बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु

विकिस्रोत कडून


भाग ४ था.

दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.

 हाराज दौलतराव शिंदे ह्यांची प्रकृति इ. स. १८२६ च्या आक्टोबर महिन्यापासून बिघडत चालली, व ग्वाल्हेरच्या उत्तम उत्तम राजवैद्यांचे औषधोपचार चालू झाले. महाराजांची प्रियपत्नी बायजाबाई ह्यांस महाराजांच्या प्रकृतीबद्दल फार काळजी उत्पन्न झाली. महाराजांविषयी त्यांचा फार प्रेमभाव असल्यामुळें त्या महाराजांच्या शुश्रूषेत अगदीं तत्पर असत. महाराज आजारी असल्याचे वर्तमान ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांस व त्यांचे असिस्टंट क्याप्टन फ्लेमिंग ह्यांस कळल्यामुळें ते उभयतां महाराजांच्या समाचाराकरितां वारंवार राजवाड्यांत येत असत. महाराजांचा व मेजर स्टुअर्ट ह्यांचा चांगल्या प्रकारचा स्नेहसंबंध असून ते परस्परांशी मोकळ्या मनाने वागत असत. त्यांनी महाराज दौलतराव शिंदे आजारी असल्याचे वर्तमान रीतीप्रमाणे गव्हरनर जनरल साहेबांस कळविलें. महाराज दौलतराव हे हिंदुस्थानांतील एका स्वतंत्र व बलाढ्य संस्थानाचे अधिपति असून, ते ब्रिटिश सरकाराशीं फार दोस्तीनें वागत असल्यामुळें, त्यांच्याबद्दल हिंदुस्थान सरकारही फार मर्यादेनें व प्रेमभावानें वागत असे. महाराज आजारी असून त्यांची प्रकृति दिवसेंदिवस क्षीण होत चालली हें पाहून, मेजर स्टुअर्ट ह्यांनीं, महाराजांस दत्तक पुत्र घेऊन गादीच्या वारसाची योग्य व्यवस्था करावी, अशी वारंवार विनंति केली. परंतु त्यांना दत्तक पुत्र घेण्याची गोष्ट पसंत पडेना. ते वारंवार ह्मणत की, "माझी पत्नी जर राज्यकारभार चालविण्यास समर्थ आहे, तर मला स्वतःस दत्तक घेण्याची काय अवश्यकता आहे?" अर्थात् महाराजांचे हे उत्तर ऐकले ह्मणजे त्यांच्यापुढे एक अक्षरही काढण्याची कोणाची प्राज्ञा नसे.
 दौलतराव शिंदे ह्यांस रखमाबाई व बायजाबाई ह्या दोन बायका होत्या. पैकीं वडील रखमाबाई ह्या फार साध्याभोळ्या व निरुपद्रवी अशा असून, राज्यशकट चालविण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगीं मुळींच नव्हतें. बायजाबाई ह्या शहाण्या, राजकारणी, धूर्त, प्रसंगावधानी, आणि दृढनिश्चयी अशा होत्या; व त्यांनी आपल्या पतीस राज्यकारभार चालविण्याचे कामीं पुष्कळ वर्षें साहाय्य केलें होतें. त्यामुळें महाराजांस सर्व राज्यकारभार बायजाबाईंचे स्वाधीन करावा अशी इच्छा वाटणें साहजिक आहे. परंतु तसें केल्यानें, कदाचित् दरबारांतल्या कित्येक कारस्थानी व कुटिल लोकांस, हिंदुशास्त्राप्रमाणें रखमाबाईचा पक्ष घेऊन, तंटेबखेडे करण्यास संधि सांपडेल, व त्याचा परिणाम संस्थानास विनाकारण भोगावा लागेल, ह्मणून त्यांनीं ह्या प्रश्नाचा निकाल स्पष्ट रीतीनें कांहींच केला नाहीं. बायजाबाईवर त्यांची अत्यंत प्रीति होती; व राज्य चालविण्यास लागणारें सामर्थ्य व इतर गुण त्यांच्या अंगीं वसत होते; ह्याचा त्यांनीं अनुभवही घेतला होता. एवढेंच नव्हे, तर स्त्रिया ह्मणजे


