भोवरा/डार्विनचा सिद्धांत

विकिस्रोत कडून




 १३
 डार्विनचा सिद्धांत


 "पृथ्वीवर सगळीकडे जीवनाचा तीव्र झगडा चालला आहे. स्वपोषण आणि प्रजनन हे सर्व जीवनसृष्टीचे अंतिम ध्येय आहे. आपण जिवंत राहावयाचे व आपल्या जीवजातीची संतती-सातत्य-कायम ठेवायचे ह्या प्रयत्नात जग गुंतलेले आहे. जे जीव ही दोन्ही कार्ये करतात, ते जीवनाच्या लढाईत यशस्वी झाले असे म्हणावे. शक्ती, युक्ती व परिस्थिती ह्या तिन्हींच्या जोरावर व्यक्ती- एक एक जीव-हे कार्य करते. ज्यांना साधत नाही, त्या व्यक्ती मरतात. सर्वतया वरील गुणांनी युक्त तेच जीव जगतात…" वर्गामध्ये डार्विनच्या विकासवादाचे विवरण करताना मी सांगितले व माझा तास संपवून घरी परतले.
 वाटेत किती तरी दिवसांनी तिची गाठ पडली. एका हातात औषधाची बाटली, एका हातात भाजीची पिशवी, अशी घाईघाईने ती कुठे तरी निघालेली दिसली. "आजारी होतीस का?"
 "छे ग! माझी ती सिंधी निर्वासित मैत्रीण आहे ना, तिची मुलगी आजारी आहे. तिचं औषध आणायला चालले आहे."
 "आणि ही भाजी कुणासाठी चालवली आहेस बाई?".
 "तुझं आपलं काही तरीच. ही काही दुसऱ्या कुणासाठी नाही. अगदी घरच्यासाठी भाजी आहे बरं!" तिने हसून उत्तर दिले. आणि "मला लवकर गेलं पाहिजे, जाते मी- " असे म्हणून ती पुढे सटकली व मी माझ्या वाटेने चालू लागले.
 भाजी अगदी घरच्यासाठी होती; तरी इतर नव्हते का कुणी ती आणायला? एवढी मुले घरी आहेत, कुणालाच का नसते जाता आले? माझ्या
मनात आले. ती जवळ नव्हती, तरी तिचे उत्तर माझ्या कानांनी ऐकले, "अग, त्यांचा अभ्यास होता. मी औषधासाठी जाणारच होते. म्हटलं, मीच आणीन."
 ही काही आजची गोष्ट नव्हती. नेहमी असेच चाले. दवाखान्यातून औषध आणून त्या बाईला देईल; घरी जाऊन भाजी काढून, निवडून चिरील. घाई घाईने अंग धुवील व शाळेला उशीर होईल ह्या भीतीने कसेबसे दोन घास खाऊन बाहेर पडेल. संध्याकाळी घरी आली की परत घरचे काम, नाही तर गावात कुणी नातलग असतील त्यांची कामे. मग शाळेतल्या वह्यांची तपासणी मग सुदैवाने रात्र झाल्यामुळे झोप… हा तिचा रोजचा कार्यक्रम असे.
 आम्ही लहानपणी एका घरात राहिलेल्या, बरोबर शाळेत गेलेल्या. ती माझ्यापरीस मोठी म्हणून नेहमी मला संभाळून घ्यायची. माझीही दोन काम करायची. मला आठवते तेव्हापासून पाहते आहे, प्रत्येकजण आपले हक्काने तिच्याकडून कामे करून घेई. मीही काही त्याला अपवाद नव्हते. आता दोघींच्या दोन वाटा झाल्यावर कधीकधी आमची भेट होते. कधीकधी एकमेकींकडे जातो, एकमेकींचे कसे काय चालले आहे ह्याची आम्हाला बातमी असते; आणि भेटलो म्हणजे दोघींनाही आनंद होतो- म्हणजे मला ती दिसल्याचा आनंद होतो, पण लगेच तिच्या परिस्थितीचे चित्र डोळ्यांपुढे आल्याने दिवसभर हुरहूर व विषाद वाटतो. मी तिच्यासाठी काही करीत नाही; नुसती हळहळते. सुखाच्या आयुष्यात लोकांबद्दल निष्क्रिय सहानुभूत व त्यामुळे वाटणारी हळहळ हीसुद्धा एक प्रकारची चैन आहे.
