Jump to content

भोवरा/भोकं राहिली

विकिस्रोत कडून




 
 'भोकं राहिली'


 टांगानिका सरोवराच्या जवळजवळ दक्षिण टोकाला पण पूर्वेकडे असलेल्या उंच पर्वतावर आम्ही बसलो होतो, ही पर्वतांची रांग टांगानिका सरोवराची पूर्वेकडची भिंत होती. मध्ये ४०० मैल लांब व ५० मैल रुंद असे प्रचंड सरोवर पसरले होते. पश्चिमेस अशीच एक पर्वतांची रांग भिंतीसारखी उभी होती. आम्ही बसलो होतो दाट झाडांच्या सावलीत. पण समोरचा देखावा मात्र उन्हात तरंगत होता. समोरची पर्वतांची रांग स्पष्ट दिसत नव्हती. सरोवराचे पाणी कोठे संपते व वातावरणास सुरुवात कोठे होते, तेही स्पष्ट दिसत नव्हते. आम्ही समोर नकाशा पसरला होता. हाताशी दुर्बीण होती. नकाशात पहावयाचे व दुर्बीण डोळ्यांना लावावयाची असे चालले होते. दुर्बिणीतूनही स्पष्ट दिसेना. शेवटी मी कंटाळून समोरचे भव्य पण किंचित अस्पष्ट चित्र पाहात बसले.
 मी बघत होते तो देखावा नुसता भव्य व रमणीयच नसून ते एक पृथ्वीवरले मोठे आश्चर्य होते. लहानपणापासून ज्याच्याबद्दल वाचले होते- जे नकाशात परत परत पाहिले होते, ते आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहात होते. नकाशात एका मोठ्या कागदावर गोष्टी कशा स्पष्ट समजतात. पण प्रत्यक्ष गोष्ट एवढी मोठी असते की, दिवस न दिवस प्रवास करूनही तिचे आकलन होत नाही. तसेच आजही झाले. टांगानिका सरोवर हा आफ्रिकेतील आश्चर्यकारक रिफ्ट व्हॅलीचा एक भाग आहे. तेसुद्धा एका दृष्टिक्षेपात दिसत नव्हते; तर संबंध रिफ्ट व्हॅली कशी दिसणार? मागच्या वेळेला म्हणे कॉन्फरन्समधल्या काही लोकांनी एक विमान भाड्याने घेऊन सबंध रिफ्ट व्हॅली बघून घेतली. ह्या वेळी आम्ही २०० माणसांनी ५० मोटरीतून
ऱ्होडेशियातील लिव्हिंग्स्टन गावापासून तो टांगानिका सरोवराजवळील ॲबरकॉर्न शहरापर्यंत प्रवास केला. सकाळी सुरुवात करायची, वाटेत प्राचीन मानवाचे अवशेष जेथे जेथे सापडले ती स्थळे बघावयाची, संध्याकाळी कोठेतरी मुक्काम, परत प्रवास, असे तीन दिवस चालले होते. टांगानिका सरोवरापासून रिफ्ट व्हॅलीचे खरे जवळून पहिले दर्शन झाले खरे दर्शन म्हणायचे कारण म्हणजे वास्तविक लिव्हिंग्स्टनच्या भोवतालचा प्रदेश, झांबेझी नदीवरील प्रचंड व्हिक्टोरिया धबधबा, नदीचे पात्र व वाहण्याची दिशा ही सर्व रिफ्ट व्हॅलीचेच एक अंग आहे. पण रिफ्ट व्हॅली म्हणजे काय हे समजायला प्रथम टांगानिका सरोवरच पाहावे लागते.
