भोवरा/सुटका

विकिस्रोत कडून




 
 सुटका


 "ह्या वेळी बराच त्रास झालेला दिसतो आहे तुला. फारच दमलेली दिसतेस."
 " तसा त्रास नाही झाला; पण बैलगाडीचा प्रवास आणि चालणं बरंच झालं आणि मापं घ्यायला माणसं इतकी मिळाली, की आम्ही रात्रंदिवस काम करीत होतो; त्यामुळं शीण आला आहे. जाईल दोनतीन दिवसांत."
 लांबचा प्रवास करून मी घरी आले होते. घरातील सर्व गोष्टींचा आस्वाद परत नव्याने घेत होते. रॉकेलचा कंदील किंवा मेणबत्ती यांच्या उजेडात दोन आठवडे वावरल्यावर घरचे विजेचे दिवे विलक्षण तेजस्वी वाटत होते. बऱ्याच दिवसांत उघड्यावर नदीत किंवा आडाच्या पाण्याने अंग धुतल्यावर स्वतंत्र न्हाणी खोलीत साबण लावून ऊनऊन पाण्याने आंघोळ केल्याने मन व शरीर कसे सुखावले होते ! बऱ्याच दिवसांनी खरोखर स्वच्छ कपडे अंगावर आले होते. भात, भाजी, पोळी, आमटी, चटणी, लोणचे वगैरे रोजचेच जेवण पंचपक्वान्नांसारखे वाटत होते. गाडीतून उतरल्याबरोबर फाटक उघडून आंत येते, तो दोघा कुत्र्यांनी अंगावर उड्या मारमारून स्वागत केले होते. त्यांच्या धाकट्या मालकीणीने येऊन अंगणांतच मला मिठी मारली होती व इतर माणसे बाहेर यायच्या आत तिघेजण माझ्या भोवतीभोवती घुटमळून मला पुढे पाऊलच घालू देत नव्हती. पण इतरांनी येऊन ह्या प्रेमाच्या वर्षावातून माझी सुटका केली व मी आत आले. त्या क्षणापासून आतापर्यंत मी बाहेरचे जग विसरले होते- विसरले म्हणण्यापेक्षा ते जग किती निराळे आहे; किती लांब आहे; आता त्याचा आपला संबंध नाही, असे मला सारखे वाटत होते. पण ह्या मोहांतून
मला जागे व्हावेच लागेल. "तो पत्रांचा ढीग पाहिलास का? आज नाही चाळलास तरी उद्या मात्र पाहवा लागले." ह्या बोलण्याने मी दचकले. ह्या गावाहून त्या गावाला अशी मी भटकत होते, म्हणून सर्व डाक इथच अडकून राहिली होती. पत्रांचा ढीग पडला होता. काही थोडी नातेवाईकाचा व मित्र मंडळींची होती. ती घरी सर्वांची वाचून झाली होती. मी ती वाचतावाचता आतील मजकूर व पाठवणारी व्यक्ती ह्यांबद्दल घरगुती गप्पा झाल्या. नंतर दुसरा ढीग समारंभाच्या नित्रणांचा होता. सुदैवाने सर्व समारंभ मी पुण्यास पोचायच्या आत उरकलेले होते. मी एक श्वास टाकून तो ढीग सबंधच्या सबंध उचलून टोपलीत टाकला व उरलेल्या पत्रांकडे वळले.
 "उद्या तरी वेळ कसा मिळणार? सकाळी दोन तास गणेशखिंडीवर शिकवणे, परत येऊन घाईघाईने जेवून कॉलेजात जायचे, तिथे अकरा ते पाचची हजेरी. पंधरा दिवसांच्या गैरहजेरीमुळे कितीतरी विद्यार्थी वाट पाहात असणार. शिवाय तिकडे काही पत्रव्यवहार पाहावा लागणारच. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एकदा आईकडे जाऊन भेटून यायचे आहे. एकदा रोजचे चक्र सुरू झाले म्हणजे वेळ कुठचा? आठवडयातून दोन तास शिकवायचे, तर सातआठ तास वाचन व अभ्यास करावा मला अजून!"
