Jump to content

भारतीय लोकसत्ता/राजकीय पुनर्घटना

विकिस्रोत कडून
जीवनाचीं सर्व अंगोपांगें तपासून पाहिल्यावांचून लोकसत्तेचें यशापयश अजमावितां येणार नाहीं किंवा पुढील काळांतील निश्चित आंखणीहि करतां येणार नाहीं. म्हणून त्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षणास आतां प्रारंभ करूं.



प्रकरण नववें

राजकीय पुनर्घटना

लोकजागृति व लोकसंघटना

 या भूमीला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर येथील लोकसत्ता सुदृढं करण्यासाठीं भारतीय जीवनाची सर्वागीण पुनर्घटना करण्याचे काँग्रेसने व जनतेनें जे प्रयत्न चालविले आहेत, त्यांच्या यशापयशाचे मूल्यमापन आपण करीत आहोत. लोकशाहीच्या विकासासाठी राजकीय, आर्थिक, सामाजिक इ. सर्व अंगांची पुनर्घटना होणे म्हणजे एका परीने या सनातन भूमीचा पुनर्जन्मच होणें अवश्य आहे. या सर्व अंगांना आपापल्या दृष्टीनें महत्त्व असले तरी त्या सर्वांत राजकीय पुनर्घटना ही अधिक महत्त्वाची आहे, याबद्दल फार दुमत होणार नाहीं. आर्थिक समतेवांचून राजकीय क्षेत्रांतील समतेला वा स्वातंत्र्याला फारसा अर्थ नाहीं हें कितीहि खरे असले तरी, राजकीय क्षेत्रांतील जनतेची प्रबुद्धता, त्या क्षेत्रांतील समता व स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे, हा विचार आपण कधीहि दृष्टिआड होऊं देतां कामा नये. मार्क्सवादाच्या व सोव्हिएट रशियाच्या प्रचारामुळे आज लोकशाहीसंबंधीं अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होत आहेत. राजकीय स्वातंत्र्याचा बळी देऊनहि आर्थिक समता प्रस्थापित करावी, असे रशियाचे धोरण आहे आणि हीच खरी लोकसत्ता होय, अशी अत्यंत विपरीत कल्पनाहि प्रसृत करून रशिया धूळफेंक करूं पहात आहे. या सर्व गोंधळांत एक विचार आपण दृढपणें पकडून ठेवला पाहिजे. तो हा की, राजकीय स्वातंत्र्यांतूनच इतर स्वातंत्र्यें व समता निर्माण होत असतात व त्याच्या बळावरच तीं टिकून राहूं शकतात. त्याच्या अभावीं इतर क्षेत्रांत समता व स्वातंत्र्य ही निर्माण होणेंच शक्य नाहीं व झालीं तरी तीं अत्यंत अल्पायुषी ठरतात, हे सोव्हिएट रशियाच्या इतिहासावरून दिसून आलेंच आहे.

आधी राजकीय समता

 सुदैवाने आपल्या राज्यकर्त्यांच्या मनांत या मूलतत्त्वाविषयी लवमात्र सदेह नाहीं. अमेरिकन पत्रपंडित नॉर्मन कझिन्स व पंडित जवाहरलाल नेहरू यांची जी मुलाखत झाली, तिच्यावरून ही गोष्ट स्पष्ट होईल. पुढील अवतरण पहा.
 नॉर्मन कझिन्स– सामाजिक, आर्थिक व राजकीय अशी त्रिविध समता लोकसत्तेच्या अंतरांत समाविष्ट असते. त्यांतील राजकीय समता हे इतर दोन समता प्राप्त करून घेण्याचे साधन होय, हे आपणांस मान्य आहे काय ? राजकीय समता नसेल तर इतर हक्क प्राप्त करून घेण्याचे साधन हाती नाही, असे होतें. विरोधी मताच्या अधिकाराचें जो समाज रक्षण करीत नाहीं, त्याला सामाजिक वा आर्थिक समतेची आशा घरतां येणार नाही हे आपणांस मान्य होईल अशी मला खात्री वाटते.
 पंडित जवाहरलाल- होय. राजकीय स्वातंत्र्य किंवा राजकीय समता हाच इतर समतेचां पाया आहे. कमालीची आर्थिक विषमता असेल तर राजकीय समता ही अर्थशून्य होईल हे खरें. तरी राजकीय समता हा इतर समतांचा सर्वाधार आहे यांत वाद नाहीं. (भारतज्योति २५-४-५१)

काँग्रेसचें महान कार्य- लोकजागृति

 स्वातंत्र्यपूर्व काळांत काँग्रेसने ब्रिटिश सरकारशी जो लढा केला, तो या तत्त्वाचा अवलंब करूनच केला होता. तो सर्व लढा 'राजकीय स्वातंत्र्याचा लढा' या एकाच नांवाने संबोधण्यास हरकत नाही. हे राजकीय स्वातंत्र्य म्हणजे केवळ भारताचे राष्ट्रीय स्वातंत्र्य नसून भारतातील प्रत्येक नागरिकाचें स्वातंत्र्य होतें. म्हणजे राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच काँग्रेसने व्यक्तिस्वातंत्र्याचाहि लढा चालविला होता. आणि त्यांतच काँग्रेसचें सामर्थ्य होतें. रशिया, इटली, जर्मनी, पोलंड या देशांत गेल्या शतकांत लढे झाले पण ते राष्ट्रीय स्वातंत्र्याचे लढे होते; व्यक्तिस्वातंत्र्याचे नव्हते. म्हणूनच त्या देशांत लोकसामर्थ्याचा विकास झाला नाही. आणि स्वातंत्र्यानंतर तेथे सर्वत्र दंडसत्ता प्रस्थापित झाली. भरतभूमीनें प्रारंभापासूनच राष्ट्रस्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य- म्हणजेच राजकीय समता- यांत अभेद मानून, व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्व सामर्थ्याचे उगमस्थान आहे हे जाणून, चळवळीस प्रारंभ केला. प्रथमपासूनच व्यक्तीच्या राजकीय स्वातंत्र्याची काँग्रेसने ही जोपासना केली यासाठी भरतभूमि तिची सदैव ऋणी राहील. १८८१ सालापासून येथे लोकशक्ति निर्माण करण्याचें जे ध्येय लो. टिळकांनी डोळ्यापुढे ठेवले होतें, ते यामुळे सफल झाले. आणि या भूमीला लोकसत्तेचा प्रयोग यशस्वी होण्याची जो थोडीफार आशा वाटते ती यामुळेच स्वातन्त्र्यपूर्वकाळच्या पुण्याईचा हिशेब असा आहे.
 अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट अशी की, स्वातन्त्र्यानंतरच्या काळांतहि सत्ताधिष्ठित काँग्रेस सरकारने भारतांतील नागरिकांच्या ठायीं व्यक्तिमत्वाची जागृति करून राजकीय समतेची प्रस्थापना करण्याचे धोरणच पुढे चालविले आहे. यासाठी काँग्रेसला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.

सरंजामी सत्तेचा नाश.

 स्वातंत्र्यप्राप्ति होतांच राजकीय प्रबुद्धतेच्या प्रगतीच्या दृष्टीने काँग्रेसनें जे पहिले महत्कृत्य केले ते म्हणजे भारतांतील संस्थानांचे विसर्जन हे होय. ब्रिटिश अंमलाखालंची प्रजा स्वातंत्र्यापूर्वीच 'नागरिक' या सन्माननीय पदवीस जाऊन पोचली होती. व्यक्तित्वाचा तेजस्वी अहंकार तिच्या ठायीं आधींच पुष्ट झाला होता; पण संस्थानांत त्या वेळी सर्वत्र अंधार होता. तेथें मध्ययुगांतील कमालीची बेजबाबदार, अनियंत्रित व उन्मत्त अशीच सत्ता चालू राहिली होती. आणि त्यामुळे संस्थानांतील मानव हा लाचार, तेजोहीन व मनःसामर्थ्यहीन असा राहिला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनीं त्या मध्ययुगीन सरंजामी सत्तेचा नाश करून मानवतेपासून ढळलेली भारताची एकतृतीयांश प्रजा पुन्हां 'मानव' या महत्पदास आणून पोचविली. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारउच्चारस्वातंत्र्य, विरोधस्वातंत्र्य, या मनुष्याच्या जन्मसिद्ध हक्कांचा त्यांनी एवढ्या प्रचंड समाजाला लाभ करून दिला. गेल्या शंभरसवाशे वर्षांत ब्रिटिश अमलाखाली असलेल्या प्रांतांतून राममोहन, म. फुले, रानडे, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, विवेकानंद, लजपतराय, मोतीलाल, जवाहरलाल, सुभाषचंद्र, पटेल बंधु, महात्मा गांधी, जगदीश चंद्र, चंद्रशेखर रमण यासारख्या थोर पुरुषांची प्रचंड परंपरा निर्माण झाली. पण त्याच अवधीत संस्थानी अमलाखालच्या पांचसहा कोटी प्रजेंतून या परंपरेंत शोभण्याजोगा एकहि पुरुष निर्माण झाला नाहीं. यावरून ही प्रजा राजकीय स्वातंत्र्याच्या अभावीं कशी सडत चालली होती हे दिसून येईल. आणि त्यावरूनच संस्थानी सत्तेचा नाश करून एवढ्या मोठ्या प्रजेला काँग्रेसने राजकीय समतेचा लाभ करून दिला ही तिची सेवा केवढी मोठी आहे याचीहि कल्पना येईल.

