भारतीय लोकसत्ता/मार्क्सप्रेरित दोन पक्ष

विकिस्रोत कडून
(भारतीय लोकसत्ता व समाजवाद)
मार्क्सप्रेरित दोन पक्ष

 मार्क्सप्रणीत समाजवादी चळवळी या प्रामुख्यानें गिरणीकारखान्यांतील कामगारांच्या चळवळी असतात. हा कामगारवर्ग अत्यंत पुरोगामी, जागृत व संघटित असून सध्यांच्या जगांत समाजवादी क्रांति घडवून आणण्याचें सामर्थ्य फक्त त्याच वर्गाच्या अंगी आहे आणि क्रांतीचे नेतृत्व करण्यास फक्त तोच वर्ग समर्थ आहे, असा मार्क्सवादाचा सिद्धान्त आहे. सध्यां कष्टाळू जनतेचा उल्लेख करतांना शेतकरी व कामकरी असा जोडीने उल्लेख केला जातो. गरीब शाळाशिक्षक व कारकून यांचीहि या समाजांत कोणी गणना करतात. पण शुद्ध मार्क्सवादान्वयें नव्या समाज रचनेचा सर्व भार गिरणी- कारखान्यांतील शहरवासी कामगारवर्गावरच असतो. असा हा कामगारवर्ग हिंदुस्थानांत इ. स. १८७० च्या सुमारास निर्माण होऊं लागला. टाटा, ससून इ. भांडवलदारांचे कारखाने याच वेळीं सुरू झाले. अनेक इंग्रज कंपन्या याच वेळी निघाल्या व त्यांच्या कारखान्यांत काम करणारा मजूरवर्गहि तेव्हांपासूनच हिंदुस्थानांत दिसूं लागला. १८९४ सालीं हिंदुस्थानांत सुमारे ८०० कारखाने असून त्यांत साडेतीन लक्ष कामगार काम करीत होते. १९३० सालीं कारखाने ८००० असून कामगारसंख्या १५ लक्ष पर्यंत गेली होती. १९४४ साली एकंदर कामगार २५ लक्ष असून ते १४ हजार कारखान्यांत काम करीत होते. ही सर्व मोठ्या कारखान्यांची गणती आहे. लहान कारखान्यांतील कामगार यांत धरले तर हिंदुस्थानांतील एकंदर गिरणी कारखान्यांत काम करणारा वर्ग हा ३० ते ३५ लक्षांच्या आसपास जाईल.
 प्रारंभापासून या कामगारांची स्थिति अत्यंत हलाखीची होती, त्यांचे पगार असेच असत की त्यांतून पोटभर अन्न, वस्त्र व इतर जीवनावश्यक वस्तु मिळणे अशक्य होते. एकेका खोलीत आठदहा माणसे रहावयाची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी कारखान्यांतून राबावयाच आणि संध्याकाळी सर्वांनी मिळून एक ते दीड रुपयांची रक्कम घरीं आणावयाची! यांतच अज्ञान, रोगराई, व्यसने यांची भर पडून या कामगारांचें जीवन म्हणजे जिवंत नरकयातना होत असत. ब्रिटिश ट्रेड युनियन काँग्रेसचें वृत्त, व्हिटले कमिशन, आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेतील भारताचे प्रतिनिधि एस्. व्ही. परुळेकर व इंडियन टॅरिफ बोर्ड यांनी दिलेले अहवाल, यांवरून हें स्पष्ट कळून येतें आणि त्यावरून हेहि दिसून येतें कीं याच वेळी पुष्कळशा कंपन्या शेकडा ४० पर्यंत नफा वाटीत असून कांहीं कंपन्या शेकडां २०० ते ३०० पर्यतहि भागीदारांना नफा देत असत !
 अशा स्थितीतहि सध्यांच्या काळांत ज्यांना आपण कामगारचळवळी व कामगार संघटना म्हणतो त्यांचा १९१८ पूर्वी म्हणजे रशियन क्रान्तीची प्रेरणा मिळेपर्यंत उदय झाला नव्हता. १८७७ सालीं नागपूरच्या एम्प्रेस मिलमध्ये पगारवाढीसाठी संप झाल्याची नोंद आहे. १८८४ साली लोखंडे नांवाच्या गृहस्थानें मुंबईच्या कामगारांची एक संघटना निर्माणहि केली होती. पण तिचे रूप फार शिथिल होते व ती पुढे टिकलीहि नाहीं. त्यानंतर काँग्रेसच्या प्रयत्नाने देशांत राष्ट्रीय भावनेचा प्रसार होऊं लागला. त्याच्या लाटा कामगारांपर्यंत अल्प प्रमाणांत जाऊन पोचत असत. त्यांच्यांत कांहींशी जागृतीहि होत होती. पण ती वर्गीय भावनेची जाणीव नव्हती. कामगार ही स्वतंत्र शक्ति आहे, हाच वर्ग क्रांतीचा नेता आहे, या कल्पना तर कोणाच्याहि मनांत, स्वतः कामगाराच्याहि मनांत, उदित झाल्या नव्हत्या. त्यामुळे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने त्यांच्या संघटनांकडे कोणी कधीं लक्ष दिलें नाहीं. देशाचा मुख्य कणा म्हणजे शेतकरी. त्यांच्या चळवळीकडेहि टिळकांखेरीज कोणी राजकीय दृष्टीने पाहिले नाहीं. मग ज्यांच्या अस्तित्वाची फारशी जाणीवहि काँग्रेसच्या नेत्यांना नव्हती त्या कामगारांच्या संघटनांचे नांव कशाला ? आणि त्यांत विपरीत असे कांहीं नव्हतें. कारण त्यावेळी अखिल हिंदुस्थानांत कामगारांची संख्या ५| ६ लाखांच्या वर गेली नव्हती. तेव्हां त्यांच्या स्वतंत्र प्रश्नांची व सामर्थ्याची जाणीव कोणास झाली नसली तर त्यांत कांहीं नवल नाहीं. टिळकांना ही जाणीव होऊन त्यांनीं कामगारांत जागृति करण्यास प्रारंभ केला होता, असा उल्लेख 'ग्रेट मेन ऑफ इंडिया या पुस्तकांत त्यांच्या इंग्रज चरित्रकाराने केला आहे. 'हा पुण्याचा सनातन ब्राह्मण आपल्यांत येऊन बरोबरीनें मिसळतो, या विचारानें कामगारांना अस्मान् ठेंगणे झालें' असें त्याने म्हटले आहे. मात्र याला अन्यत्र कोठेंहि पुरावा मिळत नाहीं. पण १९०२ सालचे केसरीतील 'हिंदुस्थानचे दारिद्र्य', 'आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले ?' हे लेख पाहिले म्हणजे शेतकऱ्यांची चळवळ आठदहा वर्षे केल्यानंतर जागृतीची तीच ठिणगी कामगारांत टाकून द्यावी या विचारानें टिळक प्रवृत्त झाले असतील हे पूर्ण संभवनीय आहे. पण तसे असले तरी ते प्रयत्न प्रत्यक्षांत अवतरले नाहीत हे खर आहे. तेव्हां १९२०-२१ पर्यंत कामगारांमध्ये राजकीय दृष्टीने चळवळ व संघटना झाली नव्हती; आणि कामाचे तास कमी करून घेणे, मजुरी वाढवून घेणे, इतर तक्रारी दूर करून घेणे इ. हेतूंसाठी ज्या संघटना झाल्या त्यांनाहि पहिले महायुद्ध संपून जाईपर्यंत विशेष जोर चढला नव्हता, असेच म्हटले पाहिज.

कम्युनिस्ट पक्षाची स्थापना

 १९१८ सालीं सोव्हिएट रशियांत अभूतपूर्व अशी क्रान्ति झाली आणि तेव्हांपासून एकंदर जगाच्याच कामगारवर्गाच्या जीवितांत नवे युग सुरूं झालें. रशियांत कामगारांचें राज्य स्थापन झाले व कामगारवर्ग सत्ताधीश झाला, असा त्यावेळी सर्वत्र बोलबाला झाला. त्यामुळे या वर्गांच्या जीवनांत नव्या आशाआकांक्षांचा उदय होऊन त्याची सर्व कळाच पालटून गेली. मार्क्सवादी वाड्मय हळूहळू भारतांत झिरपून येऊं लागले व मुंबईच्या कांहीं तरुण कार्यकर्त्यांच्या मनांत मार्क्सच्या अलौकिक संदेशाचे ध्वनि घुमूं लागले, १९२२ ते १९२४ च्या दरम्यान श्रीपाद अमृत डांगे, ठेंगडी, घाटे, जोगळेकर, शौकत उस्मानी, झाबवाला, मुझफर अहंमद, दासगुप्ता यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व डांगे यांच्या संपादकत्वाखाली १९२४ सालीं 'सोशालिस्ट' हे पत्र चालू केले.