 १ मिल्ल साहेबांनी आपल्या इतिहासांतही ह्याचा उल्लेख केला आहेः-

 "The real cause of his reluctance, however, was his attachment to Baiza Bai, who had long exercised an imperious influence over his mind, and to whom he wished to bequeath the substantial authority of the state, although the opposition of the principal persons of his court, and probably some misgivings of the result, deterred him from declaring her his successor."-Mill's History of India, Vol. IX; Page 146.'' राजकारणास अयोग्य, त्यांची योग्यता फक्त गोषांत बसण्यापुरती, असला अनुदार विचार बायजाबाईच्या संगतीमुळें त्यांच्या अंतःकरणांतून पार नाहींसा झाला होता. डा. होप नामक शिंद्यांच्या दरबारांतल्या एका भिषग्वर्यांनी असे लिहिले आहे कीं, "दौलतराव शिंद्यांचा असा अभिमान होता कीं, आपण कोणतीही महत्त्वाची गोष्ट आपल्या पत्नीच्या संमतीवांचून केली नाही. आणि पूर्वेकडील देशांतील पुरुष आपल्या स्त्रियांस किती कमी दर्जाने वागवितात हे लक्ष्यांत घेतलें, ह्मणजे हा अभिमान फारच अलौकिक होता, असे ह्मटले पाहिजे." अर्थात् डा. होपसारख्या परदेशीय गृहस्थांस दौलवराव शिंद्यांच्या ज्या अभिमानाचे फार आश्चर्य वाटले, त्या अभिमानानें पुष्कळ संस्थानिकांच्या अंतःकरणांत प्रवेश केला असता, तर बायजाबाईसारख्या किती तरी राजकारणी व चतुर स्त्रिया हिंदुस्थानांत चमकू लागल्या असत्या. जुना काळ व जुना इतिहास ज्या गोष्टी शिकवीत आहे, त्या गोष्टींची हिंदुस्थानच्या सुधारलेल्या वर्तमान स्थितींत उणीव असावी, ही मात्र खेदाची व आश्चर्याची गोष्ट होय. ह्यावरून, दौलतराव शिंद्यांच्या वेळचा धामधुमीचा काळ अधिक बरा असे ह्मणावे लागतें. असो.
 दौलतराव शिंदे ह्यांच्या आजारीपणांत रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी संस्थानाच्या भावी व्यवस्थेबद्दल पुनः एकदा प्रश्न विचारला. त्या वेळी महाराजांनी असे उत्तर दिले की, "जर राजाची बायको शहाणी व समजूतदार असेल, तर त्याच्या पश्चात् त्याचा कारभार करण्यास तीच पात्र होय." त्या वेळीं रोसडेंट साहेबांनी पुनः विचारलें कीं, "परंतु


 १ "His boast was (and a most singular one it is, when we remember the low esteem in which women are held in all eastern countries ), that he never undertook an affair of importance without consulting her.” आपणांस दोन बायका आहेत, त्याचा विचार काय ?” महाराजांनी उत्तर दिलें "होय. शिरस्त्याप्रमाणें माझ्या वडील पत्नीनें माझ्या पश्चात् राज्याचा कारभार चालवावा हें खरें आहे. परंतु राज्यभार हातीं घेणाऱ्या बायकोच्या अंगीं शहाणपण, जगाचें ज्ञान, व्यवहारांतला अनुभव हे गुण असावे लागतात. ह्या सर्वांची तिच्या ठिकाणीं वानवा आहे. त्यामुळें ती राज्य करण्याचे कामीं अगदीं अपात्र आहे. तिनें