भोवरा/यात्रा

विकिस्रोत कडून




 
 यात्रा


 आम्ही भगवतीच्या देवळाजवळ उभे होतो. प्रवास करता करता भारताचे दक्षिण टोक गाठले होते. नकाशात लंका किती जवळ दिसते; पण येथून काही लंकेचा किनारा दिसत नव्हता! जिकडे पाहावे तिकडे समुद्र पसरला होता. पलीकडे काही जगाचा भाग असेल; तिथे माणसे राहात असतील, अशी कल्पनासुद्धा करणे जड वाटत होते. जमीन पायांखाली असेल तोपर्यंत चालत राहायचे. देशच्या देश, खंडच्या खंड पालथे घालायचे हे जरी कठीण असले तरी कल्पनेला समजण्यासारखे आहे. असेच चालत चालत नागड्याउघड्या रानटी मानवाने सारी पृथ्वी पादाक्रांत केली, पण जमिनीवरून अनंत सागरात माणसाने होडी लोटली तरी कशी ह्याचे मात्र आश्चर्य वाटते! कदाचित किनाऱ्याकिनाऱ्याने जाणाऱ्या होड्या वादळाने भडकून लांब गेल्या असतील, काही बुडाल्या असतील व काही दुसऱ्या किनाऱ्याला लागल्या असतील; मनुष्याला उमगले असेल, की आपली जन्मभूमी एवढीच काय ती पृथ्वी नसून अनंत समुद्रात ठिकठिकाणी भूमी विखुरलेली आहे. मनुष्य भविष्यकाळात काय करील हे चित्र रंगवायला जितकी मौज वाटते, तितकीच त्याने पूर्वी काय केले असेल याची कल्पना करण्यातही वाटते.
 आम्ही त्या शांत, निर्मनुष्य किनाऱ्यावर किती वेळ उभे होतो कोण जाणे, एकदम माझ्याकडे वळून तो म्हणाला, "आपण एकदा हिमालयात गेलं पाहिजे."
 हो खरंच, कधी बरं जाऊ या?" व मग समोरच्या सपाट पसरलेल्या समुद्राकडे पाहातपाहात आम्ही उत्तुंग हिमालयाचे चित्र रेखाटले व जायचे बेत केले.
 किती वर्षे झाली त्या गोष्टीला ! हिमालयाला जाण्याची कल्पना आम्ही सोडून दिली नव्हती; पण जमत नव्हते खरे! तेवढ्यात आई बद्रीकेदाराला जाऊन आली व आम्ही पण तिकडेच जायचे नक्की केले; पण घरातून पाय निघेना! त्याची-माझी सुट्टी जमेना. दर सुटीत काही ना काही काम व सुटी मोकळी मिळाली, तर इतक्या लांबच्या प्रवासासाठी लागणारी रोकड नाही! बाकी सर्व आहे तर मुले व घर कोणावर सोपवावे ही पंचाईत. शेवटी एक वर्ष असे उजाडले, की काही झाले जायचेच असा निश्चय केला; कोठचेही काम सुटीत घ्यायचे नाही असे ठरवले; आईने मुले, घर, मामंजींना सांभाळण्याचा पत्कर घेतला व आम्ही एकदाचे निघालो. बरोबर माझ्या सत्तर वर्षांच्या एक वन्सं पण होत्या.
 निधर्मी राज्यव्यवस्थेमुळे पुणे ते हृषीकेश व हृषीकेश ते पुणे अशी स्वस्त दराची तिकिटे मिळाली नाहीत. पुणे ते डेहराडून व परत अशी तिकिटे मिळाली-का, तर म्हणे कोठच्याही थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास स्वस्त तिकिटे मिळतात. पण यात्रेला मिळत नाहीत!
 शेवटी एके दिवशी सकाळी प्रवासास सुरुवात झाली. युगानुयुगे प्रवास चालला होता, मला वाटते. सह्याद्री, सातपुडा, विंध्य ह्यांच्या तापलेल्या भिंती ओलांडून आग ओकणारे गंगायमुनांचे सपाट खोरे लागले. दिवस वा रात्र, उकाड्यात काहीच फरक नव्हता. दिवसा उन्हात पळणारे मृगजळ दिसे. रात्री काळ्याकुट्ट काळोखात काही दिसत नसे. लोखंडाची भट्टी खालून तापली होती, वर आकाशाची कढतकढत काळीशार कढई पालथी घातली होती व मध्ये माणसे की बिस्किटे भाजून निघत होती! अधूनमधून भट्टीचे दार उघडे. खुसखुशीत भाजलेले जिन्नस बाहेर निघत व नवेनवे कच्चे जिन्नस आत येऊन रिकाम्या जागेवर बसत व भट्टीचे दार धाडकन् बंद होई ! रात्रभर असे चालले होते. मी म्हणे, "एवढी कुणाची मेजवानी आहे की अजून हे केक-बिस्किटांच भाजणं संपत नाही!" एवढ्यात गार वाऱ्याची झुळूक आली. "छे! छे! बिघडली सारी भट्टी ! तापलेल्या मालावर अशी गार हवा लागून कसं चालेल ?" आणखी एक गार झुळूक आली व ग्लानीने मिटलेले डोळे मी उघडले. उत्तर भारताचे मैदान संपून आगगाडी हिमालयाच्या टेकड्यांवर आली होती. दोन्ही बाजूनी जंगल होते व सकाळच्या प्रहरी झाडे टवटवीत दिसत होती. आम्हा डेहराडूनच्या वाटेला लागलो होतो.
 डून नावाप्रमाणे खरोखरीच एक द्रोण आहे. चारी बाजूंनी पाच ते सात हजार फूट उंचीचे पर्वत आहेत; व मध्ये रानात वसलेले गाव आहे. हिवाळ्यात म्हणे ह्या पर्वतांच्या माथ्यावरून बर्फ असते. आता उन्हाळ्याच्या धुंद वातावरणात पर्वतांची भुते छायेसारखी भोवताली दिसत होती व त्यांची रूपरेषा स्पष्ट दिसली नाही तरी त्यांची आग मात्र चांगलीच जाणवत होती. फरक एवढाच, की उत्तर भारताच्या सपाट मैदानात पांढरी आग होती आणि येथे हिरवा उन्हाळा होता; त्यामुळे निदान डोळे तरी निवत होते.
 डेहराडून ते हृषीकेश, हृषीकेश ते देवप्रयाग, देवप्रयाग ते कीर्तिनगर, कीर्तिनगर ते श्रीनगर (काश्मिरातले नव्हे, गढवालची जुनी राजधानी), श्रीनगर ते रुद्रप्रयाग हा सबंध प्रवास अगदी स्पष्ट आठवतो; पण त्या आठवणी काही विशेष सुखदायक नाहीत. गर्दी, धूळ, उकाडा, भिकाऱ्यांचा आणि पंड्यांचा ससेमिरा, यात्रा कंपन्यांची निरनिराळी लबाडी, काही चारदोन देवळे सोडल्यास गलिच्छ भिकारी, देवळे व त्यांचे लोचट दलाल, बस-कंपन्यांची बेपर्वाई व त्यांच्या नोकरांचा उद्धटपणा- ह्या सर्वांना तोंड देऊन यात्रा पुरी करणाऱ्या लोकांच्या धीमेपणाचे, सोशिकपणाचे व श्रद्धेचे कौतुक करावे तेवढे थोडे ! आणि शेपूट तुटलेल्या कोल्ह्याच्या मुत्सद्देगिरीने नव्हे, तर अगदी मनापासून सांगते, की एवढा सर्व त्रास सोसूनही बद्री व केदारला जाणे शक्य असेल तर माणसाने आयुष्यातून एकदा तरी जाऊन यावे.
 ज्या कंपनीच्या मार्फत प्रवास केला त्यांनी आमच्याबरोबर स्वैपाक करण्यासाठी चंडीप्रसाद म्हणून एक ब्राह्मण व धनसिंग आणि वीरसिंग म्हणून दोन बोजेवाले दिले. 'सामानाचं वजन करा, म्हणजे जास्ती वजन भरल्यास सामान काढून ठेवू' म्हणून तीनतीनदा सांगूनही तसे न करता, 'सर्व ठीक आहे; तम्ही चालू लागा' असा इशारा मिळाला व आम्ही चालू लागलो. रुद्रप्रयागला बस सोडून पायी प्रवासाला सुरुवात झाली तो, 'साहेब, सामानाचं वजन करा,' म्हणून धनसिंगाची भुणभूण सुरू होती. रुद्रप्रयागाला कुलीचे एक ऑफिस आहे, तेथे थांबून सामान वजन केले, आमच्या मॅनेजरने कुलीजवळ कराराचा कागद दिला होता. त्यात वजन बरेच कमी लिहिले होते व अर्थात मजुरीही कमी लिहिली होती. तेव्हा त्या
ऑफिसात नवा कागद केला व जास्ती पैसे देण्याचा करार केला, धनसिंगाने आमच्यावर विश्वास आहे म्हणून सांगितले. परस्परांवरचा विश्वास उडावा असे वर्तन शेवटपर्यंत आमचे झाले नाही; व ह्या मजुरांच्या व चंडीप्रसादच्या बरोबर प्रवास फार संतोषाने झाला. एकंदर प्रवासी कंपन्यांचा अनुभव घेता एवढे मात्र पक्के मत झाले, की त्यांच्या वतीने प्रवास करू नये. प्रवासी व मजूर सगळ्यांनाच बुडवून पैसे काढण्याचा त्यांचा बेत असतो.
 रुद्रप्रयागला मंदाकिनीच्या तीराने पायी चालावयास सुरुवात केली. हिमालयाची सर्वच वनश्री अगदी नवीन होती, म्हणून पाहातपाहात फोटो काढीत, पक्षी दिसला की दुर्बीण लावून न्याहाळीत, नवीन फुले दिसली की ती गोळा करीत, निरनिराळे दगड खिशांत घालीत, आम्ही वीस दिवस चालत होतो. कोठेही एका दिवसापेक्षा जास्त मुक्काम केला नाही. एकंदर १८० मैल चाललो. पहिला व केदारचा अशा दोन मुक्कामात जरा कमी चाललो; एरवी साधारणपणे रोज दहा ते अकरा मैल चालत होतो. रमतगमत पाच ते सात तास चाल होई. होता होईतो सकाळचेच चालत असू. पण कधीकधी दुपारचीही चाल झाली. केदारच्या वाटेवर रोज बाराच्या पुढे गडगडायला लागून जोराचा पाऊस यायचा. धनसिंग म्हणायचा, "बाई, अशनी पडल्या तर मरायला होईल!" पण आम्हांला चार-पाचदाच गारा पडलेल्या दिसल्या. पाऊस जरी बाराच्या पुढे यायचा तरी ढग दहापासूनच जमायला लागायचे. आम्ही मोठ्या हौसेने रंगित फिल्मस् घेतल्या होत्या, त्यांचा उपयोग लख्ख ऊन असले तरच करायचा. सूर्य लौकर उगवे. पण दोन्ही बाजूंच्या उंच पहाडांतून वर येऊन खालच्या दरीत स्वच्छ प्रकाश पडायला साडेआठ वाजायचे, म्हणजे दिवसाकाठा फोटो घेण्यास फारफार तर दोन तास मिळत.
 रोज दहा मैल चाल म्हणजे नीट कल्पना येत नाही. त्या दहा मैलात एखादा तरी दोनतीन हजार फुटांचा चढ व तितकाच उतार असे. शिवाय रुद्रपयागपासून केदारपर्यंत आम्ही जवळजवळ दहा हजार फूट उंच चढलो. रुद्रपयाग असेल जेमतेम २००० फूट व केदार आहे ११,७५० फूट. केदारहून मागे परतून नाला चट्टीवर आल्यावर पाच हजार फुटांवर खाली दोन हजार फूट उतरून मंदाकिनी ओलांडून परत पाच हजार फुटांवरून
उखीमठला जायचे व तेथून तुंगनाथला बारा हजार फुटांवर चढावयाचे; परत चमोलीला २००० च्याही खाली उतरायचे- असा सारखा चढउताराचा मार्ग आहे. रस्ता सुरेख आहे - म्हणजे केदारचा. बद्रीचा इतका रम्य नाही. वाटेने सारखे यात्री चाललेले असतात व समोरून येताना प्रत्येक जण 'जय केदारजीकी', 'जय बद्रीविशालजीकी' अशा घोषणेने स्वागत करतो व आपण तेच उच्चारून प्रतिनमस्कार करावयाचा अशी रीत आहे.