 मी पत्रे पाहू लागले. "आमच्या गावी आम्ही अमकी व्याख्यानमाला योजिली आहे. आपण एक पुष्प गुंफावे" हाच मजकूर निरनिराळ्या प्रकाराने आलेला होता. कोणी मुलांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम सुरू केला होता. "तुम्ही येऊन आमच्या मुलांना गोष्टी सांगा" कोणी लिहिले होते "अमक्या गावात अमके भगिनीमंडळ आहे, त्याच्या हळदीकुंकूप्रसंगी व्याख्यान द्यावे." "अमक्या पेठेत शाळेच्या पाचवी-सहावी-सातवीचा वार्षिक उत्सव आहे, तुम्ही मुख्य पाहुण्या म्हणून यावे व चार शब्द सांगावेत." एका विशेष तडफदार सेक्रेटरीने नुसते आमंत्रण दिले नव्हते तर त्याबरोबर आतापर्यंत कोणकोणते लोक येऊन कशाकशावर बोलून गेले त्याची ठळक अक्षरात यादी दिली होती.
 मी पत्रे पाहात होते तो धाकटी आली. "आपण येत्या शनिवारी सर्कसला जाऊ. बघ, किती छान सर्कस आहे ती!" सर्कशीची एक
जाहिरात तिने माझ्यापुढे टाकली. तिची जाहिरात व त्या सेक्रेटरीचे छापील पत्रक ही दोन्ही इतकी सारखी होती, की वाचून तिच्या हातात जाहिरात देण्याऐवजी मी ते पत्रकच दिले!
 "हे काय भलतंच दिलंस? माझी जाहिरात दे परत, व तुझं पत्र घे तुला!" मी जरा आश्चर्याने ते पत्रक हातात घेतले व परत त्यावर नजर टाकली. नुसते आकार-साम्यच नव्हे तर सर्वच दृष्टींनी ते पत्रक म्हणजे सर्कसची जाहिरात होती. तो सेक्रेटरी निरनिराळ्या जनावरांना प्रेक्षकांपुढे नाचवीत होता. बंगालचा पट्ट्या वाघ, गीरच्या रानातले सिंह व सह्याद्रीच्या जंगलातली हरणे एका रिंगणात उभी होती- छे ! वाचायला चुकले. पुण्याचे महामहोपाध्याय द. वा. पोतदार, मुंबईचे अनंत काणेकर व नागपूरच्या कुसुमावतीबाई देशपांडे एका व्यासपीठावरून, पण एकामागून एक त्या व्याख्यानमालेत व्याख्याने देऊन गेले होते. आता माझा खेळ व्हावा, अशी प्रेक्षकांची मनीषा होती व रिंगमास्तर मला पिंजऱ्यातून बाहेर येण्यास फर्मावीत होते. फडाड्! चाबकाचा आवाज ऐकू येऊन माझे अंग शहारले. मी डोळे चोळून भोवताली पाहिले. अजून तरी मी घरीच होते. मी ह्या सर्कशीत जाणार नाही. ही लिहिणारी सगळी माणसे साक्षर होती, "माझे विचार तुम्हांला ऐकायचे आहेत ना? मग मी मोठ्या परिश्रमाने लिहिते ते लेख व पुस्तके का नाही तुम्ही वाचीत? मला काय येत आहे ते सर्व त्यांत आहे. त्याबाहेरचं मजजवळ काही नाही. मुलांना गोष्टी सांगा की. घरातली मुल पुरेशी वाटत नसली तर आळीतली गोळा करा. कितीतरी आपोआप तुम्हाला दुवा देतील. घरगुती गोष्टींना जागतिक रूप देऊन त्याची जाहिरात कशाला? शाळेतल्या वर्गावर्गांची संमेलने करायची असल्यास खुशाल करा. शिक्षक व विद्यार्थी एकत्र जमा. खा, प्या, हसण्याखेळण्यात एक दिवस घालवा; पण त्याचा समारंभ करून त्याचा साक्षी म्हणून परक्याला का बोलावता? संक्रांतीच्या हळदी-कुंकवालासुद्धा अर्घ्य लागू लागले. नशीब माझ की लग्नसमारंभ अजून अमक्या तमक्याच्या अध्यक्षतेखाली नाही होऊ लागले !"
 "अग तू व्याख्यान कसलं देते आहेस आणि चिडली का आहेस? लिहून टाक सगळ्यांना, वेळ नाही म्हणून."
 मी मोठमोठ्याने बोलत होते हे माझ्या ध्यानातच नव्हते. मी गप्प
बसले. "सारखा दोन दिवस प्रवास चालला होता. दमली आहेस, आता नीज. उद्या लिहिता येतील उत्तरं"
 "नाहीतर मी कार्ड लिहून ठेवतो. तू नुसत्या सह्या कर," मोठ्या सहानुभूतीने मुलग्याने पुस्ती जोडली. झाली एवढी शोभा पुरे, म्हणून मी पण मुकाट्याने निजावयास गेले.
