Jump to content

बिंदुमाधवस्तुति

विकिस्रोत कडून

श्रीबिंदुमाधवा ! तूं सदय सदा मज पदानता पावें

शरणागतें तुझ्या बा ! लक्ष्मीरमणा ! कदा न तापावें. १


दीनोद्धार - महाव्रत विश्वेशप्रभुवरें जसें काय

स्वीकारिलें, तुवांही, स्वीकारुनियां दयारसें काय ? २


दिसतां भिन्न, परि तुम्ही एकचि पाहे तुम्हांत जो भेद,

वेद स्पष्ट म्हणतसे, ‘ प्राप्त तया होय भय, महा खेद ’. ३


उद्धरिले बहु पापी तुझिया श्रीबिंदुमाधवा ! नांवें

विश्वेश्वरयशसेंचि, त्वद्यशही अत्युदार वानावें. ४


ताप हरुनि, सुख देतें तुमचें सत्कीर्तिगायनव्यजन

वर्णी असें पुराणीं श्रीव्यास, न हाचि गाय नव्य जन. ५


आराधुनि स्वयें त्वां ईशा ! विश्वेश्वरा ! सदाराध्या,

उपदेशिलें त्रिजग कीं, या श्रितकल्पद्रुमा सदारा ध्या. ६


त्वां शिवपदपद्मावरि नियमें, प्रेमेंहि दृढतरें अमळें,

उच्चारुनि शिवनामे, तितुकींच सहस्त्र वाहिलीं कमळें. ७


निववावया बहु, भरुनि साधूंचे निजयशोगुणें कान,

करिल सहस्त्रांत कमल एक प्रभु - कौतुकी उणें कां न ? ८


तूंहि महाशैव, प्रभुचरणावरि नेत्रपद्म वाहूनी,

सत्यप्रतिज्ञ विष्णो ! झालासि, शिवप्रसाद लाहूनी. ९


संरक्षिला करींद्र, प्राणव्यसनीं, वधूनि नक्रातें;

शक्रातें, असुर मथुनि, सुखवी, त्या गाति साधु चक्रातें. १०


तूं हरि भजसि शिवातें, भजतो तुज मुक्तिदायका पुरहा

युष्मद्यशोजित विधुहि म्हणतो, न म्हणेल काय कापुर हा ? ११


भजतो शिव आराध्या तुज, तूंहि भजसि शिवाचि आराध्या

म्हणती मुमुक्षु जे त्यां अस्मदभेदाचि वेदसारा ध्या. १२


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.