 आम्ही वाटेवर भेटणाऱ्या लोकांना 'तुमचा जिल्हा कोणता ?' म्हणून विचारीत असू. हिंदुस्थानच्या सगळ्या प्रांतातलेच नव्हे, तर जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांतले लोक आम्हांला भेटले. महाराष्ट्राचा तर कोंकण, देश, वऱ्हाड - नागपूर व मराठवाडा ह्या चार विभागांपैकी अगदी प्रत्येक जिल्ह्यांतला माणूस आम्हांला भेटला. उत्तर प्रदेश, पंजाब, राजपुताना, गुजरात व काठेवाडमधून, त्याचप्रमाणे बिहार व बंगालच्या सर्व जिल्ह्यांतून माणसे आली होती. दक्षिणेकडूनही लोक आले होते. ओरिसाच्या कटक व गंजम विभागातले लोक भेटले. प्रत्येक प्रांतातली भाषा वेगळी, पोषाख वेगळा, गाणी वेगळी, खाणे वेगळे. ही यात्रा म्हणजे भारताचे नित्य नवे दर्शन होते, ओरिसा व दक्षिण हिंदुस्थानच्या लोकांना भाषेमुळे बरीच अडचण पडे. बाकीच्यांना मोडकीतोडकी हिंदी येई व त्यावर निभावून जाई. सिमल्याच्या बाजूचे पहाडी लोक भेटले. त्यांचा बायकापुरुषांचा पोशाख सारखाच. म्हणजे लोकरीची विजार व वरपर्यंत गुंड्या असलेला कोट असा होता, पंजाब्यांची सलवार व खमीस, रजपुतान्यांतल्या बायकांचे घेरदार रंगीबेरंगी घांगरे, वर काचोळ्या, डोक्यावर घोंगडी, अधूनमधून तीच पदरासारखी पुढे ओढलेली, असे निरनिराळे पोशाख होते. बंगाली लोक गटागटाने आलेले दिसले. त्यांत मुंडन केलेल्या काही विधवा बायका व काही वेणीदान केलेल्या सधवा बायका खूप होत्या. अगदी तरुण बायकांनी सुद्धा मुंडन केलेले दिसले. शिवाय त्यांतल्या बऱ्याच जणी डोक्यावर पदर वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नसत. त्यामुळे पहिल्यापहिल्याने फार चमत्कारिक वाटायचे; पण एकदा अंगवळणी पडले म्हणजे त्याचे काही वाटत नाही. सोवळ्याओवळ्याचे बंडही त्यांचे मुळीच दिसले नाही. भूक लागली की सगळा तांडाच्या तांडा जिलब्या विकत घेई व रस्त्याच्या कडेला बसून हसतखिदळत, मजेत गप्पागोष्टी करीत खाई.
वन्संना हे त्यांचे वर्तन फार चमत्कारिक वाटे; कारण महाराष्ट्रात मुंडन केलेली विधवा म्हणजे एक जिवंत प्रेत वावरत असते; पण ह्या बायांना जगण्यात-निदान या यात्रेपुरता तरी-आनंद होता हे निर्विवाद. या त्यांच्या हसण्यात मलाही फार आनंद वाटे.
 ह्या यात्रेला एक मोठे गालबोट म्हणजे भिकाऱ्यांचे. वाट डोंगरी व रोजची चाल असल्यामुळे पंढरपूरच्या यात्रेसारखे भिकार लोटत नाही, पण दर गावाशी लहान मुले व मुली भिक्षा मागतात. यात्रेकरू पाहिले की हातातले काम टाकून भीक मागायला यायची. कधीकधी कामाला जाणाऱ्या पहाडी बायका भीक मागत. ह्या भीकमागेपणाचा आम्हांला फार राग येई. ही सर्व शेतकऱ्यांची मुले व बायका; ह्यांनी भीक मागू नये असे वाटे. यात्रेकरूंनीच त्यांना भीक मागायला शिकवले असे वाटते. ही एक महायात्रा असल्यामुळे निरनिराळ्या मार्गांनी पुण्य जमा करण्याचा खटाटोप चाललेला असतो.
 सर्वांत मजेदार व स्वस्त उपाय म्हणजे दोऱ्याची काही रिळे विकत घेऊन प्रत्येक भिकाऱ्याला काही वाव लांब दोरा द्यावयाचा. त्या दोऱ्यासाठी मुले-बाया सारखी कटकट करतात. 'सुई-धागा, सुई-धागा' म्हणून माग लागायची. पहिल्याने हा प्रकार काय ते आम्हांला कळेचना. मग पाहिले ता एके ठिकाणी एक लठ्ठ वाणी रीळ हातात धरून मुलाच्या हातात दोऱ्याच टोक देई व त्याला लांब जावयास सांगे व वीसपंचवीस पावलांवर दोरा तोडी. त्याचप्रमाणे वाटभर तो दोरा वाटीत होता. 'सुताला धरून स्वर्गाला जायचा' त्याचा दृढनिश्चय झालेला होता ह्यात शंकाच नाही. आंधळा, अपंग, महारोगी अशा माणसांखेरीज कोणासही काही द्यावयाचे नाही, हा आमचा निश्चय. जेवावयास करून, ताट वाढून घास घेणार तो रोज भगवी वस्त्रे परिधान केलेले लोक 'माई.जेवण वाढा' म्हणून तयार. आम्ही त्यांना काहीही दिले नाही, म्हणजे चंडीप्रसाद फार कष्टी होई. सर्व तऱ्हेच्या भिकाऱ्यांवर आमची टीका चालली असताना एकदा तो रागारागाने म्हणाला, "तुम्हांला एवढं कसं कळत नाही? तुम्ही भिकाऱ्यां वर उपकार करीत नसून ते तुमच्यावर करीत असतात! पुण्य गाठी बांधायची ही सुवर्णसंधी तुम्ही घालवलीत तर नुकसान तुमचंच आहे !" धनसिंग- वीरसिंगना मात्र आमचे म्हणणे पटे. ते म्हणत, "बाई, ह्यातला एखादा
महात्मा असेल; पण बाकी सारे भोंदू आणि किसानांच्या मुलांनी मुळीच भिक्षा मागता कामा नये. माझ्या घरी पोरांनी भीक मागितली तर त्यांना सपाटून मारून काढू !" असा रोज काही ना काही वाद चाले. रंगात आला म्हणजे धनसिंग आपल्या गावच्या गोष्टी सांगे. "तुम्ही आमच्या गावी या. सहा महिने राहिलात तरी पोटभर जेवायला घालीन, आणि पै घेणार नाही."
 "अरे, मग हा एवढ्या कष्टाचा हमालीचा धंदा का करतोस ?"
 "आम्हांला भांडी व कपडे विकत घ्यावे लागतात. त्यांसाठी रोख पैसे लागतात. वर्षांतून महिनाभर मजुरी करून पन्नास-पाऊणशे रुपये मिळवले की वर्षाची गरज भागते."
 रोजच्या बाजारात आम्हांला मीठ कमी पडायचे. चार आण्यांचे मीठ लागे, चंडीप्रसाद म्हणे, येथे मीठ फार महाग. आणि धनसिंग- वीरसिंग पण सैंपाक करताना रोज मीठ मागायचे. चंडीची रोजची खळखळ. मी म्हणाले, "दे रे मीठ, काय एवढ्या मिठासाठी भांडतोस ?" तो म्हणे, "भिकाऱ्यांना काही द्यायचं नाही आणि ह्यांनी चोपून हमाली घेऊनही ह्यांना मीठ द्या म्हणता! कंपनी माझं साल काढील !" मिठावरून गोष्टी निघाल्यावर धनसिंगाने म्हटले, "बाई, आमच्या मुलखात मिठाची फार चणचण. वर्षाकाठी नाहीतर दोन वर्षांनी एकदा भोटिये लोक मीठ, जनावरांची कातडी, कस्तुरी वगैरे घेऊन येतात. असा व्यापारी आला म्हणजे आम्ही त्याला सामोरे जाऊन भेटतो व घरी घेऊन येतो. मग दोनतीन दिवस तो व्यवस्थित खातो, पितो, आराम करतो व मग मीठ विकत देतो."
 " मिठाची किंमत काय रे?"
 " एक माप मिठाला दोन मापं तांदूळ देतो बाई ! "
 हा तांदूळ मिठाचा भाव ऐकून आम्हा सर्वांनाच फार गंमत वाटली. "अरे, जेवणाखाणाचे काही कापून घेतोस का नाही त्या भोटियाकडून ?"
 "छे छे, हे व्यापारी आमचे पिढीजाद मित्र असतात. हल्ली मी ज्यांच्याकडून मीठ घेतो त्यांचाच बाप माझ्या बापाला मीठ विकीत असे. असा किती लांबून शेकडो मैलांचा प्रवास करून, पहाड ओलांडून येतो. जायला निघाला की आम्हांला वाईट वाटते. "
 ह्या व्यापाराची आणखी विलक्षण गोष्ट अशी, की भोटियांची भाषा ह्यांना येत नाही व ह्यांची भोटियांना येत नाही. काहीतरी मोडकेतोडके
एकमेकांशी बोलतात. नेपाळी भाषा संस्कृतोद्भव, तर भोटिया तिबेटीच्या पोटातली. पोषाखातही खूप फरक असतो. पण त्या पाहुण्यांची वाट नेपाळी लोक वर्षभर चातकासारखी पाहतात!
 उतरायच्या मुक्कामला चट्टी म्हणतात. काही ठिकाणी धर्मशाळा आहेत; पण इतर ठिकाणी चट्टी म्हणजे कोणाच्या तरी मालकीची उघडी पडवी असते. पडवीच्या भिंतीशी चुली असतात. एका बाजूला मालकाचे दुकान असते. उतरायचा नियम असा, की मालकाकडून डाळ, तांदूळ, तेल, तूप, दिवेल, सरपण विकत घेतले पाहिजे. सर्व जिन्नस बरेच महाग असतात. रुपया सवा रुपया शेर तांदूळ, पण तांदूळ बारीक व स्वादिष्ट असतो. तसेच रुपया शेर गव्हाचे पीठ. गव्हाचा रवा मागितला तरी तोच भाव! 'टका शेर खाजा, टका शेर भाजा!' काय हवे ते घ्या. मसूर व तुरीची डाळ मिळते. मसूर मजुरांचे व गरिबांचे खाणे समजतात. पण तीनचार हजार फुटांपर्यंत चढले म्हणजे तूर शिजत नाही; म्हणून आम्ही मसूरच खात असू. भाजी वगैर काही मिळत नाही. बटाटे, दूध मिळते. दही दोन ठिकाणीच मिळाले. बराेबर किती घ्यावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो; पण सामानवहातुकीची मजुरी एवढी पडते. की शक्य तो दुकानात विकत घ्यावे असे आम्हांला वाटले. शिवाय जिन्नस विकत घेतले म्हणजे दुकानदारही खुशीने राहण्यास जागा देतो. धनसिंग-वीरसिंग पण रोजचा शिधा विकत घेत; पण त्याच पदार्थांना त्यांना किंमत कमी पडे. आम्हांला रुपया शेर तांदुळ मिळाला तर त्यांना बारा आण्यांना मिळे. दुकानदाराने सांगितले, की "ते मजूर; त्यांना बिचाऱ्यांना एवढा भाव कसा परवडणार? बिचाऱ्यांची मजुरी खाण्यातच संपायची! म्हणून त्यांना व तुम्हांला भाव निरनिराळा." ही व्यापाराची तऱ्हा अगदीच नवी, पण त्यातील तत्त्व आम्हांला मान्य झाले. केदारच्या वाटेवरच्या चट्टया स्वच्छ, प्रशस्त व मालक अगत्यशील होते. तर बद्रीवर लोकांना मुळाच अगत्य नाही. वन्संचे जेवण एवढेसे, चंडीप्रसाद व आम्ही दोघेही फार जेवणारे नव्हेत, म्हणून बद्री वाटेवरचे मालक रोज आम्हांला जागा देतान कुरकूर करायचे. "अरे, तुम्ही भाड्याचे पैसे घ्या." म्हटले तर त्यांना पटत नसे. बरे, एका चट्टीवर जास्त विकत घेतले, तर पुढच्या गावाला रस्त्यावरच निजायची वेळ यायची!
 चट्टीवर आले म्हणजे आज शेजार कोणाचा, म्हणून जरा कुतूहल
वाटे, बंगाली शेजारी आले म्हणजे त्यांचे खाणेपिणे, बोलणे निराळे. ही मंडळी वाटभर फक्त भात-भाजी शिजवून खात. उत्तर प्रदेशातील लोक किंवा पंजाबी असले म्हणजे ते गव्हाचे रोट करीत. कधी भात व वरण. रोटांबरोबर नेहमी वरण असायचे. शिवाय हे लोक एकदा रोट करून ठेवीत व वेळ मिळेल तसे दुधाबरोबर खात. ओरिसाचे लोक पण भातखाऊ. उत्तर रजपुतान्यातून बरेच जाट व रजपूत आले होते; ते बहुतेक रोटच खाणारे. शिवाय मोठा मुक्काम असला म्हणजे बरेच जण पुरी, भाजी, भजी, जिलबी घेऊन खात. रोजच्या कटकटी व्हायच्या, दक्षिणेकडील लोकांच्या. देवप्रयागाला पहिले भांडण झाले. एक म्हातारा मराठा वारकरी पाण्यासाठी थांबला होता. नळावर लोकांची झिम्मड होती. मी जरा रदबदली करून त्याला नळावर जागा करून दिली. त्याने बादली लावली व कोणाचा शिंतोडा उडाला म्हणून सबंध पाणी ओतून टाकले! सगळ्यांना फार राग आला. त्यांची समजूत घालता घालता पुरेवाट! वऱ्हाडकडचे एक कोष्ट्याचे कुटुंब आले होते. तो मनुष्य म्हणे, "म्हाताऱ्या, तुला सोवळंओवळं करायचं तर आलास कशाला इकडं? घरीच का नाही बसलास?" काही हिंदीत, काही पंजाबीत, काही बंगालीत सगळेच जण म्हाताऱ्याची टिंगल करीत होते. "नारायणा, विठ्ठला! तुला नाही रे दया येत!" म्हणत, एकीकडे सर्वांना रागावत तो बाजूला उभा होता. "म्हाताऱ्याचा आत्मा भुकेनं तळतळत नका ठेवू, घेऊ द्या त्याला पाणी" म्हणून विनंती केल्यावर सगळे दूर होऊन त्याला पाणी मिळाले, पण यात्राभर त्याला खास त्रास झाला असेल.
