भूमी आणि स्त्री/भूमीच्या सुफलनशक्तीशी निगडीत विधीव्रतांतील स्त्रीप्रधानता

विकिस्रोत कडून


 भारतीय एकात्मतेस लोकपरंपरांचे महत्त्वाचे योगदान, धार्मिक विधीत स्त्रीची भूमिका 'मम' म्हणण्याची, व्रते, स्त्रियांचीच त्यांचे मूळ कृषिप्रधान व्यवस्थेत, वैदिक आर्याचे पुरुषप्रधान विश्न, कृषिव्यवसाय स्वीकारला पण त्याला प्रतिष्ठा दिली नाही, टोळ्यांच्या संकराचा इतिहास : संस्कृती संगमाचा इतिहास, कुत्रे नव्हे माणसेच : टॉटेमिक समाज, वर्गीय समाजाची घडण, प्रतिलोम विवाह : शूद्र जातीत गणना, कौटिलीय अर्थशास्त्र आणि स्त्रीचे अधिकार, न स्त्री स्वातंत्र्यमर्हति , मानवाच्या कल्पनासृष्टीत त्याच्या अंतःसृष्टीचे प्रतिबिंब, आजची हिंदूसंस्कृती संमिश्र, ऋग्वेदात गौरविलेली अभृणी देवता : एक अपवाद, वैदिक श्रद्धांच्या भूपृष्ठाखालची जमीन, योनिपूजा हीच विश्वजननीची पूजा, देवीपूजा आणि मातृसत्ताक समाज यातील आंतरिक अनुबंध, सिंधूसंस्कृती उत्खननानंतर हाती आलेले दुवे, यातु : महानुभावात्मक आणि समानोत्पत्तिक, पाऊस - . स्त्री - भूमी : सुफलीकरण, कृषियातुविज्ञान : पुरातन परंपरा, कृषिमंत्रात स्त्रीला महत्त्व, वामाचार : मधुरा भक्ती, भारतातील मातृसत्ता, 'माता' पूजनीय पण स्त्री ?, मातेला अधिकार नाहीत, सुफलीकरण विधीत स्त्रीच महत्वाची , कालप्रवाहात स्त्री ओझे व देहस्विनी बनली , सांस्कृतिक एकात्मतेची वाहक आणि चेतक स्त्री, दुर्गापूजा : घट बसवणे, मर्म हरवले औपचारिकता शिल्लक राहिली.


 भारतीय एकात्मतेस लोकपरंपरांचे महत्त्वाचे योगदान -
 भारतातील विविधतेच्या मुळाशी असलेले सांस्कृतिक एकात्मतेचे तत्त्व, लोकपरंपरांतून चालत आलेल्या सांस्कृतिक, भूमीच्या सुफलीकरणाशी संबंधित विधि उत्सवांतून, तत्संबंधी गीतांतून प्रतीत होत असते. गेल्या हजारो वर्षांपासून भारतात अनेक टोळ्या आल्या. त्या या भूमीत स्थिरावल्या. संघर्ष, स्वीकार,समन्वय, समरसता या चार सकारात्मक प्रक्रियांतून, सातत्याने नवस्वीकृतीची प्रक्रिया (Aglomeration) सुरू आहे. यातूनच भारतीय संस्कृतीची अभिजातता आणि एकात्मता दृढ आली आहे.
 या संस्कृतीला एकात्म करणाऱ्या साहित्य, शिल्प, संगीत, नृत्य आदी परंपरांबरोबरच, लोकपंपरांनीही फार मोठे योगदान दिले आहे. भारतीय जनतेने, अनंतकाळ प्रचलित राहणाऱ्या विधी, उत्सव, सण, कथा, कहाण्या लोकगीते, लोकनृत्याचे पदन्यास आदींच्या द्वारे भारतीय संस्कृतीच्या विकासाचा इतिहास नोंदवून ठेवला आहे. भूमीच्या सुफलनशक्तीशी निगडित विधिउत्सवांतून सतत जाणवणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचा शोध या प्रबंधातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाड्यातील लोकपरंपरा व महाराष्ट्रातील लोकपरंपरांचे, परप्रांतांतील या संदर्भातील लोकपरंपरांशी असलेले साम्य चकित करणारे आहे.
 धार्मिक विधीत स्त्रीची भूमिका 'मम' म्हणण्याची -
 व्रतवैकल्ये, विधी, उत्सव यांतच स्त्रियांचा सहभाग विशेष महत्त्वाचा असतो. होमहवनास महत्त्व असलेल्या धार्मिक विधीत मात्र पुरुष महत्त्वाचा असतो. स्त्रीची भूमिका पतीच्या हाताला हात लावून 'मम' म्हणण्यापुरती मर्यादित असते. स्त्री शेजारी असणे आवश्यक असले तरी, ती नसल्यास शेजारी सुपारी ठेवली तरी काम भागते. सुफलीकरणाशी संबंधित विधिउत्सवांत मात्र स्त्रियांचा सहभाग प्रत्यक्ष आणि महत्त्वाचा असतो. गुजरात-राजस्थानातील वा पंजाबातील हरियाली तीज असो वा कर्नाटक महाराष्ट्रातील हरितालिका-भाद्रपद तृतीया असो. या व्रतांत स्त्रियांचाच सहभाग असतो. तृतीया, षष्ठी या दिवसांना स्त्रियांच्या व्रतांत विशेष महत्त्व असल्याचे लक्षात येते. भूमीशी तिच्या सुफलनतेशी निगडित सणांत पुरुषांचा सहभाग नसतो. असल्यास नाममात्र असतो. या उत्सवांमधील 'स्त्रीप्रधानते' चा मागोवा आणि शोध या प्रकरणात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 व्रते, स्त्रियांचीच : त्यांचे मूळ कृषिप्रधान व्यवस्थेत -
 ज्येष्ठ आषाढातील वृक्षपूजा, श्रावण भाद्रपदातील नागपूजा, वारुळपूजा, जिवतीपूजा, गौरी -लक्ष्मीपूजा, आश्विन कार्तिकातील नवरात्र, दीपावली पूजा, मार्गशीर्ष पौषातील भूमीपूजा, सूर्यपूजा, माघ फाल्गुनातील स्थसप्तमी, होळी, रंगपंचमी, चैत्र वैशाखातील गौरीतृतीया- अक्षय्यतृतीया, या पूजा विधीत आणि उत्सवात स्त्रियांचाच सहभाग असतो. स्त्रियांची व्रते, पूजाविधी या संदर्भात अवनीन्द्रनाथ टागोर नोंदवतात, 'The Desire of the male and the desire of the female - the Vedic rituals were of the men, the vratas of the women - that is all the difference between two.'
 अवनीन्द्रनाथांच्या या मताबद्दल 'लोकायत'चे लेखक देवीप्रसाद चटोपाध्याय म्हणतात, २'The vratas he has rightly said, could not have been derived from the vedas, the two were aspects of two distinct cultures , so he has attributed the vratas to the Pre-Aryans.' या संर्भात स्पष्टीकरण देताना ते नोंदवितात की वैदिक आर्यांच्या प्रार्थना भरपूर धनसंपत्ती, धान्यसंपत्ती, दीर्घायुष्य, सुरक्षित आणि संकटरहित जीवन यांच्यासाठी असल्या तरी त्यात विशेष भर पशुसमृद्धीवर आहे आणि स्त्रियांच्या व्रतांत, पूजाविधीत कृषिलक्ष्मीवर, भरपूर धान्य भूमीतून निर्माण व्हावे यावर विशेष भर दिलेला आहे. धान्यराशींची पूजा, धान्याची रांगोळी, पूजाविधीत फुले, पत्री, दुर्वा यांचा अंतर्भाव त्यात असतो.
 भारतात अनेक टोळ्यांची आक्रमणे होत गेली. त्यांतून दोन सांस्कृतिक धारा निर्माण झाल्या. एक वैदिकधारा आणि दुसरी लोकधारा. या दोनही सांस्कृतिक धारांनी परस्परांना योगदान दिले आहे. वैदिकधारा ही अधिक 'नागर' आहे. तर लोकधारेत सामान्य माणसाच्या जीवनप्रेरणा समाविष्ट झालेल्या दिसतात. देवीप्रसाद आपले मत नोंदवतात की वैदिक विचारसरणीचा प्रभाव भारतात स्थिर होण्यापूर्वी, भारतातील समाज हा कृषिजीवी होता आणि मातृप्रधान जीवन व्यवस्था होती. स्त्रियांचे कृषिव्यवसायात विशेष योगदान होते. किंबहुना भूमीच्या सुफलनाशी जोडलेल्या विधीत स्त्रियांना महत्त्व असे, त्यांच्याद्वारे ते केले जात असे जगभरचा इतिहास सांगतो.
 वैदिक आर्यांचे पुरुषप्रधान विश्व -
 वैदिक समाज पशुपालक होता. कालौघात त्यांना कृषीचे महत्त्व पटले. त्यांनी कृषिव्यवसायाचा स्वीकार केला. तरीही कृषिव्यवसायाला त्यांनी श्रेष्ठत्व दिले नाही. स्त्रिया आणि कृषि यांच्यातील एकरूपता समाजमनात एवढी रुजली होती की वेदांतील कृषिविषयक ऋचांत कृषिदेवता या स्त्रीरूपी आहेत. ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलात सीता या कृषिदेवतेस आवाहन केले आहे.

अर्वाची सुभगे भव सीते वन्दामहे त्वा ।
यथा नः सुभगाससि यथानः सुफलासासि ॥
इन्द्रः सीतां गृह्णातु तां पूषानु यच्छत ।
सां नः पयस्वती दुहमुत्तरामुत्तरां समाम्  (४.५६.६.७)

 (हे समृद्धीरूप सीतादेवी, तू आम्हाला विपुल धन आणि विपुल फलसंपत्ती देण्यासाठी उपस्थित राहा, इंद्र आणि पूषन तुला मार्गदर्शन करोत. ही सीतादेवी जलसंपत्तीचा दुग्धाप्रमाणे वर्षाव करते.) या ऋचेत 'सीता' या देवीला कृषिविषयक मंत्र असल्याने आवाहन केले असले तरी 'इन्द्र आणि पूषन् तुला मार्गदर्शन करोत' असे या पुरुष देवतांना आवाहन केले आहे. कारण वैदिक आर्यांचे विचारविश्व पुरुषप्रधान आहे. पुरुषसूक्त हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विराट विश्वपुरुषाच वर्णन पुरुषवाचक आहे. उत्तरकालीन ऋचांमध्ये विश्वतत्त्व स्त्री - पुरुष लिंगभदा पलीकडचे कल्पिले असले तरी, पुरुषसूक्तात ते पुलिंगी आहे. इतकेच नाही तर त्यांचे यात्वात्मक लैंगिकविधी व मंत्र पुरुषप्रधान आहेत. त्यांची प्रतिभासृष्टा गोविषयक कल्पनांनी बहरलेली दिसते. 'गविष्टी' हा युद्धवाचक शब्द मुळात गोविषयीची कामना या अर्थाचा आहे.
 कृषिव्यवसाय स्वीकारला पण त्याला प्रतिष्ठा दिली नाही -
 वैदिक आर्यांनी भारतात स्थिरावताना कृषिव्यवसायाचा स्वीकार केला. कारण नद्यांच्या काठाने राहणाऱ्या लोकांनी कृषिव्यवस्था समृद्ध केलेली होती. आर्य टोळ्या पशुपालन अवस्थेत असेपर्यंत शेतीशी संबंध न आल्याने तांदूळ हे महत्त्वाचे धान्य, तैलबीजे त्यांना अज्ञात होती. यज्ञाविधीमध्ये दूध, तूप, लोणी मध यांचाच विनियोग सांगितला आहे.
