बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव

विकिस्रोत कडून
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 105 crop)
भाग ६ वा.
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 105 crop) 2
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव.

 संस्थानामध्ये कलह उत्पन्न होण्यास विशेषेंकरून राजाचे दुर्गुण व कुसंगति हीं बहुधा कारण असतात. मग त्यांत कित्येक स्वार्थसाधु व कपटपटु लोकांच्या नीच कृतींची भर पडून, त्या कलहाग्नीच्या ज्वाळा अतिशय जोरानें पेट घेतात; आणि लवकरच संस्थानाची राखरांगोळी करितात. महाराज जनकोजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांच्यामध्ये जो विग्रह उत्पन्न झाला, त्याचें कारण महाराजांची अल्पबुद्धि व दुर्जनसंगति हींच होत. महाराजांचे दत्तविधान होऊन त्यांस इ.स.१८२७ सालीं गादीवर बसविले, त्या वेळी त्यांचे वय अवघें ११ वर्षांचें होतें. अर्थात् इतक्या अल्पवयी मुलाच्या हातीं अधिकार देणें अगदीं अयोग्य व शास्त्रदृष्टया देखील अप्रयोजक होतें, हें कोणीही सुज्ञ मनुष्य कबूल करील. बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराज अल्पवयी असल्यामुळें रीतीप्रमाणें संस्थानाचा राज्यकारभार आपण स्वतः उत्तम प्रकारें चालविला, व महाराज वयांत येईपर्यंत तो तसाच चालवावा अशी त्यांची इच्छा असणें साहजिक आहे. परंतु महाराज गादीवर बसून दोन तीन वर्षें झालीं नाहींत, तोंच दरबारच्या स्वार्थसाधु मंडळीच्या चिथावणीनें ह्मणा, किंवा अन्य कांहीं कारणांमुळे ह्मणा, महाराज जनकोजीराव ह्यांचें वर्तन बायजाबाईसाहेबांस असह्य व अपमानकारक वाटू लागले, व त्यांनी महाराजांवर सक्त नजर ठेवण्यास सुरवात केली. अर्थात् बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराजांस मन मानेल तसे वागू न दिल्यामुळे, हें प्रकरण जास्तच विकोपास गेलें; व पुढे नामदार गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांस इकडे लक्ष्य पोहोंचविणें भाग पडलें.

 बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराज जनकोजीराव ह्यांस फार वाईट रीतीनें वागविलें, असा त्यांच्यावर कित्येक इतिहासकारांचा आरोप आहे. परंतु तो वास्तविक खरा नसून, त्यांत अतिशयोक्ति फार आहे. सुरेंद्रनाथ राय नामक ग्वाल्हेरच्या एका इतिहासकारांनीं, इंग्रजी ग्रंथकारांचा अनुवाद करून, बायजाबाईसाहेब व जनकोजीराव ह्यांच्या कलहासंबंधाने लिहितांना असें ह्मटलें आहे कीं, "बाईंनीं आपल्या अज्ञान मुलास कोणत्याही प्रकारचें शिक्षण न देऊन संस्थानच्या राजकारणांविषयीं त्यास सर्वथा अज्ञानांधकारांत ठेविलें. त्यांनीं संस्थानचीं भावी राज्यसूत्रें चालविण्यास तो अगदी अपात्र व्हावा असा यत्न केला; व त्यास अयोग्य रीतीनें प्रतिबंधांत ठेविलें. त्याच्या मनाची वाढ खुटावी, स्वावलंबनाचा स्वाभाविक अंकुर त्याच्यामध्ये मुळांतच तुटला जावा, त्यास जगाचें अल्पही ज्ञान मिळूं नये, त्यानें नेहमीं दास्यवृत्तीमध्यें राहून राज्यकारभार हातीं घेण्यास धजू नये, आणि त्याच्या मनांत आपणांविषयीं पोकळदरारा व अमर्याद भीति राहावी, असा बाईंनीं वर्तनक्रम ठेविला."


 1. "The Bai kept her ward devoid of all education, and in profound ignorance of state affairs. She did her best to make him utterly unfit to conduct the future Government of the country, and subjected him to galling restraints. Her policy was to dwarf the growth of his mind, to nip in the bud the native spirit of self-reliance, to keep him in utter ignorance of the world, and to fill his mind with a sort of vague and indefinite fear for her, that in future he might not shake off her thraldom, and take the Government in his own hands &c."

-Gwalior by Roy. Page 333.

परंतु खरा प्रकार असा नव्हता. महाराणी बायजाबाईसाहेब ह्या स्वभावतः फार तेजस्वी व तीव्र होत्या, व त्यांना ग्वाल्हेरचा राज्यकारभार स्वतःच्या हातीं ठेवण्याची मनुष्यस्वभावानुरूप इच्छा होती, ह्या दोन्ही गोष्टी जरी मान्य केल्या, तरी जनकोजीराव ह्यांस त्यांनी अतिशय वाईट रीतीनें वागविलें व कलहाचे बीजारोपण केलें, असेंच केवळ ह्मणतां येत नाहीं. हा कलह उत्पन्न होण्यास ग्वाल्हेर दरबारचे कुटिल लोक व त्यांच्या दुष्ट मसलती, आणि जनकोजीरावांची अल्प बुद्धि व उच्छृंखल वृत्ति हींच कारणीभूत झालीं असावींत. ग्वाल्हेरच्या दुस-या एका इतिहासकारांनी असें लिहिलें आहे कीं, "बिनतोडीचे वेळीं बायजाबाईनें जनकोजी शिंद्यांस दत्तक घेतलें, आणि दौलतरावानें सांगितल्याप्रमाणें आपण जन्मभर राज्य चालवीन असा मनांत निश्चय करून, दत्तक घेतलेल्या मुलास आपल्याजवळ शिक्षणांत ठेविलें. हा मुलगा तारुण्यावस्थेंत येतांच, आपल्यास वैभवास आणणारीचे विचारें न वागतां, कांहीं कुमार्गी व आपस्वार्थी लोकांची संगत धरून, त्या बाईच्या शिक्षणांतून मुक्त होण्याची इच्छा करूं लागला. त्या जनकोजी शिंद्यास अनुपकारीपणाचे मार्गास लावणारे व कांहीं नवेंजुनें होऊं इच्छिणारे लोकांनीं त्याचा पक्ष धरिला. इंग्रज लोकही, याच संधीस, नवा राजा गादीवर बसला त्याचे नांवचा हरएक सरकारी कागदावर शिक्का झाल्याखेरीज तो कागद कोणत्याही प्रकारें ते दस्तऐवजांत खरा मानीनातसे झाले. तेव्हां जनकोजी शिंद्याचे पक्षास अधिक बळकटी आली, व बायजाबाईपासून त्याला दूर करण्याचा त्यांणीं विशेष प्रयत्न मांडिला." हीच वास्तविक खरी गोष्ट असावी असें मानण्यास हरकत नाहीं.

