भोवरा/युगांतर
१२
युगांतर
बोटीत इतकी गर्दी झाली होती, की उभे राहायला जागा नव्हती. "रोज असते का हो एवढी गर्दी ? जास्त बोटी तरी सोडाव्यात." असे मी म्हटल्यावर माझ्या बरोबरच्या गृहस्थाने सांगितले, की काही पर्वणीनिमित्त ही सर्व मंडळी पलीकडे गंगास्नानाला चालली आहेत. मला जास्तच अचंबा वाटला. पाटणा शहर गंगेच्या किनाऱ्यावर वसले आहे. इतकेच नाही, तर त्या शहराला रुंदी जवळजवळ नाहीच. लांबी मात्र चांगली दहा मैल आहे ! मला वाटते, शहराचा कुठचाही भाग नदीपासून अर्ध्या मैलापेक्षा लांब नसेल. दहा मैल लांबीचा नदीकिनारा घराच्या अंगणात असताना बोटीत बसून पलीकडच्या तीरावर आंघोळीला जायचे प्रयोजन काय, ह्याचा मला उलगडा होईना.
जुगलबाबूंनी सांगितले, "अहो, इकडच्या किनाऱ्यावर आंघोळ केला तर माणूस गाढवाच्या जन्माला येतो." तरी माझ्या डोक्यात प्रकाश पडेना; तेव्हा त्यांनी पुढे सांगितले 'पाटण्याचा किनारा 'मगध' देशात येताे. पलीकडे 'विदेह' आहे."
आता मला उमगले; पण माझे आश्चर्य मात्र दसपटींनी वाढले. विदेह पुण्यभूमी होती. विदेही जनकाने त्या भूमीत अग्नीची स्थापना केली होती. आर्यांच्या जुन्या वसाहती गंगेच्या उत्तर तीरावर होत्या. मगध तर पहिल्यापासून पाखंडांचा देश. पाटलीपुत्रात नाटपुत्त वर्धमानाने जिनधर्माला परत एकदा भरभराटीला आणले. पाटलीपुत्रातच बुद्धधर्माची विजयी पताका फडकली. मगध वैदिकांचा देश नव्हता; मगधात राहणे पुण्यप्रद नव्हते. परम मंगल गंगासुद्धा मगधाच्या किनाऱ्यावर आपले मंगलत्व
गमावून बसली होती! ज्यांना वेदांचे एक अक्षर माहीत नव्हते; ज्यांना संस्कृताचा गंध नव्हता; ज्यांना इतिहास माहीत नव्हता, असे पाटण्याचे हजारो लोक मगध सोडून एक दिवसाचे तरी पुण्य गाठी बांधण्यासाठी विदेहाला चालले होते! जुन्या समजुती उराशी बाळगणाऱ्या ह्या लोकांना म्हणावे तरी काय? सोनपूरच्या जत्रेतून येणारी एक आगबोट माणसांच्या गर्दीमुळे व उतरण्याच्या धांदलीमुळे नुकतीच बुडाली होती. पण एकीकडे तोंडाने त्या घटनेबद्दल चर्चा करीत लोक आपापली गाठोडी घेऊन पलीकडच्या तीरावर त्याच धांदलीने निघाले होते.
एक क्षणभर माझे मन विषादाने व धिक्काराने भरून गेले. दुसऱ्या क्षणी वाटले, मी माझ्याकडे नुसता मोठेपणा घेत आहे. मला विदेही जनकाची माहिती होती. पाटलीपुत्राचा इतिहास मी वाचला होता- पण माझी निव्वळ पुस्तकी माहिती होती. हे हजारो लोक तो इतिहास जगत होते. ज्यांना मी जुन्या समजुती समजले, त्या जुन्या नव्हत्याच मुळी. त्या आजच्या जिवंत भावना होत्या. दुसऱ्या देशांतून जुन्या कल्पना नष्ट होतात व नव्या येतात; पण भारताच्या भूमीत जुने अमर व अजर असते.