 आजही भारतात अस्तित्वात असलेली, पशुपालनाशिवाय कोणताही व्यवसाय न करणारी तोडा या जमातीची संघटना पूर्णपणे पितृप्रधान आहे. पशुपालक समाजाची नैसर्गिक प्रवृत्तीच पुरुषप्रधान संघटनेला अनुकूल असते. पशुपालक आर्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन असल्याने, भारतात स्थिर होताना कृषि व्यवसाय स्वीकारला तरी त्याबद्दलचा तिरस्कार बोधायन, मनु यांच्या वाङ्मयातून व्यक्त होतो. सूत्रकाळात गीतेने शेती हे वैश्यांचे स्वभावज कर्म असल्याचे सांगितले आहे. बौधायन धर्म सूत्रांत मात्र बोधायन म्हणतो -

 वेदः कृषिविनाशाय कृषिर्वेद विनाशिनी ।
 शक्तिमानुभयं कुर्यादशक्तस्तु कृषि त्यजेत ।। (बो. ध.स. १.५.१०१)

शक्य असेल त्याने दोन्ही करावे. अन्यथा कृषिकर्म सोडावे. मनूचे मत-ब्राह्मण किंवा क्षत्रियाला वैश्याचे व्यवसाय करण्याची पाळी आली तर त्याने शेती वगळून अन्य व्यवसाय करावेत. शेती ही परावलंबी असून त्यात जीवहत्या होते. (१०८३-८४) आर्यांची युद्ध करण्याची हत्यारे आधुनिक होती. येथील जित लोकांकडे त्यांनी हा व्यवसाय सोपविला होता. वाढत्या लोक- संख्येला अन्न पुरविण्याची शक्ती कृषि व्यवसायात होती. त्यासाठी श्रम लागत. ते श्रम 'जिंता' कडून दासपद्धतीद्वारे करवून घेतले जात.
 भारताच्या एकात्म संस्कृतीतील 'एकात्मते' चा शोध घेताना ही एकात्मता कशी निर्माण झाली. कोणत्या परिस्थितीत झाली आणि त्यासाठी पुढाकार प्रथम कोणी घेतला याचा थोडक्यात आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.
 टोळ्यांच्या संकराचा इतिहास : संस्कृति संगमाचा इतिहास -
 भारताचा इतिहास हा अनेक टोळ्यांच्या आक्रमणांचा, त्यातून झालेल्या संकराचा इतिहास आहे. या टोळ्या ज्या प्रदेशात गेल्या, तेथे आधीपासून राहणारा समाज आणि आक्रमण करणारा समाज यातून त्या त्या परिसरात छोटी छोटी राज्ये निर्माण झाली. ती गणराज्ये होती. हा आढावा घेताना एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनाचे, वैदिक आर्य आणि लोकायतिक हे प्रमुख घटक होते. वैदिक आर्यांनी स्थानिक प्राकृत जनांच्या आचारविधींचा, त्या मागील श्रद्धांचा तिरस्कार उल्लेख केला तरीही त्यांच्या अनेक आचार विधींचा, त्यामागील श्रद्धांचा आपल्या धार्मिक व्यवहारात समावेश करून घेतला. 'शिश्नदेव' म्हणून लिंगपूजेचा तिरस्कार केला. परंतु अनार्यांचा रुद्र व शिव देवता शंकराच्या व शिवलिंगाच्या रूपात स्वीकारली गेली. या संदर्भात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे तंत्रसाधना होय.
 तांत्रिकांचा वामाचार मूलतः लोकायतिकांचा सुफलीकरण विधी होता. या विधीचे अधिष्ठान धर्म कल्पना नसून यातुकल्पनाच असावी असे ज्येष्ठ अभ्यासकांचे मत आहे. कालौघात वैदिकांनी आपल्या धर्मसाधनेत तंत्रसाधनेचा समावेश करून घेतला. भारताचा इतिहास हा संस्कृती संगमाचा इतिहास आहे. तंत्रसाधनेप्रमाणे इतरही अनेकविधी वैदिक आर्यांच्या जीवनात प्रतिष्ठित झाले. या संदर्भात देवीप्रसाद चटोपाध्यायांनी बकदाल्भ्य आणि गाणारे कुत्रे यांचे समर्पक उदाहरण देऊन विस्तृत चर्चा केली आहे . बकदाल्भ्य हा ऋषिकुमार वेदाध्यनासाठी जात असताना त्याने एक चमत्कारिक दृश्य पाहिले. काही कुत्रे एका पांढऱ्या कुत्र्याभोवती जमा होऊन 'आम्हाला मंत्रगानाने अन्न प्राप्ती करून द्या. आम्ही भुकेले आहोत' अशी मागणी करीत होते. त्या पांढऱ्या कुत्र्याने दुसऱ्या दिवशी त्यांना एकत्र येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण ज्याप्रमाणे विशिष्ट कृती करून मंत्रपठण करतात त्याप्रमाणे सर्वांनी हिंकार स्वर लावला. त्या मंत्रघोषालाच उद्गीथ-अन्नप्राप्तीसाठी मंत्रगान म्हटले जाते. छांदोग्य उपनिषदात १.३.६ मध्ये उद्गीथ गानाने विपुल अन्न प्राप्ती होते असे सांगितले आहे, बकदालभ्य हा वेदविद्येचा त्याग करून चालला होता. त्याला मंत्रगानाचे माहात्म्य सांगण्याचा हेतू उपनिषदकारांचा असावा का? कारण त्याच्या संदर्भात 'स्वाध्यायं उद्वव्राज्य' असे वाक्य वापरले आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणात बकदाल्भ्य आणि इंद्राचा संघर्ष झाल्याचा उल्लेख आहे आणि पुढे छांदोग्य उपनिषदात बकदाल्भ्य नैमिषारण्यातील लोकांना अन्नप्राप्ती करून देण्यासाठी यज्ञात उद्गाता म्हणून गेल्याचा उल्लेख आहे.
 कुत्रे नव्हे माणसेच : टॉटेमिक समाज -
 काही विद्वानांनी वरील कथेतून यज्ञसंस्था आणि ब्राह्मण पुरोहितांना येणारी मंत्रविद्या यांचे विडंबन केले आहे असे मानले. परंतु देवीप्रसाद या संदर्भात विश्लेषण करतात की हे 'कुत्रे' म्हणजे प्राथमिक अवस्थेतील माणसे आहेत. प्राथमिक अवस्थेतील माणसांची मंत्रगानाने अन्नप्राप्ती करून घेता येते अशी श्रद्धा होती. अशा तऱ्हेची श्रद्धा आजही वन्य समाजात अस्तित्वात आहे. या श्रद्धेमागे दयाळू ईश्वराची कल्पना नसून मंत्रोच्चार आणि विशिष्ट कर्म यांतील परस्परानुबंधातून निर्माण होणाऱ्या यातुसमार्थ्याची कल्पना आहे. प्राचीन भारतातील मानवसमूह वनस्पती, पशुनामधारक होते. आजही ऋग्वेद संहितेतील उपलब्ध शाखांची नावे अश्वलायन, मंडुक, शाकल अशी आहेत. अथर्ववेद संहितेच्या काही शाखांची नावेही तैत्तिरीय (तित्तरपक्षी) श्वेताश्वतर (खेचर) मांडुक्य (बेडुक) अशी आहेत. ऋषींची नावेही काश्यप (कासव), कौशिक (घुबड), शुनक (कुत्रे) अशी आहेत. महाभारतात श्वान नावाच्या मानवसमूहाचा उल्लेख आहे. यावरून असे लक्षात येते की अतिप्राचीन मानवसमूहाची कुलनामे प्राणिसृष्टी आणि वनस्पती सृष्टीची होती. त्यामागचे रहस्य मानववंश शास्त्रज्ञांनी उलगडून दाखवले आहे. आजही कुललक्षण पूजा अस्तित्वात आहे. विदर्भातील गोंड, माडिया या आदिवासी जमातीत श्रद्धापूर्वक कुललक्षणाची पूजा केली जाते. कुळाचे संकटापासून रक्षण व्हावे, शेतीतून विपुल धान्य यावे यासाठी ही पूजा केली जाते. लोकायतिक, असुर चार्वाक यांचे विधी धर्मकल्पनेवर आधारित नसून ते यातुकल्पनेवर आधारलेले होते आणि वैदिक यज्ञाचे स्वरूपही यातुप्रधान होते. मॅकडोनल, ओल्डेनबर्ग या पंडितांनी वैदिक वाङ्मयातील टॉटेनिझमचे आस्तित्व मान्य केले आहे. टॉटेमिक समाजाचे जीवन सामूहिक होते. श्रेष्ठ कनिष्ठ ही स्थाने नव्हती. मॉरेट या समाजाचे वर्णन करतो..
 The True Totemic Society knows neither kings nor subjects. It is democratic and communistic all the members of the line is it on a footing of equality with respect to their totem.
 प्राथमिक अवस्थेतील मानवसमाज याच, साम्यवादी तत्त्वावर अधिष्ठित झालेला होता. प्राचीन भारतातील अनेक लोकसमूह, वैदिक आर्य समाजातील अनेक गण याच प्रकारचे सामूहिक जीवन जगत होते. ऊन, अन्न, पाऊस आदी कामनांसाठी सामूहिक कृती. मंत्रगान केले जाई. या समूहांच्या संकरातून समाज सतत विकसत राहिला.
 वर्गीय समाजाची घडण -
 समाजाच्या विकासक्रमात अनेक लोकसमूह एकमेकांत मिसळून गेले. तसेच एकात्म गणसमाजाचे विघटन होऊन नवा वर्गीय समाज निर्माण झाला. कारण उत्पादनात वाढ होत गेली. बौद्धिक आणि अध्यात्मिक कर्म व श्रम यात विभागणी झाली. एका वर्गाला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्याच्या दृष्टीने दुसऱ्या वर्गाकडून नवी नवी साधने निर्माण केली गेली. त्यातून वर्गीय समाज घडत गेला. सामूहिक श्रमकर्माची आवश्यकता भासेनाशी झाली. त्यातून वर्गीय समाज घडत गेला. आणि या अर्थानेच भारताचा इतिहास हा संकराचा इतिहास आहे. एकात्म संस्कृतीचे एक कारण हा संकर आहे. या 'संकर' प्रक्रियेचे वर्णन, सामाजिक स्थित्यंतरांचे संकेत धर्मसूत्रात आलेल्या संकरित जातींच्या उल्लेखांमधून मिळतात. हे संकेत जाणून घेण्याअगोदर एक महत्त्वाची बाब, जी सर्वमान्य आहे ती लक्षात घेतली पाहिजे. गणसमाज मातृसत्ताक होता. कृषिप्रधान जीवनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक स्त्री होती. कारण शेती, तिची मशागत करण्याच्या पद्धती, अन्न टिकवणे व शिजवणे या कृषिसंबंधित गोष्टींचा शोध स्त्रीने लावला होता. कृषि उत्पादनात ती प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या ती समाजाचा एक महत्त्वाचा घटक होती. गणसमाजाचे विघटन होऊन वर्गीय समाजाकडे तसेच मातृसत्ताक जीवन पद्धतीकडून पितृसत्ताक जीवनपद्धतीकडे वाटचाल सुरू झाली. या आर्थिक, समाजिक बदलाच्या स्थित्यंतरांच्या काळात, संकरातून विविध जातींची उत्पत्ती झाली.
 प्रतिलोम विवाह : शूद्र जातीत गणना -
 सर्व धर्मसूत्रांनी सांगितलेल्या एकेचाळीस संकरित जातींची यादी श्री. बॅनर्जी यांनी दिली आहे. त्यातील काही अशा -

 उदा.
जात  = पुरुष  + स्त्री
रथकार  = क्षत्रिय  + ब्राह्मण
चर्मकार  = विदेहक  + बाह्मण
निषाद  = वैश्य वा शूद्र  + ब्राह्मण
धीवर (मासेमार)  = वैश्य  + क्षेत्रीय
कर्मकार  = मगध  + क्षत्रिय
नाविक  = अंबस्थ  + ब्राह्मण
 ज्या संकरात स्त्री श्रेष्ठ वर्णाची व पुरुष निम्न वर्णांचा या विवाहांना प्रतिलोम म्हटले जाते. ज्या संकरात पुरुष श्रेष्ठ वर्णाचा आणि माता निम्न वर्णाची त्याला अनुलोम म्हणतात. अनुलोम संकरात सर्वसाधारणपणे पुरुषाचा वर्ण संततीला मिळे. मात्र प्रतिलोम विवाहातून निर्माण झालेल्या जाती 'शूद्र' मानल्या गेल्या. आई श्रेष्ठ असली तरी आईची जात मुलाला मिळाली नाही. वरील सर्व संकरात माता श्रेष्ठवर्णाची आहे तर पुरुष निम्न वर्णाचा आहे. वरील सर्व जाती श्रेष्ठ नाहीत. त्या शूद्रात जमा होणान्या आहेत.
