भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म/महाभारतातील धर्मशास्त्र

विकिस्रोत कडून



१. महाभारतातील धर्मशास्त्र

प्रस्तावना
 प्रत्येक राष्ट्राच्या संसारामागे त्यांचे एक स्वतंत्र असे तत्त्वज्ञान असते. नीती, राजकारण, धर्म, इहपरलोकींचे यश, स्वकीय परकीय यांशी वागणूक, ध्येय व्यवहार यांच्या मर्यादा, व्यक्ती व समाज यांचे परस्परांशी संबंध यासंबंधीचे काही सिद्धान्त त्या त्या राष्ट्रातील थोर पुरुषांनी निश्चित केलेले असतात; आणि साधारणतः त्यांचे व त्यांच्या राष्ट्रातील बहुजन समाजाचे वर्तन त्या धोरणाने होत असते. हे जे निश्चित झालेले सिद्धान्त त्यांचे समर्थनहि त्या विचारी पुरुषांनी केलेले असते. हेच सिद्धान्त ग्राह्य का, इतर त्याज्य का, यानेच आपल्या समाजाचे कल्याण कसे होईल, ते सोडल्याने नाश कसा होईल यासंबंधी ते नित्य मीमांसा करीत असतात व लोकांना ती पटवून देत असतात. हे जे त्या त्या राष्ट्रातील विचारी पुरुषांनी निश्चित केलेले सिद्धान्त, त्यांचे समर्थन व त्यांची मीमांसा या सर्वाला त्या राष्ट्राचे तत्त्वज्ञान असे म्हणतात.
 माणसाचा पराक्रम रक्तावर अवलंबून असतो, या रक्तात नॉर्डिक रक्त श्रेष्ठ आहे, या रक्ताचे लोक ते श्रेष्ठ, बाकीचे हीन, म्हणून त्यांच्यांत व इतरांत विवाह होऊ नयेत असे हिटलरच्या जर्मनीत सांगत असत. त्याचप्रमाणे लोकशाही ही विघातक असून एकशाही हीच श्रेष्ठ होय, प्रत्येक युगात कोणी तरी श्रेष्ठ नेता निर्माण होतच असतो, त्याच्यामागे बिनतक्रार सर्वांनी जाणे यातच राष्ट्राचे कल्याण आहे, असेही तेथे शिकविले जात असे. हे सर्व जर्मनीचे त्या काळी राष्ट्रीय तत्त्वज्ञान होते. रशियाचे तत्त्वज्ञान निराळे आहे. रक्तावर काहीच अवलंबून नाही, अर्थ-निर्मितीची साधने समाजाच्या संस्कृतीचे नियमन करतात; वंश, धर्म ही सर्व स्वार्थी लोकांनी माजविलेली ढोंगे आहेत, ती नष्ट करून त्यांमुळे निर्माण झालेले वर्गही नष्ट केले व वर्गविहीन समाज केला तर मानवाची प्रगती होईल अन्यथा होणार नाही, असे सिद्धान्त रशियात सांगितले जातात. त्याचप्रमाणे फ्रेंच, जर्मन, इटालियन, असले राष्ट्रवार विभाग करणे चूक असून भांडवलदार व कामगार असे जगात दोनच वर्ग असतात, तेव्हा जगातल्या कामगारांनी राष्ट्रविचार मनात न आणता सर्वांनी एक झाले पाहिजे असा विचार तेथे सांगितला जातो. हे सर्व रशियाचे तत्त्वज्ञान आहे. फ्रेंच राज्यक्रान्तीच्या आधी, राजशाही, जन्मजात उच्चनीचता हे तत्त्वज्ञान प्रचलित होते, तर राज्यक्रान्तीने समता, बंधुता, स्वातंत्र्य हे तत्त्वज्ञान प्रचलित केले व ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. फ्रेंच राष्ट्राचे आजही तेच तत्त्वज्ञान आहे.
 साधारणतः प्रत्येक राष्ट्राचे असेच काही तरी तत्त्वज्ञान ठरलेले असते आणि त्यातील सिद्धान्ताप्रमाणे त्याचा अर्थ ज्याला जसा समजेल त्याप्रमाणे- त्या देशातील बहुजनसमाज वागत असतो. हे तत्त्वज्ञान म्हणजे राष्ट्राच्या उत्कर्षासंबंधी त्या त्या देशातील तत्त्ववेत्त्यांनी स्वतःच्या समजुतीप्रमाणे ठरविलेले सिद्धान्तच असल्यामुळे त्या तत्त्वज्ञानावर राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते असे म्हणण्यास चिंता नाही. अर्थात बहुजनसमाज जोपर्यंत त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागत आहे तोपर्यंतच ते तत्त्वज्ञान निर्णायक ठरणार हे उघड आहे. पुष्कळ वेळा माणसे ग्रंथात किंवा बुद्धिवादात एक तत्त्वज्ञान मान्य करून आचारात अगदी भलतेच तत्त्वज्ञान अनुसरत असतात. अशा वेळी हा विचार अर्थातच फोल ठरेल. पुष्कळ वेळा दोन राष्ट्रांचे तत्त्वज्ञान एकच असून माणसांची त्यावरील निष्ठा कमी- अधिक प्रमाणात तीव्र असते. त्यामुळेही राष्ट्राच्या भवितव्यात फरक पडत जातो. या सर्व मर्यादा ध्यानात घेणे अवश्यच आहे. पण त्या घेऊनही एवढा विचार निश्चित उरेल की, ज्या अनेक गोष्टींवर राष्ट्राचा उत्कर्षापकर्ष अवलंबून असतो त्यांत तत्त्वज्ञान ही प्रधान गोष्ट आहे.
 माणसे कार्याकार्य ठरविताना स्वतःची बुद्धी वापरतात का सर्वस्वी धर्मग्रंथाच्या आहारी जातात यावर राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे हे मान्य केलेच पाहिजे. उच्चनीचता जन्मावर आहे की गुणावर आहे यासंबंधी जो सिद्धान्त राष्ट्राने अंगीकारलेला असेल त्यावर त्याची उन्नती- अवनती काही अंशी अवलंबून राहाणारच. 'व्यक्तीचे हक्क' या कल्पनेचे फाजील स्तोम माजविलेले असेल किंवा व्यक्तीला मुळात हक्कच नाहीत, ती सर्वस्वी समाजासाठी आहे. ही कल्पना फार मूळ धरून असेल, तर त्याप्रमाणे समाजाला वळण लागल्यावाचून राहाणार नाही. माणसांची निष्ठा, कर्तृत्व, कुशल नेत्याची जोड मिळणे, आर्थिक स्थिती इत्यादी इतर अनेक घटक हे आपापल्यापरी निर्णायक होतातच- पण या निर्णायक घटकांत त्या त्या राष्ट्राने अंगीकारलेले तत्त्वज्ञान हा एक घटक निश्चित् आहे हे मान्य केले पाहिजे.
 राष्ट्राच्या भवितव्यनिर्णयात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले असे जे तत्त्वज्ञान त्या तत्त्वज्ञानाचे आपल्या भरतभूमीत महाभारतकाळी काय रूप होते ते प्रस्तुत प्रबंधात सांगावयाचे आहे. सध्या या भूमीला फार दुर्गती प्राप्त झालेली आहे. तेव्हा इतर अनेक कारणांबरोबर तिने पत्करलेल्या तत्त्वज्ञानात फार अपसिद्धांत असले पाहिजेत असे अनुमान करण्यास तरी हरकत नाही. आणि याच दृष्टीने जो काळ या भूमीला अत्यंत वैभवाचा, भाग्याचा, उत्कर्षाचा व दिगंत कीर्तीचा असा होऊन गेला त्या काळचे तत्त्वज्ञान सध्याच्यापेक्षा श्रेष्ठ असले पाहिजे असा विचार मनात आल्यास त्याला या मीमांसेत स्थान प्राप्त व्हावे यात काही अनुचित नाही. आणि अशा विचाराने आपण महाभारत हा आपला राष्ट्रीय ग्रंथ उचलून घेऊन त्याचे अध्ययन करू लागलो तर आपले अनुमान अगदी योग्य असून त्या वेळचे तत्त्वज्ञान समाजाच्या उन्नतीला सर्वथा उपकारक, अत्यंत उदात्त व पराक्रम, विजिगीषुवृत्ती, यांना प्रेरणा देऊन राष्ट्राला यश, वैभव व कीर्ती प्राप्त करून देण्यास समर्थ असेच होते असे आपल्या ध्यानात येते.