 दोनतीन दिवस सुखाचे गेले. कामात होते, पण त्यात त्रास व शीण वाटत नव्हता. आठवड्यात एकच लेक्चर होते; ते घेऊन झाले होत. कॉलेजातील सहकारी मंडळींशी बोलणे-चालणे झाले. कितीतरी विद्यार्थी शंका विचारून गेले. इतर काही पीएच्. डी. च्या निबंधाची टाचणे घेऊन आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली. घरी एक पोलके शिवायला घातले. कसल्याशा वड्या मुलांना आवडतात, त्या केल्या. धाकटीने साड्या फाडून ठेवल्या होत्या त्या शिवल्या. तरी काही कामे राहिली होती. मुख्य म्हणज प्रवासातील खर्च केलेल्या पैशाचा हिशेब व रोज झालेल्या कामाचा तपशील लिहून तयार करावयाचा होता. हिशेबाची कटकट नेहमी असते. खर्चाचे टाचण तयार असते; पण ते जसेच्या तसे देता येत नाही. काही खर्च ऑडिटर मान्य करीत नाही. उदाहरणार्थ, जंगली मुलुखात पुरुषांना दिलेल्या विड्या व लहान मुलांना दिलेला खाऊ ह्यासाठी पाच सहा रुप खर्च झाले होते; ते कशात घालायचे? एका गावाला जाताना गाडीत जागा नव्हती, म्हणून दुसऱ्या वर्गाने प्रवास केला. ते पैसे कसे दाखवायचे ! पण आता मला ह्या हिशेबांची सवय झाली होती. मुख्य म्हणजे माझी मदतनीस ऑफिसच्या मदतीने ह्या सर्व गोष्टी ठाकठीक करीत होती, म्हणून मला त्यांचे ओझे वाटत नव्हते. काढलेले फोटो छापायचे, त्यात एखादा दिवस जाणार; पण तेही काम मदतनीस करील सावकाश, म्हणून मी एकंदरीने स्वस्थ होते. रोजच्या ठराविक आयुष्याच्या चाकोरीतून गाडी चालली हाेती. अभ्यास, आणलेल्या माहितीचे वर्गीकरण व टाचण, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व घरातले काम आणि वाचन व अधूनमधून लेखन. शनिवार रविवार जवळच आले होते. तेव्हा घरी विश्रांती घेतली, म्हणजे उरलासुरला शीण पण जाईल, अशी माझी खात्री होती.
 तिसरा दिवस उजाडला. सकाळचे सर्व आटोपून जरा पुस्तक हाती धरले तो एक बाई भेटावयास आल्या. "मी अमकी अमकी. म्हटलं,
तुम्हांला पाठवलेल्या पत्राचं उत्तर आलं नाही; समक्षच भेटावं म्हणून काल संध्याकाळच्या गाडीनं आले."
 मी जरा आश्चर्याने म्हटले, "अहो; तुम्हांला पत्र पाठवल्याला तीन दिवस झाले. तुमच्या गावी पुण्याहून तर दुसऱ्याच दिवशी पत्र जातं."
 "छे बाई, मिळालं नाही. मी अगदी रोज वाट पहात होते. मग काय उत्तर दिलं?"
 "मला येता येणार नाही. इथंच माझी ढीगभर कामं साचलीत." मी तुटकपणे म्हटले.
 "मला नव्हतीच आशा! सगळ्यांनी विनवून सांगितलं की तुम्हांला आण. मी म्हटलं, त्या कशाला आपल्या लहानशा गावात येतात! शहर म्हणायचं, पण खरं म्हणजे पुण्याच्या मानानं खेडंच. तर मी येते. त्या अमक्याचं घरी किती दूर आहे हो? कसं जायचं ते सांगा. पुण्याची इकडली वस्ती मला माहीत नाही. जरा कुठल्या रस्त्यानं जायचं ते सांगा, म्हणजे मी जाईन"
 माझे पत्र पोचले नाही, म्हणून त्या बाईला इतक्या लांब यावे लागले. इकडे वाहन मिळायची पण पंचाईत. बाई दमल्यासारखी दिसत होती. मला माझ्या तुटकपणाची लाज वाटली. मी मवाळ आवाजात म्हणाले, "वीसपंचवीस मिनिटं थांबलात तर बस येईल. तुम्हांला जिकडं जायचं त्याच रस्त्यानं जाईल. जरा बसा, चहा करते."
