भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म/महाभारतातील समाजकारण

विकिस्रोत कडून



२. महाभारतातील समाजकारण

समाजकारण
 भारतीय तत्त्ववेत्त्यांचे धर्मकारण किती उज्ज्वल होते, राष्ट्रघटनेस व राष्ट्राच्या उत्कर्षास ते कसे पोषक होते आणि आज समाजात जे प्रबल विचारप्रवाह वाहात आहेत तेच त्या वेळी कसे वाहात होते ते मागे दाखविले. आता महाभारतातील समाजकारणाच्या सिद्धांताचा विचार करावयाचा आहे. तो विचार आपण केला म्हणजे असे दिसून येईल की, भारतीयांनी समाजरचनेसंबंधी सांगितलेले सिद्धांतही राष्ट्रहिताच्या दृष्टीने पुष्कळ प्रगतिकर व पथ्यकर असेच होते. धर्मकारणातील त्यांचे सिद्धांत आज अगदी तंतोतंत आपण अनुसरण्यास हरकत नाही असे सांगितले. या समाजकारणातील विचार तितक्याच पूर्णतेने अनुसरावे असे म्हणता येईल असे वाटत नाही. पण असे मात्र निश्चित म्हणता येते की, ती रचना जशीच्या तशी राहिली तर आज आलेली दुर्गती मुळीच प्राप्त झाली नसती. किंबहुना त्यातील विचारांचा प्रभाव कमी झाला नसता व त्याच धोरणाने समाज प्रगत झाला असता तर आज आपण इष्ट अशा स्थितीला कदाचित येऊन पोचलोही असतो.
 महाभारतात समाजरचनाविषयक जे मुख्य तत्त्व आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध चातुर्वर्ण्यांचे तत्त्व होय. ते तत्त्व जसेच्या तसे ग्राह्य व अनुकरणीय आहे असा आग्रह धरणे युक्त नाही. पण खरे म्हटले तर आज जी जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याची कल्पना प्रचलित आहे ती महाभारतात इतक्या तीव्रतेने प्रतिपादिलेली नाही. वर्ण हा जन्मसिद्ध आहे असा एक अतिशय आग्रही व प्रभावी विचार महाभारतात आढळतो हे खरे आहे. तो गृहीत धरूनच भारतात वर्णधर्म बहुतेक ठिकाणी सांगितलेले आहेत हेही खरे आहे. पण एकतर वर्ण हा जन्मसिद्ध नसून गुणकर्मसिद्ध आहे असा दुसराही एक विचार महाभारतात पाचसात ठिकाणी प्रतिपादिलेला आढळतो; आणि दुसरी व विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की समाजव्यवस्था करताना जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य जरी महाभारतात आग्रहाने सांगितलेले असले तरी ती व्यवस्था जितकी निर्विष करता येईल तितकी करण्याचा त्यात प्रयत्न केलेला आढळून येतो. आणि आनुवंशिक गुणांवर पूर्ण श्रद्धा ज्या काळात होती त्या काळी हे विष इतके नष्ट करून समाज समतेच्या तत्त्वावर शक्य तितका सुप्रतिष्ठित करण्याचे धोरण त्या तत्त्ववेत्त्यांनी अंगीकारले यांतच त्यांच्या विचारांची थोरवी व समाजहिताविषयीची दक्षता दिसून येते.
 प्रथमतः चातुर्वर्ण्यव्यवस्था काय होती ती थोडक्यात सांगतो आणि नंतर तशा स्थितीतही उच्चनीचतेचे विष तिच्यातून काढून टाकून ती व्यवस्था समाजाच्या उत्कर्षाला शक्य तितकी जास्त पोषक करण्याचा किती प्रयत्न केला होता त्याचे निरूपण करतो.
 महाभारतात वर सांगितल्याप्रमाणे गुणकर्मसिद्ध चातुर्वर्ण्याचा विचार जरी काही ठिकाणी सापडत असला तरी समाजव्यवस्था ठरविताना जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याचाच विचार गृहीत धरलेला आहे असे दिसते. ते कसे ते प्रथम पाहू.
 कौरवपांडवांच्या युद्धांत गांधारीचे सर्व पुत्र मारले गेले. शेवटी दुर्योधन मारला गेला हे कळताच ती अतिशय शोक करू लागली. त्या वेळी तिचे सांत्वन करताना श्रीकृष्ण म्हणाले, "तू क्षत्रिया आहेस व क्षत्रियांना रणांगणात मृत्यू हाच भाग्यदायक होय. तसा मृत्यू तुझ्या पुत्रांना प्राप्त झालेला आहे. तेव्हा तू शोक करू नकोस." या वेळी श्रीकृष्णांनी पुढील उद्गार काढले.

तपोर्थीयं ब्राह्मणी धत्त गर्भं, गौर्वोढारं, धावितारं तुरंगी ।
शूद्रा दासं पशुपालं च वैश्या, वधार्थीयं क्षत्रिया राजपुत्री ॥

-( स्त्री. २६, ५)

 ब्राह्मणस्त्री गर्भ धारण करते तो त्याने जन्माला येऊन तप करावे म्हणून. गाईने ओझी वाहणारा व घोडीने धावणारा असा गर्भ धारण केलेला असतो. त्याचप्रमाणे वैश्यस्त्री ही गोरक्षण करणारा व शूद्रस्त्री दासकर्म करणारा गर्भ धारण करते आणि क्षत्रिय राजकन्या युद्धात शत्रूला मारणारा किंवा मरणारा गर्भ धारण करिते.
 श्रीकृष्णांनी येथे दिलेले मत अगदी स्पष्ट आहे. गुण हे आनुवंशावर अवलंबून असतात असा त्यांचा सिद्धांत आहे. गाय किंवा घोडी हिला विशिष्टगुणान्वितच पुत्र होतो. त्याप्रमाणे ब्राह्मणी, क्षत्रिया, वैश्या व शूद्रा यांनाही विशिष्टगुणान्वितच पुत्र होतात. त्या त्या पुत्रांचे हे गुण व त्यांचे पुढील कर्म हे गर्भामध्येच ठरलेले असते. म्हणजे ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व हे गर्भापासून, म्हणजे जन्मावरूनच ठरलेले असते आणि त्या त्या पुत्रांनी काय कर्म करावयाचे हेही जन्मावरून ठरलेले आहे.
 वर्णसंकराविषयी बोलताना एकदा भीष्मांनी युधिष्ठिराला पुढील प्रमाणे आपले मत सांगितले- ब्राह्मणाने चारही वर्णांच्या स्त्रिया कराव्या व क्षत्रियाने तीन वर्णांच्या स्त्रिया कराव्या. पण ब्राह्मणाला ब्राह्मण व क्षत्रिय स्त्रीच्या ठायी जी संतती होईल तीच फक्त ब्राह्मणवर्णाची होय. त्याचप्रमाणे क्षत्रियाला क्षत्रिय व वैश्य स्त्रीपासून जी संतती होईल तीच फक्त क्षत्रियवर्णाची होई. इतर संतती सर्व मातेच्या वर्णाची होईल. (अनुशासन अ. ४८)
 ब्राह्मण किंवा क्षत्रिय वर्ण आणि अन्य वर्णही जन्मामुळे ठरतात व त्यांचे गुण अनुवंशावर अवलंबून असतात, असे हे मत आहे. ज्याच्या ठायी ज्ञान, तप असेल तो ब्राह्मण, ज्याच्या ठायी क्षात्रतेज असेल तो क्षत्रिय असा विचार येथे सांगितलेला नाही. (असा विचारही महाभारतात आहे. त्याविषयीची वचने पुढे द्यावयाची आहेत.) ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व हे जन्मावरच आहे असे येथे सांगितले आहे.
 कौरवपांडवांच्या युद्धानंतर युधिष्ठिर राज्य सोडून संन्यास घेण्याची इच्छा करू लागला. त्या वेळी त्याला अनेकांनी उपदेश केला. त्यात जन्मतःच तुला संन्यास विहित नाही, तुझा क्षात्रधर्म हा जन्मतःच ठरलेला आहे असे अनेक वेळा सांगितलेले आहे. अर्जुन म्हणाला, "प्राण्यांचे कर्म दैवानेच निर्माण करून ठेवलेले आहे. हे राजेन्द्रा ईश्वराने तुला ज्या प्रकारचा जन्म दिला आहे त्याप्रमाणेच तू वागले पाहिजेस.
 भीष्म युधिष्ठिराला राज्य करण्याचा उपदेश करताना हेच म्हणाले-

