Jump to content

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/बायजाबाईसाहेबांची कारकीर्द

विकिस्रोत कडून

भाग ५ वा.
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द.

दौलतराव शिंदे मृत्यु पावले त्या वेळीं हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्यसत्ता लॉर्ड आह्मर्स्ट ह्या गव्हरनर जनरल साहेबांकडे होती. त्यांच्या राजनीतीचा उद्देश एतद्देशीय संस्थानें खालसा करण्याचा नसल्यामुळें त्यांनीं ग्वाल्हेर संस्थानाबद्दल फार उदार मतानें विचार केला. ग्वाल्हेरसारखें प्रचंड संस्थान बिनवारस समजून ब्रिटिश राज्यामध्यें सामील केलें असतें, तर प्रजाजन असंतुष्ट होऊन भयंकर अनर्थ ओढवला असता; व त्यामुळें चोहोंकडे अस्वस्थता उत्पन्न झाली असती. परंतु त्या वेळचें मुत्सद्दीधोरण "एतद्देशीय संस्थानें हीं ब्रिटिश राज्याच्या चिरस्थायित्वाचे आधारस्तंभ आहेत," असें शहाणपणाचें असल्यामुळें, एतद्देशीय संस्थानांच्या हक्कांची पायमल्ली न करितां, उलट तीं रक्षण करण्याकडे, त्या वेळच्या चतुर राज्यकर्त्यांची प्रवृत्ति असे. ह्या प्रवृत्तीचा परिणाम इ. स. १८५७ सालच्या बिकट प्रसंगी कसा हितावह झाला, व ब्रिटिश राज्य रक्षण करण्यास ग्वाल्हेरसारख्या एतद्देशीय संस्थानांनीं किती उत्कृष्ट साहाय्य केलें, हें इतिहासवाचकांस सांगावयास नकोच. ग्वाल्हेरच्या संस्थानिकास औरस संतति नसल्यामुळें त्यास दत्तक घेण्याबद्दल ब्रिटिश रेसिडेंटानें आग्रहपूर्वक विनवणी करावी; तथापि त्यानें ती न जुमानतां, आपल्या पत्नीच्या शहाणपणावर हवाला देऊन ब्रिटिश सरकारावर आपला पूर्ण विश्वास ठेवावा; व ब्रिटिश सरकारानें त्या विश्वासाचें चीज करावे; हा प्रेमभाव मांडलिक व त्यांचे सार्वभौम प्रभु ह्या उभयतांस सारखाच भूषणावह आहे, ह्यांत शंका []नाहीं. असो.
 लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांनीं ग्वाल्हेरच्या गादीबद्दल विचार करितांना, महाराज दौलतराव शिंदे ह्यांची शेवटची इच्छा व त्यांच्या पत्नी बायजाबाईसाहेब ह्यांची योग्यता व कर्तृत्वशक्ति हीं पूर्णपणे ध्यानांत घेऊन, त्यांसच संस्थानचे सर्व आधिपत्य दिले; व त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणें दत्तक पुत्र घ्यावा असें ठरविले. ही गोष्ट बायजाबाईसाहेब व ग्वाल्हेर दुरबारचे मुत्सद्दी व सर्व प्रजाजन ह्यांस संतोषदायक झाली; व त्यांनी त्याबद्दल नामदार गव्हरनर जनरलसाहेब ह्यांचें व रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांचे फार फार अभिनंदन केले.

 बायजाबाईसाहेब ह्यांनीं ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांच्या विचारानें सर्व राज्यकारभार आपल्या हातीं घेतला; व ग्वाल्हेरचे सर्व मुत्सद्दी व सरदार लोक ह्यांच्या भेटी घेऊन त्यांस आश्वासने दिलीं. महाराजांच्या पश्चात् बायजाबाईसाहेब व त्यांचे बंधु हिंदुराव घाटगे ह्यांनी राज्याची सर्व व्यवस्था आपले हातीं घेतल्यामुळें व दरबारी लोकांस संतुष्ट केल्यामुळे, ग्वाल्हेर येथें कोणत्याही प्रकारे गडबड झाली नाहीं.

 बायजाबाईसाहेब ह्यांनी संस्थानच्या गादीचा धनी करण्याकरिता दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिक जनांची इच्छा होती; व तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट ह्यांनींही व्यक्त केली होती. ह्याकरितां बायजाबाईसाहेबांनीं दक्षिणेंतील शिंदे ह्यांच्या वंशापैकीं पांच मुलें हिंदुस्थानांत आणविण्याबद्दल कारकून व स्वार पाठविले. त्याप्रमाणें त्यांनी शिंदेघराण्याच्या निरनिराळ्या शाखेंतील मुलांचा शोध करून पांच मुलें ग्वाल्हेर येथे आणिलीं. शिंदे घराण्याचे मूळ पुरुष मानाजी शिंदे कन्हेरखेडकर हे होते. ह्यांच्या वंशजांपैकीं चांगजी शिंदे ह्यांच्या शाखेपैकीं पाटलोजी ह्मणून जे पुरुष होते, त्यांचा पुत्र मुकुटराव हा वयानें ११-१२ वर्षांचा असून, दिसण्यांत हुशार व तरतरीत असा होता. तो बायजाबाईसाहेबांनीं पांच मुलांतून पसंत केला. त्याला थोडें लिहितां वाचतां येत असून, घोड्यावर बसण्याचेंही ज्ञान होतें. त्यामुळें दरबारच्या मराठे मंडळीस त्याचीच निवड पसंत वाटली. ह्या मुलाची जन्मपत्रिका संस्थानच्या विद्वान् ज्योतिष्यांनीं पाहिली, व मुलाचे उच्च प्रतीचे ग्रह वर्तविले. त्याचप्रमाणें सामुद्रिकांनीं त्याच्या शरीरावर राजचिन्हें आहेत असे सांगितलें. ह्याप्रमाणें राजपद उपभोगण्यास हा मुलगा पात्र आहे, असें सशास्त्र ठरल्यानंतर, शनिवार ता. १६ जून इ. स. १८२७ रोजीं, बायजाबाईसाहेबांनी आपले बंधु हिंदुराव आणि ग्वाल्हेरचे दिवाण बापूजी रघुनाथ, व इतर मुत्सद्दी व सरदार लोक ह्यांस पाचारण करून त्यांचा दरबार भरविला, व त्यामध्यें हा मुलगा दत्तक घेऊन त्यास संस्थानाचा अधिपति करण्याबद्दल त्यांची संमति विचारली. सर्व मंडळींनीं मुलगा पसंत करून त्यास गादीवर बसविण्याबद्दल आपलें पूर्णपणे अनुमोदन दिलें. नंतर बाईसाहेबांनीं ता. १८ जून इ. स. १८२७ ह्या शुभदिनीं दत्तविधान व राज्याभिषेक समारंभ करण्याचा बेत []ठरविला. बाईसाहेबांच्या मनांत ह्या मुलांस आपल्या मुलीची कन्या देऊन त्याचें लग्न करावें अशी इच्छा उत्पन्न झाली. तेव्हां त्यांनी शास्त्री व पंडित लोकांस बोलावून त्यांच्याकडून उभयतांचीं टिपणें पाहविलीं. त्यांत उभयतांची गणमैत्री जमल्यामुळें बाईसाहेबांनी आनंददायक राज्याभिषेकसमारंभाबरोबर मंगलकारक लग्नसमारंभही करण्याचे ठरविलें.
 रविवार ता. १७ जून रोजीं ग्वाल्हेर येथील राजवाड्यांत मुकुटराव ह्यांचा दत्तविधनिविधि व लग्नसमारंभ फार थाटानें झाला. नंतर दुसरे दिवशीं-ह्मणजे सोमवार ता. १८ रोजीं, राज्याभिषेक समारंभ झाला. ह्या दिवशीं सर्व नगरामध्यें आनंदप्रदर्शनार्थ गुढ्या तोरणें उभारली होतीं; व जिकडे तिकडे मंगलोत्सव दृष्टीस पडत होता. त्या दिवशीं प्रातःकाळीं वधूवरांची वरात हत्तीवरून मोठ्या समारंभानें वाजत गाजत निघाली व गृहप्रवेश होऊन बायजाबाईसाहेबांनी उभय मुलांस मांडीवर घेऊन त्यांच्या तोंडांत साखर घातली. ह्याप्रमाणें लग्नसोहळा झाल्यानंतर राजवाड्यामध्यें राज्याभिषेकाचा थाट उडाला. ब्रिटिश रेसिडेंट मेजर स्टुअर्ट व त्यांचे असिस्टंट आणि इतर युरोपियन लष्करी कामगार आपापले दरबारी पोषाख करून व सुवर्णांकित म्यानाच्या समशेरी कमरेस लटकावून सभास्थानीं येऊन दाखल झाले. त्याचप्रमाणें ग्वाल्हेर संस्थानचे सर्व सरदार, दरकार, मानकरी, मुत्सद्दी वगैरे लोक आपापल्या इतमामानिशीं दरबारांत हजर झाले. राजवाड्यापुढें घोडेस्वार, शिबंदी, प्यादे ह्यांची निरनिराळीं पलटणें खडी ताजीम देण्याकरितां खडीं होती. ह्याप्रमाणें दरबार भरून सुमुहूर्त वेळा प्राप्त होतांच, हिंदुरावांनीं मुकुटराव ह्यांस अंतःपुरांतून दरबारमहालामध्यें आणिलें. नंतर ब्रिटिश रेसिडेंट व सर्व दरबारी लोक ह्यांनीं खडी ताजीम देऊन महाराजांस सिंहासनावर आरूढ केलें. तों इकडे तोफा व बंदुका ह्यांचे मोठमोठे आवाज निघून त्यांनी नभोमंडल भरून गेलें. ह्याप्रमाणें मुकुटराव ग्वाल्हेरचे अधिपति झाल्यानंतर मेजर स्टुअर्ट ह्यांनीं गव्हरनर जनरलसाहेबांचा खलिता व उभय वधूवरांस सादर करण्याकरिता त्यांच्याकडून आलेली बहुमूल्य खिलात अर्पण केली. नंतर सरदार व बडे लोक ह्यांनी अनेक नजरनजराणे व मूल्यवान् वस्त्रें महाराजांस व बाईसाहेबांस नजर केली. ह्या वेळीं मुकुटराव ह्यांस शिंदे घराण्यांतील रणशूर वीर जनकोजी