 रिफ्ट म्हणजे भेग, चीर. व्हॅली म्हणजे दरी किंवा खोरे. साधारणपणे आपल्या नेहमीच्या पाहण्यात ज्या दऱ्या व खोरी येतात ती पाण्याच्या प्रवाहामुळे उत्पन्न झालेली असतात. उंच डोंगरावरून पाणी खाली वाहात असताना ते आजूबाजूंची माती धुपून आणते; एवढेच नव्हे, तर स्वतःचे पात्रही खोल व रुंद रुंद करीत जाते. हिमालयात, आल्प्स पर्वतात वगैरे भागांत पूर्वीच्या काळी लांबवर वाहात असलेल्या हिमनद्यांनी प्रचंड पात्रे खोदली आहेत. ह्या दऱ्या हजारो वर्षे पाणी वाहून वाहून तयार झालेल्या असतात. पर्वतांच्या रांगा जरी असल्या तरी खोऱ्याच्या सपाटीशी उतरत कोन करीत आलेल्या असतात. ह्याउलट रिफ्ट व्हॅली ही भूभंगाने झालेली असते. काही कारणांमुळे जमीन दुभागते, तिला मोठमोठ्या चिरा पडतात आणि ह्या चिरा म्हणजेच रिफ्ट व्हॅली. अशा चिरा का पडाव्यात, याचे कारण अजून सर्वस्वी उमजलेले नाही. तरीपण शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, पृथ्वीच्या पोटात कोठेतरी लाव्हा रसाचे तळेच्या तळे साठून मोठा भूभाग वर उचलला जातो व जो भाग उचलला जात नाही किंवा दोन्हीकडचा भाग उचल्यामुळे खचतो, त्यालाच रिफ्ट व्हॅली म्हणतात. आफ्रिकेत ॲबिसीनिया, सोमालीलँड, युगांडा, केनिया, टांगानिका व ऱ्होडेशिया हा सबंध भूभाग सुमारे ५००० फूट उंच उचलला गेला आहे. आणि त्यामुळे ठिकठिकाणी भेगा पडून रिफ्ट व्हॅली निर्माण झाल्या आहेत. एवढा प्रचंड भूभाग वरती उचलण्याच्या क्रियेमुळे काही गमतीदार प्रकार घडतात. त्यांतला एक म्हणजे रिफ्ट व्हॅलीचा तळ पुष्कळदा समुद्रसपाटीच्या खाली जातो. पश्चिम आशियातील जॉर्डन नदीचे खोरे समुद्रसपाटीपासून १००० फूट खाली आहे. तसेच टांगानिका सरोवर, बहुतेक ठिकाणी
सरोवराचा तळ समुद्रसपाटीच्या वर आहे. पण काही ठिकाणी सरोवराचा तळ समुद्रसपाटीपेक्षा खोल आहे. अशा तऱ्हेचे जलसंचय समुद्राला मिळणे शक्यच नव्हते. जॉर्डन नदी आतल्या आतच एका सरोवराला मिळते, त्याला मृत समुद्र म्हणतात. टांगानिका सरोवराच्या प्रदेशात बराच पाऊस पडला म्हणजे पाण्याचा एक प्रवाह डोंगराडोंगरांतून वाट काढीत काँगो नदीच्या खोऱ्याला मिळतो. आफ्रिका व अरबस्थान ह्यांना विभागणारा तांबडा समुद्र हीसुद्धा एक रिफ्ट व्हॅलीच आहे. म्हणजे जॉर्डन नदीच्या खोऱ्यापासून ते थेट ऱ्होडेशियापर्यंत अशा कितीतरी रिफ्ट व्हॅली पसरल्या आहेत. काही लोकांची कल्पना अशी आहे की, पूर्वीच्या काळी टांगानिका सरोवर, व्हिक्टोरिया सरोवर, आल्बर्ट सरोवर, रुडोल्फ सरोवर व केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमध्ये असलेली इतर लहान लहान सरोवरे मिळून पाण्याचा एक प्रचंड प्रवाह उत्तरेकडे वाहात होता. आतासुद्धा माझ्या शेजारी बसलेला इंग्रज शास्त्रज्ञ मला सांगत होता, "कर्वेबाई, तुम्हांला आत्ताचा देखावा भव्य वाटतो आहे. पण कल्पना करा, दोन्ही तीरांनी भरून पूर्वी एक नदी येथून जवळजवळ १००० मैल वाहत होती. काय त्या वेळेला दिसत असेल, नाही? आज जगामध्ये वाहणाऱ्या कोणत्याही नदीपेक्षा ही नदी मोठी होती." कल्पना तर मोठी भव्य होती. पण ती कल्पना की सत्य, ह्याबद्दल मात्र बराच वादविवाद आहे. वरती ज्या सरोवरांची नावे घेतली त्यांतल्या कितींच्या तरी मध्ये डोंगरांच्या रांगा आहेत. तेव्हा एका सरोवराच पाणी दुसऱ्यांत जात असेल, ह्याविषयी पुष्कळ लोक शंका घेतात. हा प्रश्न न सुटायचे एक कारण म्हणजे वर सांगितलेल्या २००० मैलांच्या टापूत ठिकठिकाणी पृथ्वीला कित्येक मैल लांब व कित्येक मैल रुंद भेगा पडल्या. त्या भेगांतून नद्या वाहू लागल्या आणि मग कधी तरी त्याच टापूत मोठमाठे ज्वालामुखी पर्वत उत्पन्न झाले. ज्या पर्वतांच्या रांगा निरनिराळ्या रिफ्ट व्हॅलींना छेदून गेलेल्या आहेत, त्यांतल्या बऱ्याच ह्या ज्वालामुखीच्या वर येण्यामुळे बनलेल्या आहेत. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जमीन दुभंगणे, लांबच लांब पर्वतांच्या रांगा उत्पन्न होणे, ह्या उलाढाली मानवजातीच्या हयातीतल्या आहेत. आपल्याकडे सुद्धा पूर्वी एका काळी समुद्र होता; तिथे हिमालय उत्पन्न झाला, पण हिमालयाची उत्पत्ती पहायला मानव पृथ्वीवर आलेला नव्हता. रिफ्ट व्हॅली उत्पन्न होताना मानव कदाचित उत्पन्न झाला नसेल, पण रिफ्ट व्हॅलीतून वाहणाऱ्या प्रचंड नद्या किंवा आत्ताच्यापेक्षा दसपट मोठी सरोवरे त्याने खास पाहिली होती. एवढेच नव्हे; तर ह्या सरोवराच्या पाण्यातून ज्वालामुखी उफाळून निघाले, तेही मानवाच्या हयातीतच; आणि पाण्याने भरलेली रिफ्ट व्हॅलीतील सरोवरे पर्जन्ययुग संपल्यानंतर हळूहळू लहानलहान होत गेलेली मानवाने पाहिली आहेत. नायरोबीच्या शेजारी जी रिफ्ट व्हॅली आहे तिच्यामध्ये काही थोडी सरोवरे आहेत. बाकी सबंध दरीचा तळ म्हणजे खाराने भरलेले एक ओसाड, निर्वृक्ष वाळवंट आहे. त्या क्षाराच्या ढिगाखाली अडीच तीन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन मानवाची हत्यारे शोधावयाची म्हणजे किती उकराउकरी करावी लागते, किती चाल करावी लागते व दिवस दिवस भटकून दोनचार हत्यारे हाती आली तर स्वर्ग हाती लागल्याचा आनंद होतो. भारतात बऱ्याच शोधाअंती अशा काही जागा सापडल्या आहेत की तेथे दिवसभर काम केले तर शंभरपर्यंतदेखील हत्यारे सापडतात. पण ह्या नायरोबी शेजारच्या ग्रेगरी रिफ्ट व्हॅलीमध्ये जे दृश्य दिसले ते काही अवर्णनीयच. दरीच्या तळाशी प्रेक्षकांसाठी जायला म्हणून एक रस्ता केलेला आहे व ठिकठिकाणी ७-८ फूट उंचावर उभे राहून पाहायसाठी चौथरे केलेले