 भूमीची सुफलता वाढावी या हेतूशी जोडलेल्या विधिउत्सवांतील स्त्रीप्रधानतेचा शोध घेताना वरील विवेचन महत्त्वाचे ठरते. शेती हा व्यवसाय प्रामुख्याने वैश्य, शूद्रांचा होता. बहुजन समाजाचा होता. आजही महाराष्ट्रात कुणबी, माळी, आदी जाती शेती व्यवसायात आहे. वेगवेगळ्या आर्येतर समाजांना विविध जातीत विभागताना नेमके काय घडले असावे याचे विवेचन करताना 'समाज आणि धर्म : ऋग्वेद काळ ते पुराणकाळ' या ग्रंथात श्री. जयंत गडकरी लिहितात, 'इतर आर्येतर समाजातील पुरोहितवर्ग आणि टोळी संघप्रमुखांना वरिष्ठ वर्णीयांत सामील करून घेण्याचे विधी ब्राह्मणांनी वापरले असावेत. आर्येतर समाजातील इतर सामान्य माणसांना वर्णचौकटीत समाविष्ट करून घेण्याचा प्रश्न, त्यांना शूद्र वर्णांतर्गत जातीत घेऊन सोडवला असावा हे स्पष्टपणे दिसून येते. समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत आपले श्रेष्ठत्व नष्ट होईल या भीतीतून शुद्धत्वाची ग्वाही देण्याकरिता या समाज समूहांना खालचा दर्जा देण्याकरिता 'संकर कल्पना' शोधून काढली असावी. ज्या पुरोहित वा टोळी संघप्रमुखांना वरिष्ठ वर्गात सामील करून घेतले त्यांना ब्राह्मणवर्गात समाविष्ट करून घेतले. गुजरातेत ८४ प्रकारच्या ब्राह्मण जाती आहेत. ब्राह्मणात पंच गौड व पंचद्रविड असे १० भेद आहेत. त्यांच्यात पूर्वी बेटी व्यवहार नव्हता.
 जी स्त्री 'मातृदेवता' म्हणून पूजिली गेली, जी जीवनपद्धतीची अधिष्ठात्री होती तिची गणना 'व्यवहार' करण्याच्या एका वस्तूत झाली असे लक्षात येते. या संदर्भात एक महत्त्वाची बाब अशी. स्त्री ही 'वाहक' असते. एक स्त्री शिकली तर ती पुढच्या पिढीला, सासरमाहेरच्या कुळांत आत्मसात केलेले शिक्षण सहजपणे देत असते. आणि म्हणून स्त्रिया ज्या ज्या वर्णात गेल्या तिथे त्यांनी त्यांच्या मनात रूजलेले कृषिविषयक यातु श्रद्धांचे आदिबंध नेले. स्त्रीप्रधान जीवनव्यवस्था मुळापासून उखडून टाकण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले असावेत असे अनेक अभ्यासकांना वाटते. आणि तरीही स्त्रियांनी कृषिसुफलनाशी निगडित श्रद्धा विधिव्रतांच्या माध्यमातून, धर्माशी त्यांचे नाते जोडून जतन केल्या. हे त्यांनी जाणीवपूर्वक केले असे मुळीच नाही. मुळात कृषिसुफलनाच्या विधींचे स्वरूप 'यातु' शी जोडलेले होते. धर्माचे मूळ 'यातु' वा जादूत आहे ही वस्तुस्थिती जगन्मान्य आहे. या विधिउत्सवांना स्त्रियांनी सहजपणाने धर्माधिष्ठित कर्माशी जोडून घेतले. ही बाब समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मातृसत्ताक समाजव्यवस्थेकडून पितृसत्ताक समाजव्यवस्थेकडे जाण्याच्या वाटचलीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
 कौटिलीय अर्थशास्त्र आणि स्त्रीचे अधिकार -
 जाती, वर्ग यांत विभागलेल्या समाजाला - भारतातील समाजाला एक छत्राखाली आणण्याचा प्रयत्न प्रथम चाणक्याने केला. हे कार्य करताना कौटिल्याच्या गण आणि संघराज्यातील सामान्य कुटुंबांना नव्याने लागवडीखाली येणाऱ्या प्रदेशात, त्यांच्यात गट पाडून पाठवावे लागले. वेगवेगळ्या गण व संघ राज्यांतील कुटुंबे विखुरली गेली. परंतु एक संघटित असे राष्ट्र निर्माण झाले. नियम केले गेले. चाणक्याचा काळ मनूच्या पूर्वीचा आहे. चाणक्य स्त्रियांच्या बाबतीत वैदिक हिंदू धर्मग्रंथांपेक्षा उदार आहे. सर्व समाजांना एकाच सांस्कृतिक छत्राखाली आणण्यासाठी त्याने नियम केले. या काळात कुंटुंबसंस्था स्थिर होत गेली. विवाहाचे आठ प्रकार कल्पिले गेले. पोटगी, स्त्रीधन, घटस्फोट या बाबतचे कायदे झाले. परदेशांत गेलेल्या, राजाचा अपराध केलेल्या, पत्नीच्या जिवावर उठलेल्या पतीचा त्याग करण्याची संमती कायद्याने दिली होती (३/३ २५ ते २९) या काळात उद्योगांचा विकास झाला. मातृसत्ताक जीवनपध्दतीत सूत काढणे, विणणे हे व्यवसाय स्त्रिया करीत. त्यात त्या वाकबगार होत्या. कौटिल्याच्या काळात लोकर, अंबाडी, कापूस, वृक्षाची साल, सण यापासून सूत काढण्याचे काम स्त्रियांना दिले जाई. विधवा, पंगू स्त्रिया, कन्यका, घर सोडलेल्या वा घरातून बाहेर काढलेल्या स्त्रिया, वेश्यांचा माता, देवसेवा बंद झालेल्या देवदासी, घराबाहेर न पडणाऱ्या उच्चवर्णीय स्त्रिया यांना हे काम देण्याची व्यवस्था सूत्राध्यक्ष करी. हे काम सदर महिलांपर्यंत दासींकरवी पोहोचवावे असे लिहिले आहे. अधिकाऱ्याने स्त्रियांच्या तोंडाकडे पाहिल्यास कमी मजुरी दिल्यास त्याला दंड करण्याचे आदेश कौटिलीय अर्थशास्त्रात दिले आहेत. ही कला स्त्रियांनी गेल्या हजारो वर्षांपासून जपली आहे. 'वयन्ति ' म्हणजे सूत काढणारी स्त्री. या शब्दाला पुल्लिंग नाही. आजही हातमाग व्यवसायात स्त्रिया अधिक आहेत. दुर्वर्तनी स्त्रीपुरुषांना चाणक्याने दंड ठेवला परंतु पुरुषास स्त्रीपेक्षा दुप्पट दंड आहे. चाणक्याचे अर्थशास्त्र एका वर्गाच्या सोयीसाठी लिहिले गेले नाही. हा काळ इ.स. पू. तीसरे वा दुसरे शतक असावा. या काळातील भारतीय समाज एक छत्राखाली आला.
 न स्त्री स्वातंत्र्यमर्हति -
 यानंतरचा काळ मनुस्मृतीचा आहे. गणराज्यांच्या विघटनाबरोबरच मातृसत्ताक जीवन व्यवस्था मोडकळीस आली. तरीही स्त्रीचे आर्थिक व समाजिक स्थान पूर्णपणे दुय्यम झालेले नव्हते.त्यामुळे कौटिल्याने तिच्या अस्तित्वाचा विचार, तिच्या सामाजिक - कौटुंबिक आर्थिक प्रश्नांचा विचार माणुसकीच्या भूमिकेतून आणि समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणून केला. परंतु नागरीकरण, मालमत्ता हक्क, कुंटुबव्यवस्थेचा विकासक्रम या वाटचालीत स्त्री - पवित्र्याच्या कल्पना तिच्या देहाभोवती केन्द्रित होऊन, अधिकाधिक कठोर झाल्या. तिची गणना 'शूद्रादिकांत' केले गेली. स्त्री मग कोणत्याही वर्णाची असो 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' हे सूत्र तिला लावले गेले.
 मानवाच्या कल्पनासृष्टीत त्याच्या अंतःसृष्टीचे प्रतिबिंब -
 भूमीच्या सुफलतेशी जोडलेल्या विधिउत्सवांतील स्त्रीप्रधानतेचा शोध घेताना भारतातील मातृदेवता आणि मातृसत्ताक जीवनपद्धतीचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते. विश्वाच्या मुळाशी असलेल्या आदितत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न मानवाने आपल्या हजारो वर्षांच्या अनुभवातून, निरीक्षणातून केला. त्याच्या अदितत्त्वासंबंधीच्या कल्पनासृष्टीत त्याच्या अंतःसृष्टीचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. मानवी रूपातील जी दैवते मानवाने आदितत्त्वांसाठी कल्पिली त्यावरून मानवाच्या आत्मिक आणि सांस्कृतिक विकासाचा आलेख स्पष्ट होतो. दैवतविषयक कल्पनांचा उगम भौतिक वास्तवातून झालेला असतो. त्या दैवतांच्या साहाय्याने सामाजिक परिवर्तनामागची कारण परंपरा जाणता येते. माणसाची अंतःसृष्टी स्वयंभू नसते. दैवत कल्पना वास्तवातून आकारलेल्या असतात. त्यामुळे दैवत परिवर्तनाचा इतिहास हा मानवाच्या सामाजिक परिवर्तनाचे संकेत देणारा असतो. असे म्हटले जाते की, 'Gods are born in the minds of men.' दैवत कल्पना, त्याच्याशी निगडित श्रद्धा,कर्मकांडे, तत्त्वचिंतन या सर्वांचा जन्म मानवाच्या भौतिक जीवनानुभवातून होत असतो. माणसाच्या सामाजिक संघटनेचा आधार आर्थिक जीवनात आढळतो. आर्थिक संघटनेचे स्वरूप पालटले की समाज संघटनेतही परिवर्तन होते. मानवी जीवनाचा पाया, त्याची भौतिक - आर्थिक संघटना आहे. या संघटनेत मूलभूत परिवर्तन होताच त्याच्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कल्पना विश्वाला नवा आकार मिळतो.
 त्या त्या लोकसमूहाचे दैवत विकल्पन आणी तत्त्व चिंतन यांचा त्या लोकजीवनाच्या सामाजिक - आर्थिक जीवनाशी अतूट असा आंतरिक संबंध असतो. मानवाची अंतःसृष्टी त्याच्या भौतिक जीवनाच्या संघटनेतून विकास पावत असते. या भूमिकतेन भूमीच्या सुफलतेशी संबंधित उत्सवात स्त्रीप्रधानता का आहे याचा शोध घेता येईल. त्या दृष्टीने भारतातील मातृदेवतांची संकल्पना कोणत्या समाजिक संघटनेत आकारली, त्याचा आर्थिक आधार काय होता, वैदिक आर्यांचा या मातृदेवतांशी केव्हा व कसा संबंध आला, वैदिक आर्याहून भिन्न अशा या दैवत विकल्पनाचा भारतीय समाजावर त्यांच्या जीवनचिंतनावर, कोणता परिणाम झाला, भारतीय संस्कृतीवर या दैवतविकल्पनाचा काय परिणाम झाला याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते.
