जिणें, तीच भलीं !, धिक् ! कठिना मातें हें श्लाघ्य होय काय जिणें ? ॥३॥ काय प्रत्युपकार प्राणत्यागें स्तियांस हें युक्त ? त्या साध्वीच्या न रिणापासुनि होयिन, मरोनिही, मुक्त. ॥४॥ रिपु हर्षताल रडतां, माझा तत्काळ भंग करितील, हरितील राज्यपद; मग बहु मातातात, ताप वरितील. ॥५॥ जीवित ताताधीन, त्यागावें म्यां कसें पराधीनें !’ यापरि विचार करिता झाला शोकांतही बरा धीनें. ॥६॥ उत्तरकार्य करी मग, नृपसुत डोळे करूनियां ओले; ‘म्यां स्त्री मदालसान्या न वरावी ’ निश्चयें असें बोले. ॥७॥ स्त्रीभोग त्यजुनि, असे शोकाग्नीच्या वहात आहेतें बा ! कार्य करीसा क्षम कोणाचाही न हात आहे तें. ॥८॥ तो ‘ उर्वशीहि ’ म्हणतो ‘ न लगे, व्हावी मदालसा मातें. ’ ओसणतो प्रियसख हो ! किति कष्टा या वदाला सामातें. ॥९॥ व्हावी मदालसेची प्राप्ति पुन्हा, हेंचि एक तत्कार्य, सत्करावा म्हणसी, तरि होयचि तो सुसाधुसत्कार्य. ॥१०॥ कार्य कुवलयाश्वाचें दुर्घट लोकेश्वरांसही बा ! हें, मग कोण समर्थ जगीं त्यासि म्हणाया ‘ अभीष्ट तूं लाहें ’? ॥११॥ अश्वतर म्हणे, " सुत हो ! जरि जन जाणुनि अशक्य कर्मातें, न करितिल अनुद्योगें, पावतिल न कार्यसिद्धिशर्मातें. ॥१२॥ पुरुषें आरंभावें कर्म, न पौरुष कदापि सोडावें; कर्मफ़ळ, जसें दैवें, स्पष्ट तसें पौरुषेंहि जोडावें. ॥१३॥ यास्तव यत्न तसा मीं करिन, जसें सिद्ध होय हें कार्य; म्हणती, ‘ सर्वार्थांची सिद्धि असे निश्चयीं, ’ असें आर्य. " ॥१४॥ ऐसें बोलुनि फ़णिवर जें सुयशस्कर, मनांत आणी तें, प्लक्षावरणतीर्थीं तुहिननगीं जाय शरण वाणीतें. ॥१५॥ दुष्कर तप करुनि, करी अश्वतर श्रीसरस्वतीस्तवन, जीचा प्रसाद वृद्धि ज्ञाना दे, पावका जसा पवन. ॥१६॥ ‘ प्रणवादिजगन्मूर्ते ! कारुण्यनिवासमानसे ! वाणि ! माते ! तुज नत जो, त्या विधिविष्णुशिवासमा नसे वाणी. ’ ॥१७॥ देवी भेटोनि म्हणे, ‘ झाले जे भक्त शिष्टवर मागें, अश्वतरा ! तदधिक तूं, घे देत्यें सर्व इष्ट, वर मागें. ’ ॥१८॥ अश्वतर म्हणे ‘ माते ! भ्राता कंबळ सहाय दे आधीं, दोघांसि गानविद्या अतुळा देवूनि, कीर्तिला साधीं. ’ ॥१९॥ श्रीविष्णुप्रभुजिह्वा वाणी ‘ दिधलें, ’ असें मुखें वदली, पदलीना बहु निववी ती चित्कर्पूरपूरिता कदली. ॥२०॥ श्रीवाणी वर देवुनि जातां, तत्काळ सुवर तो फ़ळला; गानप्रकार निरुपम अश्वतरा कंबळासही कळला. ॥२१॥ मग जावुनि कैलासीं, सांबा, तद्भक्तिचें पद, भ्राते यश गावुनि, आराधिति, जोडाया तत्कृपा अदभ्रा, ते. ॥२२॥ मधाह्ननिशासंध्यासमयीं सप्रेम नित्य यश गाती. चिरकाळें भक्तांची कल्पलता त्यांसि होय वशगा ती. ॥२३॥ कुतुकें सर्वार्थास प्रभु जो वीणार वासवाद्यांस, होय प्रसन्न, सेवुनि त्यांच्या वीणारवास वाद्यांस. ॥२४॥ दे दर्शन देव, वदे, ‘ घ्या वर, जैसा यशाचिया, गानें, होतों प्रसन्न, अहि हो ! नच योगानें तसाचि यागानें ’. ॥२५॥ कंबलसह अश्वतर प्रभुतें वंदुनि म्हणे, ‘ जरि वरातें देतोसि, कुवलयाश्वा द्यावें, स्त्रीरत्न जें, मृत हरा ! तें. ॥२६॥ वय, रूप, स्मरण, तिचें तेंचि असो व्यक्त; योगिनी धन्या, हे अधिकयोगिमाता व्हावी माझी मदालसा कन्या ’. ॥२७॥ ईश्वर सांगे, ‘ भक्षीं, श्राद्ध करुनि, पिंड मध्यम, व्याळा ! होयिल तसीच ती तव मध्यमफ़णजा मदालसा बाळा ’. ॥२८॥ प्रभुतें वंदुनि गेले हर्षें पन्नग रसातळीं गेहीं, शिवदर्शनवरलाभें ज्यांच्या रोमांच दाटले देहीं. ॥२९॥ अश्वतर श्राद्धान्तीं मध्यम पिंडासि आदरें भक्षी, तत्काळ मध्यमफ़णश्वासप्रभवा मदालसा भक्षी, ॥