 अशीच एक कानडी बाई दोनतीनदा दिसली. ती अंग धुऊन धाबळी नेसून सोवळयाने स्वयंपाकाचे पाणी नेण्यासाठी कुडकुडत उभी असायची. सगळ्यांचे आटोपले की हिला पाणी भेटायचे. ती पाणी भरायला लागली की आंचवणारे येत, मग तर तिची धांदल उडून जाई. सगळ्या यात्रेकरूंचे खाणे आटपून, चुली विझून भांडी घासून झाली, तरी हिचा स्वैपाक चाललेला असे! शेवटच्या शेवटच्या मुक्कामांत इतकी थंडी होती, की सगळे कपडे चढवूनही अंगात ऊब येईना. ही म्हातारी धाबळी नेसूनच पाणी भरायला येते का, ते मला पाहायचे होते; पण ती मागे राहिली होती.
 मंदाकिनी, अलकनंदा वगैरेंच्या तीराने जाऊनही पाण्याची टंचाई
असे, कारण ह्या नद्या बऱ्याच ठिकाणी 'पाताळगंगा' झालेल्या आहेत. वाट चालणारा असतो नदीपासून तीन साडेतीन हजार फूट उंच. नदीचा आवाज ऐकू येतो; नदी फेसाळत जाते ते दिसत असते; पण पाणी मात्र हाताला लागत नाही! शिवाय ज्या ठिकाणी नदी जवळ असते तिथे पाणी पिण्याला योग्य नसते. उन्हाळ्यात बर्फ वितळून नद्यांतून जे पाणी वाहते ते सिमेंट कालवलेल्या पाण्यासारखे काळसर, धूसर असते. वरून डोंगरावरची राखेच्या रंगाची बारीक माती धुपून येत असते; त्यामुळे वस्त्रातून गाळूनही पाणी स्वच्छ मिळत नाही. उत्तर प्रदेश सरकारने डोंगरमाथ्यावरूनच्या स्वच्छ झऱ्यांचे पाणी ठिकठिकाणी दर दोनचार मैलांवर पिण्यासाठी बांधून आणले आहे. ह्या नळ्या रात्रंदिवस स्वच्छ पाण्याने वाहात असतात व तिथेच सर्वांची पाणी पिण्याची गर्दी उसळलेली असते. तेथे जात नाही, पात नाही, बाई नाही, पुरुष नाही, ज्याला जशी वेळ मिळेल. तसे जाऊन पाणी घ्यावे लागते.
 ह्या सगळ्या गर्दीत कुठे असभ्यपणा इतकाही आढळला नाही. एकाच ओढ्यात आंघोळ करून, भराभर वस्त्रे धऊन वाळवायची गर्दी असे. स्त्रियांच्या पुरुषांच्या आंघोळी चालत; पण कोणी बायकांची चेष्टा केला असे आढळले नाही. स्त्रीपुरुषांचे मिश्र घोळके विश्रांतीस बसत. स्त्रिया पदर काढून मुलांना प्यायला घेत. पण येणाराजाणारा वाटसरू कधी वाकड्या नजरेने बघत नसे. बऱ्याच स्त्रिया तरुण व सौंदर्यवती होत्या; पण त्यांच्याकडे पाहून टक लावणे, फिदिफिदी हसणे किंवा अश्लील हावभाव दिसले नाहीत. तुंगनाथवर एक वयस्कर बाई अंग धऊन विवस्त्र होऊन मुलाच्या हातून लुगडे घेत होती. मोठा समाज भोवती होता; पण कोणी ह्या गोष्टीची दखल विकृतपणे घेतली नाही. शिक्षण व सुसंस्कृतपणा ह्यांची फारकत लक्षात येऊन मन परत परत विषण्ण होई. पुण्यामध्ये कॉलेजात शिकणाऱ्या मुलींना जी हीण वागणूक मिळते; प्रत्येक गॅदरिंग किंवा सभेच्या वेळी मुलींना उद्देशून जे अचकटविचकट शब्द व हावभाव ऐकू येतात व दिसतात, त्यांची आम्हा दोघांना आठवण होई. पण नको, हा प्रदेश त्या आठवणीने विटाळायचा, ह्या बुद्धीने आम्ही त्याबद्दल फारसे बोलायचेसुद्धा नाही, असे ठरवले; तरीही पदोपदी ह्या विरोधाची जाणीव व्हायचीच.
 आम्ही अगस्ती कुंडाजवळ पोचलो. तिथे नदीचे पात्र रुंद होते. समाेर
केदारची रांग स्वच्छ दिसत होती. येथे जरा वेळ बसावे असे वाटत होते; पण भिकाऱ्यांमुळे तिथे उभे राहणे शक्य नव्हते. नेहमीच्या भिकाऱ्यांखेरीज पावती फाडून वर्गणी गोळा करणारेही आता भेटू लागले. ठिकठिकाणच्या प्राथमिक शाळांचे चालक वाटेतच टेबल मांडून बसत व शाळेसाठी पैसे मागत. इतक्यांना पैसे कोठून द्यावे व का द्यावे हा मोठा प्रश्न पडे. आम्ही हिशेब केला. दर वर्षी ५० हजार ते एक लाख यात्री बद्री व केदारला येतात. अगदी पन्नास हजारांचाच हिशेब धरला तरी प्रत्येक यात्रेकरू यात्रेसाठी अगदी कमीत कमी शंभर सवाशे रुपये खर्च करीत असणार. त्यातले पन्नाससाठ मजुरांचे गेले तरी निदान माणशी पन्नास रुपये या दोन अरुंद विरळ वस्तीच्या खोऱ्यात तो खर्च करतो. म्हणजे एप्रिल ते ऑगस्टपर्यंत पंचवीस लाख रुपये येथल्या लोकांना-चट्टीवाले, दुकानदार, पंड्ये वगैरे लोकांना मिळतात. ह्या पैशांवर स्वतःच्या जिल्ह्याची स्थिती का सुधारता येऊ नये? प्रतिवर्षी एवढे उत्पन्न पाच महिन्यांत-खरोखर तीन महिन्यांतच जास्त उत्पन्न असते-मिळत असताना अशी हीनदीन भिकारी वृत्ती का? वाटेवर भेटलेल्या प्रत्येक मुलाने भीक का मागावी? महाराष्ट्राच्या मानाने ह्या लोकांचे खाणे सकस; शेती कष्टाची खरी, पण वस्ती विरळ व दर वर्षी हकमी उत्पन्न. काहीतरी चुकते आहे! आमचा हिशेब चुकत असला पाहिजे, की हिंदू लोकांना भीक मागण्याची लाजच नाही?
 अगस्ती कुंडाजवळून दरीचा एक फोटो काढला आणि पाठीमागे लागलेल्या मुलांना चुकवीत पुढे चालू लागले. चंडीप्रसादला पकडून कॉलऱ्याची टोच दिली म्हणून पुढे एक दिवस मला सैंपाक करावा लागला. यात्रा-कंपनीने ही व्यवस्था आगाऊ करून ठेवावयास पाहिजे होती.
 गाव संपल्यावर शांतपणे परत प्रवासास सुरुवात झाली. तेथून तीनचार हजार फूट चढून गुप्त काशीला जावे लागते. तेथे थांबून वन्संना दर्शन करवले व पुढे निघालो. तेथून केदारपर्यंतचा प्रवास फारच आनंदाचा झाला. रोज दुपारी पाऊस पडायचा. पायांखाली रस्ता ओलसर व थंड असे. हवेत धूळ मुळीच नाही. हिमालयाची दरी रोज नवी दृश्ये दाखवी. रोज नवीनवी फुले, वृक्ष दिसत. थोडे आम्हांला ओळखता येत. बहुसंख्य माहीत नसलेले होते. गवतावर रानटी स्ट्रॉबेरीची फुले व फळे आलेली होती.
व्हायोलेटना तोटा नव्हता; पण फूल मोठे असूनही वास नव्हता आणि रंगानेही गडद नसून आल्प्स पर्वतातल्या व्हायोलेटप्रमाणे निळे पांढुरके होते. होडोडेंड्रॉनच्या वृक्षांना बहर येऊन गेला होता. सुकलेली फुले मात्र दिसत होती, म्हणून हळहळ वाटली. पण जसजसे वरती गेलो तसतसे फुलांच्या बहारातलेही वृक्ष दिसले. रोज नवे नवे पक्षी दिसत होते, शांतपणे रस्त्यावर उभे राहून दुर्बिणीने त्यांना न्याहाळता येत होते. फुले गोळा करावयाची हा तर रोजचाच उद्योग होता. ती एका लहानशा रोजनिशीत दाबून ठेवली होती व मग डेहराडूनला गेल्यावर एका वनस्पतिशास्त्रज्ञाकडून त्यांची ओळख पटवून घेतली. काही नानाफुलांचे कंद उकरून बरोबर घेतले व ते पोस्टाने पुण्यास धाडून दिले. त्यांतल्या काही वनस्पती जगल्या आहेत; पण हिमालयातल्या झाडाला पुण्यात फुले धरतीलसे वाटत नाही.
 वाट चालताना कधी परस्परांत, कधी यात्रेकरूंबरोबर संभाषण होई, तर बरेच वेळा काही न बोलताच तासन् तास चालत असू. एकदा असेच चालताना मी सहज विचारले, "समुद्राच्या तळाशी काय असतं, कधी पाहिलं आहेस?" तो फक्त हसला व त्याने भोवतालच्या देखाव्याकडे हात दाखवला. आमच्या दोघांच्याही मनात तेच विचार चालले असले पाहिजेत. सध्या हिमालय आहे तेथे फारफार पूर्वी एक मोठा समुद्र होता. पृथ्वीच्या पोटात व त्यामुळे पाठीवरही भयंकर उलथापालथ होऊन समुद्राचा तळच्या तळ उचलला गेला व तो हिमालयपर्वत! हिंदुस्थानातला हा सगळ्यांत नवा पर्वत. हे बाळ अजून उंचउंच वाढत आहे! ह्या उलथापालथीच्या वेळी पोटातली आग उसळून वरती येत होती व तिचा निरनिराळ्या थरांशी संबंध येऊन निरनिराळ्या तऱ्हेचे रूपांतरित दगड बनत होते. ह्या दगडातूनच अग्निरसात भस्म झालेल्या द्रवाची राख सगळीकडे दिसून येते. हीच हिमालयातली राखट रंगाची माती. ही ठिसूळ असते व पावसाळ्यात दगडांचा ढिगारा घेऊन कोसळते. असे कोसळलेले कडे ठिकठिकाणी दिसून येतात. दरवर्षी कडे कोसळल्यामुळे ठिकठिकाणी पूल व रस्ता कोसळतो व तो दर वर्षी यात्रेच्या आधी दुरुस्त करावा लागतो. काही वर्षांपूर्वी कोसळलेल्या टिकाणातून अरुंद वाट गेलेली असते. कोसळलेला कडा एखाद्या थिजलेल्या प्रवाहासारखा दिसतो. ठिकठिकाणी प्रचंड शिळा अर्धवट खाली येऊन वरच्यावर लोंबत असतात. कधी डोक्यात पडतील ह्याचा नेम
नाही. उन्हाळ्यात त्या पडण्याचा फारसा संभव नसतो; पण पाऊस रोजचाच असल्यामुळे एखाद्या वेळी कडा कोसळला तर नवल नाही. इकडचे लोक हिमालयाला कच्चा पहाड म्हणतात ते यामुळेच.
