पोशिंद्याची लोकशाही/पोशिंद्यांच्या लोकशाहीसाठी स्वतंत्र भारत पक्ष

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


पोशिंद्यांच्या लोकशाहीसाठी स्वतंत्र भारत पक्ष


 २८ मेपासून सुरू झालेल्या स्वतंत्र भारत पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचं सूप वाजायची वेळ आली आहे आणि हा पक्ष काय आहे, त्याचे विचार काय आहेत, कार्यक्रम काय आहेत, देशामध्ये साडेसहाशेच्या वर पक्ष असताना हा आणखी एक नवा पक्ष का आवश्यक आहे, ते आपल्यासमोर, कोणतीही क्लिष्ट तांत्रिक भाषा न वापरता अगदी साध्या सोप्या भाषेत ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेली २८ वर्षे मी शेतकऱ्यांच्या, विद्वानांच्या, तंत्रज्ञांच्या कित्येक सभा संबोधित केल्या आहेत; पण आजची सभा ही विशेष वेगळी सभा असल्याने माझ्यावर आज मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. इतकं महत्त्वाचं भाषण करण्याची जबाबदारी माझ्यावर आजपर्यंत कधी पडली नव्हती आणि यापुढे असं भाषण करण्याची वेळ, कदाचित्, मला मिळणारही नाही.
 मी कोणापुढे बोलतो आहे ? दिडशे वर्षे गोऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीच्या अंधकारामध्येसुद्धा प्रत्येक माणसाच्या हृदयात तेवणारी स्वातंत्र्याची ज्योत ज्यांनी जागती ठेवली अशा शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कारखानदार नागरिकांच्या समोर मी बोलतो आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पन्नास वर्षांमध्ये गोरा इंग्रज गेला असला तरी त्याच्या जागी काळा इंग्रज आला आणि गोऱ्या इंग्रजांनीसुद्धा स्वातंत्र्याची जेवढी गळचेपी केली नाही तेवढी काळ्या इंग्रजांनी केली. गोऱ्या इंग्रजांनी जितकं शेतकऱ्याला लुटलं नाही, तितकं काळ्या इंग्रजांनी लुटलं. या सगळ्या घनघोर काळ्या अंधाराच्या काळातसुद्धा ज्यांनी स्वातंत्र्याची ज्योत मनात तेवत ठेवली आणि स्वतंत्र भारत पक्षाने पहिली हाक दिल्याबरोबर मुंबईच्या या शिवाजी उद्यानाच्या मैदानावर धाव घेतली, त्यांच्यासमोर मी बोलतो आहे.
 सगळ्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे. माझ्या स्वतःच्या गावामध्ये प्यायच्या पाण्यासाठी सर्व बायांनी पाचसहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. नित्यनियमित कामं चालू आहेत, लग्नाचे मुहूर्त साधायचे आहेत हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही सर्व मंडळी आपल्या खर्चाने, डोक्यावर भाकरीचटणीचं बोचकं बांधून घेऊन, कोणाच्याही वाहनाची वाट न पाहता, गाडीमधून, ट्रकमधून अत्यंत हालअपेष्टा सहन करीत, अडचणीच्या जागी बसून इथपर्यंत - ते गेली दोनशे वर्षे निराशा झाली, कदाचित यावेळी तरी स्वतंत्र भारत पक्ष आपल्या मनामध्ये जोपासलेल्या स्वातंत्र्याच्या स्फुल्लिंगावर फुंकर घालून एक नवीन मशाल तयार करील या आशेनं - आलेल्या तुम्हा जनांसमोर मी बोलतो आहे.