 "छे ! चहा नको. तेवढं तुम्ही हो म्हटल असतंत म्हणजे माझे सारे श्रम हरले असते. पण तुम्हांला आग्रह करायचा तरी जिवावर येतं. तुम्ही कामाची माणसं, सगळी शिकलेली. आमचा समाज आपला खेडवळ. दुसऱ्या कुणाचं नाव सांगा; नाहीतर चिठ्ठी द्या, म्हणजे तिकडं जाईन."
 सांगायचे तात्पर्य काय, बस यायच्या आत मी व्याख्याने द्यायचे कबूल केले; शनिवारी सकाळच्या गाडीने जायचे, रविवारी रात्रीच्या गाडीने परत आले, की सोमवारी कॉलेजला हजर राहता येईल वगैरे. ती बाई गेली, आणि मी कशी हा हा म्हणता बळी पडले, त्याची जाणीव होऊन मी कपाळावर हात मारून घेतला! तेवढ्यात मुलगा बसण्याच्या खोलीत आला. "शेवटी पाघळलीस ना?" त्याने कुचेष्टेने विचारले. माझा दुःख व राग शब्दांपलीकडे होते. मी फक्त मान हालवली. मला माझा स्वतःचा राग आला
होता. मी खुशामतीला बळी पडले होते. नुकतेच कुठल्याशा पुस्तकात एका सर्कसवाल्याची मुलाखत वाचली होती; त्यात त्याने सांगितले होते- प्राण्यांना माणसाळवयाला व शिक्षण देण्यासाठी हल्ली चाबकाचा वा काठीचा उपयोग करीत नाहीत. युक्तीने व गोडीगुलाबीने त्यांच्याकडून कामे करून घेतात. अगदी हेच तंत्र त्या बाईने वापरले होते, व मी माकडा-कुत्र्याप्रमाणे त्याला बळी पडले होते. माझी शनिवार रविवारची सुटी बुडाली होती. माझे व पोरीचे न्हाणे एका आठवड्याने पुढे गेले होते. व्याख्यान लिहण्यापायी पुढचे दोनतीन दिवस तरी खर्ची पडणार होते.
 मी कॉलेजात गेले, पण माझा कामातला उत्साह गेला होता. मन वाचण्यात, लिहिण्यात कशातच केंद्रित करता येईना. संध्याकाळी घरी आले, तो काही काम हातून न होताही थकलेली अशी आले; व कोचावर लवंडले. "मी सरबत करते आहे, घेशील ना?" जेवणघरातून आवाज आला. मी 'हो' म्हटले. एवढ्यात टेलिफोनची घंटा वाजली. "कोण आहे?"
 "मी अमकी, तुमच्याशीच काम आहे. येत्या मंगळवारी आम्ही आमच्या बालवाचन मंदिराचा उद्घाटन-समारंभ तुमच्या हस्ते करण्याच ठरवलं आहे. तुम्ही हो म्हटलं पाहिजे."
 "छे हो! माझ्यावर कृपा करा, मला शक्य नाही. माझं…."
 "नाही. मी नाही ऐकून घेणार! अर्ध्या तासापेक्षा वेळ घेणार नाही. माझी गाडी पाठवीन तुमच्या घरी… "
 माझा रागाचा पारा चढत होता. पण त्यांना नाही म्हणणे शक्य नव्हते… त्याशिवाय सुटका नव्हती. मी 'हो' म्हणून टेलिफोन खाली ठेवला.
 पैसे पुरत नाहीत म्हणून बाराबारा तास किंवा चोवीस तास तिसऱ्या वर्गाने मी जात होते. दगडधोंड्यांतून मैलमैल पायी किंवा खटारगाडीने हिंडत होते; त्या वेळी होती का ह्यांची गाडी? माझ्या रागात माझा विवेक नाहीसा झाला होता. त्या बाईने माझे श्रम वाचवायसाठी गाडी देऊ केली; पण त्याने माझे मन जास्तच भडकले.