३०॥ अश्वतराला झाला जो, तो आनंद काय सांगावा ? प्रभुचा, प्रभुभक्तांचा महिमा आम्हीं सदा न कां गावा ? ॥३१॥ कोणासहि न कळों दे, ठेवी अंत:पुरांत बाळेतें, जपति स्त्रिया बहु तितें, जेंवि स्वर्वृक्षपुष्पमाळेतें. ॥३२॥ मग तो म्हणे सुतांतें, " कां स्वगृहा कुवलयाश्व आणा ना ? साधु, सखा, उपकारी, पूज्य; असें कां मनांत जाणा ना ? ॥३३॥ निववा याचि सुदिवसीं मित्राच्या, स्मरण धरुनि, आनयनें, प्राशाया अतितृषितें वाट पहातात, करुनि, ‘ आ ’ नयनें ". ॥३४॥ प्राप:काळीं भेटुनि, ते आधीं सांगती कथा भव्या, मग ‘ अस्मदाश्रमातें ये ’. ऐसी गोष्टि काढिती नव्या. ॥३५॥ नृपसुत म्हणे, ‘ सखे हो ! या वाक्यें फ़ार वाटतो खेद, तुमचें हें सर्वस्व, प्रिय हो ! कां आज कल्पितां भेद ? ॥३६॥ सत्य सखे हो ! माझे परम हित तुम्हीं बहिश्चर प्राण, या मज दैवहताच्या झाला हृदयांत भेद हा बाण’ . ॥३७॥ ऐसें वदतां अहिसुत ते ताताज्ञा तयास कळवीती, तो नमुनि म्हणे ‘ झालों धन्य; कुशळ गुरुदया सकळ वीती. ॥३८॥ सत्वर चला, सखे हो ! ताताज्ञाश्रुति अतिक्रमिल कोण ? शोण न होवूं द्यावा तिळमात्रहि तातदृष्टिचा कोण ’. ॥३९॥ बोलुनि असें तयांसह नगराबाहिर निघोनि, तो पावे द्रुत गौतमीस, कीं नच उशिरें ते तातपाद कोपावे. ॥४०॥ त्या गौतमीनदींत व्याळनरेश्वरकुमार ते सिरले, जींत स्त्रातसकळजनदोष, ज्वाळेंत शलभसे, जिरले. ॥४१॥ मानी कुमार चित्तीं तटिनीपारीं स्वमित्रसदनातें, नेती नदींत दोघे फ़णिसुत ते त्या प्रसन्नवदनातें. ॥४२॥ सिरवुनि सरितेंत, बळें आकर्षुनि सर्पपुत्र मित्रास, नेती पाताळीं ते, परि पावे तो न लेशहि त्रास. ॥४३॥ निजलोकीं निजरूप प्रकटिति मग ते फ़णींद्रसुत दोघे, पाहुनि हर्षे हांसे, तत्सुगुणांतें गुणज्ञवर तो घे. ॥४४॥ प्रेमीं न चळे, गातां जैसा नारद महातपा ताळीं; अश्वतरप्रासादीं गेला कुतुकें पहात पाताळीं. ॥४५॥ ते त्या कथिति स्वपिता, अश्वतर व्याळपाळ दावूनी; तो कुवलयाश्व वंदी विनयें, चित्तांत तात भावूनी. ॥४६॥ सुतमित्रातें पाहुनि, तो अहि उतरे वरासनावरुनी, भेटे, माथां हुंगी, कुरवाळि तया करास नावरुनी. ॥४७॥ तो त्या म्हणे, म्हणावें साक्षात् तातें जसें, ‘ चिरं जीव; गुरुजनमन सुगुणांहीं बहु रंजविसी, असेंचि रंजीव. ॥४८॥ सुगुण तुझे आयिकतां या पुत्रांच्या मुखें, हृदय रमलें, आणविलासि पहाया वत्सा ! तुज पाहतां, सुदिन गमलें. ॥४९॥ जो पुरुष गुणी, त्याचें जीवित तें श्लाघ्य होय लोकांत, जीवंतहि मृत अगुणी, कीं बुडवी स्वजनचित्त शोकांत. ॥५०॥ गुणवान् सुख वाढवितो साधुमनीं, रिपुजनांत तापातें; पापा-तेंवि अपत्या अगुणा न भजति, नसोचि बापा ! तें. ॥५१॥ देव, पितर, विप्र, अतिथि, अर्थी, जे विकळ, मित्र, जन बा ! हे गुणिजीवित चिर वांछिति, वाहे हा यांसि भाग, यश लाहे. ॥५२॥ वत्सा ! गुरुजनरंजनरतहृदया ! भव्यगुणगणावासा ! तुझिया ठायीं जो जो, तो तोहि गुणांत गुण गणावासा. ’ ॥५३॥ ऐसें वर्णुनि फ़णिवर, पुत्रांसि म्हणे, ‘ उठा, सखा न्हाणा, आणा स्वन्न मधु, अशन करवा, पूजा बहिश्चरा प्राणा. ॥५४॥ राहो, बोलायाची यासीं आहे कथा पुनरपि हिता, हृदयीं रहस्यवार्ता राहों देयिल न हा सुनर पिहिता. ॥५५॥ विनयें न वदे किमपि, प्रेमें परि वाक्य मान्य तो करि तें, त्या पूर्ण करूं पाहे अहि, न असों दे समर्थ तोक रितें. ॥५६॥ स्नानाशनादि करवुनि, करुनि, प्रेमें सभेंत सुतसहित अश्वतर बसे, बसवुनि जवळ नृपतनय, वदावयास हित. ॥५७॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.