 आजची हिंदूसंस्कृती संमिश्र -
 गेल्या दोन तीन हजार वर्षांपासून भारतातील वरिष्ठ वर्णीयांच्या जीवनावर वैदिक आर्यांच्या संस्कृतीचा आणि तत्त्वचिंतनाचा घनदाट प्रभाव आहे. असे असले तरी लोक जीवनात आणि वरिष्ठ वर्णीयांच्या विधिउत्सवांत या अवैदिक मातृदेवंताचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. आजची हिंदू संस्कृती वैदिक आर्यांची एकसंध अशी संस्कृती राहिलेली नाही. तत्त्वचिंतनावर वैदिक आर्यांचा प्रभाव असला तरी विविध आचारविचारांची, श्रद्धांची , कर्मकांडांची संमिश्र अशी जीवनरहाटी, असे तिचे आजचे रूप आहे. भारतात अनेक टोळ्या आपापली दैवत विकल्पने, श्रद्धा, कर्मकांडे घेऊन आल्या. संघर्ष, स्वीकार, समन्वय, समरसता यांतून ही संमिश्र तरीही एकात्म जीवनरहाटी निर्माण झाली. म्हणूनच 'हिंदू' हा धर्म न राहता ती जगण्याची पद्धती झाली. त्यालाच आपण 'धर्म' ही संज्ञा देतो. यात वैदिक आर्यांची निसर्गपूजा, यातुप्रधान यज्ञयागादी कर्मकांडे, तांत्रिकाची वामाचारप्रधान स्त्रीसाधना, वेदान्त्यांचा ब्रह्मवाद, ऐहिक कामनापूर्तीसाठी आचारवयाची व्रतवैकल्ये, मंत्रतंत्र, ग्रामदेवता, स्थलदेवता, जलदेवता, वनस्पती वा शाकांभरी देवता, रोगनिवारण व बालकाचे पोषण करणाऱ्या देवता, अशा देवतांचे मंत्रतंत्रात्मकविधी, देवाला तृप्त करण्यासाठी पशुबळी वा मुले सोडण्याचे विधी आणि उपचार हे सारे हिंदू धर्माच्या विशाल छत्राखाली नांदतात. यातील बहुतेक विधी आर्यांच्या विचार विश्वाशी विसंगत असून ते आर्येतर समाजातून आले आहेत.
 भारतातील सर्व शक्तिपीठे अवैदिक देवी उपासनेची केंद्रे आहेत. जगदंबा, यल्लमा, रेणुका आदी स्त्री देवतांची पूजा करताना पुजाऱ्यांना स्त्रोवेश धारण करावा लागतो. या उपासना वैदिकांच्या कक्षेबाहेरच्या आहेत. विशेष करून दक्षिणेतील धार्मिक सांस्कृतिक जीवनावर अवैदिक आर्येतर समाजातील आचारविधींचा प्रभाव आढळतो. स्त्रियांच्या आणि बहुजन समाजाच्या श्रद्धाविश्वात ग्रामदेवता, भूदेवता, रोगनिवारक देवता या मातृदेवतांना प्रमुख स्थान आहे.
 घटस्थापना, नवरात्रोत्सव, सटीचे नवरात्र, गौरी गणपती, हरितालिका, चंपाषष्ठी ही व्रते-विधिउत्सव भूमीच्या सुफलीकरणाशी कसे निगडित आहेत याची चर्चा, वरील सणांचा परामर्ष घेताना विस्ताराने केली आहे.
 ऋग्वेदात गौरविलेली अंभृणी देवता : एक अपवाद -
 वैदिक आर्य भारतात आल्यावर त्यांचा येथील विविध टोळ्यांशी, त्यांच्या देवतांशी संबंध आला. आर्यांचे दैवत विकल्पन पुरुषप्रधान आहे. त्यात स्त्री देवतांना महत्त्वाचे स्थान नव्हते. भारतात आल्यावर यज्ञ विध्वंसक शिव, देवी या देवतांशी त्यांचा संपर्क आला. ऋग्वेदातील वन्य देव रूद्राशी शिवाचा संयोग करून 'शिव' ही देवता वैदिकांनी उन्नयित स्वरूपात स्वीकारली. मात्र या संदर्भात एक गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे. उत्तरकालीन वैदिक वाङ्मयात 'अंभृणी' या देवतेचा गौरव ऋषींनी केला आहे. ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात तिचे गौरवपूर्ण वर्णन आहे. ती स्वतःबद्दल म्हणते "मी मित्रवरुणांना धारण करणारी आहे. इंद्र, अग्नी, अश्विनी देव यांची मी धात्री आहे. मी विश्वावर अधिसत्ता चालविणारी, सर्वांना धन देणारी, ज्ञानसंपन्न, यज्ञीय देवतात श्रेष्ठ मीच आहे' मात्र या संदर्भात डॉ. स. रा. गाडगीळ एक महत्त्वाची बाब लक्षात आणून देतात की, या अंभृणीची ऋग्वेदात स्तुती केली पण तिला एकदाही यज्ञीय आहुती दिलेली नाही. वैदिक आर्य आपल्या मूळ निवासस्थानाकडून भारताच्या दिशेने येत असताना मध्य आशियातील स्त्रीप्रधान संस्कृतीशी त्यांचा संबंध आला असावा किंवा भारतात आल्यानंतर ही आर्यपूर्वांची देवता त्यांनी आपल्या दैवत विकल्पनात समाविष्ट करून घेतली असावी. आर्य उत्तरेकडून आले. त्यावेळी पंजाबसिंध भागात कृषि संस्कृती अस्तित्त्वात होती. कृषि संस्कृती आणि मातृदेवता यांच्यातील संबंध पाहणे महत्त्वाचे ठरते. ऋग्वेदात भारतातील असुरांबद्दल उल्लेख आहेत. ते शिवपूजक आहेत असाही उल्लेख आहे आणि शिवपूजा लिंग स्वरूपात होते. जिथे लिंगपूजा तिथे योनिपूजा असतेच.
 वैदिक श्रद्धांच्या भूपृष्ठाखालची जमीन -
 गीतेच्या १६ व्या अध्यायात म्हटले आहे की, असुरांच्या मते ही सृष्टी, 'विश्वदेखील स्त्रीपुरुष संयोगातून निर्माण झाले आहे. तसेच कामोपभोग हे जीवन सर्वस्व मानून असुरांचे एकूण आचरण असते. रावण हा असुर होता. तो शिवपूजक होता. विष्णु ही देवता जी वैदिकांची आहे. तिची मंदिरे अवतारांच्या स्वरूपात, विठ्ठल, रामकृष्ण आदी या रूपात दिसतात. शिव मात्र लोकदेवतेच्या विविध रूपांत बहुजन समाजात पूजिला जातो. तंत्रग्रंथ उत्तरकालीन असले तरी तंत्रसाधना अतिप्राचीन आहे. या साधनेत स्त्रीपूजेला महत्त्व आहे. काही ग्रंथांत शिव आणि शक्ती यांच्या संयोगाचे , स्त्रीपुरुष यांच्या संयोगाची असलेले साधर्म्य तपशीलवार वर्णिले आहे. तसेच प्रकृती पुरुष यांच्या विश्वात्मक कामक्रीडेशी (Cosmiclust) सद्भाव साधण्यासाठी वामाचार विधी सांगितले आहेत. भारतातील अनेक देवीपीठांत देवीची योनिशिल्पाच्या रूपात पूजा होते. लिंग, योनिपूजा करणाऱ्या शैव, शाक्त संप्रदायाची मुळे आर्यपूर्व समाजात आहेत. या संदर्भात भारतीय तत्त्वज्ञानाचे थोर अभ्यासक १०देवीप्रसाद चटोपाध्याय लिहितात, 'आपल्याला अनुमान काढावे लागते की, वैदिक श्रद्धांची भूपृष्ठाखालची जमीन धार्मिक दृष्टिकोनातून तयार झालेली नव्हती तर मांत्रिकांच्या यातुप्रधान दृष्टिकोनातून तयार झालेली होती.'
 योनिपूजा हीच विश्वजननीची पूजा -
 आदिमानवाला निर्मिती-पुननिर्मिती या घटनांबद्दल गूढ आकर्षण होते. भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनतेचे सामर्थ्य त्याने अनुभवलेले होते. दैनंदिन जगण्याला आवश्यक अशा गरजांची परिपूर्ती स्त्री आणि भूमी यांच्याकडूनच होते. हे लक्षात येताच त्याची ठाम समजूत झाली की या दोहोंत काही तरी अनाकलनीय जादू आहे. 'असुशक्ती' आहे. यातु सामर्थ्य आहे. या शक्तींद्वारे भूमीतून वनस्पतींचे सर्जन होते व स्त्री माणसाला जन्म देते. या साधर्म्यातून त्याने विश्वजननीची मातृदेवतेची कल्पना केली असावी. स्त्रीप्रमाणे विश्वाला जन्म देणाऱ्या जगन्मातेची योनी हे सर्जनाचे-निर्मितीचे केन्द्र कल्पून आदिमानवाने योनिपूजा११ हीच विश्वजननीची पूजा हा संकेत निश्चित केला.
 अंबुवाची उत्सव असामात अत्यन्त थाटात साजरा होतो. त्या ठिकाणी सतीची योनी गळून पडली असे मानले जाते. भारतात उपलब्ध झालेल्या योनिशिल्पांच्या आधारे निश्चित अनुमान काढता येते की, एकेकाळी सर्व केन्द्रांत देवीची उपासना होत असावी. भारतात वैदिक आर्य येण्यापूर्वी फार मोठ्या प्रमाणावर आद्यशक्तीची यात्वात्मक विधींनी पूजा केली जात असावी. निषाद, शबर या पारधजीवी जमातीतही देवीपूजा होती. मात्र वैदिक आर्यांना ती पूर्णपणे अज्ञात होती.
 देवीपूजा आणि मातृसत्ताक समाज यातील आंतरिक अनुबंध -
 मोहंजोदारो हरप्पाचे उत्खनन झाल्यानंतर भारतीय संस्कृतीचे अनेक दुवे हाती आले तो पर्यंत भारतातील मातृदेवतेची उपासना भारताबाहेरून आली असे मानले जाई. मध्य आशियातील मेसोपोटेमिया, इराक, सीरिया इ. देशांत अतिप्राचीन काळापासून ती होती. ज्या सामाजिक संघटनेत पुरुषप्रधानता असते तिथे मातृदेवतांचा विकास होणे शक्य नाही. हे मत सिंधू संस्कृतीच्या उत्खननापूर्वीच आर.पी. चंदा या मानववंशशास्त्रज्ञांनी व्यक्त केले होते. शाक्त कल्पनेनुसार विश्वाचे आदितत्त्व प्रकृती आहे. सर्जनाची इच्छा होताच तिने ब्रह्मा, विष्णु, महेश हे तीन पुरुषदेव निर्माण केले. प्रारंभीच्या निर्मितीसाठी तिला पुरुषाची गरज वाटली नाही. नंतर तिने शिवाला प्रियकर म्हणून स्वीकारले, या दोहोंच्या शिवशक्ती संयोगातून विश्व निर्माण झाले. ती जगन्माता बनली. हीच कल्पना मध्य आशियातील मातृदेवतांच्या निर्मितीमागे आहे. प्रथमतः देवी एकटी असते. आत्मदेहापासून ती जोडीदार निर्माण करते. त्यांच्याशी संयोग करून विश्वनिर्मिती करते. मध्य आशियात इसिसहोरस (इजिप्त), अंस्टॅरॉथटॅमझ (फोएनिशिया), सिबिलअँटिस (आशिया मायनर), व्हीआझ्युअस (ग्रीस) अशा नावांनी जगन्मातापितरे ओळखली जातात. मध्य आशियातील मातृसंप्रदायात, भारतातील देवीउपासना, देवदासी संप्रदाय, स्त्रीमाहात्म्य, स्त्रीपुजारिणी ही देवीसंप्रदायाची वैशिष्ट्ये होती. या संदर्भात रामाप्रसाद चंदा यांनी १९१६ मध्ये असे अनुमान काढले की मध्य आशियातील देवीसंप्रदाय ज्या प्रमाणे मातृसत्ताक समाज व्यवस्थेत निर्माण झाला. तद्वत भारतातील देवीसंप्रदाय मातृप्रधान समाज व्यवस्थेत बहुधा निर्माण झाला असावा.
