पोशिंद्याची लोकशाही/स्वातंत्र्यलढ्याच्या फौजेची पुनर्बाधणी करताना

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


स्वातंत्र्यलढ्याच्या फौजेची पुनर्बाधणी करताना...


 'शेतकरी तितुका एक एक' या सूत्रात सर्व शेतकऱ्यांना एकत्र गुंफून देशाच्या गरिबीची समस्या दूर करण्यासाठी गेली २५ वर्षे विविध स्वरूपांत लढा देणाऱ्या शेतकरी संघटनेने सातारा येथे ६ व ७ नोव्हेंबर २००४ रोजी झालेल्या विस्तारित संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीत समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या तसेच वेगवेगळ्या कार्यांविषयांच्या अशा २१ आघाड्या स्थापन करून, त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. (ही संख्या नंतर २५ पर्यंत गेली.) समाजातील हे भेदाभेद जाणीवपूर्वक जागते ठेवून, राजकारण्यांनी समाज कधी एकसंध होऊच दिला नाही, असे आग्रहाने मांडणाऱ्या संघटनेनेही अशा आघाड्या बनवताच इतरांच्या मनाचे सोडा, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनांचाही गोंधळ उडाला.
 या आघाड्यांपैकी अल्पसंख्याक आघाडी हा तर परम कुतूहलाचा विषय. कारण, अल्पसंख्य म्हटले, की मुसलमान असे ठाम समीकरण आपल्या देशात तयार झाले आहे. अशा या अल्पसंख्याक आघाडीच्या या पहिल्याच शिबिराच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या मनातील गोंधळ पुन्हा प्रकट झाला.
 या शिबिरात सहभागी असलेल्या, शेतकरी संघटनेच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीसुद्धा - शेतकरी संघटना अल्पसंख्याकांची आघाडी बांधायचा प्रयत्न का करते आहे? आता हे शिबिर कशासाठी भरवले? अशांसारखे प्रश्न विचारले.
 शेतकरी संघटनेने देशाच्या गरिबीची समस्या सोडवण्यासाठी 'शेतीमालाला रास्त भाव' हा एककलमी कार्यक्रम घेऊन, स्वातंत्र्याचा लढा चालवला असला, तरी समाजातील विविध घटकांचे त्याखेरीज काही प्रश्न आहेतच, याबाबत अगदी जुन्या काळापासून जागरुकता दाखविली आहे. हे शेतकरी संघटनेच्या वेळोवेळीच्या ठरावांतून आणि निवेदनांतून दिसून येईल. मुसलमान समाजाच्या प्रश्नांविषयीची संघटनेची जागरुकता फार जुनी आहे. चांदवडच्या शेतकरी महिला आघाडीच्या ठरावांपैकी समान नागरी कायद्यावरील ठराव, 'जातीय दंग्यांचे रसायनशास्त्र' यासारखे माझे लेख असे कितीतरी पुरावे यासाठी देता येतील. अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अमर हबीब यांनी यापूर्वीही अशी शिबिरे संघटनेच्या माध्यमातून घेतली आहेत; पण अशा वास्तविक किंवा भ्रामक प्रश्नांमुळे हे सर्वच समाजघटक, शेतकरी आंदोलनाचे महत्त्व कळले तरी त्यापासून अंतर राखून राहतात. हे अंतर दूर करण्यासाठी, परस्परांना समजावून घेण्यासाठी आणि संघटनेने चालविलेल्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेण्यासाठी या विविध आघाड्यांची रचना करण्यात आली आहे.
 भारतातील मुस्लिम समाजाची भारतीय नागरिक म्हणून जगत असताना, जी कोंडी झाली आहे, ती फोडायची आहे. दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचीही कोंडी झाली आहे, तीही फोडायची आहे. ही कोंडी हितसंबंधी राजकारण्यांमुळे झाली आहे. काही माणसांना 'कडवे मुसलमान' म्हणून शिक्का मारून टाकला आणि काही माणसांना 'कडवे हिंदू' म्हणून शिक्का मारून टाकला, की मोकळे झाले. मग, त्यांची भांडणे लावून द्यायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची असं राजकारण चाललं आहे. याला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका अध्यक्षांनी (श्री. बंगारू लक्ष्मण) आवाहन केले, 'मुसलमानांनो, भाजपात या. भाजप हा फक्त हिंदूंचा पक्ष आहे, असं सगळे म्हणतात ते खरं नाही.' हे आवाहन जेव्हा मी वर्तमानपत्रांत वाचलं, तेव्हा मलाही शंका होती, की हे बोलणं खरंच कळकळीचं आहे का? पण, मी विचार केला, की ते तोंडाने म्हणताहेत ना, की या म्हणून; मग आपण कसोटी पाहू आणि त्यासाठी मी साध्यासुध्या कार्यकर्त्याला नव्हे तर एके काळी शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या पाशा पटेलांना भाजपकडे पाठवलं. त्यांनी स्वीकारलं. पाशा पटेलांनी तिकडे जाऊन शेतकरी संघटनेचे नाव उज्ज्वल केलं. स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी मला सांगितलं की, 'नितीन गडकरी चांगलं बोलतात, मीही चांगलं बोलतो; पण गावोगावी भाषणे करायला कोणाला पाठवावं, असा प्रश्न आला, की तुमच्या पाशाला तोड नाही.' हा पाशाचा आणि संघटनेचाही गौरव आहे.
