भोवरा/किती घेशील दो कराने

विकिस्रोत कडून




 १०
 किती घेशिल दो कराने


 दिल्लीला पोचल्यापासून उन्हाच्या जोडीला धुळीच्या वादळालाही सुरुवात झाली होती. भर दुपारीसुद्धा सूर्य दिसत नव्हता. चमत्कारिक पांढुरका उजेड होता; पण फार लांबवरचे काही दिसत नव्हते. राजपूरला प्रत्यक्ष वादळ नव्हते, पण अंतराळातली धूळ काही कमी झाली नव्हती; व उष्णता तर वाढलीच होती. डोळे उघडे ठेवले तरी दुखत होते. बंद केले तरी दुखत होते. दोन दिवस त्या तशा उन्हात हिंडून हिंडून अगदी दमून गेले होते, पण कुलूला जायला तर पाहिजेच होते. पुण्यापासून पत्रे व तारा गेल्या होत्या. लोक उगीच वाट पाहात बसायचे. अगदी अनिच्छेने रात्रीची गाडी पकडली व धगधगत्या डब्यात बसून पहाटेची पठाणकोटला पोचले.
 स्टेशनवर कुणीच आले नव्हते. काय करावे बरे? तोंड धुऊन थोडे खाऊन घ्यावे; तोवर कुणीतरी येईल- निदान एखादी जीप व ड्रायव्हर तरी येईल, असा विचार केला. पण अर्ध्या-पाऊण तासाने पाहिले तरी कोणी नव्हते. आता काय करावे बरे? इतक्या लांब आले, तशी बसने कुलूला जावे व काम आटपून टाकावे, म्हणून बसचे तिकीट काढायला गेले. "छे, कुलूला जाणारी बस कधीच गेली. आता बस मंडीपर्यंत जाईल. कदाचित तेथून कुलूची बस मिळेल"... तरीच बरं का, प्रवासी गाडीतून उतरून धावत सुटले होते मघाशी! काश्मीर व कुलू लांब पल्ल्यावर म्हणून पहिली बस पकडण्याची धडपड असणार त्यांची. मी मात्र जीपवर विसंबून राहिले. "विचार कसला करता? दुसरी गाड़ी पण भरत आली आहे." मी भानावर आले. तिकीट काढले. सामान चढवले व आत बसले तो गाडी सुरू झाली. मनातल्या मनात मी रागावले होते- गोंधळलेही होते. महिन्यापूर्वीपासून
तारा व पत्रे जाऊनही कोणी कसे न्यायला आले नाही. हे काही समजेना. आता आज कुलूला पोचते का नाही कोण जाणे? सुदैवाने जागा खिडकीजवळची मिळाली होती. हवा दिल्लीच्या व राजपूरच्या मानाने जरा गार होती, पण वातावरण मात्र धुळीने भरलेलेच होते.
 रस्त्याच्या बाजूने शेते व फळबागा होत्या. सगळीकडे हिरवेचार होते पण विशेष थंड नव्हते. सबंध वाटभर म्हशींचे कळपच्या कळप व त्यांमागून कुटुंबेच्या कुटुंबे जाताना भेटत होती. फाटकेतुटके कपडे पण बळकट सुरेख माणसे. कोण बरे ही? चौकशी करताना कळले की ही सर्व माणसे गुजर जमातीची होती. भाकड म्हशी, गाभण म्हशी, लहान रेडक हिमालयातील रानांत हाकून न्यावयाची व हिवाळ्याच्या सुमाराला परत येऊन काही विकायची, काही घरी ठेवून दुधाचा धंदा करावयाचा, असा या लोकांचा उद्योग असतो. आपल्या महाराष्ट्रात अशा तऱ्हेचा उद्योग करणार लोक आहेत. ते बहुधा 'गोसावी' जातीचे असतात- कोकणात त्यांना 'हेडे' म्हणतात- आपल्याकडचे हिंदू असतात. गुजर बहतेक मुसलमान असतात. त्यांच्या कळपात गायी काही दिसल्या नाहीत. सर्व वाटभर हे लोक दिसत होते. सर्व संसार बरोबर घेऊन चालले होते. काळ्या लठ्ठ म्हशींना काठ्यांनी रस्त्याच्या मधून बाजूला हाकून नेणारी, भुऱ्या केसांची, गुलाबी गालांची, मोठ्या डोळ्यांची, मळकट कपडे घातलेली, धुळीने भरलेली लहान लहान मुले मोठी लोभस दिसत होती. या मुलुखात आंघोळ क्वचित् करतात. त्यातूनही गुजरासारख्या भटक्या जमातींच्या अंगाला पाणी लागत नसणारच. त्यांच्या मुलींचे सौंदर्य मळकट शरीरांतून व लक्तरांतूनही दिसून येत होते. सौंदर्यवती, गोरीपान दमयंती हीनदीन अशी भटकत भटकत आपल्या मावशीच्या गावी आली; त्या वेळचे महाभारतातील सुंदर वर्णन आठवले.