 समाजाला वैभवाला नेण्यास समर्थ असे हे तत्त्वज्ञान महाभारतात सापडते यामुळे त्याला विशेषच महत्त्व प्राप्त होते. महाभारत, हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. या भरतखंडाच्या चारी सीमांच्या आत असा एकही हिंदुसमाज, जाती किंवा व्यक्ती सापडणार नाही की जिच्यावर महाभारतातील विचारांचा, तत्त्वज्ञानाचा, धर्ममतांचा, कथांचा संस्कार झालेला नाही. वेद, उपनिषदे हे थोर ग्रंथ या भूमीतलेच आहेत. त्यांचा महाभारता- इतकाच अभिमान येथले पंडित बाळगतात. पण ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय ग्रंथ होऊ शकणार नाहीत. कारण समाजातील सर्व वर्ण, सर्व जाती, सर्व स्त्री-पुरुष, सर्व बाल-तरुण-वृद्ध महाभारताच्या कक्षेत जसे येतात तसे त्या ग्रंथांच्या कक्षेत येत नाहीत. महाभारताचे संस्कार हिंदुमात्राच्या आचारात, विचारात, गृहव्यवस्थेत नीतीच्या कल्पनेत, खाजगी वर्तनात, जाहीर वर्तनात, रक्ताच्या बिंबूबिंदूमध्ये सापडतील. यातच त्या ग्रंथाची थोरवी आहे आणि म्हणूनच तो राष्ट्रीय ग्रंथ आहे.
 आणि हे भारतीय तत्त्वज्ञानाचे व भारतीय तत्त्ववेत्त्यांचे संस्कार थोडीथोडकी नव्हे तर आज दोन हजार वर्षे आमच्या मनावर होत आहेत. प्रत्यक्ष भारतीय युद्ध इ. स. पूर्वी ३१०१ या वर्षी झाले. त्या सुमारास प्रथम वेदव्यासांनी 'जय' नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात फक्त भारतीय युद्धाचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर त्यांचा शिष्य वैशंपायन याने बहुधा त्यांच्या सान्निध्यातच, त्या जय ग्रंथात सर्व भरतकुळाचा इतिहास घालून तो ग्रंथ २४००० श्लोकांपर्यंत वाढविला व त्याला 'भारत' असे नाव दिले. त्यानंतर जवळ जवळ अडीच हजार वर्षांनी म्हणजे सुमारे इ. स. पू. २५० वर्षे याकाली लोमहर्षण नावाच्या महापंडिताने त्या ग्रंथात त्याच्या काळचे अनेक तत्त्वज्ञानाचे पंथ, धर्मपंथ, नीतितत्त्वे, थोर पुरुषांच्या कथा यांची सुमारे ७५००० श्लोकांची भर घालून सध्याचे रूप त्या ग्रंथाला देऊन 'महाभारत' असे त्याचे नामकरण केले. या रूपात आल्यानंतर दोनतीनशे वर्षांच्या अवधीतच हा ग्रंथ सर्व भरतखंडात पसरून मान्यता पावला. इ. स. ५० या सुमारास इकडे आलेल्या एका डायन क्रायसोस्टोम नावाच्या ग्रीक प्रवाशाने या लक्षश्लोकी ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे. हा ग्रंथ त्याला पांड्य, केरल या मद्रास इलाख्यातील दक्षिणेकडच्या राज्यात आढळला. यावरून आज दोन हजार वर्षे हा ग्रंथराज भरतखंडातील या भूमीच्या पुत्रांच्या मनांवर अधिराज्य गाजवीत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. यानंतरच्या काळात भरतखंडातील भिन्न प्रांतांत अनेक थोर पुरुष होऊन गेले. त्यांनी पराक्रमही केले आणि त्यांतील तत्त्ववेत्त्यांनी थोर असे ग्रंथही लिहिले, पण अखिल भारतीय अधिराज्य त्यांतील कोणालाच प्राप्त झाले नाही. म्हणूनच राष्ट्रीय दृष्टीने विचार करता भारतीयांनी महाभारताचे महत्त्व फारच मानले पाहिजे. माणूस त्रिचनापल्लीचा असो, काश्मीरचा असो, सिंधमधील असो की आसाममधील असो, तेलगू, तामीळ ही त्याची मातृभाषा असो की हिंदी किंवा बंगाली असो, त्याला महाभारताबद्दल सारखाच जिव्हाळा वाटतो. हे भिन्न प्रांतीय व भिन्नभाषी लोक एकत्र आले तर त्यांना सर्वांना एकजीव करणारा पुरुष म्हणजे श्रीकृष्ण हाच आहे आणि त्यांचे भीम, अर्जुन, अभिमन्यू हेच शौर्याचे आदर्श आहेत. या व्यक्तींच्या स्मृति अजूनही इतक्या उज्ज्वल व प्रभावी आहेत की, यांच्या स्मरणाने आजही अगदी दूरच्या प्रांतातील भारतीयांना एकमेकांच्याजवळ आल्यासारखे वाटते.
 असा हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे एक काल्पनिक कथांचे भारूड नसून एक जिवंत इतिहासग्रंथ आहे ही विशेष भाग्याची गोष्ट आहे. महाभारतात अनेक अद्भुत, अमानुष, दैवी अशा घटना वर्णिलेल्या आहेत. आणि त्या वातावरणात इतरही कथा सापडून दूषित झाल्या आहेत. पण या कथा वगळल्या, व इतर कथांवर आलेले पटल दूर करून आपण जाणत्या दृष्टीने न्याहाळून पाहू लागलो की कठोर तर्कदृष्टीला पटणारा, वाटेल त्या कसोठीला उतरणारा, प्रमाणांनी सिद्ध होणारा असा शुद्ध इतिहास आपल्या हाती लागतो.
 पुष्कळ वेळा राष्ट्रामध्ये सद्गुणसंवर्धन व्हावे म्हणून तेथील तत्त्ववेत्ते अनेक प्रकारच्या काल्पनिक कथा रचून त्यांचा प्रसार करतात. सत्याने वागल्यास शेवटी सुख निश्चित मिळते, परमेश्वराची भक्ती केली तर तो भक्ताच्या कुटुंबीयांना अंतर देत नाही, परोपकार करणाराला नेहमी उत्तम लोक प्राप्त होतो, नीच वर्तन करणारास त्याचे प्रायश्चित्त मिळाल्याखेरीज रहात नाही इत्यादी तत्त्वे बहुजन समाजाला कळावी व त्याने ती आचरावी म्हणून अनेक प्रकारच्या कथा रचल्या जातात व त्यांत तशी तशी बरीवाईट फळे परमेश्वराने दिली अशी वर्णने केलेली असतात. आपल्या पुराणांतल्या अनेक कथा व संतवाङ्मयातल्या कथा याच जातीच्या आहेत. सद्गुण- संवर्धनासाठी रचलेल्या त्या काल्पनिक व अद्भुत अशा कथा आहेत. महाभारतातील कौरवपांडवांच्या, श्रीकृष्णाच्या कथाही अशा काल्पनिक कथा आहेत असे रमेशचंद्र दत्त, वेबरप्रभृती काही पंडितांचे मत आहे.
 भारतातील या कथांवर स्वप्नातही करणे अशक्य असा जर एखांदा आरोप असेल तर हा होय. नीतितत्त्वांच्या प्रसारासाठी काही तरी काल्पनिक लिहावयाचे असते तर व्यासांनी द्रौपदीला या सर्व आख्यानाची नायिका केली नसती. पाच पतींना वरणारी, भर सभेत परपुरुषाच्या स्पर्शाने दूषित होणारी अशी ही स्त्री सद्गुणसंवर्धनासाठी निर्माण केली आहे असे म्हणणे म्हणजे अर्थाचा अनर्थ करण्यासारखे आहे. द्रौपदीची भारतातील स्वभावरेखा ही एक दिव्य व अलौकिक रेखा आहे. अरण्यात पतीबरोबर कष्ट सहन करण्यात तिने दाखविलेले धैर्य, तिच्या बोलण्यातून दिसून येणारी तिची बुद्धिमत्ता व विवेचक दृष्टी, तिची पतिनिष्ठा या सर्व गुणांनी ही मानिनी कोणी शापभ्रष्ट देवता आहे असे वाटते. असे हे स्वभावचित्र जर काल्पनिक असते तर लेखकाने तिच्या अंगी वरील वैगुण्ये चिकटविली नसती. पण त्यांचाही त्याने उल्लेख केला आहे यावरूनच ही कृती काल्पनिक नसून ऐतिहासिक आहे या म्हणण्यात शंका राहात नाही. सद्गुणांच्या गोष्टींत मध्यंतरी संकटे आली तरी शेवटी सर्व गोड झाले असे दाखविणे अवश्य असते. एरवी माणसे कोणत्या विलोभनाने सद्गुणांचे आचरण करणार? पण येथे काय प्रकार आहे ? या स्त्रीला अंती फल काय मिळाले ? तिचे पाचही पुत्र शत्रूने चिरून टाकले, भावाला यज्ञीय पशूसारखा बुकलून ठार मारला आणि पुढे सगळा निर्वंश होण्याची पाळी आली.