 मार्क्सवाद ही एक प्रखर आग आहे. ती ज्या भूमीत पसरते, तेथील प्रस्थापित राजसत्ता, धर्मसत्ता, तेथील समाजांवर वर्चस्व गाजविणाऱ्या हजारों वर्षांच्या रूढी, त्याच्या मनावरचे सर्व प्रकारचे जुनाट संस्कार हे सर्व या आगीत जळून खाक व्हावयाचें, हा गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासावरून स्पष्ट दिसून येणारा सिद्धांत आहे. १९२४ सालीं मार्क्सप्रणीत तत्त्वांचे हे सामर्थ्य इतक्या उत्कटत्वानें जगाच्या निदर्शनास आले नव्हते, पण युरोपांतील सत्ताधारी वर्गाला त्याची जाणीव झाली होती यांत शंका नाहीं, आणि या सर्व सत्ताधाऱ्यांत अत्यंत श्रेष्ठ, सावध व दक्ष असे जे ब्रिटिश लोक त्यांना तर मार्क्सवाद हा अंतर्बाह्य चांगलाच परिचित झाला होता. कारण १८५० सालापासून मार्क्स व एंगल्स यांचे सर्व कार्य त्यांच्याच भूमींतून चालले होते. हिंदुस्थानांतील या नव्या चळवळीचा, या नव्या आगीचा अर्थ त्यांनी तत्काळ जाणला आणि जन्मतःच तिचा नायनाट करण्याच्या हेतूनें आपल्या सर्व सामर्थ्यानिशी १९२४ सालापासूनच प्रयत्न सुरू केले. त्याच साली कानपूर-कटाचा खटला सुरू झाला आणि डांगे, शौकत उस्मानी प्रभृति कम्युनिस्ट नेत्यांना सरकारने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
 अशा रीतीनें हिंदुस्थानांत कम्युनिस्ट चळवळीचा प्रारंभ झाला. त्याच्या आधीं वर सांगितल्याप्रमाणे मजुरांच्या फारशा संघटनाच नव्हत्या आणि १९१७-१८ च्या सुमारास ज्या संघटना अस्तित्वांत आल्या होत्या, त्यांचें स्वरूप अगदीं साधे म्हणजे कम्युनिस्टांच्या भाषेत सुधारणावादी होते. १९२० सालीं हिंदुस्थानांतील सुमारें २०० ट्रेड युनियन्सचे प्रतिनिधि मुंबईस एकत्र जमले व त्यांनी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. यावेळी लजपतराय या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व बॅ. जोसेफ बॅप्टिस्टा हे उपाध्यक्ष होते. येथून पुढे या कामगार संघटनेचीं दरसाल अधिवेशन भरूं लागलीं. पण वर्गविग्रह, भांडवलदारशी लढा, कामगारांचे अधिराज्य साम्राज्यशाहीचा पाडाव या जहाल तत्त्वांचा अवलंब अजून कामगारांनी केला नव्हता. कामगारांची स्थिति सुधारणें, कामाचे तास कमी करणे, वेतनवाढ करणे, घरांची सोय करणे, फॅक्टरी ॲक्टसारखे कायदे करण्याची सरकारला विनंति करणे एवढीच या संघटनेच्या कार्याची व्याप्ति होती; आणि असे होते तोपर्यंत सरकारचाहि तिला पाठिंबा होता. नारायण मल्हार जोशी हे त्या क्षेत्रांत त्यावेळी प्रमुख कार्यकर्ते होते. अखिल भारतांतील कामगारसंघटना एकसूत्रांत आणणे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाशीं त्यांचा संबंध जोडून देणे इ. महत्त्वाची कामे जोशी यांनी केली. चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस हेहि एकेकदां या अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष होते; पण त्यांचें धोरण वर्गसमन्वयाचें, राष्ट्रनिष्ठेचें व सरकारच्या मदतीने कामगारांचा उद्धार घडवून आणण्याचें होतें. मार्क्सवादाची प्रेरणा यांच्यापैकी कोणींच दिली नव्हती. ती देण्याचें सर्व श्रेय डांगे, मिरजकर प्रभृति कम्युनिस्टपक्षीय नेत्यांनाच आहे.
 सरकारने अत्यंत हिंस्त्रपणे कम्युनिस्ट चळवळीवर आघात केले, तरी त्यामुळे ती दडपली गेली नाहीं. उलट त्या पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा या दडपशाहीमुळे वाढून कामगारवर्ग बहुसंख्येनें त्यांच्या पाठीमागे चालू लागला. सर्व हिंदुस्थानांतील बहुसंख्य ट्रेड युनियन्स त्यांच्या कक्षेत गेल्या आणि १९२० साली स्थापन झालेली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसहि लवकरच त्यांनी जिंकून घेतली. व्हिटले कमिशनवर कम्युनिस्टपक्षीय नेत्यांनीं बहिष्कार घालण्याचा ठराव केला; तेव्हां तें धोरण नेमस्त पुढारी ना. म. जोशी यांना मान्य नव्हतें; पण काँग्रेसमध्ये ते आपले वर्चस्व प्रस्थापूं शकत नसल्यामुळे त्यांना ट्रेडयुनियन काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले आणि 'नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर' अशी आपल्या वगीची निराळी कामगार संघटना काढावी लागली. अशा रीतीनें अखिल भारतीय कामगार जगांत कम्युनिस्टांचे निरपवाद नेतृत्व प्रस्थापित होऊन वर्गविग्रह, कामगारसत्ता या धोरणानें येथल्या राजकारणाची पावले पडण्याचा कांहीसा संभव निर्माण झाला.
 १९२८-२९ साली कम्युनिस्टप्रणीत कामगार चळवळीला अगदीं उधान आले होते. मागल्या सातआठ वर्षांत घडले नव्हते इतके संप या एका वर्षांत घडून आले आणि अनेक ठिकाणी मालकवर्गाला व त्याच्यामागे उभ्या असलेल्या सरकारला कामगारांपुढे नमावें लागून त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या; त्यामुळे सरकारनें दडपशाहीचा वरवंटा जोरात फिरविण्यास सुरवात करून अनेक मार्गानी ही चळवळ भरडून टाकण्याचा प्रयत्न केला. सुप्रसिद्ध मीरतकटाचा खटला झाला तो याच वेळी. निरनिराळ्या तीस कम्युनिस्ट नेत्यांना यांत सरकारने गोविलें होतें. हा खटला तीन साडेतीन वर्षे चालून बहुतेक नेत्यांना सरकारने १० ते १२ वर्षांच्या काळेपाण्याच्या शिक्षा दिल्या, पण पुढे आंतरराष्ट्रीय दडपणामुळे या शिक्षा बऱ्याच कमी करण्यांत आल्या. कामगारांचे नेते अशा रीतीने तुरुंगांत गेल्यामुळे चळवळ बरीच विस्कळित झाली, पण थंडावली नाहीं. फुटीरपणे शेकडों कारखान्यांत संप होतच राहिले व कांहीं ठिकाणी त्यांचें प्रमाण वाढलेहि. त्यामुळे १९३४ साली कम्युनिस्ट पक्षच सरकारने बेकायदा ठरवून या चळवळीवर प्रचंड आघात केला. तरी गुप्तपणे भूमिगत होऊन कम्युनिस्टांनी आपली चळवळ चालू ठेवली होती. १९४२ साली त्यांनी युद्धकार्यांत ब्रिटिशांना साह्य करावयाचे ठरविल्यामुळे त्यांच्यावरील बंदी उठली व त्यांच्या कामगारसंघांच्या संख्याहि वाढू लागल्या; पण युद्धसमाप्तीनंतर रशियानें ब्रिटनविरोधी धोरण अवलंबितांच येथील कम्युनिस्टांनी पुन्हां आपले धोरण बदलले. आणि यावेळी त्यांनी अत्यंत भयानक अशा घातपाती चळवळीचें धोरण स्वीकारले. यामुळे काँग्रेस सरकारने त्यांच्या विरुद्ध हत्यार उपसून कम्युनिस्ट पक्षाची पाळेमुळे खणून काढण्याचा निश्चय केला व तशी मोहीमहि सुरू केली. सध्यां बाह्यतः तरी हा पक्ष नामोहरम झाल्यासारखा दिसत आहे.