 'The Shakta conception of Devi, as Adya Sakti, the promordial energy and Jagadamba, the mother of the Univerce also very probabaly are in a society where matrichate or motherkin was prevalent.'
 मध्य आशियातील देवीसंप्रदाय आणि मातृसत्ताक समाजव्यवस्थेचा आंतरिक संबंध दाखविताना श्री. चंदानी, प्रो. पॅटॉन१२ यांच्या विधानाचा आधार दिला आहे. अरबी वाळवंटातील ओॲसिस भागात मातृसत्ताक टोळ्या राहत. त्या संदर्भात प्रो. पॅटॉन म्हणतात -
 There is a large body of evidence to show that the semites before their separation passed through a matriarchal stage of society. The tribe was a group of people inhabiting in the particular oasis in the Arabian desert. It was made up of mothers, their brorthers and children. Fathers were men of other tribes in other oasis, who contracted only temporary unions with mothers. Descent was traced through the mother and she was the head of the clan in peace and war. In such a society the chief deity of the tribe must have been conceived as a counter part of the human matriarch'
 या मातृसंस्कृतीचा विकास पुढे मेसापोटेमिया, आशिया मायनर इ, प्रदेशांत झाला. इजिप्तमध्ये मातृसत्ता अगदी अलीकडच्या काळापर्यंत होती. इजिप्तची राणी जगदंबेची पुजारीण असे. राज्याचा वारसा मातेकडून निश्चित केला जाई. धर्मकृत्याचे अधिकार तिच्याकडे असत. देवीसंप्रदाय आणि मातृसत्ताक जीवनपद्धती यातील आंतरिक अनुबंध अनेक विचारवंतांनी प्रगट केला आहे. स्टार बक म्हणतो,
 "Female dieties have often enjoyed the highest place among the gods. This depends upon the nature of the social organisation and the respect in which women are held."
 सिंधू संस्कृती उत्खननानंतर हाती आलेले दुवे -
 सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मातृसत्तेचे व देवी संप्रदायाचे विपुल पुरावे उपलब्ध झाले आणि मातृसत्ता व देवीसंप्रदाय आशिया मायनरमधून भारतात आले, हा सिध्दान्त निरर्थक ठरला. उत्तरकालीन तांत्रिकाची शिव आणि शक्ती ही दैवते आर्यपूर्व सिंधुसंस्कृतीत लिंग योनी या प्रतिमांच्या रूपात पूजिली जात.
 सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेली महत्त्वाची मुद्रा जिचा उल्लेख या प्रबंधात शाकंभरी उत्सवाच्या संदर्भात आलेला आहे, ती भूमातेचे प्रतीक असली पाहिजे. खाली डोके, वर फाकलेले पाय, अशा स्त्रीच्या जननेन्द्रियातून एक वनस्पती उगवल्याचे या मुद्रेवर दाखविले आहे. सर्व विश्वाचे पोषण करणारी वनस्पतीसृष्टी जगन्मातेच्या भूमीच्या देहातून निर्माण होते हे या प्रतिमेतून सुचवायचेआहे. मार्कंडेय पुराणात जगदंबा आपल्या देहाचे वर्णन याच स्वरूपात करते. 'आत्मदेह समुद्भव' सिंधू संस्कृतीत सापडलेली ही प्रतिमा शाकंभरी देवीचीच आहे असे देवीप्रसाद चटोपाध्याय नोंदवितात. ही मुद्रा वनस्पतीसृष्टीशी जगन्मातेचा असलेला संबंध दाखवून देते.
 यातु : महानुभावात्मक आणि समानोत्पत्तिक -
 स्त्री आणि भूमी यांच्यातील साधर्म्यातून आदिमानवाचा यातुप्रधान धर्म निर्माण झाला. या दोहोंतील साधर्म्य आणि साहचर्य यांच्या निरीक्षणातून काही ठोकताळे त्याने बांधले. विश्वातील सर्व वस्तूंमध्ये 'असु' शक्ती असते. एक गूढ सामर्थ्य असते. ते सामूहिक मंत्रगान आणि विधियुक्त कर्मातून वाढविता येते. अशी आदिमानवाची श्रद्धा होती. आदिमानवाला वस्तू आणि व्यक्ती यातील भेद कळत नव्हता. या श्रद्धेतून अनेक विधी निर्माण झाले. उदा. पर्जन्यनृत्य केल्यास पाऊस पाडण्याचे सामर्थ्य माणसात येते. आदिमानवाची जीवनरीती यातुप्रधान होती. जादूविद्येचे तर्कशास्त्र अजब असते. संभवनीयता हे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. जादूविद्या दोन प्रकारची असते. एक सहानुभवात्मक (Sympathatic) दुसरी (Homeopathic) त्याला समानोत्पत्तिक म्हणता येईल. सहानुभावात्मक अभिचाराचे महत्त्वाचे तत्त्व असे आहे की वियुक्तावस्थेतही मूळ संबंध कायम राहतो. उदा. इस्त्राईल लोकात दूध तापवीत नसत. दूध तापवले तर गाईला भाजल्याचा त्रास होतो. मराठवाडा, महाराष्ट्रातही दुधाच्या कासंडीत धारा काढण्यापूर्वीच थोडेसे पाणी टाकतात. पाणी न घालता दूध तापवले तर जनावराची कास जळते अशी सर्वमान्य समजूत आहे. होमिओपॅथ यातुचे तत्त्व सारख्यातून सारखे निघते हे आहे. पावसाळ्यातली नृत्ये शेतातील डोलणाऱ्या पिकांची नक्कल करणारी असतात. या संदर्भात दुर्गाताई भागवत लिहितात, १३'मराठीतले मुलाला उभे करून दोन्हीही बाजूला झुकवून म्हणावयाचे गाणे -

वारा पाऊस चाले
शेती जोंधळा हाले.

 मला अशाच जुन्या प्रथेचा अवशेष वाटतो. प्रथा गेली. शब्द व क्रिया राहिली व ती साध्या बालरंजनात समाविष्ट झाली. फुगडी झिम्म्याचे खेळही मूळचे असेच असले पाहिजेत यात संशय नाही.'
 पाऊस - स्त्री - भूमी : सुफलीकरण -
 पाऊस पडवा यासाठी विवस्त्र स्त्रीच्या अंगावर लतावेली गुंडाळून तिच्या डोक्यावर सच्छिद् जलकुंभ दिला जातो व तिची मिरवणूक काढतात. यातील प्रतीकात्मकता सुस्पष्ट आहे. स्त्री ही भूमीरुप असून कुंभरूपी मेघांतून तिच्यावर जलवृष्टी होते. त्यातून तिच्या देहावर वनस्पती उगवल्या आहेत अशी या यातुविधीमागची कल्पना आहे. ही अनुकरणात्मक यातुविधीची कल्पना आहे. १८७४ मध्ये गोरखपूरला प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यावेळी या यातुविधीचा अवलंब केल्याची नोंद आहे. गर्भवती स्त्रीला केळीच्या झाडाखाली आंघोळ घातल्यास तिला बाळंत होण्यास त्रास होत नाही. निपुत्रिक स्त्री उघड्यावर पावसात आकंठ भिजल्यास तिला गर्भधारणा होते अशी महाराष्ट्रात, भारतात समजूत आहे. बाणभट्टाच्या हर्षचरित्रातील राणी विलासवती पुत्रप्राप्तीसाठी यंत्रपूजा करून चौकात नग्न स्नान करते असा विधी आहे. तिने केलेले स्नान तंत्रसाधनेचा एक भाग आहे हे लक्षात घेतल्यास, देवी उपासक तांत्रिकाचा वामाचार विधी भूमीच्या वा स्त्रीच्या सुफलन विधीचा एक भाग आहे हे लक्षात येते. अशा तऱ्हेच्या श्रद्धा जगभर होत्या. विशेष करून आफ्रिका, दक्षिण अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, भारत येथील यातुश्रद्धांत खूप साम्य आहे.
 १४Bushmen women and girls are careful to take shelter during a shower, for the rain from heaven which fertilises the earth would impregnate them also. Hottenlot women believe that it would be impossible for them to have any children unless they had first stood naked in a thunder shower.. Australian women likewise believe that they can be impregnated by the rain. A mongol princess conceived through the operation of hail storm.
 या परिच्छेदातील मंगोल राजकन्या आणि राणी विलासवती एकाच परंपरेतील आहेत.
 कृषियातुविज्ञान : पुरातन परंपरा -
 स्त्री आणि भूमी यांच्या साधर्म्यातून कृषियातुविज्ञान (Agri-magic) निर्माण झाले. मानवी संस्कृतीच्या इतिहासातील फार मोठा कालखंड कृषियातुविज्ञानाने व्यापलेला आहे. यातूनच मातृसत्ता, मातृदेवता, सुफलीकरण विधिउत्सवांतील स्त्रीप्रधानता यांच्यातील आंतरिक संबंधांवर प्रकाश टाकता येईल. आदिमानवाच्या महत्त्वाच्या दोन गरजा होत्या. त्या म्हणजे अन्न आणि संतती. आज जग एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना शेती आणि यातुसाधना यांचा संबंध इतका निकटचा होता यावर जगाचा विश्वास बसणे कठीण आहे. परंतु हजारो वर्षांपूर्वी धान्य निर्मितीची प्रक्रिया मानवास अवगत नव्हती. जीवन जगण्यासाठी विपुल धान्य निर्माण होणे आवश्यक होते. अर्थातच त्याकाळात धान्यनिर्मितीची क्रिया मंत्रतंत्रावर अवलंबून असते अशी आदिमानवाची श्रद्धा होती. आजही वन्य समाजात या श्रद्धेला धार्मिक माहात्म्य आले आहे. डहाणू भागातील वारली समाजात पेरणीच्या वेळी सर्व गाव एकत्र जमते. पेरणी करावयाच्या भातावर - साळीवर देवाला बळी दिलेल्या कोम्बड्याचे रक्त शिंपडतात व नंतरच पेरणी करतात. पेरलेल्या साळीचे तांदूळ घरात येईपर्यंत मटन, कोंबडी अंडी जूनच्या पावसानंतर येणारी फळे घरातील प्रमुख पुरुष आणि त्याची पत्नी खात नाहीत. तसेच हे दोघे जुना तांदूळ खातात. नासिक भागातील ठाकर लोक पेरणीपूर्वी भूमीला कोम्बड्याचा बळी देतात. धान्य हाती आल्यावर प्रत्येक जण आपापल्या शेतातील भाताची एकेक पेंढी एकत्र करतात. त्यावर बळीचे रक्त शिंपडतात. सायंकाळी त्या पेंढ्यातील नव्या तांदळाचा भात शिजवून सर्व गाव एकत्र जेवण करते. वन्य जमातीत पेरणी कापणीच्या काळात जे यातुविधी केले जातात ते आजही केले जातात, त्यांना हजारो वर्षांची वेदपूर्वकाळापासूनची परंपरा आहे.
 वैदिक आर्य भारतात आले आणि येथे स्थिर होताना त्यांनी कृषिविषयक मंत्रतंत्र विधी स्वीकारले. अथर्ववेद, तैत्तिरीय संहिता यात शेतीचे मंत्र आहेत. ऋग्वेदातही मंत्र आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात शेतीची व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यास सीताध्यक्ष म्हटले जाई. सूत्र वाङ्मयात तर शेतीच्या अनेक देवतांचा उल्लेख आहे. वैदिक आर्य मुळात गोपालक होते. मंत्रातंत्राची त्यांना गरज भासली नाही. भारतात आल्यावर त्यांनी कृषिव्यवसायाचा स्वीकार करून मंत्रतंत्रही उन्नयित स्वरूपात स्वीकारले. त्याची मीमांसा करताना थॉमसन१५ लिहितो -
 So long as they have pasture, cattle feed and breed of themselves but by comparison with cattle raising the works of tilling, sowing and reaping is now ardous and uncertain. It requires patience, foresight, faith. Accordingly agricultural society is charactarised by the extensive development of magic.