 गौरी जोरजोराने लिंबे पिळीत होती. "अग जरा हळू, सालीचासुद्धा रस काढणार आहेस का?" मी म्हटले. मनात आले, ही माणसेसुद्धा अशीच करताहेत. मला पिळून झाले, की अशीच चोथ्या-सालासारखी टाकून देतील व म्हणतील "बाईंच्या पहिल्या लिखाणातील व बोलण्यातील नवलाई उरली
नाही. तेच तेच मुद्दे परत सांगतात." एका माणसाची आयुष्याची कमाई किती असणार? ती कमाई करताना अनुभूतीचा प्रवाह तुडुंब भरून चालला की मनुष्य आपण होऊन दुसऱ्याला बोलावते व आपली कमाई वाटीत सुटते. पण त्याला ओहोटी लागणारच. परत नव्याने भरायला थोडी उसंत नको का? मी एक क्षुद्र माणूस. इतरांसारखी मीसुद्धा माझ्या क्षुद्र संसारात, वेड्याबागड्या मुलांत रमलेली आहे; माझ्या कामात गढलेली आहे. अशी वेळ येते की माझी अनुभूती मला सांगावीशी वाटते; अशी वेळ येते की माझ्या कामात काही नवे सापडल्यासारखे वाटते व मग मी कोणी न बोलावता सांगते व लिहिते. ते करून झाले की मजजवळ काही राहात नाही. मग मी बोलले तर ते रिकाम्या गाडग्यात दगडाच्या खुळखुळण्यापेक्षा जास्त किंमतीचे नसते. सभांतून बोलावयाचे तरी काय? पुढे बसलेला समाज एकजिनसी नसतो. काही अशिक्षित, काही अर्धशिक्षित, काही सुशिक्षित. वये चौदा-पंधरापासून तो पंचाहत्तरापर्यंत. कोठच्याही विषयावर परिश्रमपूर्वक बोलणे कसे शक्य होणार? मी उठले आणि असला समाज पुढे पाहिला की माझे हातपाय गळतात. असल्या बोलण्याने कोणाला काही बोध व आनंद होत असेल का?"
 बाहेरचे दार वाजले म्हणून मी पाहिले तो तीन-चार माणसे फाटक उघडून अंगणात येत होती. 'अरे देवा!' मी म्हटले. मुलगा तिथेच वाचीत बसला होता. "तू नको पुढं होऊस. सकाळसारखा प्रकार होईल. मी लावतो त्यांना वाटेला." त्याने होकाराची वाट न पाहता दार उघडले व तो सोप्यात गेला. खोलीत पडल्यापडल्या मला बाहेरचे संभाषण ऐकू येत होते.
 "कोण पाहिजे आपल्याला? कोण आपण?"
 "आम्ही अमक्या गावचे. मी आमच्या गावच्या व्याख्यानमालेचा चिटणीस. हे दुय्यम चिटणीस, हे खजिनदार, हे उपाध्यक्ष- चौघे आलोत. म्हटलं, तिघांनी जाऊन कार्यभाग होणार नाही." गृहस्थ आपल्यावर खूष होऊन हसले. "बाईंना पुष्प गुंफण्याची विनंती करण्यास आलो आहो. सेकंड क्लासचं भाडं देऊ. सकाळच्या गाडीनं निघायचं. मुंबईला किंवा दादरला गाडी बदलायची, की एका तासात स्टेशन येईल. आम्ही स्टेशनवर न्यावयास येऊ. मग एका तासाचा मोटारीचा प्रवास की-"
 "अहो, पण…"
 "...पण वगैरे चालणार नाही. बाई घरात आहेत असं आम्हांला नक्की माहीत आहे. तुमच्या माळ्यानंच कुंपणावरून सांगितलं, की त्या घरी येऊन तास झाला. कुठं बाहेर गेल्या नाहीत."- आपल्या हुशारीचे परत एकदा कौतुक वाटून तो दुष्ट हसला; व इतरांनी त्याला साथ दिली. "आम्ही ठरवलं आहे की नकार म्हणून घ्यावयाचा नाही! अहो, इतकी नावं सुचवली पण सभासदांनी एकमुखानं सांगितलं, की दुसरं कोणी नको."- साखर पेरावयास सुरुवात झाली. "बाईंचेच विचार ऐकावयाचे आहेत. बाईंनाच भेटलेलं बरं. त्यांना निरोप सांगा… "
 गृहस्थ दमदार होता. बोलताना लौकर थांबण्याचे चिन्ह दिसत नव्हते. नंदू दात आवळून ओरडला-
 "अहो, तुम्ही म्हणता त्या बाई, माझी आई, आताच थोड्या वेळापूर्वी मेली!"

१९५५
*