 भारतांतील कम्युनिस्ट पक्षाच्या गेल्या ३० वर्षांच्या इतिहासाची रूपरेखा ही अशी आहे. या देशाच्या एकंदर प्रगतीच्या दृष्टीने आणि येथल्या लोकशाहीच्या दृष्टीनें त्या इतिहासाचा व कम्युनिस्टांच्या कार्याचा विचार केला, तर मन निराशेनें व्याप्त होते. त्याग, धैर्य, साहस या गुणांत हे लोक, किंवा निदान यांचे प्रारंभींचे नेते कमी होते असे मुळींच नाहीं. तरुण स्त्रीपुरुष जनसेवेच्या ज्या उदात्त भावनेने प्रेरित होतात त्याच भावनेनें डांगे, मिरजकर, निंबकर व त्यांचे इतर प्रांतांतले अनेक सहकारी प्रेरित झाले असले पाहिजेत. मार्क्सचें तत्त्वज्ञान अभ्यासून त्याचा कामगारांत प्रसार करण्यासाठी त्यांनी जे कष्ट केले, त्यांत स्वार्थी हेतूचा मागमूस सांपडणे त्यावेळी तरी शक्य नव्हते, अजूनहि लढा करण्याची त्यांच्या अंगांतली रग पाहिली, तुरुंगामध्ये ज्या बेडर व साहसी वृत्तीने ते प्रतिकार करतात तिची वर्णने वाचली म्हणजे त्यांच्या त्या आंतरिक प्रेरणेबद्दल मोठा विस्मय व कौतुक वाटते. आणि त्यामुळेच मनाला अतिशय खेद होतो, त्याग, साहस, धैर्य समाजहितबुद्धि हे मानवत्वाचे अलौकिक गुण केवळ वायां जावे याचा मनाला विषाद वाटतो. कारण भारतीय लोकसत्तेच्या दृष्टीने कम्युनिस्टांच्या कार्याचें मूल्य माझ्या मते जवळजवळ शून्य आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे पुष्कळसे तत्त्वज्ञान, धोरण व कृति ही या प्रगतीला मारकच झाली आहेत; आणि याचे प्रधान कारण म्हणजे सोव्हिएट रशियाची व मार्क्सवादाची त्यांनीं पत्करलेली गुलामगिरी हे होय.
 कम्युनिस्ट तत्त्वज्ञान हे विश्वव्यापक बैठकीवर उभारलेलें आहे. राष्ट्रभेद ते जाणीत नाहीं. धर्मभेद, पंथभेद तर मुळींच नाहीं. सर्व जगांतील कामगारांची एक संघटना हे त्याचें ब्रीदवाक्य आहे. मार्क्स, एंगल्स व पुढे लेलिन स्टॅलिन यांनी स्थापलेल्या संस्थांना फर्स्ट इंटरनॅशनल, सेकंड, थर्ड इंटरनॅशनल अशी नांवें होतीं. धर्मभेद, राष्ट्रभेद, वंशभेद हे सर्व भांडवलदारांनीं निर्मिलेले आहेत आणि त्यांच्या पलीकडे जाऊन म्हणजे धर्म, राष्ट्र, वंश हे कांहीं न मानतां अखिल जगतांतल्या कामगारांनी एक व्यापक संघटना उभारावी अशी कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाची आज्ञा आहे. रशियन क्रांतीच्या लाटांबरोबर हेहि तत्त्वज्ञान जगभर पसरलें व प्रत्येक देशांतील तरुण याच धोरणानें कार्य करूं लागले. प्रत्यक्षांत खरोखरच असे कांहीं घडले असते तर जगांतील युद्धे टळून मानवजातीचा दुःखभार हलका झाला असता यांत शंकाच नाहीं; पण थोर तत्त्वांची जी नेहमीं वासलात लागते तीच याचीहि लागली. धूर्त लोकांनी ते स्वार्थासाठी राबवावयाचे आणि भोळ्याभाबड्यांनी उदात्त तत्त्वाचे आपण आचरण करीत आहोत, या सुखद भावनेत गुंग होऊन बळी जायचें, असाच सर्व थोर तत्त्वांचा इतिहास असतो. हिंदुस्थानांतील कम्युनिस्ट नेते दुसऱ्या वर्गात पडले आणि त्यांनी स्वतःला व देशहिताला सुखाने बळी दिले.

सोव्हियेट रशियाचें दास्य

 वास्तविक १९२६ सालींच स्टॅलिननें 'राष्ट्रमर्यादित समाजवाद' 'सोशॅलिझम इन् ए सिंगल कंट्री' हे धोरण जाहीर करून आंतरराष्ट्रीयत्वाचा व जगव्यापकतेचा बळी दिला होता. तेव्हांपासून त्याचे प्रत्येक कृत्य कट्टर राष्ट्रवादी धोरणाने प्रेरित झालेलें होतें. १९३८ सालीं जगांतील कामगारांशीं दगाबाजी करून त्याने मार्क्सवादाचा कट्टा शत्रू हिटलर याच्याशीं तह केला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची त्याची भाषणे राष्ट्रनिष्ठा, पूर्वपरंपरेचा अभिमान, मातृभूमीचें श्रेष्ठत्व यांनीं इतकी अलंकृत झालेली आहेत कीं, क्षणभर वीर सावरकरांचींच भाषणे हा पाठ म्हणून दाखवीत आहे की काय, असा भास व्हावा. १९४५ सालीं जपानचा पराभव होऊन त्याचें सैन्य चीनमधून परत गेले; त्यावेळी चिआंग कै शेकची व माओची अशा दोन सत्ता तेथें प्रस्थापित होऊं पहात होत्या. त्यांतील कोणच्या सत्तेशीं स्टॅलिननें तह केला ? मान्यता कोणच्या सत्तेस दिली ? दलितांचा कैवार घेऊन उठणारी, शेतकऱ्यांचे राज्य जिने कांही भागांत प्रत्यक्ष प्रस्थापित केले होते अशी, मार्क्सवादावर अनन्य निष्ठा ठेवणारी, जमीनदार भांडवलदार यांचा नायनाट करणारी अशी जी माओची सत्ता तिला स्टॅलिननें मान्यता दिली नाहीं. विरोधविकासवादावरील आपल्या निबंधांत प्रस्थापित सत्ता कितीहि बलिष्ठ दिसली तरी नव्या उदयोन्मुख सत्तेलाच ती कितीहि क्षुद्र दिसत असली तरी- खऱ्या मार्क्सवादानें पाठिंबा दिला पाहिजे असे त्यानें सांगितले आहे. असे असून, अमेरिकेने ज्या प्रतिगामी, सुलतानी, सैतानी, अधोगामी चिआंग कैशेकच्या सत्तेला पाठिंबा दिला, तिलाच स्वत: स्टॅलिननें साद घातली. त्यानें चिआंग कैशेकलाच मान्यता दिली. हिटलर, चिआंग कैशेक हेच स्टलिनचे दोस्त होते. त्यानें लांडग्याच्या जातीचेच दोस्त निवडले. मधूनमधून तोंडी लावायला इतर देशांतील कामगारपक्षरूप शेळ्यांना तो जवळ करतो हें खरें. त्या वेळीं तो भाषणेहि उदात्त करतो; पण राष्ट्रीय हिताचा प्रश्न आला की तो हिटलर, चर्चिल, चिआंग यांच्या गटांत सामील होतो व मग सगळे मिळून शेळयांचा समाचार घेतात.