 कृषिमंत्रात स्त्रीला महत्त्व -
 कृषिविषयक मंत्रात 'स्त्री'ला महत्त्व होते. या संदर्भात देवीप्रसाद चटोपाध्याय नोंदवतात -
 If agriculture was the invention of women, then it is only logical that agricultural magic in its origin should belong exclusively to the province of women.
 प्रागइतिहास काळात शिकारीचे काम पुरुषाकडे होते. गरोदरपण, मूल जन्माला घालणे, त्याचे भरणपोषण ही जबाबादारी निसर्गतः स्त्रीकडे असल्याने तिला स्थिर व्हावे लागले. आणि निरीक्षण, पोटातील भूक यांचा मेळ घालून तिने शाक, फळे, बी जमा करण्याचे काम स्वतःकडे घेतले त्यातूनच तिने वसाहतीत राहून शेतीचा हस्तव्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. आणि शेती, शेतीशी निगडित व्यवसाय हे स्त्रीचे कार्यक्षेत्र झाले. जगातील सर्व देशांत शेतीसंबंधीच्या मंत्रतंत्र विधीत स्त्रीला महत्त्वाचे स्थान होते. ब्रिफॉने या क्षेत्रात मौलिक संशोधन केले आहे. उदा. हिदात्सा जमातीत धान्योत्सवामध्ये स्त्रिया शेतातील वनस्पतीचे तुरे काठीला बांधून नृत्य । करीत घरी येतात. नंतर अंगावरील सर्व वस्त्रे उतरवून ठेवतात. चेइनीज जमातीत धान्याची विपुल निर्मिती व्हावी यासाठी स्त्रिया धान्यनृत्य करतात. सेरोलोनेमध्ये रारूबा जमातीत स्त्रिया शेतीच्या सुफलीकरणाच्या औषधी - मंतरलेले रसायन तयार करतात. बहुतेक देशांतले पर्जन्यविधीही स्त्रियांकडे असत. कॅनरी बेटांतील ग्वांची पर्जन्यविधीसाठी स्वतंत्र स्त्री पुरोहित असत. युरोपमधील चेटक्यांची परंपरा स्त्री मांत्रिकांतून आली आहे. भारतातील अनेक जमातीतील पर्जन्यविधी स्त्रियांच्या हातात असतात. मध्य प्रदेशात भारिया स्त्रिया कर्मानृत्ये गाण्यात प्रवीण असतात, त्यांच्या नाचगाण्यात जादू असते अशी श्रद्धा आहे. देवार या भटक्या जातीच्या स्त्रिया ढोलावर उभे राहून पालित्याचे नृत्य करतात. हा एक जादूटोण्याचा प्रकार आहे असे मानतात.
 महाराष्ट्रात मुली स्वतःभोवती गिरक्या घेत 'इत्ता इत्ता पाणी - गोल गोल राणी' असे म्हणत खेळतात. त्यातून पाणी कसे वाढते ते क्रियेद्वारे अभिनित करतात आणि हा खळ पावसाच्या सुरुवातीसच अदिक्याने खेळला जातो. झिम्मा, फुगडी, कोंबडा हे सारेच खेळ स्त्रियांचे आणि कृषिसंबंधीचे आहेत.
 भारतातील देवी संप्रदायात'स्त्री' ला अत्यन्त महत्त्व आहे. महाराष्ट्रातील देवी उपासनेचे अवलोकन केल्यास स्त्रीमाहात्म्य लक्षात येते. नवरात्रात अष्टमीला स्त्रियांच्या अंगात येते. त्यांना प्रश्न, शकुन विचारतात. सप्तमातृकांची पूजा कर्नाटक, तामिळनाडू, आंध्राप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर होते. मराठवाडा परिसरात योगेश्वरी, तुळजाभवानी, माहूरची रेणुका महत्त्वाची देवींची ठाणी आहेत. पृथ्वीची प्रतीके म्हणून अनंत अशा लौकिक ग्रामदेवता गावोगाव पूजिल्या जातात.
 वामाचार : मधुरा भक्ती -
 पुरुषप्रधान संस्कृतीने मातृसत्ताक संस्कृतीची जागा घेतली तेव्हा हळूहळू धार्मिक विधी पुरुषांकडे आले. परंतु स्त्रियांच्या या क्षेत्रात पाऊल टाकताना पुरुषांना 'स्त्री' होऊन यावे लागे. आशिया मायनरमधील सिबिल देवतेचे पुजारी पौरूषाचे खच्चीकरण करूनच पुजारी होऊ शकत. महाराष्ट्रात दक्षिण भारतात यल्लमाचे पुजारी चोळीलुगडे परिधान करून मळवट भरतात. माहूर तुळजापुरचे देवी भक्त 'भुत्या' केस वाढवून, चोळीलुगडे घालतात. सुरुवातीस जगभर पौरूषाचे खच्चीकरण करून देवीचे पुजारीपण दिले जाई. पुढे कालौघात स्त्रीवेष करून स्त्रीत्व प्राप्त होते असा समज रूढ झाला.
 रामकृष्ण परमहंसांनीही स्त्रीवेश धारण करून देवीची उपासना केल्याचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. स्त्रीच्या भावात्म रूपात परमेश्वराची आळवणी करणारा संप्रदाय भारतातही होता. नाथपंथीय संस्कारांत वाढलेले कवी ज्ञानदेव परमेश्वराशी एकरूप होताना राधावृत्ती धारण करतात.

चंदनाची चोळी माझे अंगअंग जाळी
कान्हो वनमाळी वेगी भेटवा गा...
दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले
बाप रखुमादेवीसमोर मज ऐसे केले...

 या भक्तीच्या रूपाला 'मधुरा भक्ती' असे म्हटले जाते. प्राचीन काळी देवतांची उपासना, मंत्रतंत्र, मनुष्य व देव यांच्यातील मध्यस्थीचे व्यवहार स्त्रीकडेच होते. या आचारालाच तंत्रशास्त्रात वामाचार म्हणत. वामा म्हणजे स्त्री. 'वामा' होऊन आचार करणे. उपासकाने 'स्त्री' बनून उपासना करावी असा दंडकच होता.'वामा भूत्वा यजेत् परम्' असा नियम आचारभेद मंत्राने सांगितला आहे. तंत्रोपासनेत स्त्रीमाहात्म्य आहेच. तंत्र साधनेतील स्त्रीमाहात्म्य आणि कृषिकर्मातील मंत्रतंत्रातील स्त्रीमाहात्म्य यांचे स्वरूप समान आहे. भूमीचे व स्त्रीचे सुफलीकरण हेच या दोही 'वामाचारां' मागचे रहस्य आहे. वामा म्हणजे स्त्री, स्त्रीप्रधान विधी म्हणजे वामाचार. वामाचार म्हणजे कामाचार. शेतीविषयक मंत्रतंत्रात स्त्रीपुरुष संयोगाला यात्वात्मक महत्त्व असते. वैदिकांनी अन्न, गोधन व संतती यासाठी यात्वात्मक यज्ञ केले. यज्ञविधींमध्ये उच्चारल्या जाणाऱ्या मंत्रांना 'कामवर्षा' हे नाव मिळाले. वैदिकांच्या यात्वात्मक विधीतही स्त्रीपुरुष संयोग विधींना महत्त्व होते. परंतु त्या विधीत पुरुषांना महत्त्व असे. तांत्रिकांच्या विधीत शेतीशी संबंधित विधींप्रमाणे स्त्रीला महत्त्व असे.
 भारतातील मातृसत्ता-
 ऱ्हेनफेल या संशोधकाच्या मते जगातील सर्वात आधिक प्रभावी मातृसत्ता भारतात होती व तेथून ती पश्चिम व मध्य आशियात गेली. हे त्यांचे मत विवादास्पद असले तरी प्राचीन वाङ्मयात स्त्रीराज्याचे उल्लेख येतात. अर्जुनाशी युद्ध करणारी प्रमिला ही एका स्त्रीराज्याची स्वामिनी होती. ह्युएनत्संगनेही 'पूर्वेकडील स्त्रीराज्य' आणि 'पश्चिमेकडील स्त्रीराज्य' असे उल्लेख केले आहेत . तिबेटमधील न्यू बँग टोळीत स्त्रीचे राज्य होते. स्कंदपुराणात पाच लाख खेड्यांचे मिळून बनलेल्या स्त्रीराज्याचा उल्लेख आहे. मॅगेस्थेनिसने पांड्य देशातील स्त्रीराज्याची माहिती दिली आहे. पांड्य देश म्हणजेच मलबार. याभागात अगदी अलीकडेपर्यंत मातृसत्ता होती. पुराण, रामायण, महाभारत यांत स्त्रीराज्यांचे उल्लेख आलेले आहेत.
 भारतात आजही नायर आणि खासी जमातीत ही प्रथा आहे. माझ्या माहितीतल्या नायर कुटुंबातील विवाहपत्रिका आईच्या नावे काढली जाते. मात्र गेल्या ४०/५० वर्षांत या समाजातही पुरुषसत्ता वेगळ्या पद्धतीने वाढू लागली आहे. सत्तेची सूत्रे भावाच्या वा मामाच्या हातात पूर्वीपासून होती. अलीकडे 'थरवाड' कमी होऊ लागली आहेत. पत्नी पतीच्या सोबत राहू लागली आहे. मात्र एक गोष्ट विचारात घेणे महत्त्वाचे ठरते. दक्षिणेत कर्नाटकी ब्राह्मण समाजात मामाशी भाचीचा विवाह परंपरने होतो. मुंजीच्या वेळी भाचा ब्रह्मचर्याची शपथ घेऊन संसार त्याग करू लागतो तेव्हा मामा त्याला अडवतो आणि मुलगी देण्याचे आश्वासन देतो. महाराष्ट्रात आत्याच्या घरी मुलगी देण्याची प्रथा आजही आहे. मातृसत्ताक जीवन पद्धतीचे हे अंधुक अवशेष आहेत.
 माणसाचे अधिकार, त्याची कुटुंब व समाजविषयक कर्तव्ये त्याच्या वरील सामाजिक बंधने या सर्वाचे नियमन, स्त्रीकडून येणाऱ्या वारसा पद्धतीने होते तेव्हा त्या समाजपद्धतीला मातृसमाज पद्धती म्हणतात. या समाजात सण, उत्सवात पतीला विशेष मानाचे स्थान नसते. नायर कुटुंबाचे वैशिष्ट्य खालील शब्दात व्यक्त झाले आहे.
 १६The Nayar family, or Tarwad consists of a woman and her sons and daughters and so on. The son's children do not belong to that Tarwad but are affiliated to Tarwads of their wives. The property of a Tarwad is practically impartible and is looked after by the karnavan the mothers brother. Nayar women are entitled to keep more than one husband and this is only possible in a matriarcal residence where husbands are occasional visitors only..... the children have no tie with him"
 काही संशोधक असे मानतात की, सिंधू संस्कृतीतील मातृसत्ताक समाज आर्यांच्या आक्रमणानंतर सरकत सरकत दक्षिणेकडे आले. आपली प्राथमिक शेती व्यवसाय करीत राहिले. हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही त्यांच्यावर वैदिक आर्यांच्या जीवनपद्धतीचा परिणाम झाला नाही.
 मातृसत्ताक समाजाच्या जीवनव्यवस्थेत 'प्रकृतिप्रधान'ता होती. सांख्यांनी भौतिक दृष्टिकोनातून विश्वविकासाची मीमांसा करण्याचा भव्य आणि तर्कनिष्ठ प्रयत्न सांख्यदर्शनातून केला. प्रकृतिपुरुष विचाराला तत्त्वचिंतनाच्या पातळीवर आणून सोडले. प्रकृती हेच विश्वाचे आदिकारण असून विश्वाचा पसारा तिच्यापासून निर्माण होतो. पुरुषाचे स्थान केवळ प्रकृतीला 'भेटणारा' एवढेच आहे. पिता हा निमित्तमात्र म्हणजे जन्मदाता, एवढेच मानले आहे. तांत्रिकांच्या मंत्रतंत्रादी आचारावर भर असलेल्या कर्मकांडांतून बाहेर पडून सांख्यांनी त्याला नैतिक अधिष्ठान दिले.
