भोवरा/भ्रमंती

विकिस्रोत कडून




 ११
 भ्रमंती


 आंब्याच्या दाट पालवीतल्या गडद छायेत प्रकाशाचा लांबलचक किरण चमकला. परत पाहिले तर तो किरण सजीव होऊन इकडून तिकडे नाचत होता! आता ओळख पटली. एकटाच आहे वाटते. मादी पण आसपास असली पाहिजे. हा उत्तरेकडचा माशा खाणारा पक्षी. इंग्रजांनी त्याला नाव दिले आहे 'नंदनवनातील मक्षिका-भक्षक'; आणि त्याला कारण काय, तर त्याची 'मिया मूठभर, दाढी हातभर' असे प्रमाण असलेली फूट दीड फूट लांबीची पांढरी शुभ्र, अरुंद शेपटी, हा लहानसा पक्षी दाट पानांच्या झाडांत डहाळीडहाळीवरून उड्या मारीत कीड व किडे शोधून खात असतो. तो इकडून तिकडे आतल्या आत उडत असला म्हणजे त्याचे चिमुकले शरीर दिसायच्या आधी त्याची शुभ्र रेशमी शेपटी सुरकांड्या मारताना दिसते. हिमालयाच्या खालच्या रांगांपासून तो मध्यओरिसापर्यंत हा रमणीय पक्षी हिवाळ्याखेरीज दिसतो. पुण्यात फक्त अश्विन मार्गशीर्षाच्या दिवसांत दिसतो. इकडे थंडी पडू लागली की आणखी दक्षिणेकडे जातो की काय कोण जाणे! पुण्यात दरवर्षी आमच्या बागेत एखादा आठवडाभर दिसतो न् वर्षभर कुठे गडप होतो कोण जाणे!
 हळूहळू पाय न वाजवता मी जवळ गेले, तो लाल विटकरीच्या रंगाची त्याची मादी पण दिसली. दोघेही अगदी आपल्या कामात दंग होती. नर पांढऱ्या शेपटीमुळे लांबूनसुद्धा दिसतो. मादीला मात्र जरा शोधावे लागते. हिवाळ्यातल्या या पहिल्या पाहुण्यांचे मी स्वागत केले.
 हळूहळू इतरही लांबलांबचे पाहुणे येऊ लागले. संध्याकाळी कालव्यावरून जाताना खुपसे चतुर दिसले. त्यांच्या अभ्रकी पंखांचे कौतुक
वाटून मी क्षणभर थांबले व एक पंखाची जोडी दूर जाते तो दुसरी आली, तिसरी आली, पांढरे पोट व काळसर निळे लकलकणारे पंख असलेले हे पाकोळीच्या जातीचे 'स्विफ्ट' नावाचे पक्षी हिमप्रदेशातून आलेले पाहुणेच होते. ते म्हणे, युरोपातील आल्प्स पर्वतावरून इकडे येतात! ते चांगले फेब्रुवारी, मार्च- अगदी माघ संपेपर्यंत इकडे दिसतात. आपल्याकडल्या पाकोळ्यांचे हे जातभाई आकाराने मोठे असतात व पंखांचा रंगही जास्त सुंदर असतो. त्यांचे इंग्रजी नाव त्यांच्या वेगाने उडण्यावरून पडलेले आहे. आपल्याकडचे पाकोळी नाव कसे पडले ह्याची उपपत्ती डॉ. मल्हारराव आपटे ह्यांनी ह्या पक्षांच्या दुसऱ्या एका गुणधर्मावरून दिली आहे. पाकोळ्या कधी जमिनीवर किंवा झाडाच्या डहाळीवर बसत नाहीत. त्यांची मातीची घरटी नदीकाठच्या उभ्या दरडीमध्ये किंवा उभ्या खडकावर किंवा घराच्या भिंती किंवा छपरांमध्ये असतात. त्यांचे पाय 'पांगुळलेले' म्हणून त्या पाकोळ्या असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण मला ते तितकेसे पटत नाही. त्या पक्ष्यांची कोठची एक क्रिया लक्षात राहात असेल तर ती त्यांच्या उडण्याची. जेव्हा पाहावे तेव्हा ते आकाशांत उडत असतात. हवेतल्या हवेत सारखे आपल्या उडत्या भक्ष्यावर झेपा घालीत असतात व उडताउडता हवेतच ते त्या भक्ष्याचा फन्ना उडवतात. संध्याकाळी पन्नासपन्नास शंभरशंभर पाकोळ्या उंच आकाशात मजेत घिरट्या घालतात व एक विशिष्ट आवाज करतात. हे पक्षी पांगळे आहेत, अपंग आहेत असे कधी मनातसुद्धा येत नाही. बागेतल्या फुलपाखरालासुद्धा आपण पाकोळी म्हणतो ते काही त्याच्या पांगळेपणामुळे नाही. पाखरू हा शब्द पख म्हणजेच संस्कृत 'पक्ष' ह्यापासून आलेला. तसाच पाकोळी हा शब्दही पक्ष शब्दापासूनच आलेला वाटतो. सदैव पंखावर असते ती पाकोळी.