 यात्रेला उन्हाळ्यात जावे का पुढे जुलै-ऑगस्टमध्ये जावे, ह्याबद्दल पुष्कळ मते ऐकली होती. एप्रिलमध्यापासून जूनमध्यापर्यंत अतिशय गर्दी होते. पुढे मुख्य यात्रा संपून निवांतपणा मिळतो. झाडांना दाट पाने येऊन सगळीकडे हिरवेचार दिसते. पण पावसामुळे वाट ठिकठिकाणी कोसळायचा संभव असतो. साधारणपणे एप्रिल बारातेराच्या सुमाराला केदारला पोचण्याचा बेत ठेवला तर गर्दी नसते. थंडी वरतीवरती बरीच लागते; पण हे दिवस ऐन वसंतऋतूचे असल्यामुळे ज्याला गवतातली फुले, ऱ्होडोडेंड्रॉन वगैरे शोभा पाहावयाची त्याला उत्तम, शिवाय वसंतऋतूत पक्षी हिमालयात यावयास सुरुवात करतात. झाडांना पाने फारशी नसल्यामुळे दुर्बिणीतून ते नीट पाहता येतात. हिवाळाभर निजलेली सृष्टी वसंतात हळूहळू डोळे उघडते, ते दृश्य फार मनोवेधक असते. एकीकडे हिवाळ्याचे बर्फ पडलेले असते; तर बर्फाच्या कडेला झरणाऱ्या पाण्यातून असंख्य रानफुले उमललेली असतात. आम्हांला तरी हिमालयातील वसंतऋतू हृद्य वाटला.
 सारखे 'हिमालय हिमालय' म्हणते आहे; पण खरे म्हणजे आम्ही हिमालयात प्रवेश केला नाहीच. केदारनाथाशी हिमालयाच्या एका पर्वताचे जवळून दर्शन झाले. तुंगनाथावरून हिमालयाच्या रांगा दुरून पाहिल्या प्रत्यक्ष हिमालयावरील अक्षय हिमाच्छादित शिखरावर आम्ही पाऊल ठेवले नाही. आम्ही फक्त दारापर्यंत जाऊन डोकावून आलो, इतकेच. ह्या डोंगरांना शिवालकचे डोंगर म्हणतात. शिवालक म्हणजे शिवाचे केस. शिवाचे डोके कुठे उंच आकाशात असेल! पर्वताच्या ह्या लांबलांब रांगा म्हणजे जाडजाड जटा व त्या बटाबटांतून मंदाकिनी, अलकनंदा, भागीरथी वगैरे अनंत प्रवाहांनी गंगा झरत खाली येते… मला वाटते, आपले अनुभव सांगण्यासाठी तोंड उघडू नये, लेखणी हाती धरू नये. ज्यांनी हिमालयाच्या दृश्यावर भगीरथाची कथा रचली; ज्यांनी ह्या डोंगरांना शिवालक म्हटले, त्या प्रतिभासंपन्न लोकांपुढे इतर कुठलाही प्रयत्न क्षुद्रच ठरणार! जसजसे केदारच्या जवळजवळ जात होतो, तसतसा देखावा जास्तजास्त भव्य होत होता. झाडी पण दाट झाली. ठिकठिकाणी डोंगरांवरून बर्फ दिसू लागले.
एके ठिकाणी सबंध घळ बर्फात बुडालेली होती व त्यातूनच वाट गेली होती. ती पंचवीस पावले बर्फातून जायला सर्वांनाच मोठी हौस वाटली. धनसिंगवीरसिंगनी मुठीमुठी घेऊन बर्फ खाल्ले ! हे बर्फ म्हणजे मोठेमोठे खडे नव्हते, तर बारीक रव्यासारखी भुकटी होती व ती चिमटीने किंवा मुठी भरून उचलता येई. मोठा चढ चढून रामवाड्याला आलो. हे ठिकाण जवळजवळ नऊ हजार फूट उंच आहे. येथे गावाबाहेरच्या डोंगरावर ठिकठिकाणी बर्फ पडले होते. थंडीही खूप होती; पण यात्रेकरू आनंदात होते. केदारनाथाचा घोष जोरात होई. जसजसे पुढे जात होतो तसतसे परतणारे लोक भेटत होते. परतताना ते बद्रीनाथाचा पण जयजयकार करीत. आम्ही केदारबाबाचेच नाव घेत असू. मौज अशी, की चालणारे लोक मोठ्या आनंदात असायचे. दमले की कडेला बसायचे, दम खायचा, गप्पा मारायच्या, भूक लागली असल्यास खायचे, येईलजाईल त्याला देवाच्या नावाची ललकारी द्यावयाची, अशी चालणाऱ्यांची रीत होती; तर मेण्यातले व कंडीतले लोक फारसे हसतमुख दिसायचे नाहीत की कधी कोणाला अभिवादन करावयाचे नाहीत. मला वाटते हिमालयाची शोभा त्या बिचाऱ्यांना फारशी दिसतच नसेल. एकदा आमच्यापुढे मेण्यात बसून एक तरुण मुलगी चालली होती व वरखाली इकडेतिकडे न पाहता सारखी पुस्तके वाचीत होती. जाताजाता पाहिले तो मराठी कादंबरी दिसली! एकदा एक मनुष्य दिसला, त्याच्या हातात गजराचे घड्याळ होते. चट्टीवर पांचच्या पुढे निजू म्हटले तरी शक्य नसते, इतकी सर्वांची गडबड व धांदल असते; मग ह्याला गजराचे घड्याळ कशाला लागत होते कोण जाणे!
 केदारच्या वाटेवरचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ह्या रस्त्यावर शेळ्यामेंढ्यांची वाहतूक कमी प्रमाणात असते. बद्रीच्या वाटेवर माणसांइतक्याच शेळ्यामेंढ्या जातात. बद्रीवरून व जोशीमठावरून दोन वाटा तिबेटात गेल्या आहेत व म्हणून भारत व तिबेटातील व्यापाऱ्यांची ये-जा ह्या मार्गाने अतिशय आहे. शेळ्या, मेंढ्या, घोडी व याकसारखी दिसणारी केसाळ ठेंगणी जनावरे सारखी माल वाहून नेतांना दिसतात. शेळ्या-मेंढ्या आपल्याकडील जनावरांपेक्षा दिढीने तरी उंच असतात व त्याच्या पाठीवर उजव्या-डाव्या बाजूंना पाच ते दहा शेर धान्य किंवा बटाटे भरलेल्या लोकरीच्या पिशव्या असतात. पहिल्यापहिल्याने ह्या कळपांचे
नावीन्य व कौतुक वाटते; पण पुढेपुढे त्यांचा फार अडथळा होतो. एकदा त्यांची लांबलचक रांग लागली म्हणजे संपत नाही! त्यांना व त्यांना हाकणाऱ्यांना यात्रेकरूंचा उपद्रव वाटे व आम्हांला त्यांचा वाटे.
 रामवाड्याच्या पुढे तीन मैल खडा चढ आहे. वाट नदीच्या तीरातीराने सारखी वर गेलेली, अरुंद, ठिकठिकाणांहून पाझरणाऱ्या झऱ्यांपुढे चिखल झालेली अशी आहे; पण थंडी असल्यामुळे चालण्याचे श्रम वाटत नव्हते. जसजसे उंच चढलो तसतसे वृक्ष नाहीसे झाले व सगळीकडे गवताचा गालिचा अंथरला गेला. त्या गवतावर सगळीकडे पाण्याचे ओहोळ वाहत होते व असंख्य फुले उगवली होती. केदारनाथाच्या पूजेला हीच फुले आम्हांला मिळाली. मंदिराचा कळस लांबून दिसतो. अर्धा मैल एक अरुंद खोरे चालून जावे लागते. गवतातून घाटी बांधून मार्ग केला आहे. मंदाकिनीचा पूल ओलांडून दुसऱ्या तीरावर उन्हाळ्यापुरते गाव वसलेले आहे. भाविक लोक त्या बर्फाच्या पाण्यात अंग धूत होते. आम्ही पंड्याने दिलेले ऊन पाणी घेऊन उघड्यावरच आंघोळ केली. त्याने ऊब नाहीच आली; पण निदान अतिशय गारठलो नाही. सर्वजण देवळाकडे गेलो, देवळाच्या मागेच वीस हजार फूट उंचीचा हिमपर्वत उभा आहे व सतोपंथ नावाची हिमनदी आहे. ह्याच मार्गाने पांडव वर चढत गेले असे म्हणतात.
 देवळात स्वयंभू पिंडी म्हणजे एक प्रचंड ओबडधोबड शिळा आहे. तिला दोन्ही हातांनी कवटाळून भेट द्यावयाची असते. भेटीआधी पिंडीवर तूप लावावयाचे असते. दर्शन घेऊन परत आलो. घरांच्या छपराखाली आदल्या हिवाळ्यातील बर्फाच्या शिळा अजून पडल्या होत्या. आकाश पहिल्याने निरभ्र होते, पण मग ढग यावयास लागले. काही खाऊन मग परतावे असा विचार केला, पण जिन्नस अगदीच वाईट होते. दिनूचे डोके भयंकर दुखू लागले; म्हणून फारसे इकडेतिकडे न करता उतरलो. अर्धी वाट उतरल्यावर डोके दुखणे अजिबात थांबले. इतक्या उंचीवर गेल्याचाच तो परिणाम असावा. मला व वन्संना वरती काही झाले नाही; पण खाली आल्यावर मात्र कसेसेच व्हावयास लागले. ताजे जेवण कसेबसे खाल्ले व मग मात्र बरे वाटू लागले. हा अनुभव पुढे तुंगनाथला किंवा बद्रीला आला नाही. मला वाटते, तोपर्यंत आम्हांला हिमालयाच्या उंचीची सवय झाली.
 परतताना अर्धी वाट जाऊन मंदाकिनी ओलांडून अलकनंदेच्या
खोऱ्यात जावयाचे असते. वाटेत तुंगनाथाचे शिखर ह्या यात्रेत सर्वांत उंच असे आहे. तेथे जायचे आम्ही ठरवले. तिकडे जाताना काही पंजाबी मंडळी भेटली. ह्यांच्यातली एक बाई फार गोड बोलणारी होती. ती सर्व बद्रीला पोचेपर्यंत आमच्या थोडी पुढेमागे असत व रोज भेटत. ती बाई म्हणत होती, "कोई यात्रा धनसे करते हैं, कोई मनसे, और कोई तनसे." "म्हणजे काय?" महामंडलेश्वर यतींचा लवाजमा त्याच वेळी केदारच्या वाटेवर चालला होता व आम्ही कडेला उभे राहून त्या मेण्यात बसलेले श्रीमान धनी व शिष्यमंडळी पाहात होतो. त्यांच्याकडे बोट दाखवून ती म्हणाली. "ही पाहा धनाच्या जोरावरची यात्रा. तुम्ही व आम्ही शरीरबळ व थोडे द्रव्य ह्या बळावर करतो आहोत आणि ज्या बिचाऱ्यांना धनही नाही आणि तनही नाही ते घरीच बसून मनाने यात्रा करीत असतात." ती रोज गमती-गमती सांगायची, गाणी पण खूप म्हणायची. मला आता एकच आठवते. त्याची सुरुवात होते- "गंगा महाराणी मय्या" महाराणी आणि आई ही संबोधने एकाच गंगेला दिलेली ऐकून मला गंमत वाटली.
 दुसरी एक बाई कर्कश गळ्याने आमच्या चट्टीत भजन करीत होती- "मन मोथनु भवु तारो" सर्वच आकारान्त शब्द उकारान्त करण्याची लकब पाहून मला नवल वाटले. ती पूरबियांपैकी होती. पूर्वेकडील हिंदी जिल्ह्यांत अशी बोली आहे की काय कोण जाणे. एक दिवस आमच्या ह्या वाटेवर केदाराकडे जाणारी एक बाई दिसली. तोंडाने ती 'जय सीयाराम' जय सीयाराम' असे म्हणत चालली होती; तुलसीदास रामायणात सीता शब्द सीया ह्या रूपात मी वाचला होता; पण बोलभाषेतही तो असेल, अशी जाणीव त्या वेळी मला झाली नव्हती.
 हिंदूंची दैवते निरनिराळी, भाषा निरनिराळ्या; पण यात्रेच्या ठिकाणी एकाच भावनेने सर्व गोळा होतात. सबंध भारतावर इंग्रजांआधी कधीही एकछत्री राज्य नव्हते; पण भारताच्या एकपणाची जाणीव व भारताच्या सीमा हजारो वर्षे ठरवल्या गेल्या होत्या. हा एकपणा व या सीमा एकराज्याच्या निदर्शक नसून एका संस्कृतीच्या- हिंदू संस्कृतीच्या-निदर्शक आहेत. त्या सीमांवर सर्व हिंदूंना पूज्य अशी देवस्थाने आहेत; आणि त्यांचे संबंधही मनात इतके रुजले आहेत, की, हिमालयावर गेले की कन्याकुमारीची वा रामेश्वराची आठवण येते. जगन्नाथला गेले की द्वारकेला
जावेसे वाटते. भाषांचा, वंशांचा, पोशाखांचा भिन्नपणा कधीही ह्या एकत्वाच्या जाणिवेच्या आड येत नाही. उलट अनेकांतून एकत्व, विविधतेतून साम्य हा आमच्या संस्कृतीचा गाभा आहे. हल्ली मात्र राजकारणी पुरुषांना अनेकत्वाची व विविधतेची भीती वाटू लागली आहे ! सांस्कृतिक आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत केंद्रीकरण करण्याची धडपड चालू आहे. ही धडपड सांस्कृतिक मूल्यांसाठी नसून सत्तेचे केंद्रीकरण करण्यासाठी आहे, असे वाटते.
