Jump to content

मदालसोपाख्यान/अध्याय पहिला

विकिस्रोत कडून

<poem>

श्रीशंभुच्या प्रसादें झाली त्रिजगीं मदालसा मान्या, बुध हो ! या साध्वीतें, सेवुनि सुयश, न वदाल सामान्या ॥१॥ मार्कंडेयपुराणीं या देवीचें चरित्र सन्महित, ज्याच्या गानें - पानें होतें, व्हावें तसेंचि, जन्महित ॥२॥ पूर्वीं होता राजा, नाम जया शत्रुजित् सदाधारा, यत्कीर्तिसकृति सेव्या, अमृतरसाची जसी सदा धारी ॥३॥ त्याचा पुत्र ऋतुध्वज वरगुण, जैसा जयंत शक्राचा; मदहर गजयूथाचा सिंह, तसा जो स्वशत्रुचक्राचा ॥४॥ ऋषिनृपकुमार भजति प्रेमें त्या सुगुणकेलिसद्मातें, द्विजरूप अश्वतरफ़णिपतिपुत्रहि, मधुप जेंवि पद्मातें ॥५॥ एका समयीं ऐसें अश्वतर पुसे, ‘ कुमार हो ! असतां, रात्रौ मात्र स्वगृहीं, दिवसा कोठें सुबुद्धि हो ! वसतां ? ॥६॥ ते वदले, ‘ नृप आहे शत्रुजिदाख्य प्रसिद्ध, अनयातें जो स्वप्नींहि न साहे, त्याच्या भुललों गुणाढ्य तनयातें. ॥७॥ सुगुणनिधि तसा तोचि, ज्ञाते बहुतचि तयास मानवती, जी साधुता तयाची, वांछिति वर्णूनि देवमानव ती. ’ ॥८॥ अश्वतर म्हणे, ‘ सुत हो ! तो धन्य, यदीय सुगुण हे मागें घेतां मज सुख देतां; वंदावा साधु पुरुष हेमागें. ॥९॥ सत्कार करा प्रेमें, जो तुमचा साधु नरसखा, याचा; मित्रातें न समर्पुनि, तो स्वर्गींचाहि न रस खायाचा. ॥१०॥ तो मृतचि पुरुष, मित्रीं प्रत्युपकृतितें न जो करी यत्नें, स्वसख्यातें सुखवाया द्या मत्सदनांत असति जीं रत्नें. ’ ॥११॥ ते दोघेहि कुमार प्रांजलु वदती असें, ‘ अहो ! तात ! साधु गुणज्ञ गुरु जसे, न स्वस्तरुहि प्रसन्न होतात. ॥१२॥ रत्नें ऋतुध्वजगृहीं; त्या द्याया योग्य नव नसे कांहीं; शशिकांता बालनगा अन्यांहीं तृप्ति न वनसेकांहीं. ॥१३॥ बा ! दिव्य बाहनासनयानांबरभूषणादि जें कांहीं त्याचें, अस्मत्सदनीं या पाताळांत वस्तु तें नाहीं. ॥१४॥ कर्तव्य एक आहे, स्मरतां खिन्न क्षणक्षणीं करितें, विधिहरिहर - दत्त - वरावांचूनि असाधु सर्वथा परितें ’. ॥१५॥ तात म्हणे, " इछितसें ऐकाया मीं तथापि तें कार्य; म्हणति, ‘ असाध्य न कांहीं, कृतनिश्चय जो, तया, ’ असें आर्य ". ॥१६॥ पुत्र म्हणति, ‘ परिसें, जें निजवृत्त पित्या ! ऋतुध्वजें कथित, कथितों ज्याच्या श्रवणें सर्वांचें हृदय होतसे व्यथित. ॥१७॥ ज्या शुद्धपोनिधितें सानंद सदा सुरेशपुर गातें, गालव शत्रुजितातें भेटे, आणूनि दिव्य तुरगातें. ॥१८॥ पूजेतें स्वीकारुनि गालव बोले असें, " आगा ! राया ! आलों तुज कळवाया दु:सह निजताप मीं अगारा या. ॥१९॥ कोणी दैत्य करितसे नित्य उपद्रव मदश्रमीं बापा ! तापा साहों, न शकें द्याया सुतप:क्षयावहा शापा. ॥२०॥ आश्रमपदास माझ्या तापद तो, मोह जेंवि विश्वास; म्यां सोडिला, विलोकुनि अंबर, होऊनि खिन्न, निश्वास. ॥२१॥ तों दिव्याश्व उतरला व्योमांतुनि, जाहली गगनवाणी - ‘ हा शत्रुजितातें दे, तुझिया सुयशा सुखा मग न वाणी. ॥२२॥ पृथ्वीवलयाक्रमणीं अश्व अतिसमर्थ, म्हणुनि हा नावें ‘ कुवलय ’ विख्यात यशें होयिल, विश्वेंहि यासि वानावें. ॥२३॥ यावरि बसुनि, ऋतुध्वज होयिल हरिसाचि मान्य विश्वास. कवि ‘ कुवलयाश्व ’ म्हणतिल, तूं उष्ण न सोडिसील निश्वास. ॥२४॥ अप्रतिअहतगति वाजी पर्वतपाताळगगनजळधींत, हा रविदत्त मद उरों देयिल न निशाचरादिखळधींत ’. ॥२५॥ आज्ञा आतांचि करीं, सनया तनया स्वधर्मदक्षा या, चढुनि कुवलयीं तेजें निजविप्रादिप्रजांसि रक्षाया ". ॥२६॥ राजा म्हणे, ‘ अवश्य; ’ स्वसुतासि बसावयासि दे वाजी; सेवा जीवहिता तो वरि, रुचली फ़ार वासुदेवा जी. ॥२७॥ ‘ जा, जोडीं यश; ’ ऐसें नृप तनया, फ़ुल्ल करुनि गाल, वदे ’. गाधिज जेंवि दशरथा, आशी राज्या तसाचि गालव दे. ॥२८॥ राजकुमारा पावुनि, न म्हणे गाधिज तसाचि गालव ‘ हा ’; व्यासमुनि म्हणे, ‘ भवभयशमना सत्कीर्तिचाचि गा लव हा ’ ॥२९॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.