 इतिहास फार मोठा आहे. तपशीलवार सांगत बसलो तर दोनतीन दिवससुद्धा पुरणार नाहीत. अशा तऱ्हेची भाषणं पक्षाचे नेते करतात. रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेकेटरी त्यांच्या कॉम्रेडांसमोर भाषणं करताना तीन तीन दिवस भाषणं करीत असत. फक्त तिथं हुकमशाही असल्यामुळे कोणत्याही कॉम्रेडला उठण्याची तर सोडा, पण चुळबुळ करण्याचीसुद्धा शक्यता नव्हती; एखाद्याने चुळबुळ केलीच तर दोन दिवसांच्या आत त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येण्याची शक्यता असे. त्यामुळे सगळे लोक बिचारे निमूट ऐकन घेत असत. स्वतंत्र भारत पक्ष हा काही समाजवादी रशियाचा कम्युनिस्ट पक्ष नाही, हा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा पक्ष आहे, आणि म्हणून, माझ्या गेल्या अठ्ठावीस वर्षांच्या परंपरेला अनुसरून, स्वतंत्र भारत पक्षाचा जो काही अर्थ आहे तो थोडक्यात नेमक्या शब्दात मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांना विशेष अभ्यास करावयाचा आहे त्यांच्याकरिता उदंड साहित्य तयार झालेलं आहे, अनेक पुस्तकं आहेत, अनेक चर्चांचे वृत्तांत आहेत ते त्यांच्या उपयोगात येऊ शकेल. आज मी जे बोलणार आहे ते ज्यांनी कधी शाळेचं तोंडसुद्धा पाहिलेलं नाही, गमभन लिहिण्याचीसुद्धा संधी ज्यांना कधी, स्वातंत्र्याच्या गेल्या छपन्न वर्षांत लाभली नाही, त्यांना 'स्वातंत्र्य' ही गोष्ट काय आहे आणि त्याच्याकरिता का आणि कसं लढायचं, हे त्यांना समजावून सांगण्यासाठी.
 या सगळ्या इतिहासाची सुरुवात कशी होते? या व्यासपीठावर एक चित्र लावलं आहे. त्यात सर्वांत वर महात्मा गांधींचं चित्र आहे, त्याखालोखाल चक्रवर्ती राजगोपालाचारीचं चित्र आहे. दोन फार महान माणसं आणि त्यांच्यानंतर त्यातल्या त्यात क्षुद्र, ना-लायक असा मी; पण दैवयोग असा, की त्यांना जे काम पुरं करता आलं नाही, ते पुरं करण्याची जबाबदारी आज माझ्या खांद्यावर येऊन पडली आहे. दहा वर्षांपूर्वी मी दांडीला गेलो होतो. दांडीला गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला. त्यासाठी साबरमतीहून 'दांडीयात्रा' करीत चालत चालत गेले आणि ज्या ठिकाणी त्यांनी मीठ उचललं, त्या ठिकाणी आज एक ताम्रपट लावलेला आहे. त्यावर महात्माजींचे शब्द लिहिलेले आहेत, 'माझ्या मते, इंग्रज निघून जाणे म्हणजे स्वातंत्र्य नाही; जेव्हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या भवितव्याला आपल्या इच्छेनुसार, आपल्या क्षमतेनुसार आकार देता येईल, तेव्हा हा देश स्वतंत्र झाला असे मी म्हणेन.' एक अमेरिकन पत्रकार त्यांत होते. त्यांनी गांधीजींची मुलाखत घेताना प्रश्न विचारला, 'फार उघड नाही; पण नेहमी आमच्या कानावर कुणकुण येते, की अध्यात्मवादी महात्मा गांधी आणि आधुनिक विचारांचे समाजवादी पंडित नेहरू यांच्यामध्ये फार मोठे मतभेद आहेत. परदेशांतील लोकांना हे मतभेद काय आहेत, ते समजावून घेण्याची फार इच्छा आहे. मला समजू शकेल अशा तऱ्हेने थोडक्यात सांगा.' गांधीजी हसले. क्लिष्टातले क्लिष्ट अध्यात्मसुद्धा सोप्या शब्दांत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी मोठी अजब होती. ते म्हणाले, "मी एका वाक्यात पंडित नेहरू आणि माझ्यातील भेद सांगतो: 'मला असं वाटतं, की या हिंदुस्थानातून इंग्रज निघून गेला नाही तरी चालेल; पण अंग्रेजियत म्हणजे इंग्रजांची नीती गेली पाहिजे आणि पंडित नेहरूंना असं वाटतं, की या देशामध्ये अंग्रेजियत राहिली पाहिजे, इंग्रज निघून जायला हवा. हा दोघांमधला मोठा फरक आहे." महात्म्याने फार पुढचं पाहून वापरलेलं हे वाक्य. ही १९३० सालची गोष्ट.