 नीतिबोधांच्या चौकटीत स्वतः श्रीकृष्णाचे चरित्रसुद्धा बसणार नाही. या वीराने कंसाचा वध केला येथवर ठीक आहे. पण पुढे त्यानेच आपली फजिती कशी झाली त्याचे जे वर्णन केलेले आहे ते त्याच्या देवपणाशी अगदीच विसंगत आहे. जरासंधाच्या पराक्रमाचे धर्मराजाजवळ वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणाला, 'युधिष्ठिरा, जरासंधाने भोजकुलातील सर्व क्षत्रियांची राज्यलक्ष्मी हरण केलेली आम्ही पाहिली. आणि त्याच्या भयाने आम्ही मथुरा देश सोडला व द्वारकेस पळून गेलो. आमची एकंदर अठरा राजकुले होती. पण आमच्या असे ध्यानात आले की, आम्ही सर्व आपल्या सर्व सामर्थ्यानिशी जरासंधाशी तीनशे वर्षे जरी झुंजलो तरी त्याचा पराभव होणार नाही. तेव्हा घाबरून जाऊन आम्ही पश्चिमेस पळून गेलो व द्वारका नगरी बसविली. तेथे भक्कम दुर्ग बांधले व पुत्रकलत्रासह तेथे राहिलो, तेव्हा आम्ही निर्भय झालो.'
 कल्पनेने निर्माण केलेल्या अद्भुत दैवी पुरुषाला हे बोलणे कसे शोभेल ! श्रीकृष्णाचा अंतही सद्गुणांच्या फळाला शोभेसा झाला नाही. शेवटी यादववीर त्याच्या आज्ञेत राहीनासे झाले, खुद्द त्याचा पुत्र प्रद्युम्न व सेनापती सात्यकी हे मद्य पिऊन उन्मत्त झाले, म्हणून श्रीकृष्ण अरण्यात निघून गेला. तेथे एका व्याधाच्या बाणाने त्याला मृत्यू आला. त्यानंतर त्याच्या स्त्रियांची फारच विटंबना झाली. अर्जुन त्यांना घेऊन हस्तिनापुरास जात असताना त्या स्त्रियांना रानटी लोकांनी पळवून नेले व काही स्त्रिया स्वखुषीने त्यांच्याबरोबर गेल्या. अर्जुन एवढा पराक्रमी पण त्याचे काही चालले नाही. हा हृदयद्रावक शेवट कोणचा नीतिबोध करण्यास समर्थ आहे. या घटना म्हणजे कठोर सत्ये आहेत. भूतार्थ आहेत. मृत्युलोकीची जाणीव करून देणाऱ्या त्या इंगळ्या आहेत. ती सद्गुणाचरणाची रम्य विलोभने मुळीच नाहीत
 महाभारतात अशा अनेक कथा आहेत. खुद्द व्यासांचा जन्म, द्रोण, कश्यप इत्यादी व्यक्तींचे जन्म, अभिमन्यूचा मृत्यू, पांडवांची विजयानंतरची स्थिती, कुंती-रुक्मिणी या स्त्रियांची अंतकाळची स्थिती या घटना इतिहास म्हणूनच स्वीकारल्या पाहिजेत. भारतीय लेखक मोठे निर्भय पुरुष होते. काही तरी गुलाबी कथा सांगून लोकांची दिशाभूल करावी असा त्यांचा मुळीच हेतू नव्हता. कठोर सत्यानेच समाजाची प्रगती होत असते, सत्य इतिहास हीच समाजाची ठेव आहे, हे ते जाणून होते. त्या काळच्या लोकस्थितीला अनुसरून स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादेप्रमाणे त्यांनी काही काल्पनिक कथाही आपल्या ग्रंथात गोवल्या असल्या तरी त्यामुळे सर्वच कथा तशा आहेत असे म्हणणे सर्वथैव प्रमाणशून्य आहे. मूळ कथा शुद्ध स्वरूपात पाहिली तर तो इतिहास आहे याविषयी लेखकाच्या मनात बिलकुल संदेह नव्हता असे दिसते व म्हणूनच तो आपल्या मनात राहू देणे हे योग्य नाही.
 अशा या इतिहासग्रंथातले जे तत्त्वज्ञान पुढे सांगावयाचे आहे त्याचा प्रणेता म्हणजे प्रख्यात भारती पुरुष श्रीकृष्ण हा होय. महाभारताला कार्ष्ण (श्रीकृष्णाचा) वेद म्हणतात ते अगदी यथार्थ आहे. श्रीकृष्णाइतका प्रगल्भ बुद्धीचा, कर्तृत्वशाली, प्रज्ञावंत, व्यवहारकुशल, ज्ञानी व पराक्रमी पुरुष अजूनही साऱ्या त्रिभुवनात झाला नाही असे म्हटले तर, ज्याने महाभारत स्वतः वाचले आहे अशा माणसाला, मुळीच अतिशयोक्ती वाटणार नाही. हा जसा तत्त्ववेत्ता होता तसाच कर्ताही होता, ध्येयवादी होता तसाच व्यवहाराच्या व ध्येयाच्या मर्यादा जाणण्यात चतुर होता, सत्यनिष्ठेचा तो जसा उपदेश करी तसाच कुटिल राजनीतीचाही करी, आणि तो संसारप्रिय होता तसाच संयमी योगेश्वरही होता. सारांश, प्राचीन भारती संस्कृती म्हणजेच श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजेच प्राचीन भारती संस्कृती असे अनन्वयाने बोलणे सर्वथैव युक्त आहे.
 भारतीय तत्त्वज्ञान म्हणून जे विवेचन आता पुढे यावयाचे आहे त्यात महाभारतातील धर्मकारण, समाजकारण, व्यवहारनीती व प्रवृत्तिधर्म या विषयांवरील अनेक पुरुषांचे विचार संकलित करून दिलेले आहेत. श्रीकृष्णाचे विचार तर यात आहेतच पण त्याशिवाय भीष्म, नारद, पराशर, मार्कंडेय, धर्म, अर्जुन, भीम, कुंती, द्रौपदी, विदुला, इत्यादी अनेक थोर व्यक्तींनी वरील विषयांवर सांगितलेले विचार दिलेले आहेत. आणि हे आग्रहाने प्रतिपादन करण्यामध्ये हेतू असा आहे की, समाजाच्या धारणेला व उत्कृर्षाला अत्यंत पोषक असेच हे तत्त्वज्ञान आहे, हे सध्याचा हिंदुसमाजाच्या निदर्शनास आणावे. माझे तर स्पष्ट असे मत झाले आहे की, हे भारतीय तत्त्वज्ञान या भारती समाजाने दृष्टी आड केले नसते तर त्यांचा अधःपात झालाच नसता. आणि आजही त्यातले प्रत्येक तत्त्व अनुकरणीय म्हणून मी सांगणार नसलो तरी त्यातील मूळ गाभा हा जशाच्या तसा समाजापुढे समाजधारणेचे शास्त्र म्हणून ठेवण्यास काहीच प्रत्यवाय नाही.
 धर्मशास्त्र, समाजकारण, व्यवहारनीती व प्रवृत्तिधर्म या विषयांसंबंधी जे विचार 'भारतीय तत्त्वज्ञान' म्हणून पुढे दिले आहेत त्याशिवाय अन्य विचार महाभारतात नाहीत असे नाही. पुष्कळ ठिकाणी येथे सांगितलेल्या विचारांच्या उलट असेही विचार महाभारतात सापडतात. असे असताना हेच तत्त्वज्ञान म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असा आग्रह का धरावा असा प्रश्न येईल. त्याचे समाधान असे की, एक तर मी जे तत्त्वज्ञान सांगणार आहे ते सर्व प्रपंचाविषयीचे विज्ञान आहे आणि ऐहिक वैभवाचा परमोत्कर्ष साधला तरच निःश्रेयसप्राप्ती होते असा महाभारताचा प्रमुख सिद्धांत आहे. तेव्हा या विचाराविरुद्ध असे विचार भारतात कोठे आले तर ते त्या त्या व्यक्तीचे म्हणून ठरतील. त्यांना भारतीय विचार म्हणता येणार नाही. दुसरे असे की, प्रपंचाचा अभिमान धरून, म्हणजे मुख्य सिद्धांत मान्य करून ज्यांनी ज्यांनी तत्त्वज्ञान सांगितले आहे त्यांच्या भाषणांत पुढे दिलेल्या विचारांना विरोधी अशी वचने फार थोडी सापडतील. अगदी एकांतिक मोक्षवादी माणसांची गोष्ट निराळी. ही दोन कारणे झाली. पुढील तत्त्वज्ञान हेच भारतीय तत्त्वज्ञान असे म्हणण्याचे तिसरे व प्रधान कारण हे की श्रीकृष्णाचे जे तत्त्वज्ञान ते हेच आहे. महाभारतात अनेक मतांचे प्रतिपादन जरी असले तरी त्या वेदाचा आद्य प्रणेता जो श्रीकृष्ण त्याची राजमुद्रा ज्या मतावर असेल तेच तत्त्वज्ञान 'भारतीय' या पदवीस योग्य होय, असे म्हटल्यास त्यावर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही. पहिली दोन कारणे आहेतच. पण विशेषतः या तिसऱ्या कारणामुळे हे तत्त्वज्ञान म्हणजे 'भारतीय तत्त्वज्ञान' होय असे आग्रहाने म्हटले आहे.
 हे श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान अत्यंत तर्कशुद्ध, अनुभवसिद्ध व राष्ट्रहितांला अत्यंत पोषक असे असल्यामुळे हिंदुमात्राने याचे अहोरात्र मनन व चिंतन करून त्यातील सारार्थ ध्यानात घ्यावा यातच या समाजाचे कल्याण आहे.