 शेतकरी संघटना हे एक विद्यापीठ आहे, 'मदरसा' आहे. त्यातून तयार झालेली माणसे पळवून न्यायला इतर पक्षसंघटना टपून असतात. पंचायत राज्यात महिलांना ३३ टक्के राखीव जागा झाल्या, तेव्हा शेतकरी महिला आघाडीत तयार झालेल्या काही कार्यकर्त्या महिलांना वेगवेगळ्या पक्षांनी ओढून घेतले. असेच पुरुष कार्यकर्त्यांच्या बाबतीतही घडले. पण, माझी खात्री आहे, की शेतकरी संघटनेच्या या विद्यापीठात तयार झालेली माणसे कोठेही जावोत - शिवसेनेत जावोत, भाजपात जावोत, मुस्लिम लीगमध्ये जावोत, का अन्य कोठेही जावोत - या 'मदरशा'ने त्यांना दिलेले जे एक चारित्र्य आहे, जी एक स्वच्छ विचार करण्याची पद्धती दिलेली आहे त्यांमध्ये ते कोठेही चुकणार नाहीत.
 हिंदू आणि मुसलमान समाजांमध्ये कडवेपणाचे शिक्के मारून, स्वार्थांध राजकारण्यांनी जी दुही खदखदत ठेवली आहे, ती दूर करून, त्यांच्यात सामंजस्य निर्माण करणे व त्यायोगे समाजाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे, हे मोठे कठीण काम आहे. सगळ्या धर्मांच्या लोकांनी एकत्र चालावं, याकरिता दिल्लीच्या बादशहा अकबराने 'दीने इलाही' नावाचा वेगळा धर्म काढला. जोतीबा फुल्यांनीही अशाच हेतूने सत्यशोधक समाज तयार करण्याचा प्रयत्न केला. पण, दोन धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्याकरिता तिसरा धर्म काढून फारसं काही हाती येत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे, मी काही तिसऱ्या धर्माचा संस्थापक होऊ इच्छीत नाही, काम तेच आहे; पण माझा मार्ग थोडा वेगळा आहे.
 याच कामासाठी महात्मा गांधींनी फार मोठं कार्य केलं, त्यांनी आपलं रक्त सांडलं, त्यापायी. ज्या वेळी 'खिलाफत' टिकावी म्हणून कोणी मुसलमान नेतासुद्धा हिंदुस्थानात बोलायला तयार नव्हता, त्या वेळी एकटे महात्मा गांधी खिलाफत चळवळीच्या बाजूने उभे राहिले. मुस्लिम जगतात त्याबद्दल अजूनही कृतज्ञता बाळगली जाते. परवाच मी तुर्कस्थानात गेलो, तेव्हा तेथील लोकांनी म्हटले, की आमच्या खिलाफत चळवळीच्या वेळी जगामध्ये आमच्या बाजूने फक्त हिंदुस्थान आणि महात्मा गांधी उभे राहिले. सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा या माणसाला त्याच्या आयुष्यात शेवटी काय पाहायला मिळाले? हिंदू आणि मुसलमानांनी एकमेकांचे कोथळे बाहेर काढले, एकमेकांचं रक्त सांडलं, एकमेकांची घरे पेटवून दिली, एकमेकांच्या स्त्रियांवर आणि मुलाबाळांवर अनन्वित अत्याचार केले... हे पाहण्याचे दुर्दैव त्यांच्या वाट्याला आले.
 धर्माधर्मांतील सामंजस्याचे हे काम असं महाभयंकर कठीण आहे; पण तितकंच ऐतिहासिक महत्त्वाचं आहे. तसं पाहिलं, तर माझी गुणवत्ता काहीच नाही. शेतकरी संघटना काढायला तसा मी ना'लायक'च होतो - धड शेतकरी नाही, धड शेतकऱ्याच्या जातीचा नाही; बरीच वर्षे परदेशात काढल्यामुळे मराठी वाचण्याबोलण्याचा सरावही राहिला नव्हता अशी त्या वेळची माझी स्थिती. पण, ना'लायका'ला शेतकऱ्यांनी आपलंसं केलं. महिला आघाडी बांधतानाही हाच अनुभव. यात यश किती मिळाले, त्याचा हिशेब इतिहास करील; पण जोपर्यंत आपण हरलो असं आपलं मन मानत नाही तोपर्यंत आपला पराजय कधी होत नाही असे धरून सगळीकडे मार खाल्ल्यासारखे दिसत असले; तरी नवनवीन प्रयत्न करीत राहायला हवेत, नवेनवे 'सीड प्लॉट' घ्यायला हवेत. याच विचाराने मी ही अल्पसंख्याक आघाडी बांधायचे ठरवले आहे.