 बसच्या वाटेने जाताना मधेच पाट्या लागत होत्या. 'डलहौसी', 'चंबा', 'कांग्रा'... सारखे मनात येई- आपल्याला काम नसावं, एक मोटर असावी व मन मानेल त्याप्रमाणे या रम्य प्रदेशातून भटकावं. शतद्रू (शतलुज) पाहिली. आता विपाशा (बियासच्या) खोऱ्यातून चालले होते. डलहौसी व चंबाला इरावती (रावी) दिसली असती. जाऊ द्या झालं ! जे नाही त्याच्यासाठी पुढे असलेल्याचा उपभोग टाकायचा की काय?
 हळूहळू सपाटी संपून गाडी चढणीला लागली. एका बाजूला बियासचे विस्तृत खोरे व दुसऱ्या बाजूला बियास व रावी यांमधील पाणलोट असलेली पर्वतश्रेणी होती. पण खोरे काय, वा डोंगर काय, फार दूरपर्यंतचे दिसतच नव्हते. डोंगरातून सगळीकडून पाणी वाहात होते. हवेत गारठा आला होता. देवदाराची झाडी पण लागली. एका डोंगराच्या कडेला एक सुंदर देऊळ दिसले. ते बैजनाथचे होते. आमची गाडी वैजनाथला थांबली. येथे खूप गाड्या थांबल्या होत्या. उतरून परत चौकशी केली. कुलूहून कोणी आले नव्हते. थेट कुलूला जाणारी बस पण नव्हती. स्टँडवरून देऊळ दिसत नव्हते, पण जवळच आहे असे समजले म्हणून तिकडे गेले. देऊळ बंद होते. बाहेरच्या आवारातून काही देखावा दिसतो का पाहिले. धुळीमुळे काहीसुद्धा दिसले नाही. हिरमुसली होऊन परत गाडीत येऊन बसले. येथून पुढे, हिमालयात लागतो तसा, प्रचंड घाट लागला. मैलन् मैल वाकणावाकणाने गाडी सारखी चढत होती. डाव्या बाजूला, पाणी झिरपणारी पर्वतांची भिंत व उजव्या बाजूला सर्वत्र खोल; घळी असलेले बियासचे खोल खोरे. खरे म्हणजे बियास दिसतच नव्हती. ती खूप लांब गेली होती. तिला मिळणाऱ्या लहानलहान प्रवाहांनीच या असंख्य दरडी खणल्या होत्या. हिमालयातल्या नद्यांतून खोरी, फावडी वाहत येतात की काय कोण जाणे? मनुष्याला व इतर प्राण्यांना व वनस्पतींना पाणी पुरवणे हे त्यांच्या दुय्यम कामांपैकी वाटते. मुख्य काम म्हणजे माती उकरण्याची लहान लहान यंत्रेच. पाण्याच्या प्रवाहाच्या जोराने व दगडाच्या घासण्याने तीरावरचे प्रचंड विभाग खालून कापून काढलेले असतात. शेकडो फूट उंचीची खालून कापून काढलेली भिंत पाण्यावर अधांतरी लोंबती दिसते. असे वाटते की, थोडा वेळ पाहात उभे राहिले, तर डोळ्यांदेखत कित्येक फूट पर्वत खाली कोसळेल. खरोखरच दरवर्षी ठिकठिकाणी हिमालय असा कोसळत असतो. असा ढिगारा कोसळला, की नदीला तात्पुरता बांध उत्पन्न होतो. बांधामागे नदीचे पाणी वाढत राहते, बांधामागची खेडेगावे-शेते वाहून बुडूनसुद्धा जातात. एक दिवस पाण्याचा दाब इतका वाढतो, की फुगलेला प्रवाह ढिगाऱ्याचा बंधारा फोडून धो धो बाहेर पडतो. मग बंधाऱ्याखालच्या तीरावरील दरडी कोसळतात, गावे बुडतात, शेते वाहून जातात. हिमालयातील सर्वच नद्यांच्या खोऱ्यांतून हे दृश्य दिसते. नद्या वाहून वाहून पर्वत ठेंगणे होतील.