 युरोपात थंडी पडू लागली म्हणजे कीटक नाहीसे होतात व हे पक्षी दक्षिणेकडे येऊ लागतात. हस्ताचा पाऊस पडून गेला म्हणजे वाळव्यांना पंख फुटतात व अशा लक्षावधी वाळव्या आठ दिवस सर्व वातावरण भरतात आणि शेकडो पक्षी काही हवेत, काही जमिनीवर त्यांना खात असतात. त्यांच्यातच हे पाहुणे पण अधूनमधून दिसतात.
 दिवाळीनंतरच्या एखाद्या दिवशी मजेत थंडी पडलेली असावी, सकाळी उठून पाहावे तो टेलिफोनच्या तारा लहानलहान पक्ष्यांनी भरून गेलेल्या
असतात. काही पक्षी लालसर, काही तांबूस असे असतात. त्यातच काही थोड्यांच्या शेपटाची दोन पिसे लांब तारेसारखी मागे आलेली असतात. हे पक्षीसुद्धा स्विफ्ट प्रमाणेच कधी झाडांवर न बसणारे असतात. मात्र ते तारांवरून, घराच्या भिंतीवरून व गच्चीवर बसतात व अगदी क्वचित् जमिनीवर पण बसतात. ही सर्व मंडळी पण उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेली. ही मात्र बरेच दिवस दिसतात व मग जी नाहीशी होतात, ती हिवाळा सरताना परतीच्या वाटेवर असली म्हणजे पुन्हा भेटतात. आपल्याकडे ह्यांनाही पाकोळीच म्हणतात असे वाटते. इंग्रजीत त्यांना 'स्वालो' म्हणतात.
 हिवाळ्यातली ही भ्रमंती पाहिली म्हणजे कालिदासाच्या रघुदिग्विजयातील श्लोकांची आठवण होते. सूर्य परत तळपू लागला; इंद्रधनुष्ये नाहीशी झाली; निरभ्र आकाशात चंद्र प्रकाशू लागला; अगस्तीच्या उदयाबरोबर गढूळ पाणी निवळू लागले; नद्यांचे पूर ओसरू लागले; रस्त्यातला चिखल वाळू लागला, शरद ऋतू हिवाळा आल्याचे सांगत आला आणि त्याने काय केले तर रघूला चालू लागण्यास प्रोत्साहन दिले (यात्रायै चौदयामास ).
 पावसाळा संपला म्हणजे जणू सर्व चरसृष्टीला चालू लागायची प्रेरणा मिळते. चरैवेति चरैवेति- "चालू लाग बाबा, जगायचे असेल तर चालत राहा, नाही तर मरशील.”
 मार्गशीर्ष-पौषाच्या सुमारास मी एका पाहुण्याची वाट पाहात असते; पण तो नेहमी दिसतोच असे नाही. एक दिवस कॉलेजात बसल्याबसल्या खिडकीबाहेर पाहिले तर समोरच्याच झाडावर सोन्यासारखे काहीतरी लखलखत होते खिडकीशी जाते तो एक सोन्याचा पक्षी त्या झाडावरून उडाला व दुसऱ्या झाडावर बसला. ह्या पक्ष्याचे पंख नवीन उजाळा दिलेल्या सोन्यासारखे, लाल डोळ्यांच्या कडा काजळ घालावे तशा काळ्या व पंखांची टोके काळ्या साटिनची. ह्या अद्भुत सौंदर्यदर्शनाने माझे हृदय फुलून आले. तो पक्षी दोनतीन दिवस दिसून नाहीसा झाला. पुढल्या वर्षी घरच्या व कॉलेजातल्या बागेत पण दिसला. त्याचे 'गोल्डन - ओरिओल' हे इंग्रजी नाव पुस्तकात वाचून समजले, व कळले की हा पक्षी तुर्कस्थान, गिलगिट, अफगाणिस्तानांतून इकडे येतो, नंतर एका वर्षी वसंतऋतूत मी ओरिसात गेले असताना भल्या पहाटे पिऊऽऽ पिऊऽऽ असा पक्ष्याचा गोड आवाज ऐकून
जागी झाले. आम्ही उतरलो होतो तेथे ह्या झाडावरून त्या झाडावर पक्षी पिऊऽऽ अशी एकमेकांना साद देत होते. शेवटी उजाडल्यावर बाहेर जाऊन पाहिले तो काय आश्चर्य! पुण्यात पाहिले तसे सोन्याचे पक्षी झाडावर बोलत होते. सोन्याला नुसता जीवच आला नव्हता, तर कंठही फुटला होता! हे पक्षी वसंतात ओरिसात येतात व तिकडे त्यांना 'हलदी बसंत' म्हणतात. कुठे सोन्याची प्रभा न् कुठे हळदीचा पिवळेपणा! मी जेव्हा ह्या पक्ष्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा आश्चर्याचा भर ओसरल्यावर मला अगदी खात्री वाटली की नळराजा नेसते धोतर घेऊन ज्या पक्ष्यांना धरायला धावला ते हेच पक्षी असले पाहिजेत. पण महाभारतातही त्यांना काहीच नाव दिलेले नाही.