दलित जनतेचें मानवत्व

 संस्थानी प्रजेप्रमाणेच मानवतेच्या पदवीपासून च्युत झालेल्या अशा तीन जमाती हिंदुस्थानांत होत्या. अस्पृश्य जाति, गुन्हेगार जाति व आदिवासी जन, या त्या तीन जमाती होत. काँग्रेसनें कसलाही भेदाभेद न ठेवतां या कोट्यवधि मानवांना मानवतेचे मूलभूत हक्क देऊन टाकले. अस्पृश्यांची कहाणी सर्वांना ठाऊकच आहे. तिचा विस्तार करण्याचे कारण नाहीं. गुन्हेगार जमाती ही खास ब्रिटिशांची निर्मिति होती. मांग, रामोशी, कंजर या कांही ब्रिटिशांच्या पूर्वी गुन्हेगार ठरलेल्या जाति नव्हत्या. त्यांतल्या कांहीं जाति तर लढाऊ जाति होत्या. बेकार झाल्यामुळे त्या चोऱ्यामाऱ्या करूं लागल्या आणि राज्यकारभार सुलभ व्हावा म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर गुन्हेगार असा कायमचा शिक्का मारून त्यांच्यांतील बहुसंख्य लोकांना गुन्हेगार वसाहतींत डांबून टाकलें, हा घोर अन्याय काँग्रेसवें तत्काळ दूर करून या भूमीवरचा एक फार मोठा कलंक धुवून काढला. आदिवासींचे नागरिकत्व हा तर अभूतपूर्व असा एक प्रयोग आहे. वेदकालापासून गिरिकन्दरांत रहाणारे लोक आतां प्रथमच भारताचे नागरिक होत आहेत. त्यांची संख्या जवळ जवळ तीन कोटी आहे. असुर या नांवाचीच एक चारपांच हजारांची जमात त्यांत आहे. नाग, संताळ, गोंड या जमाती प्रसिद्धच आहेत. अस्पृश्य, गुन्हेगार व आदिवासी मिळून नऊ दहा कोटी तरी लोकसंख्या होईल. एवढ्या लोकांना शतकानुशतकें मानवतेचे सामान्य हक्क सुद्धां नव्हते. आर्य म्हणविणाऱ्या व सर्व विश्व आर्य करून टाकण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या हिंदु लोकांनी यांची फारशी पूसतपास कधीं केली नव्हती. ही जबाबदारी आपली आहे असे हिंदुसमाजानें कधी मानलेच नाहीं. सत्ता हातीं येतांच काँग्रेसनें या प्रचंड मानवसमूहाला नरकाच्या खोल गर्तेतून उचलून मानवतेच्या सन्मान्य भूमीवर आणून उभें केले. अशा तऱ्हेचे जगाच्या इतिहासांतले हे पहिलेच कृत्य असेल असे वाटते.

भारताची घटना

 राजकीय पुनर्घटनेच्या दृष्टीने काँग्रेसचे दुसरे महत्कृत्य म्हणजे भारताची घटना सिद्ध करून तिचा प्रत्यक्ष अंमल चालू करणे हे होय. या घटनेने भारताच्या इतिहासांत एका नव्या युगास प्रारंभ झाला आहे. सोळा लक्ष चौरस मैलांच्या खंडप्राय भूमीतील पस्तीस कोटी जनता धर्म, जाति, भाषा, लिंग इ. अनेक प्रकारच्या विषमता विसरून आतां समभूमीवर आली आणि तिने एक स्वयंशासन निर्माण करून आपण होऊन ती एकशासनाखाली नियंत्रित झाली. सर्व दृष्टींनी ही गोष्ट अभूतपूर्व अशी आहे. युगानुयुगें राजा, सरंजामदार, ब्राह्मण येथपासून जमीनदार, जहागीरदार, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी यांच्यापर्यंत प्रत्येकापुढे दीनपणे लाचारीनें वांकून त्यांच्या कृपाप्रसादाने जगण्यांत धन्यता मानणारी अशी ही प्रजा होती. आज काँग्रेसनें तिला व्यक्तिस्वातंत्र्य, भाषण- मुद्रण- संघटना- स्वातंत्र्य असे मूलभूत हक्क प्राप्त करून देऊन मानवत्वाचें उच्चतम भूषण प्राप्त करून दिले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे मानवाच्या सर्व उत्कर्षाचें साधन आहे. सर्व प्रकारचें वैभव प्राप्त करून देणारा हा चिंतामणि आहे. हा मणी भारतीय जनतेच्या हात देऊन काँग्रेसनें तिच्या जीवनांत आजपर्यंत कधींच अवतीर्ण न झालेले असे एक नवीन व उज्ज्वल युग प्रवर्तित केले आहे. त्यांतून पुढे कोणचें भवितव्य निर्माण होईल हा प्रश्न वादग्रस्त असला, तरी शतकानुशतकें चालत आलेले विषमतेचें, सरंजामदारीचे युग नष्ट करून काँग्रेसनें, अखिल जनतेला एक नवें स्वाधीनतेचें युग निर्माण करून देऊन, आपला उत्कर्ष आपण करून घेण्याची दुर्लभ संधि उपलब्ध करून दिली आहे यांत शंका नाही. नव्या घटनेचा हा खरा अर्थ आहे. राजकीय समता ती हीच. आणि राजकीय पुनर्घटनेच्या दृष्टीने काँग्रेसनें केलेली ही सेवा अश्रुतपूर्व अशीच आहे.
 भारताच्या नव्या घटनेवर अनेकांनी अनेक प्रकारें आक्षेप घेतले आहेत. मूलभूत हक्क एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने काढून घेतले आहेत, केंद्रसत्ता अत्यंत प्रबळ करून ठेविली आहे, इ. प्रकारचे अनेक आक्षेप आहेत. घटनेतील कलमांचे शब्द घेऊन त्यांची चिकित्सा आपण केली तर, हे सर्व आक्षेप खरे आहेत, असा निर्णय देणे कायदेपंडितांना फारसे अवघड आहे असें नाहीं. पण या घटनेकडे जरा निराळ्या दृष्टीने पहावें अस माझें मत आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ न्यायालयाचे पहिले न्यायाधीश मार्शल यांच्या उदाहरणावरून ही निराळी दृष्टि कोणची हे ध्यानांत येईल. त्यांचा एक चरित्रकार लिहितो, 'अगदी पहिल्याच अधिवेशनाच्या वेळी त्या श्रेष्ठ न्यायासनावर आरूढ होतांना आपल्यापुढे असलेल्या नवनिर्मितीच्या कार्याच्या महत्त्वाची मार्शल यांना पूर्ण जाणीव होती. कारण घटनेत जे सामर्थ्य निर्माण व्हावयाचें तें तत्त्ववेत्ता न्यायाधीश तिच्यावर जे भाष्य करील त्यामुळे निर्माण होत असत. घटनेच्या लिखित शब्दांत जिवंत तत्त्वज्ञान भरून टाकणे हे या भाष्यकाराचें कार्य आहे.' यावरून हे ध्यानांत येईल की घटनेतील हे किंवा ते कलम कसे आहे हा विचार गौण असून, तिचा व्यवहार करणारा मानव कसा आहे, हा विचार प्रधान आहे. आणि या दृष्टीने विचार करतां, काँग्रेसनें न्यायालयांना घटनेवर भाष्य करण्याचा जो अधिकार दिला आहे आणि नंतरच्या काळांत त्या न्यायालयांचा जो बहुतेक ठिकाणी मान ठेविला आहे त्यावरून ही राजकीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने फार मोठी प्रगति आहे हे मान्य करावें लागेल. न्यायपीठांच्या बाबतींत कांहीं ठिकाण अत्यंत गैर व निंद्य प्रकार झाले हे खरें, पण रशियन न्यायाधीशांना तेथील सरकारकडून वरचेवर येणारे आदेश पाहिले व तुलनेने विचार केला म्हणजे काँग्रेसने लोकशाही परंपरा निर्माण करण्याचे ब्रीद निष्ठेने चालविले आहे याविषयी फारसे दुमत होणार नाहीं.