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 82 crop) हिंदुराव घाटगे
हिंदुराव घाटगे.
ह्यांचें अभिधान देण्यांत आलें, व त्यांच्या नांवानें जयघोष करण्यांत आला. ह्याप्रमाणें मध्यान्ह समय पावेतों समारंभ होऊन, रीतीप्रमाणे अत्तरगुलाब व पानसुपारी होऊन दरबार बरखास्त झाला.

 राज्याभिषेकसमारंभ आटोपल्यानंतर बायजाबाईसाहेब ह्यांनीं ग्वाल्हेर दरबारचे सरदार व मुत्सद्दी लोक ह्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें पोषाख व बहुमान देऊन संतुष्ट केलें. कै. महाराज दौलतराव शिंदे ह्यांचे कारकीर्दींत जे लोक आपल्या कर्तृत्वशक्तीनें आणि मर्दुमकीनें योग्यतेस चढले होते, त्यांस व त्यांच्या वंशजांस बायजाबाईसाहेबांनीं पूर्णपणें अभय देऊन, त्यांच्या पूर्वींच्या जहागिरी, तैनाती अथवा नेमणुका ह्यांत बिलकूल अंतर पडूं दिलें नाहीं. त्यामुळें त्यांची कारकीर्द लोकप्रिय होऊन सर्व लोक त्यांच्या आज्ञेमध्ये वर्तूं लागले; व दरबारची शिस्त उत्तम राहून ग्वाल्हेरच्या प्रजेस राजक्रांतीचे कोणतेही दुःख सहन करण्याचा प्रसंग आला नाहीं.

 बायजाबाईसाहेब ह्यांच्या दरबारीं कोण कोण सरदार व मुत्सद्दी होते ह्यांची माहिती उपलब्ध झाली आहे. ती पाहिली ह्मणजे बायजाबाईंची जुन्या सेवकांविषयींची प्रीति व राजव्यवहारचातुर्य ह्या गुणांचें प्रकाशन झाल्यावांचून राहत नाही. जातीची अबला होऊन ज्या राजस्त्रीनें आपल्या दरबारांत राजकारस्थानपटु, तरवारबहादुर, व बुद्धिवैभवसंपन्न अशा मंत्रिमंडळाचा व सेनाग्रंणींचा संग्रह केला होता, त्या स्त्रीच्या शहाणपणाची व हुशारीची तारीफ कोण करणार नाहीं? असो. बायजाबाईसाहेबांच्या दरबारांत जे सरदार व मुत्सद्दी होते त्यांची माहिती येणेप्रमाणेः-

 जयसिंगराव घाटगे हिंदुरावः—हे सखारामराव घाटगे सर्जेराव ह्यांचे चिरंजीव व बायजाबाईसाहेबांचे वडील बंधु होत. सर्जेराव घाटगे ह्यांचा दौलतराव शिंदे ह्यांच्या दरबारी इ. स. १८१० सालीं वध झाला. नंतर जयसिंगराव हे इ. स. १८१५ चे सुमारास ग्वाल्हेरीस गेले. तोंपर्यंत हे दक्षिणमहाराष्ट्रांतील आपल्या कागलच्या जहागिरीचा उपभोग घेत होते. कोल्हापुरचे महाराजांनीं ह्यांस 'हिंदुराव' व 'वजारतमाब' असे किताब दिले होते. त्यावरून हे 'हिंदुराव' ह्याच नांवाने प्रसिद्ध होते. हे बायजाबाईसाहेबांचे सख्खे बंधु असल्यामुळें व बायजाबाईसाहेबांचें दौलतराव शिंदे ह्यांचेवर चांगलें वजन असल्यामुळें हे ग्वाल्हेरच्या दरबारांत तेव्हांच मोठ्या योग्यतेस चढले. हे स्वभावतः मोठे बाणेदार व तेजस्वी असून, स्वातंत्र्यप्रियता हा गुण त्यांचे अंगीं फार वसत असे. त्यामुळें संस्थानांतील हांजी हांजी करणाऱ्या लोकांवर त्यांची तेव्हांच छाप पडत असे. दौलतराव शिंदे ह्यांची हिंदुरावांवर पुढें पुढें इतकी मेहेरबानी जडली कीं, त्यांनी त्यांस १,५०,००० रुपयांची जहागीर बक्षीस दिली, व आपल्या दरबारांत त्यांस पहिल्या प्रतीचे सरदार केलें. एवढेंच नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक हिताहिताच्या गोष्टीबद्दलही ते काळजी घेऊं लागले. हिंदुराव ग्वाल्हेरीस राहूं लागल्यानंतर इ. स. १८२५ सालीं, कागलची जहागीर कोल्हापुरच्या महाराजांनी पुनः जप्त केली; व कागलच्या किल्यावर स्वसैन्यानिशीं चालून जाऊन तो हस्तगत केला; आणि हिंदुरावांच्या मातुश्रींस व इतर कुटुंबीय मंडळीस तेथून घालवून दिले. त्या वेळीं दौलतराव शिंदे ह्यांनी इंग्रजसरकारांस मध्यस्थी घालून कोल्हापुरच्या महाराजांकडून ही जहागीर परत मिळवून देण्याची खटपट केली. ह्या संबंधाने महाराजांची अट अशी होती कीं, हिंदुरावांनी आपल्या दरबारांत जहागीर मागण्यास स्वतः यावें. परंतु हिंदुराव ती गोष्ट मान्य करीनात. अखेर इंग्रजसरकारांनी कोल्हापुरावर सैन्य नेलें; तेव्हां कोल्हापुरच्या महाराजांनी, ता. ३० डिसेंबर इ. स. १८२५ रोजीं, इंग्रजांशी तह करून हिंदुरावांची जहागीर सोडून दिली; व त्यांना कोणत्याही प्रकारें उपद्रव करणार नाही असे मान्य केलें. ह्या एकाच गोष्टीवरून दौलतराव शिंद्यांचे दरबारीं हिंदुरावांची किती प्रतिष्ठा वाढली होती, ह्याची कल्पना करितां येईल. इ. स. १८२६ सालीं दौलतराव शिंदे ह्यांनीं, गव्हरनर जनरल लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांची आग्रा मुक्कामीं भेट घेण्याकरितां, आपल्या वतीनें हिंदुराव ह्यांस आपले प्रतिनिधि ह्मणून पाठविलें होते. अर्थात् हिंदुराव हे ग्वाल्हेर दरबारचे प्रमुख सूत्रधार बनल्यामुळें, दौलतराव शिंदे ह्यांच्या मृत्यूनंतर बायजाबाईसाहेबांनीं त्यांना आपले प्रधान मंत्री व सर्व राजकारणाचे आधारस्तंभ बनवावेत ह्यांत नवल नाहीं. बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दींतील बहुतेक राजकारणांत हिंदुरावांचा संबंध असून, त्यांच्या यशापयशाचा पुष्कळ वांटा त्यांच्याकडे आहे, असे ह्मणण्यास हरकत नाहीं.