नदीचा वाहण्याचा जोर कमी होईल. आपल्या महाराष्ट्रांतल्या नद्यांप्रमाणे त्या वाहतील अशी कल्पनाही करता येत नाही. कारण वाहून नेलेल्या गाळाने गंगेचे खोरे जसजसे भरून वरती येत आहे, तसतसा हिमालय पर्वतही म्हणे उंच उंच वाढत आहे ! या नद्या म्हणजे शंकराच्या संहारक शक्तीचे दृश्य रूपच आहेत. त्यांचे सौंदर्य जसे अनुपम, तसेच त्यांचे रौद्र स्वरूपही मन व डोळे ओढून घेणारे.
 गाडी अगदी रूक्ष चढ चढत होती. रणरणत होते. चढ काही केल्या संपत नव्हता. तेरा हजार फूट याप्रमाणे चढलो. एका बाजूला वैजनाथचे डोंगर व दुसऱ्या बाजूला बियास नदीचे अरुंद पात्र व तिच्या काठी वसलेले 'मंडी' गाव दिसले. दुसऱ्या क्षणी हे दृश्य नाहीसे होऊन गाडी वळणावळणाने उतरू लागली. थेट मंडीपर्यंत गाडी उतरत होती. मंडीत एक सुंदर भव्य राजवाडा आहे. एकंदर गाव सुंदर पण गलिच्छ आहे. कुलूच्या गाड्या निघून गेल्या होत्या व रात्र काढणे मला भाग होते. एका डोंगराच्या टोकावर सुंदर डाकबंगला आहे; पण तेथे चढून जायचे व पहाटे सामान घेऊन उतरायचे म्हणजे दिव्यच. सांगितलेला हमाल वेळेवर आला नाही तर वळकटी व पेटी घेऊन मैलभर पहाटेच्या अंधुक उजेडात आपल्याच्याने काही चालवायचे नाही असा विचार करून बस स्टँडजवळच्याच हॉटेलात एक खोली घेतली. असेच कुठेतरी जेवण उरकले व खोलीत येऊन पडले. इतका वेळ मनस्वी उकडत होते. आता भरभर ढग जमून गडगडाट, विजा व पावसाला सुरुवात झाली. भल्या पहाटे गाडी निघायची होती. एक चुकली की तीनचार तास दुसरी मिळत नाही. कारण हिमालयात सर्वत्र 'गेट'ची पद्धत आहे. या पद्धतीने गाड्यांची वाहतूक एकेरी असते. रस्ते अरुंद खाली खोल नदीचे पात्र व दरडी कोसळण्याचे भय यामुळे फक्त एकेरी वाहतूक ठेवतात. पहिल्या गेटात सकाळी सहा ते सात मंडीहून कुलूला जाणाऱ्या व कुलूहून मंडीला येणाऱ्या गाड्या दोन्ही बाजूंनी सुटतात. साधारण अर्धी वाट गेले की एक मोठे गाव लागते. तेथे दोन्हीकडच्या गाड्या आल्या की पोलिस मंडीच्या गाड्या कुलूकडे व कुलूच्या मंडीकडे सोडतो. या गावी बराच वेळ मुक्काम असतो. म्हणून पहाटे निघालेल्या लोकांची चहा पिण्यासाठी एकच गर्दी उसळते. गाड्या मुक्कामी पोचल्या की दुसऱ्या गेटच्या गाड्या सुरू होतात.