निवडणुकीतील निर्मळ भूमिका

 पण काँग्रेसची वृत्ति काय आहे याची खरी कसोटी भारतांतील पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकींच्या वेळी लागली. घटनेनें दिलेले भाषण- मुद्रण- संघटन स्वातंत्र्य सरकार या प्रसंगी जनतेला किती लाभूं देते व ज्या निवडणुकीत स्वतःवर सत्ताच्युत होण्याचा संभव आहे त्या सरळ मार्गाने होऊ देते की नाही यावरून त्याची लोकशाही तत्त्वावरची निष्ठा परीक्षितां येते; आणि या निकषावर घांसली असतां काँग्रेसची निष्ठा बावन्नकशी ठरली आहे हे तिच्या शत्रूंनींहि मान्य केले आहे.
 निवडणुकीच्या दोनचार महिन्यांत केन्द्रीय व प्रांतिक सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेचा नुसता भडिमार चालविला होता. सूक्तासूक्त सर्व आरोप त्यांच्यावर केले, वाटेल तीं भाषणे केलीं. तरी हाती असलेल्या कायद्यांचा या टीका बंद पाडण्यासाठीं चुकूनसुद्धां सरकारने उपयोग केला नाहीं. इतकेंच नव्हे तर, कारावासांत असलेल्या कम्युनिस्टांना मुक्त करून खुला सामना भरविण्यास मुभा दिली व आपल्या हातानें आपल्या पराभवाची वाट मोकळी करून दिली. मुद्रण- स्वातंत्र्याप्रमाणेच जनतेच्या संघटन - स्वातंत्र्यावरहि काँग्रेसनें कोठें गदा आणली नाहीं. वाटेल तशी पक्षसंघटना करण्यास सर्वांना सर्वत्र अवसर दिला होता. जवळजवळ एकशेवीस पक्ष निवडणुका लढवीत होते, यावरूनच ही गोष्ट स्पष्ट होईल. प्रत्यक्ष निवडणुकांच्या व्यवहारांतहि सरकारने आपली भूमिका बव्हंशी निर्मळ राखली आहे. कांहीं अपप्रकार झाले; नाहीं असे नाहीं. पण सर्व व्यवहार शेवटीं मानवाच्या हातूनच व्हावयाचे असतात आणि मानव हा अपूर्ण प्राणी आहे हे लक्षांत घेतां, काँग्रेसच्या लोकशाहीवरील निष्ठेला उणीव आली असे म्हणण्याजोगे तिच्या हातून कांहीं घडले आहे, असे म्हणतां येणार नाहीं. मद्रास, त्रावणकोर, कोचीन, राजस्थान, पेप्सू, ओरीसा या राज्यांत काँग्रेसने पराभव स्वीकारलेला आहे, आणि इतर प्रांतांत मुरारजीसारखे मोहरे पराभूत झालेले आहेत. यावरून सरकारनें या कामांत कोठें इस्तक्षेप केला आहे असे त्याच्या शत्रूलाहि म्हणतां येणार नाहीं. १७ कोटी मतदार ज्यांत आहेत अशा समाजाच्या लोकशाहीचा हा पहिला प्रयोग होता. अशा प्रचंड प्रमाणावर जगांत आजपर्यंत लोकशाहीचा प्रयोग कोठेंहि व केव्हांहि झालेला नाहीं. अशा या प्रयोगाकडे सर्व जगाचें लक्ष लागले होते. पुढील सत्तेच्या दृष्टीने काँग्रेसच्या यशापयशाचा विचार आपणांस पुढे करावयाचा आहेच. पण निवडणुकांचा व्यवहार काँग्रेसने अत्यंत दक्षतेनें, कार्यक्षमतेने व निर्मळपणे घडविला, या तिच्या परम उज्ज्वल व विलोभनीय यशाचा वांटा तिच्या पदरांत टाकल्यावांचून आपणांस पुढे जातां येणार नाहीं. राजकीय समतेच्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रगतीच्या दृष्टीने काँग्रेसने केलेले हे तिसरे महत्कृत्य आहे. सहा कोटी संस्थानी प्रजा, सहा कोटी अस्पृश्य व जवळ जवळ चारपांच कोटी गुन्हेगार व आदिवासी, अशा सोळासतरा कोटीच्या मानवसमूहाला मानवतेचे मूलभूत हक्क देणे, अशा लोकांनीच जो समाज बहुतांशी घडला आहे त्याला पूर्ण लोकायत्त अशी घटना सिद्ध करून देणे आणि सत्ता हाती असूनहि, आपली पदच्युति डोळयाला दिसत असूनहि निवडणुकांत कोणत्याहि वाममार्गाचा अवलंब न करतां, कोठेंहि हस्तक्षेप न करतां, पूर्ण समभूमीवरून हा सामना घडविण्याची कोशीस करणे ही काँग्रेसची त्रिविध लोकसेवा भारताच्या भावी इतिहासकाराला अभिमानानें व कृतज्ञतेने नमूद करावी लागेल. काँग्रेसला तिचे हे श्रेय अर्पण करून राजकीय पुनर्घटनेच्या उत्तरभागाचे विवेचन आपण हाती घेऊं.