दानमध्ययनं यज्ञं प्रजानां परिपालनम्
धर्म्यमेतदधर्म्य वा जन्मनैवाभ्यजायथाः ।

-शां. ७५,२६

दान, अध्ययन, यज्ञ व प्रजांचे पालन ही धर्म्य असोत वा अधर्म्य असोत; ही कामे जन्मतःच तुझ्यामागे लागलेली आहेत.
 पण जन्मावरच वर्ण अवलंबून आहे, या मताला यापेक्षाही बलवत्तर पुरावा भारतीयांनी सांगितलेल्या वर्णकर्म व्यवस्थेच्या विवेचनात सापडतो. वर्ण जन्मावरून ठरवावा या विचाराला विरोधी वचने काही ठिकाणी महाभारतात सापडतात हे खरे, पण प्रत्यक्ष समाजव्यवस्था करताना मात्र ती विरोधी वचने कोठेही लक्षात घेतलेली नाहीत असे स्पष्ट दिसून येते. त्या वेळी 'वर्ण हा जन्मावरचा ठरतो,' हा सिद्धांत गृहीत धरूनच सर्व नियम सांगितलेले आहेत. चार वर्णांची कर्मे कोणती, त्यांनी कोणते व्यवसाय करावे हे सांगताना ब्राह्मणाने अमके कर्म करावे, क्षत्रियाने अमके करावे असे सांगितलेले असते. अमके करील तो ब्राह्मण असे मत जरी कोठे सांगितलेले असले तरी समाजव्यवस्थेत त्या मताला स्थान नाही. जो सत्य अहिंसा या धर्माचे आचरण करील तो माणूस शूद्र असला तरी ब्राह्मण होय असे मत सांगितलेले आहे. पण त्यामुळे शूद्राने अध्यापन करावे, याजन करावे असे मात्र कोठेही सांगितलेले नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे वर्ण जन्मसिद्ध धरूनच कर्मव्यवस्था सांगितलेली आहे.
 युद्धापूर्वी संजय पांडवांना 'तुम्ही युद्ध करू नका' असा उपदेश करू लागला. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले, 'चारही वर्णांचे विहित व्यवसाय काय आहेत ते लक्षात घेऊन मग तू उपदेश कर. चतुर्वर्णाचे विहितधर्म असे आहेत. ब्राह्मणाने .वेदाध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह ही कर्मे करावी. क्षत्रियाने प्रजापालन करावे. यज्ञयाग, वेदाध्ययन ही कर्मे करावी. त्याने यज्ञ चालवू नयेत व अध्यापन करू नये. संसार करून गृहस्थाश्रमातच असावे. वैश्याने वेदाध्ययन करून शेतकी, गोरक्षण, व्यापार ही कर्मे करावी. शूद्राने ब्राह्मणांची सेवा करावी. वेद पढू नयेत. यज्ञाचीही त्याला मोकळीक नाही.'
 श्रीकृष्णांनी येथे वर्णधर्म सांगितले आहेत. त्यांत ब्राह्मण, क्षत्रिय, हे वर्ण जन्मसिद्ध धरूनच त्यांची कर्मे सांगितली आहेत. अध्ययन, अध्यापन करील तो ब्राह्मण, क्षात्रतेज दाखवील तो क्षत्रिय असे तर सांगितलेले नाहीच पण उलट क्षत्रियाने अध्यापन करू नये. शूद्राने वेदाध्ययन करू नये असे सांगितलेले आहे.

न याजयेत् न तु चाध्यापयीत । एवं स्मृतः क्षात्रधर्मः पुराणः ॥
नाधीयीत प्रतिषिद्धोऽस्य यज्ञः । एवं स्मृतः शूद्रधर्मः पुराणः ॥

- उद्योग. अ. २९, २४-२७

 गुणकर्मावरून जर ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व ठरावयाचे असते तर क्षत्रियाने अध्यापन करू नये, याजन करू नये असे सांगण्याचे कारण नव्हते. किंवा शूद्राने वेदाध्ययन किंवा यज्ञ करू नये, असेंही सांगण्याचे कारण नव्हते. गुणकर्मावर जेथे वर्ण ठरावयाचा तेथे कोणाही व्यक्तीला कोणताही व्यवसाय, कोणतेही कर्म करण्यास मोकळीक असली पाहिजे. आणि ज्या क्षेत्रात मनुष्य तेज दाखवील त्या वर्णाचा त्याला म्हणावे असा दण्डक असला पाहिजे. पण महाभारतात तसे सांगितलेले नाही हे श्रीकृष्णाच्या वरील उद्गारांवरून दिसून येते. असे विधिनिषेध महाभारतात अनेक ठिकाणी सांगितले आहेत. वर्णाश्रमवर्माचे विवेचन करताना पितामह भीष्मांनीही हेच सांगितले आहे. 'क्षत्रियाने यज्ञ करावा पण यज्ञाचे प्रयोग चालवूं नयेत, स्वतः अध्ययन करावे पण अध्यापन करू नये. संग्राम हाच क्षत्रियाचा मुख्य धर्म होय.' -(शांति अ. ६०)
 एके ठिकाणी शास्त्राविरुद्ध कर्मे करणाऱ्या लोकांची राजाने कधीही उपेक्षा करू नये असे सांगून पितामह भीष्मांनी शास्त्रयुक्त कर्मे कोणती व विरुद्ध कोणती हे सांगण्यासाठी केकय देशाच्या राजाची गोष्ट सांगितली आहे. त्या राजाला एकदा अरण्यात एका राक्षसाने धरिले. त्या वेळी, 'तुला मला धरण्याचा अधिकार नाही, कारण माझ्या राज्यात प्रजा स्वकर्मनिष्ठ आहे,' असे राजाने सांगितले. तो म्हणाला, 'अध्ययनशून्य, व्रतशून्य ब्राह्मण नाहीत. म्हणजे ते स्वकर्मनिष्ठ आहेत. त्याचप्रमाणे क्षत्रिय हे अध्ययन करितात पण अध्यापन करीत नाहीत. यज्ञ करितात पण दुसऱ्याचे यज्ञ चालवीत नाहीत. सारांश, माझ्या राष्ट्रामध्ये क्षत्रिय हे स्वकर्मनिष्ठ आहेत.' -(शां. ७७)
 या सर्व वचनांवरून महाभारतकारांनी चातुर्वर्ण्य हे जन्मसिद्ध धरूनच समाजव्यवस्था सांगितली आहे हे स्पष्ट होते. पण या मताच्या विरुद्ध असेही जिवंत विचारप्रवाह भारतात दिसून येतात म्हणून वर सांगितले आहे, त्याचे आता दिग्दर्शन करतो.
 व्यक्तीचे गुण हे रक्तावर, आनुवंशावर, आईबापांच्या गुणांवर अवलंबून असतात या म्हणण्यात फारसा अर्थ नाही हे भारतकाळच्या विचारी पुरुषांच्या पुन्हा पुन्हा ध्यानी येत होते असे त्यांच्या उद्गारांवरून दिसून येते. पांडवांचा अज्ञातवास संपला. नंतर राज्य परत मिळविण्यासाठी काय उद्योग करावा याविषयी तत्पक्षीयांची सभा भरून विचारविनिमय सुरू झाला. त्या वेळी दुर्योधनापुढे पांडवांनी नमून बोलले पाहिजे असे बलराम सांगू लागले. ते सात्यकीला सहन न होऊन तो म्हणाला,

एकस्मिन्नेव जायेते कुले क्लीबमहाबलौ
फलाफलवती शाखे यथैकस्मिन्, वनस्पतौ ।

-उद्योग. ३.३

 एकाच वृक्षावर ज्याप्रमाणें फळांनी भरलेली व फलरहित अशा दोनहि प्रकारच्या शाखा असतात त्याचप्रमाणे एकाच कुळात अतिबलाढ्य व अत्यंत दुबळे असे पुरुष जन्मास येतात. श्रीकृष्ण अत्यंत बलाढ्य व बलराम दुबळे असा सात्यकीचा अभिप्राय आहे.
 एकाच आईबापांच्या पोटी असे अगदी दोन टोकाचे पुत्र होऊ लागले तर माणसाचे गुण जन्मतः ठरलेले आहेत व त्यावरच त्याचे कर्म ठरून जावे, आणि क्षत्रियाने अध्यापन करू नये व शूद्राने वेदाध्ययन करू नये या म्हणण्यातला जीव निघून जातो. आणि हे ध्यानात घेऊनच भारतातील अनेक पुरुषांनी गुणांवर ब्राह्मण्य, क्षत्रियत्व अवलंबून असते असा विचार मांडलेला आहे. तो प्रभावी होऊन त्याप्रमाणे समाजव्यवस्थेत बदल झाला नाही हा भाग निराळा. पण अनुभव जमेस धरून त्याप्रमाणे विचार करणारी माणसे तेव्हा होती हे यावरून स्पष्ट दिसते.
 नहुष व धर्मराज यांच्या संवादात हा विचार अगदी निश्चित शब्दांत आढळतो. 'ब्राह्मण कोणास म्हणावे?' असे नहुषाने विचारले तेव्हा धर्मराज म्हणाला की, 'ज्याच्या अंगी सत्य, दान, दया, अहिंसा हे गुण दिसून येतात त्यास ब्राह्मण म्हणावे.' त्यावर नहुष म्हणाला, 'तुझे म्हणणे युक्त नाही. कारण सत्य, दान, क्षमा, दया, अहिंसा हे गुण शूद्राच्याहि अंगी असतात.' त्यावर