 पहिला प्रवास अंधारातच झाला. गाडी कुलूच्या अरुंद रस्त्याला लागली व आम्ही अगदी बियासच्या काठाकाठाने जाऊ लागलो. येथे विपाशाला बियास म्हणतात किंवा ब्यासा - प्यासा असेही कानांना ऐकू येते. तिचा संबंध व्यासांशी जोडतात! विपाशा, नांवाप्रमाणेच विपाशा खरीच ! तिने वशिष्ठांचे पाश तोडले की नाही कोण जाणे; पण स्वतः मात्र खळाळत मुक्त वाहते आहे. दरी जसजशी अरुंद होते, तसतसा दोन्ही बाजूंच्या पर्वतांच्या भिंतीतून निनादल्यामुळे तिचा आवाज इतका वाढत जातो की बोलणेही अशक्य होते. विपाशा मोकाट धावणारी. शतद्रू (शंभर ) अफाट धावणारी. इरावती व सरस्वती पाण्याने भरलेल्या, दशद्वती- दगडाळ. काय नावे आहेत ! मध्य आशियाच्या निर्वृक्ष कोरड्या गवताळ माळावरून दक्षिणेकडे आलेल्या आर्यांना या नद्या पाहिल्यावर काय वाटले असेल ते नावांवरून प्रतीत होते. वाहत्या प्रवाहाला 'नदी' म्हणायचे हेसुद्धा गमतीदार नाही का? आर्यांच्या भाईबंदात अशा प्रवाहांची नावे मी आठवायला लागले. जर्मन म्हणतात Fluss ( वाहणारी), फ्रेंच म्हणतात Fleuve ( वाहणारी), इंग्रज म्हणतात River (तीर असलेली, तटिनी) आपण म्हणतो नदी- आवाज करणारी! खरंच, मी जर्मन नद्या अगदी उगमापासून पाहिल्या. त्या कशा गवतातून, झाडांतून लपून छपून वाहतात. हिमालयातील नद्यांप्रमाणे अव्याहत आवाज करीत त्या धावत जात नाहीत. हिमालयात प्रवास करताना या नद्यांच्या आवाजाची इतकी सवय होते की त्या टापूबाहेर गेले की पहिल्याने चुकल्याचुकल्यासारखेच होते. विलायतेतील मंदगामी मुक्या नद्या पहिल्या म्हणजे हिमालयातील प्रवाहांना नदी हे नाव सार्थ वाटते.
 दहा वाजता कुलूचे मैदान लागले. स्टँडवर उतरले. तेथेही कोणी नव्हते. आता काय करावे? तेथेच उभी राहून परतणारी गाडी पकडण्याखेरीज गत्यंतर नव्हते. कुलूला हॉटेल वगैरे काही नाही. अर्धा तास उभी होते, एवढ्यात एक माणूस धावत आला. "बाईसाहेब, अशाच जाऊ नका. सरकारी विश्रांतिगृहात या." मी त्याच्यामागून चालू लागले. त्याने मला खोली दाखविली व सकाळच्या न्याहारीची व्यवस्था केली. मी म्हटले, "बाबा, आमची पत्रे, तारा तुम्हांला मिळाल्या नाहीत का?"
 तो म्हणाला, "जिल्ह्याच्या मुख्यांकडे पाठवून दिल्या, त्या आहेत लाहूलला, आणखी पंधरा दिवस येणार नाहीत."
 "येथे दुसरे कोणी अधिकारी नाहीत का?"
 "नाही, मुख्य ग्रामसेविका रजेवर गेली आहे."
 मी म्हटले, "मग मला शक्य तितक्या लौकर परत जाऊ दे. निदान आज रात्रीपर्यंत पठाणकोटला गेले तर परतीची गाडी तरी मिळेल."