 ह्या शरत्कालीन भ्रमंतीत फक्त पक्षीच असतात असे नाही. तर इतरही प्राणी वाटचाल करू लागतात. एक दिवस सकाळी पुणे-मुंबई रस्त्यावर तट्टावर बसून चाललेल्या बायका पाहिल्या. भांडीकुंडी, पोरेसार सर्व चालली होती. ही आघाडीची मंडळी होती. दहा-अकरा वाजता कुठेतरा पाणी व सावली बघून ती थांबतील व सैंपाक करून ठेवतील तो मागूनचा मंडळी येणार. ही मागूनची मंडळी कॉलेजात जाताना भेटली आणि कुठे; तर मालधक्क्याच्या रस्त्यावर अगदी ऐन ऑफिसच्या वेळेला. दोनचारशे शेळ्यामेंढ्या पन्नासपन्नासाच्या गटाने शिस्तीत हाकीत धनगर चालले हाेते. काळेकभिन्न, अंगात मळकट सदरे, ते इतके खाली, की लंगोटाच्या त्रिकोणाचे फक्त टोक तेवढे पुढे दिसत होते. धोतर अंगावर घेतलेले बरोबर त्यांच्यासारखीच काळीसावळी, हसतमुख, गुटगुटीत पोरे, चौक ओलांडायला त्यांना चांगली दहा मिनिटे लागली. तोवर शेकडो सायकली, दहाबारा मोटरी, दहाबारा मोटरसायकली अडून बसलेल्या. एका बाजूने मालधक्क्यावरून माल भरून मोठाले माल ट्रक व बैलगाड्या ह्याचा तांडा येऊन उभा राहिलेला; आणि दुसऱ्या बाजूने पोलिसाने रस्ता खुला दिल्यामुळे धनगर व शेळ्यामेंढ्या जात होत्या. पुण्याच्या पूर्वेकडच्या सर्व रस्त्यांतून ह्या काही दिवसांत कळपच्या कळप पश्चिमेकडे जात असतात. हिंगण्याच्या रस्त्यावर, सिंहगडच्या रस्त्यावर, लोणावळ्याच्या रस्त्यावर त्यांच्या बायका मारे सैंपाकपाणी करीत असतात व नगर रस्ता, सोलापूर रस्ता ह्या मार्गे येऊन टिळक रस्ता, डेक्कन जिमखाना, स्टेशन रस्ता अशा सर्व रस्त्यांवर शेकडो शेळ्यामेंढ्या पूर्व महाराष्ट्रातील कोरडी, वृक्षहीन मैदाने सोडून
पाण्यासाठी, चाऱ्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगराकडे चाललेल्या असतात. सगळ्यांचा मंत्र एकच- चरैवेति चरैवेति।
 आणि ह्याच सुमाराला शेते पिकली म्हणजे त्या उघड्या दौलतीवर डल्ला मारायला, दिवाळीच्या आनंदात असलेल्या शहरवासियांकडून काही मिळाले तर पाहावे म्हणून बहुरूपे, जोशी, फासेपारधी, कोल्हाटी, माकडवाले हे पण रस्त्यावर दिसू लागतात, गुडुम्-गुडुम्-गुडुम्. बापूराव भागूबाई ही गेल्या वर्षी नाहीशी झालेली जोडी आपल्या साखळीला हिसके देत, पोरांना वाकुल्या दाखवीत परत पुण्याच्या रस्त्यावर आपल्या संसाराच्या परवडीचे प्रदर्शन मांडीत हिंडू लागली. गुडुम्-गुडुम्-गुडुम् नंदीबैल पैसा मागत येतो.
 …आणि ही सगळी हालचाल पाहिली म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतील पशुपक्ष्यादी सगळ्या भटक्या पूर्वजांचे रक्त माझ्या शरीरात उसळून उठते. मी पण बांधाबांध करते व प्रवासास निघते… लोकांना वाटते, बाई संशोधनकार्याला निघाल्या म्हणून!

१९५४
*