उतरायचा घाट जवळ आला तसतसे बसलेले लोक उठून उभे राहिले. "यंदा उतरायचा घाट दोन फर्लांग पुढे गेला आहे." लोक म्हणत होते. जुगलबाबूंनी परत एकदा समजावून सांगितले, "गंगेने गेल्या वर्षी प्रवाह बदलला म्हणून आगगाडीचे स्टेशन जरा लांब न्यावे लागले. स्टेशनजवळच उताराचा घाट आहे." परत एकदा पुस्तकी ज्ञान व अनुभव ह्यांतील फरक लक्षात आला. वाळूने भरलेल्या जवळजवळ सपाट मैदानातून वाहणारी गंगा व तिला मिळणाऱ्या इतर नद्या ह्या शाप की आशीर्वाद अशी भ्रांत का पडते हे समजायला गंगा-किनाऱ्यावरच आले पाहिजे. ते चैत्राचे दिवस होते. गंगेचे पाणी कमी झालेले होते. गंगा धीरे धीरे वाहत होती. पात्राला रुंदी खूप होती; पण त्या मानाने खोली नव्हती. ठिकठिकाणी पात्रात वाळू साचून लहानलहान बेटे झाली होती. पाण्याच्या पलीकडे अर्धा मैल रेती होती व काठ तर इतके सखल होते, की पात्र व किनारा ह्यांतील फरक चटदिशी लक्षात येत नव्हता. त्या वाळूवरच गाडीचे स्टेशन होते. स्टेशन कसले ? गाडी उभी होती तिथपर्यंत रूळ घालून बांबूच्या मांडवाखाली तिकिटघर होते. तिकिटे काढून गाडीत बसलो. पंधरा मिनिटांनी गाडी सुटायची होती. मी भोवताली पाहिले तो
गंगेच्या विस्तीर्ण वाळवंटात हजारो माणसे स्नानासाठी गोळा झाली होती. ग्रहण लागावयास अजून चौदा पंधरा तास तरी अवकाश होता. पण मालगाड्या, बोटी, पडाव, खटारे भरभरून माणसे येत होती व कित्येक चालतच आलेली होती. आगगाडीच्या डब्यातच नाही तर बाहेरूनही खिडक्या, दरवाजे - सर्व काही माणसांनी लिंपलेली दिसत होती. जणू पर्वणीच्या दिवसापुरता गुरुत्वाकर्षणाचा सृष्टिनियम ईश्वराने सैल केला होता. इतर सामाजिक बंधनेही त्या दिवसापुरती ढिली झालेली दिसत होती. एरवी घराबाहेर न दिसणाऱ्या बायका पर्वणीच्या निमित्ताने मिश्र समाजात दिसत होत्या; पण तरीही दक्षिणेकडील बायकांचा मोकळेपणा त्यांच्यात नव्हता. त्या पर्वणीच्या दृश्यात काही तरी उणे आहे असे मला वाटत होते. ते म्हणजे सर्व देखावा रंगांनी भरलेला नव्हता. वर चैत्र-वैशाखाचे धूसर वातावरण, खाली गंगेची पिवळसर पांढुरकी रेती आणि वर मळकट पांढरी वस्त्रे नेसलेले स्त्रीपुरुष-असे ते दृश्य होते. प्रदेशही सपाट - पाहावे तिकडे सपाट जमीन क्षितिजाला टेकलेली. मला गंगेचे खोरे कंटाळवाणे वाटू लागले.