 'अल्पसंख्याक आघाडी' असं नाव देताना अल्पसंख्याक म्हणजे शिख, मुसलमान, पारशी, ज्यू असे सर्व समाज मला अभिप्रेत आहेत, केवळ मुसलमान नव्हे. या सर्व धर्मीयांच्या प्रश्नांमध्ये फरक आहेत. मी पहिल्यांदा स्पष्ट करतो, 'सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र करून, एक धर्म करावा अशी माझी बुद्धी नाही. किंबहुना, कोणी असं करायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही ठामपणे विरोध करू.'
 खरं तर वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत, विविधतेमध्ये काही सत्य सापडण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनेने / स्वतंत्र भारत पक्षाने आम्हाला सरकार अजिबात नको असं नाही म्हटलं; आम्हाला एकसत्ताधारी सरकार नको असं म्हटलं आहे. निवडणूक जिंकली, की राजकारणही तुमच्या हाती, परकीय धोरणही तुमच्या हाती, अर्थकारणही तुमच्याच हाती, शाळाकॉलेजं कोणी कोठे काढायची हेही तुमच्याच हाती आणि कोठल्या गरिबांना भाकरी द्यायची हेही तुमच्याच हाती...असे सरकार आम्हाला नको. सगळ्या लोकांनी एक डोक्याला (किंवा दोन पायांना) एक मत गृहीत धरून, तुम्हाला निवडणुकीत निवडून दिलं आहे, तर तुमचा अधिकार कुठवर चालेल? तुमचा अधिकार त्याच क्षेत्रात चालेल, ज्या क्षेत्रात सगळी माणसं सारखीच असतात. सगळी माणसं सारखी कुठे असतात? प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो, प्रत्येकाला आपली मालमत्ता सुरक्षित राहावी अशी इच्छा असते. म्हणजे 'कायदा आणि सुव्यवस्था' ही एकच बाब अशी आहे, की जिच्यामध्ये सर्व लोक सारखे आहेत. तेव्हा 'एक डोके, एक मत' या हिशेबाने निवडून आलेल्या सरकारला 'कायदा आणि सुव्यवस्था' राखण्याचे काम सोडल्यास दुसरं कोणतंही काम देणं योग्य होणार नाही. कारण, त्यांनी तो अधिकार मिळवलेला नाही. फजले मतीन सारखे सबंध कुराण मुखोद्गत असलेले आणि ज्यांनी कुराण ग्रंथ कधी पाहिलेलाही नाही; पण उगाचच कुराणाच्या गप्पा मारतात, अशांना मुसलमान धर्मावरील चर्चेसाठी सारखे मानणे योग्य होईल का? मुळीच नाही. विद्वानांचं सरकार विद्वानांचं असलं पाहिजे, विद्वानांनी निवडलेलं असलं पाहिजे. गरिबांसाठी जर काही काम करायचं असेल, तर त्यासाठी, ज्यांच्या मनामध्ये गरिबांविषयी कणव आहे, एखादा उपाशी माणूस पाहिला, तर ज्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं अशा मदर टेरेसांसारख्या व्यक्तींचं सरकार असलं पाहिजे. दारिद्र्यरेषेखालील लोकांची, गरिबांची यादी करण्यामध्ये ज्यांना पैसे कमवायचे असतात, त्या लोकांच्या हाती असं सरकार दिलं, तर गरिबांचं भलं होणं शक्यच नाही. 'गरिबी हटाव'च्या नुसत्या घोषणा देऊन गरिबी हटत नाही. आपल्या देशात 'गरिबी हटाव'चा एकच कार्यक्रम यशस्वी झाला, तो म्हणजे शिख समाजाच्या गुरुद्वारातील 'लंगर'. गरिबातील गरीब माणूससुद्धा या लंगरमध्ये जमेल ते काम करून दहापंधरा दिवस जगू शकतो. या कालावधीत तो बाहेर आपल्या लायक एखादा व्यवसाय शोधू शकतो. त्यामुळे, आपल्या असं लक्षात येईल, की इतर सगळ्या धर्माचे भिकारी दिसतात; पण शिख अल्पसंख्य असले तरी, शीख धर्माचे भिकारी सापडत नाहीत. 'गरिबी हटाव'चा हा कार्यक्रम यशस्वी होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडील 'लंगर' ही कनवाळूपणाची, करुणेची संस्था राजकीय पुढाऱ्यांच्या हाती दिलेली नाही, तर ज्यांच्या हाती धर्म आहे त्यांच्या हाती आहे आणि धर्माची प्रेरणा करुणा ही आहे, मग तो धर्म कोणताही असो. 'गरिबी हटाव'सारखं करुणेचं काम, जनकल्याणाचं काम त्यांच्या हाती राहू दिलं म्हणजे ते होतं.