 बापूजी रघुनाथः- हे जातीचे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु होते. ह्यांचें उपनांव दिघे. हे बडोद्याचे प्रख्यात मुत्सद्दी विठ्ठलराव देवाजी ह्यांच्या वशिल्याने गायकवाड सरकारच्या पागेचे अधिपति झाले. गायकवाड सरकारचें व धारच्या पवारांचे नातें होतें. गोविंदराव गायकवाड ह्यांची कन्या धारचे रणशूर व पराक्रमी राजे यशवंतराव पवार, जे पानिपतच्या तुमुल रणकंदनांत इ. स. १७६१ सालीं पतन पावले, त्यांच्या पुत्रास-ह्मणजे खंडेराव पवारांस दिली होती. त्यांचे पुत्र आनंदराव पवार ह्यांस गोविंदराव गायकवाडाच्या पत्नी गहिनाबाईसाहेब ह्यांची सख्खी भाची मैनाबाई ही दिली होती. आनंदराव पवार इ. स. १८०७ सालीं मृत्यु पावले. त्यांस औरसपुत्र नसून त्यांच्या पत्नी मैनाबाई ह्या गरोदर होत्या. त्या अबला आहेत असें पाहून, धारच्या पवारांचा मुरारराव नामक एक दासीपुत्र, स्वतः सर्व राज्यकारभार बळकावून, त्यांना फार त्रास देऊ लागला; व संस्थानांत दंगेधोपे करू लागला. त्यामुळें धार येथे झोटिंगबादशाही होऊन, शिंदे होळकर वगैरे प्रबल सरदारांस आपला फायदा करून घेण्यास चांगली संधि मिळाली. त्या वेळीं धारसंस्थानास मदत करण्याकरितां बडोद्याच्या राणी गहिनाबाईसाहेब ह्यांनी सखाराम चिमणाजी नामक एका शूर सरदाराबरोबर कांहीं सैन्य देऊन तिकडे पाठविलें. त्यांनी तिकडे जाऊन बराच बंदोबस्त केला; परंतु त्यांस तेथील प्रमत्त लोकांचे पारिपत्य करण्याकरिता आणखी एका शूर सरदाराची अवश्यकता भासूं लागली. ह्मणून त्यांनी बडोद्याहून बापूजी रघुनाथ ह्यांस बोलावून नेलें; व त्यांस सेनापतीचा अधिकार दिला. पुढें कांही दिवसांनी सखाराम चिमणाची मृत्यु पावले. तेव्हां धारची दिवाणगिरी बापूजी रघुनाथ ह्यांजकडे आली. त्यांनी मोठ्या शहाणपणानें व शौर्यानें शत्रूंचा पराभव करून धारच्या राज्यांत शांतता स्थापन केली. ह्यांच्या कारकीर्दींत इ. स. १८१७ सालीं माळव्यामध्ये राज्यक्रांति घडून आली, व सर जॉन मालकम हे माळव्याच्या बंदोबस्ताकरितां आले. त्यांजबरोबर ह्यांनी ता. १० जानेवारी १८१९ रोजीं मित्रत्वाचा तह करून धार संस्थानाचे रक्षण केले. ह्यांचे कारकीर्दींत धार संस्थानांत अनेक सुधारणा होऊन प्रजा सुखी झाली. ह्यांनी मैनाबाईचे चिरंजीव रामचंद्रराव पवार ह्यांचा, दौलतराव शिंदे ह्यांची नात अन्नपूर्णाबाई हिजबरोबर, मोठ्या थाटानें विवाहसमारंभ करून, ग्वाल्हेर व धार ह्या दोन्ही संस्थानांचा प्रेमसंबंध दृढतर केला. ह्यांचे शहाणपण व राजकारणकौशल्य पाहून दौलतराव शिंदे ह्यांची त्यांच्यावर फार प्रसन्न मर्जी झाली, व त्यांनी इ. स. १८२६ साली त्यांना ग्वाल्हेर येथे नेऊन दिवाणगिरीची वस्त्रें अर्पण केलीं. पुढें दौलतराव शिंदे लवकरच वारले. तथापि, बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रख्यात मुत्सद्याची कर्तृत्वशक्ति व धूर्तता लक्ष्यांत घेऊन, त्यांस आपल्या कारकीर्दींत मुख्य प्रधानकीचीं वस्त्रें दिली. बापूजी रघुनाथ ह्यांच्यासारख्या कीर्तिशाली मुत्सद्याचे योग्य सद्गुण ध्यानीं घेऊन, बायजाबाईसाहेबांनी त्यांस आपल्या दरबारांतील प्रधानपद सादर केलें, हीच गोष्ट त्यांच्या शहाणपणाची दर्शक आहे. उत्तम मंत्र्याची निवड करणें हा महत्त्वाचा गुण होय. तो बापूजी रघुनाथ ह्यांच्या नेमणुकीवरून, बायजाबाईसाहेबांच्या अंगीं चांगल्या रीतीनें वास करीत होता, असे दिसून येते.[]
 यशवंतराव दाभाडेः—हे तळेगांवच्या रणशूर सेनापति दाभाडे ह्यांच्या घराण्यांतील पुरुष होत. पेशव्यांनी लष्करी सत्ता आपल्या हाती घेतल्यामुळें हें घराणें पुढें नामशेष झाले होते. परंतु दौलतराव शिंद्यांनी यशवंतरावांस आश्रय देऊन आपल्या दरबारचे सरदार केलें होतें. शिंद्यांच्या मुलुखांत त्यांस ७०,००० हजारांची जहागीर होती. शिवाय दक्षिणेंत, खासगी जहागीर व तळेगांव व इंदुरी हीं दोन इनाम गांवें मिळून एकंदर ३१,१५० रुपयांचें उत्पन्न होते. ह्यांचे चिरंजीव मन्याबा ऊर्फ बाबुराव ह्यांस दौलतराव शिंद्यांनी आपली वडील मुलगी चिमणाबाई ही दिली होती. हिच्या पोटीं त्यांस एकंदर तीन कन्या झाल्या. त्यांपैकी एक धारचे राजे आनंदराव पवार ह्यांस आणि दुसरी महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस दिली होती. त्यामुळे बाबुराव दाभाडे बायजाबाईसाहेबांचे जावई होते. त्यांनी त्यांस दरमहा २५०० रुपयांची तैनात करून देऊन आपल्या दरबारांतील सरदारी सांगितली.

 यशवंतरावभाऊः–हे जावद प्रांताचे व मेवाडांतील इतर जिल्ह्यांचे सुभेदार होते. ह्या प्रांतांचा सर्व वसूल पूर्वीं त्यांच्याकडे सोंपविला असून, त्यांत त्यांनीं आपल्या हाताखालील सैन्याचा खर्च भागवावा, असा ठराव होता. यशवंतरावभाऊ हे दौलतराव शिंद्यांचे प्रख्यात सेनापति जिवबादादा बक्षी ह्यांचे चिरंजीव होत. ह्यांचे बंधु नारायणराव ह्यांस सर्जेराव घाटग्यांनी इ. स. १८०० मध्ये तोफेच्या तोंडी देऊन निर्दयपणानें मारिलें होते. यशवंतरावभाऊ हे शिंद्यांच्या दरबारांतील पुढारी सरदारांपैकी एक असून दौलतरावांच्या कारकीर्दींत ह्यांची फार भरभराट असे. ह्यांनी पेंढारी लोकांस इ. स. १८१७-१८ मध्यें साहाय्य केल्यामुळें व त्यांचें रक्षण केल्यामुळें ह्यांची व बंगालच्या सैन्याचे अधिकारी मेजर जनरल ब्रौन ह्यांची लढाई होऊन ह्यांच्या सैन्याचा फार नाश झाला होता. पुढें इंग्रज सरकारचा व दौलतरावांचा तह होऊन मेवाड प्रांत ग्वाल्हेर संस्थानांतून गेल्यानंतर यशवंतरावभाऊ हे ग्वाल्हेरीस येऊन राहिले. ह्यांची स्वतःची जहागीर ४०,००० हजारांची असून ती बायजाबाईसाहेबांनीं त्यांच्याकडे चालविली. ह्यांस शिंदे सरकारच्या दरबारांत फार मान असून हे त्या वेळच्या मुत्सद्दी मंडळींतील एक अग्रणी होते.

 लालाभाऊः—हे दौलतराव शिंद्यांचे प्रसिद्ध सरदार गोपाळराव भाऊ ह्यांचे चिरंजीव होत. शिंदे सरकारांकडून ह्यांस एक लाख रुपयांची जहागीर होती. ह्यांचे वय २५ वर्षांचे असून त्यांच्याकडे दक्षिणेंतील सातारा जिल्ह्यापैकीं वांकडी व अहमदनगरपैकी बेलापुर अशीं दोन गांवें इनाम होतीं. ह्यांच्याकडे बायजाबाईसाहेबांच्या दरबारांतील सरदारीचे काम होतें.