 स्टॅलिनचें हें चरित्र अगदीं उघडे व जगजाहीर असे आहे. त्यांत गूढ, अनाकलनीय असे कांहीं नाहीं. १९२६ साली त्यानें राष्ट्रीय समाजवादाचें धोरण जाहीर करतांच जगांतील, निदान हिंदुस्थानांतील कम्युनिस्टांनीं सावध व्हावयास हवें होतें. १९३८ सालीं त्याने हिटलरशी सख्य केले तेव्हां तर त्यांच्या डोळ्यांत चरचरीत अंजन पडावयास हवें होते. पण आपल्या दुर्दैवानें तसे झालें नाहीं व अजूनहि कम्युनिस्टांची सोव्हिएटनिष्ठा कमी होत नाहीं. कित्येक मुसलमानांची भारतबाह्य निष्ठा जितकी घातक आहे तितकीच कम्युनिस्टांची ही भारतबाह्य निष्ठा घातक आहे व तिला एक अर्वाचीनतेचें व अद्यावततेचें भ्रामक आवरण असल्यामुळे ती एका दृष्टीने जास्तच घातक आहे.

हिंस्त्र मार्ग

 उत्पात, विध्वंस यांवांचून समाजाची प्रगति नाहीं, या मार्क्सप्रणीत विरोधविकासवादांतील दुसऱ्या एका तत्त्वावरील अंधनिष्ठेमुळे कम्युनिस्ट आणखी एका प्रकारें या भूमीचे अहित करीत आहेत. गेलीं कांहीं वर्षे त्यांनी घातपाती चळवळीचा अवलंब करूंन लोकशाहीच्या मूलभूत कल्पनाच झुगारून दिल्या आहेत. वास्तविक महात्माजींनीं सत्याग्रहाचा किंवा व्यवहारतः निःशस्त्र प्रतिकाराचा मार्ग या भूमीच्या स्वातंत्र्याच्या लढ्यांत यशस्वी करून दाखविल्यानंतर कांहीं भारतीयांनी अन्य मार्गाचा अवलंब करावा हे खरोखर दुर्दैव होय. अंतिम लढा सशस्त्र होईल की निःशस्त्र याविषयीं कितीहि मतभेद असले, तरी प्रारंभीचे लोकजागृतीचे लढे हे या एकाच मार्गाने यशस्वी होतील, निदान स्वकीय सरकाराविरुद्ध जो लढा करावयाचा तो आचार्य जावडेकरांनी रूढ केलेल्या शब्दप्रणालीअन्वये सत्याग्रही समाजवादी पद्धतीनेंच करणे अत्यंत श्रेयस्कर होय, याविषयीं कोणाचें दुमत होईल असे वाटत नाहीं. खरोखर लोकशाही समाज व लोकायत्त शासन निर्माण करूं पहाणाऱ्या राष्ट्राला महात्माजींनी सत्याग्रह हे जे शस्त्र दिले आहे त्याला दुसरी तोड नाही. लोकशाहीच्या सर्व व्यवहारांची व लोकायत्त शासन लोकांच्या नियंत्रणाखाली सतत ठेवण्याच्या उपायांची ज्यानें स्वतःच्या मनाशीं चिकित्सा केली असेल, त्यालाच महात्माजींच्या या अलौकिक कार्याची महती यथार्थपणे कळू शकेल. जगाच्या लोकशाहीचा इतिहास लिहितांना गांधीपूर्वयुग व गांधीउत्तरयुग असे त्या इतिहासाचे दोन भाग पाडावे लागतील इतके सत्याग्रही समाजवादाचे महत्त्व आहे. लोकायत्त शासन बदलण्यास मतप्रचारानें बहुमत आपल्या बाजूस करून घेणे हा एकच शांततेचा उपाय आजपर्यंत जगाला माहीत होता. तो फसला तर सशस्त्र क्रांतीखेरीज दुसरा मार्ग नव्हता. पण सशस्त्र क्रांतींत लोकशाहीचा बहुधा बळी पडतो; म्हणून तो उपाय अवलंबिणे फार धोक्याचें असतें. सत्याग्रह हा मार्ग दाखवून महात्माजींनी ही कोंडी फोडून टाकली आहे आणि जगांतल्या लोकशाहीची चिरंतन सेवा केली आहे. पण दुर्दैवानें कम्युनिस्ट जातीचे लोक हे महासत्य आकळू शकत नाहीत आणि रशियाहून येणाऱ्या संदेशाप्रमाणे घातपाताचा अवलंब करून भारतीय लोकसत्तेचा ते कायमचा नाश करूं पहात आहेत.

साम्राज्यशाहीशी लढा नाहीं.

 पण एवढेहि करून ज्या साम्राज्यशाहीच्या शत्रुत्वाचे कंकण जन्मतःच या पक्षानें हातांत बांधले होते, त्या ब्रिटिश साम्राज्यशाहीशी या पक्षाने लढा चालविला असता तर भारतीय जनता अंशतः तरी त्याची ऋणी झाली असती. कारण अज्ञान, दास्य, दारिद्र्य यांत हजारो वर्षे खितपत पडलेल्या तेजोहीन, प्रतिकारशून्य जनतेला स्वतःच्या हक्कासाठी, आपल्या बांधवांसाठी व आपल्या स्वाभिमानासाठी लढा करण्यास उद्युक्त करणें, तिच्या पाठीचा कणा ताठ करून मरणमारणसंग्रामाला तिला सिद्ध करणे ही लोकशाहीची आणि मानवतेची फार मोठी सेवा आहे. पण तोंडाने साम्राज्यशाहीशी लढा हे पालुपद चालू ठेवणाऱ्या या पक्षाने स्वतंत्रपणे ब्रिटिशांशी कधींहि लढा कला नाहीं आणि काँग्रेसने जे लढे केले त्यांपैकी एकांतहि भाग घेतला नाहीं. शेवटच्या ४२ च्या लढ्यांत तर स्वदेश, जनता व कामगार यांशीं द्रोह करून त्या साम्राज्यशाहीशीच सहकार्य केले. आणि हे कृत्य म्हणजेच कम्युनिस्ट पक्षाच्या पुरोगामित्वाचें कमालीचे भूषण होय, असे पाम दत्तासारखे लेखक जगाला सांगत आहेत ! (इंडिया टुडे-पृ. ३५३).
 कम्युनिस्टांनी १९२० सालानंतरच्या पंधरावीस वर्षांत कामगारवर्गात जागृति करून गिरणी-कारखान्यांतून अनेक संप घडवून आणले; पण या लढ्यांना जोपर्यंत राजकीय स्वरूप येत नाही, तोपर्यंत हे संप म्हणजे कामगार वर्गाच्या स्वतःच्या कामाच्या तासांच्या व मजुरीच्या तक्रारी दूर करण्याचे एक साधन ठरून त्यांना उदात्त य व्यापक प्रतिष्ठा प्राप्त होत नाहीं. राष्ट्रीय लढ्यामागले थोर तत्त्वज्ञान, अखिल देशबांधवांच्या कल्याणासाठी त्याग करण्याची त्याच्या मागची भूमिका, एका मानवसमूहाच्या सांस्कृतिक उंचीसाठी आत्मार्पण करण्याची त्यामुळे मनाला मिळणारी शिकवण हे जे ब्रिटिश साम्राज्यशाहीशी होणाऱ्या लढ्याचें वैभव ते केवळ मजुरांच्या हितसंबंधाचे दोनचार प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या संपांना कधीच येणार नाहीं. कामगारांच्या लढ्यांना प्रारंभ जरी संपापासून झाला, तरी साम्राज्यशाहीशी करावयाच्या लढ्याचा एक भाग, हे त्याचे स्वरूप कधींच दृष्टीआड होता कामा नये. कारण कामगारांचे खरे शत्रू साम्राज्यशहा हेच असतात. भांडवलदार, जमीनदार, संस्थानिक हे त्यांचे हस्तक म्हणून त्यांचें स्थान गौण असतें. आणि म्हणूनच प्रत्येक आर्थिक लढा हा राजकीय लढा असला पाहिजे हे मार्क्सवादांत आद्य तत्त्व म्हणून स्वीकारलेले आहे. पण सोव्हिएट रशियाच्या अंकिततेमुळे येथील कम्युनिस्टांना या तत्त्वाचाहि विसर पडला आणि कामगारवर्ग ही भारताची एक मोठी शक्ति यांनी परक्यांच्या हितासाठी कायमची पंगु करून ठेवली. साम्राज्यशाहीशीं मुकाबला केल्याने अंगांत निर्माण होणारे तेज व सामर्थ्य त्यांनीं जन्माला येऊंच दिले नाहीं.