 मंदाकिनी ओलांडून पोथीवासाला येऊन पोचलो, तेव्हा दिवस चांगला वर होता, दिवसभर जरा निर्जल प्रदेशातून चाललो होतो. त्यामुळे पोथीवासा फार रम्य वाटले. गावाच्या तीनही बाजूंना उंच डोंगर, मधल्या खबदडीत सर्व बाजूंनी खळखळ झरे वाहत होते व त्यांतच गाव बसले होते. खाली असते तर कदाचित उकडले असते; पण आम्ही बऱ्याच उंचावर- सात-आठ हजार फुटांवर तरी आलो होतो; म्हणून गारवा चांगला होता. गावात शिरल्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी आधी जागा शोधली. एक लांबच लांब घर मिळाले. आधी आलेली मंडळी मराठीच होती व एका कोपऱ्यात आम्हापुरती जागा होती. तिथे मालकी शाबीत करण्यापुरते गाठोडे टाकले. समोरच्या घरवाल्याच्या दुकानात चहा-कॉफी प्याल्यावर शीण गेला. तेथून घोडी घेऊन तुंगनाथला जायचा बेत केला होता.
 गावाला वेढा देऊन जे डोंगर उभे होते तेच आम्हांला उद्या चढायचे होते. म्हणजे पाणलोट ओलांडून आम्ही अलकनंदेच्या खोऱ्यात पोचणार. अजून तरी इथले ओढे-नाले मंदाकिनीला मिळणारे होते. आम्ही केदारनाथच्या राज्यातच होतो.
 वरून रिकामी घोडी खाली येत होती; पण कोणी घोडेवाला दुसऱ्या दिवसाचा वायदा करावयास तयार होईना. पोथीवासाहून तुंगनाथ सारा साडेचार मैल होता व तेवढ्याचे पैसेही फार मिळायचे नाहीत. सर्वांची आशा ग्वालियाबगड किंवा उखीमठ येथून स्वाऱ्या मिळाल्या तर पाहाव्यात. रात्र पडू लागली. वन्सं व हमालही येऊन पोचले; आणि बाहेर थंडी पडू लागली म्हणून शेवटी घरात गेलो. चंडीप्रसाद बड्या माताजींसाठी चहा आणायला गेला. तो म्हणाला, "मी बघतो घोडी, तुम्ही स्वस्थ असा." आज चाल मोठी व चढाची झाली म्हणून गडी पण दमले होते. ऊन लागूनलागून
वन्संही हैराण झाल्या होत्या; म्हणून दूध पिऊन व फराळाचे खाऊन निजायचा बेत केला. गड्यांनी खिचडी करून खाल्ली. शेजारच्या मंडळींचा स्वयंपाक चालला होता; त्यांच्याशी गप्पागोष्टी सुरू झाल्या. ती वऱ्हाडची होती. दोनतीन कुटुंबे सोबतीने आली होती. त्यांच्या पलीकडे आणखी दोघे प्रवासी होते. बायको मलेरियाने आजारी होती. ताप नसेल त्या दिवशी पॅल्युड्रिन घ्यावयाचे व पुढे जायचे; ताप भरला म्हणजे धर्मशाळेत पडून राहावयाचे, असा त्यांचा क्रम चालला होता. बाई मला फारच थकलेली दिसली. केदार करून आमच्याप्रमाणेच मंडळी बद्रीला चालली होती. शेवटी यात्रा पूर्ण केली की नाही कोण जाणे! बहुतेक केली असेल; कारण 'देह जावो अथवा राहो, यात्रा पार करायचीच,' असा ह्या लोकांचा निर्धार असतो.
 इतर मंडळी बरीच बोलकी होती. यात्रा असली म्हणजे मनुष्य काय काय करतो याबद्दल गोष्टी निघाल्या. वन्सं म्हणत होत्या. "घरी चहा फार तर दोनदा घेत असे; पण इथं शोष पडतो. मुलं म्हणतात, चहा घे- पेला भरभरून पुढं करतात, घेते मग. मुक्कामाला आलं की रोज तेलानं पाय चोळायचे बसल्या बसल्या. घरी का कुणी देहाचे एवढे उपचार करतं!" त्या बायांनी व पुरुषांनीही होकार भरला. "अंगात गरम लोकरीचं, डोकीला गरम पट्टा असं पुरुषांच्या बरोबरीनं कधी कुणी गावात जाईल का? पण इथं तर आता तो प्रकार रोजचाच!" त्या बाया म्हणाल्या.
 गा एकीने सर्वांचे बूट आवरता आवरता म्हटले, "अहो उभ्या जन्मात कधी बूट घालून जाईन असं स्वप्नातसुद्धा आलं नव्हतं. पण आता आपलं पुरुषासारखं बूट-मोजे घालून रोज चालतो. ते बूट घालायचे कसे हेसुद्धा माहीत नव्हतं. अन् अजून पण रोज घोटाळा होतो!" आम्हांला सर्वांनाच हसू आले. यात्रेत प्रत्येकाच्या पायांत बूट, पण घालण्याच्या तऱ्हा मात्र निरनिराळ्या. उजव्या पायाचा डाव्यात, डाव्याचा उजव्या पायात असे बूट घालणारे आम्हांला आढळले होते. उत्तर हिंदुस्थानचे लोक बूट नीट घालीत; पण दक्षिणेकडच्या व बंगाली बायांना व माणसांना ते जमत नसे. शेवटी त्रासून बूट फेकून द्यावयास निघालेली बाई दिसली. एका यात्रेकरूने अंगठ्याजवळचे कापड फाडून अंगठ्याला मोकळीक करून दिली होती, तर एकाने अंगठा व शेजारचे बोट ह्यांमध्ये एक पट्टी ठेवन पुढचा सबंधच बूट
वरून कापून काढला होता! बुटाचे बंद बरेचजण बांधीतच नसत. यात्रेला निघाले की हृषीकेशला काठ्या व बूट खरेदी करीत. त्यांतल्या बहुतेकांनी तोपर्यंत कधी बूट पायात घातलेलेच नसत व मग अशी त्रेधा होई !
 रात्री पाऊस पडत होता, थंडी पण बरीच पडली होती. आम्ही उतरलो होतो ती धर्मशाळा नेहमीप्रमाणे पडवी नसून चांगले पक्के बांधलेले लाकडी दरवाजाचे घर होते. दार घट्ट लागले तेव्हा बरी ऊब आली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो. चंडीप्रसादने सांगितलेले दोन्ही घोडेवाले आपापल्या जनावरांना घेऊन येऊन तणतणत भांडत होते. शेवटी त्यांना तसेच सोडून आम्ही दोघे झपाट्याने पुढे निघालो. त्यांच्या भांडणामुळे निघायला जवळजवळ तासभर उशीर झाला. "नाही तुंगनाथ पाहिला म्हणून काही एवढं बिघडत नाही. जे पाहिलं आहे तेसुद्धा असामान्यच नाही का?" असे मी म्हटले; पण मनातून मी फार खट्टू झाले होते, तो काहीच बोलला नाही.
 दाट रानातून मार्ग होता. पक्षी सारखे बोलत होते; पण एखादाच क्वचित दृष्टीस पडे. दोन पक्षी सारखे एकमेकांना साद देत होते. त्यांच्या बोलांवरून कोकिळेच्या जातीचे (परभृत) असावेत असे वाटले; पण प्रयत्न करूनही दृष्टीस पडेनात. सबंध रान मात्र त्यांच्या बोलांनी निनादून गेले होते. वाटेत एक पहाडी इसम भेटला. त्याला विचारले, "हा बोलतो आहे तो पक्षी कोण?" त्याने जरा कान देऊन ऐकले व म्हटले, "कुणा बिचाऱ्या मेलेल्याचा आत्मा आक्रोश करतो आहे !" ही कल्पना ऐकून मी चकितच झाले. त्याला आणखी काही विचारीन तर तो कधीच झपाट्याने पुढे गेला होता! पोथीवासाभोवतालची डोंगराची साखळी आम्ही जवळजवळ ओलांडली होती तो वरून खाली रिकामे घोडे येताना दिसले. "येणार का तुंगनाथाला? काय घ्याल?" "चार रुपये." "ठीक, चला" आम्ही घोड्यावर स्वार होऊन पुढे सटकलो. आता खास तुंगनाथ भेटणार ह्या विचाराने आमची मने हिमालयापेक्षाही उंच झाली!
 काही मिनिटांतच चढ चढून वर एका पठारावर आलो. समोर तुंगनाथाचा डोंगर तीन हजार फूट उंच उभा होता. त्याच्या पायथ्याला वळसा घालून चमोलीची वाट गेली होती. वन्सं मागे होत्या. त्या त्या वाटेने जाणार होत्या. आम्ही तुंगनाथ चढून, दुसऱ्या बाजूने उतरून त्यांना मिळणार होतो. पायथ्याच्या-आम्ही उभ्या असलेल्या बाजूच्या गावाचे नाव चौपता.
 येथे आम्हांला हिमालयाची एक सबंध रांग पहिल्याने दिसली. सूर्य नुकताच वर आला होता. हिमाच्छादित शिखरे गुलाबी रंगली होती. हिमनद्या चमकत होत्या व साधारण बारा-चौदा हजार फुटांवर आल्या की बर्फ वितळून त्यांच्यातून हजारो ओहोळांनी पाणी खाली धावत होते. किती पाहिले तरी पुरे वाटत नव्हते ! शेवटी उशीर होईल म्हणून निघालो व एका रम्य राईतून चढणीला आरंभ केला. इतक्या उंचीवर झाडांचे शेंडे हिमाने कोळपून काळे पडतात. खाली वसंतऋतूतील हिरवी-पोपटी पालवी व वरती काळा झालेला, शेवाळलेला, वेडावाकडा वाकलेला झाडाचा शेंडा असे दृश्य दिसत होते. खालच्या हिरवळीत नाना तऱ्हेची फुले उमललेली होती; पण आज आम्ही घोड्यावर असल्यामुळे ती तोडणे शक्य नव्हते.
 हळूहळू मोठ्या पानांची झाडे जाऊन चाडसारखी सूचिपर्णी झाडे आली. चढ एवढा झाला, की घोडी दर वीस-पंचवीस पावलांनी विसावा घेण्यास थांबू लागली. अर्धी वाट चढल्यावर उतरून घोड्यांना विश्रांती दिली. झाडांचा प्रदेश संपला होता. आता फक्त हिरवे गवत व झुडुपेच होती. खालच्या उतरणीवर ऱ्होडोडेंड्रॉनचे वृक्ष होते. त्यांना फुले येऊन गेली होती व कुठे चार-दोन ताजी फुले शिल्लक राहिलेली व बाकीची सुकलेली, म्हणून आम्ही अगदी हळहळत होतो. पण येथे साडेदहा अकरा हजार फुटांवर गेलो तो ऱ्होडोडेंड्रॉनची झुडुपेच दिसली व सर्व ताज्या टवटवीत फुलांच्या गुच्छांनी भरली होती! खाली फुलांचा रंग गडद तांबडा, तर येथे निळसर जांभळा व पांढुरका असा होता. आणखी वर गेलो तर झुडुपेही नाहीशी झाली! काळेभोर दगड जिकडेतिकडे पसरलेले होते पोथीवासापासून तुंगनाथाला येईपर्यंतच्या चार मैलांवर दोन ऋतू व पृथ्वीवरील निरनिराळे अक्षांश ह्याचे दर्शन पुन्हा एकदा झाले. वर प्रदेश निर्वृक्ष होता तरी निर्जल नव्हता. प्रत्येक कपारीतून खळखळ पाणी वाहात होते. काही ठिकाणी चिखल झाला होता.
