भूमी आणि स्त्री/समारोप
मराठवाड्यातील वा महाराष्ट्रातीलच नव्हे तर एकूण भारतातील भूमीच्या सुफलीकरणाशी जोडलेले विधी, उत्सव अत्यन्त पुरातन आहेत. त्यांच्या पृष्ठावरील जमीन, वैदिक जीवनधारणा भारतीय लोकमानसात स्थिर होण्यापूर्वीची आहे. भारतीयांच्या जगण्यात हे विधिउत्सव 'आदिबंध' रूपात गोंदले गेले आहेत.
लोकसंस्कृतीच्या हृदयातील स्पंदने जणु पं. वासुदेवशरण अग्रवालांशी संवाद करीत. ते म्हणतात की, 'लोक' हा भारतीय जीवनाचा महासमुद्र आहे. त्यात भूत, वर्तमान, भविष्य साठवलेले आहे. 'लोक' हे राष्ट्राचे अमर रूप आहे. अर्वाचीन मानवासाठी 'लोक' सर्वोच्च प्रजापती आहे. लोक, लोकधात्री भूमाता, आणि 'लोक'चे व्यक्त रूप मानव हेच आपल्या नव्या जीवनाचे अध्यात्मशास्त्र आहे. लोक, मानव आणि भूमी या त्रिपुटीत जीवनाचे कल्याणमय रूप आहे.
लोकसाहित्य - लोकसंस्कृती ही सतत प्रवाही असते. त्यामुळे ती नेहमीच नवनवोन्मेषशालिनी असते. त्याच्या अभ्यासाची पायाभरणी महाराष्ट्रात इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर आदींनी केली. चिकित्सक दृष्टी आणि योग्य दिशा देण्याचे काम दुर्गाबाई भागवतांनी केले. या शाखेला विविध अंगांनी समृद्ध करण्याचे काम रा.चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. भाऊ मांडवकर, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. दा.गो. बोरसे, डॉ. तारा परांजपे, डॉ. मोरजे, यांनी केले. डॉ. पुष्पलता करनकाळ, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. व्यवहारे, डॉ. दिनकर कुलकर्णी आदी अनेक अभ्यासक ही परंपरा पुढे नेत आहेत.
लोकसाहित्याच्या अध्ययनाचा पाया इ.स. १८६८ मध्ये मेरी फ्रिअर या लेखिकेने 'ओल्ड डेक्कन डेज' या नावाने लोककथांचे संकलन करून घातला. १८८० मध्ये मिस् स्टोक्स हिने अयोध्या प्रान्तातील लोककथा प्रसिद्ध केल्या. भारतीय लोकजीवनाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून १८८६ मध्ये बॉम्बे ॲन्थ्रॉपॉलॉजिकल सोसयटीची स्थापना झाली.
आज जग २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आज लोकसाहित्याचा अभ्यास एक स्वतंत्र अभ्यास-शाखा म्हणून होत आहे. लोकसाहित्याचा विविध अभ्यासशाखांशी जसे मानसशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान; मानववंशशास्त्र आदींशी कोणता अनुबंध आहे याचा शोध घेतला जात आहे. लोकसाहित्य ही अभ्यासशाखा एकेरी , एकांगी न राहाता ती समृद्ध आणि संपृक्त होत आहे.
व्रतांमध्ये स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असतो, व्रते ही स्त्रियांचीच असतात. वर्षाच्या बारा महिन्यांतील व्रते आज धर्माशी जोडलेली असली तरी त्यांची मुळे कोणत्या कामनेशी, भूमिकेशी गुंतलेली आहेत, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रबंधाद्वारे केला आहे. आमची लोकभूमी समृद्ध आहे. ती जेवढी खणाल तेवढे मूलधन हाती लागते. त्यातून आजच्या जीवनाचे प्रेरणास्रोत हाती लागतात.