आगगाडी हळूहळू चालली होती. अमक्या ठिकाणी अमक्या वेळी पोचायची काही व्यवस्था होती की नाही कोण जाणे. शेवटी एकदाचे स्टेशनला पोचलो. तेथून पुढचा प्रवास मोटरचा होता व आम्हांला शक्य तर कलेक्टरकडून काही तरी वाहन मिळेल अशी आशा होती, पण आम्हांला उतरून घेण्यासाठी स्टेशनवर तर कोणीच नव्हते. कलेक्टर कचेरीकडे जाऊन चौकशी केली; पण कोठेच दाद लागेना! शेवटी बसस्टँडवर जाऊन तिकिटे काढली. बस शेवटपर्यंत जाणारी नव्हती; पण इथे वेळ घालवण्यापेक्षा निदान अर्ध्या वाटेवर तरी जाऊन पडावे असा विचार केला. बस निघावयास बराच अवकाश होता, म्हणून आसपासची माणसे बघत बसमध्ये बसून राहिलो. इतक्यात बसस्टँडवर गडबड झालीसे वाटले म्हणून तिकडे पाहिले, तर कोणी सरकारी पट्टेवाला कसली तरी चौकशी करीत होता. तो थेट आमच्याकडे आला व पाटण्याहून सीतामढीकडे जाणाऱ्या बाया आम्हीच का, म्हणून विचारले. आम्ही 'हो' म्हटल्यावर तो लवून नमस्कार करून म्हणाला, "तुम्हांला कलेक्टरसाहेबांनी बोलावलं आहे." आता आली का पंचाईत! गाडी सुटायला पंधरावीस मिनिटेच होती. मी कलेक्टरकडे गेले तर नमस्कार होईतो गाडी निघून जायची व मी धड नाही पाटणा न् नाही सीतामढी, अशा भानगडीत मध्येच राहायची! मी म्हटले,
"कलेक्टरसाहेबांना माझे प्रणाम सांगा. मी परत येताना वेळ झाल्यास त्यांना भेटेन; पण आता येण्यास मला वेळ नाही." तो परत जाऊन पाच मिनिटे होतात, तो खुद्द कलेक्टरच आले. पाटण्याहून पाठविलेले पत्र त्यांच्या हाती कारकुनाने दिलेच नव्हते. ते आता हाती पडले. त्यांनी आग्रह केला, की मी उतरलेच पाहिजे, त्यांच्या घरी चहा घेतलाच पाहिजे वगैरे. अर्ध्या तासापूर्वी, कचेरीत साहेब नाहीत म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो व पाचच मिनिटे गाठ पडेल का, म्हणून चौकशी केली होती, तर त्यांच्या बायकोने नोकराकरवी 'गाठ पडणे शक्य नाही', म्हणून निरोप पाठवला होता; म्हणून आमची आम्ही व्यवस्था केली, तर आता हे साहेब उतरून घ्यावयास आले; मला राहण्याचा आग्रह करू लागले. दुसऱ्या दिवशी कोणी मिनिस्टर येणार, म्हणून गुढ्या-तोरणे उभारणे चालले होते. ह्या धांदलीत माझे काम होण्याची शक्यता नव्हती, म्हणून मी गाव सोडून जात होते. शेवटी त्याच दिवशी मोटरने मला सीतामढीस पोचविणार असाल तर उतरते, असा वायदा करून उतरले. एक पट्टेवाला पुढे, एक मागे अशा थाटात आम्ही कलेक्टरच्या बंगल्यात पोचलो. कलेक्टरीणबाई बंगल्याच्या फाटकापाशी सामोऱ्या आल्या; मोठ्या अगत्याने दिवाणखान्यात घेऊन गेल्या. तेथे चहाफराळाची व्यवस्था मोठी सुंदर युरोपीय पद्धतीवर केली होती.
मी आपली बोलत होते. जाई काही बोलेना न खाईना. स्वारी जरा घुश्शात होती. मी सांगितले, "बाई, अन्न पुढं आलं आहे, थोडं खाऊनपिऊन घे. आज संध्याकाळी मुक्काम कोठे होणार, काय खायला मिळणार काही पत्ता नाही. सकाळी सात वाजता खाल्लं. आता दोन वाजून गेले आहेत, वेडेपणा करू नकोस." तसे तिने पण खाल्ले.
कलेक्टरीणबाई म्हणत होत्या, "ह्यांना उद्याची तयारी करायची आहे; आमची मोटर काही देता यायची नाही; दुसऱ्या कुणाची मिळते का पाहतो आहोत."
मी म्हटले, "अहो, आम्हांला खराब रस्त्यानं जायचं, उगाच तुमची काय किंवा दुसऱ्या कुणाची काय, चांगली गाडी नकोच मुळी. एखादी जुनी गाडी, जीप, माल-ट्रक काही चालेल." त्याबरोबर बाई खूष झाली.
तिने बाहेर कलेक्टरसाहेब होते त्यांना तसे कळवले व थोडक्याच वेळात जीपचा एक लहानसा ट्रक दाराशी येऊन उभा राहिला. आम्ही पण निघालो. जाताना बाईंचे व साहेबांचे आभार मानले व गाडीत बसलो.
"आता स्वतंत्र गाडी मिळाली आहे; आपल्याला 'रीघा' ला पोचायला हरकत नाही." मी उद्गारले.
"ते शक्य नाही. आपण पोचल्यावर एका तासात ही व्यवस्था झाली असती तर पोचलो असतो. आत दुपार उलटली आहे आणि मैलांच्या हिशेबानं अंतर जरी थोडं असलं तरी रस्ता इतका खराब आहे, की सीतामढीला पोचायलाच संध्याकाळ होईल." जुगलबाबू म्हणाले.
