भोवरा/भोवरा

विकिस्रोत कडून




 
 भोवरा


 "कालच नाही का मी तुम्हांला हात हालवला ? आणि बरेच दिवसांत भेटला नाही असं कसं म्हणता?"
 "मला तर काल कुणी भेटल्याचं आठवत नाही. मी कुणाकडं गेले नव्हते, कुणी माझ्याकडं आलं नव्हतं."
 "अहो !" ती बाई हसत म्हणाली, "काल संध्याकाळच्या तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये वाचनालयाच्या मागच्या रस्त्यावरून चालला होतात ना, तेव्हा मी मोटरने त्या रस्त्यावरून गेले— जाता जाता तुम्हांला पाह्यलं व तोंड बाहेर काढून हात हालवला की ! तुम्ही पाहात होतात माझ्याकडं."
 "खरंच की!" मी उत्तर दिले. जरा वेळ विचार केल्यावर मला तो प्रसंग आठवला. कुणी हात हालवला, ते काही मी ओळखले नव्हते व मोटर इतक्या वेगाने गेली की 'असेल दुसऱ्या कुणासाठी', असेच मला वाटले होते. एकमेकांना न ओळखता, भर्रकन निरनिराळ्या दिशांनी निघून जाण्याला जर ही बाई 'भेट' म्हणत असेल तर म्हणू दे पण माझ्या अनुभवात तरी त्याला भेट म्हणायला मी तयार नव्हते.
 पुण्याच्या रस्त्यांतून जाताना समोरून कोणी आले - क्षणभर थांबले, दोन शब्द बोलले तर ती भेट होईल का ? त्या माणसाचा आवाज ऐकायला मिळेल, डोळ्यांत पाहायला मिळेल, कदाचित शब्दांना अर्थही असू शकेल. क्षणभरात का होईना, माझे कान व डोळे कितीतरी गोष्टी टिपून घेतील. भेटीची उत्कटता पळावर वा तासावर मोजण्याचा प्रयत्न करणे वेडेपणाचे नाही का ? खरे म्हणजे भारतात असताना असा तासा-मिनिटांचा विचारच माझ्या मनात आला नसता, पण इथे अमेरिकेत मात्र सारखा येतो.
भारतामध्ये सगळे कसे शांत व स्थिर असते. तेच रस्ते, तीच नदी, तीच ओळखीची माणसे-फक्त आपल्या नात्यातलीच नव्हेत तर इतरही. पुण्यातला टांगा चालवणारा बाबू सगळ्यांच्या ओळखीचा; वीस वर्षे ओळखीचा, माळीणबाईची ओळख तिच्या मरणाने तुटली, कॉलेजात ज्यांनी शिकवले ते गुरुजन, आजचे सहाध्यापक, तीच शेजारीण माझ्याबरोबरच हळूहळू म्हातारी झालेली, तीच माझी व शेजाऱ्यांची मुले हळूहळू मोठी होता होता बरोबरीची झालेली. शाळेतल्या मैत्रिणी दहा ठिकाणी पांगल्या तरी भेट झाली की तीच ओळख पुढे चालू होते. सगळे संबंध स्थिर, रुजून मुळ्या धरून बसलेले, मागच्या कित्येक जन्मांचे, पुढे कित्येक जन्म चालू राहणारे. इथे मात्र सगळेच काही विलक्षण गतिमान, क्षणाक्षणाला बदलत जाणारे. पावसाळ्यातील वादळी वाऱ्यात बोट मुंबईहून निघाली होती. सारखी डचमळत होती. माझ्याबरोबर केबिनमध्ये एक बिचारी बाई होती. तिला भयंकर बोट लागली होती. तिला मी परत परत विचारी, "काय करू बरं ? कशानं आराम वाटेल तुम्हांला?" ती म्हणायची, "एक पळभर- खरच अगदी पळभरच- बोट स्थिर थांबवायला सांगा हो." मला कित्येकदा त्या बाईची आठवण व्हायची. अमेरिकेतील वेगवान धावणाऱ्या आयुष्यात माणसाला, निदान मला तरी, मी स्वतः धावते आहे असं वाटायचं नाही. काहीतरी जोरानं फिरत आहे, आणि आपण त्या काहीतरीत असल्यामुळे अनिच्छया फिरत आहोत असं मला होई. सान्फ्रान्सिस्कोला जाताना मधे प्रचंड मोठ्या पुलावरून जावे लागे. एका बाजूने अविरत, न थांबणाऱ्या समोरून येणाऱ्या मोटरीचे पांढरे दिवे, तर स्वतःच्या बाजूला तितक्याच वेगाने धावणाऱ्या लाल दिव्यांची माळ! एका प्रचंड कारखान्यात दोन समांतर पट्टे विरुद्ध दिशेने फिरत आहेत-एकावर जाणारा माल, एकावर येणारा माल आणि त्यातलाच मी एक मालाचा पुंजका. माझी गती माझी नव्हती. माझे डोके फिरावयास लागायचे.