लोकसंघटना

 कोणच्याहि समाजाच्या राजकीय पुनर्घटनेची दोन अंगे असतात. प्रत्येक मनुष्याच्या ठायींचें व्यक्तित्व जागृत करणे हे पहिले अंग, आणि अशा या जागृत समाजाची संघटना करून सामर्थ्य निर्माण करणे हे दुसरे अंग होय. कोणच्याहि जुलमी, अन्यायी, मदांध अशा परकीय वा स्वकीय सत्तेचा प्रतिकार करून शेवटी तिला पदच्युत करणारी जी 'लोकशक्ति' ती, ही दोन्ही अंगे परिपुष्ट झाली, तरच निर्माण होते. ही लोकशक्ति हा लोकसत्तेचा आत्मा होय. तिच्या अभावीं कोणचीहि लोकसत्ता यशस्वी होणे शक्य नाहीं. लोकजागृति व लोकसंघटना यांतील पहिल्या अंगाची जोपासना काँग्रेसने समाधानकारकपणे केली आहे हे आपण येथवर पाहिले. आतां जागृत व्यक्तित्व संघटित करण्याच्या दृष्टीनें काँग्रेसच्या यशाचे मापन करावयाचे आहे.
 लोकमत जागृत करणे हे एकपट अवघड असले तर ते संघटित करून त्यांतून 'शक्ति' निर्माण करणे हे शतपट अवघड आहे. कृषिखात्यांतील एक जुने अधिकारी नेहमी म्हणत की, 'जेथे पूर्वी धान्याचें एक कणिस निर्माण होत होते तेथे आपल्या कष्टानें दोन कणसे निर्माण करणारा शेतकरी हा जगाचा उपकारकर्ता आहे.' आपल्यापरी हे वचन खरेंच आहे. पण त्याहिपेक्षां जास्त खरें असे एक वचन आहे. जेथें पूर्वी एक एक अशी फुटीरपणे माणसें कार्य करीत होतीं त्या ठायीं, दंडसत्तेचा आश्रय न करतां, दोन व्यक्तित्वजागृत माणसांना सहकार्याने एकत्र काम करण्यास उद्युक्त करणारा माणूस हा जगाचा सर्वांत मोठा उपकारकर्ता होय. व्यक्तित्व जागृत होतांच मानवांच्या सर्व गुणांचा विकास होऊं लागतो हे खरे. तत्त्वज्ञान, कला, साहित्य, धर्म इ. क्षेत्रांत मानवाची व्यक्तिस्वातंत्र्यामुळे अत्यंत वेगानें प्रगति होऊं लागते. पण या लोकजागृतीबरोबरच लोकसंघटनेची विद्या हस्तगत करता आली नाहीं, तर समाज भेदजर्जर होतो, छिन्नभिन्न होतो, त्याची अनंत शकले होतात, आणि सर्व सांस्कृतिक मंदिराचा पाया म्हणजे जे आत्मरक्षणाचे सामर्थ्य तेच त्याला निर्माण करता येत नाहीं. आणि मग सांस्कृतिक दृष्टीने प्रगत पण भेदामुळे दुर्बल झालेल्या या समाजावर कमी संस्कृत संघटित समाज आक्रमण करून त्याचा नाश करतात. मग त्याचे स्वातंत्र्य व त्याची संस्कृति यांच्यासह त्याच्या व्यक्तित्वधनाचाहि नाश होतो. ग्रीसचा इतिहास याचीच साक्ष देत आहे. तेथें बुद्धिनिष्ठा, विचारस्वातंत्र्य हीं जागृत होतांच विद्याकलांची पुष्कळ प्रगति झाली. आणि जेव्हां जेव्हां या जागृत व प्रगतिमान् समाजांत संघटना निर्माण होई, तेव्हां तेव्हां आपल्यापेक्षां दसपटीने मोठ्या आक्रमकासहि तो धूळ चारीत असे, पण हे फार काळ टिकले नाहीं. आणि लवकरच शतधा भिन्न होऊन हा समाज लयास गेला. रोमचा प्रारंभींचा इतिहास असाच आहे. व्यक्तित्व जागृत होतांच त्या समाजाच्या चिरफळ्या होऊं लागल्या. त्यावेळी त्यांतील कांहीं पराक्रमी पुरुषांनी दंडसत्तेचा आश्रय करून आपले साम्राज्य स्थापन केलें, रोमन साम्राज्याचा विस्तार झाला, त्याचें वैभव वाढीस लागलें, ह्याचें श्रेय लोकायत्त समाजाच्या सामर्थ्याला नसून सामर्थ्यसंपन्न पुरुषांनी निर्माण केलेल्या दंडायत्त संघटनेला आहे. लोकशाहीची तत्त्वें रोमन समाजांत पसरतांच तेथें इतके कलह माजूं लागले कीं, तेथील समाजधुरीणांनीं साम्राज्यस्थापनेचें धोरण स्वीकारले नसते तर, ग्रीकाप्रमाणेच रोमचाहि नाश झाला असता. ग्रीक व रोमन हे समाज लयास गेल्यानंतर अनेक शतकें व्यक्तित्वजागृतीचा हा कठिण प्रयोग कोणींच केला नाहीं. तो पुन्हां सतराव्या शतकांत ब्रिटननें सुरू केला. आणि जागृतिगरोबरच संघटनेसाठी अवश्य असणाऱ्या गुणांचीहि त्या राष्ट्राने जोपासना करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे त्याचा प्रयोग यशस्वी होऊन त्याच्या ठाय कल्पनातीत सामर्थ्य निर्माण झालें व कांहीं काळ सर्व जगाचे नेतृत्व त्याला करतां आले. ब्रिटनच्या मागून त्याच राष्ट्राची शाखा असलेल्या अमेरिकेने हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. पण दोघांचा मिळून प्रयोग एकच. म्हणजे जागृत व्यक्तित्वाची संघटना करून त्यांतून सामर्थ्य निर्माण करण्यांत जगाच्या इतिहासांत आतांपर्यंत एकाच- फक्त एकाच समाजाला- अँग्लो-सॅक्सन समाजाला यश आलेले आहे. त्यानंतर युरोप व लॅटिन अमेरिका येथील अनेक देश, रशिया, चीन हे देश, यांतील जवळ जवळ प्रत्येकानें हा प्रयोग करून पाहिला; पण स्वित्झरलँड, स्कॉंडिनेव्हियन देश यासारखे लहान अपवाद सोडले तर त्यांत कोणालाहि यश आलें नाहीं. व्यक्तित्वजागृति म्हणजे चिरफळ्या, भेद, शकले हाच सिद्धांत प्रत्येकानें सिद्ध करून दाखविला. शेवटी त्यांतील कांहींनीं दंण्डसत्तेचा आश्रय करून आपल्या संघटना अभंग राखिल्या व तेहि ज्यांना जमलें नाहीं ते देश दुबळे बनून परक्यांच्या आहारी गेले, व स्वातंत्र्यही गमावून बसले.
 तेव्हां व्यक्तित्वजागृति हे एक फार कठिण व्रत आहे. जागृत व्यक्तित्व संघटित ठेवण्याची विद्या जर समाजानें प्रथमपासूनच अभ्यासिली नाहीं तर तो समाज दुबळा होऊन त्याचा सर्वनाश होण्याचा संभव असतो. स्वातंत्र्यपूर्व काळांत लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी लोकायत्त शासनाचें हे महत्त्व जाणून लोकजागृतीबरोबरच लोकसंघटना निर्माण करून ती दृढ व अभंग राखण्याचे धोरण ठेविले होतें. त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास ते महापुरुष सदैव सिद्ध असत. काँग्रेससंघटना अभंग रहात असेल तर, सुरतेचें अपयश, कारण नसतांहि, स्वतःच्या शिरी घेण्याचे टिळकांनी मान्य केले होते, हे मागे सांगितलेच आहे. पुढेहि अनेक वेळां काँग्रेसनिष्ठा व स्वतःच मते यांत संघर्ष आला तेव्हां त्यांनीं स्वमताचा आग्रह बाजूस ठेवून काँग्रेसनिष्ठेला वंदन केले. महात्माजीचेंहि हेच धोरण होतें. स्वराज्यपक्षाची मते त्याना मान्य नव्हतीं. तरी, त्याने फुटून जाऊ नये म्हणून, आपला आग्रह सोडून त्यांनी त्या पक्षाला काँग्रेसमध्ये जागा करून दिली. पुढें समाजवादी पक्षाबद्दलहि त्यांनी हेंच धोरण ठेवले होते. आणि अशा रीतीने काँग्रेसचीं शकले न होऊं देण्याविषयीं या दोन महापुरुषांनी अखंड दक्षता बाळागली होती. त्यांच्यानंतर पंडित जवाहरलाल यांनी काँग्रेस सरकारची घडण करतांना देशांतील सर्व पक्षांना एकसूत्रांत गोवण्याचा फार मोठा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकर, श्यामाप्रसाद मुकर्जी हे काँग्रेसचे अगदीं कट्टे वैरी. पण मंत्रिमंडळांत त्यांना जागा देऊन देशाची संघटना अभंग राखण्यासाठी पंडितजींनी अत्यंत संयम करून ते जुनें वैर दृष्टीआड केलें, आणि भारतीय जनतेची एक अभंग फळी निर्माण केली. टिळक, गांधीजी व पंडितजी हे थोर नेते राष्ट्राची संघटना अभंग राखण्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास सिद्ध असत. याचे कारण एकच दिसते. लोकसंघटना भंगली तर सर्वनाश आहे हे त्यांनी जाणले होते. संघटनेस अवश्य ते गुण आपण जोपासले नाहींत तर व्यक्तिस्वातंत्र्याला, राष्ट्रीय स्वातंत्र्याला- कशालाच अर्थ नाहीं हे जगाच्या इतिहासांत त्यांना पदोपदी दिसत होते. अमेरिकेसारख्या एका प्रबल लोकसत्ताकाचा जनक वॉशिंग्टन यानें अगदी प्रारंभी आपल्या राष्ट्राला हेंच महातत्त्व शिकविले होते. 'लोक स्वतंत्र झाले असे केव्हां म्हणावे ? समाजकल्याणासाठी आपल्या वैयक्तिक स्वार्थांना व हक्कांना आपण होऊन मुरड घालण्याची सद्बुद्धि ते दाखवितील तेव्हां. तोपर्यंत त्यांना स्वतंत्र म्हणतांच येत नाहीं.' असे वॉशिंग्टन नित्य सांगत असे. मागें उल्लेखिलेले अमेरिकन वरिष्ठ न्यायालयाचे पहिले न्यायाधीश मार्शल यांचेहि याविषयींचे उद्गार प्रसिद्ध आहेत. "परकीय दास्यांतून मुक्त होण्याच्या प्रचंड घोषणा करीत असतांना अमेरिकन लोक एका दुसऱ्या दास्याच्या आहारी जात होते. दुही, फूट, विघटना यांचें तें दास्य होते. या दास्यांतून अराजक व दौर्बल्य निर्माण होऊन समाजाचा नाश होतो.'
 इतिहासाची पुनरावृत्ति होते असे म्हणतात. मानवी स्वभाव सर्वत्र सारखा असतो, त्याच लोभमोहाला तो सर्वत्र बळी पडतो, तेच रागद्वेष त्याच्यावर सर्वत्र वर्चस्व गाजवितात, तीच मनाची क्षुद्रता, तोच अविवेक, तीच विपरीत बुद्धि यांच्या आहारीं तो जातो आणि भिन्न भिन्न काळी व स्थळीं तोच इतिहास निर्माण करतो. भारतांत कोठल्या इतिहासाची पुनरावृत्ति होणार, असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर आपल्याला शोधावयाचे आहे.
 महात्माजी गेल्याबरोबर काँग्रेसनें आपलें विशाल राष्ट्रव्यापी रूप टाकून दिले. काँग्रेसच्या कक्षेत यापुढें भिन्न मतांच्या लोकांना जागा नाहीं असा तिच्या सूत्रधारांनीं दण्डक घालून टाकिला. टिळक व महात्माजी यांचें धोरण नेमके याच्या उलट होतें हें आपण पाहिलेच आहे. समाजवादी पक्षानें काँग्रेसमध्येच स्वतंत्र गट केला असूनहि महात्माजींनी त्याला काँग्रेसमध्ये राहवून घेतले; इतकेच नव्हे, तर जयप्रकाश नारायण किंवा आचार्य नरेंद्र देव यांपैकी कोणाला तरी काँग्रेसचे अध्यक्षपद द्यावे असे सुचविले होते; पण महात्माजींच्या मागून जे काँग्रेसचे सूत्रधार झाले त्यांना हें व्यापक धोरण मानवले नाहीं. त्यांनीं भिन्नमतवादी लोकांना काँग्रेसमध्ये रहाणे अशक्य करून टाकिलें आणि त्यामुळे अखिल भारतव्यापक अशी एकही संघटना या देशांत राहिली नाहीं. विघटनेला येथून प्रारंभ झाला. पण एवढेंच होऊन काँग्रेसची विघटना थांबली असती तर ती फार मोठी आपत्ति ठरली नसती; पण काँग्रेसचें सत्त्व आतां लोपत चाललें होते. सत्तारूढ झाल्याबरोबर काँग्रेसच्या नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या स्वार्थी वासना व अधोगामी वृत्ति अत्यंत प्रबळ झाल्या आणि पूर्वसूरींनीं रक्ताचें खतपाणी घालून जोपासलेल्या या संघटनेला प्रत्येक प्रांतांत तडे जाऊं लागले. आणि आज या प्राचीन सनातन भूमीच्या सर्वनाशाचें भयानक दृश्य विचारवंतांच्या डोळ्यांपुढे उभे राहूं लागले आहे.