 जनकोजीराव ह्यांस बायजाबाईसाहेबांनीं दत्तक घेऊन त्यांस आपला नातजांवई केले, व ग्वाल्हेर संस्थानच्या राजपदाचे धनी केलें; ही गोष्ट लक्ष्यांत घेतली ह्मणजे जनकोजीराव ह्यांनी आपल्या वैभवसंपन्न व राज्यव्यवहारचतुर मातुश्रीच्या आज्ञेंत चालणें हें त्यांचें कर्तव्य होतें असेंच ह्मणावे लागतें. परंतु त्यांनी ह्या कर्तव्यास पराङ्मुख होऊन लहानपणापासून मूर्ख व हलकट लोकांच्या नादीं लागून कुमार्ग स्वीकारला. त्यामुळें दिवसेंदिवस बायजाबाईसाहेबांच्या मनांत त्यांचे विषयीं तिरस्कार व अप्रेमबुद्धि उत्पन्न होऊं लागली. महाराज जनकोजीराव ह्यांस दत्तक घेतल्यानंतर कित्येक दिवसपर्यंत, बायजाबाईसाहेब त्यांच्याशी प्रेमभावानें वागत असून त्यांचे लडिवाळपणानें कौतुक करीत. परंतु जेव्हां महाराजांनीं दुष्ट लोकांच्या नादीं लागून, त्यांच्या शिकवणीनें, स्वतंत्रपणानें वागण्याचा व शिरजोर वर्तन करण्याचा क्रम आरंभिला, त्या वेळेपासून त्यांनी त्यांस आपल्या ताब्यांत ठेवण्याचा प्रयत्न केला. ग्वाल्हेर दरबारचे माहितगार व जुने रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांच्याही कानांवर ह्या अप्रिय गोष्टी अनेक वेळां गेल्या, व त्यांनीही त्यांबद्दल वेळोवेळीं मध्यस्थी करून, उभयतांचा सलोखा करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांत त्यांस यश आलें नाहीं. महाराज जनकोजीराव ह्यांच्याबद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट व दुसरे युरोपियन लोक ह्यांनीं जे लेख लिहिले आहेत, त्यांवरून त्यांच्याविषयीं व त्यांच्या वर्तनाविषयीं अनुकूल ग्रह होत नाहीं.

 इ. स. १८२९ च्या जानेवारी महिन्यांत हिंदुस्थानचे मुख्य सेनाधिपति लॉर्ड कोंबरमियर हे ग्वाल्हेर येथील सैन्याची पहाणी करण्याकरितां आले होते. त्या वेळी त्यांची व महाराज जनकोजीराव ह्यांची मुलाखत होऊन, महाराज जनकोजीराव ह्यांच्यासंबंधानें त्यांचा जो ग्रह झाला, तो त्यांचे एडीकां (परिचारक) मेजर आर्चर ह्यांनी आपल्या प्रवासवृत्तांत नोंदून ठेविला आहे. त्यांत त्यांनी असे लिहिले आहे की, "राजेसाहेब हे अगदी बालवयी ह्मणजे अवघे १४ वर्षांचे आहेत. त्यांचा चेहरा गोड असून फार सौम्य आहे. त्यांचा वर्ण गोरा असून ते दिसण्यांत सुरेख आहेत. परंतु ते अगदीं जड, जिज्ञासाशून्य, आणि जवळ चाललेल्या गोष्टींविषयीं मन्दोत्साह असे दिसतात. तथापि, कमांडर-इन-चीफ ह्यांच्यासारख्या बड्या गृहस्थांच्या प्रथम भेटीनें ते घाबरले नाहींत. त्यांनीं आमच्या समक्ष विडा खाल्ला. अशा रीतीनें विडा खाणे. त्यांची दरबारी मंडळी व एकंदरीत सर्व पूर्वेकडील लोक असभ्यपणा मानीत नाहींत." ह्या लेखावरून त्यांच्याविषयी चांगलें मत होत नाहीं.

 महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन दिवसेंदिवस फार शिरजोरपणाचें व जुलमाचें होऊ लागलें; व त्यांच्या हातून फार अनुचित कृत्यें घडू लागलीं. इ. स. १८३० मध्यें बायजाबाईसाहेबांची नात जी जनकोजीरावांस दिली होती, ती मृत्यु पावली. तेव्हां जनकोजीराव ह्यांनी दुसरें लग्न केलें. त्या लग्नामध्यें त्यांनी आपल्या अविचाराची कमाल करून सोडिली. त्यांनी जवळच्या लोकांच्या अंगावर बाण उडविले. त्यायोगानें एक मनुष्य जखमी होऊन मृत्यु पावला. त्यामुळे बायजाबाईसाहेबांस त्यांच्यावर सक्त नजर ठेवून त्यांचा वारंवार निषेध करणें भाग पडलें. परंतु ती गोष्ट त्यांस न रुचून, त्यांनीं रेसिडेंट साहेबांकडे वारंवार तक्रारी नेण्यास प्रारंभ केला. त्यामुळें बाईसाहेबांचे मन त्यां-


 1. "The Rajah is quite a lad, about fourteen years of age, of a very pleasing and mild expression of countenance; he is fair and good-looking; but appears dull, inapprehensive, and but little interested in what goes on around him ; he was not, however, embarrassed, though it was his first appearance before a stranger of the Commander-in-chief's rank. In common with his court, and all Orientals, who consider it no want of politeness, he chewed betel while we were present."

-Tours in Upper India. Page 41-42.