ही व्रते, विधी, तत्संबंधी उत्सव जमिनीच्या सुफलीकरणाशी निगडित आहेत. या. विधी, व्रतोत्सवांचे मूलबंध भूमीची सुफलता वाढून मानवी जीवनास अत्यावश्यक अशा अन्नाची आणि श्रमासाठी आवश्यक अशा माणसांची समृद्धी वाढावी या कामनेशी जोडलेले आहेत. भूमी आणि अन्ननिर्मिती यांच्याशी निगडित परंपरा कृषिजीवनात खोलवर रुजलेल्या आहेत. त्या माणसाच्या जगण्याशी जोडलेल्या असल्याने मानवी विकासक्रमात वा कलौघात त्यांत फारसे बदल झाले नाहीत. काळानुरूप विधींचे व्रतांत उन्नयन झाले. त्यांच्या स्वरूपात बदल झाले. परंतु हजारो वर्षांपूर्वीचे मूलबंध कायम आहेत.
भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जन-सामर्थ्याने भारावलेल्या आदिमानवाने त्यांच्यातील साधर्म्य मनात नोंदवले. त्यातूनच भूमीची सुफलनता वाढविण्यासाठीच्या विधिउत्सवांतून स्त्री-प्रधानता आली. आदिदेवता ही स्त्रीरूपी आहे. निर्मितीचे मूलस्थान मूलस्थान असणारी 'योनी' आदिमानवाने पूजनीय मानली. जीवन प्रेरणा मानली. पुरुषाच्या सहभागाशिवाय 'योनी' ला चेतना मिळत नाही हे लक्षात येताच 'लिंग'पूजा सुरू झाली. लिंगयोनी-पूजा धर्माधिष्टित नव्हत्या. त्या 'विधि'स्वरूप होत्या. विश्वात अद्भुत शक्ती असून, ती रसमय आहे, ती प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत असते, विशेषतः स्त्रीत अधिक्याने असते अशी आदिमानवाची धारणा होती. यातुशक्तीच्या साहाय्याने सृष्टीचे नियंत्रण करता येते, या श्रद्धेतून पाऊस पडावा, जमिनीतून भरपूर धान्य यावे, त्यावरची रोगराई दूर व्हावी, यासाठी त्याने 'विधी' निर्माण केले. हे विधी सर्जनक्षमता असलेल्या स्त्रीच्या माध्यमातून केले जात. त्यांचेच कालौघात व्रतांत रूपान्तर झाले.
शेतीचा शोध स्त्रीने लावला, आणि जो समाज शेतीवर अवलंबून असतो तो मातृप्रधान असतो, या बाबी जगन्मान्य आहेत. भारतातही मातृसत्ताक समाजव्यवस्था होती. याचे संकेत या विधिउत्सवांतून मिळतात. त्यांचा उहापोह प्रस्तुत प्रबंधात केला आहे.
सुफलीकरणाशी निगडित देवता या 'लोकदेवता' आहेत. त्या वृक्षरूपी, नदीरूपी, माती,दगड या रूपात पूजिल्या जातात. या लोकदेवतांचे मूलबंध शोधण्यासाठी लोकजीवनाचे रूप न्याहाळावे लागते. 'असु' म्हणजे जादू, वा यातुशक्ती. ती ज्यांच्यात अधिक्याने असते ते असुर. रावण, विश्वकर्मा, वरुण हे असुर होते. दलितांत धर्मा, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन इत्यादी नावे ठेवली जातात. त्याच बरोबर वनात निसर्गाच्या सानिध्यात अधिक नैसर्गिक व अनौपचारिक जीवन जगणाऱ्या आदिवासींमध्ये रावण, बिभीषण इत्यादी नावे ठेवली जातात. वृक्षवेलींची नावे ही विपुल आढळतात.
भारतीय जीवनराहाटीत या समाजांचे असलेले महत्त्व आणि योगदान आदींचा अभ्यास सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आज केला जात आहे. त्यासाठी 'लोकभूमी' च्या खोलात जाऊन शोध घेतला जात आहे.