युधिष्ठिर म्हणाला,

शूद्रे तु यद् भवेत लक्ष्म द्विजे तच्च न विद्यते ।
न वै शूद्रो भवेत् शूद्रो ब्राह्मणो नच ब्राह्मणः ॥

- वन. १८०.२५

यत्रैतत् लक्ष्यते सर्प वृत्तं स ब्राह्मणः स्मृतः ।
यत्रैतत् न भवेत् सर्प तं शूद्रमिति निर्दिशेत् ॥ २६

 शूद्राच्या अंगी हे लक्षण जर दिसून आले व ब्राह्मणाच्या अंगी दिसून आले नाही तर तो शूद्रही शूद्र नव्हे व ब्राह्मणही ब्राह्मण नव्हे. तर हे सर्पा, ज्याच्या ठिकाणी वरील सत्य, अहिंसा या गुणांनी युक्त असे आचरण दिसेल तोच ब्राह्मण व ज्याच्या ठिकाणी ते दिसून येणार नाही तो शूद्र होय.
 ब्राह्मणत्व किंवा शूद्रत्व हे गुणांवर व वृत्तावर अवलंबून ठेवण्याचे अगदी साधे कारण युधिष्ठिराने सांगितले आहे. तो म्हणाला, 'सध्या सर्व वर्णांचा संकर चालू आहे. कोणताही पुरुष कोणत्याही स्त्रीशी विवाह करतो. त्यामुळे जाती ही निवडून सांगणे फार कठीण आहे. म्हणूनच हे भुजंगश्रेष्टा, ज्याच्या ठायी संस्कारजन्य असे उच्च शील दिसून येईल त्याला ब्राह्मण म्हणावे, असे मी म्हणतो,' (वन. १८०)
 वनपर्वातील ब्राह्मण व व्याध यांच्या संवादात ब्राह्मणानेही आपले असेच मत व्यक्त केले आहे. व्याध हा पूर्वजन्मी ब्राह्मण होता. पण या जन्मीसुद्धा त्याचे आचरण ब्राह्मणाप्रमाणेच सत्य, दान, दया, अद्रोह, यांनी अलंकृत असे होते. त्यावरून ब्राह्मण त्यास म्हणाला, 'या जन्मीदेखील मी आपणांला ब्राह्मण समजतो. कारण ब्राह्मण हा दांभिक होऊन जर दुष्कृत्ये करू लागला तर तो शुद्धतुल्य होय. व शूद्र सत्य, दम, वर्म यांनी युक्त असे आचरण करील तर तो ब्राह्मण होय, असे माझे मत आहे." -(वन. २१६)
 जनकपराशर संवादात पराशराने शूद्रासंबंधी पुढील अभिप्राय दिला आहे. 'हे जे मी भूतदयादि तेरा धर्म सांगितले, त्यांचे जो शूद्र यथावत पालन करितो त्याला विद्वान लोक ब्रह्मदेवाशी सजातीय (ब्राह्मण) मानतात. मी मात्र त्याला जगताचे प्रधानकारण जो विष्णू त्याच्याशी (क्षत्रिय) सजातीय मानतो. (शांति. २९६)
 धर्मराजाला संन्यासनिवृत्तीचा उपदेश करताना अर्जुन म्हणाला, 'राजा इन्द्र हा ब्रह्मदेवाचा पुत्र असून तो आपल्या कर्माने क्षत्रिय झाला आहे.' (शां. २२)
 भृगु- भारद्वाज संवादात, भिन्नभिन्न वर्ण कर्मामुळे झाले असे भृगूने आपले मत दिले आहे. भृगू म्हणतो, 'जग ब्रह्मदेवाने निर्माण केले असल्यामुळे प्रथम वर्णभेद नव्हता. प्रथम सर्व ब्राह्मणच होते व मग कर्मामुळे त्यांचे भिन्नवर्ण झाले. यांपैकी जे रजोगुणी, कोपिष्ट, साहसी होते व ज्यांनी ब्राह्मणधर्म टाकिला ते क्षत्रिय झाले. ज्यांच्यात रज व तम या गुणांचे मिश्रण होते व ज्यांनी ब्राह्मणधर्म टाकून पशुपालन व कृषी हे व्यवसाय पत्करिले, ते वैश्य झाले. जे तमोगुणी असून हिंसा व असत्य यांवर आसक्त झाले आणि हव्या त्या कर्मावर उपजीविका करू लागले ते शूद्र झाले. सारांश, इत्येतैः कर्मभिर्व्यस्ता द्विजा वर्णान्तरं गताः । (शांति. १८८. १४.) 'आपापल्या भिन्न कर्मांमुळे मूळच्या ब्राह्मणांपासून भिन्न भिन्न वर्ण निर्माण झाले.' याच संवादात पुढे भारद्वाजाने, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा भेद कशाच्या योगाने होतो ते मला सांगा' असे विनविल्यावरून भृगू म्हणाला, 'जो पुरुष जातकर्मादी संस्कारांनी शुचिर्भूत होऊन वेदाचे अध्ययन- अध्यापन करतो, जो सदाचारसंपन्न व सत्यनिष्ठ आहे तो ब्राह्मण होय. जो हिंसाजनक कृत्ये करतो, वेदाध्ययन करतो, प्रजापालन करतो तो क्षत्रिय होय. जो व्यापार, पशुपालन, करतो व जो वेदाध्ययनसंपन्न आहे तो वैश्य होय व ज्याने वेदाचा त्याग केला आहे व अनाचार पतकरिला आहे, जो अशुद्ध व अमंगळ आहे तो शूद्र होय. शूद्राच्या ठायी वरील सत्य अहिंसादी गुण दिसतील तर तो शूद्र नव्हे व ब्राह्मणाच्या ठायी ते दिसणार नाहीत तर तो ब्राह्मण नव्हे.' -(शांति १८९)
 पराशर- जनकसंवादात पराशराने जनकास असेच मत सांगितले आहे. जनकाने विचारले, 'हे महामुने, मला एक संशय उत्पन्न झाला आहे, तो आपण उलगडून सांगा. संशय असा की, मनुष्याला जो हा वर्णात कमीपणा येतो तो त्याच्या कर्माच्या हीनत्वामुळे की जातीमुळे?'
 यावर पराशर म्हणतो- 'हे महाराजा, या कामी कर्म आणि जाती ही उभय हीनत्वास कारण होतात. मात्र त्यात थोडा फरक आहे. तो असा की, हीन जाती व हीन कर्म ही दोन्ही एकाचे वाट्यास आली असली तरी त्याने जातीची पर्वा न करता हीन कर्माचा त्याग करावा म्हणजे झाले. कारण, जातीने हीन असूनही जर तो दुष्ट कर्म न करील तर त्यास उत्तम पुरुषांत गणण्यास काहीच हरकत नाही. बरे, याचे उलट जातीने उत्तम असूनही पुरुष जर निंद्य कर्म करील तर ते कर्म त्याला हीनत्व आणील. यावरून पाहता जातीपेक्षा कर्माचे हीनत्व अधिक बाधक होते.' -(शांति. २९६)
 याप्रमाणे वर्ण हे जन्मसिद्ध की कर्मसिद्ध यासंबंधी महाभारतकारांचे विचार काय आहेत ते आपण पाहिले. यात असे दिसले की, भारतीय तत्त्ववेत्त्यांच्या मते प्रधानतः वर्ण हे जन्मसिद्ध आहेत आणि ते तसे गृहीत धरूनच त्यांनी समाजव्यवस्था सांगितली आहे. आता वर्ण हे कर्मसिद्ध आहेत हा विचारही मधून मधून अनेकांनी व्यक्त केला आहे आणि काही मोठ्या तत्त्ववेत्त्यांनी तो मान्यही केला आहे. पण ते एक मत म्हणून त्यांनी फक्त मान्य केलेले आहे. समाजव्यवस्था करताना हे मत त्यांनी विचारात घेतलेले नाही. शूद्र हा सत्य, अहिंसा इत्यादी गुणांनी युक्त असे आचरण करील तर तो ब्राह्मण होय, असे म्हटले आहे. पण त्याने याजन करावे किंवा अध्यापन करावे असे मात्र कोठेही सांगितलेले नाही. त्यांचप्रमाणे कर्माने तो क्षत्रिय झाल्यास क्षत्रिय स्त्री विवाह करण्यास त्याला हरकत नाही असेही कोठे सांगितलेले नाही. उलट याचा तीव्र निषेधच केलेला आहे.