च्याविषयीं अतिशय कलुषित झालें. ह्या वेळीं ग्वाल्हेर दरबारचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट हे फार भले व थोर गृहस्थ होते. त्यांनी महाराजांची चांगली कानउघाडणी करून, त्यांस ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फलद्रूप झाला नाहीं. इ. स. १८३० सालीं-ह्मणजे महाराजांच्या १५ व्या वर्षीं-मेजर स्टुअर्ट ह्यांची व महाराजांची जी मुलाखत झाली, तिचें वर्णन त्यांनी आपल्या खलित्यामध्यें येणेंप्रमाणें केलें आहेः- "महाराजांस ज्या वेळी मी विचारिलें कीं, "तुमची कशी काय हालहवाल आहे ?" त्या वेळीं त्यांनी उत्तर दिलें की, "मी सुखी आहे; परंतु सर्व राज्याधिकार बाईसाहेबांच्या हातीं आहे." मी त्यांस उत्तर दिलें की, "बरोबर आहे. तुमचें अद्यापि अल्पवय असल्यामुळें तुह्मीं राज्याधिकार आपल्या हातीं घेण्याची इच्छा करणें प्रशस्त नाहीं. तुह्मीं कोणाच्या तरी तंत्रानें वागलें पाहिजे. ह्या कामीं तुमच्यावर देखरेख करण्यास बाईसाहेब ह्याच फार योग्य आहेत. तुह्मांस बाईसाहेब ज्या रीतीनें वागवितात, त्यांत कांहीं तुह्मांस तक्रार करण्यासारखें असेल, तर मला सांगा. मी त्याचा योग्य बंदोबस्त करीन." परंतु महाराजांनी ह्या प्रश्नाचें उत्तर "माझे बरें आहे, मला कांहीं सांगण्यासारखें नाहीं." अशा प्रकारचें उडवाउडवीचें दिले. मग मी त्यांस विचारिलें कीं, "तुमचे जर सर्व कांहीं ठीक आहे, व तुह्मांस बाईसाहेबांच्या विरुद्ध तक्रार करण्यास जागा नाहीं, तर तुह्मी नौकरचाकरांवर प्रसंगविशेषीं तरवारी उपसता, व लग्नाच्या वेळी तर तुह्मीं त्यांच्यावर बाण सोडले, अशा प्रकारचें चमत्कारिक वर्तन कां केले ? त्यामुळें लग्नप्रसंगी एक मनुष्य ठार मेला, हे तुह्मांस माहीत नाहीं काय ?" (लग्नाच्या वेळीं महाराजांनीं बाण सोडल्यामुळे धारच्या पवारांचा एक नौकर जखमी होऊन मृत्यु पावला.) ह्या प्रश्नास महाराजांनीं अतिशय बेपरवाईनें उत्तर दिलें कीं, "भगवानानें जसें केलें तसें झालें!" त्यावर मीं त्यास असें सांगितलें कीं, "महाराज, भगवानानें तुह्मांस तुमच्या निकृष्ट स्थितींतून एवढ्या ऐश्वर्यपदावर आणून ठेविलें, हे तुमच्यावर मोठे उपकार केले आहेत. ते दुसऱ्यास अपकार करण्याकरितां नव्हेत ! तुह्मी जर अशा रीतीनें वागूं लागला, तर तुमच्याविषयीं सर्व लोकांचे मत फार वाईट होईल व तुह्मांस कोणी चांगले ह्मणणार नाहीं." ह्यावर त्यांनी उत्तर दिलें कीं, "मीं आतां ते सर्व सोडून दिले आहे !" अर्थात् तशा प्रकारचें सर्व वर्तन महाराजांनीं सोडून दिले, असा महाराजांच्या शब्दाचा अर्थ माझ्या मनांत येऊन, मी त्यांस ह्मटलें की, "ही फार आनंदाची गोष्ट आहे." परंतु महाराजांनी माझा हा चुकीचा समज फार वेळ राहूं दिला नाहीं ! त्यांनी लगेच स्पष्ट करून सांगितले की, "तुह्मी समजलां तसा माझ्या शब्दांचा अर्थ नाहीं. माझा अर्थ असा कीं, मीं लोकमताकडे लक्ष्य देण्याचें मुळींच सोडून दिले आहे. मला कोणाचीच जरूर नाहीं !"

 हा मेजर स्टुअर्ट ह्यांच्या खलिता वाचून महाराज जनकोजीराव ह्यांचें वर्तन कोणाही सुज्ञ मनुष्यास चांगले वाटणार नाहीं

 मेजर स्टुअर्ट ह्यांची इ. स. १८३० सालीं ग्वाल्हेरीहून बदली झाली. त्या वेळीं त्यांनीं ग्वाल्हेर सोडण्यापूर्वी पुनः महाराजांची भेट घेतली व त्यांची कशी काय स्थिति आहे हें विचारिलें. त्या वेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पूर्ण सुखी आहें." ह्या प्रसंगी मेजर स्टुअर्ट ह्यांनी महाराजांस चांगला उपदेश केला, व संस्थानचें राजकीय कामकाज चाललें असतांना बाईसाहेबांजवळ हजर राहणें किती हितावह आहे, तेंही सांगितलें. त्या वेळीं महाराजांनीं, "माझी तबियत बरी असते, तेव्हां बाईसाहेबांजवळ मी हजर असतों." असें उत्तर दिलें. ह्या सर्व संभाषणाचा सारांश मेजर स्टुअर्ट ह्यांनी शेवटी एका वाक्यांत असा काढिला आहे कीं, "एकंदरींत महाराजांनीं मजवर यत्किंचितही विश्वास न दाखवितां, किंवा आपली दुःखें मला न कळवितां, माझ्या आपण होऊन केलेल्या मदतीचा स्वीकार न करून तिच्याकडे दुर्लक्ष्य केलें; व आपला उर्मटपणा व बेपरवाई स्पष्ट रीतीनें व्यक्त केली."

 मेजर स्टुअर्ट ह्यांच्यासारख्या ग्वाल्हेर संस्थानाच्या खऱ्या हितचिंतक व निःपक्षपाती रेसिडेंटानें अल्पवयी महाराजांविषयीं आपला जो अभिप्राय व्यक्त केला आहे, त्यावरून महाराजांचें खरें वर्तन कशा प्रकारचें होतें, ह्याविषयीं नीट कल्पना करितां येते. अर्थात् अशा अज्ञान व विचारशून्य बालराजाच्या हातीं संस्थानच्या राज्यकारभाराचीं सूत्रें देणें ही गोष्ट, बायजाबाईसाहेबांसारख्या शहाण्या व राजकारणी बायकोस अप्रशस्त व अनर्थावह वाटावी, हें अगदीं साहजिक आहे. त्यामुळें अशा बालराजास त्यांनी स्वातंत्र्य दिलें नाही, किंवा राज्याधिकार दिला नाहीं, ह्याबद्दल त्यांना दोष देणें रास्त नाहीं. परंतु खरा इतिहास व खरी वस्तुस्थिति माहीत नसल्यामुळें कांहीं इतिहासकारांचा हा गैरसमज झालेला आहे. असो.