 आम्ही सरकार या संस्थेच्या विरुद्ध नाही. तर सरकार वेगवेगळ्या स्वरूपांत, विविध प्रकारचं असलं पाहिजे आणि तरच ते कार्यक्षम होऊ शकतं असा आमचा विश्वास आहे. शेतकरीही जाणतो, की झाडं लावायची झाली, तर एकाच प्रकारची झाडं लावू नयेत, त्यांची लागवड चांगली होत नाही. चांगली लागवड करायची असेल, तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत. अशा वेगवेगळ्या झाडांची लागवड केली म्हणजे त्यांची तुलना करता करता आपल्याला काही समजतं, जमिनीचंही भलं होतं आणि त्या वनस्पतींचंही भलं होतं. त्याऐवजी, कोणी जर म्हणालं एकाच प्रकारची झाडं लावा - मोनोकल्चर - जसे निलगिरी, सुबाभूळ वगैरे - तर ती भलेपणाची नसेल. (भलेपणाची नसते याचा कटू अनुभव अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.) तसंच, जर कोणी सांगू लागला, की सगळ्यांना हिंदू करा किंवा कोणी सांगू लागला, की सगळ्यांना मुसलमान करा तर हे 'मोनाकल्चर' करणारे लोक जनतेचं भलं करू शकत नाहीत. शेतकरी संघटनेची / स्वतंत्र भारत पक्षाची या विषयातील भूमिका किती स्पष्ट आहे, हे दाखविणारी उदाहरणे देणे सयुक्तिक होईल.
 देशात समान नागरी कायदा करण्याची चर्चा सुरू झाली, तेव्हाच शेतकरी संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली. १९८६ च्या नोव्हेंबरमध्ये चांदवड येथे झालेल्या शेतकरी महिला अधिवेशनात समान नागरी कायद्याबाबत बुद्धिनिष्ठ ठराव करण्यात आला.
 धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ज्याला त्याला आपल्या बुद्धीला भावेल त्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, त्यामध्ये कोठे जबरदस्ती असू नये. धर्मग्रंथातही अशी जबरदस्ती असल्याचे सापडत नाही.
 शेतकरी संघटनेतून उगम पावलेला स्वतंत्र भारत पक्ष, त्याचा मी राष्ट्रीय अध्यक्ष असून, या पक्षाचा खासदार म्हणूनच मी राज्यसभेत आहे. या पक्षाच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे, की काश्मीरचा प्रश्न सोडविण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे तेथील लोकांचे या विषयावर मतदान घ्यावे. त्यांची मते कशी नोंदवायची ते तुमचे तुम्ही पाहा. जसं, घरातील एखाद्या व्यक्तीला - ती बाई असो की पुरुष - घरात नांदायचे नसेल तर त्याला वेगळे होण्याची मोकळीक असली पाहिजे, संधी असली पाहिजे, तसंच ज्या राज्यातील लोकांना आमच्याबरोबर राहण्याची इच्छा नाही, त्यांना वेगळं होण्याची मोकळीक असली पाहिजे.
 कोणाचंही स्वातंत्र्य आम्ही नाकारत नाही. समान नागरी कायद्यासंबंधी ठराव आणि काश्मीर प्रश्नासंबंधी आम्ही सुचविलेला कार्यक्रम हा त्याचा लेखी पुरावा आहे.
 समान नागरी कायदा नको आणि काश्मीरच्या लोकांना सार्वमताची संधी मिळाली पाहिजे असं म्हणण्याची हिंमत आम्ही दाखवू शकतो; कारण आम्ही शास्त्रशुद्ध विचार करणारी माणसं आहोत. आम्ही हिंदू म्हणून विचार करीत नाही आणि मुसलमान म्हणूनही विचार करीत नाही; आम्ही शुद्ध विवेकाने विचार करणारी माणसे आहोत.
 मला सर्व धर्म टिकले पाहिजेत. सर्व धर्म टिकले पाहिजेत, एवढ्याकरिता, की मी जर फक्त गीताच शिकलो आणि इतर धर्मग्रंथांची काहीच ओळख झाली नाही, तर त्याला काही महत्त्व राहत नाही. एकच एक पीक घ्यायला शिकला तर त्याला कोणी शेतकरी म्हणेल काय? मला वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या थोर माणसांनी, येशू ख्रिस्तासारख्या प्रेषितांनी-माणसांनी करुणा म्हणजे काय म्हटले आहे, हे समजलं पाहिजे; कृष्ण एका वेळी रणांगणातून पळून का आला, हे समजलं पाहिजे आणि तसं दुसऱ्या वेळी, सबंध भारताचा विनाश होणार आहे, हे माहीत असतानासुद्धा तो अर्जुनाला 'युद्ध कर' असं का सांगतो, हेही समजलं पाहिजे. विविधतेतून माणसाची अनुभूती वाढते, ज्ञान वाढते.
 जे कोणी सर्व माणसांना एकाच साच्यात बसवून, शिस्त आणण्याचा प्रयत्न करतात, सगळ्या लोकांनी खाकी कपडे घालून 'टॉक टॉक' करीत चालावं म्हणतात, त्यांना मनुष्य जातीचे वैशिष्ट्यच कळलेले नसते. प्रत्येक मनुष्य निसर्गाने तयार करताना वेगळा वेगळा तयार केलेला असतो. एका माणसाच्या अंगठ्याचा ठसा दुसऱ्या माणसाच्या अंगठ्याच्या ठशाशी जुळत नाही. ही केवळ अंगठ्याची गोष्ट, अख्ख्या माणसांत सारखेपणा कसा असणार? महिन्यादोन महिन्यांचं मूल हातात घेताना मला प्रत्येक वेळी मोठं नवलं वाटतं. मला अजून दोन बाळं अशी भेटलेली नाहीत, की ज्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आहेत. त्यांचा काही अनुभव नाही, अजून आईच्या मांडीवरच आहेत; पण प्रत्येक बाळाचा चेहरा वेगळा...अशी अद्भुत किमया निसर्गाने केली, ती काही कोणीतरी सगळ्यांना सारखे कपडे घालावे आणि सगळ्यांच्या तोंडून एकसारखं बोलणं काढावं यासाठी खचितच नाही.