 १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि १९४८ मध्ये गांधीजींचा खून झाला. गांधीजींना ही कल्पना नव्हती, की ज्याला आपण शिष्योत्तम म्हटलं, आपला राजकीय वारस म्हटलं तोच इंग्रज निघून गेल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये हिंदुस्थानात 'अंग्रेजियत' कायम ठेवण्यासाठी मोठं कारस्थान रचणार आहे. गांधीजी गेले आणि त्यानंतर चारच वर्षांत समग्र गांधीविचाराला, अर्थवादाला उखडून टाकण्याचं काम त्यांच्या या शिष्योत्तमानं केलं. गांधींच्या मते, अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. नेहरूंनी सांगितलं, सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा जड उद्योगधंदे, लोखंडाचे, सिमेंटचे कारखाने आहेत. गांधीजींनी म्हटलं, खेडं हा हिंदुस्थानचा आत्मा आहे; नेहरूंनी सांगितलं, की शहरांचा विकास झाला पाहिजे. गांधींनी सांगितलं होतं, की व्यक्तीनं प्रगती करायची आहे, सरकार नको; एवढंच नव्हे तर ते म्हणाले होते, 'माझा मुळी शासन या संस्थेलाच विरोध आहे. सगळ्या जगामधून सरकार नावाची गोष्ट नष्ट होऊन जावी अशी माझी इच्छा आहे; पण सगळ्या जगात इतकी सरकारं, त्यांना नष्ट करण्याची सुरुवात करावी कोठून? याचा विचार करून, मी असं ठरवलं, की पहिल्यांदा हिंदुस्थानातील इंग्रज सरकार नष्ट करू आणि त्यानंतर सगळ्या जगातील सरकारं आणि शासनसंस्था ही व्यवस्था खलास करायला लागेल...' आणि त्यांच्या शिष्योत्तमांनी काय भूमिका घेतली? त्यांनी म्हटलं, की सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, सरकारी नियोजन मंडळ (झश्रळिसि गीळीळी), पंचवार्षिक योजना, वेगवेगळी सरकारी खाती यांच्या हाती सत्ता राहावी. म्हणजे एका अर्थी गांधीजींचा खराखुरा 'हत्यारा' हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी बसला. तेव्हापासून हिंदुस्थानात गुलामगिरीचा एक नवा कालखंड सुरू झाला. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात गोऱ्या इंग्रजांची गुलामगिरी होती, स्वातंत्र्यानंतर काळ्या इंग्रजांची गुलामगिरी आली.