धर्मकारण

 पांडव वनवासास गेल्यावर त्यांची स्थिती मोठी विकल झाली. इंद्रासारखे हे पराक्रमी योद्धे सर्व राजैश्वर्य सोडून वल्कले, नेसून, कंदमुळे खाऊ लागले आणि झाडाखाली पालापाचोळ्यावर पडू लागले. ते पाहून द्रौपदींचे मन अगदी दुभंगून गेले आणि धर्मा- धर्मासंबंधी फारच मोठ्या शंका तिच्या मनात निर्माण होऊ लागल्या. सत्यनिष्ट, पुण्यशील, सदाचरणी अशा धर्मराजाला अरण्यवास आणि कपटी, अधम अशा दुर्योधनाला राज्यलक्ष्मी या घटनेत काही तरी अधर्म असला पाहिजे असे तिला वाटू लागले. आणि दुर्योधनाने जर अन्यायाने राज्याचे अपहरण केले आहे तर आपली प्रतिज्ञा मोडूनही, सत्यनिष्ठा सोडूनही, आपण आपले राज्य परत घ्यावे, वनात राहू नये असे ती धर्मराजाला सांगू लागली. भीम, अर्जून यांनीही युधिष्ठिराच्या धर्मवेडाचा उपहास करून द्रौपदीच्या म्हणण्यास पाठिंबा दिला आणि अन्यायाने हिरावून नेलेली राज्यलक्ष्मी बाहुबलाने परत जिंकून घेणे हाच खरा क्षत्रियाचा धर्म आहे, वनात राहाणे हा भेकडपणा आहे असे त्यास सांगितले.
 पण धर्मराजाला हे मुळीच मानवले नाही. त्याने आपली पत्नी व बंधू यांस स्पष्टपणे सांगितले, 'मी माझी प्रतिज्ञा कधीच मोडणार नाही हे पक्के समजा. मोक्षाचा अथवा प्रत्यक्ष जीविताचाही त्याग करावा लागला तरीही मी सत्यरूप धर्माचा स्वीकार करणार. कारण राज्य, पुत्र, कीर्ती, द्रव्य यांना सत्याच्या एका षोडशांशाची सुद्धा सर यावयाची नाही.' (वन अ. ३४)
 धर्माच्या या भाषणावर त्या भावाभावांत खूप चर्चा, नव्हे खडाजंगी झाली. त्यांच्यापुढे खरोखरच मोठा बिकट व गहन प्रश्न येऊन पडला होता. धर्माची, सत्याची प्रतिज्ञापालनाची किंमत तरी किती ? राज्य गेले, कीर्ती गेली, जीव गेला आणि मोक्षही गेला तरी सत्याचरण करावयाचे की काय ? आणि करावयाचे असेल तर ते कशासाठी? सत्य हेच साध्य आहे, धर्म हेच साध्य आहे, का धर्म या साधनांनी आणखी काही साध्य प्राप्त करून घ्यावयाचे आहे ?
 असले प्रश्न पांडवांना व द्रौपदीला फार त्रास देऊ लागले. या प्रश्नांनी त्यांनाच फक्त त्रास दिला असे नाही. अरण्यात पांडवांना बलराम भेटावयास आला तेव्हा त्यांची ती हीन स्थिती पाहून त्याचेही मन व्याकुळ झाले. तो श्रीकृष्णाला म्हणाला, "कृष्णा, धर्माचरण करणे हे प्राण्याच्या अभ्युदयाचे अथवा अधर्माचरण हे अपकर्षाचे कारण नाही असे म्हणावे लागते. कारण या धर्माचा आश्रय केला असताही महात्म्या युधिष्ठिरांस जटाधारी बनून आणि बल्कले नेसून वनात राहून क्लेश भोगावे लागत आहेत आणि दुर्योधन हा पृथ्वीचे राज्य करीत आहे तरी तो अधर्माने वागत आहे म्हणून काही पृथ्वी दुभंगून जाऊन त्याला गडप करीत नाही यामुळे ज्या मनुष्याची बुद्धी मंद आहे त्याला धर्मापेक्षा अधर्माचेच आचरण करणे अत्यंत श्रेष्ठ होय असे वाटू लागेल हे साहजिक आहे. दुर्योधन सुख भोगत आहे व धर्म दुःख भोगत आहे यामुळे लोकांनी धर्म व अधर्म यांपैकी कोणाचे आचरण करावे अशी मनुष्यांना शंका उत्पन्न झाली आहे." (वन. अ. ११९)
 बलरामांच्या या भाषणावरून धर्माला काहीतरी ध्येय असले पाहिजे, त्याच्या आचरणाने अभ्युदय झाला पाहिजे, तरच त्या आचरणाला काही अर्थ आहे असे त्यास वाटत होते असे दिसते. एखाद्या वेळेस विपरीत दिसताच धर्म सोडून देणे हे मंदबुद्धीचे लक्षण आहे हे म्हणणे योग्य आहे. पण जर अभ्युदय नाही तर धर्माचरण कशाला करावे अशी शंका येणे साहजिक आहे असे तो ज्याअर्थी म्हणतो त्याअर्थी अभ्युदय हे धर्माचे प्राप्तव्य असले पाहिजे असा त्याचा अभिप्राय आहे असे दिसते.
 महाभारतात धर्माधर्मनिर्णयाचे असे अनेक प्रसंग निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रसंगी श्रीकृष्ण, भीष्म, पराशर, व्यास, धर्म, भीम, अर्जुन इत्यादी विचारवंतांनी आपले विचार प्रगट केले आहेत. त्यावरून धर्मासंबंधी, त्याच्या स्वरूपासंबंधी, शाश्वततेसंबंधी आपल्याला महाभारताचे मत काय आहे याचा निर्णय करणे सहज शक्य होते. तो प्रयत्न आता करावयाचा आहे.