 फकीरजी गाढवेः-हे सातारा जिल्ह्यांतील वाई गांवचे रहिवासी असून जातीचे धनगर होते. हे प्रथमतः महादजी शिंद्यांचे हाताखाली १०० स्वारांचे शिलेदार होते. ह्यांनी इ. स. १७९८ सालीं महादजी शिंद्यांच्या बायकांचे व दौलतरावांचे वैमनस्य होऊन जो दंगा झाला, त्या वेळीं सर्जेराव घाटग्यांस मदत केली; व पुढेंही वेळोवेळी अनेक साहसाचीं कृत्यें करण्यांत त्यांस साहाय्य केलें. त्यामुळे दौलतरावांची त्यांजवर मेहेरबानी जडून, त्यांस सैन्याच्या एका तुकडीचे स्वतंत्र आधिपत्य मिळालें होतें. ह्यांनीं सर्जेरावांच्या बरोबर जरी कांहीं निर्दयपणाचीं कृत्ये केली होतीं, तथापि पुढे गोपाळरावभाऊबरोबर उत्तर हिंदुस्थानांत त्यांनी शौर्याचीं चांगलीं कामेंही अनेक केली. त्यामुळें ह्यांच्या शूरपणाची शिंद्यांच्या दरबारांत प्रसिद्धी होती. बायजाबाईनीं फकीरजी गाढवे हे आपल्या यजमानाच्या वेळचे जुने सरदार आहेत असें पाहून, त्यांच्याकडे खासपागेपैकी २०० स्वारांचे आधिपत्य सांगितले.

 उदाजी कुटकेः–हे जातीचे धनगर असून अहमदनगर जिल्ह्यांतील कोळ पिंपळगांवचे राहणारे होत. हे दौलतराव शिंद्यांचे कारकीर्दीतील एक प्रख्यात सरदार होते. ह्यांच्याकडे 'सरनोबत' हा अधिकार असून २००० स्वारांच्या कांटिंजंट फौजेचे आधिपत्य होतें. ही फौज शिंदे सरकारची होती, तथापि तिच्यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांची देखरेख असे. हे नेहमीं गुणा येथील छावणीमध्यें राहत असत. बायजाबाईसाहेबांनी ह्यांच्याकडे सरनोबतीचे पद देऊन, पूर्वींप्रमाणेच कांटिंजंट फौजेचेही काम सांगितलें.

 माधवरावपंत ब्रह्माजीः-हे शिंदे सरकारच्या तोफखान्याचे अधिपति होते. हें काम त्यांच्याकडे इ. स. १८०९ पासून होतें. हे जुने व प्रामाणिक नौकर असें पाहून बाईसाहेबांनीं तेंच काम त्यांस सांगितलें. दौलतराव शिंदे ह्यांनीं सहा पायदळ पलटणी व त्यांच्या बरोबरच्या २० तोफा ह्यांच्या ताब्यात दिल्या होत्या, व त्यांच्या खर्चाकरितां स्वतंत्र मुलूख तोडून दिला होता. हे अहमदनगर जिल्ह्यांतील साकुरमांडव्याचे कुळकर्णी होते. परंतु केवळ स्वतःच्या कर्तबगारीने उदयास चढले. बायजाबाईसाहेबांनी ह्यांचा पूर्वींचा इतमाम ह्यांच्याकडे तसाच कायम ठेविला.
 लक्ष्मणराम विठ्ठलः- हे मूळचे दक्षिणेंतील चांभारगुंडी गांवचे रहिवासी होत. ह्यांचे वडील विठ्ठल महादेव ऊर्फ विठ्ठलपंत तात्या हे दौलतराव शिंद्यांच्या दरबारांत नामांकित मुत्सद्दी होते. ह्यांनीच इ. स. १८०३ सालीं, सर आर्थर वेलस्ली साहेबांबरोबर सुर्जीअंजनगांवचा तह ठरविला होता. ह्यांचें शहाणपण जाणून दौलतराव शिंदे ह्यांनी त्यांच्याकडे दरबारवकिलीचें काम सोपविलें होते. ह्यांचें सर आर्थर वेलस्ली, सर जॉन मालकम इत्यादि युरोपियन मुत्सद्यांवर चांगले वजन []असे. त्यांचे चिरंजीव लक्ष्मणराव विठ्ठल हे होत. ह्यांस बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेरचे किल्लेदार नेमून, त्यांच्या सैन्याच्या खर्चाकरिता ग्वाल्हेरसभोंवतालची ५०।६० गांवें त्यांस जहागीर दिलीं.
 रामराव फाळकेः–हे वाईप्रांतांतील जुने मराठे सरदार ग्वाल्हेर दरबारी होते. बायजाबाईसाहेबांनी ह्यांच्या हाताखालीं ४०० शिलेदार स्वार देऊन त्यांचे आधिपत्य त्यांस सांगितले.
 मणीराम शेटः–शिंद्यांच्या राज्यामध्यें मुख्य फडणीस गोकुळ पारख ह्मणून एक धनाढ्य पेढीवाला होता. तो इ. स. १८२७ सालीं मृत्यु पावला. तेव्हां त्याचे काम बायजाबाईंनीं जयपुरचे रहिवासी मणीराम शेट ह्यांजकडे सांगितले. हे पूर्वीं अगदीं गरीब स्थितीत होते. परंतु पुढें इतके द्रव्यसंपन्न झाले कीं, शिंद्यांच्या लष्करांत त्यांची बरोबरी कोणाच्यानेंही करवेना. ह्यांचें सर्व सावकारांवर व पेढीवाल्यांवर अतिशय वजन असून त्यांची सल्लामसलत घेतल्यावांचून सरकारास एक रुपयाही कोणी कर्ज देत नसे. ह्यांची पेढी "मणीराम आणि लखमीचंद" ह्या नांवाने त्या वेळी प्रसिद्ध असे.
 दाजीबा पोतनीसः—शिंदे सरकारच्या राज्यांतील मुख्य पोतनिशीचें काम ह्या गृहस्थाकडे होतें. हे दौलतराव शिंद्यांच्या कारकीर्दींत स्वामिनिष्ठ व प्रामाणिक सेवक ह्मणून प्रसिद्ध होते. बायजाबाईंनींही आपल्या कारकीर्दींत तेंच काम त्यांच्याकडे सोपविलें. ह्यांचे बंधु कृष्णराव ह्यांच्याकडे हा हुद्दा महादजी शिंद्यांचे वेळेपासून होता. परंतु कृष्णरावांचे पश्चात् त्यांचे चिरंजीव अमृतराव हे अज्ञान व अल्पवयी असल्यामुळें दाजीबा हेच सर्व काम पाहत असत.

 आत्माराम शिवरामबाबा वांकडेः–ह्यांचे पूर्वज लक्ष्मणराव वांकडे हे पुण्याचे रहिवासी असून, महादजी शिंदे ह्यांचे बरोबर उत्तर हिंदुस्थानांत आले होते. ह्यांच्याकडे प्रथम पोतनिशीचें काम होतें. पुढें कांहीं कारणामुळें ते त्या कामावरून दूर झाले. त्यांचे पश्चात् दौलतराव शिंदे ह्यांनीं तात्या पागनीस ह्यांजकडे तें काम सांगितलें. ते मृत्यु पावल्यानंतर लक्ष्मणराव ह्यांचे नातू आत्मारामपंत ह्यांस तें काम सांगितले. दोन वर्षेंपर्यंत ते काम त्यांनी उत्तम रीतीने बजावल्यामुळें सर्जेराव घाटगे ह्यांची त्यांजवर फार मेहेरबानी जडली, व त्यांनी त्यांस खासगी दिवाण नेमिलें. पुढें सर्जेराव इ. स. १८१० सालीं मृत्यु पावल्यानंतर कांहीं दिवस ते स्वस्थ होते. परंतु ते चतुर व दूरदर्शी मुत्सद्दी असल्यामुळें दौलतराव शिंद्यांची त्यांच्यावर पुनः कृपा जडली, व त्यांच्या दरबारामध्यें त्यांचा पगडा बसला. दौलतरावांच्या पश्चात् बायजाबाईसाहेबांनीं त्यांस आपले खासगी दिवाण नेमिलें. ते बायजाबाईसाहेबांच्या दरबारांत आत्माराम पंडित ह्या नांवाने प्रसिद्धीस आले.

