भोवरा/तितिक्षा
३
तितिक्षा
"बाबूजी, बेहनजी ! जरा आगे बढो-आगे बढो-" तेच तेच वाक्य तो परत परत उच्चारीत होता. पण आत शिरल्याबरोबर जरा इकडे तिकडे पाहून, जागा रिकामी आहे असे दिसताच मी दाराशेजारच्याच एका बाकावर जागा धरली व इतर बाबूजी-बेहनजींना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी केली.
एकामागून एक माणसे भरत होती. बसायच्या जागा संपल्यावर लोकं उभे राहू लागले. पहिल्यापहिल्यानेच आत शिरलेले दोघेजण सारखे घड्याळाकडे बघत होते. शेवटी न राहवून एकजण ओरडला, "काय रे, माणसं आत येण्याचं संपणार आहे का आज?" कंडक्टरने नुसते ओरडणाऱ्याकडे पाहिले व परत दाराकडे वळून "बाबूजी, माईजी, आगे बढो" हा मंत्रोच्चार करून काही जणांना हाताने जरा पुढे रेटून, खालच्या लोकांसाठी जागा केली. रांगेतली माणसे मला वाटते पन्नास असावीत-घेतल्यावर गाडी रें रें करीत चालू लागली. दर मुक्कामाला गाडीतील एखाददुसरे माणूस उतरले तर चारपाच तरी आत चढत होती.
दोन दिवसांच्या धो धो पावसाने हवा निवळण्याऐवजी जास्तच कुंद व दमट झाली होती. साचलेली पाण्याची डबकी, मधुनमधुन वस्ती नसलेल्या भागांत साचलेल पाणी व बसमध्ये गर्दीत घामावलेली माणसे ह्या सगळ्यांमुळे काही विचित्र उग्र दर्प हवेत भरून राहिला होता. कंडक्टर गर्दीत शिरून तिकिटे फाडीत होता. पैसे घेत होता व दर पाच मिनिटांनी मुक्काम आला की दाराशी जाऊन आतील उतारूना उतरवीत होता व नव्यांना चढवीत होता. परत एकदा घड्याळवाला उद्धटपण ओरडला, "काय, जागेवर पोचवण्याचा विचार आहे तुझा, का इथंच कुजवणार आहेस आज?" दाराजवळून आत परतणाऱ्या कंडक्टरने तिकिट फाडता फाडता
म्हटले, "बाबूजी, त्यांना पण घरी जायचं आहे." "उद्धट लेकाचा!" घड्याळवाला आपल्याशीच पण लोकांना ऐकू येईल असे पुटपुटला. एक क्षणभर तिकिटांच्या पानांची चवड हातांत धरून कंडक्टरने वर पाहिले– परत भोके पाडण्याचा चिमटा हाती घेतला व तो खाली पाहून तिकिटे फाडू लागला.
त्याच्या डाव्या हातात वीतभर लांब व चार बोटे रुंद अशी निळ्यापांढऱ्या रेघांची सुती कापडाची पिशवी होती. तिचे बंद आंगठा व शेजारचे बोट ह्यात ताणून धरून, तोंड उघडे राहील अशी ती धरली होती. उरलेल्या तीन बोटात नोटांच्या घड्या उभ्या घट्ट दाबून धरल्या होत्या. कुणी नोट दिली की तो तिची उभी घडी करून त्या बोटात धरी व उजवा हात पिशवीत घालून नाणी काढून मोड देई. त्याच्या तीन बोटांत नोटा तरी किती मावणार, हा प्रश्न माझ्या मनात आला, तोच त्याचे उत्तर मिळाले. मधे क्षणभर फुरसत मिळाली. तेवढ्यात त्याने बोटातल्या नोटा काढून खिशात ठेवल्या व परत आपले काम सुरू केले. बस शेवटच्या मुक्कामाला जाईपर्यंत नाण्यांच्या भाराने पिशवी फाटत कशी नाही, किंवा त्यात दुसरा कोणी पटकन हात का घालीत नाही, ह्या दोन प्रश्नांचे उत्तर मात्र मला मिळाले नाही.
