गदाधरस्तुति

विकिस्रोत कडून

श्रीवैकुंठी देसी पितरां सह तूं गदाधरा ! वास

नमुनि, स्तवुनि, प्रेमें पूजुनि, हृदयीं सदा धरावास. १


व्हावें परम शुचि तुझ्या नामस्मरणें गदाधरा ! पतितें

त्यजुनि तुतें, न भजावें, देतांही निज पदा, धरापतितें. २


त्वां प्रभुनें वैकुंठचि केलें वसवूनि फ़ल्गुतीर सदा

तुज सिंधु हे जसी श्री; जी बोले बोल वल्गु, ती रसदा. ३


म्हणती गतताप-मुदित ऋणभारें सर्व मोडकळला हो.

प्रभुजी ! भवत्प्रसादें भवतरुचा संग-मोड कळला हो. ४


पाप्यासहि मुक्तिप्रद तूं, जेंवि गदाधरा ! पवित्रास

वा ! त्वत्प्रणाम देतो संसारगदा धरा पवित्रास. ५


आणुनि तुज भेटविती, तारिति जीवांस जे गयावळ, ते

त्वदूपचि हे नसते, तरि करुनि कसे नतीं दया वळते ? ६


प्रह्रादा तेंवि दिला त्वां यांला कीर्तिसाज वरदानें

बहुतांसि देत आले हे सद्रतिचींच आजवर दानें. ७


देवा ! गदाधरा ! त्वां प्रभु केले बंधमुक्ति ओपाया

सर्वांस म्हणति जन, ‘ हो याचि पथें सुगति, हाचि सोपा, या ’. ८


केले स्वसमचि वरदा ! देवा ! त्वां विप्र हे गयावासी

यांतें बद्धकर - सकळमुख, यांची व्हावया दया, वासी. ९


छळिला बळि, लागे हा शब्द दहांचा प्रभो ! तुलाहि तसा

बहुधा गयावळाही; हितही न गमे, पिता मुला हितसा. १०


देवा ! गदाधरा ! तूं स्वविभूतिद्विजसमाज हा वळिव

मळिव न यश ; करुणास्पद निज भक्त मयूर, हेंचि या कळिव. ११


पाव गदाधरदेवा ! नांव तुझें मम मुखीं सदा राहो.

भाव तव पदींच वसो, नाव भवाब्धींत तूं सदारा हो. १२


वाहे विपत्प्रवाहीं, त्या आप्तहि भुज न दे, वदे ‘ वाहें ’

तैसा न दीनबंधो ! तूं गाती सुजन देवदेवा ! हें. १३


प्रभुचीं नामें, चिन्हें, सप्रेम मुखें वदा, धरा देहें

यश गा वशगा होइल मुक्ति कवि म्हणति गदाधरा ! दे हें. १४


पळही गदाधरा ! तुज ऋणभाराकुळ न लक्षवे दास

आढळलें त्वद्यशसें यश न त्रिजगीं वलक्ष वेदास. १५


नमुनि गदाधरदेवा ! हे वाणी वाहिली तुझ्या चरणीं

दुसरी न घडे सेवा दे वात्सल्यें मना रुचि स्मरणीं. १६


उडवी, पितरांचें जें ऋण, तें तृण तेंवि. पूर्वी काम

हे श्रीगदाधारस्तुति. ऋणतृणवात्या असें इचें नाम. १७


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.