फक्त राजवाड्यांत बसावें आणि दुवक्तां जेवावें. ह्यापेक्षां तिच्या अंगीं अधिक कांहीं नाहीं." अशा प्रकारें दौलतराव शिंदे ह्यांनी रेसिडेंट साहेबांशीं संभाषण करून आपल्या दोन्ही राण्यांविषयीं आपलें मत कळविले. त्यावरून मेजर स्टुअर्ट ह्यांची बायजाबाईंच्या योग्यतेबद्दल खात्री झाली; व आपल्या पश्चात् बायजाबाईनीं राज्यकारभार चालवावा अशी महाराजांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले. मे. स्टुअर्ट ह्यांनी महाराजांजवळ आणखीही दोन चारवेळां ह्या प्रश्नाची वाटाघाट केली. परंतु ज्या ज्या वेळीं हा प्रश्न निघाला, त्या त्या वेळीं महाराजांनीं, बायजाबाई शहाण्या व चतुर आहेत असे दर्शवून, "ह्या प्रश्नाचा ब्रिटिशसरकाराने वाटेल तो निकाल करावा; त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे." असेंच सांगितले.
 दौलतराव शिंदे ह्यांची प्रकृति दिवसेंदिवस फार बिघडत चालली. पौष महिन्यांत महाराजांनीं मेजर स्टुअर्ट व आग्रा येथील आपले युरोपियन मित्र ह्यांस संक्रांतीचा शेवटचा तिळगूळ पाठविला. बायजाबाईनीं संक्रांतीप्रीत्यर्थ बहुत दानें व देकार केला. ता. १३ जानेवारी रोजी त्यांनीं हिंदुरावांस सांगून, काशीचे गंगापुत्र व मथुरेचे चोबे मिळून दोन हजार लोक बोलाविले. व प्रत्येकास एक शेर मिठाई, एक रुपया दक्षणा व लोटाभर तांदूळ देऊन सर्वांस संतुष्ट केलें.त्याचप्रमाणे ब्राह्मणभोजनें वगैरे घालून हिंदुचालीप्रमाणें सर्व दानधर्म, प्रायश्चित्तें व गोप्रदानें केलीं. "ह्या दानधर्माची कीर्ति त्या प्रांतीं बहुत झाली. ह्याप्रमाणें बायजाबाईंनीं व हिंदुरावांनीं महाराजांच्या जेवढ्या इच्छा होत्या तेवढ्या सर्व उत्तमप्रकारें सिद्धीस नेल्या. पुढें महाराज अधिक अधिक थकत चालले, व त्यांना उदराची व्यथा होऊन त्यांचे हातपाय सुजले. त्यामुळें त्यांचा अंतकाळ अगदीं समीप आला. बायजाबाई व त्यांचे बंधु महाराजांच्या बिछान्यासन्निध एकसारखे बसले होते. व राजवाड्यांतील सर्व सेवकजन महाराजांच्या प्रकृतीबद्दल चिंतातुर होऊन खिन्नवदन झाले होते. अखेर माघ वद्य ७ शके १७४८ रोजीं महाराजांच्या प्रकृतींत चलबिचल फार दिसूं लागली. त्या वेळीं महाराजांनी मेजर स्टुअर्ट ह्यांस बोलावून आणण्याबद्दल हिंदुरावांस आज्ञा केली. त्याप्रमाणें हिंदुरावांनीं ताबडतोब घोडेस्वार पाठवून रेसिडेंट साहेबांस पाचारण केलें. रेसिडेंट साहेब आल्यानंतर, कांहीं वेळ त्यांची भेट व शेवटचें संभाषण झाले. नंतर रेसिडेंट साहेब कांहीं वेळ महाराजांस विश्रांति देण्याकरितां दुसरीकडे जाऊन बसले. महाराजांच्या प्रियपत्नी बायजाबाई लगेच महाराजांजवळ आल्या. तों महाराजांनी त्यांच्याकडे करुणमुद्रेनें पाहून, त्यांचा व त्यांच्या बरोबर आपल्या अखिल प्रजाजनांचा शेवटला निरोप घेतला. महाराजांस देवाज्ञा होतांच राजवाड्यांत जो आकांत झाला, तो वर्णन करणे कठीण आहे. त्याचें