 आनुवंशावरील दृढ विश्वास हे या व्यवस्थेचे मुख्य कारण आहे असे दिसते. मातापित्यांचे गुण वंशपरंपरेने अपत्यांत संक्रान्त होतात असे त्यांना वाटत होते. माणसाचे गुण रक्तावर अवलंबून आहेत आणि रक्तात भेसळ झाली तर ते गुण नष्ट होतील असे त्यांचे मत होते. लोभी पुरुषाचा पुत्र लोभी होतो व रागद्वेषहीन पुरुषाचा पुत्र रागद्वेषहीन होतो, (शां. २६३. ९) असे मानण्यापर्यंत कोठे कोठे हा आनुवंशावरील विश्वास गेलेला आहे आणि विशिष्ट जातीतच विशिष्ट गुण असतात हा सिद्धांत धरून व्यवस्था केलेली आहे. वर्णसंकर झाल्यास हे गुण नष्ट होतील अशी भीती या तत्त्ववेत्त्यांच्या मनांत असल्यामुळे त्यांनी वर्णसंकराचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केला आहे. वर्णसंकराची भीती महाभारतकारांना काही कल्पनातीत वाटत होती असे दिसते. कारण सर्व जगात वर्णसंकर हे एकच महत संकट आहे असे मानूनचं काही ठिकाणी त्यांनी विवेचन केले आहे. युद्धामुळे होणारा मोठा अनर्थ म्हणजे वर्णसंकर होय; वर्णसंकर होऊ न देणारा राजा तो उत्तम राजा; अव्यवस्था होऊन वर्णसंकर होऊ लागल्यास वाटेल त्याने हातात शस्त्र घ्यावे व हे भयंकर अरिष्ट टाळावे. इत्यादी उद्गारांवरून वर्णसंकराचे भय त्यांना किंती वाटे ते दिसून येते.
 मात्र वर्णसंकराची आपल्या मनात जी कल्पना रूढ आहे ती त्यांच्या मनांत नव्हती. त्यांना फक्त प्रतिलोम संकराची भीती वाटत होती. म्हणजे ब्राह्मणाने क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्त्रीशी, क्षत्रियाने वैश्य व शूद्र स्त्रीशी, वैश्याने शूद्र स्त्रीशी विवाह करण्यास त्यांची हरकत नव्हती. पण क्षत्रिय पुरुष व ब्राह्मण स्त्री, वैश्य पुरुष व ब्राह्मण किंवा क्षत्रिय स्त्री व शूद्र पुरुष व ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य स्त्री असे विवाह त्यांना मान्य नव्हते. फक्त जातीतच लग्ने झाली पाहिजेत असा आजचा दंडक तेव्हा नव्हता.
 आता गुण हे जर रक्तावरच अवलंबून आहेत असे असेल तर क्षत्रियाचे अंगी ब्राह्मणाचे गुण का दिसावे, शूद्राचे अंगी केव्हा केव्हा ब्राह्मणाचे सत्य, अहिंसादी गुण किंवा क्षत्रियाचे शौर्य, साहस हे गुण दिसतात त्याचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे वारंवार येत असला पाहिजे. आणि असे गुण दिसले तर त्यांना ब्राह्मण किंवा क्षत्रिय म्हणावे असे त्यांनी उत्तर दिले. पण त्यामुळे समाजव्यवस्था बदलावी असे वाटण्याइतपत त्या मताला दृढता आहे असे त्यांना वाटले नाही.
 भारतीय तत्त्ववेत्त्यांनी जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य जमेस धरुन समाजव्यवस्था केली हे जरी खरे असले तरी अशा व्यवस्थेमुळे उत्पन्न होणारे जे दोष ते समाजव्यवस्थेत शिरू न देण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. आणि यातच त्यांचे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी वर्ण जन्मसिद्ध मानला तरी योग्यता मात्र जन्मावर कधीही अवलंबून ठेवावयाची नाही असे त्यांचे निश्चित मत होते. क्षत्रियकुळात पुरुष जन्माला आला म्हणून तो क्षत्रिय असे धरून त्याने युद्ध, प्रजापालन ही कार्ये करावी असे त्यांनी सांगितले आहे. पण ही कार्ये त्याने न केली तरी केवळ जन्मामुळे त्याला मान द्यावा असे भारतीयांनी कधीही सांगितले नाही. तेच ब्राह्मणा- संबंधी आहे. ब्राह्मणवर्ण हा जन्मावरून गृहीत धरून ब्राह्मणाने यजन याजन इ. कार्ये करावी असा दंडक घातलेला आहे. पण ब्राह्मणाने आपली कार्ये केली नाहीत तरी केवळ जन्मामुळेच त्याला श्रेष्ठ मानावे ही मनुस्मृतीतली समाजहिताला अत्यंत घातक अशी कल्पना त्यांना स्वप्नातसुद्धा शिवलेली दिसत नाही.
 गुण हे जन्मसिद्ध धरून त्या अन्वये कार्ये ठरवून देणे हे तत्त्व समाजाला बाधक आहेच, पण त्यापेक्षाही केवळ जन्मामुळे, गुण प्रकट झाले नसताही, उच्चनीचताही ठरविली तर ते धोरण मात्र समाजाचा घात केल्यावाचून राहात नाही आणि भारतीय तत्त्ववेत्त्यांनी या घातक धोरणाचा कधीही पुरस्कार केलेला नाही. जन्मावर वर्ण ठरवून त्या अन्वये पदाधिकार ठरविले तर दोन प्रकारचे दोष निर्माण होतात. एक म्हणजे ज्यांच्या अंगी गुण नाहीत ते पदाधिकारी होऊन बसतात व त्यामुळे घात होतो व दुसरा म्हणजे ज्यांच्या अंगी गुण आहेत त्यांना पदाधिकार मिळत नाही व त्यांच्या गुणांचा विकास होत नाही. क्षत्रिय कुळात जन्मलेले सर्वच पुरुष धैर्य-शौर्य गुणांनी युक्त असतात, ज्ञानाची लालसा, धनार्जनाची बुद्धी हे गुण त्यांच्या ठायी नसतातच असे नाही. आणि वैश्य कुळात जन्मलेल्या पुरुषांच्या अंगी धनोत्पादनाचे सर्व गुण असतात आणि क्षत्रियाचे किंवा ब्राह्मणाचे गुण नसतात असेही नाही. त्यामुळे शौर्य धैर्य नसलेल्या क्षत्रियाला राजपद किंवा सेनाध्यक्षाचे पद देणे म्हणजे नालायक माणसाला पदाधिकार देणे होय व ते गुण अंगी असणाऱ्या वैश्याला तो न देणे म्हणजे त्याच्या गुणविकासाला संधी न देणे होय. या दोन्ही गोष्टी समाजाला घातक आहेत. यांपैकी नालायक माणसाला पदाधिकार देणे हा जो दोष तो भारतीय तत्त्ववेत्त्यांनी समूळ नष्ट केला आहे आणि गुणी माणसाच्या गुणविकासाला संधी न मिळणे हा दोष शक्य तितका नष्ट व्हावा अशी योजना केली आहे. हे त्यांनी कसे घडविले ते आता पाहावयाचे आहे.
 भीष्म सांगतात, 'हे राजा, ब्राह्मणांना इन्द्रियदमन, शुचिर्भूतपणा व सरलत्व हे धर्मविहित आहेत. जो ब्राह्मण इंद्रियदमन करतो, जो सदाचारसंपन्न, दयाशील, सहिष्णू, निरिच्छ, असा असतो, तोच खरा ब्राह्मण होय. हे गुण नसलेला ब्राह्मण ब्राह्मण नव्हेच. दुराचारी, शास्त्राविरुद्ध कर्मे करणारा, दुष्ट असा ब्राह्मण शूद्र होतो. राजा त्याने वेदजप केला असला किंवा नसला तरी तो शूद्रतुल्य असल्यामुळे त्याला दासाच्या योग्यतेचे भोजन द्यावे व त्याला देवकृत्यात वर्ज्य मानावे (जपन् वेदानजपंश्चापि राजन् । समः शूद्रैर्दासवच्चापिभोज्यः । एते सर्वे शूद्रसमा भवन्ति । राजन्नेतान्वर्जयेत् देवकृत्ये ॥ शां. ६२, ५)' पितामह भीष्मांनीच ब्राह्मणभेदकथन करताना असे सांगितले आहे की,