आहेत. एकेका चौथऱ्यावर उभे राहून खाली पाहिले म्हणजे साधारण २५ चौरस फुटांच्या जागेमध्ये दगडाच्या उत्तम उत्तम हत्यारांचा खच पडलेला दिसतो. त्याचप्रमाणे त्याच दरीच्या एका भिंतीत एक मोठी गुहा आहे. ही गुहा एके काळी वरपर्यंत पाण्याने भरलेली होती. पाणी जसजसे खाली जायला लागले, तसतशी माणसे गुहेत येऊन राहायला लागली. आणि पाणी ओसरेल तसतशी वस्ती पाण्याच्या जवळजवळ जात अगदी दरीच्या तळाजवळ आली इतके होईतो पर्जन्ययुग संपून हल्लीचे कोरडे युग सुरू झाले होते. दरीतले पाणी आटले होते. एके काळी तेथे मोठमोठी गोड्या पाण्याची सरोवरे होती. अरण्ये होती, रान पशूंनी भरलेले होते- सरोवरे माशांनी भरलेली होती, शेतीचा मागमूस नाही अशा काळी केवळ दगडाच्या हत्यारांनी शिकार करणाऱ्या मानवाचे जीवन सुसह्यच नव्हे तर बऱ्याच अंशी खाण्यापिण्याची ददात नसलेले असे असणार. खणायच्या उपयोगाचे अणकुचीदार दगड, घाव मारून लाकूड, पशूची तंगडी वगैरे तोडता येईल इतपत धार असलेले कुऱ्हाडीच्या पात्यासारखे दगड, पशूचे कातडे सोलण्यासाठी व खरवडून साफ करण्यासाठी लहान लहान पाती असलेले दगड हजारोंनी डोळ्यापुढे दिसत होते. मधूनमधून लिंबाएवढे व तशाच आकाराचे दगड तीनतीनाच्या पुंजक्याने आढळत होते. अशा तऱ्हेचे दगड अमेरिकेतील वन्य जमाती वापरताना आढळलेले आहे. ह्या दगडांना 'बोला' म्हणतात. एका लांब दोरीच्या शेवटी तीन लहान दोऱ्या लावतात. प्रत्येक दोरीच्या शेवटी एक एक दगड घट्ट गुंफतात ती लांब दोरी गरगर फिरवून जनावराच्या पायाच्या रोखाने फेकली की ती पायाभोवती गुंडाळून गेल्यामुळे जनावर कोलमडून पडते-पुष्कळदा त्याचा पाय मोडतो व ते शिकाऱ्याच्या हातांत सापडते. ह्या दोऱ्या वापरात नसतील तेव्हा गुंडाळून ठेवलेल्या असतात. आफ्रिकेतही मानवाने त्या तशा गुंडाळून ठेवलेल्या असणार. दोऱ्या कुजून नाहीशा झाल्या- दगड मात्र तीनतीनच्या पुंजक्याने राहिले! सरोवरे आटली, अरण्ये नाहीशी झाली, पशू गेले. माणसे गेली, फक्त त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र राहिल्या. आज तेथे आफ्रिकेतील एक सुप्रसिद्ध सोडा कंपनी कुदळीफावड्याने जमिनीवरील क्षार उकरून जगभर नेऊन विकीत आहे.
 ह्याप्रमाणे रिफ्ट व्हॅली. त्यांतली सरोवरे. त्यांच्यामध्ये उत्पन्न झालेल ज्वालामुखी पर्वत हे मिळून आजही एक आश्चर्यकारक दृश्य आहे; पण त्यापेक्षाही आश्चर्य म्हणजे ही सर्व प्रचंड घडामोड मानवेतिहासाशी गुंफली आहे. ही गुंफण इतकी गुंतागुंतीची आहे की, आत्ता कुठे तिचा थोडा थाडा उलगडा पडू लागला आहे. आफ्रिकेत काम करणारे शास्त्रज्ञ दर वर्षी ह्या ज्ञानात भर घालीत आहेत. रिफ्ट व्हॅली व तिच्याशी निगडित असलेला मानवेतिहास ह्यासारखी सुरस व चमत्कारिक कथा दुसरी नाही.