  ह्या दानधर्माचा वृत्तांत 'शमसूल अखबार' ह्या पत्रांत प्रसिद्ध झाला होता. तो वाचून 'एशियाटिक जर्नल' मधल्या एका लेखकाने पुढे लिहिल्याप्रमाणे उद्गार काढिले आहेत:-

 "Here is a Chief, once powerful enough to inspire the British Government with apprehension, risking his throne and his life, by wasting upon idle Brahmans money which is due to his dependents!"-Page 373.

 ह्या लेखकास हिंदुचालीरीतीचें ज्ञान नसले पाहिजे असेंच ह्मणावें लागतें !! वर्णन मेजर स्टुअर्ट ह्यांनी हिंदुस्थान सरकारास पाठविलेल्या आपल्या खलित्यांत सविस्तर रीतीनें केलें आहे. तें प्रत्यक्ष अनुभवानें लिहिलें असून करुणरसानें ओतप्रोत भरलें आहे. तेंच येथें सादर करितोंः-

 "काल सकाळी ९ वाजण्याचे सुमारास, महाराजांच्या राजवाड्यांतून एक घोडेस्वार रसिडेन्सीमध्यें मोठ्या त्वरेनें भरधांव घोडा फेंकीत आला. त्यानें हिंदुरावांचा असा निरोप कळविला कीं, "महाराज साहेबांनीं आपणांस भेटण्याची उत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ह्याकरितां, आपण एक क्षणाचाही विलंब न लावितां, ताबडतोब राजवाड्यांत यावे." हा निरोप ऐकतांच, महाराजांचा अंतकाल अगदीं समीप येऊन ठेपला असें वाटून, मी लगेच घोड्यावर बसलों; आणि क्याप्टन डाईक ह्यांस फक्त बरोबर घेऊन तत्काल राजवाड्यांत गेलों. राजवाड्यांत जातांच चिंताक्रांत झालेला हजारों लोकांचा समुदाय माझे दृष्टीस पडला. राजवाड्यांत प्रवेश करितांच निरनिराळ्या दालनांमध्ये सरदार, मानकरी व इतर सभ्यलोक जमा झालेले दृष्टीस पडले. हिंदुरावांची व माझी भेट होतांच, महाराजसाहेबांची प्रकृति कशी काय आहे असा मीं प्रश्न केला. हिंदुरावांनीं "महाराज फार अत्यावस्थ आहेत; आपण लवकर भेटावें." असें उत्तर दिलें. माझें व हिंदुरावांचें हें भाषण होत आहे, तोंच महाराजांच्या अंतःपुरांत, मी आल्याची वर्दी पोहोंचून, महाराजांनी मला आंत येण्याबद्दल पाचारण केलें. तेव्हां मी लगेंच महाराज ज्या खोलीमध्यें होते तेथें गेलों. मजबरोबर हिंदुराव, रावजी खाजगीवाले, आत्माराम पंडित व आणखी एक दोन गृहस्थ होते. क्याप्टन डाईक हेही मजबरोबर आंत आले. महाराज पलंगावर लोडाला टेंकून बसले होते, किंवा पडले होते, ह्मटलें तरी चालेल. त्यांच्या सभोंवतीं पुष्कळ दासी व नौकर लोक होते. त्यांच्या पलीकडे पडद्यांमध्ये बायजाबाई, रखमाबाई आणि बाळाबाई ह्या होत्या. महाराजांच्या चेहऱ्यामध्यें फार फरक झालेला पाहून मला एकदम वाईट वाटलें. त्यांचे हात व शरीराचा वरील भाग अगदीं कृश झाला होता. पोट व पाय फार सुजले होते. मी त्यांच्याजवळ गेलों व त्यांचा हात मी आपले हातांत घेतला. आणि ते काय शब्द उच्चारतात ते ऐकण्याकरितां मी त्यांच्या तोंडाजवळ आपले डोकें नेलें. त्यांच्यानें प्रथमतः कांहीं बोलवेना; ह्मणून ते स्तब्ध राहिले होते. शेवटीं, कांहीं वेळानें त्यांनी स्पष्ट व मोठ्यानें, तेथील सर्व लोकांस व पडद्यांमध्यें देखील ऐकूं जाईल अशा रीतीनें, "जो तुम मुनासीब, सो करो" ( तुह्मांस जें योग्य वाटेल तें तुह्मी करा ) हे शब्द उच्चारिले. ते ऐकून मीं महाराजांस उत्तर दिलें कीं, "महाराजांच्या इच्छेप्रमाणें प्रत्येक गोष्ट केली जाईल." नंतर मीं त्यांचे थोडें सांत्वन केलें; व परमेश्वराच्या कृपेनें अद्यापही महाराजांच्या प्रकृतीस आराम पडेल, अशी आशा दर्शविली. ह्या वेळीं महाराजांस फार गहिंवर आला, व त्यांनीं "आपके देखनेसे, और आपके मोहबतसे–" एवढे हृदयद्रावक शब्द उच्चारिले. परंतु पुढें त्यांच्यानें तें वाक्य पुरें करवलें नाहीं. पुढें पुष्कळ वेळ ते स्तब्ध राहिले. शेवटीं मीं "महाराज साहेबांस आणखी कांहीं मला कळविण्याची इच्छा आहे की काय?" असें विचारलें. त्या वेळी त्यांनी पुनः "बहुत तेरासा कहना है" (आपल्याला पुष्कळ सांगावयाचें आहे ) असे शब्द उच्चारिले. परंतु पुढें पुष्कळ वेळ त्यांच्याने कांहीं बोलवेना. तेव्हां मीं असा विचार केला कीं, दुसऱ्या खोलीमध्यें आपण कांहीं वेळ जावें, व महाराजांस थोडीशी हुषारी वाटली व बोलण्याची थोडी शक्ति आली ह्मणजे पुनः त्यांच्या जवळ यावें. तें तेथील मंडळीस पसंत पडलें. मी उठलों न उठलों तोंच, बायजाबाईंनीं पडद्यांतून "डा. प्यांटन ह्यांस बोलावून आणवावें" अशी सूचना केली. तेव्हां मी, महाराजसाहेबांची तशी इच्छा आहे कीं काय, ह्मणून पुनः प्रश्न केला. त्यास महाराजांनीं 'होय' ह्मणून अस्पष्ट खुणेनें उत्तर दिले.

 "महाराजांनी ह्या प्रसंगीं जें जें भाषण केले, ते मी अक्षरशः कळवीत आहे. ह्याचें कारण, ते त्यांचे अगदीं शेवटचे शब्द होत. मी दुसऱ्या माडीवर जाऊन एक तास झाला नाहीं, तोंच राजवाड्यांतील स्त्रियांचा रुदनस्वर ऐकूं आला; व त्यानें महाराजांचा अंत झाला असे कळविलें!

 "ह्यानंतर पुढें जो शोककारक देखावा दृष्टीस पडला, त्याचें बरोबर वर्णन माझ्यानें देववत नाहीं. स्त्रियांचे आक्रंदन व पुरुषांचे शोकस्वर ह्यांच्या योगानें राजवाड्यांत जिकडे तिकडे जो आक्रोश व जो गोंधळ उडाला, तो वर्णन करणें अशक्य आहे !