 मेजर स्टुअर्ट ह्यांनी हा सर्व प्रकार वरिष्ठ सरकारास कळविला. परंतु, बायजाबाईसाहेब ह्या राज्यकारभार चालविण्यास खंबीर असल्यामुळें व त्या वेळीं एतद्देशीय संस्थानांतील अंतर्व्यवस्थेंत हात घालण्याचा वरिष्ठ सरकारचा हेतु (Policy) नसल्यामुळें, हा कलहाग्नि कांहीं कालपर्यंत तसाच धुमसत राहिला. संस्थानांतील कलहप्रिय व स्वार्थसाधु सरदारांचे व लष्करी अधिकाऱ्यांचें त्यास जोंपर्यंत साहाय्यरूपी तेल मिळालें नाहीं, व वरिष्ठ सरकारच्या अनुकूलतेचा वारा त्यास लागला नाहीं, तोंपर्यंत त्याच्या ज्वालांनीं पेट घेतली नाही. परंतु पुढें दोन्ही गोष्टी प्राप्त होतांच, त्याच्या ज्वाला प्रदीप्त होणार व त्यांत कोणाची तरी


 1. Major Stewart's despatches quoted in Sutherland's Sketches. Page 191. आहुति पडणार, हें भविष्य ठरल्यासारखेंच झालें. कर्नल सदरलंड नामक एका माहितगार युरोपियन गृहस्थानें त्यावेळच्या ग्वाल्हेरच्या स्थितीबद्दल जो लेख लिहिला आहे, त्यांत हें भविष्य ध्वनित केलें आहेः- "बायजाबाईसाहेब ह्या आमच्या साहाय्याशिवाय राज्यकारभार चालवीत आहेत, आणि आतांपर्यंत, बालराजानें संस्थानांतील आपल्या अनुयायी मंडळीसह बायजाबाईंच्या राज्यकर्तृत्वावर किंवा सामर्थ्यावर कांहीं छाप बसविली आहे, असें दिसत नाहीं. तथापि जसजसा तो वयानें मोठा होत जाईल व सज्ञान होईल, त्याप्रमाणें त्यास, जर साधारण महत्त्वाकांक्षा व मनुष्याचे उचित मनोविकार असतील, तर पुढेंमागें जी सर्व राजसत्ता त्याचीच होणार, तिचा कांहीं भाग हातीं घेण्याची इच्छा त्यास उत्पन्न झाल्यावांचून राहणार नाही. त्याचप्रमाणे, संस्थानच्या सरदार व मुत्सद्दी लोकांपैकीं कांहींना नेहमीं नवीन उदयास येणाऱ्या सूर्याप्रमाणें नूतन राजाची आवड अधिक असते, व कांहींना स्त्रीच्या राज्यकारभारापेक्षां पुरुषाचा राज्यकारभार अधिक पसंत वाटतो, असे सर्व लोक बालराजाचा पक्ष लवकरच स्वीकारतील. आणि असें झालें ह्मणजे त्यांच्या संयुक्त बळापुढे रीजंट राणीचें राज्य बिलकूल टिकणार नाहीं. खजिन्याचें आधिपत्य व संस्थानचीं इतर कित्येक साधनें ह्यांच्या योगानें बायजाबाईंच्या पक्षाची कांही दिवस सरशी होईल व त्यांस प्रतिपक्षाशीं थोडा वेळ टिकाव धरतां येईल. अशा वादामध्यें ब्रिटिश सरकार हें अगदीं अलिप्त राहील हेंच विशेष संभवनीय आहे. आह्मी कोणावरही मेहेरबानी न करितां, उभय पक्षांस जितकें ज्यास्त स्वातंत्र्य देऊं, तितकें त्या संस्थानचें हित होऊन, त्याची राज्यव्यवस्था अधिक राष्ट्रीय व अधिक कार्यसाधक होईल. व तेणेंकरून आह्मांस त्या संस्थानच्या राजकारणांत हात घालण्याची अवश्यकता तितकी कमी कमी वाटत जाईल." परंतु कर्नल सदरलंड ह्यांच्या अनुमानाप्रमाणें ब्रिटिश सरकारच्या तटस्थपणाचा परिणाम ग्वाल्हेर संस्थानास हितावह न होतां, उलट अनर्थावह मात्र झाला, असें मिल्ल प्रभृति इतिहासकारांचें मत आहे. अस्तु.
 ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनीं ग्वाल्हेर येथील दरबारची स्थिति व बायजाबाईसाहेबांचा राज्यकारभार ह्यासंबंधीची माहिती सरकारास वेळोवेळीं कळविलीच होती. त्यांना बायजाबाईंच्या राज्यव्यवस्थेंत बिलकुल उणीव वाटली नाहीं, व हिंदुस्थान सरकारासही त्यामध्यें


 1. "From the period up to the present there has been little at Gwalior calling for the interference or notice of the British Government in the affairs of that principality. The Baeza Baee continues her administration without requiring our support, and the young Raja, if he has any adherents in the state, has so far failed to make any impression on her power. It may be supposed that as he advances in years and appoaches his man-hood, he must, if he has the ordinary ambition, and the proper feelings of a man, desire to exercise a portion of that power which sooner or later must be his own; that those of the chiefs of the state who are likely to worship the rising sun, as well as those who would prefer the Government of a man to that of a woman, will, at no very distant period, array themselves on his side ; and that the Government of the Regent will fall before their united force. The command of treasury and the resources of the state must, for a time give a preponderance to her party, and may enable her to prolong the struggle. In such a contest it will be very possible for the British Government to stand aloof and the more we allow the parties to have a fair-field and no favor, the more shall we secure a national and efficient Government for that country, and the less will it hereafter be necessary for us to interfere in its affairs." हात घालण्याची अवश्यकता वाटली नाहीं. मेजर स्टुअर्ट ह्यांची हैदराबादच्या रेसिडेंटाच्या जागीं इ. स. १८३० सालीं नेमणूक झाली. त्यांचे जागीं मि. क्याव्हेंडिश हे ग्वाल्हेर दरबारचे नवे रेसिडेंट होऊन आले. ह्यांचेंही बायजाबाईसाहेबांविषयीं प्रथम मन कलुषित झालेलें नव्हतें. त्यांना ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पसंत असून त्यांनी बाईसाहेबांचें अनेक वेळां अभिनंदन केलें. परंतु पुढें, महाराज जनकोजीराव हे जसजसे मोठे होऊं लागले, तसतसें त्यांच्या पक्षास अधिक प्राबल्य येऊन हा कलह पेट घेत चालला. ह्याच वेळीं ब्रिटिश सरकाराने बायजाबाईसाहेब ह्यांस स्वतःचा शिक्का बंद करून महाराजांचा शिक्का चालविण्याचा आग्रह केला, व महाराजांचे सर्व प्रतिबंध कमी करून त्यांचें व ब्रिटिश रेसिडेंटाचें दळणवळण अधिक मोकळेपणाचें केलें. त्यामुळें महाराजांच्या पक्षांतील लोकांस चांगली फूस सांपडून, त्यांनी महाराज व त्यांच्या मातुश्री ह्यांच्या तंट्याचे स्वरूप अधिक उग्र व भयानक केलें. त्यामुळें नवीन रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांस हें भांडण हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांच्यापुढें मांडणें भाग पडलें. लॉर्ड वुइल्यम बेंटिंक ह्यांनी राजकारणाच्या हेतूनें ह्मणा, किंवा वस्तुस्थितीचें समक्ष ज्ञान करून घेण्याकरितां ह्मणा, ग्वाल्हेर येथें स्वतः येऊन, बायजाबाईसाहेब व जनकोजीराव ह्यांची भेट घेण्याचा निश्चय केला;व त्याप्रमाणें त्यांची स्वारी आपल्या पत्नीसहवर्तमान ग्वाल्हेर येथें ता. १८ डिसेंबर इ. स. १८३२ रोजीं येऊन दाखल झाली. खुद्द गव्हरनर जनरलसाहेब ह्यांची स्वारी ग्वाल्हेर येथें येणार असे समजतांच बायजाबाईसाहेब ह्यांस फार संतोष झाला, व त्यांनी त्यांच्या स्वागताची उत्तम प्रकारची तयारी केली. बायजाबाईसाहेब ह्यांची व लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांची जी भेट झाली, तिचें सुंदर वर्णन त्या वेळी हजर असलेल्या एका युरोपियन गृहस्थानें लिहिले आहे. तेंच येथें सादर केलें ह्मणजे त्या प्रसंगाचा हुबेहूब देखावा नेत्रांपुढें येऊन, बायजाबाईसाहेबांचे ऐश्वर्य व संपत्ति ह्यांचीही कल्पना करितां येईल. हें वर्णन पुढें लिहिल्याप्रमाणें आहेः-