 पर्वताच्या माथ्याजवळ जाऊ लागलो, तसतसे यात्रेकरू वाटेवर बसून एकावर एक दगड रचताना दिसले. येथले दगड गोटे नसून सपाट कपच्या कपच्या निघालेले असे होते. त्यातील दोन उभे करून त्यांवर तिसरा आडवा ठवायचा, अशी लहानलहान एक किंवा दुमजली घरकुले लोक बांधीत हात. हे काय म्हणून विचारता त्यांनी सांगितले. 'पितरांसाठी घरे!' तुंगनाथवर पितरांसाठी घर बांधावे व दान करावे असे आहे. पाहिले तो वाटेच्या दोन्ही
बाजूला पितरांची चिमुकली घरे हारीने उभी होती! कोणाकोणाची पितरे बसली होती कोण जाणे! आम्ही जिवंत माणसे ह्या मेलेल्यांच्या नगरीतील राजमार्गाने चाललो होतो. पूर्व भारतातील जंगलात राहणाऱ्या काही जमाती मृतांचे अशा तऱ्हेचे स्मारक प्रचंड शिळा उभारून करतात. अशी स्मारके करणारे लोक पूर्वी युरोपपासून भारतापर्यंत पसरलेले होते असा संशोधकांचा दावा आहे, त्यांचेच तर हे अवशेष नसतील ना? एका मराठी लोकगीतात दगडांची रास करण्याचा उल्लेख आहे- "असा पुतूर इमायनी, रची दगडाच्या टिमायनी." का रचीत होता कोण जाणे ! एकदा मी जेजुरीला गेले होते. तिथे कडेपठाराच्या देवळाला जाताना वाटेत दगडांची रास आहे, त्यावर प्रत्येकाने दगड टाकायचा असतो; म्हणून मी व माझ्या बरोबरच्या बाईने दगड टाकलेले आठवतात. ह्या राशी का रचायच्या, ह्याबद्दल मात्र कोणी काही सांगितले नाही.
 रोजच्याप्रमाणे ढग यायला सुरुवात झाली. वाटेत वेळ मोडणे शक्य नाही म्हणून पितरांच्या घरांचा फोटो काढण्याचे मनात असूनही पुढे सटकलो. लौकरच देवळाजवळ पोचलो. एका पंड्याच्या अंगणात घोडी उभी राहिली. आम्ही उतरलो व पंड्याला सांगितले, की फोटो काढून मग पुढचे बोलू. तसे त्याने फोटो काढण्यास योग्य अशा एका उंचवट्यावर आम्हांला नेले. आम्ही हिमाच्छादित रांगांपासून जरा दूरवर असलेल्या एकाकी शिखरावर उभे होतो व समोर गंगोत्रीपासून बद्रीनाथपर्यंत लांबच लांब पसरलेली पर्वतांची रांग दिसत होती. तेरा ते चौदा हजार फूट उंचीचे लांबच लांब एक पठार होते. त्यावर दाट बर्फ पडलेले होते व त्यातील घडीतून हिमनद्या वाहात होत्या. त्या खाली आल्या की काळ्याभोर दगडांतून पाण्याच्या प्रवाहरूपाने शतधारांनी वर्षत होत्या. बर्फाच्छादित पठारावर अधूनमधून उंच उन्हात चमचमणारी वीस ते बावीस हजार फुटांपर्यंत गेलेली प्रचंड शिखरे दिसत होती. केदार, चौखंबा, नीलकंठ अशी त्यांची नावे. चौखंबा हा चार शिखरे मिळून बनलेला एक हिमपर्वत आहे, एखाद्या देवळासारखा दिसतो. पांढरेशुभ्र चमकणारे हिमाच्छादित पर्वत, खालच्या कडेला भयानक, काळेभोर, गवताचे पानसुद्धा नसलेले मोठेमोठे कडे, त्याच्या खाली हिरव्या गवताने अंथरलेल्या वरच्या उतरणी, त्या खाली वृक्षराजींनी झाकून टाकलेल्या
पर्वताच्या खालच्या उतरणी व सर्वांच्यावर चमचमणारे, स्वच्छ निळे आकाश डोळ्यांत साठवले. फोटो काढता काढता भराभर ढग येऊन समोरचे दृश्य नाहीसे झाले. अधूनमधून एखादा पर्वत दिसे; पण चित्रांतला बारकावा नाहीसा झाला. आणखी फोटो काढणे शक्य नव्हते, म्हणून कॅमेरा बंद केला.
 "आपले फोटो काढून झाले; आता ज्या स्थानी आलात, त्याचा आदर करणे योग्य नाही का?" आमच्याबरोबरच्या पंड्याने विचारले. "ठीक आहे; पण काय तुमचे विधी असतील ते लौकर आटपा; आम्हांला पुढे दहा मैलांची चाल आहे." "चला तर मग माझ्याबरोबर; आधी कुंडात हातपाय धुऊन शुद्ध होऊ." जाताजाता त्याने ताजी पुरीभाजी करण्याचा निरोप घराशेजारच्या दुकानदाराला सांगितला व आम्ही कुंडाशी गेलो. हातपाय, तोंड धुतले तर कळा लागण्याइतके पाणी थंड होते. तरी भाविक लोक स्नान करीत होते व स्नान करून गारठलेल्या यजमानांना हात धरून पंडे लोक रसरसलेल्या शेगड्यांशी नेऊन बसवीत होते. पंड्याने संकल्प सांगितला व आम्ही दक्षिणा देऊन देवळाच्या वाटेला लागलो.
 पंड्याने सांगितल्याप्रमाणे देवांच्या पुढे पैसापैसा टाकीत मुख्य देवळात जाऊन दर्शन केले. देऊळ अगदी लहान होते. बाहेर चौथरा होता; त्यावर येऊन उभे राहिलो व परत एकदा चौफेर नजर टाकली. उत्तरेकडे हिमालयाच्या रांगा पसरल्या होत्या; दक्षिणेकडे, पश्चिमेकडे, पूर्वेकडे, पहावे तिकडे पर्वतच पर्वत, अगदी क्षितिजाच्या वाटोळ्या धारेपर्यंत पर्वतांच्या रांगाच रांगा पसरल्या होत्या. पंड्या परत परत काहीतरी सांगत होता. माझे लक्षच नव्हते. शेवटी त्याने मला हालवले,
 "माताजी मनाची काय इच्छा आहे ?"
 मला त्याच्या बोलण्याचा अर्थच समजेना. त्याने परत प्रश्न केला, "कोणता हेतू मनात धरून यात्रेला आलात?" हेतू? इच्छा? छे, काहा नाही. माझे मन- मला निराळे असे मनच राहिले नव्हते. वरच्या निळ्या आकाशाला काही इच्छा होती का? काळे फत्तर काही हेतू मनात धरून का स्त्रवत होते? त्या अफाट पसरलेल्या पर्वतांच्या रांगा काेठच्या कामनापूर्तीसाठी का थिजून उभ्या होत्या? मी त्यांच्यातलीच झाले होते मीच ते निळे आकाश, ते कडे, ते डोंगर, ते अनंत अमर्याद चैतन्याने
स्फुरणारे आकाश झाले होते. पंड्याने परत म्हटले, “माताजी- आपली इच्छा मनातच ठेवा; मला सांगण्याची गरज नाही. मी संकल्प म्हणतो." इच्छापूर्तीचा मंत्र म्हणून त्याने सूर्याकडे उदक उडवले. "चला, आता फराळ करा, लौकर उतरायला लागा; नाहीतर मुक्कामाला पोचणार नाही,' असे म्हणून त्याने आम्हांला आपल्या घरी चालवले. आम्ही पण त्याच्या मागोमाग निःशब्द गेलो. त्याच्या अंगणात बसून एका ताटात आणलेल्या गरम पुऱ्या व भाजी खाल्ली. दक्षिणा देऊन त्याची तृप्ती केली व देवळाच्या डाव्या कडेने पलीकडच्या उतरणीला लागलो.
 वाट अरुंद आणि दगडधोंड्यांनी भरलेली होती. आलो तो चढ बरा, इतका कठीण उतार होता. इकडेतिकडे, वर, चौफेर पाहात चालणे शक्यच नव्हते. शंभर पावले चालल्यावर थांबलो, आलेल्या वाटेकडे दृष्टी टाकली व सुस्कारा टाकून, तिच्याकडे पाठ फिरवून उतरावयास आरंभ केला. निवृक्ष उतरण. काही हजार फूट उतरल्यावर चांगले दाट रान लागले व सूर्याचा ताप भासेनासा झाला. ह्या रानात फुले केदारच्या वाटेवरल्यासारखीच होती; मात्र एक नवा वेल दिसला क्लेमाटिसचा. बागेतल्या क्लेमाटिसच्या तिप्पट मोठे फूल होते. पण वास नव्हता. हिमालयातल्या व्हायोलेटलाही वास नव्हता. जाई, कुसरी व गुलाबांना मात्र मंद सुवास होता. तरी वास अगदी दरवळून जाईल अशी फुले मात्र दिसली नाहीत. बद्रीच्या वाटेवर तमाल आढळला, पण तोही वासाला आपल्या महाबळेश्वराच्या किंवा आणखी दक्षिणेकडील कूर्गच्या रानातील तमालपत्राइतका सुवासिक नव्हता. हिमालयातील सगळीच पाने-फुले अशी का? हा उंचीचा गुण की काय, कोण जाणे.
 उतरताना खाली जंगलचट्टी दिसली. तिथल्या माणसांचे आवाजही ऐकू येऊ लागले. संपला वाटते उतार. पण छे, अजून अर्धी वाट काटायची होती. वातावरणात धूळ अगदी नसते म्हणून व विशेषतः धुके नसले म्हणजे लांबवरचे इतके स्पष्ट दिसते, की हातावर आहे, असा भास होतो. त्याचप्रमाणे शहरी जीवनातला गोंगाट, निरनिराळे यांत्रिक आवाज मुळीच नसल्यामुळे लांबचा शब्दही स्पष्ट ऐकू येतो. ह्यामुळे हिमालयात पुष्कळदा पहाड, झाडे, माणसे दूरवर असूनही अगदी जवळ आहेत असे वाटते, चालताना वाट लांब आणि जायचे ठिकाण तर चारपाचशे फुटांवर असे
होते ! ह्याचे आणखी कारण म्हणजे जवळजवळ सर्व वाट वळणावळणांनी गेलेली आहे. पर्वताच्या कडेने जाताना दोन पुढे आलेल्या टोकांवरचा रस्ता असा अगदी आपल्यापुढेच आहेसे दिसते- तो खरोखर तसा असतोही - पण फक्त उडता येणाऱ्या पक्ष्याला ! रस्त्याच्या दोन टोकांमध्ये एखादा लहानसा ओढा वा नदी खळखळत असते व आपण उभे असतो तेथून हजार दोन हजार फूट उतरून परत तितकेच चढावे तरी लागते किंवा वरच्या वरून रस्ता असला तर डोंगर माथ्यावर असलेला एखादा लहानसा पूल ओलांडून परत पलीकडच्या बाजूला तितकेच अंतर चालावे लागते !
 दोन टोकांमधले अंतर हे प्राण्याचा आकार व प्राण्याच्या हालचालीचा प्रकार ह्यांवरच अवलंबून असणार. डोंगराच्या दोन टोकांतले अंतर बंदुकीच्या गोळीला त्या टोकांना सांधणाऱ्या सरळ रेषेइतके असेल; पक्ष्याला लहान-मोठ्या वक्राकार उलट्या किंवा सुलट्या कमानीइतके असेल; तर पायी चालणाऱ्या मनुष्याला अगदी वेड्यावाकड्या खालवर गेलेल्या, भूमितीच्या कोणत्याच सुरेख आकृतीत न बसण्यासारख्या रेषेसारखे ते असते. मनुष्याच्या पायांना लहानमोठे खाचखळगे व दगडधोंड्यांचे उंचवटे सरळ ओलांडून तरी जाता येतात; पण मुंगीच्या चिमुकल्या पायांना प्रत्येक खळगा व प्रत्येक धोंडा म्हणजे एक प्रचंड दरी व प्रचंड पर्वत वाटत असेल, व आपण ज्यांना दरी व पर्वत म्हणतो त्यांचा आकार बिचारीला अगम्यच असणार !
 जंगलचट्टीला पोचलो तो वन्सं पण तिथेच. त्यांना म्हणालो, "आता इथे थांबायचं नाही, पुढच्या मुक्कामाला जाऊ," व तसेच पुढे निघालो. तासाभरात मुक्कामाला आलो. वन्सं भयंकर थकल्या होत्या. लोकांना दिसायला दिसते, की माणूस छान दुसऱ्याच्या पाठीवर बसून येत आहे; पण त्या माणसाला काही फारसे सुखाचे वाटत नाही. जरा थोडी हालचाल केली की खालचा माणूस बजावीत असतो, "माताजी, निश्चळ बसा." माणसाच्या चालीने टोपली खालीवर होते, त्याने बरेचदा गचके बसतात. वरून रणरण ऊन लागते. तरुण माणसाला इतके कष्ट वाटणार नाहीत; पण त्यांना यात्रा कष्टाची झाली.