 चिनी कम्युनिस्टांना स्वतंत्र प्रज्ञा, अभिजात दृष्टि व स्वयंकर्तृत्व यांची जोड लाभल्यामुळे आपल्या राष्ट्राची त्यांनी किती अलौकिक सेवा केली पहा. जपानी साम्राज्यशाहीशीं लढा हे आपले ध्येय त्यांनी कर्धीहि दृष्टिआड होऊ दिले नाही आणि त्यासाठी प्रथम सन्यत्सेनशीं तर त्यांनी सहकार्य केलेंच, पण पुढे चिआंग कैशेकनें जपानशीं लढण्याचे मान्य करतांच १९३६ साली कोमिंटांगसारख्या अत्यंत प्रतिगामी व अधम अशा पक्षांशी सुद्धां सहकार्य केलें. सियान येथें चिआंगला मांचूरियन सैन्यानें पकडलें, त्या वेळीं कम्युनिस्टांच्या मध्यस्थीमुळेच तो जिवंत सुटला. आणि त्याला ठार केले तर देशांत यादवी माजून जपानी साम्राज्यशाहीशी लढा करणे अशक्य होऊन बसेल हे जाणूनच कम्युनिस्टांनी या आपल्या हाडवैऱ्याला जिवंत सोडून त्याच्या प्रतिष्ठेला अणुमात्र धक्का लागणार नाही अशी दक्षता घेतली. आणि नंतर त्याच्या हाताखाली आपल्या सेना देऊन साम्राज्यशाहीशी लढा चालू केला. हे सहकार्य यशस्वी व्हावे म्हणून त्यांचे अधिराज्य असलेल्या वायव्य सरहद्द प्रांतांत त्यांनीं कांहीं काळ जमीनदारांशी चालू केलेला संग्राम स्थगित करण्याचेंहि अभिवचन दिले आणि ते कसोशीने पाळले. कारण जपान हा खरा शत्रू असून जमीनदार-भांडवलदार हे त्याचे हस्तक होत, हे सत्य त्यांना चांगले उमगले होते. साम्राज्यशाहीशी लढा या तत्त्वाप्रमाणेच राष्ट्रनिष्ठा हे दुसरे महातत्त्वहि चिनी कम्युनिस्टांनी दृष्टिआड होऊं दिले नाहीं. 'परतंत्र राष्ट्राचे पहिले कर्तव्य स्वातंत्र्यप्राप्ति हे होय, समाजवाद नव्हे. परतंत्र राष्ट्रानें कम्युनिझमची चर्चा करण्यांतसुद्धा अर्थ नाहीं, राष्ट्रीय स्वातंत्र्य हेच त्याचें पहिले कर्तव्य होय.' असे माओ त्से तुंगचे स्पष्ट उद्गार आहेत. (रेड स्टार ओव्हर चायना एडगर स्त्रो. पृ. ४१७). चिनी कम्युनिस्ट पक्षाचें कार्यहि याचीच साक्ष देईल. १९२१ पासून १९४९ साली चीनवर पक्षाचें राज्य स्थापन होईपर्यंत राष्ट्रीय स्वातंत्र्य व साम्राज्यशाहीशी लढा हे दोनच कार्यक्रम त्यांनी डोळ्यापुढे ठेवले होते व या लढ्यासाठी चिनी शेतकऱ्यांच्या प्रचंड सेना तयार करून राष्ट्रीय संग्रामाच्या अग्निदिव्यांतून त्यांनीं नवचीन निर्माण केला आणि याच वेळी हजारों खेड्यांतून स्वायत्त शासनाचे शिक्षण देऊन लोकशाहीचा पाया घातला. सामान्य मानवांतील स्वाभिमान जागृत करून त्याला आक्रमणाला तोंड देण्यास, साम्राज्यशाहीशीं लढा करण्यास सिद्ध करणे हा स्वायत्त शासन पेलण्यास त्याला समर्थ करण्याचा एकच उपाय आहे, हे टिळकमहात्माजींनी जितके जाणले होते तितकेच चिनी कम्युनिस्टांनीं जाणले होते असे दिसतें. राष्ट्रीय संघटना करण्यांत त्यांना यामुळेच यश प्राप्त झाले आहे. याच सत्याचें ज्ञान हिंदुस्थानांतील कम्युनिस्टांना झाले असते तर !
 हे ज्ञान त्यांना स्वतःला तर झालें नाहींच, पण ज्या दोन विभूतींना झाले होते, त्यांची निरर्गल निंदा करणे यांतच भूषण आहे, असे विपरीत धोरण त्यांनी अंगीकारले होतें. पाम दत्त नांवाच्या कम्युनिस्टाच्या मतें टिळकांच्या पक्षाला राजकीय तत्त्वज्ञानच नव्हते ! टिळकांना नवीन सामाजिक व राजकीय दृष्टि प्राप्त झालेली नव्हती ! (इंडिया टुडे पृ. २६८). आणि गांधींची सत्यनिष्ठा, अहिंसा व इतर तत्वे म्हणजे जनतेची चळवळ हाणून पाडण्याचे हुकमी साधन होतें ! (उक्त ग्रंथ पृ. २९५) अशा तऱ्हेचीं बालिश मते असल्यामुळे येथल्या कम्युनिस्टांनी काँग्रेसशीं कधींहि सहकार्य केले नाहीं. चिआंग कै शेकचे जपानी साम्राज्यशाहीशी लढा नाहींच करावयाचा असे व्रत होते. हा लढा करावा असे प्रतिपादन करणाऱ्या हजारों तरुणांची त्यानें कत्तल केली. अशा चिआंगला जबरदस्तीनें पकडून कम्युनिस्टांनी त्याला मारूनमुटकून जपानशीं लढा करण्यास तयार केलें व मग त्याच्याशी आपला शेतकरीक्रांतीचा कार्यक्रम स्थगित करूनहि सहकार्य केले. आणि भारतांत साम्राज्यविरोधी लढा हें एकमेव ध्येय कोंग्रेसनें डोळ्यापुढे ठेवलेले असतांना मार्क्सवादी पोपटपंचीचा आश्रय करून येथील कम्युनिस्टांनी तिच्याशीं एकदांहि सहकार्य केले नाहीं. उलट ब्रिटिश साम्राज्यशाहीशींच सहकार्य केले. एकाच मार्क्सवादाला दोन देशांत हीं किती भिन्न फळे आलीं !
 कम्युनिस्टांच्या अलीकडच्या या सर्व लीला पाहिल्या म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दलच नव्हे तर हेतूच्या शुद्धतेबद्दलहि जबर शंका येऊ लागतात. आणि रशियन साम्राज्यशाहीचे हे हिंदुस्थानांतील स्वजनद्रोही हस्तक आहेत हे समाजवादी पक्षानें व काँग्रेसनें त्यांच्यावर केलेले आरोप खरे आहेत असें वाटू लागते; आणि हे आरोप खरे असतील तर भारतीय लोकसत्तेचा त्यांनीं विनाश न केला तरच नवल. त्यांचे हेतु शुद्ध असले तरी त्यांचे घातपाती धोरण, त्यांची मार्क्सवरील अंधनिष्ठा, त्यांची भ्रामक विचारसरणी- म्हणजे एकंदरीत त्यांचे तत्त्वज्ञान हे लोकशाहीला पुरेसे मारक आहे. मग त्यांत कृष्ण हेतूंची भर पडली तर कोणता अनर्थ होईल हे सांगावयास नकोच, या पक्षाचे कधीं काळी दुर्दैवाने या भूमीवर वर्चस्व प्रस्थापित झालेच तर झेकोस्लोव्हाकिया, बल्गेरिया, पोलंड या देशांसारखे रशियाचे दास्य, स्वत्वहीनता व व्यक्तित्वशून्यता तिच्या कपाळी येऊन लोकशाहीच्या उदात्त तत्त्वांचा येथून समूळ नाश झाल्याखेरीज रहाणार नाही.

समाजवादी पक्ष

 मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानान्वयें भारतांत चळवळ व संघटना करणारा दुसरा पक्ष म्हणजे भारतीय समाजवादी पक्ष होय. गेल्या प्रकरणांत काँग्रेसच्या धोरणाविषयीं पंडित जवाहरलाल यांची जी भूमिका विशद करून सांगितली आहे, तीच जवळजवळ या पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसचें केवळ राष्ट्रवादी धोरण या पक्षाला अमान्य आहे. शेतकरी व कामकरी यांची संघटना करून जमीनदार- भांडवलदार वर्गाविरुद्ध लढा पुकारला पाहिजे आणि तो लढा ब्रिटिशांशीं स्वातंत्र्याचा लढा चालू असतांनाच सुरू केला पाहिजे; साम्राज्यशाहीशी चालविलेल्या लढ्याचा तो एक भागच आहे, असे या पक्षाचें मत होतें आणि काँग्रेसला ते मत मान्य नसल्यामुळे या पक्षाला आपली निराळी संघटना करावी लागली.