धर्म हे समाजोन्नतीचे साधन

 भारती तत्त्ववेत्त्यांचा पहिला सिद्धांत असा आहे की धर्म हे साध्य नसून साधन आहे. आणि समाजाची उन्नती हे त्याचे साध्य आहे. आणि ज्यामुळे समाजाची उन्नती होईल तोच धर्म होय अशी त्यांनी धर्माची व्याख्या केली आहे. युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्मांनी पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे. “ युधिष्ठिरा, सत्य भाषण करणे हेच उत्तम होय. कारण सत्याहून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही. तथापि, हे भारता, याविषयीच जे ज्ञान होणे अवश्य आहे ते मी तुला सांगतो, ऐक. ज्या प्रसंगी सत्याचा असत्यासारखा उपयोग होत असेल व असत्याची योग्यता सत्यासारखी असेल त्याप्रसंगी, जरी सत्य असले तरी ते न बोलता असत्यच भाषण केले पाहिजे. ज्याला सत्य कोणते याविषयीचा निर्णय झालेला नाही, तो मनुष्य केवळ अज्ञानी होय. सत्य व असत्य या दोहोंविषयीचा सिद्धांत ठरविल्यानेच मनुष्य धर्मज्ञ होतो. सत्यभाषणरूप धर्म घडावा म्हणून कौशिक नावाच्या एका तापसाने चोरट्या लोकांना त्यांच्या भीतीने लोक कोणत्या दिशेने पळून गेले होते ते सांगितले. असला हा पुरुष खरा धर्मवेत्ता नव्हे. कारण त्याच्या सत्य भाषणामुळे अनेक लोकांचा घात झाला. हा प्रश्न असा आहे की, यात धर्म कोणता व अधर्म कोणता याची निवड करणे कठीण आहे; याविषयी निश्चय कसा करावा ? अर्थात हे ठरविणे अशक्य आहे. तथापि, लोकांच्या अभ्युदयासाठीच धर्म सांगितलेला आहे. ह्यामुळे ज्याच्या योगाने लोकांचा अत्यंत उत्कर्ष होईल तोच धर्म होय, असा सिद्धांत आहे. धर्म शब्दाचा अर्थ धारण करणे असा आहे. सर्व लोकांना धर्माचेच अवलंबन असल्यामुळे धर्मानेच त्यांना धारण केले आहे. म्हणूनच ज्याच्या योगाने लोकांचे धारण होईल तो धर्म, असा सिद्धांत आहे." (शांति. १०९). धर्म हे साध्य नव्हे साधन आहे असे विचार भीमानेही सांगितले आहेत. अरण्यात असताना तो एकदा युधिष्ठिराला म्हणाला, "हे भरतवंशजा, आम्ही तुझे शास्त्र ऐकत बसलो आणि धृतराष्ट्राच्या पुत्रांना त्याच वेळी ठार केले नाही या दुष्कृत्यामुळे आम्हांला ताप भोगावा लागत आहे. हे राजा, तू 'धर्म धर्म' म्हणत सदैव व्रते करीत बसला आहेस. तुला स्वतःला प्राप्त झालेल्या या वनवासरूपी पशुवृत्तीकडे तरी लक्ष दे. या वृत्तीचे अवलंबन समर्थ लोक करीत नाहीत, दुबळे लोक करतात. ऐश्वर्य संपादन करण्यास असमर्थ असणारे निंद्य लोकच स्वर्गाचा विघात करणाऱ्या या वैराग्यावर प्रेम करतात. राजा जो धर्म मित्रांच्या आणि आपल्याही अपकर्षास कारण होतो तो धर्म नसून प्रत्यक्ष दुःख अथवा अधर्माचे बीज होय. मनुष्य सदोदित इतर पुरुषार्थांचा त्याग करून धर्माचरण करू लागला म्हणजे तो, धर्म अर्थसाध्य असल्यामुळे, धर्माचरणाविषयी असमर्थ बनतो आणि असे झाले म्हणजे धर्म व अर्थ हे दोन्ही पुरुषार्थ त्या पुरुषाचा त्याग करतात. ज्याचा धर्म केवळ धर्माकरताच आहे तो शहाणा नव्हे. त्याच्या कपाळी नेहमी दुःखच येणार." (वन.अ. ३३) यावर युधिष्ठिराने नेहमीप्रमाणे, 'मला सत्यापेक्षा काही श्रेष्ठ चाटत नाही.' असेच उत्तर दिले. दुसऱ्या एका प्रसंगी सात्यकीलाही त्याने, 'तू म्हणतोस त्याप्रमाणे खरे असले तरी मला सत्यव्रताचे अत्यंत पालन करावयाचे आहे, राज्याचे करावयाचे नाही' असे उत्तर दिले व यादववीर दुर्योधनाला ठार मारण्यास उद्युक्त झाले असता, तुम्ही धर्मामध्ये केव्हाही प्रमाद होऊ देऊ नका.' असे त्यांना विनविले. (वन.अ. १२०).
 अशा तऱ्हेने तो निक्षून बोलत असला तरी त्याच्या मनातही पुष्कळ वेळा डळमळ चालत असे. आपली दीन स्थिती ध्यानात येऊन, आपल्या प्रिय पत्नीची वनवासात चाललेली विटंबना पाहून त्याचे मन चलित होई व आपल्या 'सत्याकरिता सत्य' या व्रतात कितपत अर्थ आहे अशा शंकेने त्याचेही मन ग्रस्त होत असे व मग आपल्याला यात कोणी तरी पाठिंबा द्यावा असे त्याला वाटू लागे. म्हणून एके प्रसंगी त्याने लोमश ऋषींना ते अरण्यात भेटावयास आले असता प्रश्न केला. तो म्हणाला, 'हे देवर्षिश्रेष्ठा, माझ्या अंगी मुळीच गुण नाहीत असे वाटत नाही. तथापि, दुसरा कोणीही राजा दुःखसंतप्त नसेल इतका मी दुःखाने गांजलो आहे. आणि आमचे शत्रू दुर्गुणी आहेत इतकेच नव्हे तर ते धर्माप्रमाणे वागतही नाहीत, असे मला वाटते; तरी पण हे लोमशा त्यांची या जगतामध्ये भरभराट होते, ह्याचे कारण काय ?' (वन.अ. ९४).
 युधिष्ठिराच्या या प्रश्नावरून धर्माचरणामुळे अभ्युदय झाला पाहिजे आणि आपला तसा होत नाही हे विपरीत आहे, असे त्यास वाटत होते, हे निश्चित दिसते. अभ्युदय होतो असे दिसत नसले तर लगेच धर्म सोडावा असे त्याने केले नाही हे खरे; पण हे काही तरी चुकत आहे असे त्यासही वाटत होते असे दिसून येते. युधिष्ठिराच्या प्रश्नाला देवर्षी लोमश यांनी जे उत्तर दिले त्यावरून धर्म हे साधन आहे व समाजाच्या उत्कर्षासाठीच त्याची उत्पत्ती आहे हे त्यांनाही मान्य होते, असे दिसून येईल. थोडा वेळ फलप्राती दिसेनाशी झाली तर लगेच धर्म सोडू नये. एवढी सूचना त्यांनी केली आहे इतकेच. लोमश म्हणाले, 'हे कुंतीपुत्रा, अधर्माच्या योगाने प्रथम काही काळ मनुष्याचा अभ्युदय होतो. नंतर थोडा वेळ त्यास आपले कल्याणही झालेले पाहावयास सापडते. पुढे तो शत्रूसही जिंकतो. पण शेवटी मात्र समूळ नष्ट होऊन जातो. उलट धर्माचरणी मनुष्य प्रारंभी जरी कष्ट भोगत असला तरी अंती त्याला सुख प्रात होते.'
 धर्माधर्मासंबंधी धर्मव्याधानेही असेच विचार एके ठिकाणी सांगितलेले आढळतात. आपल्याकडे आलेल्या ब्राह्मणाला धर्म व्याध म्हणाला, ‘धर्मांचे ज्ञान अत्यंत सूक्ष्म असून त्याच्या अपार अशा अनेक शाखा आहेत. प्राणांतिक प्रसंगी व विवाहाच्या ठिकाणी असत्य भाषण करणे भाग पडते. त्या वेळी असत्य भाषण केल्यानेच सत्य भाषण केल्याचे व सत्य भाषण केल्याने असत्य भाषण केल्याचे फळ मिळते. कारण जे प्राण्यांना अत्यंत हितकारक असेल तेच सत्य होय असा निश्चय आहे. यद्भूतहितमत्यंतं तत् सत्यमितिधारणा ॥' (वन.अ. २०९.४ )
 धर्म हे साधन आहे, साध्य नव्हे आणि समाजाच्या उत्कर्षासाठी त्याची प्रवृत्ती झालेली आहे असा जो भारती सिद्धांत तो अनेकांच्या मुखाने वर सांगितलाच आहे. आता श्रीकृष्णाने हाच विचार कसा विशद करून दाखविला आहे ते सांगतो.
 भारतीयुद्ध चालू असताना एकदा युधिष्ठिराला कर्णाने बाणांचा वर्षाव करून अगदी घायाळ करून टाकले व त्यामुळे त्याला रणातून पळून शिबिराकडे यावे लागले. ही बातमी ऐकून अर्जुनाला चिंता वाटू लागली व युधिष्ठिराचे कुशल विचारण्यासाठी तो रणांगण सोडून शिबिरात आला. धर्मराज कर्णावर अगदी चिडून गेला होता व त्याच्या सूडासाठी जळत होता. अर्जुन त्याला मारून शिबिरात आला असेल असे वाटून तो त्याचे अभिनंदन करू लागला. पण तसे झालेले नाही, कर्ण अजून जिवंतच आहे असे त्याला कळल्यावर निराशेने त्याचे मन भडकून गेले व त्याने अर्जुनाची अतिशय निर्भर्सना केली व 'तुझ्या हातून पराक्रम होत नाही तर तुझे धनुष्य ठेवलेस कशाला, ते दुसऱ्याला देऊन का टाकीत नाहीस !' असे तो म्हणाला. 'तुझे धनुष्य दुसऱ्याला देऊन टाक' असे मला कोणी म्हटल्यास त्या पुरुषाचा मी तत्काल वध करीन' अशी अर्जुनाने पूर्वी केव्हा तरी प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे युधिष्ठिराने तसे म्हणताच हा आपला ज्येष्ठ बंधू आहे, आपल्याला वंद्य आहे हा विचार मनात न आणता अर्जुनाने एकदम खड्ग काढले व तो त्याच्या वधास उद्युक्त झाला. हे त्याचे वर्तन पाहून श्रीकृष्ण विस्मित झाले व अर्जुनाने आपल्या प्रतिज्ञेचे कारण सांगितले तेव्हा तर त्यांना प्रतिज्ञापालनासंबंधीची त्याची ही विपरीत कल्पना व धर्माधर्मासंबंधीचे अज्ञान पाहून परम उद्वेग वाटला. ते त्याला म्हणाले, 'अर्जुना, तू मूर्खासारखा धर्मलोपभयाने जे कृत्य करण्यास उद्युक्त झाला आहेस ते धर्माची सूक्ष्म तत्त्वे माहीत असलेला पुरुष कधीच करणार नाही. पार्था, कार्याकार्यनिर्णयासंबंधाने पंडितांचे जे सिद्धांत आहेत त्यांचे ज्ञान ज्याला नाही तो पुरुष असाच तुझ्याप्रमाणे भांबावून जाऊन वेड्यासारखी भलतीच गोष्ट करण्यास तयार होतो. तू धर्मज्ञ म्हणून जे कृत्य करण्यास तयार झाला आहेस ते केवळ तुझ्या अज्ञानाचेच द्योतक आहे. बाबारे, धर्माची तत्त्वे फार सूक्ष्म आहेत. ती तुला माहीत नाहीत. आता मी तुला धर्माचे गूढ तत्त्व निरूपण करून सांगतो, सत्यापेक्षा अधिक श्रेष्ठ काही नाही हे खरे, परंतु सत्यास अनुसरून वर्तन करीत असताना सत्याच्या तत्त्वावर अनुसंधान ठेवून त्याचा यथायोग्य निर्णय ठरविणे अवघड आहे. अज्ञ पुरुष सत्यासत्य विवेकातील मर्म न जागता केवळ सत्यालाच धरून बसतात आणि तदनुसार वागतात. पण सत्यासत्याचे मर्म ज्याला कळेल तोच धर्मज्ञ होय. धर्माचे मूलतत्त्व प्राण्यांचा उत्कर्ष व्हावा हेच होय. आणि याच तत्त्वाच्या अनुरोधाने श्रुतीत धर्माची व्याख्या केली आहे. या अनुरोधाने पाहिले तर अर्जुना, आधी तू जी प्रतिज्ञा केलीस तीच चुकीची आहे. आणि म्हणून तू मूर्खपणाने अधर्ममूलक कर्म करीत आहेस, यात संदेह नाही. प्राणसंकटात, विवाहकाली, किंवा सर्व जातीचा नाश होण्याचा प्रसंग आला असताना असत्य भाषण केले तरी पाप लागत नाही. धर्मतत्त्व यथार्थ जाणणाऱ्या लोकांना यात अधर्म वाटतच नाही.' (कर्णपर्व, अ. ६९).
{{gap}धर्माचे स्वरूप काय, त्याची प्रवृत्ती कशासाठी झाली आहे या महत्त्वाच्या विषयासंबंधी वर अनेक थोर व विचारी पुरुषांची मते सांगितली आहेत. भीम, लोमश, धर्मव्याध यांची मते यात आहेतच, पण त्याशिवाय पितामह भीष्म आणि योगेश्वर श्रीकृष्ण यांचाहि अभिप्राय व्यक्त केला आहे. त्यावरून धर्माचे अंतिम ध्येय समाजाचा उत्कर्ष हे असून सत्यासत्य, न्याय्यअन्याय्य हे सर्व त्यावरून ठरविणे अवश्य आहे असा भारतीय तत्त्वज्ञानाचा पहिला सिद्धांत ठरतो असे स्पष्ट दिसून येईल.