 …आज ती मला आणखी वाळल्यासारखी वाटली. लहानपणी ती माझ्या एवढीच दिसायची. आता पहाते तो ती दिवसानुदिवस लहानलहान दिसते. ती लहान होत होती, का मी सारखी फुगत असल्यामुळे ती तशी दिसायची, कोण जाणे! मी जगाची एक घेणेकरी होते. दोघी रिकाम्या हाती व उघड्या अंगाने जगात आलो, पण पहिला श्वास घेतल्यापासून आतापर्यंत माझ्यावर देणग्यांचा वर्षाव होत होता. लाडकी मुलगी, प्रेमाची बहीण, मायेची शाल पांघरलेली पत्नी, पिलांची किलबिल चाललेल्या घराची धनीण… एक ना दोन, देव देत होता व मी घेत होते; आणि घेता घेता शरीराने पण वाढत होते आणि ती?... एक देणेकरीण होती. आई, बाप, भाऊ, बहिणी, मित्रपरिवार… सगळ्यांनी तिच्याकडून घेण्याचा जणू विडा
उचलला होता. आई बिचारी महासाध्वी होती. नवऱ्याच्या क्षुल्लक पगारावर आठदहा माणसांचा संसार कसा करी, तिचे तिलाच माहीत.
 मुले हळूहळू मोठी झाली. थोरल्या मुलीचे लग्न झाले, थोरला मुलगा मिळवू लागला, खालची लवकरच आपल्या मार्गाला लागणार असे दिसत होते. तरुण वयात केलेल्या कष्टाचे फळ मिळणार, आत सुखाचे दिवस येणार ह्या आशेत सर्व होती पण ते बिचारीच्या नशिबात नव्हते. थोरला मुलगा कर्ज काढून परदेशात गेला तो परत आलाच नाही. त्याचे कर्ज मात्र कुटुंबाच्या डोक्यावर बसले. आई व वडील दुःखातच गेली. मधल्या मुलाला मध्येच कॉलेज सोडून लहानशी नोकरी पत्करावी लागली. हिने, भावाच्या मदतीने काही शिष्यवृत्त्या मिळवून शिक्षण संपवले व शिक्षण संपल्या दिवसापासून ती व तिचा भाऊ ह्यांनी संकल्प सोडावा त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचे कुटुंबाला दान केले. कर्जाची फेड करता करता भावाबहिणींचे वय झाले… कोणी तरी वंशाला राहावा म्हणून धाकट्याचे लग्न करून दिले व दोघांनी त्याच्या संसाराला मदत केली. तिच्या त्यागाची सीमा तरी काय, हे दैवाला पाह्यचे होते की काय कोण जाणे… बहिणीची मुले, विधवा भाच्या आणि नातवंडे पण तिच्याच पदरी पडली… आणि जणू काय हे सर्व कमीच म्हणून, ती आता एका निर्वासित मैत्रिणीसाठी दवाखान्यात खेटे घालीत आहे. तिचा विचार करायला लागले की माझ्या विचारांचे पर्यवसान रागात होई. पहिल्याने काही कारण नसता तिच्या दीन अगतिक नातलगांचा राग येई- नंतर परदेशात सुखात असलेल्या भावावर मी चरफडे. शेवटी मला तिचाच राग येई, 'तिला तरी जरा अंगाबाहेर नसते का टाकता आले?' असे मी घरी हजारदा मनाला विचारी. माझ्या सुखासीन जिवाला तिचा त्याग अगदी असह्य होई.
 विचाराच्या चक्रात मी घरी कधी आले ते समजलेसुद्धा नाही. घरची मंडळी जरा खिन्नच दिसली व लवकरच त्याचे कारणही कळले. "तुला कळलं का ताई गेल्या ते?"
 "म्हणजे? दोन दिवसांपूर्वीच मला दिसल्या होत्या. भावाच्या आजाराची चौकशीसुद्धा केली मी त्यांच्याजवळ. जरा दमल्या भागलेल्या व ओढल्यासारख्या दिसत होत्या, पण आजारी काही नव्हत्या. काही अपघात वगैरे झाला की काय?" मी आश्चर्याने विचारले.
 "त्यांचे संध्याकाळी पोट दुखू लागलं. दोन दिवस घरी होत्या.
शेजारच्या डॉक्टरीणबाईंना बोलावलं, त्यांनी सांगितलं की घरगुती उपचारांचं हे दुखणं नाही, म्हणून इस्पितळात नेलं. तिथ शस्त्रक्रिया करण्याच्या आतच मेल्या!" मला माहिती देण्यात आली. "ताईच्या आई काय आक्रोश करताहेत!" कोणीसे कळवळून म्हणाले.