 नेहरू त्या वेळी नुकतेच समाजवादी रशियात जाऊन आले होते. शहरांतील वैभव पाहून, एखादा खेड्यातील पोरगा जसा चकित होऊन जातो तसंरशियातील चकचकाट पाहून, नेहरूंना कुतूहलमिश्रित आश्चर्य वाटलं आणि त्या प्रभावाने 'जगामध्ये समाजवादी रशियासारखा महत्त्वाचा प्रयोग कोणताही नाही,' असं त्यांनी जॉर्ज बर्नाड शॉ आणि बर्ट्र्र्ंड रसेल यांच्यासमोर प्रत्यक्षात मांडलं. हिंदुस्थानात त्यांनी सार्वजनिक चर्चा घडवून आणली नाही, समाजवादाच्या प्रश्नावर कधी निवडणूक लढवली नाही, 'समाजवाद आणि समाजवादी धाटणीची समाजरचना हे हिंदुस्थानचं ध्येय आहे,' असं त्यांनी एकदम जाहीर करून टाकलं. गांधीजींचा शिष्योत्तम, प्रभावी व्यक्तिमत्व, उच्च राहणीमान; यामुळे लोकांचं त्यांच्यावर इतकं अपार प्रेम होतं, की त्यापोटी सबंध देशानं समाजवादाचं हलाहलसुद्धा पचवण्याची तयारी दाखवली. हलाहल गिळणारा एक शंकर होऊन गेला, त्याचा फक्त कंठ निळा झाला. हिंदुस्थानला हे समाजवादाचं विष पचलं नाही. समाजवादी रशियाने प्रामाणिकपणे समाजवादाचा प्रयोग केला आणि तो देश शकलं शकलं होऊन मरून गेला. हिंदुस्थान समाजवादाचा प्रयोग काही प्रमाणात करूनसुद्धा संपूर्ण नष्ट झाला नाही, अजून जिवंत आहे, पुन्हा एकदा जागृत होण्याची धडपड करतो आहे. यामागे कारण आहे, हिंदुस्थानात कधी शुद्ध माल काही येत नाही, जो येतो तो भेसळच माल येतो. आपण नेहमी वाचतो, की एखादा शेतकरी कंटाळून जीव द्यायला निघतो आणि एन्ड्रिन पितो; पण ते भेसळीचे, बनावट निघाल्याने त्याला त्रास होतो, तरी तो मरत नाही. रशियाने शुद्ध समाजवादाचा प्रयोग केला आणि तो मेला. आपल्या देशाची अवस्था एन्ड्रिन पिणाऱ्या त्या शेतकऱ्यासारखी झाली. समाजवादाच्या प्रयोगानंतरसुद्धा आपण वाचलो आहोत; कारण इथं समाजवाद आला नाही, समाजवादाची बेगडी नक्कल आली. या परिस्थितीची जाणीव होताच, त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांची धडपड सुरू झाली.
 महात्मा गांधींनी पहिल्यांदा स्वातंत्र्याची व्याख्या दिली. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय लोक निघून जाणे नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे आपल्या भवितव्याला आकार देण्याची मुभा मिळणे होय. नेहरूंनी उलटी उडी मारून, नवी गुलामगिरी लादली, गांधीजींच्या विचाराचा उच्छेद करून टाकला आणि तरीदेखील हुशारी अशी, की सगळ्या देशभर चर्चा करताना 'गांधी-नेहरू' हा द्वंद्व समास वापरला. हा समास देवदानव या समासासारखा आहे. याला विरोध करण्याची हिंमत कोणाला झाली नाही. गांधीजींचे उत्तमोत्तम शिष्य नेहरूंच्या मागे शेपट्या हलवीत हलवीत जाऊ लागले. कोणला मंत्रिपदाची आशा, कोणाला गव्हर्नरपदाची आशा, कोणाला कशाकशाची आशा! अगदी गांधीवादाची जोपासना करण्याचा वसा घेतलेले त्यांचे बहुतेक पट्टशिष्यसुद्धा आश्रमाला चांगल्यापैकी काही एकर जागा मिळावी म्हणून नेहरूंचे स्तुतिपाठक भाट झाले आणि अशा या परिस्थितीमध्ये नेहरूंनी चालवलेल्या या समाजवादाविरुद्ध स्पष्टपणे भाषा वापरणारा एक महान वीर पुढे आला. त्याचं नाव चक्रवर्ती राजगोपालाचारी.