विघटना

 राजकीय पुनर्घटनेचा उत्तर भाग जो लोकसंघटना, त्याबाबतीत काँग्रेस अपयशी ठरणार आणि जगांतल्या इतर लोकसत्ता ज्या मार्गाने गेल्या त्याच मार्गाने भारताची लोकसत्ताहि जाणार, अशी एक अत्यंत दारुण भीति सध्यां मनाला ग्रस्त करीत आहे. काँग्रेसचे नेते इतके चारित्र्यभ्रष्ट होतील व स्वार्थ, धनमोह, वैयक्तिक हेवेदावे, सत्ताभिलाष असल्या कारणामुळे प्रांतोप्रांत या संघटनेंत तट पडतील, भारताच्या स्वातंत्र्यार्थ पन्नास वर्षे संग्राम करणाऱ्या या संस्थेच्या या कारणांमुळे चिरफळ्या होतील, हे कोणाच्या स्वप्नांतहि आले नसेल; पण हें सत्य डोळ्यांसमोर घडत आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर नाहीं.
 काँग्रेसच्या या विघटनेला मद्रास प्रांतांत प्रथम सुरवात झाली. टी. प्रकाशम् हे आन्ध्र प्रांतांतील कॉंग्रेसचे नेते असून १९४७ मध्ये प्रथम मद्रासचे पंतप्रधान होते. पुढें पदच्युत झाल्यानंतर त्यांनी नवीन आलेल्या मंत्रीमंडळावर जे आरोप केले ते इतके भयंकर आहेत कीं कोणाहि भारतीयाला ते वाचून धक्काच बसावा. त्यांच्या मते, अमुक एक पाप या नव्या मंत्रिमंडळाने करावयाचें ठेवले होते असे नाहीं. धान्यवाटपाचे काम एका सहकारी संस्थेकडे द्यावयाचें ठरले होते. ते तसे न देतां मंत्रिमंडळाने आपल्या ओळखीच्या व्यापाऱ्यांकडे दिले. न्यायालयांत चाललेले पुष्कळ खटले काढून घेण्याचे हुकूम दिले. मद्रास हायकोर्टाच्या कामांत हस्तक्षेप करून मुख्य न्यायाधीशांचा अवमान केला. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. सीमेंट, सूत, पोलाद यांच्या आयात निर्यातीचे परवाने आपल्या सग्या-सोयऱ्यांना दिले. मद्रासचे अर्थमंत्री ज्या सुदर्शन कंपनीचे डायरेक्टर होते त्या कंपनीला दहा लाखाचे कर्ज दिले. मंत्री झाल्यावर अर्थमंत्र्यांनी त्या कंपनीचे आपले शेअर बायकोच्या नांवाने बदलून घेतले; पण विशेष असे कीं त्या कंपनीचा धंदा अजूनहि सुरू झालेला नाही. दुसऱ्या एका मंत्र्यानें बंगोलरच्या एका कंपनीला डिझेल बसेस घेण्यासाठी १२ लाख रु. कर्ज म्हणून दिले. अशी कंपनी अस्तित्वांतच नव्हती व नाहीं. टी. प्रकाशम् यांनीं काँग्रेसच्या नियंत्यांकडे सर्व गोष्टी कळवून रीतसर चवकशी व्हावी असा अर्ज दिला; पण त्यांनी आंतल्या आंत चवकशी करून, विशेष कांहीं घडलें नाहीं असा निर्णय दिला व तें प्रकरण मिटवून टाकले. त्यामुळे टी. प्रकाशम् हे काँग्रेसमधून फुटून निघाले व त्यांनीं 'डेमोक्रॅटिक फ्रंट' या नांवाचा स्वतंत्र पक्ष काढला. टी. प्रकाशम् व त्यांचा पक्ष यांनीं सत्ताधारी पक्षावर जे आरोप केले ते खरे कीं खोटे हा प्रश्न येथें गौण आहे. ते खोटे असतील तर त्यांच्या पक्षानें सत्तेच्या अभिलाषाने दुसऱ्या पक्षावर दुष्ट बुद्धीनें निंद्य आरोप केले असा त्याचा अर्थ होईल; पण काँग्रेसच्या एकाच पक्षांत फळ्या निर्माण झाल्या, काँग्रेसची विघटना होऊं लागली, हे सत्य बदलत नाहीं. एक फळी धनमोहाला बळी पडली, कीं दुसरी सत्तामोहाला बळी पडली, एवढाच काय तो प्रश्न. जागृतीनंतर संघटना अभंग राखण्याची विद्या आम्हांला वश नाहीं, हा निर्णय अटळच आहे.
 उत्तरप्रदेश, पंजाब, बंगाल या राज्यांची हीच कहाणी आहे. उत्तर-प्रदेशांतील पन्नास काँग्रेसजनांनी वरिष्ठ नेत्यांकडे अर्ज करून, जमीनदारी नष्ट करण्याच्या प्रकरणांत मंत्र्यांनी लाखों रुपये खाल्ले, असे आरोप केले. बंगालच्या मंत्रिमंडळाविरुद्ध तेथील काँग्रेसजनांनी असाच अर्ज करून एकंदर सतरा आरोप त्यावर केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या आरोपांची चवकशी करून, या सतरा आरोपांपैकी बारा आरोपांना मंत्रिमंडळाने समाधानकारक उत्तरे दिलीं, असें जाहीर केले. पण म्हणून काय झाले ? राहिलेल्या पांच आरोपांचे काय ? कापडाचा काळा बाजार केला म्हणून एका व्यापाऱ्यावर खटला झाला होता. बंगालच्या पंतप्रधानांनी मध्ये पडून तो काढून घेतला. एका कंपनीविरुद्ध ॲन्टीकरप्शन खात्यानेच पुरावा दिला होता. तोहि खटला सरकारने काढून घेतला. मिठाचे परवाने आपल्या सग्यासोयऱ्यांना दिले. वेस्ट बेंगॉल प्रॉव्हिन्शियल कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल प्रोक्युअरमेंट ॲन्ड डिस्ट्रिब्यूशन सोसायटी- या संस्थेच्या कारभारांत द्रव्यापहार व अव्यवस्था आहे असे आढळूनहि तिच्यावर खटला केला नाहीं. राहिलेले पांच आरोप आहेत ते असले आहेत. आणि त्यासाठी विरुद्ध पक्षानें दिलेला पुरावा मोठा विक्षोभक आहे, असें पंडितजींनींच म्हटले आहे. या प्रकरणी नेहमीप्रमाणेच अवश्य त्या फायली हरवणें, नष्ट होणें, पळवून नेणे हेहि प्रकार झाले. आणि असें असूनहि याची जाहीर चवकशी झाली नाहीं. भारताच्या प्रत्येक प्रांतांत काँग्रेसची अशीच विघटना चालू आहे. या थोर संघटनेची अभंग, एकसंघ अशी फळी, मुंबई हा अपवाद वजा जातां, कोठेंच राहिलेली नाहीं. बिहारमध्ये श्रीकृष्णसिंह व अनुग्रहनारायणसिंह, पंजाबमध्ये साचार व भार्गव, मध्यभारतांत लीलाधर जोशी व विजयवर्गीय, राजस्थानांत हिरालाल शास्त्री व जयनारायण व्यास अशी द्वंद्वे व तदंतर्गत क्षुद्र कलह सर्वत्र चालू होते व आहेत. आणि अत्यंत खेदजनक गोष्ट ही की हे कलह तत्वासाठी नसून क्षुद्र स्वार्थासाठी आहेत.
 भारतवर्षांमध्ये अखिल राष्ट्रव्यापी जनमनावर वर्चस्व गाजविणारी आणि अखिल भूमीची चिंता वहाणारी अशी काँग्रेस ही एकच संघटना आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या सलामीतच तिचीं अशीं ही अनंत शकले झालेली पाहून या भूमीच्या भवितव्याविषयीं विचारवंतांना अतिशय निराशा वाटू लागते.