 तो कारकून नको नको म्हणत होता तरी मी निघालेच. सुदैवाने परतीची गाडी मिळाली. हा सर्वच प्रवास अगदी त्रासाचा झाला होता. पंजाबच्या खेड्यांतून रणरण उन्हात हिंडले होते. कुलू संपले की राजस्थानात जायचे असे ठरवून अतिशय थकले असूनही तशीच निघाले होते. महिनाभर आधी, 'मी येणार, व्यवस्था व्हावी' म्हणून पत्र जाऊनही त्या कारकुनाच्या गबाळेपणामुळे मला व्यर्थ वळसा पडला होता. असो. गाडी लौकर मिळाली, आता पठाणकोटला पोचता येईल, याबद्दल आनंद मानीत मी निघाले. हवा सुंदर थंड होती. अर्ध्या वाटेवर भरून येऊन, खूप गडगडाट होऊन पाऊस पडायला सुरुवात झाली. हिमालयातला गडगडाटही ऐकण्यासारखा असतो. आपल्याकडे ढगांचा गडगडाट एका दिशेने येऊन दुसरीकडे जाताना ऐकू येतो. हळूहळू आवाज कमी कमी होतो. येथे आवाज दरीत अडकून घुमत राहतो. एकदा या बाजूने, एकदा त्या बाजूने असा आदळताना ऐकू येतो. वातावरण एकदम रौद्र रूप धारण करते. दरीच्या मुशीतून वारा जोराने वाहू लागतो. उंच डोंगरांच्या भिंतीमुळे आधीच प्रकाश मंद असतो, तो आणखीनच कमी होतो. मोटर हळूहळू चालली होती, ती एकदम थांबली. रस्त्यावर आडवा अडसर टाकला होता. एक पोरगे तांबडे निशाण घेऊन उभे होते. अर्ध्या फर्लांगावर रस्त्याच्या मधोमध एक प्रचंड शिळा वरून कोसळली होती. कामकरी सुरुंग लावून तिला फोडीत होते. तास दोन तास तरी खोटी होणार होती. झालं- आता कसलं पठाणकोट! परत एक रात्र मंडीला काढावी लागणार! मनातल्या मनात त्या कारकुनाला परत शिव्या दिल्या. पण काही झाले तरी पठाणकोटला आज पोचणे शक्य नाही हे समजल्याबरोबर मनावरचा ताण कमी झाला. बियासचे सौंदर्य अनुभवीत असताही, वेळेवर पोहोचू ना, आगगाडीत जागा मिळेल ना, वगैरे काळजी मनात होती तीही नाहीशी झाली. त्या थंडीवाऱ्यात व गडगडाटात मला सीटवरच अगदी गाढ झोप लागली. मी जागी झाले ती बस चालू झाल्यामुळे.
 चांगली दोन तास झोप झाली होती. पाऊस चालूच होता. बस निघाली. एका वळणावर वारा इतक्या जोराने आला की बसवरची ताडपत्री उडाली व एक वळकटी लांब फेकली गेली. सुदैवाने नदीत पडली नाही. आणखी अर्धा पाऊण तास खोटी झाली पण मी अगदी स्वस्थ होते. मंडीला संध्याकाळी पाच वाजता पोचले. दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या बसचे तिकीट घेऊन ठेवले, संध्याकाळी जेवले व निजले. रात्रभर पाऊस पडत होता, तो कधीतरी पहाटे थांबला.