 "२० तारखेच्या खलित्यांतील शेवटच्या कलमांत कळविल्याप्रमाणें, मीं महाराजांच्या प्रेताची पुढील तयारी होई तोंपर्यंत, राजवाड्यांत राहण्याचा निश्चय केला, व त्याप्रमाणे हिंदुराव व तेथें हजर असलेले दरबारचे प्रमुख लोक ह्यांनींही मला विनंति केली. राजवाड्यामध्यें जिकडे तिकडे दुःखाचा देखावा दृष्टीस पडत होता; तथापि त्यांतल्या समाधानाची गोष्ट एवढीच कीं, सती जाण्याची तयारी कोठें आढळून आली नाहीं. ज्या वेळीं एखादी स्त्री आपल्या प्राणपतीबरोबर सती जाण्याचा विचार करित्ये, त्या वेळीं तिच्या दुःखास एक प्रकारचे गंभीर आणि उदात्त स्वरूप येत असतें. मग ती त्या वेळीं नेत्रांतून दुःखाश्रू ढाळीत नाहीं, किंवा मोठ्यामोठ्याने धाय मोकलून रडत नाहीं. मग ती आपला तोंडावरचा पदर एकीकडे सारून सर्व लोकांपुढें येते व आपला निश्चय व्यक्त करिते. अशा प्रकारचे चिन्ह मला बिलकूल दिसत नव्हतें. ह्मणून, जेव्हां बायजाबाई महाराजांबरोबर सहगमन करणार अशी बातमी माझ्या कानावर आली, तेव्हां त्यांचा प्रतिबंध करण्यास फार कठीण जाणार नाहीं अशी मला खात्री वाटत होती. ह्या कारणास्तव मला बाईसाहेबांजवळ नेण्यांत आले. त्या वेळी त्यांची व माझी भेट फक्त एका पातळ पडद्याच्या अंतराने झाली.
 "त्या प्रसंगी मी जें काय भाषण केलें, तें येथें सविस्तर देण्याची आवश्यकता नाहीं. ह्या भाषणाचे शेवटीं, महाराजांनी मला मरतेवेळीं जें सांगितलें आहे, त्याप्रमाणें सर्व राज्याचा अधिकार मीं धारण केला आहे, व आतां तुह्मीं आपल्या निवासस्थानी जावें अशी माझी इच्छा आहे, असें मी सांगितले. परंतु त्याप्रमाणे घडले नाही. शेवटीं बायजाबाई ह्यांस राजवाड्यांतील सर्व स्त्रियांना हातीं धरून अंतःपुरांत न्यावें लागलें.
 "पुढे कांहीं वेळानें रेसिडेंट ह्या नात्यानें मजकडे एक सात कलमांचा खलिता पाठविण्यांत आला. हें महाराजांचे शेवटचें मृत्युपत्र ह्मणून आलें होतें. परंतु त्यावर महाराजांची सही नव्हती. ह्यांतील मुख्य मुद्यांचा आशयः- महाराजांचा हेतु दत्तकपुत्र घ्यावा; हिंदुराव ह्यांनी सर्व राज्याचे व्यवस्थापक (Superintendent ) व्हावें; औरस पुत्र झाल्यास तो गादीचा अधिकारी व्हावा; व न झाल्यास दत्तक पुत्रानें, महाराज व बायजाबाई हे जोंपर्यंत हयात आहेत तोंपर्यंत त्यांच्या आज्ञेंत चालावें; इत्यादि होता. आणि शेवटीं, ह्या सर्व गोष्टी सिद्धीस नेण्यास ब्रिटिश सरकाराने साहाय्य करावे, अशी विनंति केली होती.
 महाराजांच्या अंत्यविधीचा देखावा फारच हृदयद्रावक व शोककारक होता. महाराजांचें शव पालखीमध्यें घालून त्यावर उंची पोषाख व रत्नांचे व मोत्यांचे अलंकार घातले होते. त्यांचे तोंड मोकळें ठेवलें असून जीवंत मनुष्याप्रमाणें त्यांस बसविलें होतें. त्यांच्या ह्या शेवटच्या स्वारीचा समारंभ दरबारी थाटाप्रमाणें असून, त्यांच्या पालखीबरोबर हत्ती, घोडे, डंका निशाणें वगैरे सर्व चाललें होतें. लष्करांतील प्रत्येक माणूस त्यांच्या प्रेताबरोबर होता. तात्पर्य, त्यांचे शेवटचें दर्शन घेण्यास फारच गर्दी झाली होती. सर्व प्रजाजन महाराजांच्या मृत्यूमुळें अत्यंत शोकाकुल होऊन गेले होते; व त्यांच्या नेत्रांतून एकसारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. त्यावरून महाराजांविषयीं त्यांची किती प्रीति होती ह्याची साक्ष पटत होती. दौलतराव शिंदे हे चांगल्या राजास लागणाच्या सर्व गुणांनीं जरी परिपूर्ण नव्हते, तथापि ते दुष्ट किंवा क्रूरकर्म करणाच्या राजमालिकेंत गणले जाणारे नव्हते. त्यांच्या