 कर्नल जेकबः—हा आर्मीनिया प्रांतांतील मूळचा राहणारा इसम स्वपराक्रमानें दौलतराव शिंदे ह्यांच्या पदरीं योग्यतेस चढला. ह्याच्याकडे १३ पायदळ पलटणी, ४०० घोडेस्वार, व एकंदर ५२ तोफा होत्या. ह्या सैन्याची व्यवस्था त्यानें फार चांगली ठेविली होती व त्याचा पगार वगैरे वेळच्यावेळीं तो देत असे. त्याबद्दल कर्नल जेकब ह्यांस स्वतंत्र प्रांत तोडून दिला होता. बायजाबाईसाहेबांनीं दौलतराव शिंदे ह्यांच्या व्यवस्थेंत कांहीं फेरफार न करितां, कर्नल जेकब ह्याजकडे पूर्वींप्रमाणे जायदाद व अधिकार कायम ठेविले.  कर्नल जॉन बॅप्टिस्ट फिलोजः—हा शिंदे सरकारच्या दरबारामध्यें "जॉन बत्तीस" ह्या नावानें प्रसिद्ध आहे. हा जातीचा फराशीस होता. ह्यानें दौलतराव शिंद्यांचे कारकीर्दींत अनेक लढाया मारून फार प्राबल्य मिळविलें होतें. हा शूर, धाडशी व प्रसंगावधानी असल्यामुळें ह्याची शिंद्यांच्या दरबारांत बरीच छाप बसली होती. ह्यानें केरोली, चंदेरी, राघोगड, बहादुरगड, लोहपाड वगैरे ठिकाणच्या रजपूत व बुंदेले राजांवर स्वाऱ्या करून व त्यांना जेरीस आणून, त्यांचा प्रांत काबीज केला होता. परंतु हा इसम स्वार्थसाधु असल्यामुळे दौलतराव शिंद्यांची ह्याजवर गैरमर्जी झाली; व त्यांनी त्यास इ. स. १८१७ मध्ये ग्वाल्हेरीस आणून सक्त नजरकैदेंत ठेविलें होते. पुढें ह्यानें, दौलतरावांचे मुख्य खजानची किंवा फडणीस गोकुळ पारख ह्यांजकडे संधान लावून, इ. स. १८२५ साली आपली सुटका करून घेतली. तेव्हांपासून हा धाडशी व महत्वाकांक्षी सरदार मोकळाच होता. बायजाबाईसाहेबांनीं ह्यास मोकळा ठेवून उपयोगी नाहीं असे मनांत आणून, त्यास दरबारांत हजर राहण्याची परवानगी दिली, व सैन्याच्या एका छोट्या पथकाचा अधिकार दिला. ह्या पुरुषाने पुढे ग्वाल्हेर दरबारांतील राजकारणांत चांगलाच प्रवेश केला व तेथे वर्चस्व संपादन केलें.

 मेजर जोसेफ आलेक्झांडरः---ह्यास "जोशी शिकंदर" किंवा "सवाई शिकंदर" असे ह्मणत. हा पूर्वीं जान बत्तिसाच्या सैन्यामध्यें एक लहानसा सेनाधिकारी होता. परंतु जान बत्तीस ह्याजवर मध्यंतरीं दौलतराव शिंदे ह्यांची इतराजी झाली व त्याचें सेनाधिपत्य त्यांनीं काढून घेतलें, त्या वेळीं ह्यास सर्व कंपूंचें आधिपत्य देण्यात आले. तें त्याजकडे पुष्कळ वर्षें होते. पुढे इ. स. १८२१ साली, बुंदेलखंडांतील एका राजाचें व जोशी शिकंदर ह्याचें भांडण झालें. त्या वेळीं ब्रिटिश सरकार मध्यें पडून त्यांनी शिंदे सरकाराकडून त्यास ग्वाल्हेरीस परत बोलाविलें; व त्यास खुद्द ग्वाल्हेर येथे ठेवविलें. ह्याच्या ताब्यात दोन जंगी कंपू आणि दोनशे घोडेस्वार असत. बायजाबाईसाहेबांनी त्याच्याकडे तेवढेंच सैन्य ठेविलें.

 बायजाबाईसाहेब ह्यांनी ह्या सर्व मुत्सद्यांच्या व सरदारांच्या साहाय्यानें ग्वाल्हेरचा राज्यकारभार पाहण्यास आरंभ केला. त्यांनी राज्यसूत्रें हाती घेतली नाहींत तोंच त्यांच्या पुढें दोन महत्त्वाचे राजकीय प्रश्न उपस्थित झाले. महाराज दौलतराव शिंदे हे मृत्यु पावल्यानंतर त्यांच्या पश्चात् ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पाहण्यास ब्रिटिश सरकारानें बायजाबाईसाहेब यांस पूर्ण मोकळीक दिली. परंतु त्यांनीं दक्षिणेंतील शिंद्यांच्या ताब्यांतील गांव जे दौलतरावांच्या हयातीपर्यंत त्यांजकडे चालविले होते, ते सोडून देण्याबद्दल बायजाबाईसाहेब ह्यांचे जवळ बोलणें लाविलें, व कांटिंजंट फौजेच्या खर्चाची तजवीज करण्याबद्दल तगादा लावला. ह्या दोन्ही प्रश्नांचा समाधानकारक निकाल करणें फार कठीण होते. ज्या वेळी इ. स. १८०३ सालीं सुर्जीअंजनगांव येथें तह झाला, त्या वेळीं असें ठरलें होतें कीं, शिंद्यांच्या घराण्याकडे पूर्वापार चालत आलेले जे इनाम गांव व बाबती व सरदेशमुखीचे हक्क आहेत, ते कायम ठेवून, बाकीचे गांव इंग्रजांच्या स्वाधीन करावेत. परंतु पुढें ह्या इनाम गांवांबद्दल वाद उपस्थित झाला. तहाच्या इंग्रजी कागदांतील कलमांत, "इनाम" ह्या शब्दाचा उल्लेख न करितां फक्त "शिंद्याकडे चालत आलेले गांव" असेंच ह्मटलें होतें. त्यावरून शिंद्यांच्या तांब्यांतील कोणते गांव सोडावे व कोणते न सोडावे ह्याबद्दल वाद उत्पन्न झाला. अखेर ह्या संदिग्ध प्रश्नाचा इ. स. १८२२ मध्यें असा निकाल झाला कीं, दौलतराव शिंदे जोपर्यंत हयात आहेत, तोंपर्यंत त्यांच्या ताब्यांत असलेले सर्व गांव त्यांजकडे चालवावे व त्यांचे पश्चात् त्यांचे खासगत इनाम गांव खेरीजकरून, बाकी सर्व गांव खालसा करावेत. त्याप्रमाणें दौलतराव शिंदे वारल्यामुळें त्यांचे पश्चात् दक्षिणेंतील गांव खालसा करण्याबद्दल हिंदुस्थान सरकारचा ता. २४ मार्च इ. स. १८२८ रोजीं नवीन ठराव होऊन आला. तो ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी बायजाबाईसाहेब ह्यांस सादर केला. सुर्जीअंजनगांवच्या तहामध्यें इनाम गांवांची यादी बरोबर न देतां, अदमासानें कांहीं तरी नांवें दिलीं होतीं; त्या चुकीचा परिणाम आतां भोगण्याचा प्रसंग आला. बायजाबाईसाहेब ह्यांस शिंद्यांच्या घराण्याकडे फार दिवस चालत आलेले गांव सोडून देऊन दक्षिणेंतील आपला संबंध नाहींसा करणे इष्ट वाटेना. तेव्हा त्यांनीं रेसिडेंटमार्फत अनेक तडजोडी करण्याचे प्रयत्न केले. परंतु, इंग्रज सरकारास राजकीयदृष्ट्या शिंद्यांचा संबंध सातपुड्याच्या पलीकडे दक्षिणेंतील गांवांवर असणें बरोबर वाटत नसल्यामुळें त्यांनीं तीं गांवे आपल्या ताब्यात घेण्याचा आग्रह धरला. अर्थात् सार्वभौम प्रभूचा विशेष आग्रह पडल्यामुळें बायजाबाईसाहेबांस दक्षिणेंतील ८९ १/२ गांव इंग्रजांच्या ताब्यात देणें भाग पडले. त्याप्रमाणें त्यांनी आनंदराव दत्तात्रय कमाविसदार ठाणें जामगांव ह्यांस गांवे सोडण्याबद्दल सनद पाठविली. ती येणेप्रमाणेः-