  'माता' पूजनीय पण स्त्री? -
 एकूण भारतीय संस्कृतीत 'माता' पूजनीय असली तरी 'स्त्री' म्हणून तिला समाजात दुय्यम स्थान आहे. 'कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति' 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियासि' यासारखी वचने वैदिक वाङ्मयात आढळतात. पण दुसऱ्या बाजूला १७'स्त्रीशूद्रौनाधीयाताम्' स्त्री व शूद्रांनी अध्ययन करू नये हा नियम घालून दिला. किंबहुना 'स्त्रीशूद्र' असा द्वंद्व समाज रूढ करून दोघांना समान नियम लावले. मनू म्हणतो, 'स्त्रीशूद्राश्च सधर्माणः' बोधायनसूत्र सांगते, शूद्राच्या हत्येसाठी जे प्रायश्चित्त आहे तेच स्त्रीच्या हत्येसाठी आहे. स्त्रिया आणि शूद्रांनी विष्णु किंवा शिवलिंगास दुरून स्पर्श न करता वंदन करावे. या दोहोंनी स्पर्श केलेल्या लिंगाची वा मूर्तीची पूजा करणाऱ्याची कोटी कुले नरकात पडतील. त्यांना पूजेचे फळ हवे असल्यास ब्राह्मणाकडून पूजा करावी असे निर्णय सिंधू सांगतो. आणि पुराणे ही स्त्री शूद्रांसाठी दयाबुद्धीने तयार केली आहेत असे देवीभागवतात म्हटले आहे. स्त्रियांची निंदा एकूणच ग्रंथांतून विविधप्रकारे केली आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वात म्हटले आहे 'क्षुरधारा विषं सर्पो वाह्निः इति एकतः स्त्रियः' वस्तऱ्याची धार, विष, साप आणि अग्नी हे सर्व एकत्रितपणे स्त्रीमध्ये आढळतात. कथा सरित् सागरातील अनेक सुभाषितांतून स्त्रीनिंदा आहे. उदा. स्त्रियांच्या ओठात अमृत पण ओटीत मात्र विषच असते. 'स्त्रियःश्चरित्रपुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः ?' हे वचन प्रसिद्ध आहे. एका कवीने तर मृत्यूच्या चार दारांपैकी एक 'प्रमदाजनविश्वास' स्त्रियांवरील विश्वास हे सांगितले आहे (पूर्वोक्त भांडागार पृ. १६९ श्लोक ८९) एकूणच स्त्रिया अविश्वसनीय, गूढ, चंचल, घातक, कठोर, धूर्त, चरित्रहीन, भोगातुर, अधःपतनाचे कारण असतात अशी भूमिका वैदिक संस्कृत वाङ्मयात मांडलेली आढळते. 'आई' या पदाचा, नात्याचा गौरव केला तरी तिला (स्वामी विद्यानंद सरस्वती, वेदमीमांसा दिल्ली १९८४ पृ. २३०- २३३) अधिकार दिलेले नाहीत.
 मातेला अधिकार नाहीत -
 नारद स्मृतीत म्हटले आहे, वडीलांनी स्वतःच कन्यादान करावे व जिला वडील नसतील तर भावाने, वडिलांच्या पित्याने, वडिलांच्या कुळातील पुरुषाने अथवा मामाने करावे. या सर्वापैकी कोणीच नसेल आणि मुलीची आई शरीराने वा मनाने स्वस्थ असेल तर तिने करावे. या वरून धर्मशास्त्रानी वरवर पाहता 'माता' या पदाचा केलेला गौरव किती वरकरणी आहे ते लक्षात येते. शास्त्रकारांना आईविषयी खरोखरच आदर असता तर वडिलांनंतर तिचा क्रम लावायला हवा होता. कौटिल्यानेही आईला स्वतंत्रपणे आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. याला अपवाद एकमेव १८वराहमिहिराचा आहे. त्याने मात्र बृहत्संहितेत या निंदकांची परखड हजेरी घेतली आहे. वराहमिहिराच्या काळाबद्दल इ.पू. ३ रे शतक की इ.स. ६ वे शतक हा वाद आहे. असे असले तरी त्या एकमेव विद्वानाने अत्यन्त कठोर शब्दात, तर्कशुद्ध पद्धतीने स्त्रियांचा कैवार घेतला आहे. आपल्या बृहत्संहिता ग्रंथात तो म्हणतो, 'स्त्रियांचा असा कोणता दोष आहे जो पुरुषांच्या आचरणात आढळत नाही. विकृत आचरण करणारा पुरुष कमी दोषी आणि स्त्री आधिक दोषी असे सांगण्यात आलेले नाही. पुरुष नियमांचे पालन करीत नाहीत. स्त्रिया मात्र करतात. म्हणून त्याच श्रेष्ठ आहेत. स्त्री ही पुरुषाची पत्नी असते वा माता असते. पुरुषाचा जन्म स्त्रीपासून झालेला असतो. स्त्रियांची निंदा करणाऱ्यांना सुख कसे लाभेल?' पण वराहमिहिरासारखे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके. स्त्री कितीही चांगली वागली तरी पुरुषाचे समाधान करू शकत नाही ही भावना कवी भवभूतीने 'उत्तररामचरित' या नाटकात पात्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली आहे. तो म्हणतो, 'वाणी व स्त्रिया यांच्या शुद्धत्वावर ठपका ठेवताना लोक दुर्जनतेने वागतात, एवढेच नव्हे तर अतिदुर्जनतेने वागतात असे म्हटले पाहिजे. हे अपवाद सोडले तर धर्माची एकूण भूमिका 'स्त्री' निंदकाची आहे.
 सुफलीकरण विधीत स्त्रीच महत्त्वाची -
 स्त्रीमध्ये सुफलीकरणाची अद्भुत शक्ती आहे. भूमीचे सुफलीकरण करण्यासाठी तिचा तिच्यातील यातुशक्तीचा उपयोग करून घ्यावा हे तर्कशास्त्र कृषिविधानात वापरले गेले. झाडाचे पहिले फळ सवत्स स्त्रीला देतात. ज्या स्त्रीला मुले अधिक तिच्याकडून पेरणीस सुरुवात करायची ही प्रथा आजही शेतकरी समाजात आहे.
 A fruitful woman makes plants fruitful, a barren woman makes them barren.
 भूमी आणि स्त्री यांच्यातील साधर्म्य साहचर्यातून अनेक परंपरा निर्माण झाल्या आहेत. मूल जन्माला आले की आजही ते जमिनीवर ठेवतात. खेड्यात ही प्रथा आहे. संस्कृतमध्ये 'अपत्य संभव' या शब्दासाठी 'भूमिस्थ' असा शब्द आहे. बिफ्रॉं म्हणतो -
 The fecundity of the earth and the fecundity of women viewed as being one and the same quality.
 कालप्रवाहात स्त्री ओझे व देहस्विनी बनली -
 संस्कृतीच्या विकास क्रमात स्त्रीसत्ताक समाज व्यवस्था नाहीशी होऊन पुरुषकेन्द्री समाजव्यवस्था काही अपवाद वगळता सर्वत्र आली. केरळातील नायर समाज वरवर पाहता मातृसत्ताक राहिला तरी थरवाडातील सर्व महत्त्वाचे व्यवहार भाऊ पाहू लागला. पुरुषकेन्द्री समाज व्यवस्था आली, स्त्रीचा समाजिक दर्जा दुय्यम, बिनमहत्त्वाचा झाला, हुंडा पद्धतीमुळे ती कुटुंबातले 'ओझे' झाली, आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्ष अर्थकारणातील सहभाग संपला. त्यातून अनेक कुप्रथा निर्माण झाल्या. उदा. राजस्थानात मुलगी झाली की तिला चांदीच्या बादलीत दूध ठेवून त्यात नवजात बालिकेला बुडवून ठार मारीत. तिचा देह मातेच्याच खाटेखाली पुरत. तिने पुढील जन्म मुलाचा घ्यावा ही अपेक्षा. अशा प्रकाराला 'दूधमुही' म्हणतात. राजस्थानात अशा मातेला मी भेटले आहे. तर तामिळनाडूत उसलामपट्टी जिल्ह्यातील कल्लार समाजात मुलगी जन्मताच तिला ठार मारण्याची प्रथा आहे. फक्त एक मुलगी जिवंत ठेवतात. आईने मुलगी ठार मारण्यास विरोध केला तर तिला नवरा टाकून देतो. मुलगा व्हावा म्हणून नाजूक अंगाला सुई टोचण्याचा विधी स्त्रियांना करवून घ्यावा लागतो. महाराष्ट्रातील लोककथांत बाई बाळंत झाली की 'तुला मुसळच झाले', 'तुला कुंचा झाला' असे सांगितल्याचे संदर्भ सापडतात.
 संस्कृतीच्या विकास क्रमात, 'आत्मदेहसमुद्भव' माझ्या देहातून वनस्पतीसृष्टी निर्माण करून संपूर्ण जगाचे मी पोषण करीन असे सांगणारी शाकंभरी - बनशंकरी - दुर्गा केवळ व्रतात विधिउत्सवात बंद झाली. 'मी मित्रवरुणांची धारणपोषण करणारी आहे. अग्नी, इंद्र, अश्विनी देव यांची धात्री मात्र आहे. सोमाला सामर्थ्य मीच देते... सर्व विश्वावर अधिसत्ता चालविणारी मीच आहे. सारे प्राणिमात्र माझ्या कृपेने जगतात. अन्नउदक चलनवलनाचे सामर्थ्य सर्व माझ्यामुळेच त्यांना मिळते. असे सांगणारी ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात भेटणारी अंभृणी या साऱ्याच देवता, ज्यांचे स्वतंत्र अस्तित्व होते त्यांचे मनस्वीपण हरवले. त्यांचे प्रत्यक्षरूप स्त्रीत पाहिले गेले ती 'स्वयंपूर्णा', 'स्वयंसिध्दा', 'मनस्विनी' स्त्री केवळ 'देहस्विनी' उरली. वैदिकांपूर्वीच्या कृषिप्रधान जीवनव्यवस्थेतील मातृसत्ताक जीवन व्यवस्थेतील स्त्री उत्पादनात सहभागी होती. समाजाच्या सामाजिक,आर्थिक, कुलाच्या संघटनात ती केन्द्रबिंदू होती. तिचे महत्त्व मुलाला जन्म देणारी म्हणून इतपतच शिल्लक राहिले. तिचे अस्तित्व आणि भाग्य 'मुलग्याची' आई आणि 'जिवंत असलेल्या पतीची 'पत्नी' इथवर मर्यादित झाले.