 समाजवादाचा पुरस्कार हिंदुस्थानातील अनेक मान्यवर करीत होते. नरेंद्र देव, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, लोहिया यांच्यासारख्या थोर नेत्यांची समाजवादाला मान्यता होती; पण त्यांचा हा भारतीय समाजवाद आणि नेहरूंचा समाजवाद यांत फरक होता. विषय गहन असला, तरी थोडक्यात स्पष्ट करतो. भारतातला समाजवाद हा सानेगुरुजींच्या भाषेत, 'कसणाऱ्याची धरणी आणि श्रमणाऱ्याची गिरणी' या अर्थाचा होता. नेहरूंचा समाजवाद म्हणजे 'कसणाऱ्याची धरणी' नाही आणि 'श्रमणाऱ्याची गिरणी' नाही; तर 'धरणी आणि गिरणी दोन्ही सरकारचे, सरकार सगळे नेहरू घराण्याच्या वारसांचे,' या अर्थाचा. याला चक्रवर्ती राजगोपालाचारींनी 'लायसन्स-परमिट-इन्स्पेक्टर राज' असा शब्द वापरला. ज्या वेळी सगळ्या जगामध्ये समाजवादाचा बोलबाला होता, त्या वेळी राजगोपालाचारींनी नेहरूंच्या या समाजवादी नियोजनाचा अर्थ अचूकपणे सांगितला, "ही केवळ हुकूमशाही आणण्याची भारतीय पद्धत आहे. यातून पुढे नंतर घराणेशाहीही येणार आहे. नेहरूंच्या मनामध्ये प्रतिअशोक बनण्याची इच्छा आहे आणि आपल्या घराण्याची हुकूमशाही देशात निर्माण करायची आहे. त्यासाठी 'लायसन्स-परमिट-इन्स्पेक्टर राज' ही पहिली पायरी आहे."
 नेहरूंच्या या प्रयत्नांना रोखण्यासाठी राजगोपालाचारींनी 'स्वतंत्र पक्ष' निर्माण केला. पहिल्या निवडणुकीतच 'स्वतंत्र पक्ष' लोकसभेतील सर्वांत मोठा विरोधी पक्ष बनला. स्वतंत्रतेचा झेंडा घेतलेले लोक सहजी मागे राहत नाहीत, त्यांनी स्वतंत्र पक्षामागे आपले बळ लावले. गुजरात राज्यात तर स्वतंत्र पक्षाच्या हाती सत्ता आली. म्हणजे स्वातंत्र्याचा संदेश लोकांपर्यंत नीट पोहोचला, तर असं परिवर्तन होऊ शकतं; पण नेहरू घराण्याची मंडळी मोठी भामटी. अजूनही तशीच आहेत. स्वतंत्र पक्षाच्या पहिल्याच झटक्याने ते सावध झाले. त्यांनी सबंध हिंदुस्थानात प्रचार सुरू केला, की 'स्वतंत्र पक्ष' हा संस्थानिकांचा, राजेरजवाड्यांचा, भांडवलदारांचा, 'टाटा-बिर्लां'चा पक्ष आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटून, समाजवादाच्या प्रभावाखाली आलेल्या समाजात त्या काळी हे शब्द म्हणजे शिव्या होत्या. अगदी भारतीय समाजवाद्यांच्या दृष्टीनेही. जमीनदार, भांडवलदार, उद्योजक, कारखानदार हे शब्द शिवीसारखे वापरले जात. कोणत्यातरी सरकारी नोकरीत असणे, कोणत्यातरी सरकारी कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर असणे - मग तो धंदा बुडवत का असेना - हे गुणवर्णनाचे मापदंड झाले होते; त्यांना देशभक्त मानले जायचे. नेहरूंच्या या शब्दांच्या खेळांनी भारतीय लोक फसले आणि राजगोपालाचारींच्या स्वतंत्र पक्षाचा स्वातंत्र्याचा प्रयोग फसला. केवढी मोठमोठी माणसं त्यांच्याबरोबर होती! स्वतः महात्मा गांधींनी पंतप्रधानपदाकरिता नेहरूंच्या बरोबरीने ज्यांचं नाव घेतलं होतं आणि संपूर्ण जगामध्ये स्वातंत्र्याच्या विचारसरणीवरील अधिकारी माणूस म्हणून ज्यांना मान्यता होती, ते मिनू मसानी राजगोपालाचारीचे सर्वांत निकटचे सहकारी होते. असे असतानासुद्धा नेहरूवाद्यांनी केलेल्या राजकारणातल्या खेळामुळे आणि 'गरिबी हटाव'सारख्या भ्रामक घोषणा देऊन मतदारांना भुलवल्यामुळे स्वतंत्र पक्षाचा प्रयोग अयशस्वी झाला.