धर्म परिवर्तनीय

 ज्यामुळे समाजाचा किंवा राष्ट्राचा उत्कर्ष होतो ते बंधन म्हणजे धर्म होय अशी व्याख्या पतकरिली म्हणजे ही बंधने सर्व काळी सर्व स्थळी एकाच प्रकारची असणे शक्य नाही हा विचार मान्य करणे प्राप्तच आहे. आणि महाभारतातील प्रज्ञावंतांनी हा विचार अनेक ठिकाणी विस्तरशः मांडलेला आढळून येतो. व्यासांनी एके ठिकाणी हे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 'कृतयुगातील धर्म निराळा, त्रेता, द्वापर, कली याही युगांतील धर्म निराळे;' असे ते म्हणतात. यात हाच अभिप्राय आहे. मोक्षधर्माचे सिद्धांत जरी शाश्वत असले तरी जे प्रपंचाचे, संसारधर्माचे तत्त्वज्ञान येथे सांगावयाचे आहे, त्याचे सिद्धांत त्रिकालाबाधित असणे शक्य नाही हे उघड आहे. काल हा नित्य पालटत असतो. परिस्थिती पालटत असते. त्या त्या परिस्थितीप्रमाणे समाजावरची बंधने बदलणे अवश्य आहे हा विचार कोणाही सुज्ञ पुरुषाला पटण्याजोगा आहे. भारतकारांच्या मते तर राजा हाच कालाचे कारण आहे. राजा हाच आपल्या उत्तम किंवा अधम शासनाने कृत, त्रेता, द्वापर, कली इत्यादी युगे निर्माण करतो असे महाभारतात दोन तीन ठिकाणी म्हटले आहे. (शां. ६९, ९१) सध्या प्रचलित असलेली सर्वस्वी कालावलंबी युगकल्पना भारतात आहे. पण ही वर सांगितलेली कल्पनाही आपणांस तेथे आढळते. यावरून ठरीव कृत युग किंवा कलियुग असे काही नसून राजा येईल तसे युग पालटते असा विचार स्पष्ट होतो; आणि तो जमेस धरून देशकालाप्रमाणे धर्म पालटतो असा निश्चय भारतकारांनी केला आहे.

स एव धर्मः सोऽधर्मो देशकाले प्रतिष्ठितः
आदानमनृतं हिंसा धर्मोह्यावस्थिकः स्मृतः ।

-शां. ३६:११

 योग्य वेळी आणि योग्य स्थळी जो धर्म ठरतो तोच अयोग्य वेळी आणि अयोग्य स्थळी अधर्म होतो. चौर्यकर्म, असत्य भाषण, हिंसा या सर्वांची गोष्ट अशीच आहे. म्हणून 'धर्म हा परिस्थितीप्रमाणे ठरवावा लागतो' असे भीष्मांनी येथे सांगितले आहे. युद्धामध्ये आपण फार हिंसा केली, अनेक भूपतींचा वध केला या विचाराने युधिष्ठिराला फार खंत वाटू लागली. या पापाच्या निष्कृतीसाठी वनात जाऊन तपश्चर्या करणे अवश्य आहे असे वाटून तो राज्यत्यागाची भाषा बोलू लागला. तेव्हा भीष्मांनी त्याला उपदेश करून, तुझ्या हातून पाप घडलेलेच नाही, असे सांगितले. अहिंसा हा काही सर्व स्थळी धर्म होत नाही, असे सांगताना ते म्हणाले, 'धर्माचा उच्छेद टळत असेल. राष्ट्र सुखी होत असेल तर अशा प्रसंगी वध करणे हे सद्वर्तनाला बाधक होत नाही. कारण, हे प्रजाधिपते, एखादे अधर्माचे कृत्य हेच केव्हा धर्म होत असते व धर्माचे कृत्यही अधर्मरूपी होत असते. तेव्हा तू शोक करू नको. अंतःकरण स्थिर कर.' (शांति. ३३) दुसऱ्या एका प्रसंगी भीष्मांनीच पुढीलप्रमाणे उद्गार काढले आहेत. 'आपत्ती आली असताना पूर्वीच्या लोकांनी आचरण केलेल्या गौण धर्माचेही आचरण करावे. कारण हे भारता, संपन्नतेच्या कालाचे धर्म निराळे आहेत व आपत्कालचे धर्म निराळे आहेत. द्रव्यसंग्रह केल्यावाचूनही धर्म संपादन करता येईल, पण चरितार्थाचे महत्त्व धर्माहूनही अधिक आहे. ज्या उपायाने धर्मनिष्ठ राहूनही बलाची प्राप्ती होईल असा खात्रीचा उपाय नाही. म्हणूनच आपत्काली अधर्मालाही धर्माचे स्वरूप येते व धर्मही अधर्म होतो असे ज्ञानी लोकांचे मत आहे.'
 आपल्या इतर प्राचीन ग्रंथांप्रमाणे महाभारतातही आपद्धर्म म्हणून एक मोठेच प्रकरण आहे. समाजाला नेहमीच्या व्यवस्थेसाठी काही बंधने लावून दिलेली असतात. पण आपत्काल आला असता ती बंधने पाळणे हे अशक्य असते. अशा वेळी ती बंधने सोडून त्या त्या प्रसंगी आपले व समाजाचे ज्यायोगे हित होईल ते कोणतेही आचरण धर्म्यच होय असा भारतकारांनी अभिप्राय दिलेला आहे. वर्णधर्म ही प्राचीनकालची फार महत्त्वाची कल्पना होय. पण आपत्काली ती व्यवस्थाही बदलण्यास हरकत नाही, नव्हे अवश्य बदलावी असा भारतात उपदेश आहे. युधिष्ठिर म्हणतो की, "सरळ मार्ग म्हणजे श्रुतींनी लावून दिलेली कामे चारहि वर्णांनी करणे. उदाहरणार्थ, ब्राह्मणांचा धर्म अध्ययनादि, क्षत्रियांचा शौर्यादि, वैश्यांचा कृष्यादि, आणि शूद्रांचा सेवादि. असे जरी खरे तरी जगातून कधीही नाहीसे न होणारे धर्म आणि अधर्म हे त्याच कर्माच्या ठायी संभवतात. उदा. ब्राह्मणाने क्रयविक्रय करणे हा संकट नसता अधर्म होय, परंतु निर्वाहच होत नसेल तर आपत्काली तोच त्याला धर्म होय. या रीतीने परस्पर वर्णांच्या क्रियांचा विपर्यास होतो व स्थितीभेदाने तीच धर्म रूपवती क्रिया अधर्मरूप मानिली जाते. संजया, उपजीविकेचे साधन असूनही आपद्धर्माप्रमाणे चालणारा, आणि आपत्तीत असूनही आपद्धर्माप्रमाणे न चालणारा हे दोघेही निंदेला पात्र आहेत, आम्ही पूर्वी एकचक्रा नगरीत भिक्षा मागितली. तेव्हा भिक्षा न मागणे हा अधर्म होता. पण आता युद्ध सोडून भिक्षा मागणे हा अधर्म होईल, " (उद्योग २८)
 साधारणतः शस्त्रग्रहण करून प्रजेचे पालन करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. पण राज्यावर संकट आले व राजाच्या हातून ते निवारण होईनासे झाले किंवा राजा नादान असल्यामुळे प्रजेच्या पालन होत नसले तर वर्णधर्माची कोणचीही कल्पना मनातं न आणता सर्वांनी क्षात्रधर्माचे आचरण करावे असा उपदेश भीष्मांनी केला आहे. ते म्हणतात, 'अपार आणि नौकाशून्य अशा संकटरूप समुद्रामध्ये जो मूर्तिमंत परतीर अथवा नौकाच झालेला असतो तो जरी शूद्र असला, अथवा दुसरा कोणी असला तरी त्याचा सर्वथैव सन्मान करणेच योग्य होय. प्रजापालन न करणारा राजा अगदी निरर्थक होय. जो सदैव सज्जनांचे रक्षण करून दुष्टांना हाकून देतो तोच (शूद्र असला तरी) राजा केला पाहिजे. हा देश व काल यांचा प्रभावच असा आहे की, या कारणांच्या अनुरोधाने धर्मालाही अधर्माचे रूप येते व अधर्मही धर्मस्वरूप बनतो.' (शांति ७८)
 आपत्काली अमुक करावे व एरवी अमुक करावे या बोलण्याचा 'परिस्थिती पाहून वर्तावे' असाच अर्थ होतो. कारण आपत्काल म्हणजे अमका एक काल असे काहीच ठरलेले नाही. उपजीविका चालली नाही तरी आपत्कालच होय. परचक्र येणे, राजा नादान असणे, अवर्षण होणे, हे सर्व आपत्कालच होत. यावरून प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा, गावाचा किंवा समाजाचा आपत्काल निराळा असू शकेल हेही दिसते. वर सांगितलेले आपत्काल हे नेहमी येथे ना तेथे असणारच आणि त्यामुळेच आपत्काली असे आचरण करावे याचा अर्थ देश, काल, परिस्थितीप्रमाणे आचरण करावे, उत्कर्ष कसा होईल इकडे लक्ष ठेवावे; सत्य, अहिंसा, दया, क्षमा, प्रतिज्ञापालन यासंबंधीच्या एकाच सिद्धांताला चिकटून बसू नये. 'असाच अभिप्राय व्यक्त होतो.
 भिन्न युगात धर्मनियम निराळे, समर्थ असताना निराळे, दुबळे असताना निराळे, सुस्थितीत असताना निराळे, आपत्तीत असताना निराळे. हे सर्व विचार एकत्र केले की धर्मनियम हे परिवर्तनीय आहेत, शाश्वत नाहीत असाच भारतकारांचा अभिप्राय आहे हे निश्चित दिसू लागते.
 श्रीकृष्णाचे या विषयासंबंधी निश्चित व उत्तम मत सांगून हा विषय पुरा करू.
 'तुझे धनुष्य दुसऱ्यास देऊन टाक' असे युधिष्ठिर म्हणाला तेव्हा अर्जुन त्याच्या वधास उद्युक्त झाला हा कथाभाग वर आलाच आहे. त्याप्रसंगी 'तू अगोदर प्रतिज्ञा केलीस तीच मूर्खासारखी होती' असे सांगून कृष्णाने ती अर्जुनास मोडणे भाग पाडले. आणि प्रतिज्ञा पाळलीस तर अधर्म होईल असे सांगितले. उलट भीमाने गदायुद्धात दुर्योधनाला बेंबीच्याखाली मांडीवर प्रहार करून ठार मारले त्या वेळी बलराम त्याचा निषेध करू लागला. तेव्हा कृष्णाने भीमाने तशी प्रतिज्ञाच केली होती, ती पुरी करणे भाग होते. असे सांगितले. प्रतिज्ञा मोडणे हा एके ठिकाणी धर्म होता व ती पाळणे हा दुसऱ्या ठिकाणी धर्म होता. आणि याचे विवेचन करताना श्रीकृष्णानेही प्रसंगपरत्वे सत्य हे असत्य ठरते व असत्य हे सत्य ठरते असा आपला अभिप्राय दिला.
 धर्म हा लोकांच्या उत्कर्षासाठी आहे आणि त्यामुळेच त्यांचे नियम अगदी निश्चित, केव्हाही, कोठेही मार्गदर्शन स्पष्ट करतील असे नाहीत, असे महाभारतकारांचे मत आहे असे आपल्या निदर्शनास आले. हे ध्यानात येताच एक नवी अडचण आपल्यापुढे येऊन उभी रहाते. भिन्न भिन्न प्रसंगी देश, काल, परिस्थिती यांप्रमाणे धर्माचे रूप बदलत असेल तर आपल्यावर आलेल्या विशिष्ट प्रसंगी आपण वर्तन कसे ठेवावे हे पुरुषाने कशाच्या आधाराने निश्चित करावयाचे ? सत्य, अहिंसा, क्षमा यांबद्दल काही शाश्वत सिद्धांत असते तर काही झाले तरी त्याप्रमाणे वागावे असे धोरण ठेवता आले असते; पण तसे नाही. कधी सत्य हे असत्य ठरते. आणि भलत्याच वेळी, जेथे समाजाची हानी होत आहे. अशा प्रसंगीही, सत्याचरण केले तर त्यामुळे प्राणी नरकास जातो असे भारतीय तत्त्ववेत्ते निक्षून सांगतात. (कर्ण.अ.६९) त्यामुळे कोणत्या वेळी काय धर्म्य व काय अधर्म्य हे ठरवावयाचे कसे हा मोठा प्रश्न आहे.