जन्मकर्मविहीना ये कदर्या ब्रह्मबन्धवः ।
एते शूद्रसमा राजन् ब्राह्मणानां भवन्त्युत ॥
अश्रोत्रियाः सर्व एते सर्वे चानाहिताग्नयः ।
तान् सर्वान् धार्मिको राजा बलिं विष्टिंच कारयेत् ॥

- शां. ७६, ७ व ८

 ब्राह्मणजन्मास योग्य अशा कर्माचा त्याग करणारे जे कृपण ब्राह्मण ते शूद्रसम होत, तसेच वेदाध्ययन न करणारे व अग्न्याधान न करणारे जे ब्राह्मण तेही सर्व शूद्रतुल्यच असल्यामुळे धर्मनिष्ठ राजाने त्यांच्याकडून कर घ्यावा व त्यांना वेठीच्या कामालाही लावावे.
 व्यासांनीही ब्राह्मणजन्माच्या सार्थकाविषयी बोलताना हाच अभिप्राय व्यक्त केला आहे.

ब्राह्मणस्य तु देहोऽयं न कामार्थाय जायते
इह क्लेशाय तपसे, प्रेत्य त्वनुपमं सुखम् ।

-(शां. ३२१, २३)

 ब्राह्मणाचा देह सुखोपभोगासाठी निर्माण झालेला नाही. इहलोकी क्लेश भोगून तपाचरण करण्यासाठी ब्राह्मण जन्मला आहे. असे केल्यानेच त्यास परलोकी निरुपम सुख मिळेल.
 ब्राह्मणाला शिक्षा करण्यासंबंधी व त्याच्या वध्यत्वासंबंधीही महाभारतकारांनी असाच अगदी निःपक्षपाताने निर्णय दिला आहे.
 एके ठिकाणी ब्राह्मणाने मोठा अपराध केला असला तरी त्याला शरीरदंड करू नये, त्याला फक्त हृद्दपार करावा असे भीष्मांनी सांगितले आहे. (शां. ५६) पण व्यासांनी याहीपुढे जाऊन अशा ब्राह्मणाचा वध करावा असे सांगितले आहे. व्यास म्हणतात 'युधिष्ठिरा, वेदपारंगत असणारा ब्राह्मणही शस्त्र घेऊन वध करण्याच्या इच्छेने आला तर त्याचा युद्धामध्ये वध करावा. त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. हे कुंतीपुत्रा, अशा प्रकारचा मंत्रच वेदामध्ये आहे. वेदप्रमाणमूलकच धर्म मी तुला सांगत आहे.' (शां. ३४) अश्वमेध करण्याचा उपदेश युधिष्ठिराला करीत असताना व्यासांनी ब्राह्मणाच्या वध्यत्वासंबंधी सोदाहरण विवेचन केले आहे. ते म्हणाले, 'पूर्वी देव-दैत्यांचे युद्ध चालू असता देवांनी दैत्यांना ठार करून स्वर्ग मिळविला आणि त्याच वेळी दर्पामुळे विचारशून्य झालेले, शालावृक नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध असलेले वेदपारंगत असे ब्राह्मण दानवांना साह्य करण्यासाठी त्यांच्या आश्रयाला जाऊन राहिले होते. तेव्हा हे भरतकुलोत्पन्ना, देवांनी त्या अठ्ठ्याऐशी हजार ब्राह्मणांचाही वध केला. त्याप्रमाणे धर्माचा उच्छेद व्हावा अशी इच्छा करणारे, अधर्मप्रवर्तक लोक असतील तर त्या दुरात्म्यांचाही वध केला पाहिजे.' -(शां. ३३)
 ब्राह्मणाविषयी हे जे धोरण सांगितले आहे त्यावरून उच्चनीचता ही जन्मावर ठेवावयाची नाही फक्त गुणांवर ठेवावयाची हे भारतीयांचे धोरण अगदी स्पष्टपणे दिसून येते.
 ब्राह्मणाप्रमाणेच क्षत्रियांसंबंधीही धोरण आहे. प्रजेचे पालन करणे, शत्रूपासून तिचे रक्षण करणे, व उत्कृष्ट दंडनीती प्रस्थापून धर्माचा उत्कर्ष करणे हे राजाचे व क्षत्रियांचे कर्तव्य होय. हे कर्तव्य जे बजावणार नाहीत ते क्षत्रियच नव्हेत असे महाभारतात अनेक ठिकाणी सांगितले आहे.

यो हि तेजो यथाशक्ति न दर्शयति विक्रमात्
क्षत्रियों जीविताकांक्षी स्तेन इत्येव तं विदुः ॥

- उद्योग. १३४.२

 जीवाच्या आशेने जो क्षत्रिय पराक्रम करण्याचे टाळतो, व यथाशक्ती आपले तेज प्रगट करीत नाही, तो क्षत्रिय नसून चोर आहे असे म्हटले पाहिजे, असे विदुलाराणीने आपल्या पुत्रास सांगितले आहे. त्याचप्रमाणे-

रक्षणं सर्व भूतानामिति क्षात्रं परं मतम् ।

- शां. १२०.३

 सर्व प्राण्यांचे संरक्षण करणे हा क्षत्रियाचा मुख्य धर्म होय, असे शास्त्रांचे मत आहे. असे पितामह भीष्मांनी सांगितले आहे. क्षत्रियाच्या धर्मासंबंधी महाभारतात अशी शेकडो वचने आहेत. आणि शांतिपर्वातील राजधर्मपर्व हे तर त्यासाठीच आहे. प्रवृत्तीधर्माच्या विवेचनात त्याचे साकल्याने विवेचन येणार असल्यामुळे येथे विस्तार करीत नाही. मथितार्थ येवढाच आहे की क्षत्रियाचीही योग्यता केवळ जन्मावर अवलंबून ठेवलेली नव्हती.
 ब्राह्मण किंवा क्षत्रिय हे प्रथमतः जन्मामुळे ब्राह्मण किंवा क्षत्रिय ठरत असले तरी त्यांचे खरे ब्राह्मणत्व किंवा क्षत्रियत्व हे त्यांच्या कर्मावरच अवलंबून आहे. असे महाभारतकारांचे मत होते हे यावरून निःसंशय दिसते. पण याहीपेक्षा त्यांचे विशेष अभिनंदनीय धोरण, त्यांनी क्षत्रिय ब्राह्मणांमध्ये काडीचीही उच्चनीचता नाही, दोन्ही वर्ण पूर्णसम आहेत, हे तत्त्व प्रस्थापित करण्याचा जो अट्टाहास केला आहे, त्यात दिसून येते.
 'ब्राह्मण व क्षत्रिय हे राष्ट्राचे सारखेच पालक आहेत', 'ब्राह्मणाचे भाग्य क्षत्रियावर व क्षत्रियाचे ब्राह्मणांवर अवलंबून आहे', 'समाजाला दोघांचीही अत्यंत जरूर आहे' असे विचार महाभारतात अनेक ठिकाणी आहेत. राजा म्हणजे प्रत्यक्ष देवच असेही सांगितलेले आहे, त्याचप्रमाणे ब्राह्मण हेही देव आहेत असेही म्हटलेले आहे. ब्राह्मणांची उत्पत्ती क्षत्रियापासून झाली असे म्हणून लगेच क्षत्रियांची उत्पत्ती ब्राह्मणापासून झाली असेही मत व्यक्त केले आहे. धर्मविवेचन करताना मात्र क्षात्रधर्म सर्वांत श्रेष्ठ असे अनेकवार सांगितले आहे आणि ते युक्त कसे आहे याचे विवेचन अन्यत्र केले आहे.
 मुचकुंदाने कुबेराचा पराभव केल्यावर त्यास सांगितले की, "ब्राह्मण व क्षत्रिय हे ब्रह्मदेवाने सख्खे बंधूच निर्माण केले आहेत. त्यांचे सामर्थ्य व उद्योग ही अलग अलग झाली तर प्रजेचे पालन होणार नाही. तप व मंत्र यांचे बल सदैव ब्राह्मणांच्या ठायी निश्चलपणे वास्तव्य करीत असते आणि अस्त्रबल व बाहुबल ही क्षत्रियांच्या ठायी सदैव स्थिरपणे राहात असतात. ब्राह्मण व क्षत्रिय या उभयतांनी प्रजेचे पालन केले पाहिजे." हे मुचकुंदाचे उद्गार युधिष्ठिराला सांगून भीष्म म्हणतात, 'ब्राह्मणांच्या हाती सदैव सुखदुःख देण्यास समर्थ असे उदक असते व क्षत्रियांच्या हाती शस्त्र असते. जगतामध्ये जे काही आहे ते सर्व या उभयतांच्या म्हणजे ब्राह्मणांच्या व क्षत्रियांच्या अधीन आहे.- (शांति अ. ७४)
 ऐलकश्यप संवादात कश्यपमुनी ऐलाला म्हणाले-