 "बियाना, डिसेंबर २० इ. स. १८३२– गव्हरनर जनरलसाहेब ग्वाल्हेरच्या महाराजांस परत भेट देण्यास गेले, त्या वेळीं महाराणी बायजाबाई आणि महाराज जनकोजीराव शिंदे हे नामदारसाहेबांस भेटण्याकरितां धोलपुरापर्यंत आले होते. त्या वेळीं त्यांचेबरोबर सर्व प्रकारचें सैन्य मिळून ३०,००० लोक होते. ह्या सैन्याचा तळ ग्वाल्हेरच्या सरहद्दीवर चंबळा नदीचे कांठीं पडला होता. आग्र्याच्या सरहद्दीवरील प्रांत, दोन किंवा तीन मैलपर्यंत, विपुल जलानें परिप्लुत झाल्यामुळें, आह्मांस त्या पलीकडे तळ देणें भाग पडलें होतें. मराठ्यांच्या लष्करापासून आमचा तळ लांब असल्यामुळें, व नामदार गव्हरनर जनरल ह्यांनी दुपारी तीन वाजतां कूच केल्यामुळें, मराठ्यांच्या लष्कराचा भव्य देखावा अवलोकन करण्यास मला संधि मिळाली नाहीं. ह्या समयीं मराठ्यांचे सैन्य नामदारसाहेबांच्या सन्मानार्थ लष्करी थाटानें जितकें सज्ज होतें, तितकें क्वचितच दृष्टीस पडेल. ह्या लष्कराच्या तळापासून नदीच्या काठापर्यंत जाण्याचा जो रस्ता होता, तो फारच अरुंद होता. नदीच्या तीरावरील उच्चप्रदेशावर पायदळ पलटणींचे लोक हातामध्यें तरवारी व तोड्यांच्या बंदुकी घेऊन दोन मैलपर्यंत एकसारखे उभे राहिले होते. त्यांच्याकडून नदीच्या बाजूस खाली उतरत आलें आणि थोडें वळलें, ह्मणजे नीलवर्ण व स्वच्छ अशा चंबळा नदीच्या तीरावर, फारच सुंदर देखावा दृष्टीस पडत असे. तेथें १५ हजार सैन्याची दुतर्फा रांग लागलेली असून त्यांच्या पिच्छाडीस घोडेस्वारांच्या तरवारी चमकत होत्या. हे सर्व लोक नामदारसाहेबांस सलामी देण्याकरितां अगदीं तत्पर झाले होते. हा देखावा फारच भव्य व अदृष्टपूर्व असा होता. रीतीप्रमाणें गव्हरनर जनरलसाहेबांच्या दरबारचा समारंभ झाला. महाराज जनकोजीराव हे शृंगारलेल्या हत्तीवर सोन्याच्या अंबारींत बसून गव्हरनर जनरलसाहेबांस अर्ध्या रस्त्यावर सामोरे आले होते. उभयतांची मुलाखत होतांच बंदुकीची फेर झडली. नंतर परस्परांचे मुजरे होऊन नामदारसाहेब आपल्या हत्तीवरून शिंदे सरकारच्या हत्तीवर आले. नंतर उभयतांच्या स्वाऱ्या दरबारच्या भव्य तंबूमध्यें दाखल झाल्या. हा तंबू ह्या प्रसंगाकरितां उत्तमप्रकारें शृंगारलेला होता. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांची व नामदारसाहेबांची भेट तंबूमध्ये चिकाचा पडदा लावून झाली. त्यांस नामदारसाहेबांनी मोठ्या आदबीनें सलाम केला. नंतर त्यांचें व बायजाबाईसाहेबांचे, मि. म्याक्नॉटन ह्यांच्या मध्यस्थीनें, कांहीं वेळ संभाषण झालें. रीतीप्रमाणें नजरनजराणे, पानसुपारी व अत्तरगुलाब होऊन दरबार बरखास्त झाला.