स्त्री आणि शेती यांच्यातील प्राणभूत नाते सुफलन विधिउत्सवांतून सतत जाणवत असे. या नात्याचा शोध घ्यावा, या नात्याच्या बुडाशी असलेले तिच्या सबलत्वाचे संकेत शोधावेत आणि कालप्रवाहात 'निर्बल देहस्विनी' झालेल्या स्त्रीला, भारतीय जीवनरहाटीच्या मध्यवर्ती प्रवाहात आणून, तिला 'सबल मनस्विनी' कसे करता येईल, तिच्यातील आत्मभान जागे करून तिला आत्मसिद्ध कसे करता येईल, याची दिशा शोधावी ही प्रेरणा या अभ्यासामागे होती.
भूमीच्या सुफलतेशी जोडलेल्या भारतभरच्या विधी, उत्सवांतून विलक्षण एकात्मता आहे. ती अंगभूत आहे. तिचे मूलबंध धर्माशी जोडलेले नाहीत तर माणसाच्या जगण्याशी, परंपरेने संचित केलेल्या जीवनरहाटीशी जोडलेले आहेत. भारतातील लोकमन माती, नद्या, हरितसृष्टी, निसर्गातील चढउतार यांच्याशी एकरूप झालेले आहेत. येथील माणसे
सर्वेपि सुखिनः सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दुःखभाग् भवेत ॥
ही भूमिका घेऊन जगणारी आहेत. 'सं' 'सर्वे' या शब्दातूंन व्यक्त होणारी 'समूहजीवना' ची भावना हीच 'राष्ट्र' संकल्पना नव्हे का ?
. भारतातील विधी, उत्सव रूढार्थाने धार्मिक नाहीत. ते लोकपरंपरांशी जोडलेले आहेत. भारतातील 'धर्म' ही संकल्पना संस्कृतिवाचक आहे. Religion या अर्थाने ती नाही. प्राचीन काळापासून चालत आलेल्या जीवन धारणांशी ती जोडलेली आहे. 'रिलिजन' ही संकल्पना मात्र उपासनापद्धती, संप्रदाय, पंथ यांच्याशी निगडित आहे. 'हिंदू' हा शब्द जीवनरहाटी, जीवनपद्धती दर्शवितो. या जीवनरहाटीनुसार जगणाऱ्या विविध पंथांच्या संप्रदायांच्या लोकांच्या जीवनधारणा एकच आहेत. इतिहास असे दर्शवितो की शैव, वैष्णव, वारकरी, महानुभाव यांच्यात तीव्र मतभेद झाले, तरी ते सर्व एकाच जीवनधारेत, सांस्कृतिक परंपरेत, 'हिंदू' या संकल्पनेत समाविष्ट होतात. गेल्या शंभरवर्षांत ही संकल्पना अधिक विशाल होऊन 'भारतीय' या संकल्पनेत परिवर्तित झाली आहे.
लोकसंस्कृतीचा अभ्यास केवळ सजीव अवशेषांचा अभ्यास नाही किंवा मृत पारंपरिकबाबींची चिकित्सा नाही. या अभ्यासाला कार्यात्मक मूल्य आहे. त्यातून भविष्याला चेतना व प्रेरणा मिळते. आज धर्मभेद , भाषाभेद, जातिभेद, लिंगभेद अधिक टोकदार होऊन त्यांद्वारे, भारतीय समाजाचे विघटन होईल की काय असे भय वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्राचीन भारतीय समाज एकसंघ कसा राहिला याचा उलगडा लोकसंस्कृतीच्या अभ्यासातून होतो. प्रस्तुत शोधनिबंधात ही भूमिका घेऊन सुफलीकरणाशी निगडित विधिउत्सवांचा आणि तत्संबंधी गाण्यांचा अभ्यास मांडला आहे. भारतीय एकात्म सांस्कृतिक जीवनाच्या एका पैलूचा हा अभ्यास आहे. इतर पैलूंच्या अभ्यसातून भारतातील एकात्म लोकसंस्कृतीच्या मुळाशी असलेल्या प्रेरक तत्त्वांचा शोध घेऊन भविष्याच्या दिशा शोधता येतील. त्या दृष्टीने लोकसंस्कृतीचा, लोकसाहित्याचा अभ्यास केवळ महत्त्वाचा नाही तर आवश्यक आहे हे स्पष्ट होते.