 प्रत्येक माणसाला विविधतेचा अनुभव घेता आला पाहिजे, हे माझ्या तत्त्वज्ञानाचं महत्त्वाचं सूत्र आहे.
 आणि हा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक माणसाला त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा क्षमतेनुसार रुंदावण्याची मोकळीक असली पाहिजे. ही मोकळीक केवळ भौतिक बाबतीतच नव्हे, तर बौद्धिक बाबतीतही असायला हवी.
 मला सर्व धर्म हवेत. पुष्कळसे हिंदुत्ववादी लोक मिशनरी लोकांनी आमच्या लोकांना ख्रिश्चन केले, मुसलमानांनी आमच्या लोकांना मुसलमान केले अशी ओरड करतात; अशा तऱ्हेच्या धर्मांतरावर बंदी घालावी असा आग्रह धरतात. माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक माणसाला त्याच्या विचाराने धर्मांतर करण्याचा अधिकार असला पाहिजे. मला पटलं, तर मी धर्मांतर का करू नये? लहानपणी माझ्या मनात विचार होता, की दर दिवसाला, दर महिन्याला न का होईना निदान तर वर्षाला एक धर्म बदलावा, म्हणजे सर्व धर्मांचं आकलन होईल. मला सगळे धर्म हवेत; कोणी नवीन धर्म काढला तर तोसुद्धा हवाच. पण, धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये तेढ निर्माण करणारांचा धर्म नको. प्रत्येक धर्माचा संस्थापक जेव्हा होता, तेव्हा त्या महात्म्याने असे काही केले नाही, असे काही मांडले नाही, की ज्यामुळे माणसामाणसांमध्ये तेढ वाढेल. गांधीवाद महात्मा गांधींनंतर तयार झाला. गांधींनी स्वतः म्हटलं होतं, की गांधीवाद असं जर काही असेल, तर मी गांधीवादी नाही.
 पण या महात्म्यांचे जे शिष्य तयार होतात, ते आपापला गठ्ठा बांधायचे प्रयत्न सुरू करतात. ज्या भागात मेंढ्यांचे खूप कळप पाळले जातात, तेथील धनगरांना मोठी चिंता असते. खरं तर त्यांना खात्री असते, की मेंढरं जरी इकडची तिकडे गेली, तरी आपापली मेंढरं वेळ होताच आपापल्या घरी येतील; पण चुकून एखादं मेंढरू कमीजास्त झालं आणि शेजारी मेंढपाळाबरोबर वाद झाला, तर आपलं मेंढरू आपलं आहे, हे सिद्ध करायचं कसं? मग ते काय करतात? एखादा धनगर आपल्या मेंढरांच्या शेपट्यांचे थोडे थोडे केस कापून एकसारखी खूण करतो; कोणी आपल्या मेढरांच्या पाठीवर ठराविक रंग लावतो, कोणी काय, कोणी काय... प्रत्येक जण आपल्या कळपातील मेंढरांना एकएक वेगळी खूण तयार करण्याचा प्रयत्न करतो. तसंच धर्माच्या नावाने कळप तयार करणाऱ्या धर्मवाद्यांनी केलं. कोणी म्हणतो डोक्यावर शेंडी ठेवा, तर कोणी म्हणतो डोक्यावर नको हनुवटीवर केस ठेवा; कोणी म्हणतो सगळेच केस वाढवा. कशासाठी? ज्याला त्याला आपली 'मेंढरं' सांभाळायची असतात आणि म्हणून असल्या प्रकारची जी काही रूढी माणसांवर लादली जाते, त्यामध्ये या सगळ्या माणसांना आपले व्यक्तिमत्त्व गमवावे लागते. सगळ्या सरदारजींना सांगितलं, दाढी वाढवायची, सगळे दाढी वाढवून सारखेच दिसायला लागले. जरा वेगळे दिसू द्या की? पण सारखे दिसण्याची गरज सरदारजींची नाही, गरज मूळ मेंढपाळांचीही नाही; गरज मेंढपाळांच्या पोरांची आहे. मला सगळ्या लोकांना ते आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपात एकत्र करायचे आहे. मला माझ्या विद्यापीठाचा 'सीड प्लॉट' घ्यायचा आहे. पण, म्हणजे मी मिळेल ते बियाणे आणि मिळेल ती जमीन घेऊन हे करणार नाही. दोन्ही मी पारखून घेणार आहे.
