भवान्यष्टकम्

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतार  ·नारायण
वेदांग
शिक्षा · चंड
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
इतिहास
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत
न तातो न माता न बन्धुर्न दाता  न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता ।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥१॥

हे जगन्माते भवानि ! आई, बाप, भाऊ अथवा आप्तजन, कन्या, पुत्र, सेवक हे कोणीही उपयोगाला येत नाहीत. पत्नी सुद्धा अंती उपयोगाला येत नाही. विद्येचाही उपयोग होत नाही. वृत्ति (म्हणजे निर्वाहाचे साधन) सुद्धा जेथल्या तेथें राहून जाते आणि शेवटी तुझाच आधार उपयोगाला येतो. आई भवानी शेवटी तूच माझी गति आहेस, आधार आहेस, रक्षण करणारी आहेस. (गति शब्दाचे मार्ग, उपाय, आश्रय, आधार आणि रक्षक असे अनेक अर्थ आहेत.) ॥१॥

भवाब्धावपारे महादुःखभीरुः  प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः ।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥२॥

हे जगन्माते भवानि ! मी प्रकामी, प्रलोभी आणि प्रमत्तही असल्यामुळे ह्या अपार भवसागरात मला मोठ्या मोठ्या दुःखांना तोंड द्यावे लागत असल्याने मी अत्यन्त घाबरून गेलो आहे. अवांछनीय अशा संसारबंधनात मी कायमचा अडकलो आहे. ह्यातून सुटण्यास मला काहीच साधन नाही. हे भवानि ! तूच माझे साधन, आधार आणि तूच माझी गती आहेस. ॥२॥

न जानामि दानं न च ध्यानयोगं   न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम् ।
न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥३॥

मी दान करणें जाणत नाही. त्याचप्रमाणे मला ध्यानयोगही माहीत नाही. (एकाग्र चित्ताने तुझे चिन्तन कसें करावे हे मला कळत नाही.) तंत्रमार्गातील कोणत्याही विधीचे मला ज्ञान नाही. त्याचप्रमाणे आई ! तुझी स्तोत्रे कशी म्हणावीत, मंत्रांचा जप कसा करावा हे काही मला माहीत नाही. तुझी पूजा कशी करावी हे ही मी जाणत नाही, न्यास वगैरेही मला माहीत नाहीत. हे जगज्जननि माते ! तूच माझे एकमेव आश्रयस्थान आहे, तूच माझा आधार आहेस. ॥३॥

न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं  न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् ।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातः गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥४॥

हे भवानि ! पुण्य काय ते मला माहीत नाही. मी कधी कोणत्याही तीर्थाला किंवा क्षेत्राला गेलों नाही. मुक्ती कशाला म्हणतात आणि चित्ताचा लय कसा करावा हेंही मला माहीत नाही. तुझी भक्ति कशी करावी आणि व्रतांचे आचरण कसे करावे हेंही मला माहीत नाही. हे आई ! शेवटी तूच माझा आधार आहेस, माझी गती म्हणजे रक्षण करणारी आहेस. ॥४॥

कुकर्मी कुसंगी कुबुद्धिः कुदासः  कुलाचारहीनः कदाचारलीनः ।
कुदृष्टीः कुवाक्यप्रबन्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥५॥

हे आई ! मी नेहमी वाईट कर्मातच रत राहिलों, दुर्जनांच्या संगतीतच माझे आयुष्य गेले, दुसऱ्याचे अनिष्ट कसें होईल त्याचाच विचार करीत राहिल्याने मी कुबुद्धी बनलों आहे. मी कुदास म्हणजे वाईटाचाच गुलाम आहे, कुलाचाराचे कधीच पालन केले नाही. कदाचार म्हणजे मलीन आचरणातच मी मग्न राहिलों. वाईट नजरेचा, नेहमी कुवाक्यांची म्हणजे वाईट विचार व्यक्त करणाऱ्या वाक्यांचीच रचना करीत राहिलो. कधीं चांगले बोललों नाही आणि लिहिलेंही नाही. अशा स्थितीत हे भवानि माते ! तूच माझी गती आहेस. ॥५॥

प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं  दिनेशं निशीथेश्र्वरं कदाचित् ।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥६॥

हे भवानि आई ! तूच शरणागताचे रक्षण करणारी असल्याने मी इतर कोणत्याही देवाला म्हणजे ब्रम्हदेव, विष्णु, महेश, इन्द्र, सूर्य, चंन्द्र इत्यादींना जाणत नाही. तूच माझी गती - परम आधार आहेस. ॥६॥

विवादे विषादे प्रमादे प्रवासे  जले चानले पर्वते शत्रुमध्ये ।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥७॥

हे शरणागत वत्सले आई ! पंडिताशी वाद करीत असताना, विषण्ण म्हणजे खिन्न अवस्थेत असताना, माझ्या हातून काही प्रमाद म्हणजे चुका होत असताना, मी प्रवासात असताना, मी पाण्यामुळे किंवा अग्नीमुळे संकटात असताना, पर्वतावर किंवा अरण्यात संकटात सापडलो असताना किंवा शत्रूंनी मला वेढले असताना हे आई ! सदा सर्वकाळ तूच माझे रक्षण कर. तुझ्याशिवाय मला दुसरी कोणतीही गती नाही. ॥७॥

अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो  महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः ।
विपत्तो प्रविष्टः प्रणष्ट सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥८॥

हे माते ! मी अनाथ आहे, दरिद्री आहे. वार्धक्य आणि इतर अनेक रोगांनी पीडित आहे. मी अत्यन्त दुर्बळ आणि दीन झालो आहे. माझी वाणी जड झाली आहे म्हणजे मी बोलू शकत नाही. मी संकटात सापडलो आहे. मी जवळ जवळ नष्ट होण्याच्या बेतात आहे. तेव्हा हे आई ! भवानि माते तूच माझे रक्षण कर, तूच माझी एकमेव गती आहेस. ॥८॥

--श्रीमद् आद्य शंकराचार्य