एतौ हि नित्यं संयुक्तौ इतरेतरधारणे ।
क्षत्रं वै ब्रह्मणो योनिर्योनिःक्षत्रस्य वै द्विजाः ॥

- शा. ७३.४९.

 ब्राह्मण व क्षत्रिय हे परस्परांशी मिळून असले म्हणजे त्यांचे पोषण होते. क्षत्रिय हे ब्राह्मणांचे उत्पत्तिस्थान असून ब्राह्मण हे क्षत्रियांचे उत्पत्तिस्थान आहे.
 पितामह भीष्मांचेही असेच मत आहे. ते म्हणतात, 'युधिष्ठिरा, ईश्वराने ब्राह्मण व क्षत्रिय हे उभयता समान अंतःकरण असलेले परस्परांचे मित्र म्हणून निर्माण केले आहेत. ब्राह्मण व क्षत्रिय या उभयतांचा सन्मान केल्यास प्रजेला सुखप्राप्ति होते व त्या उभयतांचा अपमान केल्यास प्रजेचा निःसंशय नाश होतो. ब्राह्मण व क्षत्रिय हेच सर्व प्रजेला मूलभूत आहेत. (ब्रह्मक्षत्रं हि सर्वासां प्रजानां मूलमुच्यते. -शां. ७३. ४३)
 जुन्या ग्रंथांत ब्राह्मणाला देव पदवी दिलेली आढळते. पण त्याचप्रमाणे क्षत्रियालाहि दिलेली आढळते हे विसरून चालणार नाही. मांधात्याला उपदेश करताना इंद्र म्हणाला, "सर्व लोकांचा गुरूच अशा राजाचा जो अपमान करतो त्याने दिलेले दान व त्याने केलेले यज्ञ व श्राद्ध यांचे फल मिळत नाही. मनुष्यांचा अधिपति, इतकेच नव्हे तर मूर्तिमंत आणि सनातन देवच असा जो धर्माभिलाषी राजा त्याचा अपमान देव देखील करीत नाहीत. भगवान ब्रह्मदेवाने सर्व जग निर्माण केले, तथापि त्याची सत्कर्माकडे प्रवृत्ती व दुष्कर्मापासून निवृत्ती झाली पाहिजे, एतदर्थ त्याला क्षत्रियांची अपेक्षा वाटली. धर्माची प्रवृत्ती झाली म्हणजे त्याचे फल काय मिळते, याचे ज्याच्या बुद्धीला ज्ञान असते तोच राजा मान्य व पूज्य होय, आणि तोच क्षत्रिय धर्माचा खरा आधार होय. (शांति, अ. ६५)
 युधिष्ठिराने एकदा पितामह भीष्मांना विनविले की, हे भरत कुलश्रेष्ठा, मनुष्यांचा अधिपति जो राजा त्याला ब्राह्मण लोक देवता का मानतात, ते मला सांगा. तेव्हां भीष्मांनी त्याला बृहस्पतीने वसुमना राजास सांगितलेले विचार सांगितले.
 बृहस्पती म्हणाला, 'हे नरश्रेष्ठा, राजा हाच लोकांच्या धर्माचे मूळ आहे असे दिसून येते. राजाने पालन केले नाही तर वेदत्रयांचे अस्तित्व नष्ट होईल. ब्राह्मण वेदाध्ययन करणार नाहीत, लोक अनीतीने वागू लागतील, सर्वत्र वर्णसंकर होईल व राष्ट्रात दुर्भिक्ष येईल. म्हणून हा एक मनुष्यच आहे असे समजून राजाचा केव्हाही अवमान करू नये. कारण ती एक मनुष्याचे रूप धारण करणारी देवता आहे. जो मनुष्य राजाचे वाईट व्हावे अशी इच्छा करीत तो इहलोकात क्लेश पावून मरणोत्तर नरकास जाईल.' -(शां. ६८)
 क्षत्रिय व ब्राह्मण हे अशा रीतीने सर्व राष्ट्राचे आधारस्तंभ

आहेत. ते एक असतील तर शत्रूचा निःपात करतील व त्यांच्यात जर फूट झाली तर राष्ट्राचा नाश होईल, असे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे मत आहे.

ब्रह्म क्षत्रेण सहितं क्षत्रं च ब्रह्मणा सह
संयुक्तौ दहतः शत्रून् बनानीवाग्निमारुतौ ।

-वन. १८५, २५

 ब्राह्मणास क्षत्रियाचे व क्षत्रियास ब्राह्मणाचे साहाय्य असले म्हणजे ते उभयता मिळून, ज्याप्रमाणे अग्नी आणि वायू हे परस्परांचे साह्य करून वन जाळून टाकतात, त्याप्रमाणे शत्रूंचा

नाश करतात.
 महाभारतातील महान धर्मवेत्ता सनत्कुमार याचे हे उद्गार आहेत. क्षत्रिय व ब्राह्मण हे दोन्ही वर्ण असे सम असले आणि ब्राह्मणधर्म व क्षात्रधर्म या दोहींची राष्ट्राला सारखी गरज असली तरी राष्ट्राचे रक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे भारती तत्त्ववेत्त्यांना क्षात्रधर्माची महती जास्त वाटते हे निःसंदिग्ध शब्दात त्यांनी सांगितले आहे.
 भीष्म म्हणतात, 'हे पांडुपुत्रा, लोक व वेद या दोहोंमध्ये ज्यांना श्रेष्ठ मानले आहे असे चारही आश्रमांचे धर्म व यतिधर्म या सर्वांना क्षत्रिय धर्म हाच आधार आहे. हे भरतकुलश्रेष्ठा, ही सर्व कर्मे क्षत्रिय धर्मावरच अवलंबून आहेत. क्षत्रियधर्म सुव्यवस्थितपणे चालत असेल तर मनुष्यांच्या सर्व कामना पूर्ण होतात. या एका क्षात्रधर्मामध्ये सर्व धर्म प्रविष्ट झालेले आहेत म्हणून हाच धर्म श्रेष्ठ होय.'
 राजा मांधाता यास उपदेश करताना सुरेश्वर इंद्राने पुढील विवेचन केले आहे.
 पूर्वी श्रीविष्णूने क्षात्रधर्माचेच अवलंबन करून शत्रूंचा निःपात करून, बलसंपन्न अशा देवांचे व ऋषींचे रक्षण केले.

यदि ह्यसौ भगवान् नाहनिष्यत्
रिपून् सर्वान् असुरान् अप्रमेयः ।
नच ब्रह्मा नैव लोकादिकर्ता
सन्तो धर्माश्चादिधर्माश्च न स्युः ।

- शां. ६४. २३

 जर त्या अप्रमेय अशा विष्णूने शत्रूंचा वध केला नसता तर, ब्राह्मण जिवंत राहिले नसते, लोक राहिले नसते, आदिकर्ता भगवान ब्रह्मदेवही शिल्लक राहिला नसता, हा धर्म राहिला नसता व सनातन आर्यधर्मही राहिला नसता.