 थोडा वेळ थांबून उतरावयास सुरुवात केली. आजचा प्रवास दाट रानातून होता. ऊन मुळीच लागत नव्हते. रोज मंदाकिनीचा खळखळ
आवाज ऐकू येण्याची इतकी सवय झाली होती, की आज अगदी चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. जसजसे खाली येत होतो, तसतसा तुंगनाथाचा डोंगर जास्त उंच वाटत होता. पलीकडच्या बाजूने सातआठ हजार फूट चढून आले की तुंगनाथ पुढे चार हजार फूट उंच दिसतो. त्या बाजूने तुंगनाथावरून उतरले की माणूस थेट अडीचतीन हजार फुटांवर येऊन ठेपतो. म्हणजे तुंगनाथाची प्रचंड भिंत जवळ जवळ दहा हजार फूट डोळ्यांपुढे दिसते ! उतरून उतरून पायाचे तुकडे पडले. जरा सपाटीवर चालायला मिळाले तर किती बरे होईल, असे सारखे वाटायचे. शेवटी अगदी संध्याकाळी मंडलचट्टीशी येऊन ठेपलो. तासा दीडतासाने वन्सं पण येऊन ठेपल्या. सगळीजणे इतकी दमली होती, की जवळचे फराळाचे खाऊन, दूध पिऊन लौकरच निजलो. आम्ही पाणलोट ओलांडून अलकनंदेच्या खोऱ्यात येऊन पोचलो होतो. एक लहानशी नदी तुंगनाथ, रुद्रनाथ वगैरे पहाडांतून येऊन वाहात होती व रोजच्याप्रमाणे आमच्या यात्री जीवनाचे पार्श्वसंगीत परत ऐकायला मिळत होते.
 दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. मार्ग सोपा व रम्य होता. सगळीकडून ओढे वहात होते व त्यांच्या पाण्यावर भात व गहू लावला होता. प्रत्येक ओढ्याने मोठमोठे दगडधोंडे वाहून आणले होते. त्यांचे गडगे शेताला व शेळ्या-मेंढ्यांच्या बसायच्या जागांना घातल्यामुळे खोरे दगडाने भरलेले दिसत होते. तरी जिथे जिथे माती होती तिथे झुडपे उगवून आली होती.
 पक्षी पण खूप पाहावयास मिळाले. एक मोठी गंमत पाहिली. एका घारीच्या मागे कोतवाल पक्ष्यांचे एक जोडपे लागले होते व घार त्यांना चुकवण्याचा प्रयत्न करीत होती. दोनचारदा तरी कोतवालाने घारीला टोचले व शेवटी घार हार खाऊन पळून गेली. कोतवाल आकाराने लहान, पण मोठा धीट असतो व कावळा, घार वगैरे दरवडेखोरांवर तुटून पडतो. कावळादेखील घारीचा पाठलाग करताना आम्ही पुढे एकदा पाहिला. घारीला वरून जोराने खाली झडप घालता येते, पण चटकन् दिशा बदलून पलटी खाणे तिला जमत नाही. एकदा ती उंचावर गेली म्हणजे इतर बारक्या पक्ष्यांना तिचा पाठलाग करता येत नाही; पण ती खाली असली म्हणजे कोतवाल व कावळा तिच्या भोवती फिरतात व पटकन वर जाऊन
तिला टोचतात व हैराण करतात. घारीसारख्या बलाढ्य दरोडेखोराशी यशस्वी लढाई दिल्याबद्दल मी त्या चिमुकल्या कोतवालांचे अभिनंदन करून शुभ शकुन झाला अशा आनंदात पुढे चालू लागले.
 दोन-अडीच तास चालल्यावर चमोलीला आलो. वाटेत दोनतीन देवळे होती. काही पावती फाडून देणारे व काही नुसतेच हात पसणारे भिकारी होते. त्या सर्वांच्या त्रासातून सुटका करून घेत चाललो होतो.
 ह्या वाटेवर पुढे थेट बद्रीपर्यंत अधूनमधून संगमरवराचा दगड दिसला. मोठा उंची संगमरवर नव्हता; पण पुष्कळ होता. चमोलीला लोक डोंगरातील दगड फोडून लहान लहान घरे बांधीत होते. त्यात बराचसा पांढरा, पिवळा व लालसर संगमरवर होता. पुढे बद्रीच्या वाटेवर एका अरुंद जागी माती वारंवार ढासळते म्हणून दगडाची घाटी जवळजवळ अर्धा मैल बांधलेली आहे. त्यातसुद्धा ह्याच उंची दगडाचे प्रमाण बरेच दिसले. शंकराच्या देवळाची वाट सोडून धनाढ्य विष्णुमंदिराची वाट चालू लागलो त्याचीच ही निशाणी होती.
 सुदैवाने त्याच दिवशी मोटर मिळाली आणि पीपलकोठीला पोचलो. पीपलकोठीमध्ये रणरण ऊन, वैराण प्रदेश, सर्वत्र धूळ, माणसांची वर्दळ व लाउडस्पीकरचा आवाज यांनी आम्हांला नकोसे झाले ! दुपारचे दोन वाजले होते. आकाशात ढग आले होते, गडगडत होते तरी आम्ही तेथून सुटण्याकरिता तसेच पुढे निघालो. कोठेही पाणी नव्हते. रस्ता धुळीचा होता; पण सुदैवाने ढगांमुळे ऊन लागत नव्हते. दरी अरुंद व पर्वत म्हणजे हजारो फुटांचीं दगडाची भिंत उभी होती. आम्ही नदीपासून तीनचारशे फुटांपेक्षा उंचीवर चालत असूनही नदीचा खळखळाट सारखा ऐकू येत होता. नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूंना ज्वालामुखीच्या पोटात रूपांतर पावलेले थराचे दगड निरनिराळे कोन करून पर्वताच्या उतरणीवर दिसत. खालच्या जमिनीशी कोणता कोन करून डोंगर उभे होते ते दिसावे म्हणून एक फोटो घेतला; पण तो काही तितका चांगला आला नाही. दगड फोडून रस्ता काढलेला होता. हे दगड बहुतेक स्लेटचे होते व त्यांचेच पातळ चिरे इकडल्या घरांवर कौलांसारखे घालतात. ह्या दगडांत अगदी पातळ पातळ पापुद्रे एकावर एक असतात व एकदोन ठिकाणी फारच मजेदार पापुद्रे आढळले. साधारणपणे पापुद्रे सपाट होते, पण एकदोन ठिकाणी ते
लाटांच्या आकाराचे किंवा छपरावर जस्ताचे पत्रे असतात. त्या आकाराचे होते. मात्र उंचवटे व खळगे उथळ होते.
 हा दगड मूळचा मातीचा गाळ समुद्राच्या व सरोवराच्या तळाशी साठल्यामुळे तयार होतो. दर ऋतूतील गाळाचा एकएक पापुद्रा म्हणता येईल. उथळ पाण्यात पाण्यावरील लाटांचे स्वरूप त्याला येते. ह्या थरांचा अग्नीशी संयोग झाला की स्लेटचा दगड होतो. स्लेटच्या दगडात पूर्वकालीन प्राण्यांचे अवशेष सापडतात; पण ह्या विभागात पुष्कळदा पाहूनसुद्धा ते सापडले नाहीत. पुढे मला कळले, की हिमालयाच्या ह्या विभागात असले अवशेष सापडत नाहीत म्हणून.
 एकंदरीने केदारच्या मानाने बद्रीची वाट रूक्ष वाटली. जंगल खात्याने चीड वृक्षाच्या राया ठिकठिकाणी लावल्या होत्या; पण त्यासुद्धा पुरेशा हिरव्यागार वाटत नव्हत्या. देखावा भव्य होता, पण रौद्र होता. अलकनंदेच्या खोऱ्यापलीकडे सर्व पर्वतांवर डोके काढून उभा असलेला कामेट पर्वत मात्र फारच सुंदर दिसे. परत येताना शुभ्र चांदण्यात किंवा अगदी पहाटे तर तो फारच रमणीय दिसे. कामेटचा एक फोटो काढला. पण सगळेच फोटो पाहिलेल्या दृश्यांच्या मानाने फिके वाटतात. स्मृती मंदावली म्हणजेच फोटोची मजा वाटते; पण स्मृती ताजी असेपर्यंत फोटोतली प्रतिकृती मनाचे समाधान करू शकत नाही, असा माझा नेहमीचा अनुभव आहे. काही देखावे मात्र प्रत्यक्षापेक्षा फोटोत चांगले दिसतात; पण हिमालयाची शोभा तशापैकी नव्हे.
 एक दिवस, मला वाटते गरुडगंगेहून निघालो त्या दिवशी, दोन वयस्क पुरुष बोलताना ऐकले. मराठी भाषण ऐकून त्यांना ठरल्याप्रमाणे विचारले, तुम्ही कुठले म्हणून. एकाने सांगितले, की मी अकोल्याजवळच्या गायगावाचा. एवढ्यात त्याला खोकल्याची उबळ आली म्हणून तो खाली बसला. आम्हीही त्याच्याजवळ बसलो व मग त्याला विश्रांती मिळाल्यावर बरोबरच चालू लागलो. म्हातारा बोलका होता. शेवटपर्यंत आमची गाठ पडत होती. त्या दिवशी त्याने आपली प्रवासाची हकीकत सांगितली, "एक महिना झाला मला घर सोडून." मी म्हटले, "काय, अकोल्याहून इथपर्यंत यायला एक महिना लागला! का यात्रा करीत करीत आलात?" थोडेसे हसून तो म्हणाला, "त्याचं असं झालं, ही फिरतीची तिकिटं निघाली नव्हती
का? मी म्हटलं जावं काशीला; दिल्ली, आग्रा, मथुरा बघावं व घरी यावं. मुलगे, जावई पण म्हणाले, खुशाल जा, काही काळजी करू नका. मग सामान बांधलं न् बैलगाडीनं येऊन अकोल्याला रेलगाडीत बसलो. गाडा झाली लेट. भुसावळेला पोचलो तर दिल्लीची गाडी निघून गेलेली! आता काय करावं? रात्रभर फलाटावर माशा मारीत बसायचं मनास येईना. पुढचाच गाडी मुंबईची होती; मग तिच्यातच बसलो झालं!"
 … "मग यात्रेचं काय झालं?" मी कुतूहलाने विचारले. "अहाे, काशी नाही तर पंढरपूरला गेलो ! तिथून येताना शिंगणापूर, जेजुरी केला. परतताना काही मंडळी भेटली बद्रीला जाणारी. तेव्हा त्यांच्याबरोबर निघालो. आग्रा, दिल्ली मथुरा, काशी, प्रयाग करून हृषीकेशला आलो नि आजारी पडलो. ती मंडळी पुढे गेली; मी मागेच. मनात विचार केला हा काही खरी सोबत नव्हे. बरं वाटलं की एकट्यानंच पुढं जावं; पण ताप हटेना. मग पुढं न जाता घरी गेलो. घरी गेल्यावर आराम वाटला व पडूनच होतो तो एके दिवशी जावई आले. "मामा, बद्रीकेदारला जायचं आहे का? आपल्याकडचीच दहा-पंधरा माणसं जाताहेत.' हृषीकेशहून परत आल्यापासून मला पण बघा चैन पडत नव्हतंच. लगेच जावयाबरोबर गाडी जोडून शेजारच्या गावी गेलो, तर कळलं की सगळी माणसं अकोल्याला गेली. मग तसाच अकोल्याला गेलो. लेकीनं गायगावला जाऊन बांधाबाध केली; गावकऱ्यांनी दुसरी गाडी दिली; ती जोडून ती माझं सामान घेऊन अकोल्याला आली. तिथे चौकशी करीतकरीत मंडळी उतरली होती त्या ठिकाणचा पत्ता लागला. मग जावयानं विचारलं, "मामा म्हातारे, आत्ताच ताप येऊन गेलेला, कसं व्हायचं?' सगळ्यांनी सांगितलं, 'काळजी करु नका. दादा आमचेच आहेत, संभाळून नेऊ' मग त्या माणसांसंगं आला. परत ताप आला नाही. आपल्या माणसांत यात्रा पण सुखाची होते आहे. देवाच्या मनात दर्शन द्यायचं आहे असं दिसतं"
 बोलताबोलता आम्ही पाताळगंगेशी पोचलो होतो. म्हाताऱ्याची माणसे तिथेच रस्त्याच्या कडेला बसली होती. त्यांच्यात म्हाताऱ्याला सोडून, रामराम करून पुढे निघालो. मी म्हटले. "दहा वर्षे बद्रीला जायचं घोकता घोकता यंदा निघायचं तर कोण जिवाचा आटापिटा! आणि हा म्हातारा पाहा. मनात आलं; निघाला यात्रेला."
"अग, त्यानं यात्रेला जायच्या आधी घरचं पाहतापाहता जन्म गेला. आता मुलगेमुली मोठी झाल्यावर तो निघाला; म्हणून त्याला काळजी नाही. त्याला आपल्यासारखी घाई नव्हती सुटली." "अरे, पण आपल्यापेक्षा कितीतरी तरुण माणसं निघाली आहेत की यात्रेला!" "पण त्यांना किती यातायात पडली, तुला कुठं माहीत आहे ?"
 आणि म्हाताऱ्यासारखे मनात आले निघाले, अशी माणसे विरळा. बहुतेकांची तऱ्हा तुकारामाच्या अभंगातल्या 'आवा चालली पंढरपुरा। वेशीपासुनी आली घरा।' अशीच.