 त्यानंतर स्वातंत्र्याचा झेंडा उभारण्याचं काम कोणी राजेरजवाड्यांनी केलं नाही, कोणीही कारखानदारांनी केलं नाही. १९८० मध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना नावाची एक लहानशी संघटना चाकणच्या कांदेबाजारात उभी राहिली. त्यात शेपाचशे शेतकऱ्यांसमोर मी उभं राहून म्हटलं, की आपला हेतू आहे, की शेतकऱ्याला सुखानं आणि सन्मानानं जगता यायला पाहिजे, तसं जगता यायला पाहिजे असेल, तर त्याला मार्ग एकच आणि तो म्हणजे शेतीमालाचा भाव जाणूनबुजून बुडविण्याचं जे कारस्थान सरकारनं रचलं आहे, ते मोडून 'शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम' हाती घेणं. हा कार्यक्रम यशस्वी केला, तरच शेतकऱ्याला सुखानं आणि सन्मानानं जगता येईल. माझा आणि लोकांचा काही परिचय नाही, प्रस्थापित पुढाऱ्यांच्या तुलनेत मी क:पदार्थ आणि तरीदेखील एक चमत्कार घडला. चाकणच्या कांद्याच्या आंदोलनानंतर केवळ अठरा महिन्यांच्या काळामध्ये 'शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे,' ही गर्जना पंजाबपासून ते केरळापर्यंत सबंध हिंदुस्थानभर ऐकू येऊ लागली आणि एका नव्या कालखंडाला सुरुवात झाली.
 १९८६ मध्ये चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून लाखांनी महिला जमल्या होत्या. त्यांना एकच मंत्र शेतकरी संघटनेने आणि शेतकरी महिला आघाडीने दिला आणि त्या महिलांनी घोषणा दिल्या, की 'चांदवड येथे जमलेल्या आम्ही लाख लाख महिला जाहिर करतो, की आम्ही माणसे आहोत.' यापेक्षा मोठी क्रांतिकारी घोषणा होऊ शकत नाही. त्या दिवसापासून हिंदुस्थानातल्या सगळ्या महिलांचं, विशेषतः ग्रामीण महिलांचं भवितव्य बदललं आणि त्यानंतर शेतकरी महिला आघाडीनं 'दारू दुकान बंदी'चा कार्यक्रम काढला; सरकारनं तो हाती घेतला. या आघाडीनं महिलांना राजकारणामध्ये स्थान पाहिजे आणि ते मिळविण्यासाठी पंचायत राज्याच्या निवडणुका १०० टक्के लढविण्याची घोषणा केली; परिणामी महाराष्ट्र शासनाने महिलांना राखीव जागांची तरतूद केली. इतर राज्यांनीही अनुकरण केले. आज दिल्लीमध्येसुद्धा अशा तऱ्हेच्या राखीव जागा निर्माण करण्याचं, नाटक का होईना, सुरू झालं. स्त्रियांच्या मालमत्तेच्या हक्काची मांडणी केली, 'लक्ष्मी मुक्ती'च्या कार्यक्रमातून तो हक्क मिळवायला सुरुवात केली; आज या प्रश्नाला लोकसभेमध्येसुद्धा मान्यता मिळते आहे. सगळ्या हिंदुस्थानात स्त्रियांच्या प्रश्नावर शास्त्रशुद्ध विचार मांडून स्त्रीशक्तीच्या जागरणाची खरी सुरुवात केली, ती शेतकरी महिला आघाडीने. चांदवड नावाच्या लहानशा गावामध्ये छोटीशी सुरुवात केलेली ही महिला आघाडी सबंध हिंदुस्थानभरच्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात क्रांती घडवून आणण्यात यशस्वी होत आहे.
 १९७८ मध्ये मूठभर शेतकऱ्यांना मी 'सुखाने आणि सन्मानाने जगण्याचा' मंत्र दिला. त्यासाठी 'शेतीमालाला भाव मिळेल, शेती तोट्याची आहे, ती फायद्याची होईल' असा काही पराक्रम करून दाखवा, असे आवाहन केले आणि साऱ्या हिंदुस्थानभर चळवळीचा वणवा पेटला; १९८६ मध्ये स्त्रियांना 'तुम्ही माणूस आहात, माणसासारखं जगा,' असा संदेश दिला आणि हिंदुस्थानातील सर्व ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं.