 मला एक एक समाज एका कामाकरिता उभा करायचा आहे. माझं जे काम आहे, ते हिंदूंचं काम नाही, ब्राह्मणांचं काम नाही, मुसलमानांचं काम नाही. मी शेतकरी संघटना काढून, या कामात का पडलो, हे अनेकवेळा सांगितलं आहे. माझ्या वाडवडिलांची एक इंच जमीन नसताना, माझ्या मागील पाच पिढ्यांमध्ये कोणीही शेतकरी नसताना मी शेतकरी झालो आणि शेतकरी संघटनेचं काम चालू केलं; कारण मी स्वातंत्र्याचा सैनिक आहे. माझ्या मनाप्रमाणे, माझ्या स्वभावाप्रमाणे, माझ्या प्रकृतीप्रमाणे मला प्रयोग करण्याची संधी पाहिजे.
 मी ईश्वर मानतो का? हो, मी ईश्वर मानतो. पण, मी ईश्वर खासगीचा मानतो. मी माझ्या ईश्वराची साधना माझ्या घरामध्ये करतो. हे माझं खासगी प्रकरण आहे. जसं, वयात आलेल्या दोन व्यक्तींनी एकमेकांत कसा व्यवहार करावा यासंबंधी त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यावर दुसऱ्या कोणाचंही बंधन असता कामा नये. माझं आणि ईश्वराचं नातं प्रेमिकाचं आहे, खासगीचं आहे. मी त्याला इतका जवळचा समजतो, की माझ्या त्याची पूजा करण्याच्या किंवा आराधना करण्याच्या माझ्या हक्काच्या आड कोणी आलेलं मला खपणार नाही.
 मूर्तिपूजा उचित का अनुचित असाही एक धर्माधर्मांत वाद निर्माण करणारा विषय. ज्याला मूर्तिपूजा सार्थ वाटत असेल, त्याचा त्याच्या खासगी आयुष्यात ती करण्याचा हक्क डावलता येणार नाही. ज्याला ती निरर्थक वाटेल, त्याच्यावर ती करणे लादता येणार नाही. मी सध्या माझ्या घरात मूर्तिपूजेचा एक प्रयोग करीत आहे. या प्रयोगातून मला अशी खात्री वाटू लागली आहे, की आपण निर्जीव मूर्तिमध्येही देवपण घालू शकतो. अर्थात हा माझ्या खासगी प्रयोगाचा निष्कर्ष आहे, तो मी कोणावर आग्रहाने लादणार नाही.
 तर, अशी माझी धर्मासंबंधी व्यापक कल्पना आहे. अनेक धर्म पाहिजेत, तसेच असणे साहजिक आहे. संस्कृतमध्ये 'धारयति इति धर्मः' अशी धर्माची व्याख्या केली आहे. म्हणजे ज्याच्यामुळे जीव जगवता येतो तो धर्म. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर जो दररोजचे व्यवहार चालवू देतो, तो धर्म. आता, प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, हे मान्य असेल तर हा धर्म सामूहिक कसा असेल? प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, मी काय बोलतो त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या प्रकृतीप्रमाणे समजणार, तुम्ही काय बोलता त्याचा अर्थ मी माझ्या प्रकृतीप्रमाणे घेईन. मग, सगळ्यांनी एकच भाषा वापरली, एकच प्रार्थना म्हटली, एकच गीता वाचली किंवा एकच कुराण पढले; तरी प्रत्यक्षामध्ये त्याचा अर्थ वेगवेगळा असणार. कारण तुमची प्रकृती वेगवेगळी असते. हे एकदा मान्य केले, की सामूहिक धर्म ही धर्माधिपतींची किंवा पीठाधिपतींची फक्त सोय आहे असा निष्कर्ष निघतो. या सामूहिक धर्मकल्पनेच्या धोक्यातून मनुष्यजातीला आणि मनुष्यप्राण्याच्या व्यक्तिमत्त्वाला जगवायचं कसं, हा सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न आहे.
 मी स्वातंत्र्याचा सैनिक म्हणून हिंदुस्थानात आलो. शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घ्यायच्या आधी शेतकरी बनून, शेतीचा आणि शेतीच्या अर्थकारणाचा अभ्यास केला आणि सगळ्यांत जास्त अन्याय कोणत्या बहुसंख्यांवर होत असेल, तर ते शेतकरी आहेत, असे माझ्या लक्षात आले आणि मी या बहुसंख्याक अन्यायग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यापासून सुरुवात केली. शेतकरी आंदोलन उभं राहिलं, शेतकरी आंदोलन फोफावलं हे खरं आहे. लोकांनी मला खूप मानलं आणि निवडणुकीत लोकांनी मला खूप पाडलंही. त्याचा राग कोणावर काढायचा? मनुष्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा पाढा वाचण्याबद्दल वेगवेगळ्या धर्मांत वेगवेगळ्या कल्पना आहेत. मुसलमान धर्मात कयामतची कल्पना आहे. त्या दिवशी अल्लासमोर मृताच्या आत्म्याने आपला हिशेब द्यायचा असतो. हिंदू धर्माच्या कल्पनेप्रमाणे माणसाच्या पापपुण्याची दैनंदिन नोंद चित्रगुप्ताने आधीच ठेवलेली असते. त्यामुळे मरताक्षणीच त्याचा हिशेब करून, त्याची स्वर्गात किंवा नरकात रवानगी केली जाते. मला जर का कयामतची संधी मिळाली तर मी काय जबाब देईन? मी म्हणेन, 'माझ्या मनात जे काही मी करायला पाहिजे असे होते, ते मी माझ्या शक्तीनुसार केलं. लोकांनी मला फळ दिलं नाही, तरी माझी खात्री आहे, की अल्ला माझ्यावर रागावणार नाही.' त्यावर अल्ला म्हणेल, 'तुझ्या मनात जेवढं होतं, तेवढं केलंस ना? शाब्बास!'