 आमचा मोटरचा प्रवास कधीच संपला होता. टांगानिका सरोवरापासून नायरोबीला आम्ही विमानानेच आलो. मोटरच्या प्रवासात ज्याप्रमाणे ठिकठिकाणी थांबून प्रदेश पाहता आला तसे विमानात करता येईना. शिवाय विमान अतिशय उंचावरून जाते व खाली धुके असते त्यामुळे काही विशेष दिसले नाही. नायरोबीजवळच्या रिफ्ट व्हॅलीत परत गेलो. तेथल्या पाहण्यासारख्या जागा पाहून झाल्यावर मी हिंदुस्थानचे विमान पकडले. ज्या प्रदेशावरून विमान जात होते तो प्रदेश बराच रूक्ष होता. कुठे शेतीही फारशी दिसत नव्हती; कुठे अरण्यही फारसे दिसत नव्हते. तिथली लोकवस्ती अतिशय विरळ आहे व आफ्रिकेतील बऱ्याचशा भटक्या व गुरांवर उपजिविका करणाऱ्या टोळ्या तेथे राहतात. विमान संध्याकाळी निघाल्यामुळे खालचा देखावाही लवकरच दिसेनासा झाला. येताना हा प्रवास दिवसाउजेडी झाल्या असल्यामुळे मला त्याचे काही विशेष वाटले नाही. ह्या
वेळेला अरबस्तानचा प्रवास सकाळी होणार होता तेव्हा ताजेतवाने राहावे म्हणून तारे किंवा आकाश ह्यांकडे न बघता विमानात झोप काढली. सकाळी एडनचा रूक्ष विमानतळ आला. त्या वैराण प्रदेशावरून निघालो. सुदैवाने खिडकीशेजारी जागा मिळाली. विमान फार उंचावरून जात नव्हते, हवाही अगदी स्वच्छ होती; त्यामुळे खालचा प्रदेश लख्ख दिसत होता. पर्वतांच्या रांगा दिसत होत्या. कोठेही झाडझुडूप काही दृष्टीआड असे नव्हतेच. पर्वतांतून नद्या निघालेल्या उगमापासून दिसत होत्या. नद्यांचे संगम दिसत होते. नद्या दऱ्याखोऱ्यांतून वळणावळणाने कशा जात होत्या, ते दिसत होते. आम्ही समुद्रकिनाऱ्याला येऊन पोचलो, तेव्हा नद्यांची मुखे दिसू लागली. दहा दहा पंधरा-पंधरा मुखांनी, पंख्यासारखी पसरून एक एक नदी समुद्राला मिळाली होती. तेथे, भूशिरे दिसत होती. ह्या सर्व देखाव्यात वाण होती ती पाण्याचीच! पूर्वी एके काळी ह्या प्रदेशात नद्या वाहिल्या होत्या, त्यातले पाणी गेले आटून अन् आता फक्त ते पाणी कसे वाहिले, कुठून वाहिले हे दाखविणारे वाळवंटातून दिसणारे पात्र तेवढे राहिले.
 आफ्रिकेत ज्या परिषदेसाठी गेले होते, तिथे एकदोघा शास्त्रज्ञांनी अरबस्थानातील प्राचीन वस्तीबद्दल निबंध वाचले होते. ह्या कोरड्या पडलेल्या नद्यांकाठी मानववस्तीचे अवशेष सापडतात. एके काळी येथे माणसे होती, जनावरे होती, पाणी होते, झाडे होती, गवत होते, पाणी नाहीसे झाले तेव्हा इतरही सर्व नाहीसे झाले, एका काळच्या सुबत्तेच्या ह्या विलक्षण खुणा मात्र शिल्लक राहिल्या. कापाचा शृंगार गेला, भोकांची जखम मात्र राहिली. पाणी नाहीसे होण्याचे कारण बऱ्याच अंशी नैसर्गिक व काही अंशी मानवी कृतीत सापडते. नैसर्गिक कारण असे सांगतात की, युरोप खंडाला पाऊस आणणारे वारे पूर्वी भूमध्यसमुद्रावरून वाहात असत, व थोडासा पाऊस थेट अरबस्तानापर्यंत पोहोचे. का कोण जाणे, ह्या वाऱ्यांनी आपली दिशा