"आणि ह्या सगळ्या घोटाळ्याला कारण ते कलेक्टर!" जाई म्हणाली, "पहिल्याप्रथम आपल्या दाराशी उभं करावयास तयार नव्हते आणि मग क्षमा मागतामागता व पाहुणचार करताकरता पुरेवाट ! मला शुक्रवारच्या कहाणीचीच आठवण झाली. फराळाचं खाऊ नये, एकएक घास उचलून दागिन्यांवर ठेवावा असं वाटत होतंस."
"अग, दागिन्यांवर नाही, गव्हर्नरसाहेबांच्या पत्रावर !" मी हसून उद्गारले. पण जाईचे बोलणे संपले नव्हते, "इतका घोटाळा करून ठेवला आणि तरी तू आपले त्यांचे आभार मानीत होती."
"हे बघ, जायले! तू त्या बिचाऱ्या कलेक्टरच्या दृष्टीनं विचार कर पाहू जरा, कलेक्टरला आधीच काम पुष्कळ असतं; पण हल्ली रेशनच्या दिवसांत तर ते किती तरी वाढलं आहे. पूर्वी कलेक्टर जिल्ह्याचा सर्वाधिकारी असे. आपल्या समजुतीप्रमाणं तो काम उरकीत असे व वरिष्ठांपुढे कामाचा जाब देत असे. हल्ली जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस पुढारी त्याचा वरिष्ठ बनला आहे; त्यांच्या हस्तक्षेपामुळे कारभार करणं जड जातं, एवढंच नव्हे, तर चटचट कामाचा उरकच होत नाही. त्याशिवाय तू पाहिलंसच, की हा मिनिस्टर आला, तो मिनिस्टर आला म्हणजे स्वागताची केवढी जंगी तयारी करावी लागते ती ! आणि त्या सर्वांवर कळस म्हणून की काय, आपल्यासारखी आगंतुक माणसं गव्हर्नराकरवी पत्र पाठवून येतात आणि त्यांच्या दृष्टीनं अँथ्रोपॉलॉजीसारख्या निरर्थक कामात त्यांचा वेळ घेतात. वेळात वेळ काढून अनिच्छेनं का होईना त्यांनी आपला पाहुणचार केला; एक गाडी देऊन आपल्याला पुढच्या मुक्कामावर रवाना केलं; हा त्यांचा व त्यांच्या बायकोचा उपकारच नाही का ?"
'बरं बाई, तुझ्या म्हणण्याप्रमाणं का होईना !' अशा अर्थाचा चेहरा करून जाई स्वस्थ बसली. रस्ता वाईट हे आधी समजले होते; पण तो किती
वाईट ह्याची कल्पना नव्हती. रस्त्यावरून चाललो होतो म्हणण्यापेक्षा गाडी एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्डयात जात होती, म्हणणे जास्त बरे झाले असते! गाडीच्या वेगाने धूळ एवढी उडत होती, की दहा पावले मागे काही दिसत नव्हते! आम्ही नेपाळच्या सरहद्दीजवळ चाललो होतो. येथून म्हणे सबंध हिमालयाची रांग दिसते. जाई मोठ्या आशेने डोळे फाडफाडून बघत होती. सबंध हिमालय काय पण क्षुद्र टेकडीसुद्धा कुठे दिसत नव्हती. पाहावे तिकडे सपाट प्रदेश व धूळ. "रात्री धूळ खाली बसली की पहाटे कदाचित् पर्वताच्या रांगा दिसतील," असे मी म्हटले.
जुगलबाबू उत्तरले, "छे! आता पाऊस पडून गेल्याशिवाय धूळ खाली बसायची नाही! आता तर आपण वसंतऋतूत आहोत. अजून उन्हाळ्याबरोबर धूळ वाढतच जाणार. जसे दिवस जातील तसं वातावरण धुळीनं धुंद होईल."
ते पुढे म्हणाले, "आपण जे शहर सोडलं ते पूर्वीचं वैशाली. आता जात आहोत तिथे सीता सापडली व तिथून तीन मैलांवर नेपाळहद्दीत जनकपूर म्हणजे पूर्वीची मिथिला आहे असं म्हणतात."