 "एक पळभर-खरंच, पळभर थांबवा हो हा पट्टा" माझे मन सारखे ओरडायचे.
 युनिव्हर्सिटीत विद्यार्थी व शिक्षक सगळेच बदलत असतात. कोण कधी, केव्हा, कुठे जाईल ह्याचा नेम नाही. पटत नाही म्हणून जातात असेही नव्हे. काहींना पगार जास्ती मिळतो, काहींना शिष्यवृत्ती मिळते,
म्हणून जातात; पण बरेचसे कुठेतरी निराळ्या ठिकाणी जायचे म्हणून, बदल हवा म्हणून जात असतात.
 रस्त्याने फिरायला गेले की कितीतरी घरांवर व दुकानांवर पाट्या दिसायच्या, " विकाऊ आहे." मला दर वेळीं वाटायचे- " अरेरे! फारच डबघाईला आला बिचारा. दुकान, घर विकावं लागत आहे." काही दिवसांनी मला कळले की पैशाची खोट आली म्हणून काही लोक घरे आणि दुकाने विकीत नाहीत; तर त्यांना एके ठिकाणी राहण्याचा कंटाळा आला म्हणून. आठ वर्षांपूर्वी भेटलेल्या माणसांपैकी एक की दोन त्याच गावात, त्याच घरी, त्याच नोकरीत होती. बाकी सर्व इकडची तिकडे झाली होती.
 सगळ्यांत मौज म्हणजे स्वतःच फक्त हिंडायचे व मग जावे त्या ठिकाणी नवे घर बघायचे, नवे साहित्य विकत घ्यायचे, नव्याने घर सजवायचे. त्या भानगडी नकोत म्हणून ह्या लोकांनी घरांनाच चाके बसविली आहेत. काही काही घरे साठ फूट लांब व वीस फूट रुंद असतात. त्यांना आठ किंवा दहा चाके, अशी घरे प्रचारात आली की त्यांना ओढून नेणाऱ्या मोटरगाड्या तयार होतात. कंपन्या निघतात. एका गावाहून दुसरीकडे जायचे म्हणजे घरासकट जायचे ! माणसे हिंडतात, त्यांची घरे पण हिंडत असतात.
 लाइबनिट्झ म्हणून एक प्रख्यात तत्त्ववेत्ता होता. विश्वरचनेबद्दल त्याची मोठी मजेदार कल्पना होती. सर्व विश्व अणुमय आहे. अणूचे नाव मोनाड. पण हे अणू निर्जीव, निरात्म नाहीत, हे आत्माणू सर्वथैव स्वतंत्र, स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण असे आहेत, असे त्याचे म्हणणे होते. ह्या संख्यातीत, स्वतंत्र आत्म्यांचे मिळून विश्व बनले कसे ? एकमेकांशी त्यांचा संबंध मुळीच नाही का? लाइबनिट्झच्या मते संबंध फक्त एवढाच होता की, ह्या प्रत्येक बंदिस्त आत्मारूपी अणूला एक एक खिडकी असते व त्या खिडकीत इतर सर्व अणू प्रतिबिंबित झालेले असतात. हाच एका मोनाडचा दुसऱ्या मोनाडशी संबंध.
 कधी जुन्या काळी कॉलेजात शिकलेल्या ह्या सिद्धांन्ताची मला राहून राहून आठवण येई. एक मोठा भोवरा फिरत आहे. त्याच्या तळाशी गती इतकी थोडी की स्थिरत्वाचाच भास व्हावा. तिथे आम्ही वर्षानुवर्षे, जन्मच्या जन्म, एकमेकांजवळ घालवतो तरी आत्म्याला आत्मा मिळत नाही म्हणून तळमळतो. लाइबनिट्झच्या मोनाडांप्रमाणे जोपर्यंत प्रत्येक आत्मा वेगळाला राहतो तोपर्यंत भेट होणे शक्यच नाही असे मानतो. ज्या दिवशी देहात, अस्मितेत कोंडलेला आत्मा सुटेल, त्या दिवशी अनंताच्या जाणिवेत वेगळेपण विरलेलेच असणार. पण तोपर्यंत ही निराळेपणाच्या विरहाची हुरहूर आमच्या मनात कायमच राहते. पण त्याच भोवऱ्याच्या वरच्या कडेला सर्व इतके गतिमान आहे की कोणताही एक बिंदू कोणत्याही एका बिंदूशेजारी फार वेळ राहूच शकत नाही. फिरण्याची कक्षा म्हणजे एक लांबच लांब प्रचंड मोटर रस्ता आहे. त्यावर असंख्य मोनाड निरनिराळ्या दिशांनी जात येत आहेत. प्रत्येक मोनाड आपल्या खिडकीतून इतरांकडे पाहातो, हात हालवतो व म्हणतो "झाली हं आपली भेट!"

१९६०


*