जागरूक सारथी

 पण या अंधाऱ्या निराशेत अजूनहि आशेचा एक किरण उजळतो आहे असें वाटतें, काँग्रेसचे जे अग्रश्रेणींतले नेते आहेत, त्यांना या विघटनेची पूर्णपणे जाणीव असून वेळोवेळी आपल्या अनुयायांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दांत निषेध केला आहे. अध्यक्ष राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल, राजर्षि तंडन, पट्टाभि सीतारामय्या यांचे या विघटनेला आळा घालण्याचे प्रयत्न अहर्निश चालू आहेत. प्रत्येक सभेत, बैठकीत खाजगी किंवा प्रगट रीतीने ते काँग्रेसच्या सभासदांना आपल्या संस्थेला जडलेल्या या रोगाची जाणीव देत आहेत. त्याची चिकित्सा करून आपले निदान त्यांना सुनावीत आहेत व अधोगामी वृत्तीला पायबंद बसला नाहीं तर आपला समूळ नाश झाल्यावांचून रहाणार नाहीं, असें त्यांना अगदीं निःसंदिग्ध शब्दांत बजावीत आहेत. अर्थात् आज चारपांच वर्षे ही कानउघाडणी चालू असूनहि तिचा कसलाहि परिणाम काँग्रेससदस्यांवर झालेला नाहीं हें उघड आहे. पण वेगानें प्रलयाकडे निघालेल्या या महायंत्राचा सारथी तरी सावध आहे, एवढी समाधानाची गोष्ट आहे यांत शंका नाहीं.
 २७ ऑगस्ट १९४९ रोजी कानपूर प्रांतिक काँग्रेसच्या बैठकीत भाषण करतांना पंडित जवाहरलालजींनी पुढीलप्रमाणे कडक टीका केली. 'गेली दोन वर्षे काँग्रेसचें कार्य ज्या पद्धतीने चालू आहे ती तिला फारशी भूषणावह नाहीं. ज्या संघटनेनें भारतांत राज्यक्रांति घडवून आणली ती संघटना हीच काय, असा या देशांतले व बाहेरचे लोक विस्मित होऊन प्रश्न विचारीत आहेत. आतां आपल्या सत्त्वपरीक्षेची खरी वेळ आहे. आपण सध्यां आपल्या पूर्वपुण्याईवर जगत आहों. पण असे किती दिवस चालणार? त्याग व सेवा हें आपले पूर्वीचे बळ होतें. ते व्रत आपण पुढे चालविले नाहीं तर लोक आपली जुनी पुण्याई विसरून आपणांस पाठमोरे होतील.' ३० जानेवारी १९५१ रोजी अहंमदाबादला अखिल भारतीय काँग्रेस- समितीपुढें त्यांनीं अगदीं तळमळून पुढीलप्रमाणे उद्गार काढले; 'आतां काँग्रेसचा आत्माच नष्ट होण्याची वेळ आली आहे. त्याच्या जपणुकीसाठी आपल्याला निकराचा झगडा केला पाहिजे. आपले सर्व लक्ष जडदेहाच्या कल्याणाकडे असून आत्म्याची आपणांस विस्मृति झाली आहे. काँग्रेस आंतून कुजूं लागली आहे. या संस्थेला कसली तरी दुर्धर व्याधि जडली आहे.' दिल्ली स्टेट कॉन्फरन्सपुढे बोलतांना (८-४-५१) तर ते फारच निराश झालेले दिसतात. 'आपण महात्माजींची शिकवणूक विसरलो असून क्षुद्र विषयावर भांडत बसलो आहों. आपल्या हातून कसलेंहि कार्य घडत नाहीं. या देशाचा इतिहासच असा आहे की, त्यानें प्रत्येक वेळी आपल्या विजयाचे पराभूतींत- विनाशांत रूपांतर केले आहे.'
 कैलासवासी सरदार वल्लभभाई पटेल यांचे उद्गार याहिपेक्षा जास्त स्पष्ट व जास्त कठोर आहेत. 'आज काँग्रेसजनांना प्रथम स्वार्थ दिसतो. आपण सर्वांनी त्याग करून आपले सामर्थ्य पूर्वी वाढविलें, पण आतां त्या त्यागाची भरपाई करावयाची संधि आली आहे, असे काँग्रेस-सदस्यांना वाटत असावेसे वाटते. आपली नैतिक पातळी अगदी खाली गेली असून भोवतालच्या हीन वातावरणाचा संसर्ग काँग्रेसलाहि बाधलेला दिसतो.' (म्हैसूर २५-४-४९) मद्रास, बंगाल, संयुक्तप्रांत या राज्यांत सरदारजींनीं काँग्रेसच्या शुद्धीसाठी सारखे दौरे केले. लखनौहून परत जातांना त्यांनी पुढील प्रमाणे पत्रक काढले होतें. (१०-१-५०) 'तुमच्या प्रांतांतील चिरफळ्या व गटबाजी पाहून मला अत्यंत दुःख झाले. तुमच्यांतील मतभेद तात्त्विक स्वरूपाचे नसून स्वार्थविषयक आहेत व ते कॉंग्रेसला अत्यंत विघातक आहेत. प्रत्येक प्रांतांत अधःपाताची जणुं शर्यतच लागली आहे. तुम्ही हीन स्वार्थापायीं भांडत बसता व आपसांत गट निर्माण करता. काँग्रेस कार्यकारिणीने अनेक वेळां निषेध केला तरी ते तुम्ही मोडत नाहीं; यामुळे काँग्रेसचें नांव कलंकित होत आहे. व्यक्तिहितापेक्षां काँग्रेसचें हित श्रेष्ठ आहे हे ज्यांना मानवत नसेल त्यांनी काँग्रेसमधून चालते व्हावें.' बार्डोली, जोधपूर, मद्रास येथें याच शब्दांत सरदारजींनी काँग्रेस सदस्यांची निर्भत्सना केली आहे. 'बाहेरच्या आक्रमणाची भीति मला वाटत नाहीं. आपला नाश झाला तर तो अंतःकलहानेंच होईल. आतां जर आपण अपयशी ठरलों तर तो दोष सर्वस्वी आपला आहे. खरोखर या दुफळ्या पाहून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच कसें, याचे मला आश्चर्य वाटते. (मद्रास २३-२-४९) 'गेल्या तीन वर्षांतले आपले वर्तन अत्यंत लज्जास्पद असें आहे. वैयक्तिक हेवेदावे, मत्सर व सत्तास्पर्धा अशीच चालू राहिली तर, गांधीजींनी जे अमृत प्राप्त करून दिले आहे त्याचें लवकरच विष होऊन जाईल.'
 १९४९ साली काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांनी काँग्रेसजनांच्या मार्गदर्शनासाठी पुढील सूचनापत्रक काढले होते. (१८-१-४९) 'काँग्रेसच्या प्रतिनिधींनी आयात-निर्यात दुकानांचे परवाने स्वतःसाठीं वा मित्रांसाठी घेऊ नयेत. न्यायप्रविष्ट खटल्यांत न्यायाधीशांना भीड घालू नये. असें अनेक वेळां झाल्याचें ऐकतों. ट्रॅन्सपोर्ट कमिटी, क्लॉथ लायसेन्स बोर्ड यावरच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपली संघटना अभेद्य होती; पण त्यानंतर पक्षांत उपपक्ष, त्यांत पुन्हां गट, अशा फळ्या झाल्या आहेत. एका गटाचा माणूस मंत्री झाला कीं दुसरा गट त्याच्याविरुद्ध फळी उभारतो. सिनेमाची जागा, दुकानची जागा, आयात निर्यात परवाने- एवढे कारण विरुद्ध गट करण्यास पुरेसें होतें.' १७-९-५० च्या भारतज्योतीमध्ये पट्टाभींनीं 'दि ट्रुथ मस्ट बी नोन' या नांवाचा लेख लिहून काँग्रेसच्या सदस्यांची अनीति, क्षुद्र वृत्ति, व नग्न स्वार्थ हीं अगदीं प्रांजलपणें जनतेपुढे मांडली आहेत. आंध्र प्रांतांतील काँग्रेस कमिट्यांच्या अंतर्गत निवडणुकांविषयीं लिहितांना ते म्हणतात, 'अनीतीलाहि कांहीं सीमा असते, पण आंध्रमधील घटनांनीं अनीतीच्या सर्व ज्ञात मर्यादा ओलांडल्या आहेत.'
 काँग्रेसची विघटना कोणत्या थरास जाऊन पोचली आहे याची या हकीकतीवरून व काँग्रेस श्रेष्ठींच्या टीकेवरून कल्पना येईल. यावरून एका अत्यंत दुःखद निर्णयाप्रत आपण येऊन पोंचतों, लोकजागृतीची विद्या आपण हस्तगत केली असली आणि त्या दृष्टीने आपण यशस्वी झालों असलो तरी व्यक्तित्वजागृत अशा लोकांची संघटना करण्याची विद्या अजून आपल्याला वश झालेली नाहीं. राजकीय पुनर्घटनेचे हें दुसरे अंग अजून अत्यंत विकल असेंच आहे. ते पुष्ट होऊन त्यांत प्राणशक्तीचा संचार होईपर्यंत, पहिले अंग कितीहि परिपुष्ट झाले असले तरी, राष्ट्रीय उन्नतीचे कार्य, लोकसत्तेच्या दृढीकरणाचे ध्येय साध्य होण्याची यत्किंचितहि आशा धरतां येणार नाहीं हें अगदी उघड आहे.