 माझी खात्री आहे, की अंतिम विजय स्वातंत्र्याचाच होणार आहे आणि म्हणून मी हा सगळा प्रयत्न चालवला आहे. यामध्ये माझी एक व्यावहारिक गरज आहे.
 जगात एक फार मोठं युद्ध चालू आहे. या युद्धात तोफा नाहीत, सैन्य नाही, आक्रमण नाही; यात आगी लागत नाहीत, अत्याचारही होत नाही, खूनखराबा होत नाही. या युद्धात एका बाजूला माझ्यासारखे 'स्वातंत्र्य हवे' म्हणणारे लोक तर दुसऱ्या बाजूला 'स्वातंत्र्य नको, कोणीतरी मध्यस्थ हवा' म्हणणारे लोक आहेत. माझा ईश्वर-अल्ला आणि मी यांच्यामधील संबंधात मध्यस्थ कोणी नाही असे म्हणणारे सगळे माझ्यासारखे स्वातंत्र्यवादी एका बाजूला आहेत आणि 'मधे सरकार पाहिजे,' आणखी कोणत्या संस्था हव्यात, संघटना हव्यात, कोणीतरी प्रमुख पाहिजे, असे म्हणत मेंढपाळ होऊ पाहणारे कळपवादी दुसऱ्या बाजूला. अशा स्वातंत्र्यवाद्यांचं आणि कळपवाद्यांचं मोठं युद्ध जगभर चालू आहे. १९८० मध्ये शेतकरी संघटना उभी करून शेतकऱ्यांच्या सैन्याच्या साहाय्याने मी हे युद्ध सुरू केलं. १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंगांनी खुल्या व्यवस्थेकडे जाणारं पहिलं अंदाजपत्रक जाहीर केलं, तेव्हा मला वाटलं, की आपण हे युद्ध जिंकत आहोत. पण, नंतर माझ्या असं लक्षात यायला लागलं, की माझी फौज मागे हटते आहे. ही स्वातंत्र्याची फौज मागे हटता हटता, आज दिल्लीमध्ये स्वातंत्र्य नको म्हणणाऱ्या, लायसन्स-परमिट-कोटा राजच असावे असा आग्रह धरणाऱ्या डाव्या गटांच्या नादाने, त्यांच्या तालावर चालणारे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आले आहे.
 आपल्याला एक निर्णय करायचा आहे. काही माणसं हिंदुत्ववादी म्हणून बदनाम झाली आहेत. त्यांचा हिंदुत्ववाद काय आहे, ते मी चांगलं ओळखतो. दुसऱ्या बाजूला माणसांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला पाहिजे असे म्हणणारी डावी मंडळी आणि त्यांच्या दबावाखालील सरकार. यांतून निवड करायची आहे. डाव्या मंडळींना - कम्युनिस्टांना मवाळ करणं अशक्य आहे; कारण ते कर्मठ लोक आहेत. हिंदुत्ववादी म्हणून बदनाम झालेल्यांना मी बदलीन असा मला आत्मविश्वास वाटतो. म्हणून सध्या मी त्यांचा आधार घेतला आहे.
 भिडस्तपणे कोणी विचारणार नाही; पण काही लोकांच्या मनात शंका आली असणार, की 'स्वतंत्र भारत पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे म्हणजे तो भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मानतो. मग आताच शरद जोशींना मुसलमानांची आठवण कशी काय झाली?'
 माझं ध्येय स्वातंत्र्याचा मार्ग खुला करण्याचं आहे - शेतकऱ्यांना स्वातंत्र्य, महिलांना स्वातंत्र्य, दलितांना स्वातंत्र्य, मुसलमानांना स्वातंत्र्य... पण, या फौजेमध्ये मला दोन मोठे धोके दिसतात.
 एक दलितांमध्ये. खरे म्हणजे दलित हे शोषित आहेत. त्यांना जितकं स्वातंत्र्य मिळेल तितकं त्यांचं भलं होणार आहे. पण, राखीव जागांच्या मागे लागलेले दलितांचे नेते राखीव जागांमुळे कळपवाद्यांचा फायदा होतो म्हणून सरकारशाही वाढवायला बघतात. सरकारशाही वाढली म्हणजे सरकारी नोकऱ्या वाढल्या, सरकारी नोकऱ्या वाढल्या म्हणजे राखीव जागा वाढल्या आणि राखीव जागा वाढल्या म्हणजे आपला कळप वाढला असे त्यांचे सरळ सरळ गणित. या सरकारच्या नोकरशाहीमुळे कितीक शेतकऱ्यांचे, कितीक उद्योजकांचे वाटोळे झाले तरी हरकत नाही; पण सरकारशाही वाढू द्या अशी या नेत्यांची धारणा आहे.