बुद्धिप्रामाण्य

 या धर्माधर्म- निर्णयात मनुष्याच्या बुद्धीला मुळीच वाव नाही, त्याने सर्वस्वी शास्त्रावरच, श्रुतीवरच अवलंबून राहिले पाहिजे असा आपल्या प्राचीन ऋषींचा निर्वाळा आहे असे एक मत प्रचलित आहे. पण ते भ्रामक आहे. महाभारतात सर्वस्वी ग्रंथप्रामाण्य न उपदेशिता अनेक ठिकाणी बुद्धिप्रामाण्याचीही प्रशंसा व उपदेश केलेला आढळतो. श्रुतीमध्ये सर्व गोष्टी सांगणे शक्य नाही. प्रत्येक प्रसंगाची, त्या वेळच्या परिस्थितीची व त्या वेळच्या सत्यासत्याची कल्पना श्रुतींच्या तत्त्ववेत्त्यांना येणे शक्य नाही हे भारतीय तत्त्ववेत्ते जाणून होते. त्याचप्रमाणे श्रुतीत परस्परविरोधी वचनेही सापडतात व त्यामुळे गोंधळ होतो, कार्याकार्य ठरत नाही हेही त्यांनी लक्षात घेतले होते. आणि म्हणूनच सर्व काही श्रुतिवचनाप्रमाणेच झाले पाहिजे. असा आग्रह त्यांनी अनेक ठिकाणी सोडून दिल्याचे आपणांस दिसून येते. श्रुतिवचनाबरोबरच कार्याकार्यनिर्णयात त्यांनी वृद्धांच्या वचनालाही प्रामाण्य दिलेले आढळून येते. आणि याही पुढे जाऊन ज्ञानसंपन्न पुरुषाने कठिण प्रसंगी स्वतःची बुद्धी चालवून तिला पटेल तो निर्णय करावा असेही त्यांनी सांगितले आहे.
 सत्यासत्य- निर्णयाचा विचार चालू असताना भीष्म युधिष्ठिरास सांगतात, 'हे भारता, श्रुतीत जे जे सांगितले आहे तो तो धर्म होय असे कित्येकांचे मत आहे; व दुसऱ्या लोकांच्या मते तो सर्वच धर्म होय असे नाही. या दुसऱ्या प्रकारच्या मतांचा आम्ही- द्वेष करीत नाही. कारण श्रुतीमध्ये प्रत्येक गोष्ट सांगितलेली असणे शक्य नाही. (शांति. अ. १०९) शिबिराजापुढे धर्माधर्म-निर्णयाचा एक बिकट प्रश्न येऊन पडला होता. एका कपोत पक्ष्यामागे एक ससाणा लागला होता. त्या वेळी कपोत या राजाच्या आश्रयास आला व राजाने त्यास अभय दिले. मागून ससाणा आला व आपले भक्ष्य राजाजवळ मागू लागला. राजा कपोताला त्या ससाण्याच्या स्वाधीन करीना. तेव्हा ससाणा म्हणाला, 'याला तू माझ्या स्वाधीन केले नाहीस तर मी भुकेने मरेन, आणि माझी बायकामुले मरतील. त्यांची हत्या तुझ्या माथी येईल व तुला अधर्म घडेल.' हे ऐकून राजालाही प्रश्न पडला. कपोत द्यावा तर शरणागताचे रक्षण करण्याचे ब्रीद नष्ट होऊन अधर्म घडेल. न द्यावा तर अनेक प्राण्यांच्या हत्येची जबाबदारी येऊन त्यामुळे अधर्म घडेल. या वेळी ससाण्याचे रूप धारण करणारा इंद्र त्याला म्हणाला-