 "राजश्री आनंदराव दत्तात्रय कमाविसदार ठाणें जामगांवः-

 स्नेहांकित बायजाबाई शिंदे दंडवत सु॥ तिस्सा अशरीन मयातैन व अलफ. सुर्जेअंजनगांवचे मुक्कामीं कंपनी इंग्रजबहादूर यांचा व आपला तहनामा झाला. त्यांत आठवे कलमांत, दक्षणचे रुखेशीं श्रीमंत पेशवेसाहेब ह्यांचे मुलुकांत, आपले पिढीदरपिढीपासून कितेक परगणे व तालुके व गांव सुदामत वडिलोपार्जित चालत आले, त्याप्रमाणें चालावे असा करार ठरला असतां, तहनामा करावयाचे समयीं कागद पत्राचा दाखला, वहिवाटीस तालुके व परगणे व फुटकर देहें चालत आहेत त्यांचा न पाहतां, गैरमाहितीनें जबानीवरून, परगणे व तालुके व देहें लिहिले; त्यांत सुदामतपासून वहिवाट चालत आली त्याप्रमाणें तालुके व देहें लिहिले गेले नाहींत. परंतु त्यांची वहिवाट आजपर्यंत आपल्याकडे चालत आली असतां, तहनाम्याखेरीज साडेएकूणनव्वद देहें सोडून देण्याविषयीं कंपनी इंग्रजबहादूर यांचे ह्मणणें पडलें. सबब * * * * * साडेएकूणनव्वद देहें खालसा व दुमाला मिळून आहेत ते सोडून कंपनी इंग्रजबहादूर यांजकडे द्यावयाचें ठरलें. त्याजवरून ही सनद तुह्मांस सादर केली असे. तरी सदर्हू साडेएकूणनव्वद देहें कंपनी इंग्रजबहादूर यांजला लिहून, अंमलदार यांचे स्वाधीन, सरदेशमुख्या व पाटीलक्या व मोकदम्या व नावघाट वगैरे वतनबाब खेरीजकरून देणें. साहेबबहादूर यांजकडील अंमलदार सदर्हू गांवीं अंमल करतील. तुह्मीं दखलगिरी न करणें. जाणीजे. छ. २४ रबिलाखर हे विनंति. (मोर्तबसुद)"[]
 ह्याप्रमाणे दक्षिणेंतील गांवें इंग्रजांच्या ताब्यात देऊन एका प्रश्नाचा निकाल लागला. परंतु दुसरा ब्रिटिश सरकारच्या कांटिंजंट फौजेच्या खर्चाचा प्रश्न तसाच राहिला. महाराज दौलतराव शिंदे मृत्यु पावल्यामुळें त्यांना ब्रिटिश सरकाराकडून जें चार लक्ष रुपये पेनशन मिळत असे, तें बंद झालें. तें त्यांनी कांटिंजंट फौजेच्या खर्चाकरितां लावून दिलें होतें. अर्थात् तें कमी झाल्यामुळें बायजाबाईसाहेबांच्या दोन लक्ष पेनशनानें व रजपूत संस्थानाकडील खंडणीनें ती रक्कम भरून येईना.

बायजाबाईसाहेबांचे पेनशन, ... ... ...

२,००,०००

खंडणी संस्थान कोटा,... ... ... ...

१,०२,४३०

 " " कोट्री ... ... ...

१०,६१०

 " " जयपूर ... ... ...

१,००,०००

 " " रतलाम व सेलना ... ... ...

१,१२,१४०

वसूल प्रांत गढाकोटा व मलठण .... ... ७०,०००
" "  येवलें व चोपडें .... .... ७३,५६०

 मिळून ६,६८,७४० रुपये व आणखी कांहीं किरकोळ बाबींचे ६,९५६ रुपये, मिळून एकंदर ६,७५,६९६ रुपये पावत असत. परंतु तेवढ्यानें फौजेचा खर्च ७,०९,२२४ रुपये भरून न येतां, ३३,५२८ रुपये तूट पडूं लागली. शिवाय बायजाबाईसाहेबांचे पेनशन तहाहयात असल्यामुळें त्यानें कायमच्या खर्चाची व्यवस्था होणार नाहीं, अशीही तक्रार उपस्थित झाली. तेव्हां उभय पक्षीं बरीच वाटाघाट होऊन बायजाबाईसाहेबांनी ८० लक्ष रुपये सरकारास कर्जाऊ द्यावे व त्याच्या व्याजांतून ह्या फौजेचा खर्च भागवावा असें ठरलें. ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेबांस राज्याधिकार आपल्या ताब्यात ठेवण्यास, अप्रत्यक्ष रीतीने, सार्वभौम सरकारास, द्रव्यद्वारें खूष करणें भाग पडलें.

 कंपनी सरकारची भानगड संपल्यानंतर बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेरच्या राज्यकारभारांत आपले लक्ष्य चांगल्या रीतीनें घातलें. त्यांची एकंदर कारकीर्द इ. स. १८२७ पासून इ. स. १८३३ पर्यंत सरासरी साहा वर्षेंच चालली; परंतु तेवढ्या अवधीमध्यें त्यांनी मोठ्या दक्षतेनें व शहाणपणानें राज्यकारभार चालविला, आणि मराठ्यांच्या स्त्रिया राज्यकारभार चालविण्यास किती समर्थ असतात हें सर्व जगास महशूर केलें. ह्यांचे मुख्य दिवाण बापूजी रघुनाथ हे इ. स. १८२८ सालीं धारचा कारभार पाहण्याकरितां तिकडे निघून गेले. त्या वेळी त्यांनी इंदूरचे प्रख्यात मुत्सद्दी तात्या जोग ह्यांच्या शिक्षणानें राजकारणांत पूर्ण वाकबगार बनलेले गृहस्थ रावजी त्रिंबक चांदवडकर ह्यांस ग्वाल्हेरीस नेऊन, त्यांस आपल्या दिवाणगिरीचीं वस्त्रें दिली. रावजी त्रिंबक ह्यांचा नामनिर्देश सर जॉन मालकम ह्यांच्या इतिहासांत आला असून, हे गृहस्थ ग्वाल्हेर दरबारांत पुढें फार प्रसिद्धीस आले. ह्यांच्या मदतीनें बायजाबाईसाहेबांनीं राज्यांत अनेक सुधारणा केल्या व प्रजेस फार सुख दिलें. बाईसाहेबांच्या कारकीर्दीचे अस्सल कागदपत्र अद्यापि उपलब्ध झाले नसल्यामुळें त्यांच्या राज्यकारभाराची सविस्तर हकीकत देतां येत नाहीं. तथापि जी त्रोटक माहिती मिळाली आहे, तेवढ्यावरून बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दींत ग्वाल्हेर संस्थानांत ज्या सुधारणा झाल्या, त्यांचा संक्षिप्त उल्लेख करण्यास हरकत नाहीं.

 बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दींत देशामध्यें बरीच शांतता झाली. त्या वेळची देशस्थिति सांप्रतच्या देशस्थितीहून फार भिन्न होती. त्या वेळीं प्रत्यक्ष रणभूमीवर अनेक पराक्रम गाजविलेलें व युद्धाकरिता आणि लुटीकरितां सदैव उत्सुक असलेले सैन्य फार होतें. त्यास आपल्या ताब्यात ठेवून त्याच्याकडून प्रांताचा बंदोबस्त करविणें व परचक्रापासून आणि चोरलुटारूंपासून प्रजेचें रक्षण करणें ही दोन्हीं कामें युक्तीनें करावयास पाहिजे होतीं. ती बाईसाहेबांनीं, जनकोजीराव ह्यांचा विरुद्ध पक्ष उत्पन्न होईपर्यंत, चांगल्या रीतीनें केलीं, महाराज दौलतराव शिंदे मृत्यु पावले, त्या वेळीं ब्रिटिश कांटिंजंट व किल्यांवरचें सैन्य खेरीजकरून, १४,००० पायदळ, १०,००० घोडेस्वार, आणि २५० तोफा होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याचा बंदोबस्त करणें फार कठीण काम होतें. बाईसाहेबांनी हें सैन्य चांगल्या स्थितींत ठेवून व त्याचे निरनिराळे कंपू करून, त्यांच्यावर स्वतंत्र अधिकारी नेमिले. कर्नल स्लीमन ह्यांनी इ. स. १८३३ मध्यें-ह्मणजे बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीच्या अखेरीस, शिंद्यांच्या फौजचे २५ कंपू असून, त्यांपैकी ३ कर्नल आलेक्झांडर, ६ आपाजी खंडेराव, ११ कर्नल जेकब, आणि ५ कर्नल फिलोज ह्यांच्या ताब्यामध्यें होते, असे लिहिले आहे.