नष्टा धर्माः शतधा शाश्वतास्ते
क्षात्रेण धर्मेण पुनः प्रवृद्धाः
युगे युगे ह्यादिधर्माः प्रवृत्ता
लोकज्येष्ठं क्षात्रधर्मे वदन्ति ।

-शां. ६४. २४

 शाश्वत अशा धर्माचा शेकडो वेळा लोप झालेला आहे. पण क्षात्रधर्माच्या योगाने पुनरपि त्याची अभिवृद्धी झाली. हे आदिधर्म प्रत्येक युगात प्रवृत्त होतात. पण क्षात्रधर्म हाच सर्व लोकात श्रेष्ठ धर्म होय.
 ब्राह्मण, वैश्य व शूद्र हे आपापल्या धर्मापासून च्युत झाले तर त्यांना स्वधर्माचे ठायी आणून ठेवणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. म्हणूनच राजधर्म हाच सर्वांत श्रेष्ठ होय. इतर कोणताही नाही. –(शां. ६५.१२)
 अत्री व गौतम यांच्या वादाचा निर्णय देताना सनत्कुमाराने पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे :
 'राजा हाच सुप्रसिद्ध असा धर्म असून तोच प्रजापती, इंद्र, शुक्र, जगताचे पोषण करणारा धाता आणि बृहस्पती आहे. राजा धर्माचा प्रवर्तक असल्यामुळे सर्वांस मुख्यत्वेकरून कारणीभूत आहे, म्हणूनच त्याला पुरायोनी म्हणजे प्राथमिक कारण असे म्हणतात. ज्याप्रमाणे आकाशदेवतांमध्ये वास्तव्य करणारा सूर्य अंधकाराचा नाश करतो, त्याप्रमाणे भूमीवर वास्तव्य करणारा नरपती हा अधर्माचा अत्यंत नाश करतो. यामुळे व शास्त्र प्रामाण्यावरूनही राजाला प्राधान्य आहे, असे सिद्ध होते. (वन १८५)
 अशा या क्षात्रधर्माची लक्षणे कोणती ?
 इंद्र म्हणतो-

आत्मत्यागः सर्वभूतानुकम्पा
लोकज्ञानं पालनं मोक्षणंच
विषण्णानां मोक्षणं पीडितानां
क्षात्रे धर्मे विद्यते पार्थिवानाम् ।

- शां. ६४. २६

 सर्व प्राणिमात्राविषयी अनुकम्पा, स्वार्थत्याग, राष्ट्राविषयी पूर्ण ज्ञान, लोकांचे पालन, संकटग्रस्तांना मुक्त करणे, गांजलेल्यांची पीडा दूर करणे ही क्षात्रधर्मनिष्ठ राजाची कर्तव्ये होत.
 क्षात्रधर्म हा असा थोर पण तितकाच कठीण असल्यामुळे 'तुझा देह कष्टासाठी आहे' हे जसे ब्राह्मणाला वेदव्यासांनी बजाविले आहे (शां. ३२१. २३), त्याचप्रमाणे ब्रह्मवेत्ता उतथ्य याने क्षत्रियांनाही

धर्माय राजा भवति न कामकरणाय तु । शांति ९०.३

 राजाची- क्षत्रियांची- उत्पत्ती धर्मरक्षणासाठी आहे, विलासासाठी नाही असे बजाविले आहे.
 ब्राह्मण व क्षत्रिय यांच्याप्रमाणेच वैश्यांचे महत्त्वही भारतीय तत्त्ववेत्ते पूर्णपणे जाणून आहेत. पुढील प्रवृत्तिधर्मप्रकरणी धनाचे भारतीयांना किती महत्त्व वाटत होते, धनावरच सर्व धर्म अवलंबून आहे असे त्यांना का वाटत होते, याचे सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यावरून वैश्यांचे त्यांच्या मते किती महत्त्व आहे हे कळून येईल. कृषी, वाणिज्य हा सर्व राष्ट्राचा प्राण आहे हे महाभारतात अनेक ठिकाणी सांगितलेले आहे.
 भीष्म म्हणतात,

'वार्तामूलो ह्ययं लोकस्तया वै धार्यते सदा
तत्सर्वं वर्तते सम्यग् यदा रक्षति भूमिपः ।

- शां. ६८.३५

 सर्व जग हे शेती व व्यापार यावरच अवलंबून आहे. त्यामुळेच जगाचे पालनपोषण होत असते. राजा जेव्हा राष्ट्राचे पालन करीत असतो तेव्हाच यांची व्यवस्था ठीक असते.
 कोशसंचयाचे महत्त्व युधिष्ठिराला सांगताना पितामह भीष्मांनीच पुन्हा एकदा कृषि-वाणिज्याचे महत्त्व सांगितले आहे. ते म्हणाले, हे राजा, कृषी-गोरक्षण, व्यापार आणि अशाच प्रकारचे जे दुसरे कर्म असेल ते अनेक लोकांकडून करवावे. नाही तर ती कर्मे नष्ट होऊन जातील. कृषी-पशुपालन व व्यापार करू लागलेल्या मनुष्याला चोर अथवा अधिकारी यांच्यामुळे त्रास होत असेल तर त्यामुळे राजाच निंदेस पात्र होतो. राजाने अन्नपान आणि वस्त्रे यांच्या योगाने सदैव द्रव्यसंपन्न लोकांचा बहुमान करावा: हे भरतकुलोत्पन्ना, द्रव्यसंपन्न पुरुष हे राज्याचे मोठे अंग आहे. म्हणून तो सर्व प्राण्यांचे केवळ मूर्धस्थान आहे यात शंका नाही. (ककुदं सर्व भूतांना धनस्थो नात्र संशयः । -शां. ८८.३०) सारांश -

कृषिगोरक्ष्यवाणिज्य लोकानामिह जीवनम् |—-शां. ८९.७

शेती, गोरक्षण, व व्यापार यावरच जगाची प्राणयात्रा अवलंबून आहे हे सत्य महाभारतकार कधीहि न विसरल्यामुळे वैश्यांचीही महती त्यांनी कमी लेखलेली नाही. राजाने कृषिवाणिज्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे नारदाने युधिष्ठिराला केलेल्या बोधावरून स्पष्ट होईल. नारद म्हणाले, “युधिष्ठिरा, राष्ट्रातील कृषी निवळ पर्जन्याच्या पाण्यावर अवलंबून असू नये. शेतकीसाठी मोठमोठे तलाव विशिष्ट अंतरावर नित्य उदकाने परिपूर्ण राहतील अशी व्यवस्था करावी. अशी व्यवस्था तू केली आहेस ना ? हे नरश्रेष्ठ कृषीचा उत्कर्ष व्हावा यासाठी कृषीवलांची सुस्थिती राखण्याकडे राजाने लक्ष पुरविले पाहिजे. त्याजपाशी पोटगी व बीभरणा भरपूर आहे की नाही याची राजाने चवकशी करावी व एकोत्रा व्याजापेक्षा अधिक व्याज न घेता त्यास कर्ज द्यावे. बा धर्मा, तू हीच पद्धती ठेविली आहेस ना ?"
 वैश्यांचे महत्त्व भारतीय तत्त्ववेत्त्यांना किती वाटत होते हे दुसऱ्या एका प्रकाराने कळून येईल. राजाने अमात्य कोणचे व कसे नेमावे हे सांगताना भीष्मांनी सांगितले आहे की विद्यानिष्ठ प्रौढ, शुचिर्भूत असे चार ब्राह्मण अमात्य असावे. शस्त्रधारी, बलिष्ठ असे अठरा क्षत्रिय अमात्य असावे आणि

वैश्यान् वित्तेनसंपन्नानेकविंशति संख्यया
त्रींश्च शूद्रान् विनीतांश्च शुचीन् कर्मणि पूर्वके ।