गंगेच्या खोऱ्यात पावलापावलावर प्राचीन इतिहासाच्या खुणा आहेत. कोठेही खणा, वैदिक देवतांच्या किंवा बुद्धाच्या मूर्ती सापडतात. ह्याच वाटेने विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन जंगलातून मिथिलेला गेला असणार; नंतर हजार वर्षांनी वैशंपायनांशी भांडण झाल्यावर याज्ञवल्क्य ह्याच वाटेने त्या वेळच्या जनकराजाकडे गेले असणार; परत तीनशे वर्षांनी त्याच वाटेने माहेरी जाताजाता मायादेवी बाळंत होऊन बुद्धाचा जन्म झाला असणार; ह्याच वाटेने जाऊन कोसलराजा पसेनदीच्या मुलाने शाक्य कुलाची कत्तल केली. बुद्ध, अशोक, चाणक्य, चंद्रगुप्त, गुप्तसम्राट् व कालिदास- विदेह व मगधाच्या परिसरात प्राचीन भारताच्या इतिहासाची किती तरी उज्ज्वल पाने लिहिली गेली. जुगलबाबंच्या उद्गाराने माझ्या विचारांची साखळी तुटली. "ही नदी आपण ओलांडतो आहोत ना, तिचं नाव मनुस्मारा." गतेतिहासात गुंतलेल्या माझ्या मनाला एक आश्चर्याचा व आनंदाचा धक्का बसला. विदेहाचा इतिहास मी प्रभू रामचंद्रांपर्यंतच नेत होते; पण येथे तर थेट मनूपर्यंत ह्या लोकांनी पोहचवला की! मनूचेसुद्धा स्मरण यांनी ठेवले आहे !
नदी ओलांडून आम्ही गावात शिरलो व एका मोठ्या आवारातून
आत जाऊन लहानशा घरासमोर उभे राहिलो, "इथल्या सीतादेवीच्या देवळाच्या महंताचं हे घर. आज रात्र येथे काढून उद्या पुढे जाऊ. आपल्याला आणायला आलेली मोटर आपण वेळेवर आलो नाही, म्हणून परत गेली, ती उद्या सकाळी येईल."
आम्ही पुढे झालो. खुर्च्या टाकून काही मंडळी बसली होती. त्यांतला एक पोरसवदा माणूस उभा राहिला. अंगात रेशमी शर्ट, त्याला सोन्याच्या गुंड्या, केसांचा भांग काढलेला, अशी मूर्ती होती. अत्तराचा घमघमाट सुटला होता. "हे इथले महंत श्री साधु अमुक अमुक " म्हणून ओळख करून दिली. मी चकितच झाले; पण मुकाट्याने नमस्कार करून बसले. मला नंतर कळले, की महंत म्हणजे पुजारी.
माझ्या कामाची माहिती जुगलबाबूंनी त्यांना करून दिली. त्यांनी जिज्ञासेने विचारले, "माझं रक्त तपासता का ?" "एका माणसासाठी नळी फोडता यायची नाही," मी उत्तर दिले. तशी ते म्हणले, "मी माणसं जमवतो." म्हणून सर्व सामान काढले. सुमारे २०-२५ नमुने मिळाले व अंधार पडला म्हणून आत जाऊन किटसनच्या उजेडात रक्त तपासणे सुरू झाले. काम चालू असताना प्रश्नोत्तरे होतच होती. "तुमच्या तपासणीनं कोठचा रोग झाला ते कळतं का हो?" असा नेहमीचा प्रश्न झाला. मी "नाही" म्हणून उत्तर देऊन परत प्रश्न केला, "तुमच्या प्रदेशात रोगराई किती आहे ?"
महंतजी उद्गारले, "किती व कुठचे रोग म्हणून काय विचारता? सर्वांना रोग आहेत; व सर्व प्रकारचे आहेत. काळा आजार आहे; मलेरिया आहे; हत्ती रोग आहे; त्याशिवाय दोषी ताप, नवज्वर, पटकी आहे. एवढंच काय, पण नदीचं पाणीसुद्धा विषारी आहे" "कुठल्या नदीचं ?" मी विचारले. "ह्या लक्ष्मणा नदीचं. म्हणून तर आम्ही तिला मनूस् - मारा म्हणतो."