 सकाळी परत हमाल, परत बसची गर्दी व रेटारेटी. एकदाची जागा मिळाली. हवेत गारठा होता. आकाश निरभ्र होते. मनाला व शरीराला विश्रांती मिळाली होती. गाडी मंडी सोडून चढ चढू लागली. सकाळचे आठ वाजले असतील. परत तेरा हजार फुटांवर आम्ही येऊन पोचलो. कालचा निर्वृक्ष वैराण चढ आज उतरून जायचे होते. खालच्या दरीत धुके होते. मी समोर दृष्टी टाकली. क्षणभर, मी काय पाहते आहे ते लक्षातच येईना. काल न दिसलेली पर्वतांची शिखरे आज स्वच्छ दिसत होती, कोवळ्या उन्हात ती चमकत होती. सर्वांच्या शिखरांवर बर्फ दिसत होते. कालच्या वादळाने व पावसाने वातावरणातील धूळ खाली बसली होती. खाली पाऊस म्हणून लागतो तो उंचावरती बर्फ म्हणून पडला असला पाहिजे. दर वळणाला शिखरे नाहीशी होत व परत दिसत. हां हां म्हणता वैजनाथला पोचलो. मी घाईघाईने उतरून मंदिरात गेले. मंदिर उघडे होते. सगळीकडे स्वच्छ झाडले होते. नुकतीच पूजा झाली होती. देवावरील ताज्या फुलांचा मंद वास सभामंडपात भरून राहिला होता. मी पाया पडून गाभाऱ्याला उजवी घालून देवळाच्या मागच्या बाजूला आले. मागे उंच उंच पर्वतांची एक लांबच लांब रांग पसरली होती व सबंध रांगच्या रांग बर्फाने चमकत होती. पर्वतांच्या कापलेल्या काळ्या भिंतींमधून ठिकठिकाणी हिमनद्या वाहात होत्या. प्रवाही पाणी पर्वत कापून काढते पण ते कापणे व बर्फरूपाने वाहणाऱ्या हिमनद्यांचे कापणे अगदी वेगळे असते. बर्फ घासत जाते- रोज काही फूटच जाते पण दोन्ही बाजू अगदी उभ्या कापीत जाते. त्या बाजू इतक्या सरळ असतात की त्यांवर बर्फ ठरत नाही. त्या काळ्याशार भिंती व मध्ये पांढरे शुभ्र चमकणारे बर्फ असे दिसते. एका विशिष्ट उंचीच्या खाली बर्फाचे पाणी होऊन सबंध रांग झिरपत होती. डोंगर कित्येक मैल दूर होते, पण
वातावरण इतके स्वच्छ होते की हिमनद्यांवरील बर्फ हाताने उचलावे इतके जवळ वाटत होते. माझे मन आनंदात वाहात होते. वातावरणातील धूळ नाहीशी झाली होती - माझे मनही प्रसन्न होते. मोठ्या कष्टाने मी परत फिरले. परत देवाच्या पाया पडले व बसमध्ये येऊन बसले. सबंध वाटभर ती पर्वतांची रांग दिसत होती. हिमनद्यांमागून हिमनद्या दिसत होत्या. काल ह्या होत्या कोठे ? आज मी पाहते ते खरेच आहे ना? असे सारखे मनात येई. गावात आल्यावर हे दृश्य लोपले. मी स्टेशनवर विश्रांती घेतली. डोळे मिटून खोलीत पडल्या पडल्या वैजनाथच्या मागच्या डोंगराचा देखावा आठवून मन भरून येत होते. पाच वाजता गाडीत बसले. गाडी सुरू होऊन स्टेशनच्या बाहेर आली व मी सहज खिडकीतून बघितले. तो काय आश्चर्य, तीच पर्वताची रांग सबंधच्या सबंध दिसत होती. सकाळी रस्त्याने येताना पर्वतश्रेणीचा एक एक तुकडा डोळ्यांसमोर येत होता. आता मात्र पंचवीसतीस मैलांची रांग एकसंध दृष्टीसमोर होती. सूर्य खाली गेला तसतशी सोनेरी, गुलाबी छटा पांढऱ्या बर्फावर पसरली. एक शिखर नाही - सबंध शिखरांची रांग दिसत होती. सूर्य खाली गेला तरीही अंधुक उजेडात पांढरे बर्फ चमकत होते. दर मिनिटाला पालटणारे ते रम्य, भव्य चित्र प्रकाशमय होते. सौंदर्य विश्वरूपाने माझ्यापुढे उभे होते आणि मी वेड्यासारखी ते अनंतरूप माझ्या द्रोणाएवढ्या ओंजळीत, मुठीएवढ्या हृदयात व चिंचोक्याएवढ्या डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न करीत होते.

१९५९
*