 १९३० सालापासून जयप्रकाश नारायण, नरेन्द्र देव, अच्युत पटवर्धन, ना. ग. गोरे, कमलादेवी चट्टोपाध्याय, पुरुषोत्तमदास त्रिकमदास, साने गुरुजी इ. काँग्रेसमधील तरुणांना काँग्रेसचें जमीनदार- भांडवलदारांच्या आहारी जाण्याचे धोरण नापसंत होऊं लागले. अशा या तरुणांनी काँग्रेसच्या छायेंतच संघटित व्हावयाचें ठरवून १९३४ साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. काँग्रेसशीं समाजवादी भूमिकेविषयीं व भांडवलदार- जमीनदार यांच्याबद्दलच्या धोरणाविषयी जरी यांचे मतभेद असले तरी आपला खरा लढा साम्राज्यशाहीशीं आहे व भारताचे राष्ट्रीय स्वातंत्र्य हे आपले पहिले प्राप्तव्य आहे, या तत्त्वाचा या पक्षाला कम्युनिस्टांप्रमाणे केव्हांहि विसर पडला नव्हता आणि या जाणीवेमुळेच त्यांनीं काँग्रेसमधून फुटून निघावयाचें नाहीं हें निश्चित ठरवून तो आपला निश्चय स्वातंत्र्याची प्राप्ति होईपर्यंत टिकवून धरला. हा विवेक व ही जी समंजसता समाजवादी पक्षाने दाखविली ती त्यास भूषणावह आहे. ब्रिटिश साम्र ज्यशाहीशीं झगडा करणारी काँग्रेस ही एकमेव संस्था आहे व तिच्यामागें भारताची अखिल पुण्याई उभी आहे, या गोष्टीचा या पक्षाला विसर पडला नव्हता. पक्षाच्या स्थापनेच्या वेळी सादर केलेल्या अहवालांतच जयप्रकाश नारायण यांनीं हें धोरण स्पष्ट करून सांगितले आहे. 'काँग्रेसपासून फुटून निघणे अगदीं मूर्खपणाचें असून तो आपल्या शक्तीचा केवळ अपव्यय आहे. ब्रिटिशांशी लढणारी ती एकच संस्था आहे. तिच्यांत कांहीं उणीवा असल्या तर त्या भरून काढून तिला जास्त समर्थ करणे हेच पक्षाचें खरें कार्य आहे. ज्यांना हें मत मान्य नसेल त्यांना समाजवादी पक्षांत स्थान नाहीं.' असें अगदीं निःसंदिग्ध शब्दांत जयप्रकाश यांनी बजावलेले आहे. या पक्षाला भारतांत आज थोडें मानाचे स्थान आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यांत त्याला काहींसें यश येत आहे आणि कांहीं विचारवेत्यांच्या मतें भारताचें भावी काळांतील हा पक्ष म्हणजे आशास्थान आहे. इतकी पुण्याईं निर्माण होण्याचे प्रधान कारण म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीशी झगडा करण्याची जबाबदारी या पक्षाने कधींहि टाळली नाहीं आणि त्या उद्दिष्टासाठीं मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसशी सहकार्य करण्या धोरण ठेवलें, हे होय. हा पक्ष १९३४ सालीं स्थापित झाला असला तरी त्याची खरी प्राणप्रतिष्ठा १९४२ च्या लढ्याच्या वेळीं झाली. त्या राष्ट्रीय संग्रामांत समाजवादी पक्षानें जें थोर कार्य केले यामुळे त्याचे या देशांतील स्थान अढळ होऊन गेले. त्याला एक प्रकारचा अधिकार प्राप्त झाला व समाज त्याच्याकडे आशेने पाहूं लागला.
 लोकशाहीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे कार्य या पक्षानें केलें आहे. महात्माजींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसवर व एकंदर भारतीय समाजावर अध्यात्माचें वर्चस्व बसू पहात होतें. अतींद्रिय शक्तीच्या आवाहनानें सामर्थ्य प्राप्त होतें, परमेश्वरी प्रसादानें कार्ये सफल होतात, बुद्धीपेक्षां शुद्ध भावाला महत्त्व जास्त आहे, ही घातक विचारसरणी दृढमूल होऊं पहात होती. याचें सविस्तर विवेचन गांधीवादाचें परीक्षण केले तेव्हां केलेच आहे. लोकशाहील मारक व अत्यंत प्रतिगामी अशा या विचारसरणीपासून समाजवादी अगदी अलिप्त आहेत. भाबडया अध्यात्मवादाला पायबंद घालून समाजाला बुद्धिवाद व विवेकनिष्ठा यांचे महत्त्व पटवून देण्याचें बरेंचसे कार्य पंडित जवाहरलाल यांनी केले आहे. पंडितजी काँग्रेसमध्यें नसते तर तिचा अंधश्रद्धावाद कोणत्या थराला गेला असता ते सांगवत नाहीं. 'काँग्रेसला एखाद्या भजनी मंडळाचे रूप येऊं पहात आहे !' असे आत्मचरित्रांत पंडितजींनी म्हटले आहे. आणि त्या वृत्तीची चीड आल्यामुळेच त्यांनी कसली हि भीडभाड न ठेवतां महात्माजी व काँग्रेस यांवर कडक टीका केली आहे. 'असहकारितेच्या चळवळीला धार्मिक पुनरुज्जीवनाचे स्वरूप येऊ लागले आहे. काँग्रेसमधील नाफरेवाले हे शब्दप्रामाण्यवादी आहेत. (आत्मचरित्र पृ.- १०७) राजकारणांत गांधीजींची वृत्ति शास्त्रीय नव्हती. त्यांचा सर्व भार शीलावर, साधनशुद्धीवर आहे. बौद्धिक विकास व बौद्धिक शिक्षण ते क्षुद्र गणतात. (पृ. ५१२). लोकांनी स्वतः विचार करावा असा गांधीजींचा आग्रह नव्हता. आत्मशुद्धि व त्याग यांवर सगळा भर. (पृ.३७५) श्रद्धेनें कांहींकाळ फायदा होईल, पण लोकांना शहाणे करावयाचे असेल तर हा मार्ग योग्य आहे काय ? ही सर्व जुनी विचारसरणी आहे. जुन्या आशा, आकांक्षा, एकंदरीत जीर्ण जगाचेच वातावरण माझ्या सहकाऱ्याभोवती पसरले आहे असे मला वाटते. मला हवें असलेले नवें जग अद्याप फार दूर होतें. (पृ. ३७५)' अशा तऱ्हेचे उद्गार पंडितजींच्या आत्मचरित्रांत ठायी ठायीं आढळतात. पंडितजींचे व्यक्तिमत्व अलौकिक असल्यामुळे व पुढे कांही काळाने सर्व तरुणांची मनें त्यांनी आपल्याकडे खेचून घेतल्यामुळे भोळ्या, श्रद्धाळू अध्यात्मवादापासून भारतीय तरुण मुक्त झाले. पंडितजींचे हेच कार्य समाजवादी पक्षाने पुढे चालू ठेवून विवेकनिष्ठा व बुद्धिवाद यांची छाप तरुण मनावर बसविण्यांत बरेचसे यश मिळविले आहे.