कल्पनेत रचलेल्या गतेतिहासाच्या वैभवशिखरावरून वास्तवाच्या दरीत कोसळत गडगडत येणाऱ्या मनाला सावरून मी विचारले, "पण नदीचं पाणी विषारी का ?"
"ह्या नदीचा उगम नेपाळच्या तराईत बचनाग असलेल्या जंगलात होतो व तसल्याच जंगलातून वाहात ती ह्या गावाला येते. म्हणून हिचं पाणी विषारी आहे. पुढे दोनतीन नद्या तिला मिळाल्यावर तिच्या पाण्यातील विषार जातो."
ही माहिती त्या वेळी मला नवीनच होती. पुढे काही वर्षांनी जंगलांतून वाहणाऱ्या इतर नद्यांबद्दल व जंगलातील गावांबद्दल हेच प्रवाद ऐकायला मिळाले. ओरिसात दक्षिणेकडील जंगलात कोरापुट म्हणून गाव आहे. तेथील पाणी वर्षाचे सहा महिने जानेवारी ते जूनपर्यंत विषारी असते, असा प्रवाद होता. आपल्याकडे पाटण गावावरून कोयना नदी वाहते, तिच्या पाण्याबद्दलही अशीच समजूत आहे. 'पाटणला बदली म्हणजे अंदमानावर पाठवणी!' असे एक सरकारी नोकर म्हणताना मी ऐकले. पावसाळ्यात पाणी ठीक असते; पण पावसाळा संपून पाणी कमी होऊ लागले म्हणजे ते विषारी होते, असे कळले. लक्ष्मणा ऊर्फ मनुस्-मारा नदीच्या थोड्याशा पाण्यात इतर दोन नद्यांचे ओघ मिसळले म्हणजे विषाची तीव्रता कमी होत असली पहिजे.
काम संपतासंपता डासांचा इतका त्रास झाला, की रक्ताचा थेंब तपासणीसाठी काढून घेतला की त्यावर डास यावयास लागले. म्हणून एकजणीने डास वारून दुसरीने तपासणी संपवली. पसारा आवरला आणि शेजारीच असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत श्रमपरिहारार्थ गेलो. आठ वाजून गेले होते. दिवभराच्या प्रवासाने शीण आला होता, म्हणून बिछाने पसरले. मच्छरदाणी लावावयास खुंट्या सापडेनात. लक्षावधी डास गुणगुणत होते, म्हणून जाईला म्हटले, "बाई, डोक्यावरून पांघरूण घेऊन नीज." ती म्हणाली, "थांब जरा. काला आजारानं मरणं बरं, का जीव घुसमटून मरणं बरं, ह्याचा आधी विचार करू दे." दारावरून माणसांची ये-जा सुरू होती; दोघींनाही भूक लागली होती, पण आमचे काम सुरू झाल्यावर जुगलबाबूंनी जी दडी दिली होती त्यांचा अजून पत्ताच नव्हता! सांगायचं कोणाला, म्हणून मी खोलीचे दार लावले व जाईशेजारीच पायापासून डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन पडले.
दाराच्या खडखडाटाने मी दचकून जागी झाले. घड्याळात पाहिले तो साडेदहा वाजले होते. जुगलबाबूंचा आवाज ऐकू आला, "जेवण तयार आहे. येता ना?" मी "हा" म्हणून जाईला उठवले व ती नको म्हणत असताही "तुला एकटीला इथं कुठं सोडून जाऊ? माझ्याबरोबर चल." म्हणून तिच्याबरोबर बाहेर आले. खोलीच्या शेजारी आतला चौक होता व पडवीत आमची दोघींची पाने मांडली होती.
" इतर मंडळींची जेवणं झाली वाटत?"
"इतक्यात कुठची? अजून तास दोन तास अवकाश आहे. जुगलबाबूंच्या सांगण्यावरून तुम्हांला आधी वाढलं." वाढणाऱ्या इसमाने सांगितले.
"महंतजींच्या घरी कुणी बायकामाणसे नाहीत का?"
"आहेत की, शेजारच्या वाड्यात ती असतात. अधूनमधून महंतजी तिकडे जातात."
"त्यांची जेवणं झाली का?"
"इतक्यात कशी होतील? पुरुष मंडळींची जेवणं झाली की त्या जेवतील."