 दुसरे दिवशीं सकाळीं मराठ्यांचें सैन्य ग्वाल्हेरीकडे परत वळलें, व ना. गव्हरनर जनरल ह्यांची स्वारी एक दिवसानंतर–ह्मणजे ता. २१ डिसेंबर रोजीं कूच करिती झाली. त्यानंतर तोफखाना परत निघाला. चंबळा नदीचे ग्वाल्हेरच्या बाजूचे ओहोळ हे आग्र्याच्या बाजूपेक्षां अधिक बिकट असल्यामुळें त्यांतून सुरक्षितपणें तोफा नेणें जवळजवळ अशक्य होतें; ह्मणून ता. २१ रोजी सर्व सैन्य पुढें पाठवून, तोफखाना स्वतंत्र रीतीनें न्यावा, असा विचार ठरला. आह्मी आल्यानंतर दुसरे दिवशीं महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांची भेट घेतली. एतद्देशीय स्त्रियांनी युरोपियन स्त्रियांची भेट घेण्याची फारशी चाल नाहीं. परंतु बायजाबाईनीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांची मुलाखत व्हावी अशी इच्छा व्यक्त केल्यामुळें तो योग घडून आला. प्रथमतः बायजाबाईसाहेब ह्यांनी रीतीप्रमाणें त्यांना पेशवाईची भेट दिली. त्या वेळीं त्यांच्याबरोबर त्यांची कन्या चिमणाबाई (ही आपासाहेब पाटणकर ह्यांस दिली होती ) व इतर सरदारांच्या स्त्रिया गेल्या होत्या. युरोपियन स्त्रियांना ह्या भेटीचें फार कौतुक वाटून त्या, लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांस, राजस्त्रियांच्या स्वागताचे कामीं मदत करण्याकरितां आल्या होत्या. युरोपियन स्त्रियांनीं चिमणाबाईचें सौंदर्य पाहून त्यापुढें आपलें रूप कांहींच नव्हे, असे प्रांजलपणें कबूल केलें. त्यांनीं, तिचें अप्रतिम लावण्य, तिचा गौरवर्ण, तिचे तेजस्वी व पाणीदार नेत्र आणि नाजूक व रेखलेले अवयव पाहून, इंग्लंडांतील प्रत्येक स्त्री तिचा हेवा करील, अशा प्रकारें तिच्या रूपाची फार फार प्रशंसा केली. ह्या वेळीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांनीं महाराणीसाहेबांस कांहीं चिनी वस्तू व अलंकार नजर केले. हे त्यांच्या भेटीच्या अगोदर तीन चार तासपर्यंत सर्वांच्या प्रदर्शनार्थ मांडून ठेविले होते. ते फार सुंदर होते असें ह्मणतात. राणीसाहेब मेण्यांत बसून आल्या, त्या वेळीं त्यांच्याबरोबर साहा परिचारिका पायीं चालत होत्या. मेण्यावर लाल रंगाच्या मखमलीची भरजरी बुटेदार चादर पसरलेली होती. ती फार मूल्यवान् असून तिच्यासभोंवतीं मोत्यांचे गोंडे लोंबत होते. राणीसाहेबांच्या दासी व इतर स्त्रिया ह्यांनीं अतिशय उंची वस्त्रे व बहुमूल्य अलंकार परिधान केल्यामुळें त्यांच्याकडे पाहून दृष्टि दिपून जात असे.

 दुसरे दिवशीं सकाळीं, महाराज जनकोजीराव शिंदे लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांस भेटण्याकरितां गेले होते. त्यांचा लवाजमा व थाट अगदीं अपूर्व होता. ते स्वतः एका शृंगारलेल्या हत्तीवर बसले होते. हत्तीच्या अंगावर भरजरीची झूल व गळ्यामध्यें सुवर्णाच्या माळा आणि गंडस्थळावर निरनिराळे अलंकार घातले होते. त्यामुळे तो प्रचंड प्राणी फार सुशोभित दिसत असून, आपल्या ऐश्वर्याचें प्रदर्शन करण्याकरितांच जणू मंद गतीनें चालत आहे, असें वाटत होते. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांचे बंधु हिंदुराव घाटगे व जांवई आपासाहेब पाटणकर आणि दरबारचे इतर प्रमुख मानकरी व सरदार लोक महाराजांबरोबर मोठ्या थाटानें गजारूढ होऊन गेले होते. त्यांच्या वैभवानें शृंगाराभिरुचि दिपून जाऊन, ती बिचारी तेथून लोपली होती कीं काय, असें वाटत असे. महाराजांची व नामदारसाहेबांची मुलाखत होऊन कांहीं वेळ एकांत भेट झाली. हिंदुराव व आपासाहेब ह्यांचे व महाराजांचे अंतःकरणांतून रहस्य नसल्यामुळें, त्यांना नामदार साहेबांनी महाराजांस खाजगी भेट दिल्याचे पाहून फार आश्चर्य वाटलें. त्यांचा व महाराजांचा एकांत तीन तासपर्यंत चालला होता. तो पाहून, महाराजांना कांहीं लहर येऊन त्यांनीं गव्हरनर जनरलसाहेबांस, आपणांस गादीवर बसविल्यावांचून सोडीतं नाहीं, ह्मणून हट्ट धरून अडवून ठेविलें आहे की काय, अशी शंका घेण्यास कारण झाले. तसा कांहीं प्रकार झाला असता, तर महाराजांस तेव्हांच निरोप मिळून रणकंदनाचाच प्रसंग ठेपल्यावांचून राहाता ना. महाराणींचे सैन्य तयार होतेंच व आमचेंही सैन्य तयार होतेंच. त्या उभयतांपैकीं कोणाची तरी महाराजांच्या लोकांशी चकमक उडाली असती. परंतु जनकोजीराव ह्यांस, महाराणीच्या सैन्याची व आपली लढाई झाली, व तींत आपण कैद झालों, तर आपणांस गव्हरनर जनरलसाहेबांकडून कांहीं मदत होणार नाहीं, असें कळून चुकलें होतें. त्यामुळें त्यांनीं अतिप्रसंग न करितां, तीन तासपर्यंत गव्हरनर जनरलसाहेबांजवळ, आपणांस राज्याधिकार मिळावा ह्मणून एकसारखी कर्मकथा चालविली होती. असो. ही भेट संपल्यानंतर दुपारीं लेडी उइल्यम ह्या आमच्या लष्करातील सर्व आंग्ल स्त्रिया बरोबर घेऊन महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस भेट देण्याकरितां गेल्या. त्यांचा महाराणीसाहेबांच्या वतीने चिमणाबाईनें उत्तम प्रकारें आदरसत्कार केला. चिमणाबाईचें आदरकौशल्य आणि रीतभात
९६


पाहून आंग्ल स्त्रियांनी तिच्या रूपाप्रमाणें ह्याही सद्गुणांची फार तारीफ केली. चिमणाबाईनें आपल्या मातुश्रींच्या वतीनें, मोठ्या प्रौढपणानें आणि चित्ताकर्षक रीतीनें, सर्वांचा आदरसत्कार व मानपान यथायोग्य केला. ह्या प्रसंगीं बायजाबाईसाहेबांनीं लेडी उइल्यम व आंग्ल स्त्रिया ह्यांना पुष्कळ मूल्यवान् वस्तू नजर केल्या. त्या सर्वांची माहिती चिमणाबाईनें आंग्ल स्त्रियांस विनम्र व गोड वाणीनें सादर केली. त्यामुळें त्या स्त्रिया अत्यंत प्रसन्न झाल्या, हें सांगावयास नकोच."

 गव्हरनर जनरलसाहेबांनीं महाराज जनकोजीराव ह्यांस परत भेट दिली; त्याचप्रमाणें बायजाबाईसाहेब ह्यांसही परत भेट दिली. बायजाबाईसाहेबांनीं रीतीप्रमाणें चिकाच्या पडद्यांतून नामदारसाहेबांची भेट घेतली. त्या वेळीं हिंदुराव घाटगे हे मराठी तऱ्हेचा बाणेदार पोषाख करून व बहुमूल्य रत्नालंकार धारण करून, नामदारसाहेबांच्या सत्कारार्थ तत्पर होते. बायजाबाईसाहेबांचें व नामदारसाहेबांचें राजकीय प्रकरणीं वगैरे बराच वेळ संभाषण झालें. नंतर त्यांनी आदबीनें सलाम करून बायजाबाईसाहेबांचा निरोप घेतला.

 गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक आणि महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांची ज्या वेळीं भेट झाली, त्या वेळीं चीफ सेक्रेटरी मि. म्याक्नॉटन, ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश आणि लखनौचे रेसिडेंट मेजर जॉन लो हे हजर होते. ह्या भेटीमध्यें जे संभाषण झालें, त्याचा सारांश ता. १८ डिसेंबर १८३२ च्या एका खलित्यामध्यें आला आहे. तो संक्षिप्त रीतीनें येथे दाखल करितोंः-

 "गव्हरनर जनरलसाहेबांनी महाराजांस असें सांगितलें कीं, ज्याअर्थीं उभय सरकारांमध्ये स्नेहभाव वसत आहे, त्या अर्थीं महाराजांनीं मजवर पूर्ण विश्वास ठेवावा, व माझी काय मदत पाहिजे तें मला मोकळ्या अंतःकरणाने कळवावे. महाराजांनीं गव्हरनर जनरलसाहेबांच्या ह्या कृपाळुपणाबद्दल त्यांचे आभार मानून आपली सर्व हकीकत सांगण्यास सुरवात केली. त्या हकीकतीचा मथितार्थ इतकाच होता कीं, आपण आतां प्रौढ झालों असून, शास्त्राप्रमाणें व शिंद्यांच्या घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या चालीप्रमाणें राज्याचा अधिकार आपणांस मिळावा. नामदारसाहेबांनीं महाराजांची सर्व हकीकत ऐकून घेऊन, त्यांचें मागणें किती चुकीचें आहे हें त्यांस समजावून सांगितलें. ते ह्मणालेः– "राज्याचा अधिकार कोणाकडून घेण्यास अथवा कोणास देण्यास मला मुळींच अखत्यार नाही. कारण, शिंदे सरकारचें राज्य अगदीं स्वतंत्र आहे. ब्रिटिश सरकारानें कोणास मसनदीवर बसविलें नाहीं व कोणास तिच्यावरून ते काढणारही नाहींत. प्रस्तुत प्रसंगी त्यांना आपल्या राज्यकारभाराचे धोरण बदलण्याचे प्रयोजन नाहीं." हे नामदारसाहेबांचे शब्द ऐकून महाराजांनी असा प्रश्न विचारिला कीं, "मग मला दत्तक घेण्याचा हेतु काय ?" नामदारसाहेबांनीं त्यांस उत्तर दिलें कीं, "तुह्मांस दत्तक घेण्याचा उद्देश, शिंद्यांच्या घराण्याचे नांव चालावें व वारसाबद्दल वादविवाद उत्पन्न होऊन पुढें विपरीत परिणाम होऊं नये, हा आहे. ब्रिटिश सरकारानें बायजाबाईंकडून तुह्मांस अमकेच वर्षीं गादीवर बसवावें, असा करार करून घेतलेला नाहीं. बायजाबाईंच्या कृपेनें तुमचें दत्तविधान होऊन तुह्मांस शिंद्यांच्या गादीच्या वारसाचा हक्क मिळाला, हें तुह्मीं आपलें मोठें भाग्य समजलें पाहिजे. ह्या उपकाराची फेड तुह्मीं अशा रीतीनें करू नये." महाराजांनीं गव्हरनरजनरलसाहेबांच्या भाषणाचा प्रतिकूल कल पाहून पुनः असा प्रश्न विचारला कीं, "आतां नाहीं, तर मग पुढे किती वर्षांनी मला राज्याधिकार मिळेल ?" त्यावर नामदारसाहेबांनीं "ह्या प्रश्नास आह्मी जबाब देऊ शकत नाहीं." असें चोख उत्तर दिले. आणखी, त्यांना सामोपचारानें असे सांगितलें कीं, "महाराज, तुह्मी या गोष्टीचा नीट विचार करा. मेजर स्टुअर्ट हे ज्या वेळीं ग्वाल्हेरचे रेसिडेंट होते, त्या वेळीं त्यांनीं महाराज दौलतराव शिंदे ह्यांस दत्तक घेण्याबद्दल वारंवार सूचना केली; परंतु त्यांनी ती मान्य केली नाहीं. पुढे त्यांनी मृत्यूपूर्वीं कांही महिने अगोदर, चांगलें अक्कलहुषारींत असतांना, आपल्यापश्चात् बायजाबाईनीं सर्व राज्यकारभार सांभाळावा, अशी इच्छा भरदरबारामध्ये प्रदर्शित केली. त्याप्रमाणें महाराज दौलतराव मृत्यु पावल्यानंतर सर्व राज्यसूत्रें बायजाबाईंनीं धारण केली आहेत. गादीच्या वारसाबद्दल प्रश्न उपस्थित होऊन घोंटाळा होऊं नये, ह्मणून त्यांनीं तुह्मांस दत्तक घेतलें आहे. परंतु अमक्याच वर्षीं दत्तकावर सर्व राज्यभार सोंपवूं ह्मणून त्यांनी ब्रिटिश सरकाराशीं करार केलेला नाहीं. सारांश, तुह्मी जे ह्या महापदावर चढला, त्याचें सर्व श्रेय बायजाबाईंकडे आहे; व त्याचा संबंध ब्रिटिश सरकाराशीं मुळीच नाहीं. तुह्मांस राज्याधिकारी होण्याचा प्रसंग सुदैवाने लवकरच येईल; तोपर्यंत तुह्मीं वाट पाहिली, तर बायजाबाईंनीं तुमच्याखेरीज दुसऱ्या कोणास गादीचा वारस करूं नये एवढें मात्र आह्मी त्यांस सांगू. ह्यावर तुह्मीं विश्वास ठेवावा. परंतु असें न करितां, जर तुह्मी दंगेधोपे करून बायजाबाईंस राज्यावरून काढण्याचा प्रयत्न कराल, तर मग त्याचा जो बरावाईट परिणाम होईल, तो तुमचा तुह्मांस भोगावा लागेल. अशा गडबडींत जर तुमचा खून झाला, अथवा तुह्मी कैद झाला, तर ब्रिटिश सरकार तुमचा कैवार घेऊन बिलकूल मध्यस्थी करणार नाहीं, किंवा तुमच्या गादीच्या वारसापणाबद्दल हमी घेणार नाहीं." ह्याप्रमाणें गव्हरनरजनरलसाहेबांनीं महाराजांस स्पष्ट रीतीनें आपलें मत कळविलें व आणखीही योग्य उपदेश केला, व महाराजांनी त्याप्रमाणे वर्तन करण्याचें मान्य केलें.