 सांस्कृतिक एकात्मतेची वाहक आणि चेतक स्त्री -
 सुफलनविधी उत्सवांतील स्त्रीप्रधानता, देवीमाहात्म्य : मातृसत्ताक कृषिसंस्कृती यांतील अनुबंधातून आली आहे. हे निखळ सत्य आहे. आजची हिंदू संस्कृती अनेकविध टोळ्यांच्या सांस्कृतिक संकरातून निर्माण झाली असून या संस्कृतीच्या एकात्मतेचा गाभा या 'संकरात' आहे. संघर्ष, स्वीकार, समन्वय, समरसता या प्रक्रियेतून ही एकात्मता झाली असून त्याच्या वाहक आणि चेतक स्त्रिया आहेत. मातृसत्ताक समाज पद्धती, गणसत्ता व कृषिसंस्कृतीचे परिवर्तन होऊन समाजात वर्ग निर्माण झाले. विविध जातिजमातीत समाज विभागला जाताना, त्या जाती शूद्रात घालायच्या की वरिष्ठात घालायच्या हे अनुलोमप्रतिलोम विवाहांतून ठरवले गेले. हा काळ मातृसत्तकेडून पुरुषसत्ताक पुरुषकेन्द्री व्यवस्थेकडे जाण्याचा काळ असल्याने वरिष्ठ वर्णाच्या स्त्रीने कनिष्ठ वर्णाच्या पुरुषाशी समागम... विवाह केल्याने निर्माण होणाऱ्या संततीवर शूद्र जातीचा शिक्का मारला गेला. पुरुष ज्या वर्णाचा असेल त्यावर संततीचा दर्जा ठरू लागला. वरिष्ठ वर्णाच्या स्त्रियांनी कनिष्ठ वर्णाच्या पुरुषाशी विवाहसंबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा झाला. या संदर्भातील विवेचन यापूर्वी केले आहे. स्त्रिया आणि कृषिविधान यांचे आंतरिक दृढ नाते असल्याने त्या, ज्या ज्या वर्णात गेल्या, त्या त्या ठिकाणी सुफलता विधींबद्दलचे 'आदिबंध' त्यांनी नेले. सुफलन विधींतील यातुश्रद्धा , विधी, सामूहिक कृतिशीलता, सामूहिक नृत्य आणि मंत्रगीते यांच्यात बदल होऊन त्यांचे रूपान्तर व्रते, उत्सव, सण यांत झाले. त्यांच्यातील स्त्रीप्रधानता मात्र कायम राहिली. गेल्या दोन हजार वर्षांपासून भारताच्या एकूण समाज जीवनावर वैदिक परंपरेचा प्रभाव दिसतो. परंतु या परंपरेने पूर्व वैदिक परंपरेत निर्माण झालेल्या कृषिसंबंधित यातुश्रद्धा, सण, विधी, व्रते, उत्सव यांच्या माध्यमातून स्वीकारल्या. धार्मिक अधिष्ठानात त्यांना महत्त्वाचे स्थान दिले. गौरीगणपती - मराठवाड्यातील लक्ष्म्या, हरतालिका, नवरात्र, घटस्थापना, भोंडला, भुलाबाई भराडीगौर आदी कुमारिकांचे खेळोत्सव, शाकंभरी नवरात्र, चंपाषष्ठी आदी व्रतांचा वैदिक धर्म संस्कृतीशी काहीही संबंध नाही हे सण हे सर्व विधी, उत्सव, वनस्पती सृष्टीच्या सुफलीकरणाचे आहेत.
 दुर्गापूजा : घट बसवणे -
 वरील सर्वच व्रते स्त्रीप्रधान आहेत. महाराष्ट्र मराठवाड्यातील श्रावण, भाद्रपदातील सर्व व्रतांचा सूक्ष्मपणे अभ्यास केल्यास त्यातील स्त्रीमाहात्म्य आणि त्यातील स्त्री आणि भूमी यांच्या सुफलीकरण विधीचे रहस्य सहजपणे लक्षात येते. दुर्गापूर येथील दुर्गापूजा पूर्वी 'पूर्ण घट' रूपानेच केली जाई. देवीप्रसाद चटोपाध्यायांनी त्या विधीचे सविस्तर वर्णन केले आहे. मातीच्या चौकोनी सपाट ओट्यावर पाच प्रकारची धान्ये पसरून त्यावर जलाने भरलेला मृत्तिका घट ठेवतात. घटाच्या मुखावर पाच प्रकारच्या वनस्पतींची पाने ठेवून त्यावर असोला नारळ ठेवतात. घटावर लहान मुलांची कुंकवाने आकृती काढतात. नारळाला कुंकू लावतात. हा पूर्ण घट ज्या मृत्तिकेवर ठेवतात त्यावर श्रीयंत्राची आकृती काढतात. या आकृतीला 'सर्वतो भद्र मंडलम्' असे नाव आहे. यापूर्वी स्त्री व्रतांची चर्चा करताना कोकणस्थ ब्राह्मणात बोडण भरतात. त्याची विस्तृत माहिती दिली आहे. बोडणाच्या परातीखाली वा समोर विशिष्ट प्रकारची रांगोळी काढतात. पारंपरिक रांगोळ्या आणि स्त्री यांच्या अतूट नात्याबद्दलची चर्चाही यापूर्वी केली आहे. रांगोळी न येणारी स्त्री शोधून सापडणार नाही. रांगोळी हा शुभकारक यंत्राचाच एक भाग आहे.

 तंत्रशास्त्राला अनुरूप काढलेली श्रीयंत्राची आकृती स्त्री योनीचे प्रतीक आहे. या संदर्भात देवीप्रसाद चटोपाध्याय१९ लिहितात -
 "We may easily see the significance of Purna Ghata, being placed on the sarvabhadra mandalam. Plants and fruits are brought into contact with the female reproductive organ. The same idea is repeated in the Purna Ghata itself. The vessel is the female womb, that this womb is with a baby is indicated by the picture of sindur puptali. It is thus an enactment of human reproduction .. But why this enactment of human reproduction? Obivously to ensure the multiplication of the fruits, plants and leaves. That is why they are brought in contact with female reproductive organ."
 मराठवाडा महाराष्ट्रात 'घट बसवणे' हा शब्द नवरात्रीसाठी वापरला जातो. सटीचे नवरात्र असो वा शाकंभरीचे, 'घट बसणे' हा विधी असतोच. या विधिउत्सवाची सविस्तर चर्चा या पूर्वी केली आहे. या व्रतात स्त्रीप्रधानता असल्यामुळे पत्री, फुले,फळे, धान्य, पाणी, माती, मातीचे घट, दुर्वांकुर, विविध प्रकारच्या भाज्या, अन्नप्रकार, रांगोळ्यांच्या विशिष्ट आकृती, धान्याची चौक मांडणी आदी बाबींना विशेष महत्त्व असते. वर्षनाशी संबंधित भूमीचे सुफलता विधी पाऊसकाळात आधिक्याने येतात. या सर्व विधीउत्सवांची सविस्तर चर्चा यापूर्वी केलेली आहे.
 मर्म हरवले : औपचारिकता शिल्लक राहिली -
 सुफलन विधिउत्सवांचे स्वरूपांतील स्त्रीप्रधानता राहिली मात्र त्यातील तिच्या 'स्त्रीत्वा' चा गौरव, तिचे सामाजिक आर्थिक संघटनेतील महत्त्व व सहभाग या बाबी नाहीशा झाल्या. सुफलन विधींमध्ये असलेल्या 'स्त्री' या व्यक्तीचा आत्मसन्मान होता. तिच्यातील गुणांना सामाजिक मान्यता होती. समाजाचा महत्त्वाचा घटक असलेली स्त्री, समाजाच्या आवश्यक अशा दैनंदिन गरजा-अन्न, वस्त्र निर्माण करणारी होती. आजही शेतीची मशागत स्त्रियाच प्रामुख्याने करतात. शंभर वर्षा पूर्वीपर्यंत ग्रामीण भागात डाळी-साळी तयार करणे, शेतीसाठी लागणाऱ्या बीजकरणासाठी शेतातील चांगली कणसे, फळे, भाजीपाला राखून त्यांपासून चांगले बीज तयार करणे. दळणकांडण करणे आणि अन्न शिजविणे या सर्व गोष्टी कुटुंबातील स्त्रियाच करीत. परंतु समाजात पुरुषप्रधान जीवन व्यवस्था आली, राज्यव्यवस्था आली, उत्पादनाच्या आणि युद्धाच्या साधनांचा विकास होऊ लागला आणि स्त्रियांचे समाजातील महत्त्व कमी झाले. त्या 'दास 'झाल्या. समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणून त्यांचे उत्पादनात असलेले स्वयंभू महत्त्व संपले. त्यांचे कष्ट, श्रम कमी झाले नाहीत. त्यांच्या जोडीला समाजातील दुर्बल घटक म्हणून त्यांच्यावर होणारे अत्याचार मात्र वाढले.
 भूमीच्या सुफलनाशी निगडित विधिव्रतामधून असलेला स्त्रियांचा सहभाग सजग झाला, त्यामागील तिच्या कर्तृत्वाची, ती आणि भूमी यांच्यातील सकारात्मक अनुबंधाची जाणीव तिला झाली तर सामान्य भारतीय स्त्रीला आत्मभान येऊ शकते. या व्रतांचा ती नव्या संदर्भात आणि नव्या भूमिकेतून विचार करू शकते. त्यामुळे या व्रतात आलेली निर्ममता, औपचारिकता, कचकडीपणा नाहीसा होईल. आज ही व्रते 'रीत' म्हणून 'देवाचे केले नाही तर अरिष्ट कोसळेल' या भीतीतून केली जातात. या विधीत स्त्रीचे अहेवपण महत्त्वाचे झाले. त्यामुळे प्रत्यक्ष श्रम करणारी स्त्री या विधिउत्सवांपासून दूर ठेवली गेली.
 या विधिउत्सवामध्ये परिवर्तन घडविणाऱ्या, या व्रतातील सामूहिकता जागवून ती समाजोपयोगी करण्याचा प्रयत्न काही सुशिक्षित महिलांनी केला. उदा. संक्रान्तीच्या हळदीकुंकवाच्या वेळी वाटायचे वाण न वाटता ते पैसे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना देणे वगैरे, पण तो प्रयत्न वरवरचा होता. भूमीच्या सुफलनाशी जोडलेले विधिउत्सव भारतातील सर्व स्तरांतील स्त्रिया श्रद्धेने आचरतात. या विधिउत्सवांचा अभ्यास करून त्यांना स्त्रियांच्या सबलीकरणासाठी सकारात्मक रूप देता येते. तसा प्रयत्न सामूहिकपणे व्हायला हवा. लोकमान्य टिळकानी गणेशचतुर्थीचे सकारात्मक रूप जनसामान्यांत रुजवले. त्या वळणाचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.
 ऱ्हेनफेलच्या मते सर्वात प्रभावी मातृसत्ता भारतातच होती. गेल्या ३/४ हजार वर्षांपासून तिला मुळापासून उखडण्याचा सतत प्रयत्न झाला. त्याचा आढावा यापूर्वी घेतला आहेच. असे असूनही भारतीय सामाजिक, सांस्कृतिक जीवनात तिच्या अस्तित्वाचे अवशेष विधिउत्सवांच्या माध्यमातून विशेष करून सुफलन विधिउत्सवांच्या माध्यमातून संकेत रूपाने टिकून आहेत. मातृसत्ताक जीवनव्यवस्था नष्ट करण्यासाठी तीन कठोर उपाय वापरले. बालविवाह, बहुपत्निकत्व आणि सतीची चाल. हे उपाय हजारो वर्षांपासून वापरले जात आहेत. त्यामुळे भारतीय स्त्रीत्वातील शक्ती निस्तेज झाली आहे. ते दुर्बळ, अंधश्रद्ध, तर्क विचार यांपासून दूर गेलेले, गतानुगतिक बनले आहे. स्त्रीतत्वाला आत्मभान देऊन सचेत करायचे असेल तर या सुफलीकरणाशी निगडित विधिउत्सवांच्या, त्यामागील स्त्रीच्या समर्थ अस्तित्वाच्या खुणांचा शोध घ्यायला हवा' या विधिउत्सवांच्या गाभ्यातली स्त्रीच्या मानसिक, शारीरिक, कृषिप्रधान सामर्थ्याची ओळख समाजाला करून द्यायला हवी. त्यातून स्त्रियांच्यातील आत्मविश्वास जागा करता येऊ शकतो. आदिकाळात, त्यानंतरही त्यांनी बजावलेल्या समाज कुटुंबातील महत्त्वाच्या भूमिकेची ओळख करून देऊन समाजात त्यांच्याविषयी नवी दृष्टी निर्माण करता येऊ शकते. सुफलीकरण विधिउत्सवांतील 'स्त्रीप्रधानता' तत्कालीन समाजातील स्त्रीच्या आर्थिक, समाजिक संघटनातील समर्थ भूमिकेतून आलेली आहे. या भूमिकेचे स्वरूप सर्वसामान्य स्त्रीपर्यंत आणि समाजापर्यंत विसाव्या शतकातील 'सामाजिक न्यायाच्या' विचारमुशीतून नेऊन पोहोचविले तर एकविसाव्या शतकात प्रवेश करणारी भारतीय स्त्री सबल, सुजाण होऊ शकेल आणि भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेची वीण अधिक सधन आणि घट्ट होईल.