 बाईसाहेबांनी सैन्याची व्यवस्था करून आपल्या राज्यांतील पेंढारी व ठग लोक ह्यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. सर जॉन मालकम ह्यांनी इ. स. १८१८ सालीं पेंढाऱ्यांचे पुढारी पकडून त्यांचे बंड मोडून टाकिलें होते; परंतु त्यांचा अवशेष राहिलेला भाग ग्वाल्हेर संस्थानच्या सरहद्दीवर लपून छपून अद्यापि हल्ले करीत असे व संस्थानच्या प्रजेस फार त्रास देत असे. त्याचप्रमाणें, नीचतम व कपटपटु ठग लोक हे आपल्या अधमपणाच्या घातकी व निर्दय कृतींनीं प्रजेस अत्यंत पीडा देत असत. ह्या सर्वांचा शोध लावून व पाठलाग करून त्यांचें पारिपत्य करणें फार आवश्यक होतें. त्या कामीं ब्रिटिश राज्यांतील कर्नल स्लीमन, कर्नल म्याक्लौड वगैरे मोठमोठे अधिकारी, सर्व संस्थानांतील पोलिटिकल एजंटांचे साहाय्य घेऊन, एकसारखे झटत होते. बायजाबाईसाहेबांनी त्यांस उत्तम प्रकारची मदत करून, स्वतंत्र रीतीनें व त्यांच्या साहाय्यानें, ह्या दुष्ट लोकांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. ठग लोकांस ग्वाल्हेर संस्थानचे नौकर लोक देखील पुष्कळ अनुकूल होते; परंतु बायजाबाईसाहेबांनीं आपले सरसुभे नारायणराव ह्यांस सक्त ताकीद करून, कर्नल म्याक्लौड ह्यांस चांगली मदत देवविली; व स्वतःच्या राज्यांतील ठगांचा मागमूस काढवून त्यांस कडक शिक्षा दिल्या..[]
 ह्याचप्रमाणें बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेर संस्थानांत मक्त्याच्या मामलतीची जी चाल होती, ती बंद करण्याबद्दल प्रयत्न केला. मक्त्याच्या मामलतीच्या योगानें, अंमलदार लोक, सरकारची व आपली तुंबडी भरण्याकरितां, प्रजेकडून जुलमानें वाटेल तसें द्रव्य काढितात. त्यामुळें प्रजा अगदीं जिकीरीस येऊन त्राणरहित होते. ह्या कारणास्तव तादृश फायद्याकडे लक्ष्य न देतां, प्रजेच्या हिताकडे लक्ष्य देऊन, ही चाल मोडून टाकण्याचा स्तुत्य प्रयत्न दिवाण रावजी त्रिंबक ह्यांनीं सुरू केला. व त्याप्रमाणें त्यांनी दोन वर्षें अंमलवजावणी केली.[] त्या योगानें लवकरच ग्वाल्हेर संस्थानची प्रजा सुखी होऊन वसुलाची स्थिति सुधारेल, अशी आशा उत्पन्न झाली. परंतु दुर्दैवानें रावजी त्रिंबक हेच ता. २६ जानेवारी इ. स. १८३३ रोजीं मृत्यु पावले. त्यामुळें बायजाबाईसाहेबांचा उजवा हात मोडल्यासारखें होऊन त्यांस फार दुःख झालें. रावजी त्रिंबक हे प्रामाणिक व शहाणे मुत्सद्दी असून, त्यांनीं ग्वाल्हेरच्या राज्यकारभारांत बायजाबाईसाहेबांस उत्कृष्ट मदत केली होती. त्यांचें मृत्युवृत्त विलायतेंतील "एशियाटिक जर्नल" मध्यें छापलें असून, त्यांत रावजी त्रिंबक ह्यांच्या मृत्यूनें ग्वाल्हेर दरबारांतील एका कर्तव्यदक्ष आणि राजकारणपटु प्रधानाची जागा रिकामी झाली, व ती पुनः सहज रीतीनें भरून येणें कठीण आहे असें ह्मटले []होतें. ह्यावरून रावजी त्रिंबक ह्यांची योग्यता व्यक्त होते. रावजी त्रिंबक हे मोठे स्वधर्मनिष्ठ व दानशूर गृहस्थ होते. ह्यांनी काशी वगैरे ठिकाणीं घाट व देवालये बांधली आहेत.

 रावजी त्रिंबक मृत्यु पावल्यानंतर कांहीं दिवस, बायजाबाईंनीं कोणासही दिवाण न नेमितां, आपण स्वतः राज्यकारभार चालविला. परंतु पुढें त्यांनीं सखो शामजी व दादा खासगीवाले ह्या उभयतांस राज्यकारभार पाहण्यास सांगितलें. परंतु थोड्याच दिवसांत जनकोजी शिंदे ह्यांचा व त्यांचा उघडपणे बेबनाव होऊन, दरबारी लोकांत दुफळी झाली; व जनकोजीरावांचा पक्ष प्रबल होऊन बायजाबाईसाहेब ह्यांस ग्वाल्हेरचीं राज्यसूत्रें सोडून देणें भाग पडलें. ह्या राज्यक्रांतीची हकीकत पुढील स्वतंत्र भागांत सादर केली आहे.

 बायजाबाईसाहेब ह्यांच्या राज्यकारभाराची विस्तृत माहिती उपलब्ध नसल्यामुळें आह्मांस ती सादर करितां येत नाहीं. तथापि त्यांच्या अंगीं राज्यसूत्रें चालविण्याची चांगली शक्ति होती, हे निर्विवाद सिद्ध आहे. ग्वाल्हेरच्या एका एतद्देशीय इतिहासकारानें, "बायजाबाई राज्यकारभारांत बहुत दक्ष व शहाणी असे, व दरबारी लोकांवर हिचा दरारा विशेष []असे" असें वर्णन केलें आहे; एवढेंच नव्हे, तर खुद्द ग्वाल्हेर येथील रेसिडेंट व इतर युरोपियन लोक ह्यांनीही त्यांच्या राज्यकारभाराची प्रशंसा केली आहे. ता. १ जुलई इ. स. १८३२ ह्या तारखेच्या "इंडिया ग्याझेट" पत्रामध्यें "रीजंट बाई (बायजाबाईसाहेब ) ह्या संस्थानचा राज्यकारभार फार नियमितपणानें चालवीत आहेत. एवढेंच नव्हे, तर कै. महाराज दौलतराव ह्यांच्या कारकीर्दीपेक्षांही तो अधिक चांगल्या रीतीने चालला आहे"[१०] असा स्तुतिपर लेख प्रसिद्ध झालेला दृष्टीस पडतो. "ब्रिटिश हिंदुस्थानच्या इतिहासाचे" कर्ते मिल्लसाहेब ह्यांनी बायजाबाईंविषयीं असें मत दिले आहे कीं, "ती फार तेजस्वी व सत्वशील बायको असून, तिचें वर्तन सभ्य प्रकारचें होतें. तिच्या अंगांत राज्यकर्तृत्व कमी होतें असें नाहीं. तथापि तिच्याकडून आप्तस्वकीयांसंबंधानें अयोग्य पक्षपात क्वचित् घडून येई; आणि लोभाच्या भरात ती संस्थानाच्या कारखान्यांचे नुकसान करून खाजगी द्रव्यसंचय करण्यास उत्सुक असे. ती स्वभावानें कडक होती, तथापि क्रूर किंवा खुनशी नव्हती. तिच्या कारकीर्दीमध्यें ग्वाल्हेरचा राज्यकारभार, इतर कोणत्याही संस्थानाच्या बरोबरीनें असा, चांगल्या रीतीने चालला होता.[११] मिल्लसाहेबांनी बायजाबाईसाहेबांचे गुण व दोष दोन्ही व्यक्त केले आहेत. तथापि त्यांच्या तेजस्वितेविषयीं व राज्यकर्तृत्वाविषयी त्यांचा मतभेद नाहीं. स्वकीयांविषयीं पक्षपातबुद्धि किंवा द्रव्यसंग्रहाची इच्छा ह्या दोन गोष्टी बायजाबाईंसारख्या स्त्रीच्या ठिकाणी असल्यास नवल नाहीं; परंतु राज्यकारभार चालविण्याचें ज्ञान असणे हीच विशेष महत्त्वाची गोष्ट होय. "मुंबई ग्याझेट" पत्रकारांनी इ.स. १८३३ सालीं ग्वाल्हेर येथील राज्यक्रांतीबद्दल लिहितांना असें म्हटलें आहे कीं, "महाराज शिंदे ह्यांनी आपल्या पश्चात् आपल्या बायकोनें आमरण राज्यकारभार चालवावा अशी इच्छा आपल्या मृत्युसमयीं प्रदर्शित केली होती, व ती सिद्धीस नेणें ब्रिटिश सरकारास एकप्रकारें अगत्याचें होतें. त्याप्रमाणें बायजाबाईंनी आजपर्यंत राज्यकारभार उत्तम रीतीने चालवून, आपल्या यजमानांचा भरंवसा किती यथायोग्य होता हें सिद्ध करून दाखविलें. त्यांनी आपल्या शांत व सुखकर कारकीर्दीमध्यें देशाची अंतर्सुधारणा करण्यांत व प्रजेच्या सुखाची अभिवृद्धि करण्यांत अतिशय परिश्रम घेतले..........ह्या महाराणी आपल्या प्रजेला सौम्य व सद्यवृत्ति वाटत. त्यांचा कल, वयाच्या मानानें व जात्या, शांतता राखण्याकडे असे, आणि कृतज्ञता व स्वहित ह्या दोन्ही दृष्टीनीं त्या इंग्रजसरकाराशीं सलोखा राखीत.[१२] ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेबांच्या राज्यकारभाराविषयीं त्या बेळचें लोकमत अनुकूल असल्याचें दिसून येते, व त्यावरून ही राजस्त्री सामान्य प्रतीची नसून, राज्यकार्यकुशल व शहाणी होती असें निःसंशय सिद्ध होतें. खऱ्या इतिहासाच्या अभावीं ह्या स्त्रीच्या महत्त्वाच्या राजकारणांचा वृत्तांत किंवा बुद्धिचातुर्याच्या गोष्टी आह्मांस येथें सादर करितां येत नाहींत. तथापि, ह्या स्त्रीनें आपल्या लोकोत्तर गुणांनी आपलें नांव कीर्तिमंदिरांत प्रविष्ट केलें आहे ह्यांत शंका नाहीं. हिंदुस्थानच्या इतिहासांत रोझयाबेगम, चांदबिबी, ताराबाई, अहल्याबाई हीं स्त्रीरत्नें ज्याप्रमाणें चमकत आहेत, त्याचप्रमाणे बायजाबाई शिंदे ह्यांचेही नांव अखंड चमकत राहील.

