भोवरा/कुंकवाची उठाठेव

विकिस्रोत कडून




 
 कुंकवाची उठाठेव


 उमार मठाच्या प्रशस्त वाचनालयात मी सकाळपासून मापे घेत होते. खाली जगन्नाथ मंदिराच्या प्रचंड पटांगणात माणसांची सारखी ये-जा चाललेली होती. सकाळ, संध्याकाळ, रात्र - केव्हाही पाहा, चौकात माणसे नाहीत असे होत नाही. सगळ्या प्रांतांचे यात्रेकरू दिसत होते. तरी मी ऐन यात्रेच्या दिवसांत गेले नव्हते. जसा दिवसाच्या चोवीस तासांत एकही तास सुना जात नाही, तसा वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांत एकही दिवस इथे यात्रेकरू नाही, असे होत नाही. माझ्या मनात आले की मी एक वर्षभर पुरीला राहिले; आणि मला रक्त दिल्याशिवाय यात्रा सफळ होणार नाही अशी कोणी यात्रेकरूंची समजूत करून दिली, तर सर्व भारताच्या रक्ताचा नमुना मला विनासायास मिळेल ! खालच्या पटांगणातील सर्वच नाही पण काही काही मंडळी वर येऊन मला मापे देऊन चालली होती. त्यांना वर घेऊन यायचे काम पुरीतलीच काही विद्वान् मित्र निष्काम बुद्धीने करीत होते.
 "हे गृहस्थ श्री .... प्रसाद. येथील सामन्तकरण. " मला मदत करणाऱ्या शास्त्रीबोवांनी सांगितले. "सामन्तकरण नाही, सम्राटकरण सर्व करणांचे मुख्य" त्या गृहस्थांनी शास्त्रीबोवांची चूक सुधारली. "सम्राट की सभ्रान्त?" असे पुटपुटत शास्त्रीजी खाली गेले व मी त्या गृहस्थाची मापे घेऊ लागले. त्या गृहस्थाची मापे झाल्यावर दुसरा काही उद्योग नसल्याने ते तेथेच बसले व मी काय करते ते पाहात पाहात मला त्यांनी आपल्या कुळाची हकीकत सांगितली; व माझ्या कामाबद्दल माहिती विचारली. कारण म्हणजे कायस्थ. पुरीच्या देवालयाचे पुजारी जसे निरनिराळे हुद्देवाले, तसेच
जमाखर्च पाहणारेही निरनिराळ्या हुद्द्याचे. रोजचा खर्च लिहिणाऱ्या कारकुनापासून तर सर्व संस्थानाचा हिशेब पाहणारे करणांचे सम्राट अशी निरनिराळी घराणी होती. त्यांतील त्यांचे घराणे मुख्य. कोणी मंडळी आली की त्यांची मापे घ्यावी, परत बसून बोलणे सुरू करावे, असे आमचे संभाषण चालले होते.
 "तुम्ही कॉलेजात शिकवता म्हणे?" मी मानेनेच होय म्हटले. हे गृहस्थ माझ्याशी बोलताना तोंडाशी उपकरणे धरून बोलत होते. मला मागून कळले की तोंडापुढे कापड धरून बोलणे हे दरबारी पद्धतीने आदर दाखवायची रीत आहे म्हणून. पण त्या वेळेला मला हा प्रकार माहीत नसल्यामुळे मला ते भारी अवघड वाटले. मला उडिया येत नव्हते, तरी सावकाश बोलले की थोडेसे समजे. त्यांना मोकडेतोडके हिंदी येत होते; तेव्हा अर्धवट हिंदी, अर्धवट उडिया असे आमचे भाषण चालले होते. "तुम्ही विलायतेला पण गेला होता वाटतं?" मी परत मानेनेच होकार दिला. "तुम्ही पोशाखात काही फरक केलेला दिसत नाही. हातांत बांगड्या, कपाळाला मोठे कुंकू, आपल्याकडचे लुगडे वगैरे दिसते आहे." सम्राटकरण परत म्हणाले. माझी मदतनीस चेहरा गंभीर ठेवून आपल्या वहीवर रेघोट्या ओढीत होती. मी अर्थात् काहीच उत्तर दिले नाही...