 पक्षाच्या बुद्धिवादी विवेकनिष्ठेची प्रतीति त्यानें गुरुस्थानी मानलेल्या मार्क्सवादाकडे पहाण्याच्या त्याच्या वृत्तीवरून सहज येऊं शकते. सध्यांच्या काळांत मार्क्सवाद ही एक अंधनिष्ठाच झाली आहे. तिच्या आहारी गेलेला माणूस हेकट, दुराग्रही, एकांतिक आणि पिसाट असाच बहुधा होतो आणि लोकसत्तेचा तो कट्टा शत्रु बनतो. मार्क्सवादाचे स्वतःला अनुयायी म्हणवीत असूनहि समाजवादी लोक या वळणावर गेले नाहीत हे फार मोठे सुदैव आहे. मार्क्सवादांत क्रांतीची प्रचंड प्रेरणा आहे आणि तिचे सामर्थ्यहि अगदीं अतुल असें आहे. पण मार्क्सचीं कांहीं तत्त्वें अशीं आहेत कीं तीं माणसाला प्रज्ञाहत बनवितात. समाजवादी पक्षाने सावध राहून मार्क्सवादांतील क्रांतीची प्रेरणा तेवढी घेऊन दुसरी आपत्ति टाळण्यांत बरेंच यश मिळविले आहे असें वाटते. कामगारवर्गाचे नेतृत्व, विरोधविकासवाद, राष्ट्रनिष्ठा, शासनसंस्थेचे भवितव्य इ. मार्क्सप्रणीत सिद्धान्तांचे या पक्षांतील अशोक मेहता, आचार्य जावडेकर, कर्णिक, लोहिया, लिमये यांनी चालविलेले परीक्षण पाहिले म्हणजे यांनी मार्क्सची गुलामगिरी पत्करलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येते. जयप्रकाश नारायण यांचे गेल्या पंधरा वर्षांतले लेखन वाचून हाच प्रत्यय येतो. मार्क्सवादांतील अगदी मूलभूत सिद्धान्तहि त्यांनी अंधपणें स्वीकारलेले दिसत नाहीत. रशियन क्रांति, गांधीवाद, राष्ट्रनिष्ठा याकडे चिकित्सक दृष्टीनें पहाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे लोकशाहीला अनुकूल अशी विवेकदृष्टि समाजांत निर्माण करण्यांत त्यांना यश येईल असा भरवसा वाटू लागतो.
 याच चिकित्सक दृष्टीमुळे मार्क्सवादांतील अत्याचारी क्रांतिवाद या पक्षाने स्वीकारलेला नाहीं. सशस्त्र क्रांतीला तत्त्वतःच या पक्षाचा विरोध आहे असे नाहीं; पण हिंदुस्थानांतील सध्यांच्या परिस्थितीत शांततामय सत्याग्रहाचाच अवलंब करणे श्रेयस्कर होय, असे या पक्षानें निश्चित ठरविले आहे. (जयप्रकाश नारायण. डेमोक्रॅटिक सोशलिझम- पृ. ९) रक्तपाती क्रांतिवाद हा मार्क्सवादाचा आत्माच आहे. असें असूनहि या पक्षानें सत्याग्रहावर निष्ठा ठेवावी हें या देशाचें सुदैव आहे. वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सत्याग्रह ही महात्माजींची लोकशाहीच्या तत्त्वाला एक अलौकिक अशी देणगी आहे. सशस्त्र क्रांतीनें सरकार बदलणे हे लोकशाहीला संमत नाहीं. तो लोकशाहीचा अंतच होय. पण केवळ निवडणुकीच्या मार्गानें दर वेळीं प्रत्येक देशांत जुलमी, मदांध व धनादि साधनांमुळे समर्थ असलेले सरकार पदच्युत करता येईल असे नाही. अशा स्थितीत सत्याग्रह हा एकमेव मार्ग आहे. त्याचा अवलंब करावयाचा, या धोरणाला या पक्षाने स्वतःला बांधून घेतले आहे. लोकायत्त देशांतील दोन पक्षांतील झगड्यांत या साधनाचा कसा उपयोग करतां येतो, हें जर या पक्षाने पुढील काळांत दाखवून दिले, तर लोकशाही त्याची फार ऋणी होईल.
 आणखी एक महत्त्वाचा उपक्रम या पक्षानें अलीकडे सुरू केला आहे. भारताची पुनर्घटना करून त्यांतील खेड्यांत सामूहिक जीवन निर्माण करावें व लोकसत्ता हा जो सामुदायिक जीवनाचा परमोच्च विकास त्याचा पाया घालावा असा हा उपक्रम आहे. 'देश के लिये एक घंटा' अशी ते तरुणांना साद घालीत आहेत. आणि अशा सुविद्य तरुणांची सेवकसेना खेड्यांत नेऊन तेथें पाटबंधारे घालणे, रस्ते करणे, नाले खणणे, सामुदायिक शेती करणें, सहकारी संस्था उभारणे इ. कार्ये खेडुतांच्या सहकार्याने करावयाची असा हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रांत सानेगुरुजीसेवापथकानें गेल्या काही वर्षांत या तऱ्हेनें कांहीं कार्य केले आहे. आणि बिहार, उत्तर प्रदेश येथे स्वतः पक्षाच्याच नेतृत्वाने प्रचंड प्रमाणावर ही चळवळ चालू झाली आहे. (साधना- सेवापथक विशेषांक ११ जून १९५१. भारतज्योति १० जून १९५१ 'दी पीपल ऑन दि मार्च ' - मधु लिमये) ही चळवळ आज बाल्यावस्थेत असली तरी तिला फार मोठा अर्थ आहे व म्हणूनच फार मोठे भवितव्य आहे. चिनी कम्युनिस्टांनी ज्या तऱ्हेनें ही चळवळ चालविली त्या तऱ्हेनें पण शांततेच्या मार्गाने येथे ती चालविण्यांत आली, तर शेतकऱ्यांत सामाजिक प्रबुद्धता निर्माण होईल, सामुदायिक जीवनाचा पाया घातला जाईल, उत्पादनाचा निकडीचा प्रश्न बराचसा सुटेल आणि जनता समर्थ होऊन राजकारणांतील इतर सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गाला लागतील. सुविद्य तरुण यांत किती संख्येने सामील होतात त्यावर त्या भूमीचे भवितव्य

अवलंबून राहील. याच ग्राम- पुनर्घटनेच्या कार्यक्रमाचा अवलंब करून चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने अगदी अक्षरशः धुळींतून नवे विश्व निर्माण केले आहे. येथील समाजवादी पक्षांची पावले त्याच दिशेनें पडत आहेत. ही वाटचाल किती वेगानें होते हें त्याग, चिकाटी, निष्ठा, नेत्यांचें संघटनाकौशल्य व सुशिक्षित मध्यमवर्गीयांची राष्ट्रनिष्ठा यांवर अवलंबून आहे.
 समाजवादी पक्षाच्या कार्याविषयी काही विवेचन वर केले, पण या पक्षाचें मूल्यमापन करतांना एक गोष्ट सांगावीशी वाटते ती ही की, त्याचें महत्त्व त्याने आतांपर्यंत केलेल्या कार्यामुळे वाटत नसून त्या कार्यामुळे त्याच्या भविष्यकालीन कर्तृत्वाविषयीं जी आशा निर्माण होते तिच्यामुळे वाटते. कारण प्रत्यक्ष कार्य या दृष्टीने पाहिले तर सिद्ध असे फारच थोडे झालेले आहे. गेल्या सोळा वर्षांत तत्त्वांची निश्चिति, मार्गाची आंखणी, साधनांची जमवाजमव, मनुष्यबळाचा संग्रह, पुण्याईची निर्मिति हा पायाभरणीचाच कार्यक्रम चालू आहे. अजून पक्षाच्या जमेला इतिहासांत नमूद करून ठेवण्याजोगे कांहीं नाहीं. ४२ चा लढा हा त्याच्या नांवें जमा आहे; पण त्या लढ्याच्या यशामागची सर्व पुण्याई काँग्रेसची होती. यामुळे तें स्वतंत्र कर्तृत्व होऊं शकत नाहीं. पण आपल्या पराक्रमासंबंधीं या पक्षाच्या नेत्यांच्या मनांतहि भ्रामक कल्पना नाहींत असे दिसते. जयप्रकाश नारायण यांनी १९४८ सालीं नाशिकला भरलेल्या अधिवेशनाच्या वेळीं जो अहवाल सादर केला त्यांत पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला आहे. अन्यत्रहि अशा तऱ्हेचें सिंहावलोकन पक्षाच्या इतर नेत्यांनी केले आहे. त्या सर्वावरून हेच ध्यानांत येईल की आपण एक मोठी शक्ति निर्माण करीत आहोत, एवढीच नम्र व शालीन कल्पना या पक्षाने स्वतःच्या कर्तृत्वाविषय ठेवली आहे. पण ती कल्पना मात्र अत्यंत अर्थगर्भ अशी आहे. पांचदहा वर्षांत देशाच्या जीवनाला वळण लावण्याचे सामर्थ्य हा पक्ष स्वतःच्या ठाय निर्माण करील अशी चिन्हें मध्यंतरी दिसत होती. कामगारसंघटना, कृषकसंघटना व विद्यार्थी संघटना या तीनहि क्षेत्रांत पक्षाचें कार्य अखंडपणे अजूनहि प्रगत होत आहे. अनेक स्थानिक क्षेत्रांतील संग्रामांत पक्षाच्या नेतृत्वानें चाललेल्या संग्रामांना भावी काळाच्या दृष्टीनें अर्थ आहे असे वाटते. भारताच्या प्रत्येक प्रांतांतील कानाकोपऱ्यांत आपली हांक पोंचवून पक्षाला अखिल भारतीय स्वरूप देण्यांत इतर कोणच्याहि नव्या पक्षाला जे यश आलें नाहीं, तें समाजवादी पक्षाला कदाचित् येईलहि. या सर्व लक्षणांवरून स्वार्थ, अनीति, अधमपणा यांनीं भ्रष्ट झालेले; क्षुद्र अहंकार, मत्सर व कलहवृत्ति यांनीं छिन्नभिन्न झालेले; आणि दारिद्र्य, उपासमार व शोषण यांनी हीनदीन झालेले भारतीय जीवन हा पक्ष पुन्हां संघटित व समृद्ध करूं शकेल अशी एखादे वेळी आशा वाटते.