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 104 crop)
  1.  लॉर्ड डलहौसी ह्यांनी ज्या वेळीं एतद्देशीय संस्थानें खालसा करण्याचा क्रम आरंभिला, त्या वेळीं मि. सलिव्हन नामक एका युरोपियन गृहस्थांनीं ग्वाल्हेरच्या संस्थानाची ही हकीकत देऊन त्या वेळच्या उदार राजनीतीची प्रशंसा केली आहे. त्यांनीं ह्याप्रमाणे उल्लेख केला आहे:-
     "In 1826 Dowlatrao Scindiah, Rajah of Gwalior, was ill and childless. Colonel Stewart, the Resident at his court, and his assistant, passed months in urging him to adopt an heir; they reasoned, they argued, they insisted, they even annoyed and irritated the sick prince: for the pride of Scindiah had been broken. After the downfall of the Peishwa, in whose defence his sword had not been drawn, the glory of the Mahratta race was, he felt, gone, and he was no longer the same man. So, careless of the future, he repulsed all their entreaties, replying- "After my death you will be masters of every thing, and may do as you please." In March 1827, he died heirless. But Lord Ahmerst did not—as Lord Dalhousie now says we are bound in "all" such cases to do-seize on Gwalior as a "lapsed" fief. On the contrary-he disclaimed any right "to regulate the Gwalior succession;" eagerly and gracefully he recognized the boy whom Scindiah's favourite wife adopted after his death. In this case the right was exercised, not by the eldest, but by the second wife, who, said Scindiah to Colonel Stewart, when teased about the eventualities of his succession, "was a woman of sense."-The Native States of India. page. 22.
  2.  सर्व सरदार व मुत्सद्दी लोकांचा दरबार भरवून सर्वांच्या विचाराने बायजाबाईनीं दत्तविधान व राज्याभिषेक असे दोन्ही समारंभ ठरविले, ही गोष्ट ता. ९ जुलईच्या "कलकत्ता गव्हरमेंट ग्याझेट" मध्येही प्रसिद्ध झालेली आहे. त्यांत स्पष्ट लिहिलें आहे:-
     "On the Saturday previous, the chiefs and the ministers were assembled at the durbar, when the intentions of the Baiza Bai to adopt and place Mookut Rao on the musnud were publicly announced, and the opinions of the assembly were asked. Not a dissentient voice was heard, and all expressed their warm concurrence in the measure.”
     ह्यावरून बायजाबाईसाहेब ह्या लोकमताचें महत्त्व जाणत होत्या असें ह्मणण्यास हरकत नाहीं.
  3.  बापूजी रघुनाथ ह्यांची प्रशंसा मध्यहिंदुस्थानचे पोलिटिकल एजंट सर जॉन मालकम, वेलस्ली व मार्टिन ह्यांनी फार फार केली आहे. सर जॉन मालकम ह्यांनीं मध्यहिंदुस्थानच्या इतिहासामध्ये बापू रघुनाथासंबंधानें जो उल्लेख केला आहे तो वाचण्यासारखा आहे:-
     "The administration of Dhar is conducted by Bapoo Raghunath, who acting in complete confidence of meriting and receiving the support of the British Government is incessant in his labours to restore this principality to prosperity."
     "That principality being under a minor prince, the adopted son of Maina Bai, the widow of the late Raja, has afforded us the same advantages, in carrying into execution economical reforms of the state of Holkar, nor is the minister Bapoo Raghunath inferior to Tantia Jogh in zeal or in a just appreciation of the generous policy of the British Government, which has restored the ruined fortunes of the Dhar family, and given them once more a rank and place among the princes of India."
  4.  विठ्ठलपंत तात्या हे फार शहाणे व चतुर मुत्सद्दी होते. इंग्रजाकडील लष्करी मंडळींत विनोदाने ह्यांचे टोपण नांव “Old Brag” (ह्मातारा बढाईखोर) असे पडले होते. ह्या संबंधाने के साहेबांनी मालकमसाहेबांच्या चरित्रांत एक आख्यायिका दिली आहे. ती फार मौजेची व वाचनीय आहे. ती येणेप्रमाणें:-
     “He was a man far advanced in years, but of unbroken energy, and formed both by nature and habit for diplomatic address. His self-command was wonderful. He had a sour supercilious, inflexible countenance, in which no penetration could ever discern a glimpse of feeling. He wore, indeed, an
    impenetrable mask. The most startling demand or the most unexpected concession was alike received without the motion of a muscle. Malcolm said of him that he never saw a man with such a face for the game of Brag. From that time Wittal Pant was known by the name of "Old Brag" in the British camp. And years afterwards, when Malcolm met General Wellesly, then the Duke of Wellington, in Europe, and the conversation one day turned upon the characters of the great men of France, the latter, when questioned regarding Tallyrand, replied that he was a good deal like "Old Brag”—but not so clever."

    -Malcolm's Life by Kaye. Vol. II, Page 241.

  5.  १ ही अस्सल पत्राची नक्कल असून, ती आमचे मित्र कै. रा. रा. वामनराव लेले वकील राहणार पुणे ह्यांच्या दप्तरांतून आह्मांस उपलब्ध झाली आहे.
  6.  १ ठग लोकांचे बंड मोडण्याचे कामीं वायजाबाईसाहेब ह्यांनीं मदत केली अशाबद्दल कर्नल हर्वे ह्यांच्या इ.स.१८६६ सालच्या रिपोर्टांत पुढील उल्लेख सांपडतोः-
     "In 1833, when Mr, F. D. Macleod, Assistant General Superintendent, had visited Gwalior, he reported to the Agent to the Governor-General, that during his entire stay in that territory he experienced the greatest attention, and that great willingness to co-operate with the measures of the British Government was displayed by Her Highness the Baiza Bai and by her Suba, Narayan Rao, who was the principal organ of communication with him; also that he had no occasion to apply for assistance which was not promptly afforded. ... ... ... ... Gwalior Durbar may be considered to have lent its co-operation in our measures from the period of Mr. Macleod's visit to Gwalior, viz. 1833."
     The Sovereign Princes and Chiefs of Central India. Vol. I.
  7.  १. रावजी त्रिंबक ह्यांनी ही मक्त्याच्या मामलतीची चाल बंद करून वसुलाची सुधारणा केली, अशाबद्दलचा उल्लेख त्यावेळच्या "Mofussil Ukhbar" नामक पत्रांत प्रसिद्ध झालेला आहे:-
     "* * * * Raoji Trimbak, the minister, has, during the last two years, endeavoured to do away with the system of farming the land revenue; and though the immediate loss from the inefficiency or misconduct of the aumils would seem to have been considerable, yet as the system of amani management, under common superintendence, contains within itself the seeds of certain improvement to the country, we may, if it be preserved in, yet expect to see even the most distant districts assume a more flourishing aspect. It is a fine country, and under proper fiscal management, might be expected to yield a revenue of a million and a half of money."
  8.  १ "Raoji Trimbak, the Karbhari of the Gwalior Court, died on 26th January A. D. 1833. His loss as a zealous and able minister will not, it is feared, be easily replaced.”

    -Asiatic Journal 1833.

  9.  १ रा. फडकेकृत शिंद्यांचा इतिहास.
  10.  २. "The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of the late Maharaja."

    —India Gazette, 1st July 1832.

  11.  ३. "She was a woman of high spirit, and respectable conduct, not destitute of ability to govern, but disposed to the injudicious partiality to her own kin, and greedy in accumulating private wealth at the expense of public establishments. She was violent in temper, but not cruel or vindictive and during her administration the affairs of Gwalior were conducted with as much efficiency as those of any other native principality."

    -Mill's History. Page 292.

  12.  १. “It was the dying wish of the Scindiah, to the fulfilment of which the British Government was in a manner pledged, that his widow should continue regent till her death; and the manner in which she has hitherto performed the duties of that office is such as must justify the confidence reposed in her by that prince. During a long and peaceful reign, she has directed her energies to the internal improvement of her country and the happiness of her subjects. ......In the Ranee Regent they had a mild and friendly princess, attached to peace alike from inclination and age, and bound to the British from gratitude and interest..."