 "अहो, तुम्ही मानसशास्त्र शिकला म्हणता, मग सिंदूर का लावतात ते सांगा पाहू?" थोड्या वेळाने करणराजांनी मला विचारले. "मला नाही बुवा माहीत." मी प्रांजलपणे कबुली दिली. गृहस्थ किंचित् हसले व विजयी मुद्रेने त्यांनी पुन्हा विचारले, "सिंदूर कोण कोण लावतात सांगा पाहू ?" कुमारी व सधवा." मी ताबडतोब उत्तरले. "आमच्यात कुमारिका नाहा सिंदूर लावीत. मी त्याबद्दल नाही विचारले. बायकांखेरीज आणखी काण लावतात सिंदूर?" "मला नाही माहीत.", मी परत माझे अज्ञान प्रकट केल. "तुम्हांलाच काय, फारच थोड्यांना हे माहीत आहे. पूर्वी लोकांना माहीत होतं. पण हल्ली कुणालाच ठाऊक नाही. मी तुम्हांला सांगतो."
 मी मनात पुस्ती जोडली- "ही कथा शंभूने सत्ययुगात कैलास पर्वतावर पार्वतीला सांगितली. ती सनत्कुमाराने ऐकली. त्याच्यापासून नारदाला मिळाली. ती ह्या कलियुगात नष्ट झाली. पण आज संतुष्ट होऊन ही गुह्यतम कथा मी तुला सांगत आहे."-
 करणबाबू पुढे सरसावून खालच्या आवाजात बोलू लागले. "शक्तिपूजक, राजा व सुवासिनी आपल्या दोन भृकुटींमध्ये सिंदूर लावतात. सांगा पाहू ह्या तिघांनीच का असं करावं?"
 मी परत मान हलवली. "शक्तिपूजक शक्तीची उपासना करतो. त्याच्या भालप्रदेशी मोठा सिंदुराचा टिळा असतो. कोणाचीही दृष्टी तिकडे गेली म्हणजे तिथेच खिळून राहाते. मग तो आपल्या डोळ्यांनी त्या माणसाचे अंतःकरण बांधून ठेवतो व त्याला वश करतो. अशा तऱ्हेने तो आपले बळी मिळवतो. राजाही शक्तिमान् असावा लागतो. त्याच्या सर्वालंकारभूषित शरीरावरून मुखावर दृष्टी गेली की दोन भुवयांतील सिंदुराच्या ठिपक्यावर ठरते व अंतःकरण त्यात गुंतून राहते. मग राजा आपल्या रहस्यभेदी डोळ्यांनी त्या व्यक्तीला वश करून टाकतो. अशा व्यक्तीला राजद्रोह करणे शक्य होत नाही. पुरुषाचे अंतःकरण भटके असते. स्त्री जेव्हा पतीला भेटते तेव्हा पती तिची हनुवटी उचलून तिच्या मुखाकडे बघतो व त्या तेजस्वी मुखात, दोन भुवयांतील रक्ताचा थेंब जणू, अशा सिंदूरतिलकाकडे त्याची दृष्टी खिळते. त्याचे भटकणारे अंतःकरण स्त्री अशा तऱ्हेने काबीज करून ठेवते आणि म्हणूनच साध्वी स्त्रिया वर मान करून परपुरुषांकडे पाहात नाहीत. आता समजले सिंदूर का लावतात ते?" मी मानेनेच होकार दिला व इतका वेळ गोष्ट ऐकण्याच्या भरात उत्सुकतेने करणबाबूंकडे लावलेली दृष्टी मुकाट्याने माझ्या पायांकडे वळवली.

*