सर्व समाजच रोगग्रस्त

 पण यावेळी भारताच्या नागरिकांनी अत्यंत सावधगिरीने विचार करणे अवश्य आहे. काँग्रेसजनांची स्वार्थपरायणता, क्षुद्रवृत्ति व हीन आचरण पाहून मन उद्वेगून व भडकून जाणे अगदी सहाजिक आहे. पण लोकशाहीचा प्रत्यक्ष आचार ज्यांना करावयाचा आहे त्यांनी अशा मनःस्थितीच्या कधींच आहारीं जातां कामा नये. नाहीं तर एका बाजूची स्वार्थी, हीन व संकुचित वृत्ति व दुसऱ्या बाजूचा अविवेक, संताप व माथेफिरूपणा यांची युति होऊन येथें वाटेल ती अनर्थपरंपरा कोसळेल. इतर देशांत हेंच झाले आहे. ते आपल्या या भूमींत न होऊं देण्याची जितकी काँग्रेसची जबाबदारी आहे तितकीच भारताच्या नागरिकांचीहि आहे. म्हणून विवेकानें विचार करण्यास त्यांनी सिद्ध झाले पाहिजे.
 मनाची तशी सिद्धता त्यांनी करतांच त्यांच्या पहिली गोष्ट ही ध्यानी येईल की, काँग्रेसला विघटनेची ही जी व्याधि, हा जो रोग जडला आहे, तो केवळ काँग्रेसचा रोग नसून आपल्या अखिल समाजाचा रोग आहे. मार्क्सवादी प्रेरणेने या देशांत आज तीस वर्षे कार्य चालू आहे. त्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या लोकांचे किती पक्ष व उपपक्ष झाले आहेत, त्याचा जनतेने एकदां विचार करावा; म्हणजे आहे या संघटनांत जास्तीत जास्त दृढ अशी काँग्रेस हीच संघटना आहे, हे तिच्या ध्यानांत येईल. कम्युनिस्ट, सोशॅलिस्ट, रॉयिस्ट, बहुजनसमाजवादी, नवजीवनवादी असे मार्क्सप्रेरित लोकांचे अनेक पक्ष आहेत. आणि त्या प्रत्येकांत पुन्हां अनेक गट आहेत. यांनी निर्माण केलेल्या कामगार संघटनांच्या अशाच चिरफळ्या चालू आहेत. मार्क्सच्या मतें सर्वांत पुरोगामी असलेली ही शक्ति कधींच संघटित होऊं शकली नाहीं; इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यांत सहभागी होण्याइतकी राजकीय प्रबुद्धताहि या शक्तीला कधी प्राप्त झाली नाही. गेल्या निवडणुकांत या पक्षांनी, काँग्रेस भांडवलवाल्यांच्या आहारी गेली असा प्रचार करीत असतांना स्वतः भांडवलवाल्यांशी कशी लगट केली हि भारताच्या नागरिकांनी ध्यानीं घ्यावें. भाई डांगे यांनी, आम्ही भांडवलाचे राष्ट्रीयीकरण करणार नाहीं, अशी घोषणाच करून टाकली. बहुजनसमाजवादी लोकांनी, व्यापारी हा कष्टकरी वर्ग आहे, असा निर्वाळा दिला व दोन लाखापर्यंत धन असलेल्या श्रीमंतांना गरीब जनतेंत सामील करून टाकले. काँग्रेसजन सत्तारूढ झाल्यावर तरी धनवश झाले. इतर पक्षांनी आधींच आपली शरणागति जाहीर करून टाकली आहे. हिंदुत्वाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या लोकांची स्थिति कांही निराळी नाहीं. त्यांनाहि अखिल भारतांत एक आघाडी निर्माण करता आली नाहीं. हिंदुसभा, रामराज्य- परिषद्, जनसंघ अशा त्यांच्या चिरफळ्या झालेल्या आहेतच. जमीनदार- भांडवलदार यांच्याविषयीं त्यांची वृत्ति काय आहे हे करपात्री महाराजांच्या भाषणावरून सहज कळून येईल. त्यांचें धन त्यांना पूर्वजन्मींच्या पुण्याईमुळे मिळालेले असून ते जप्त करणे हें पाप आहे, असें हे महाराज भाषणांतून सांगतात ! हें दोन गटांचें वृत्त झाले. तिसरा गट काँग्रेस सोडून जाणाऱ्या समाजवाद्यांचा व तत्सम इतरांचा. काँग्रेसमधील स्वार्थ, अनीति, क्षुद्रवृत्ति, यांना कंटाळून ज्यांनी काँग्रेस सोडली त्यांना काँग्रेसविरोधी आघाडी उभारण्यांत किती यश आले हें महशूर आहे. वास्तविक ध्येयनिष्ठा, उच्च नीति, महात्माजींचें सेवाव्रत या उदात्त घोषणा करीत हे लोक बाहेर पडले होते. त्यांना तर अखिल भारतव्यापी एकसंघ संघटना करण्यास कांहींच अडचणी यावयास नको होत्या. कारण त्यांची प्रेरणा अत्यंत उदात्त होती. पण प्रत्यक्षांत दृश्य असें दिसले की, त्यांच्यांत विघटनावृत्ति सर्वांत जास्त आहे. याचा अर्थ असा की तेहि स्वार्थ, सत्ताभिलाष, क्षुद्रवृत्ति यांतून वर निघू शकत नाहींत. काँग्रेसेतर पक्षांची ही स्थिति पाहिली म्हणजे, विघटना हा केवळ काँग्रेसचाच रोग नसून आपला सर्व समाजच त्या दुर्धर रोगाने ग्रस्त झालेला आहे, हे ध्यानांत येईल.