 'करतील तर काय झालं. एक गुलाम नाहीसा झाला. कोणालाही वाईट वाटेल!" मी मनातल्या मनात म्हटले, पण मोठ्याने मात्र "सुटली बिचारी !" एढेच शब्द उच्चारले.
 ही दुसरी देणेकरीण. ताई कॉलेजची परीक्षा पास झाली तेव्हा कोणी तिला एका संस्थेत काम करण्याची गळ घातली होती. ती नाकारून ताईने जरा जास्ती पैशांची सरकारी नोकरी पत्करली. तर त्या वेळी कोण गहजब झाला ! एका सभेत तिचे नाव न घेता लोकांना समजेल अशा बेताने एक वक्ते म्हणाले होते, 'मुली बी. ए. झाल्या म्हणजे आपले आयुष्य एखाद्या गरीब संस्थेत न वेचता पैशाकडे पाहतात व मोठ्या नोकऱ्या धरतात." बिचारी ताई वक्त्यांच्या समोर पुढच्या रांगेत बसली होती. संताप, आश्चर्य, अगतिकता व शरम ह्यांनी तिच्या अंतःकरणात काय झाले ते ती कोणाजवळ बोलली नाही. बऱ्याच वर्षांनी मला ते कळले. तिच्या अंगावर आई व सात भावंडे ह्यांचा संसार होता. त्यांचे शिक्षण करता येईल अशी नोकरी तिला हवी होती. आई व भावंडे शिकण्यासाठी एकीकडे व स्वतः नोकरीच्या गावी, असे दोन संसार तिला चालवायचे होते. सर्व भावंडांचे शिक्षण व लग्ने करूनही तिची जबाबदारी व देणे संपले नव्हते. भावाच्या आजारात रात्रंदिवस तिची सेवा चालली होती. दिवसभर नोकरी, रात्रभर जागरण, मधल्या वेळात स्वयंपाक - कोण गुलाम पैसा देऊनही इतके करणारा मिळेल? मिळवता मुलगा घरी आला की दमला म्हणून त्याचे कौतुक होई, पण ताईला "बस हो, दमलीस - " एवढे दोन शब्दही कधी कोणी म्हटले नाहीत. ज्या बायांनी संस्थांतून कामे केली, त्यांचा बोलबाला झाला, वर्तमानपत्रातून फोटो आले, समाजसेविका म्हणून सत्कार झाले, शारीरिक स्वास्थ लाभले, प्रतिष्ठा मिळाली, ताईचा त्याग कोणाला दिसला नाही. सगळ्या बहिणींची लग्ने झाली. कोणाच्या मनात येईना, की ताईलाही संसार करावासा वाटत असेल म्हणून. शेवटी शरीराने संप पुकारला आणि ताईच्या कचाट्यातून आपली सोडवणूक करून घेतली.
 ताईची ही तऱ्हा, तिची ती तऱ्हा. तिने लग्न करावे म्हणून भावाने तिला पुष्कळ सांगितले, पण तिनेच भावावर एकट्यावर भार नको म्हणून लग्न केले नाही. तिला पाहिले की मला वाटते, ती ताईसारखीच एक दिवस जाईल. दोघी चांगल्या मिळवत्या, पण कधी झुळझुळीत वस्त्र नेसल्या नाहीत. दोघींचे केस सुन्दर पण कधी त्यावर फूल घातले नाही. जबाबदाऱ्या अंगाबाहेर टाकायच्या ही युक्ती त्यांना साधली नाही. आयुष्याच्या धकाधकीत इतरांना मागे रेटून आपण पुढे सरायचे ही शक्ती त्यांना नाही. परिस्थिती म्हणजे शक्तियुक्तीनेच आपलीशी करून घ्यायची. अशी शक्तियुक्ती ज्यांच्यात असेल त्यांचेच संसार होतात… त्यांची संतती पृथ्वीची मालक होते. जीवनाच्या झगड्यात यशस्वी होण्यास लागणारा स्वार्थ, बेदरकारपणा दोघांच्यातही नव्हता. डार्विनच्या सिद्धान्ताप्रमाणे त्या जगण्यास नालायक; त्यांनी कामकरी मुंग्यांप्रमाणे इतरांचे संसार उभारायचे, लोकांची कर्जे फेडायची, लोकांसाठी कष्ट करायचे व निर्वंश मरायचे!

*