 जोशीमठापासून दीडदोन मैल सारखी उतरण आहे. थेट नदीच्या पात्राशी पोचेपर्यंत दीडदोन हजार फूट उतरावे लागते. येथे अलकनंदा एका प्रचंड पर्वताला वळसा घालून येते व आपल्याला तिच्या काठाकाठाने जावयाचे असल्यामुळे ती करील ते आपल्याला करावे लागते. एका बाजूने खळखळत विष्णुगंगा तिला येऊन मिळते; दोन नद्या मिळतात तेथे उंच लाटा असतात. नदीचे पात्र अरुंद, उभ्या पर्वतांच्या भिंतींतून गेलेले व रस्ता खडकांतून कापून काढलेला व अरुंद असा आहे. ह्या घाटातून जाताना मधूनमधून पर्वताच्या उतरणीवर बर्फ होते व समोर, मागे, बाजूला असलेली पर्वत-शिखरे अधूनमधून दिसत होती. पर्वत कापून कापून, वळसे घेत, उड्या मारीत, प्रचंड नाद करीत नदी चालली होती. दिवस वर आला असूनही पर्वतांच्या उंचीमुळे दाट सावली होती, वर गडद निळ्या आकाशाची धांदोटी दिसत होती आणि आम्ही मजेत एकमेकांच्या संगतीने वाट काढीत होतो.
 मला थोडे पडसे झालेसे वाटत होते, आवाज बसला होता. विनायकचट्टीशी मुक्काम केला, त्या दिवशी माझा आवाज पार गेला. बोलताच येईना! दुसऱ्या दिवशी बद्रीला जायचे. सकाळी उठले तो ताप पण होता. पण मिळाल्यास घोडे करावयाचे असा बेत करून गरम कपडे घालून तसेच निघालो. नेहमीसारखे चालवत नव्हते; चढ आला की श्वासोच्छावास करणे जड जाई. घोडे काही मिळेना. हळूहळू चालत होतो. त्या दिवसाचे आठ मैल व चार हजार फुटांचा चढ व पुढच्या दोन दिवसांची परतीची चाल मी कशी केली, ह्याचेच मला आश्चर्य वाटते. हवा उत्तम होती. पुढची वाटही रानामुळे रम्य होती; पण बद्रीचा चढ खडकाळ व उभा होता.
बद्रीपासून मैल दीड मैलावर एक घोडे मिळाले; चढ जवळजवळ संपला होता; पण तरी ते केले व मी घोड्यावर बसून विश्रांती घेऊन पुढे गेले.
 बद्रीनाथाचे देऊळ चांगले प्रशस्त असूनही गर्दीत बसले असल्याने त्याला केदाराची शोभा येत नाही. आता एक एक देवस्थान नेमलेल्या कमिटीच्या पंचांच्या ताब्यात जात आहे. देवळाची जागा बळकावून घरे व बाजार वसवलेली जमीन त्यांनी जर मोकळी केली व देवस्थाने पूर्वी होती तशी प्रशस्त अंगणात परत आणली, तर काही पंडे, बडवे, पुजारी इत्यादी देवाच्या दलालांशिवाय इतर सर्व हिंदू त्यांना दुवा देतील. काही देवळांतून दुकाने इतकी आहेत की, देऊळ उठवायचीच वेळ आली आहे ! काही देवळांच्या भोप्यांनी देवळाची जमीन बळकावून सबंध भोवतालून आपले वाडे बांधले आहेत व आता या देवळात जायला मोकळा मार्गच उरलेला नाही. जायचे तर पुजाऱ्यांच्या वाड्यातूनच जावे लागते. काही देवळांत श्वासकासारी व शिलाजिताच्या जाहिराती लागल्या आहेत! हिंदूंच्या देवळाइतकी अनास्था दुसऱ्या कोणाच्याही धर्माच्या पूजास्थानांची दिसून येत नाही. बद्री, केदार व तुंगनाथ वर्षाचे आठ महिने बर्फाच्छादित असल्यामुळे ह्या देवळांची फारशी विटंबना होत नाही, हे यात्रेकरूंचे नशीब!
 वन्संनी गरम कुंडावर स्नान केले. मी अंगात ताप असल्याने फक्त हातपाय धुतले. तोच तोच संकल्प ऐकून मी कंटाळले होते. "पापोऽहम् ! पापकर्माऽहम् !" छेः, मी पापात्मा आहे हे मला पटतच नव्हते - शिवाय येथील पंड्यांचे संस्कृत उच्चार पण आपल्या कानाला कसेसेच वाटतात. शेवटी माझे 'ग्यातं अग्यातं' पाप सर्व नाहीसे करण्याची विनंती करून आम्ही तेथून निसटलो. पूर्वी पंडे संकल्प सांगताना यात्रेकरूंकडून नाडून पैसे काढीत, आता तसे होत नाही. देऊळ दुपारचे बंद झाले होते म्हणून कशीबशी घरी येऊन पडले. पंड्या काही केल्या प्रसाद आणीना व सर्वांना भूक लागलेली; मग चंडीप्रसादाने ब्राह्मणाच्या दुकानची पुरी-भाजी आणली व ती खाऊन आम्ही परत कुडकुडत रजया पांघरून पडलो. दोन तासांनी पंड्या प्रसाद घेऊन आला; बाकी कोणाला भूक नव्हती, उगीच थोडा थोडा खाल्ला. मला मात्र परत सपाटून भूक लागली होती व मी म्हणून त्यांनी वरणभात, मालपुवा वगैरे यथास्थित खाऊन घेतले व परत पडून राहिले.
 संध्याकाळी नैवेद्याचे ताट घेऊन दर्शनास गेलो. गर्दी फार होती; पण पुरुषांच्या व बायकांच्या निरनिराळ्या बाऱ्या असल्यामुळे दर्शन झाले व प्रसाद घेऊन परत आलो. अंगात बराच ताप असावा; कारण उभे राहणे व चालणे जडच जात होते. वन्संना पंड्याला दक्षिणा द्यावयाची होती; पण त्याने तोंडच दाखवले नाही. दोन दोन निरोप पाठवले तरी पत्ता नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे निघावयाचे होते, म्हणून शेवटी जिथे उतरलो होतो तिथल्या मुलांच्या हातांवर खाऊसाठी पैसे देऊन पुढे गेलो. त्या दिवसाच्या सबंध मुक्कामात कोणाचे काही हिंडणे-फिरणे झाले असेल तर दिनूचे. पाऊस पाच वाजल्यापासून पडत होता. आपल्याकडे हिवाळ्यातही नाही अशी कडक थंडी पडली होती. वन्संचे व त्याचे पंड्याबद्दल बोलणे चालले होते. मला बोलता येत नव्हते व तापामुळे बोलण्याची इच्छाही नव्हती, म्हणून मी ऐकत होते. पंडे बरेचसे अशिक्षित असतात; मंत्रोच्चार धड करीत नाहीत; पैशाचे भयंकर लोभी असतात, हे सर्व खरे. पण यात्रेच्या ठिकाणी यात्रेकरूंच्या राहण्याजेवण्याची सोय होते; थंडीसाठी रजया मिळतात, हे काय कमी आहे ? आम्ही देवळात दक्षिणा भरपूर ठेवली होती व पंड्याला पंधरा रुपये द्यावयाचे ठरवले होते; पण आम्ही काही धार्मिक विधी करणार नाही, म्हणून तो इतर यजमानांच्या बडदास्तीत होता. शेवटी ते पंधरा रुपये पुण्यास परतताना आम्ही आमच्या चंडीप्रसादला दिले. पंड्याला माणशी पाच ते दहा रुपये रोजी द्यावयास यात्रेकरू खुशीने तयार असतो; पण पंड्या भांडण काढतो व मग सर्वांचाच विरस होतो. येथे येणारी काही यात्रा श्रीमंतांची असली तरी बहुसंख्य बरेच गरीब असतात व त्यांच्या भोळ्या भावाचा फायदा पंड्यांना मिळतो. हा व्यवहार थोडा कमी लोभ ठेवून झाला, तर दोन्ही पक्षांना संतोषकारक होईल.
 दुसऱ्या दिवसासाठीही घोडे मिळाले नाही म्हणून पायीच निघालो, पहाटे पाचला धर्मशाळेतून निघून नदीच्या पुलावर येऊन पोचलो. परतताना एकदा डोळे भरून सर्व दृश्य बघून घेतले. मंदाकिनीला केदारपाशी फारशी मोठी दरी नाही. येथे मात्र बरेच लांब खोरे आहे. काहीसे कृष्णेच्या जोरखोऱ्यासारखे, मात्र दोन्ही बाजूंचे पर्वत महाबळेश्वरपेक्षा चौपट तरी उंच, व सर्व उंच शिखरांवर बर्फ होते. झाडी मुळीच नाही. बद्रीपलीकडे काही मैल गेल्यावर वसुंधरा नावाचा धबधबा लागतो व त्यापलीकडे
भारताच्या हद्दीतील शेवटचे खेडे माना ह्या नावाचे लागते. तेथपर्यंत जायचा आम्ही बेत केला होता; पण माझ्या तापामुळे शक्य झाले नाही. आम्ही उभे होतो ती दरी अर्धवट काळोखात होती. पायाखालचे दिसायला लागले होते. वर नजर टाकली तर पर्वतांची बर्फाच्छादित शिखरे प्रकाशाने उजळली होती. काळेभोर, गवताची पातही नसलेले, सावलीने झाकळलेले डोंगर व त्यापलीकडे उन्हांत चमकणारी शिखरे फारच रम्य दिसत होती. अलकनंदेच्या सर्वच प्रवासात छायाप्रकाशाची ही मौज दिसावयाची. पण आज बर्फाची शिखरे बरीच असल्यामुळे छायाप्रकाशाचा विरोध विशेष उठून दिसत होता. कॅमेऱ्यात रंगीत फिल्म असल्याने ह्याही वेळी आम्हांला फोटो काढता आला नाही.
 हळूहळू आठ मैल चालत गेल्यावर माझा तापही उतरला; आवाज थोडथोडा परत आला व हुशारी वाटू लागली. परतीची वाट आम्ही झपाट्याने काटली. वाटेत महामंडलेश्वर यतींची राजविलासी यात्रा परत भेटली व ह्या मंडळींना यशस्वी रीत्या टाळता येऊन त्यांच्यापुढे राहता आले ह्याबद्दल श्रीबद्री, केदार व तुंगनाथ ह्या त्रयीचे उपकार मानून पुढे सटकलो.
 गरुडगंगेला शेवटची रात्र काढली. मोठ्या शिकस्तीने जागा मिळाली. जसजसे दिवस जात होते, तसतशी यात्रेतील प्रसन्नता कमीकमी होत होती. यात्रेची गर्दी इतकी वाढली होती, की जागा मिळायला मोठी पंचाईत पडे. रस्त्यात धुरळाही फार झाला होता. सकाळी उठून चालू लागलो तेव्हा परत एकदा हिमालयाच्या जादूने आम्हांला भारले. पहाटेच्या चांदण्यात दूर अंतरावर कामेट चमकत होता; आकाश निरभ्र, गडद, काळेनिळे होते. कितीतरी पक्षी उठून अर्धवट अंधारातच किलबिलू लागले होते. खाली अलकनंदा खळखळत होती. जड अंतःकरणाने ह्या सगळ्यांना निरोप देऊन चालू लागलो व पीपलकोठीला आलो.
  मोठ्याथोरल्या पत्र्याच्या छपरात सामान टाकून बसलो व आज पुढे जाण्याची तिकिटे मिळतील का नाही, ही विवंचना सुरू झाली. धनसिंग, वीरसिंग, चंडीप्रसाद, वन्सं व आम्ही दोघे एकत्र बसलो होतो. धनसिंग क्षणांत घरच्या गोष्टी बोले, तर क्षणांत आमची संगत सुटणार म्हणून त्याचे डोळे भरून येत. अर्ध्या अर्ध्या तासाने मोटरी येत होत्या व सुटत होत्या; त्यांचे भोंगे, उतारूंची धावपळ, खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा ओरडा
व सारखा न थांबता चाललेला लाउडस्पीकरचा आवाज आम्ही आमच्या रोजच्या जगात पोचल्याची जाणीव वेदनापूर्वक देत होते. आमची सर्वांचीच संगत सुटणार होती. धनसिंग-वीरसिंग पंचवीस दिवसांच्या वाटेवर कुठे नेपाळात उंच डोंगरात बसलेल्या त्यांच्या गावी जाणार होते. चंडीप्रसाद आम्हांला हृषीकेशपर्यंत पोचवून गढवालमधल्या आपल्या गावी जाणार. वन्सं आपल्या घरी व आम्ही एकाच घरी, तरी संसाराच्या आटापिटीत पोटाच्या पाठीमागे एकमेकाला दुरावणारच होतो. हिमालयाच्या देवभूमीत, सर्व देवांच्या सहवासात वीस दिवस आम्ही रात्रंदिवस एकमेकांच्या सहवासात घालवले; आयुष्याचा एकच क्षण का होईना पण तुंगनाथच्या शिखरावर मी अनंतत्वाचा अनुभव घेतला. हे सुवर्णक्षण आयुष्य उजळायला पुरेसे नाहीत का?

१९५४

*