जास्त विचारपूस न करता पुढे आलेले जेवण आम्ही जेवलो. जेवणाच्या बाबतीत प्रवासात असताना आम्ही उंटाला गुरू केले होते. अन्न भेटले की पोटभर जेवायचे. अन्नासाठी कामाचा वेळ गमवायचा नाही; जेवण नाही मिळाले तर तसेच पुढे ढकलायचे, असा आमचा क्रम होता. ह्या प्रवासात तरी कधी चोवीस तास अन्नशिवाय गेले नाहीत व जेवणावर जेवण मिळून कधी अजीर्णही झाले नाही.
जेवण झाल्यावर परत खोलीत गेलो, पोट भरल्यावर जाईची झोप उडाली होती. ती म्हणाली, "नको रे बाबा हे गंगेचं सुपीक खोरं व इथल्या बायकांचा जन्म! त्या शेजारच्या चार भिंतीत हातावर हात व पायावर पाय ठेवून जेवणासाठी ताटकळत बसायचं म्हणजे कोण कर्मकठीण! त्या बहुतेक आतल्याआत कुजत असतील नाही?"
"नाही; तसं व्हायच्या आत काळा आजार. मलेरिया वगैरे रोग त्यांना मारून टाकतात!" मी सुस्कारा टाकून म्हटले.
तिला कसली तरी आठवण झाली. "आपण बंगाली कादंबऱ्यांची भाषांतरं वाचली, त्यात पण पांढरपेशा लोकांची राहणी अशीच रंगवली आहे, नाही? ते पुरुष पण असेच मध्यरात्री जेवायला येतात व तोवर त्यांच्या बायका ताटकळत बसतातसं दिसतं."
पुढे मी ओरिसात गेले तेथेही असाच काहीसा प्रकार दिसला. भयंकर उकाडा म्हणून रात्रीचा दिवस करतात; की आम्हांला विलक्षण नमुने भेटले कोण जाणे! संध्याकाळपासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा बहुतेक वेळ पत्ते खेळण्यात जातोसे दिसते. आम्ही थोड्याच वेळात झोपी गेलो. रात्री बऱ्याच
मोठमोठ्याने चाललेल्या हसण्याखिदळण्याने, संभाषणाने मला परत जाग आली. आम्ही जेवलो त्याच चौकात महंतजी व त्यांचा मित्रपरिवार ह्यांचे मोठ्या मजेत, सावकाश, हसतखेळत जेवण चालले होते. पत्त्यांच्या खेळातील हारजितीबद्दल वादविवाद चालला होता. ऐकता ऐकता मला परत झोप लागली.
रोजच्याप्रमाणे आम्ही सहा वाजता उठलो. दार उघडले तो बाहेर अगदी सामसूम. खोलीतल्या खुजातल्या पाण्याने तोंड वगैरे धुऊन, बिछाना आवरून, सामान बांधून, नीट एकावर एक रचून ठेवले व जरा उघड्यावर जावे म्हणून बाहेरच्या बागेत आलो. गावात सर्वत्र दहा वर्षांपूर्वीच्या भूकंपाची पडझड दिसत होती. देवीचे देऊळ शेजारीच होते; तेथे गेलो. आत एक घागरा नेसवलेली ओबडधोबड मूर्ती होती. देऊळही अगदी जुजबी बांधणीचे होते. त्यांतूनही भूकंपात पडलेला भाग अजूनही दुरुस्त न केलेला होता. ज्या भूमीत अशोकाच्या वेळची व गुप्तांच्या वेळची अप्रतिम शिल्पे सापडतात, तेथेच अशा भिकार मूर्ती घडाव्या हे काय दुर्दैव!