बस सब्जी मंडीशी आली. सरकारी कचेऱ्यांजवळ लोक रांग करून उभे होते व एकएकजण आत चढला होता; इथे रांग वगैरे करण्याची बात नव्हती. गाडी थांबल्याबरोबर वीस पंचवीसजण धावत दाराशी आले. चौघे-पाचजण आत शिरल्यावर जागा भरली व कंडक्टरने दाराला आडवा हात लावून आता जागा नाही म्हणून सांगितले. काहींनी आर्जवे केली, काहींनी शिव्या दिल्या. एक वयस्क लठ्ठ बाई एक पोर बखोटीला मारून सर्वांना बाजूला सारीत दाराशी आली व कंडक्टरला बाजूला सारून आत शिरू लागली. बाहेरून एकच गिल्ला झाला. "ही कोण मागून येऊन आत शिरणार? तिला बरा आत येऊ देतोस? आम्ही काय म्हणून बाहेर राहाणार?" लोकांची दाराशी झिम्मड झाली. तेवढ्यात ही बाई पायरी चढून आली- तिने एक पाय बसच्या आत घालण्यास उचलला. "बाई. आत जागा नाही." बाईचे तोंड अखंड चालू होते. तिच्या अंगावरचे पांढरे फडके बाहेर कोणाच्या तरी पायाखाली अडकले होते ते धरून मागे वळून तिने चार सणसणीत शिव्या मोजल्या, तशी फडके मोकळे झाले पण पदर घसरून तिच्याच पायाखाली आला. कंडक्टरच्या हाताला घट्ट लोंबकळून ती चढत होती. अर्धी साडी ढुंगणाखाली घसरली होती, आतला
परकर दिसत होता- पदर कधीच पडला. शेवटी तिने हिसडा दिला, "ही गाडी चुकली तर सत्संग चुकेल, हरिकीर्तन चुकेल. तुला गाढवाला त्याची काय पर्वा?" असे तोंडाने चाललेच होते. ती आत आली. साडी सबंध सोडून एका हाताला घेतली , पोराला सावरले व शिव्या देत देत दोन्हीकडच्या बाकांतून पुढे गेली. कंडक्टरने घंटी दिली- दाराला हाताचा अडसर केला व आत घुसणाऱ्या लोकांना मोठ्या मिनतवारीने निवारले. गाडी चालू झाली.
दारापाशी खूप दाटी झाली होती. "बाबूजी, माईजी, आगे बढो !" त्याने परत घोषणा केली व तिकिटे द्यावयाचे काम सुरू केले. "कुठ जायचे?" "कुठून बसलात आपण? अडीच आणे.".... "नाही नाही, कदापि नाही. दोनच आण्यांचं तिकिट आहे. तू लुच्चा आहेस."
शेजारची दोन तीन माणसे म्हणाली, "असेच असतात हे कंडक्टर. दर बघत नाहीत, काही नाही. तोंडाला येईल ते सांगतात. इथून तिथून लुबडण्याचा धंदा!"
"नाही, अडीच आण्याचाच दर आहे बाबूजी. हे बघा... " पलीकडचे दोघेतिघे ओरडले– "पुढच्या स्टॉपवर आम्हांला उतरायचंय. अजून तिकिटं दिली नाहीत; अशी हुज्जत घालीत बसणार आहेस, का आमची तिकिटं फाडणार आहेस?"
कंडक्टरने पहिल्या माणसाचे तिकिट फाडले व ह्या दोघातिघांचे पैसे घेऊन त्याने यांचीही तिकिटं फाडली, तो मुक्काम आला. बस थांबली. लोकं उतरू लागले. कंडक्टर घाईघाईने दरवाजाशी गेला. काहीजण उतरता उतरता पैसे देऊन तिकिटे घेऊन जात होते. दोघे विद्यार्थी उतरू लागले. "बाबूजी, तुमची तिकिटं?" "का नाही आत असताना फाडलीस? आता देतो आहे होय पैसे? विसरा बच्चंजी." दोघेही कशी फजिती केली म्हणून फिदीफिदी हसत उडी मारून पसार झाले.
क्षणभर कंडक्टरने मान वर केली; उजवा हात लांबवला. मला वाटल तो त्या विद्यार्थांच्या पाठोपाठ उडी मारून त्यांना मागे ओढणार. पण छे! सहनशीलतेची- तितिक्षेची-परिसीमा गाठण्यास शिकणे यासाठी कंडक्टरचा जन्म घेतलेल्या त्या भावी बुद्धाने तसे काही केले नाही. नवी माणसे आत यत होती. तो जरा बाजूला झाला व म्हणाला, "भाईजी, जरा आगे बढो...!"
*