ठिकाणीं शहाणपण किवा समजूत ह्यांची उणीव नव्हती. ह्मणूनच महाराष्ट्रसाम्राज्यरूपी नौकेचा भंग झाला असतांना त्यांचे संस्थान सुरक्षित राहिलें. ते फार शूर व रसिक होते. अनेक भाषणप्रसंगीं ते ज्या उपमा आणि जे दृष्टांत देत असत, ते फार मार्मिक व आनंदप्रद असत. त्यांचा स्वभाव अतिशय सौम्य व शांत होता. तारुण्यावस्थेंत त्यांचे दुर्गुण व प्रमाद कितीही असले (आणि त्याबद्दलचा सर्व दोष महाराजांपेक्षा त्यांच्या कुटिल मंत्रिमंडळाकडे अधिक येतो असें मला वाटते. ), तथापि त्यांच्या पुढील कारकीर्दींत, त्यांच्या हातून नीतीचा मोठासा भंग होण्यासारखी एकही गोष्ट घडली नाहीं. दुर्लक्ष्य व आळस हे त्यांचे दोन मोठे दुर्गुण होते. ते त्यांस राजपदाची कर्तव्यकर्में उत्तम रीतीने बजावण्यास सदैव आड येत असत. एकंदरीत, हिंदुस्थानांतील एवढी मोठी विस्तृत सत्ता त्यांचे हातीं अवघे चौदा वर्षांचें अल्प वय असतां आली; व त्यांचे सर्व बालपण, त्या काळच्या मराठी लष्कराचें लक्षण होऊन राहिलेल्या 'विश्वासघात' व 'लुटालूट' ह्यांच्या देखाव्यांत गेले; ह्या दोन गोष्टी लक्ष्यात घेतल्या, ह्मणजे त्यांच्या कारकीर्दींत घडलेल्या पुष्कळ चुका व दोष हे क्षम्य होते, असें मानण्यास हरकत नाहीं. ह्या पत्रांतील कांहीं भाग नेहमींच्या सरकारी पत्रव्यवहाराच्या मर्यादेपेक्षां अधिक लिहिला गेला आहे; तथापि ह्या प्रसंगाचें महत्त्वच तसें आहे असे समजून, त्याबद्दल क्षमा होईल अशी आशा आहे. ज्या संस्थानिकाचा व माझा पुष्कळ दिवसांचा परिचय आहे, व ज्याचें वर्तन अलीकडे मज बरोबर अगदीं स्नेहभावाचें होतें, त्याच्या मृत्यूचें वृत्त लिहितांना माझी हृदयवृत्ति द्रवून जाणे साहजिक आहे. तसें न झालें तर मला खरोखर पाषाणहृदयीच व्हावें लागेल. त्याचप्रमाणें, मृत्युसमयीं त्यानें ब्रिटिश सरकारच्या न्यायीपणाबद्दल व औदार्याबद्दल जो अमर्याद विश्वास दाखविला, ती त्याच्या मृत्यूबरोबर घडलेली एक महत्त्वाचीच हृदयद्रावक गोष्ट समजली पाहिजे."
 ह्या खलित्यावरून मेजर स्टुअर्ट हे सुस्वभावी गृहस्थ असून, एतद्देशीय संस्थानिकांविषयीं त्यांच्या मनांत किती आदरबुद्धि वसत होती, हें चांगले दिसून येतें. असो.
 महाराज दौलतराव निवर्तल्यानंतर त्यांचा उत्तरविधि राजकीय थाटानें झाला. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस आपल्या प्रियपतीचें चिरकालिक वियोगदुःख सहन करण्याचा भयंकर प्रसंग प्राप्त झाला. परंतु त्यांनीं, धीर न सोडतां, मोठ्या शांतपणाने ते सहन करून, आपल्या यजमानांच्या आज्ञेप्रमाणे संस्थानची राज्यसूत्रे लवकरच आपल्या हातीं घेतलीं.
 बायजाबाईसाहेबांनी महाराज दौलतराव शिंदे ह्यांच्या दहनस्थानावर एक सुरेख छत्री बांधून त्यांचे ग्वाल्हेर येथें चिरस्मारक करून ठेविलें आहे. ह्या छत्रीच्या खर्चाकरितां त्यांनी सालीना दहा हजार रुपयांची नेमणूक करून दिली आहे. ती अद्यापि चालत असून त्या छत्रीचा प्रतिवार्षिक उत्सव मोठ्या थाटानें होत असतो.
 दौलतराव शिंदे शरीरानें धट्टेकट्टे असून त्यांची उंची ५-५॥ फूट होती. त्यांचा वर्ण काळा असून, चेहरा वाटोळा व नाक किंचित् चपटें होते. तथापि एकंदर चेहरा दिसण्यांत भव्य आणि परोपकारशील असा दिसे. त्यांची वर्तणूक फार आदबीची असून त्यांस आदरसत्कार फार प्रिय असे. त्यांचा पोषाख व एकंदर चालचलणूक पाहून, पुष्कळ युरोपियन लोक, त्यांची इंग्लंडच्या आठव्या हेन्री राजाशीं तुलना करीत असत. त्यांचे पागोटें लहान व पिळदार असून, तें सध्यांच्या ग्वाल्हेर दरबारच्या चालीप्रमाणे कलतें घालण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांचा पोषाख फार साधा असे. एक तलम झिरझिरीत पांढरा आंगरखा व गुडघ्यापर्यंत लांब असा रेशमी तंग चोळणा हीं फक्त त्यांच्या पोषाखाचीं दोन वस्त्रे असत. त्यांच्या गळ्यामध्ये बकुळाएवढ्या पाणीदार मोत्यांचे व तेजस्वी पाचांचे फार मूल्यवान् कंठे असत. दौलतरावांस मोत्यांचा फार शोक असून, नेहमीं उत्तम मोत्यें पाहिली की, त्यांचा संग्रह केल्यावांचून ते राहत नसत. त्यांच्या मोत्यांच्या आवडीवरून त्यांस लष्करांतील लोक "मोतीवाले महाराज" असें विनोदानें ह्मणत असत.
 हे शिकार करण्यामध्ये फार निष्णात असून, त्यांचा काल बहुतेक घोड्याच्या पाठीवर वाघांची शिकार करण्यांत जात असे. नेम मारण्यांत त्यांचा हातखंडा असे. नदीच्या कांठीं तासांचेतास बसून मासे धरण्याचाही त्यांना नाद असे. घोड्यावर बसण्यांत व भाला मारण्यांत हे पटाईत होते. हे दोन गुण त्यांच्या सहवासाने बायजाबाई ह्यांच्या अंगीं पूर्णत्वेंकरून वसत होते. ते जातीनें आळशी स्वभावाचे असून सदां ऐषआरामांत राहण्याची त्यांना संवय असे. अगदी बालवयामध्यें त्यांच्या हातून कांहीं क्रूरपणाच्या व कडक गोष्टी घडल्या; परंतु पुढें केव्हांही तशा गोष्टी करण्यास ते सहसा प्रवृत्त होत नसत. ते स्वधर्मनिष्ठ असून पाटीलबावांप्रमाणेच मोठे कृष्णभक्त होते. सकाळसंध्याकाळी देवपूजा वगैरे करण्याचा त्यांचा नित्य नियम असे.
 दौलतराव शिंदे ह्यांच्या कालामध्यें ज्ञानप्रसार कमी असल्यामुळें ग्रंथवाचनाची अभिरुचि बेताचीच असे. त्यामुळें मनाचें रंजन करण्याचीं साधनें व मार्ग हीं वर्तमानकालाप्रमाणें नसून, गाणेंबजावणें व नाचरंग ह्यांवर त्या वेळीं फार बहार असे. दौलतराव शिंदे हे संगीताचे फार शोकी असून, त्यांच्या जवळ गानकलासंपन्न गुणिजन फार असत. त्यांच्यापुढें गवयी व कलावंतिणी ह्यांची हजिरी लागली नाहीं असा एकही दिवस जात नसे. ते ह्या कलेंतील पूर्ण रसज्ञ असून, ध्रुपदांचे मोठे भोक्ते होते, अशी ख्याति असे. त्यांना उद्यानविहाराचाही फार नाद असे. ग्वाल्हेरच्या सभोंवतीं त्यांनी अनेक बागबगीचे केले असून नेहमीं तेथें वनभोजनें व वनक्रीडा चालत असत.
 दौलतराव शिंदे ह्यांस दोन बायका होत्या. परंतु त्या दोघींमध्यें त्यांची बायजाबाईंवर फार प्रीति असे. त्यामुळें बायजाबाईसाहेब नेहमीं त्यांच्या सन्निध असत. त्या स्वतः चतुर व कुशाग्रबुद्धि असल्यामुळें दौलतराव शिंदे ह्यांच्यावर त्यांचे फार वजन असे. दौलतराव शिंदे हे हरहमेषा राजकीय अथवा घरगुती गोष्टींमध्ये त्यांची सल्लामसलत घेत असत. बायजाबाई ह्यांचे दौलतरावांवर विशेष वजन होतें ह्याचें कारण एका इंग्रज गृहस्थाने असें दिले आहे कीं, "बायजाबाई ह्या राठोर रजपुतांच्या उच्च कुलांतील असल्यामुळें व दौलतराव हे कमी प्रतीच्या मराठ्यांच्या कुलांतील असल्यामुळें, केवळ कुलभेदामुळें त्यांना एवढें वर्चस्व प्राप्त झाले." परंतु हें कारण सयुक्तिक नाहीं. कां कीं, केवळ कुलाच्या उच्चतेमुळें बायजाबाईंचें दौलतरावांसारख्या पाणीदार व ऐश्वर्यसंपन्न पतीवर वर्चस्व बसलें नसून, त्यांच्या अंगचे विशिष्ट गुणच त्याला कारण झाले होते.
 दौलतराव शिंदे ह्यांचें स्वतःच्या दरबारांतील मुत्सद्यांशीं व परराज्यांतील वकिलांशीं जें वर्तन असे, तें फार प्रतिष्ठेचें व सभ्यपणाचें असे. मोठमोठ्या राजकारस्थानांच्या गोष्टींबद्दल देखील जो वादविवाद व जीं संभाषणें व्हावयाचीं, तीं ह्या दरबारच्या आदबीमुळें, दिवाणाच्या