 मार्क्सवाद जन्माला येऊन आज शंभरएक वर्षे झाली. तेवढ्या अवधीत मार्क्सच्या प्रेरणा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचल्या आहेत आणि त्याच बलशाली प्रेरणांच्या पुण्याईनें रशिया व चीन या दोन राष्ट्रांनी आपला कायाकल्प करून घेतला आहे. गेल्या अनेक शतकांत जे सामर्थ्य व बल या राष्ट्रांना प्राप्त झाले नव्हते, ते एका पाव शतकाच्या आंतच निर्माण करण्यांत तेथील कम्युनिस्ट पक्षांना यश आले आहे. मार्क्सचा असा प्रभाव भरतभूमींत पडला नाहीं; पण त्याचे कारण मात्र फार निराळे आहे. मार्क्सवाद येथे येण्यापूर्वीच टिळंक व महात्माजी यांच्या कर्तृत्वाने या भूमींत क्रांतीचें तत्त्वज्ञान प्रसृत होऊन गेले होते. येथें रशिया व चीन येथल्याप्रमाणें जुनाट, अंध, क्रूर व मदांध अशी सरंजामदारी सत्ताच अधिष्ठित असती, तर येथेंहि मार्क्सवाद आगीसारखा पसरला असता. पण मार्क्स जन्माला येण्याच्या आधीपासूनच भरतभूमीत राममोहनांसारख्या पुण्यपुरुषांनी सामाजिक पुनर्घटनेचें कार्य चालू केले होते व पुढे टिळक व महात्माजी यांनी ते परिणतीस पोचविलें होतें. मात्र असे करतांना त्यांनी लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, समता या मार्गांचा अवलंब केला. त्यामुळे या देशाचें नवें रूप वरील देशांपेक्षां अगदी निराळे झाले. येथील जनतेची मनोभूमि मार्क्सवादाला मुळींच अनुकूल राहिली नाहीं आणि म्हणून ती प्रेरणा येथें प्रभावी होऊं शकली नाहीं.
 हे जे झाले ते भारताच्या हिताचे झालें कीं अहिताचें ? हा प्रश्न फार गहन आहे. कम्युनिस्टाशीं वाद चालू असतांना अनेक वेळां 'टिळकांनी मार्क्स वाचला होता काय?' असा प्रश्न विचारलेला मी ऐकला आहे. टिळकांनी बहुधा मार्क्सवादाचा अभ्यास केला नसावा असे मला वाटतें; पण टिळक मार्क्सवादी नव्हते हें या भूमचें भाग्य होय असे मी मानतो. कारण त्यामुळेच त्यांनी येथें विशुद्ध लोकशाहीची परंपरा निर्माण केली आणि एक अभूतपूर्व अशी क्रांति या देशांत घडवून आणली. महात्माजींनी तेंच व्रत पुढे चालविलें आणि या देशांत मार्क्सवादाचें आगमन दुष्कर करून टाकले. पण आज या लोकशाहीच्या भवितव्याविषयीं मनाला दारुण शंका येऊन मोठा संभ्रम निर्माण होतो. लोकशाही ही संयम, विवेक, त्याग, नीति या कठोर व्रतांची अपेक्षा बहुसंख्य लोकांकडून करीत असते आणि आज अत्यंत अल्पसंख्य लोक तरी या कसोटीस उतरतील की नाहीं याची शंका आहे; आणि हे जर सत्य असेल तर लोकसत्ता लांबच राहिली, आमचे राष्ट्रीय स्वातंत्र्य तरी टिकेल की नाहीं, अशी भीति मनांत उद्भवते. या भयानें मन व्याकुळ असतां त्या दुबळ्या अवस्थेत असा विचार येतो कीं, आम्हींहि मार्क्सवादाचा आश्रय केला असता तर बरें झालें असतें. लोकशाही नाहीं; पण निदान रशिया व चीन यांच्याप्रमाणे, कठोर दण्डसत्तांकित कां हेईना पण एक समर्थ व समृद्ध असें राष्ट्र तरी भरतभूमत निर्माण झाले असते. आज आमची लोकसत्ता अयशस्वी झाली आणि तो संभव फार आहे- तर येथे लोकशाही नाहीं व स्वातंत्र्यहि नाहीं अशी स्थिति होऊन बसेल आणि टिळक व महात्माजी या महाविभूतींची शिकवण पचविण्याची ताकद पुढील पिढ्यांना नव्हती म्हणून भरतभूमीचा नाश झाला, असा इतिहास निर्वाळा देईल. भावी इतिहासकारांचीं हीं वाक्यें मनःचक्षूंपुढे येऊन क्षणभर मनांत येतें कीं, मार्क्सवादाचा आश्रय करून निदान रशिया- चीनप्रमाणे एक बलिष्ठ समाज तरी आम्ही निर्मिला असता. अर्थात् हें सर्व निराशेच्या दुबळ्या मनःस्थितीत असतांना जागृत व सावध अवस्थेत असतांना, रशियाची उग्र, मदांध दण्डसत्ता, तेथील अंध शब्दप्रामाण्य, तेथील मानवतेचें अत्यंत हीन झालेले मूल्य, तेथील व्यक्तिस्वातंत्र्याचा नाश, तेथील कम्युनिस्ट साम्राज्यशाही, यांचा विचार मनांत येऊन टिळक-महात्माजींना विसरणे ही केवळ आत्मह्त्या आहे याविषयीं खात्री पटते, पण आम्ही त्यांचा वारसा सांगण्यास नालायक ठरलो तर इतिहास मात्र वरील प्रकारचा निर्वाळा दिल्याखेरीज रहाणार नाहीं. तेव्हां यापुढे भारताच्या भवितव्याला दोन भिन्न प्रकारांनीं वळण लागणे शक्य आहे. विवेक, संयम, त्याग, नीति हीं कठोर व्रते आम्ही आचरली तर लोकशाही यशस्वी करून टिळक-महात्माजी यांची परंपरा पुढे चालविल्याचे श्रेय आम्हांला मिळेल; पण या गुणांचा विकास येथील जनतेनें केला नाहीं तर ? 'टिळक महात्माजी येथे झाले; पण त्यांना भरतभूमीत वारस लाभले नाहीत, केवळ वंशज लाभले. उग्र, क्रूर, शब्दप्रामाण्याधिष्ठित, व्यक्तिस्वातंत्र्यहीन अशा मार्क्सप्रणीत दण्डसत्तेचीच यांची लायकी होती; पण भलत्याच विभूतींशीं नातें जोडण्याच्या मोहानें यांनी लोकसत्ताहि घालविली व दण्डसत्ताहि घालविली आणि स्वतःवर अराजक व पारतंत्र्य मात्र ओढवून घेतले.'-- असा अभिप्राय इतिहासकार आमच्याबद्दल लिहून ठेवतील !
 स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पांचसहा वर्षात लोकशाहीला अवश्य अशा त्या बहुमोल सद्गुणांची जोपासना आपण कितपत केली ते आतां पहावयाचे आहे.