 ह्या भेटीच्या वृत्तांतावरून बायजाबाईंनीं सर्व राज्यकारभार चालवावा व महाराजांनी त्यांच्या आज्ञेत राहावे, असा हिंदुस्थान सरकारचा हेतु स्पष्ट रीतीनें व्यक्त होतो. परंतु ह्याप्रमाणें महाराजांच्या हातून वर्तन घडले नाहीं. त्यांनी पुनः आपल्या कुटिल मंत्र्यांच्या नादीं लागून, त्यांच्या मसलतीप्रमाणें बायजाबाईंच्या विरुद्ध कट उभारिला, आणि त्यांच्याविरुद्ध नानाप्रकारच्या कागाळ्या ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांचेमार्फत गव्हरनरजनरलसाहेबांकडे पाठविण्यास सुरवात केली. मि. क्याव्हेंडिश ह्यांचें मत महाराजांच्या विरुद्ध असून, त्यांना महाराजांच्या ह्या कृती पसंत होत्या, असें दिसत नाहीं. ता. २८ मार्च इ. स. १८३३ रोजीं, त्यांनीं महाराजांस जो खलिता पाठविला आहे, त्यांत त्यांनीं त्यांची कानउघाडणी करून गव्हरनरजनरलसाहेबांच्या उपदेशाची त्यांना पुनः आठवण दिली आहे. एवढेच नव्हे, तर "बायजाबाई ह्या सर्व राज्याच्या मालक आहेत व इंग्रजांस त्यांच्या राज्यकारभारांत हात घालण्याचा अधिकार पोहोंचत नाहीं. ह्याकरितां माझी तुह्मांस अशी शिफारस आहे कीं, तुह्मीं गव्हरनरजनरलसाहेबांच्या उपदेशांप्रमाणें व तुमच्या स्वतःच्या वचनाप्रमाणें वर्तन ठेवून, तुह्मीं बायजाबाईंच्या आज्ञेंत वागावें व कांहीं तंटेबखेडे करूं नयेत. असा वर्तनक्रम तुह्मी स्वीकाराल, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांस संतोष वाटेल; आणि जर तुह्मी दंगेधोपे कराल, तर- तुमची सध्याची स्थिति कांहींही असो-तुह्मी अधिक प्रतिबंधांत पडाल; आणि त्यांतून तुमची सुटका होणें अधिक कठीण पडेल. मग ब्रिटिश सरकार किंवा मी तुमच्या वतीनें त्यांत बिलकूल लक्ष्य घालणार नाहीं. ........ तुह्मांस जर कांहीं महत्त्वाची गोष्ट कळवावयाची असेल व ती जर गव्हरनर जनरल ह्यांस अद्यापि कळविली गेली नसेल, तर प्रथम मी ती बायजाबाईंस कळवीन; व त्यांचा त्यासंबंधाचा अभिप्राय घेऊन, नंतर तुमचा खलिता पुढें रवाना करीन. कोणत्याही कारणास्तव, तुमचा खलिता किंवा खाजगी पत्रव्यवहार बायजाबाईंस कळविल्यावांचून मी पुढें रवाना करणार नाहीं. तुमच्या हे लक्ष्यांत असेलच कीं, तुमची भेट घेण्याबद्दल गव्हरनरजनरलसाहेबांनी बायजाबाईंची परवानगी प्रथम विचारली होती; व तुमच्या भेटीमध्यें जी हकीकत घडली, ती सर्व मागाहून त्यांस कळविली होती. त्यांच्या संमतीवांचून तुमचा व माझा किंवा गव्हरनरजनरलचा व तुमचा खाजगी पत्रव्यवहार होणें अगदीं अशक्य आहे. बाईसाहेबांनीं तुह्मांस जास्त ममतेने वागविण्याबद्दल मी त्यांस सांगावें ह्मणून तुह्मीं जें लिहिले आहे, त्याबद्दल माझें असें सांगणे आहे कीं, तुह्मी जर स्वतःच बाईसाहेबांस आपल्या वर्तनानें संतुष्ट कराल, तर तुह्मांस त्या फार चांगल्या रीतीनें वागवितील. तुह्मी अयोग्य तक्रारी करीत राहाल व भलतेसलते विचार मनांत वागवाल, तर तुमचीं संकटें कमी न होतां, उलट अधिक वाढतील; व आह्मी तुमच्याकरितां बिलकूल मध्यस्थी करणार नाहीं. तात्पर्य, तुह्मीं बायजाबाईंस संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे; व गव्हरनरजनरलसाहेबांचे शब्द सदोदित नेत्रासमोर ठेविले पाहिजेत."

 ह्याप्रमाणें महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस बायजाबाईसाहेबांच्या मर्जीप्रमाणें व आज्ञेबरहुकूम वागण्याबद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांनीही स्पष्ट रीतीने कळविलें. ह्यावरून गव्हरनरजनरल व ग्वाल्हेरचे रेसिडेंट ह्यांस महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन पसंत नसून, त्याचा त्यांनी वारंवार कडक शब्दांनी कसा निषेध केला होता, हे दिसून येतें. अर्थात् या सर्व हकीकतीवरून ग्वाल्हेर येथील तंट्याचे मूळ कारण काय व त्याचा अधिक दोष कोणाकडे येतो, हें चतुर वाचकांस सहज ताडितां येईल. महाराज जनकोजीराव ह्यांचे अल्पवय व


 1. Letter from the Hon'ble Mr. Cavendish to Junkoo Raw Scindiah, in reply to one received from the Maharaja, dated 28th March 1833. अपरिपक्वबुद्धि असल्यामुळें, ग्वाल्हेर दरबारांतील कुटिल व कलहप्रिय लोकांच्या ते ताब्यांत जाऊन, त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागले, ह्यांत विशेष आश्चर्य नाहीं. तथापि, त्यांच्या ह्या दुर्वर्तनाने हा कलह अधिक विकोपास गेला व त्याचा परिणाम बाईसाहेबांस विनाकारण भोगावा लागला, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. 'एका हातानें टाळी वाजत नाहीं' ह्या व्यवहारांतील ह्मणीप्रमाणें महाराजांच्या दुर्वर्तनामुळें बायजाबाईसाहेबांसही संताप व उद्वेग येऊन, त्यांच्याही हातून क्वचित् प्रमाद घडले असतील; परंतु दोषाचा अधिक वांटा त्यांच्याकडे येतो, असें उपलब्ध माहितीवरून तरी निदान ह्मणतां येत नाहीं.



बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 125 crop)