गुरुलाघवमादाय धर्माधर्मावीनर्णये
यतो भूयांस्ततो राजन् कुरुष्व धर्मनिश्चयम् ।

-वन. १३१।१३

 राजा, धर्म कोणता व अधर्म कोणता याचा निर्णय करिताना तारतम्य पाहून त्यातल्या त्यात जो जास्त महत्त्वाचा वाटेल, (जे कृत्य जास्त फलदायी वाटेल) तो धर्म होय, असे तू ठरव.
 इंद्राने या ठिकाणी श्रुतिवचनांचा हवाला न देता तुझी तारतम्य बुद्धी तू वापर व तू स्वतःच धर्माधर्म ठरव असे राजाला सांगितले. आणि याचे कारणही उघड आहे. असा दर वेळी उद्भवणारा प्रसंग कल्पून त्या त्या वेळी धर्म कोणता व अधर्म कोणता हे सांगून टाकणे श्रुतीलाही शक्य नाही.
 युधिष्ठिराने एके प्रसंगी भीष्मांना प्रश्न केला की, 'मोठमोठे लोक सुद्धा आम्हांला बाह्यतः जे असत्य व निंद्य वाटते असे आचरण करतात; तर हीन असे जे दस्यू त्यांचे आचरण वेगळे कसे दाखविता येईल ? या प्रश्नामुळे मला कर्तव्याची दिशा कळेनाशी झाली आहे. तरी आपण मला मार्ग दाखवा. त्यावर भीष्मांनी उत्तर देताना जे प्रास्ताविक चार शब्द सांगितले आहेत त्यातील मर्म वरीलप्रमाणेच आहे. भीष्म म्हणाले- 'शास्त्रातील तत्त्वे ऐकूनच मी तुला हा उपदेश करीत आहे असे नाही. हे जे मधुतुल्य ज्ञान साठविलेले आहे ती ज्ञानसंपन्न अशा लोकांच्या ज्ञानाचीच पराकाष्ठा आहे. अर्थात ज्ञानसंपन्न लोकांनी संकटप्रसंगी असे आचरण न करणे फार भयावह आहे असे दिसून आल्यामुळेच ते आचरण करावयाचे ठरविले आहे. राजाने अनेक प्रकारच्या लोकांकडून अनेक प्रकारचे ज्ञान संपादन केले पाहिजे. युधिष्ठिरा, राजाने आपल्या बुद्धीच्या योगाने धर्माचे त्या त्या बाजूने संशोधन केले पाहिजे. धर्माचा प्रकार एकच असला तर तो राजाचे हातून घडू शकणारच नाही. यास्तव बुद्धीने त्याचे अनेक प्रकार जाणले पाहिजेत. राजा, काही लोक खरे ज्ञानी असतात व काहींचे ज्ञान खरे नसते. यास्तव त्याची आधी बरोबर रीतीने माहिती मिळवून जे ज्ञान सज्जनांना मान्य असेल त्याचाच सुज्ञ लोक अंगीकार करीत असतात. पण राजा, सज्जनांनी देखील दांभिकपणे आचरण केलेला जो धर्म असेल त्याचा तुला स्पर्श होता कामा नये. केवळ शास्त्राच्या अनुरोधाने किंवा केवळ बुद्धीने धर्मनिर्णय करणे शक्य नाही, (न धर्मवचनं वाचा नैव बुध्येति नः श्रुतम् ॥ शांति. १४२, १७) कारण त्याला या दोहोंचीही अपेक्षा असते असे बृहस्पतीचे मत प्रत्यक्ष इंद्राने सांगितले आहे. राजा, लोकांचा योग्य रीतीने चरितार्थ चालविणे हा धर्म आहे असे काही पंडितांचे मत आहे. म्हणून ज्ञानसंपन्न राजाने सज्जनांना मान्य असलेला धर्म कोणता याचा आपल्या बुद्धीनेच विचार करावा. राजा ज्ञानास कारणभूत असल्यामुळे काही लोक (श्रुतीतील) वचनाचीच प्रशंसा करितात. पण ते केवळ अज्ञान होय. दुसरे युक्तीपुढे शास्त्र टिकत नाही म्हणून शास्त्रच निरर्थक होय असे म्हणतात, पण तेही अज्ञानच होय.' (शांति. १४२)
 धर्माधर्म-निर्णयासंबंधी श्रुतिवचने व सत्पुरुषांचे आचरण यांचे महत्त्व कितपत मानता येईल याविषयी युधिष्ठिराने एके ठिकाणी आपले विचार सांगितले आहेत ते मननीय आहेत. तो म्हणतो,
 'धर्माचे स्वरूप निश्चित आहे असे वाटत नाही, कारण जो संपन्न स्थितीत असतो त्याचा धर्म निराळा आणि जो संकटात असतो त्याचा धर्म निराळा असतो. संकटे काही वेदाच्या योगाने जाणणे शक्य नाही. अर्थात त्याचे स्वरूप निश्चित नसल्यामुळे धर्माचेही स्वरूप निश्चित नाही. सत्पुरुषांचा आचार हा धर्माविषयी प्रमाण असेही म्हणता येत नाही. कारण सत्पुरुषांचा आचार हा धर्म असे मानले आहे त्याचप्रमाणे आचारसंपन्न असतात तेच सत्पुरुष असेही मानलेले आहे. अर्थातच सत्पुरुषत्वाचा निर्णायक आचार व आचाराचा निर्णायक सत्पुरुष असा अन्योन्याश्रय होतो. धर्माचे दुसरे प्रमाण म्हणजे वेदवचने हे होय असे शास्त्रनिष्णात लोकांनी सांगितलेले आहे. परंतु प्रत्येक युगात त्या वेदवचनांचा ऱ्हास होत जातो असे आम्ही ऐकलेले आहे. म्हणूनच कृतयुगातील धर्म निराळे, त्रेतायुगातील निराळे, द्वापरयुगातील निराळे व कलियुगातील धर्म निराळे आहेत. हे सर्व युक्तीच्याच अनुरोधाने केले आहेत असे दिसते. वेदवचन तेवढे प्रमाण असे म्हणणे केवळ लोकांच्या समाधानासाठी आहे (आम्नायवचनं सत्यमित्ययं लोकसंग्रहः ॥ शांति. २६६,९) वेदामध्ये प्रमाणभूत व अप्रमाणभूत अशी दोन्ही प्रकारची वचने आहेत. अशा रीतीने परस्परविरुद्ध वचनांनी युक्त असलेल्या ग्रंथाला प्रमाणत्व कोठून येणार ? हा धर्म प्रथम गंधर्वनगराप्रमाणे मोठा अद्भुत असा दिसतो पण विद्वान् लोक याच्यासंबंधी विचार करू लागले म्हणजे त्याचे नावही राहात नाही. शेतात सोडलेले पाण्याचे पाट जसे क्रमाक्रमाने क्षीण होऊन जातात तसाच शाश्वत म्हणून प्रतिपादिलेला धर्मही क्रमाने क्षीण होत जातो.'
 मागे एकदा त्रेतायुगाच्या शेवटी फार मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी राजर्षी विश्वामित्र यांची अन्नान्नदशा झाली. क्षुधेने व्याकुळ होऊन ते सगळीकडे भटकत असताना एका चांडाळाच्या घरात शिरले व तेथे टांगलेली कुत्र्याची मांडी त्यांनी हरण करून घेतली.'प्रथम प्राण वाचविणे हाच धर्म होय' असे त्याप्रसंगी त्यांनी मत दिले. त्याचे समर्थन करून भीष्म म्हणतात, 'याप्रमाणे संकटात सापडलेल्या जीवितेच्छू व विद्वान मनुष्याने हवे ते उपाय करून आपले प्राण वाचविले पाहिजेत. कारण प्राण वाचले तरच मनुष्य पुण्य संपादन करू शकतो व त्याचे कल्याणही होते.' इतके सांगून या कथेचा निष्कर्ष म्हणून पितामहांनी सांगितला तो असा : 'यास्तव हे कुंतिपुत्रा, बुद्धिचातुर्यसंपन्न अशा विद्वान पुरुषाने धर्म कोणता याचा निर्णय करण्याच्या कामी बुद्धीचे अवलंबन करून या लोकात वागले पाहिजे.'

तस्मात् कौन्तेय विदुषा धर्माधर्मविनिश्चये
बुद्धिमास्थय लोकेस्मिन् वर्तितव्यं कृतात्मना ॥

- शांति. १४१, १०४

 अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णांनी एके समयी आपला हाच अभिप्राय व्यक्त केलेला आहे. श्रुतीत सर्व धर्माचा ऊहापोह केलेला नसल्यामुळे मनुष्याने तर्काच्या साह्याने धर्माधर्म ठरवावा असे ते म्हणतात. कौशिक नावाच्या माणसाने अतिरिक्त सत्यप्रीती धरून काही निष्पाप लोकांच्या वधास अप्रत्यक्ष साह्य केले. त्यासंबंधी बोलताना श्रीकृष्ण म्हणाले, 'अर्जुना, या समयी कौशिकाने जे भाषण केले ते सत्य असले तरी दुरुक्तच होय. या मोठ्या अधर्माचरणामुळे कौशिकाला नरकात पडावे लागले. धर्माचे सूक्ष्म तत्त्व माहीत नसल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली.

ततो ऽ धर्मेण महता वाग्दुरुक्तेन कौशिकः
गतः सुकष्टं निरयं धर्मसूक्ष्मेष्वतत्त्ववित् ॥

- कर्ण. ७२, ५३

 आता धर्माधर्म निर्णयाचे मर्म कोणते ते सांगतो. ऐक. कित्येक प्रसंगी धर्माचे तत्त्व मनात येणे मोठे कठीण पडते. यासाठी त्याचे बरोबर ज्ञान होण्यास तर्काची मदत घ्यावी लागते. पुष्कळ लोक असे म्हणतात की, धर्माचे तत्त्व श्रुतीतच आहे. यावर मी असे म्हणतो की, 'धर्माचे तत्त्व श्रुतीत आहे हे खरे, पण सर्वच गोष्टी श्रुतीत सांगून त्यांचा तेथे ऊहापोह केलेला नाही. प्राण्यांचा उत्कर्ष हेच धर्माचे मूलतत्त्व आहे हे ध्यानात घेऊन तर्काच्या आधाराने धर्माधर्म-निर्णय करावा.'
 महाभारतातील धर्माचे स्वरूप असे अतिशय उज्ज्वल आहे. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी केलेले नियम म्हणजेच धर्म हे भारतीय तत्त्वज्ञान आपण दृष्टिआड केले. धर्माधर्माचा, कार्याकार्याचा निर्णय मनुष्याने तर्काचा व स्वतःच्या बुद्धीचा आश्रय करून केला पाहिजे हे अमृतवचन आपण विसरलो. आणि देशकालपरिस्थितीप्रमाणे धर्माचे रूप पालटावे लागते, म्हणजे समाजधारणेचे नियम बदलावे लागतात ह्या सिद्धांताकडे आपण दुर्लक्ष केले. आणि त्यामुळेच भारतवर्षाला दुर्गती प्राप्त झाली आहे व आजही होत आहे. धर्माधर्मासंबंधीचा हा व्यामोह आपण दूर सारून श्रीकृष्ण, व्यास, भीष्म या भारती पुरुषांनी उपदेशिलेल्या धर्माचे पुनरपि आचरण केले तर त्या काळी ज्या वैभवाच्या परमोच्च बिंदूला हे राष्ट्र गेले होते त्याच बिंदूला ते पुनरपि जाईल अशी आशा करण्यास मुळीच प्रत्यवाय नाही.

● ● ●