-शां. ८५.८

 धनसंपन्न असे एकवीस वैश्य तुझे अमात्य असावे. त्याचप्रमाणे नित्यकर्माचरण करून शुचिर्भूत झालेले तीन शूद्र अमात्य असावे
 अमात्यपदी बहुसंख्य वैश्य असावे असे सांगितले आहे. त्यावरून त्यांचे राष्ट्रात कोणते स्थान होते ते कळून येईल.
 शूद्रासंबंधी मात्र भारतीयांच्या मनांत समतेची भावना नाही. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्याबरोबरीला त्याला त्यांनी आणलेला नाही. तो त्रैवर्णिकांचा दास आहे असेच मत आहे. पण यासंबंधी एक गोष्ट लक्षांत वागविली पाहिजे. आज हिंदुस्थानात शेतकऱ्यांचा वर्ग फार मोठा आहे. त्यांना कोणतेही कारण नसताना शूद्र लेखण्यात येते हे अगदी अशास्त्रीय व धर्मविरुद्ध आहे. कृषिगोरक्ष्य करणारे ते सर्व लोक वैश्य आहेत व वेदाध्ययन, यज्ञ, वेदोक्तकर्म यांचा त्यांना आजच्या ब्राह्मणांइतकाच अधिकार आहे. तेव्हा शूद्र म्हणताच त्यांचा विचार डोळ्यांपुढे आणणे हे अयुक्त होय. त्याहून जे इतर राहिले ते शूद्र होत. त्यांच्याबद्दल भारतीयांना समतेची भावना नव्हती हे वर सांगितलेले आहेच. पण आज समाजात त्यांच्याबद्दल जी हीन भावना आहे तीही त्या काळीं नव्हती असे म्हणण्यास वाटेल तितकी प्रमाणे आहेत. महाभारत वाचताना असे निश्चित वाटू लागते की शूद्रांनाही हळूहळू या समाजात सामील करून घेऊन कालांतराने त्यांना एकजीव करून घ्यावे असेच धोरण भारतीयांचे होते.
 शूद्राने सत्य, अहिंसा, दान इत्यादी धर्माचे प्रतिपालन केले तर तो शूद्र ब्राह्मणाच्या बरोबरीचा होतो असे धर्म, पराशर, भृगू इ. थोर तत्त्ववेत्त्यांचे मत होते हे वर सांगितलेच आहे. त्याचप्रमाणे प्रधान निवडताना तीन शूद्र प्रधान राजाने निवडावे असे भीष्मांनी सांगितल्याचेही वर आलेच आहे. पण शूद्राना संन्यास यज्ञयाग व तप ही निषिद्ध नाहीत, विहित आहेत असेही भारती तत्त्ववेत्त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेले आढळते.
 गृहस्थाच्या तपोविधीचे विवेचन करतांना पराशर म्हणतात,

तपः सर्वगतं तात हीनस्यापि विधीयते
जितेन्द्रियस्य दान्तस्य स्वर्गमार्गप्रवर्तकम् ।

- शां. २९५. १४

 'जनका, हे तप सर्वांस विहित आहे. ते शूद्रांनाही विहित आहे. जो जितेंद्रिय व संयमी आहे तो कोणीही असला तरी त्याला तप हे स्वर्गप्राप्तिकारक ठरेल.'
 शूद्राला काही अटीवर यज्ञाधिकार आहे असे पितामह भीष्मांनीच सांगितले आहे. वर्णाश्रमधर्मकथन करतांना युधिष्ठिरास ते म्हणाले, 'हे भरतकुलोत्पन्ना, ब्राह्मणादी तीन वर्णांना व शूद्रालाही यज्ञाचा अधिकार आहे. स्वाहाकार, वषट्कार व वैदिकमंत्र हे तीन मात्र शुद्धाला वर्ज्य आहेत. यास्तव शूद्राने अमंत्रक पाकयज्ञ करावे. या पाकयज्ञाची दक्षिणा दोनशेछपन्न मुठी धान्य होय असे सांगितले आहे. पैजवन नामक शूद्राने अमंत्रक यज्ञ करून एक लक्ष पूर्णपात्रे दक्षणा दिली असे आम्ही ऐकिले आहे.
 यज्ञाप्रमाणेच संन्यासाचाही अधिकार शूद्राला आहे असे भीष्मांचे मत आहे. वास्तविक भारतीयांच्या मते ब्राह्मणाखेरीज इतर कोणीही हा संन्यासधर्म स्वीकारू नये असे आहे. त्याचे विवेचन प्रवृत्तिधर्मात केले आहे. पण क्वचित् इतरांनाही संन्यास जेथे विहित म्हणून सांगितला आहे तेथे तो शूद्रालाही आहे.
 भीष्म म्हणतात, "हे पृथ्वीपते, वेदांतश्रवणाची ज्याला इच्छा आहे, जो स्वकर्मनिष्ठ आहे व ज्याला राजाने अनुज्ञा दिली आहे अशा शूद्राला सर्व आश्रम विहित आहेत. म्हणूनच पूर्वी सांगितलेल्या स्वधर्माचे आचरण ज्याने केले आहे अशा शूद्राला, वैश्याला व क्षत्रियालाही संन्यासाश्रम विहित आहे."
 वर्ण जन्मसिद्ध मानून भारतीयांनी जरी समाजव्यवस्था केली होती तरी ही व्यवस्था शक्य तितकी निर्विष करून टाकण्यासाठी. त्यांनी किती दक्षता घेतली होती हे यावरून कळून येईल. गुण रक्तनिष्ठ असतात हा आनुवंशातील विचार (जो अजूनहि युरोपात लोकांना झपाटून राहिला आहे) आणि वैदिक मंत्रांचे काही दैवी अनाकलनीय पावित्र्य यांवरील श्रद्धा, यांमुळे त्यांनी काही विषम वाटणारी बंधने घातली होती. पण तरी ही बंधने समाजोत्कर्षाच्या आड येऊ नयेत अशी शक्यतो खबरदारी त्यांनी घेतली होती असे दिसते.
 या भारतीय तत्त्ववेत्त्यांची दृष्टी राष्ट्रीय कशी होती, अगदी कडक व शाश्वत मानलेले धर्मनियमही राष्ट्रकल्याणासाठी झुगारून देण्यास ते मागेपुढे कसे पाहत नसत हे पुढील उताऱ्यावरून दिसून येईल.
 युधिष्ठिराने एके प्रसंगी भीष्मांस विचारले, 'पितामहा, दस्यू अनार्य इत्यादी शत्रूचे सैन्य चालून आले असता व सर्वत्र गोंधळ माजूनं राहिला असता ब्राह्मण, वैश्य किंवा शूद्र यांपैकी कोणी शस्त्रधारण करून प्रजेचे रक्षण केले तर त्याने पुढे राजकार्य करावे की नाही ? तो प्रजांचा अधिपती होऊ शकतो की नाही ? यावर भीष्मांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे. समाजव्यवस्थेच्या बुडाशी अंतिम धोरण काय असावे हे त्यावरून स्पष्ट होते. भीष्म म्हणाले, 'राजा, अपार व नौकाशून्य अशा संकटरूपी समुद्रामध्ये जो मूर्तिमंत नौकाच झालेला असतो तो जरी शूद्र असला किंवा अन्य कोणी असला तरी त्याचा सर्वथैव सन्मान करणेच योग्य आहे.

अपारे यो भवेत् पारमप्लवे यः प्लवो भवेत्
शूद्रो वा यदि वाप्यन्यः सर्वथा मानमर्हति ।

-शां. ७८,३८

 शत्रूंनी पीडित केल्यामुळे अनाथ होऊन लोक ज्याची मार्गप्रतीक्षा करतात व ज्याच्या आश्रयामुळे सुखाने नांदतात त्याचाच त्यांनी प्रेमाने आपल्या बांधवाप्रमाणे सन्मान करावा. हे कुरुकुलोत्पन्ना, संकटाचा नाश करणाऱ्या पुरुषाचा पुनः पुनः सन्मान करणे अवश्य आहे. लाकडाचा हत्ती, कातड्याचा हरिण, पीक न देणारे शेत, व तेजोहीन पुरुष ज्याप्रमाणे निरुपयोगी असतात त्याचप्रमाणे अध्ययन न करणारा ब्राह्मण, प्रजापालन न करणारा राजा आणि वृष्टी न करणारा मेघ हे व्यर्थ होत. म्हणून

नित्यं यस्तु सतो रक्षेदसतश्च निवर्तयेत्
स एव राजा कर्तव्यः तेन सर्वमिदं धृतम् ।

- शां. ७८.४४

 जो नेहमी सज्जनांचे रक्षण करील व दुष्टांचे पारिपत्य करील त्यालाच- तो कोणत्याहि वर्णाचा असला तरी- राजपद दिले पाहिजे. त्याच्याच बलामुळे सर्व राष्ट्राचे धारण होत असते.
 वर्णधर्म कितीही कडक असले तरी राष्ट्रोत्कर्षाच्या आड ते येत असतील तर त्यांची मुळीच प्रतिष्ठा नाही हेच धोरण या वचनातून दिसून येते. आणि 'प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् | यः स्यात् प्रभवसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ॥ धर्मनियम हे राष्ट्राच्या उत्कर्षासाठी केलेले असून ज्यामुळे राष्ट्रोत्कर्ष होईल तोच धर्म होय हे तत्त्व ध्यानी वागवूनच भारतीयांनी समाजव्यवस्था केली होती. पारलौकिक कल्पनेला प्राधान्य देऊन धर्म म्हणजे काही अनाकलनीय, अदृष्ट असा पुण्यसाठा मिळविण्याचा मार्ग असे ते समजत नव्हते, हे यावरून निर्विवाद सिद्ध होते.

● ● ●