काँग्रेसमध्ये शिरावें

 स्वार्थ, क्षुद्रवृत्ति, अनीति ही व्याधि केवळ काँग्रेसचीच आहे असे नसून आपण सर्वच तिच्या आधीन आहोत, हे जर भारतीय नागरिकांच्या ध्यानीं आलें, तर त्यांना पुढील विचार स्वीकारण्यास फारशी अडचण पडणार नाही असे वाटते. लोकसत्ताक राज्यपद्धतीचे पहिले तत्त्व असें कीं, त्या पद्धतींत कोणचा तरी एक पक्ष निर्विवाद बहुमताच्या बलानें संपन्न असला पाहिजे. असे असल्यावांचून राज्ययंत्रच चालू शकणार नाही आणि राज्ययंत्र दुबळे झालें, की नागरिकांवर कोणचे अनर्थ कोसळतात तें आतां नव्याने सांगण्याची जरूर आहे असें नाहीं. तेव्हां, लोकसत्ताक पद्धतीचे हे पहिले तत्त्व लक्षांत ठेवून, भारतीय जनतेनें सध्यांच्या काळांत काँग्रेस या संघटनेलाच जास्तीत जास्त पाठिंबा देणे, यावांचून गत्यंतर नाहीं. काँगेसजनांची अधोगामी वृत्ति वर वर्णन करून पुन्हां त्या संघटनेलाच पाठिंबा द्यावा असे मत मांडणें हें अनेकांना अत्यंत विपरीत भासेल. पण जगांतील व्यवहारांत उतरल्यावर तुलनात्मक व तारतम्याच्या दृष्टीने पाहूनच निर्णय करावा लागतो. आपली आकांक्षा कितीहि मोठी असली तरी वस्तुस्थितीकडे पाहूनच व्यवहारांत पाऊल टाकावे लागते हे आपण विसरता कामा नये. विघटनेच्या रोगानें आपल्या सर्व समाजाला व्यापले नसतें, काँग्रेस नीतिभ्रष्ट झाली असतांना इतर कोठला तरी पक्ष निःस्वार्थी, सेवातत्पर व अभंग असा असता, तर त्याच्या हातीं राज्यसूत्रें देणेच आपले कर्तव्य ठरलें असतें. पण दुर्दैवानें तसा एकहि पक्ष नाहीं. अशा स्थितीत मोठ्या प्रकाशसंपन्न अशा विद्युद्दीपाच्या अभावीं जी कोणची लहानशी पणती आपल्याजवळ आहे तिच्या दोन्ही बाजूला हात धरून तिच्या मंद ज्योतीचा जितका संभाळ करता येईल तितका करणे हेच आपले कर्तव्य आहे, हा विचार शांतपणानें मनन केल्यास पटू शकेल असे वाटते. त्या ज्योतीला काजळी आलेली पाहून ती मालवून टाकावी असा विचार संतापाच्या भरांत येणे साहजिक आहे आणि अनेकांनी तो बोलून दाखविलाहि आहे; पण शुद्ध आततायीपणा होईल. लोकशाहीला अवश्य असणाऱ्या विवेकाचें तें लक्षण ठरणार नाहीं. कारण आज या ज्योतीचा संभाळ केला तर भविष्यकाळी केव्हांतरी विद्युद्दीप प्राप्त होण्याचा संभव आहे. पण ही पणती आज मालवून टाकली तर येथे सर्वत्र अराजकाचा अंधार पसरून त्यांत वाटचाल करतांना आपण कोणच्या कड्यावरून कोसळून पडूं, हे सांगणे फार कठीण आहे.
 अत्यंत सुदैवाची गोष्ट अशी की, हे तत्त्व मनोमन जाणूनच भारतीय जनतेने मागल्या निवडणुकांत मतदान केले असे दिसतें. काँग्रेसची पुण्याई लुप्त होते असे दिसत होते. आणि मनाला फारच निराशा वाटत होती. अशा वेळी ही दुसरीच एक पुण्याई या भूमीच्या संरक्षणासाठी उभी राहिली असे दिसतें. बहुसंख्यांचा एक पक्ष या देशांत काय वाटेल तें झाले तरी तगविलाच पाहिजे, असा निश्चय करून तो अमलांत आणण्याइतके सामुदायिक चिंतन व इतकी राजकीय प्रबुद्धता या भूमीतील अत्यंत मागासलेल्या समाजांत निर्माण झाली असेल, असे कोणाच्या स्वप्नांतहि आले नव्हतें. पण गेल्या शतकांतील थोर पूर्वसूरींचें कार्य, टिळक, महात्माजी यांचा मनापुढील आदर्श, पंडितजी, राजेन्द्रबाबू, सरदारजी यांची शिकवण यांचा परिपाक होऊन म्हणा किंवा कोणच्याहि दुसऱ्या कारणाने म्हणा, भारतीय जनतेनें पुष्कळशा प्रांतांत काँग्रेसला बहुमताचा पाठिंबा देऊन या देशावरचा एक घोर अनर्थ टाळला आहे. कांहीं प्रांतांत काँग्रेस सत्ताच्युत झाली हेहि एक प्रकारें हितावह झाले असे वाटते. लोकसत्ताक शासन हे सत्ता चालविण्याइतकें बलसंपन्न असावें, पण जनतेला उपमर्दून टाकण्याइतकें बल त्याच्या ठाय संचित होता कामा नये, असा लोकसत्ताक शासनशास्त्रांतील एक सिद्धांत आहे. जनतेनें काँग्रेसला याचीहि जाणीव दिली हे मोठे सुलक्षण आहे असे वाटते. काँग्रेसला आपला कौल देतांना मद्रास, त्रावणकोर, कोचीन, हैद्राबाद या प्रांतांत जनतेनें आपले मनोगत स्पष्टपणे प्रगट केले आहे. जो लोकसेवा करील त्यालाच मी सत्ताधिष्ठित करीन, असा निर्णायक जबाब तिने दिला आहे. यापुढे केवळ पूर्वपुण्याईवर तुम्हांला जगतां येणार नाहीं, असे पंडितजींच्याप्रमाणेच जनतेनेहि काँग्रेजनांना स्पष्टपणे बजाविलें आहे. आणि सत्ताधारी मदांध होऊन स्वार्थपरायण होतील तर त्यांना पदच्युत करण्याचे म्हणजे देशाच्या निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपल्या अंगी आहे, हे तिने निर्विवाद रीतीने प्रत्ययास आणून दिले आहे.
 या अकल्पितपणे उदयास आलेल्या महाशक्तीचा भारतीय तरुणांनी आपल्या राष्ट्राच्या राजकीय पुनर्घटनेच्या दृष्टीने जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. दोनचार राज्यांचे अपवाद वजा केले तर, जनतेने भारतांत काँग्रेसला पुन्हां सत्ताधिष्ठित केलें आहे. अशा प्रसंगी, ही शंभर वर्षांच्या तपश्चर्येने निर्माण झालेली पुण्याई नष्ट होऊं द्यावयाची नसेल तर, येथील तरुणांनी पंडितजींच्या हांकेला साद देऊन काँग्रेसमध्ये शिरावें, या दोन चार वर्षात काँग्रेसचा जो अधःपात झाला त्यावरून, तिचें हेंच मूळरूप आहे, असे न मानतां, ही तिची विकृति आहे आणि तिची प्रकृति त्याग, लोकसेवा, ध्येयनिष्ठा यांनींच घडली आहे, हें त्यांनीं ध्यानीं घ्यावें, आणि देशांत जी नवशक्ति निर्माण होत आहे तिच्या साह्यानें लोकसेवा करीत करीत आपल्या च्यारित्र्याच्या बळानें एका पिढीच्या कालावधींत या विराट संस्थेचे संपूर्ण शुद्धीकरण करून तिचे महासामर्थ्य तिला पुनः प्राप्त करून देण्याची महत्त्वाकांक्षा धरावी. मानवी कर्तृत्वाच्या दृष्टीने आपला देश अत्यंत गरीब आहे. अशा स्थितींत, शंभर वर्षाच्या दीर्घ प्रयत्नानें निर्माण झालेला पुण्यौघ तसाच डावलून दुसरी पुण्याई निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे आपणांस परवडणार नाही. दोन कर्तृत्वशाली संघटना पोसण्याइतके मानवी कर्तृत्वाचें सामर्थ्य या भूमींत निर्माण होण्यास अजून पुष्कळ कालावधि लागेल. तोपर्यंत आधींच निर्माण झालेल्या या जलौघाला अनेक ठिकाणी निर्माण होत असलेल्या जनशक्तीच्या प्रवाहाची जोड देऊन परिपूरित करून टाकणें हाच एक उन्नतीचा मार्ग होय.