हा सर्व प्रदेश म्हणजे चंपारन् पासून थेट पूर्व बंगालच्या सीमेपर्यंत, निरनिराळ्या रोगांनी पछाडलेला आहे. महंतजी सांगत होते त्यात अतिशयोक्ती नव्हती. तेच रोग पुढे पूर्व किनाऱ्याने सबंध ओरिसा व आंध्राच्या पूर्वपट्टीला व्यापून आहेत. ओरिसात व आंध्रात तर जोडीला आणखी महारोग पण आहे ! ह्याच प्रदेशातील जंगल विभागात, विशेषतः समुद्रसपाटीपासून साधारण ८०० ते १००० फूट उंच असलेली ठिकाणे रोगमुक्त आहेत. आज रोग व महापूर ह्यांच्या तडाख्यात सापडलेल्या प्रदेशातच प्राचीन व मध्ययुगीन संस्कृती फोफावली होती. जंगल विभागात तेव्हाही वन्य जमातींचा काही प्रदेश जमिनीसाठी सदैव हपापलेल्या शेतकऱ्यांनी ताब्यात घेतला; पण एकंदरीने त्या सृष्टीत मोठ्या घडामोडी झाल्या नाहीत. सपाट, सुपीक प्रदेशात मात्र एका काळी समृद्ध राज्ये, मोठा व्यापार, सुंदर शहरे, भरभराटलेली बंदरे होती. वैदिक धर्माचा अभिमानी कालिदास, बौद्ध अश्वघोष व जैन विमलसूरी ह्यांनी आपली काव्ये इथेच लिहिली. ह्याच भूमीवर नालंदाचे विश्वविद्यालय सतत पाचशे वर्षे त्या वेळच्या सुसंस्कृत जगाला विद्यादान करीत होते. त्या वेळीही नद्यांना पूर येत असणारच. भूकंपाचे धक्के बसत असणारच, आताचे आजार त्या वेळीही होते, ह्याची साक्ष वैद्यकावरील ग्रंथ देतात. मग आताच बहुजन
समाज इतका हीन व दीन आणि सुखवस्तू माणसे इतकी नादान व संस्कृतिहीन का झाली? ह्या कोड्याचे उत्तर काय?
त्या वेळी मला झट्दशी दोनच कारणे दिसली. मुसलमानी व इंग्रजी आमदानीत जहागीरदारी व जमीनदारी वाढली. दिल्लीच्या राजाने सनद दिली की केवढा तरी मुलूख एका माणसाच्या ताब्यात जाई; व तिथले सर्व शेतकरी त्या एकाचे ताबेदार बनत. कलकत्त्यात कॉर्नवॉलिसने केलेल्या लिलावात बंगाली जमीनदारांनी कधीही न पाहिलेल्या ओरिसाच्या हजारो एकर जमिनी विकत घेतलेल्या आहेत. अरबांनी व मागाहून युरोपीय लोकांनी आशियात चाललेला दर्यावर्दी व्यापार आपल्या ताब्यात घेतला. आतील व्यापार परकीयांच्या ताब्यात गेला. मंदिरे वगैरे बांधकामे थांबली व अव्याहत वाढत्या लोकसंख्येला जमीन कसण्याखेरीज निर्वाहाचे काही साधनच उरले नाही. शेतकरी दिवसेदिवस जास्त निर्धन बनत चालला. अर्धपोटी माणसांमुळे तऱ्हेतऱ्हेची रोगराई. पण सुखवस्तू लोक नादान का झाले, याची कारणपरंपरा मात्र इतक्या सोप्या तऱ्हेने सापडण्यासारखी नव्हती.
आम्ही दर्शन करून परत आलो, तो जुगलबाबू काही माणसांबरोबर बोलत होते. ही सर्व माणसे सोशलिस्ट पार्टीची होती व ह्या विभागातील कार्य कसे चालले आहे व कसे व्हावे ह्याबद्दल वादविवाद सुरू होता. भारत स्वतंत्र होऊन नवे युग उगवले होते; पण नव्या युगाच्या जागृतीचे चिन्ह मला ह्या प्रवासात अजून तरी दिसले नव्हते. महंतजी व त्यांचा परिवार गाढ झोपेत होता. पण सकाळच्या प्रहरी शेतकरी व कामकरी ह्यांनी पुढील सहा महिन्यांत काय योजना कराव्यात, बिहारमधील साखर कारखान्यात मजूर- संघटनांतून काय फेरबदल करावेत ह्याबद्दल निदान वादविवाद करणारी ही तरुण पोरे नव्या युगाच्या सुरुवातीची चिन्हेच होती. त्यांच्याशेजारी महंतजींचा धाकटा पाच वर्षांचा मुलगा सदरा चघळत उभा होता. अर्धवट इंग्रजी, अर्धवट बिहारी भाषेत चाललेले संभाषण त्याला कळत नव्हते; पण तो मोठ्या उत्सुकतेने व एकाग्रतेने बोलणाऱ्या प्रत्येक माणसाकडे टक लावून ऐकत उभा होता. तो ह्या नव्या युगाचा वारसदार होता, की त्याचा पहिला बळी होता कोण जाणे!
१९५४
*