 १ "Her descent was from the Rahtore Rajpoots, which alone gave her great power over him, as he was of lower caste.” मार्फत होत असत. तात्पर्यं, प्रत्येक गोष्टींत त्यांचे सौजन्य दिसून येत असे. इंग्रजी रेसिडेंटाचा ते फार सत्कार ठेवीत असत; व त्यांस क्वचित् प्रसंगी मेजवान्या देत असत.
 दौलतराव हे सर्व हिंदुलोकांप्रमाणें धर्माच्या बाबतींत परधर्मीयांशी फार सौम्यपणानें वागत असत. ते स्वतः कर्मनिष्ठ होते, परंतु मुसलमान साधूंविषयी व त्यांच्या देवस्थानांविषयी त्यांची पूज्य बुद्धि असे. त्यांनी मुसलमानांच्या पिरांचीं व फकिरांचीं वर्षासने चालविली होतीं. ग्वाल्हेर येथील शाह मनसूर ह्याच्या स्थानाबद्दल त्यांची पराकाष्ठेची भक्ति असे. ह्याचें कारण, त्या अवलियानें महादजी शिंदे ह्यांस, "दिल्लीपर्यंत तुला राज्य दिलें आहे" असा वरप्रसाद दिला होता. त्याप्रमाणें पुढें घडून आलें, ह्मणून शिंद्यांच्या घराण्यांत त्या अवलियाविषयीं भक्तिभाव उत्पन्न झाला. तो अद्यापि चालू आहे.
 दौलतराव हे पुढें पुढें उदास झाले होते असें दिसून येतें. त्यांच्याविषयीं एका युरोपियन गृहस्थानें अशी एक गोष्ट लिहिली आहे कीं, "इ. स. १८०७ सालीं एकदा धूमकेतू निघाला. त्या वेळीं दौलतरावांच्या मुत्सद्दयांनीं व ब्राह्मणमंडळींनीं, राजे लोकांस हें अनिष्ट असून, कांहीं फेरफार होणार असें भाकित केलें. त्या वेळीं दौलतराव शिंदे यांनी असें उत्तर दिलें कीं, 'माझें आतां कांहीं अनिष्ट होण्यासारखें राहिलें नसून, माझ्या स्थितीमध्यें झाला, तर कांहीं इष्टच फेरफार होईल!" इ. स. १८०३-४ सालीं जनरल वेलस्ली व लॉर्ड लेक ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांचा पराभव करून सुर्जीअंजनगांवच्या तहामध्ये त्यांचे स्वातंत्र्य हरण केलें, त्या मानहानीस अनुलक्षून हे उत्तर होतें.
 दौलतराव शिंदे ह्यांचा काळ शास्त्रीय शोध व ज्ञानप्रसार ह्यांचा नसल्यामुळें, पाश्चिमात्य देशांतील कलाकौशल्य व शास्त्रीय सुधारणा ह्यांचें त्या वेळी लोकांस अपूर्व कौतुक व चमत्कार वाटत असे. अर्थात् शास्त्रीय शोधांच्या प्रगतीची लोकांस कल्पना नसल्यामुळें, पाश्चिमात्य वस्तू पाहून त्यांची मति थक्क होऊन जात असे; व ते शास्त्रीय ज्ञानाच्या अभावी असंस्कृत व भोळसर तर्क लढवून आपलें हास्यकारक अज्ञान मात्र व्यक्त करीत असत. त्यामुळें अनेक गमतीचे प्रकार वारंवार घडून येत असत. इ. स. १८१० सालीं, शिंद्याच्या दरबारचे ब्रिटिश रेसिडेंट मेजर मालकम ह्यांनीं, दौलतरावांकरितां एक उत्कृष्ट चार चाकी बगी इंग्लंडाहून तयार करून आणिली; व ती चार करड्या रंगाचे आरबी घोडे व त्यांचें उत्तम प्रकारचे कातडी सामान ह्यांसह त्यांस नजर केली. दौलतरावांनी व त्यांच्या दरबारी मंडळीनें अशा प्रकारचा अश्वरथ पूर्वीं कधीही पाहिला नव्हता. त्यामुळें त्यांस फार चमत्कार वाटला, व त्यांत कदाचित् दारूगोळा भरून ठेवला असेल असें समजून, त्यांनी त्या गाडीमध्ये प्रथम फकीर लोक बसविले ! अर्थात् मोठ्या प्रेमादरानें नजर केलेल्या बहुमूल्य अश्वरथांत फकीर बसलेले पाहून ब्रिटिश रेसिडेंटास काय वाटलें असेल, तें निराळें सांगावयास नकोच. ह्याचप्रमाणें आणखी एक अशीच मजेची गोष्ट घडून आली. एकदां रेसिडेंटानें दौलतराव शिंद्यांकरितां एक भव्य व सुंदर तंबू तयार करवून त्यांस नजर केला. तो पिंवळ्या रंगाचा असून त्याच्या अंतर्भागीं कांचेच्या तावदानांच्या प्रशस्त व रमणीय अशा खोल्या केल्या होत्या. ह्या तंबूमध्यें दौलतराव शिंदे ह्यांनीं एक मोठा मेजवानीचा समारंभ केला. त्या दिवशीं, कर्मधर्मसंयोगाने, रोषनाई करितांना मशालजीच्या नजरचुकीनें त्या तंबूस आग लागली, व तो सर्व जळून गेला. परंतु ही गोष्ट कोणाच्याच लक्ष्यांत न येऊन, जिकडे तिकडे अशी बातमी पसरली कीं, तंबूच्या कनातींमध्यें कळीच्या तोफा, दारूगोळा, व शस्त्रें ठेविली होती. त्यामुळे तो तंबू पेटून खाक झाला !! तात्पर्य, अशा गोष्टी त्या काळीं फार घडून येत असत, व त्यांच्या योगानें मराठी राज्यांत ज्ञानप्रसार कमी होता हे व्यक्त होत असे.

__________________