 दुसरा धोका हिंदू आणि मुसलमान यांच्यातील तेढ जागती ठेवणारांचा. खरं तर अरबस्थानसारख्या अत्यंत कठीण परिस्थितीत सगळ्या जगाला लागू होणारा धर्म मांडला गेला आणि त्या धर्माचा प्रसार होता होता, आज निम्म्याच्या वर जग इस्लामला मानणारे आहे. इस्लामचे एकसंध बंधुत्व मानणारा, इमान मानणारा, इज्जत मानणारा एक सबंध समाज तयार आहे. त्या समाजाचे नेते म्हणवणारे समाजाचे प्रश्न समजून घ्यायला कधी येत नाहीत. मुसलमानांच्या रोजगाराची परिस्थिती काय आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांची मिळकत काय आहे याची चर्चा हे नेते कधी करीत नाहीत. ते फक्त आपल्या मुसलमानपणाचे नाव घेत, मुसलमान समाजाला भडकावून, इतर समाजापासून वेगळं करतात. हिंदू समाजाचे नेते म्हणवणारांनीही हिंदू समाजाच्या मनात तसंच भरवलं. या दोन्ही समाजांच्या नेत्यांनी आपापल्या समाजांना वेगवेगळ्या कोंडवाड्यात घातले आहे. आज मुस्लिम समाजाचे नेते मुसलमानांना सांगत आहेत, की सगळं जग खुलं होत आहे, भिंती पडत आहेत, ही फार धोक्याची गोष्ट आहे. वर त्यांनी म्हटलं नाही म्हणजे नशीब, की 'इस्लाम खतरे में है।'
 ज्या इस्लामची सुरुवातच मुळात भिंती पाडण्याच्या कल्पनेने झाली, त्या समाजाच्या आजच्या नेत्यांनी त्यांना सांगावे, की जर भिंती पडत गेल्या, तर 'इस्लाम खतरे में है।' ही इस्लामच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे.
 माझ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी फौजेची पुनर्बाधणी म्हणून मला ज्या नव्या जोमाच्या फलटणी उभ्या करायच्या आहेत, त्यांत मुसलमान समाजाची फलटण असणार आहे. मुसलमान समाजात इमानानं काम करणारी माणसं आहेत, आजचा रोजगार सुटला, तर भिकेचा मार्ग न धरता, दुसऱ्या दिवशी दुसरा रोजगार शोधण्याची हिंमत असणारी माणसे आहेत, हे आपल्याला वेळोवेळी अनुभवायला मिळतं. अशा खऱ्याखुऱ्या उद्योजक माणसांची फलटण मला उभी करायची आहे. हा समाज स्वातंत्र्याच्या लढाईत माझ्या बाजूने असणे मला आवश्यक आहे. आवश्यक तर या समाजाचं उदाहरण मला बहुसंख्याकांसमोरही ठेवायचं आहे. अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून मी अशा उद्योजक माणसांची एकी साधतो आहे, पोथीनिष्ठ लोकांची नाही. जे केवळ शब्द वाचतात आणि त्या शब्दांच्या आधाराने आपल्या स्वार्थाचे समर्थन करतात, त्यांना येथे स्थान नाही. पैगंबराची प्रेरणा काय होती, हे ज्यांना समजले आहे, त्या काळच्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये कुराणाने जे काही सांगितले, ते समजावून घेऊन, आज पैगंबर असते, तर आजच्या या परिस्थितीत त्यांनी काय आदेश दिला असता, तो जे समजून घेतील, अशा लोकांची मला एकी करायची आहे. हा इस्लामचा खरा विजय असेल; पण जर कोणी असं म्हणायला लागलं, की स्वातंत्र्य मिळाल्यामुळे इस्लामचा नाश होणार आहे, तर इस्लाम खरंच 'खतरे में' आहे.
 थोडक्यात, मला मी सुरू केलेल्या स्वातंत्र्याच्या लढाईत स्वातंत्र्याच्या सैनिकांची पीछेहाट होताना दिसते आहे; म्हणून मी माझ्या फौजेची पुन्हा बांधणी करतो आहे. अल्पसंख्याक आघाडीचे हे पहिले शिबिर म्हणजे या पुनर्बाधणीच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. स्वातंत्र्याचे हे युद्ध विजय मिळेपर्यंत चालूच राहणार आहे. नवीन बांधणीची फौज उभी राहिल्यानंतर जी लढाई होईल, तीमध्ये नेतृत्व करण्याची ताकद माझ्यामध्ये, कदाचित्, उरणार नाही; पण तुमच्यासारखे जे नवीन पिढीतील सेनापती तयार होत आहेत, त्यांच्यासाठी मी निदान फौजेची जमवाजमव तरी करून ठेवली. एवढी जरी माझ्या नावाने नोंद झाली, तरी कयामतच्या दिवशीसुद्धा अल्लाच्या समोर मी उन्नत माथ्याने उभा राहू शकेन.

(२१ जुलै २००५)

◆◆