किंचित बदलली हे एक, व दुसरे जॉर्डनची रिफ्ट व्हॅली उत्पन्न होताना भूमध्यसमुद्राचा पूर्व किनारा सबंधच्या सबंध उचलला गेला, त्यामुळे जे काय चार ढग येतात ते तिथेच अडकतात आणि अरबस्तानात पाऊस पडत नाही. मनुष्याची करणी म्हटले ती अशी, की माणसांनी आपल्या उपयोगासाठी अरण्येच्या अरण्ये कापली. जे काय थोडे गवत होते त्या जमिनीत नांगरट केली; आणि पाळीव गुरे व विशेषतः शेळ्या ह्यांच्या चरण्यामुळे गवत व रान ह्या दोहोंचाही फडशा पडला. खालचा प्रदेश पाहता पाहता मला नुकत्याच ऐकलेल्या एका गोष्टीची
आठवण झाली. इस्त्राएलच्या सरकारने शेती, बागाईत व लहानलहान राखीव जंगले करायचा निश्चय केला आहे; आणि त्या प्रयत्नांना मदत म्हणून इस्त्रायलच्या राज्यामध्ये शेळी हे जनावर पाळण्याची बंदी आहे; शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, पोर्तुगाल, स्पेन, सिसिली, माल्टा, भूमध्य समुद्रातली इतर बेटे व ग्रीसचा बराच भाग हे वैराण होण्याचे मुख्य कारण म्हणजे शेळी होय; अर्थात् शेळीच्या मदतीला अरबस्थानात वर सांगितलेल्या इतरही गोष्टी होत्या.
 समुद्राच्या किनाऱ्याकिनाऱ्याने विमान चालले होते. सबंध किनारा अतोनात वैराण व एकाकी आहे. खोट्या खोट्या नद्यांची खोटी खोटी मुखं बघता बघता डोळे दुखू लागले व थोडी डुलकी लागली. थोड्या वेळाने जागी झाले ते एक धक्का मिळाल्यामुळे. खिडकीतून बाहेर पाहिले तो विमान ढगातून चालले होते. थोड्याच वेळात भारताचा किनारा दिसू लागला सह्याद्रीच्या रांगेवर लठ्ठ पोटाचे काळे ढग विसावत बसले होते. विमान ढगांच्या वर होते पण ढगांना फटी पडल्या होत्या व त्या रिफ्ट व्हॅलीमधून पश्चिम किनारा पाण्याने तुडुंब भरलेला दिसत होता. अरबस्थानचा निळा समुद्र जाऊन तिथे नदीच्या मुखातून आलेल्या गाळाने गढूळ झालेला समुद्र खाली दिसत होता. जिकडून तिकडून पाणी वाहात होते व जिथे थोडीशी म्हणून माती असेल तिथे वनस्पती उगवलेल्या दिसत होत्या. विमान वेगाने खाली उतरत होते व माझी सुजला, सुफला अशी आई सर्वांगाने ठिपकत आपल्या गार कुशीत घ्यायला तितक्याच वेगाने धावून वर येत होती.
 आफ्रिकेतला प्रवास झाल्यानंतर काही महिन्यांनी विमानाने मुंबईहून दिल्लीला जात होते. विमान सह्याद्री ओलांडून तापीच्या खोऱ्यावरून गेले आणि तापीच्या खोऱ्याची उत्तरेकडील भिंत- सातपुडा पर्वताची रांग- ओलांडताना एकदम ध्यानात आले की खरोखर तापी-पूर्णा खोरे ही पण एक रिफ्ट व्हॅलीच आहे. ह्या रिफ्ट व्हॅलीमध्ये तापी मागून आली. सातपुड्याची भिंत रिफ्ट व्हॅलीच्या भिंतीप्रमाणेच सरळसोट असून त्या बाजूने तापीला काही नद्या मिळत नाहीत. ही रिफ्ट व्हॅली आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीच्या समकालीन असेल तर पूर्णा, तापी व नर्मदा ह्या तीन नद्यांच्या खोऱ्यांचा अभ्यास मनोरंजक होईल.

१९५९

*