 या शिवाजी उद्यान मैदानावर शेतकरी संघटनेच्यासुद्धा यापेक्षा मोठ्या सभा भरल्या आहेत. आजची सभा ही गर्दीने छोटी असली, तरी त्या सभेपेक्षा वेगळी आहे. म्हणून भाषणाला सुरुवात करताना मी नेहमीप्रमाणे 'माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो,' अशी न करता 'स्वातंत्र्याची ज्योत मनामध्ये जपून ठेवून इथपर्यंत आलेल्या' तुम्हा लोकांना प्रणाम करून, मी भाषणाला सुरुवात केली. माझ्यापुढे आज कोण जमले आहेत? केवळ शेतकरी नाहीत, केवळ उद्योजक नाहीत, केवळ व्यापारी नाहीत, केवळ कारखानदार नाहीत, केवळ व्यावसायिक नाहीत, केवळ कर्तबगारीने आपल्या क्षेत्रात यशवंत झालेले नाहीत; या सगळ्या लोकांचं जर एका शब्दात वर्णन करायचं झालं तर तुम्ही 'पोशिंदे' इथे जमा झाला आहात. शेतकऱ्यांच्या चळवळीच्या बीजापासून सुरू झालेलं आंदोलन हे मूलतः स्वतंत्रतेचं आंदोलन आहे. शेतकऱ्याकरिता आम्ही मागणी भिकेची केली नव्हती, मागणी स्वातंत्र्याची केली होती; स्त्रियांकरिताही आम्ही मागणी भिकेची केली नव्हती, मागणी स्वातंत्र्याची केली होती. आज इथं उभा राहून मी तुमच्यासमोर मागणी करतो आहे, ती जगामध्ये सगळ्या 'पोशिंद्यां'ना स्वातंत्र्य मिळावे अशी आहे. शेतकरी जगाला खाऊ घालतो, स्त्री जगाला खाऊ घालते, कारखानदार जगाला उत्पादन करून खाऊ घालतात, रोजगार देतात आणि सर्व जगाला पेलणारे हे सर्व लोक कर्तबगार, कष्टाळू, कल्पक, संशोधक यांनी सगळी पृथ्वी शेषाप्रमाणे आपल्या फण्यावर तोलून धरली आहे. सानेगुरुजींनी 'कोटी किसानांचा फणा करी शेष, येथून तेथून सारा पेटू दे देश,' म्हणताना पृथ्वीचा भार पेलणारा शेष हा किसान आहे असं मानलं असलं तरी हा भार पेलणारा केवळ शेतकरी आहे असं नाही; पृथ्वीचा भार पेलणाऱ्यांत शेतकरी आहे, व्यापारी आहे, उद्योजक आहे, संशोधक आहे, कारखानदार आहे, प्रतिभावान आहे, बुद्धिवान आहे, कष्टकरी आहे. स्वत:चं भांडवल, कल्पकता, कष्ट, प्रतिभा वापरून, स्वतंत्रपणे सृजन करून, ही सर्व 'पोशिंदे' मंडळी आपलं, आपल्या कुटुंबाचं लालनपालन तर करतातच, शिवाय इतरांसाठी रोजगारही निर्माण करतात. या सर्वांनी पृथ्वीचा भार शेषाप्रमाणे तोलला आहे आणि प्रख्यात तत्त्वज्ञ आयन रँड यांनी म्हटल्याप्रमाणे, 'पृथ्वीवरची गांडुळं - ज्यांच्याकडे काही प्रतिभा नाही, साधनं नाहीत, कर्तबगारी नाही - या शेषाला बेजार करून टाकण्याचं काम करतात. या ऐतखाऊ गांडुळांची झुंडशाही माजली आहे.' या सभेत आपण पहिल्यांदाच 'पोशिंद्यां'च्या स्वातंत्र्याची घोषणा करतो आहोत.
 'स्वतंत्र भारत पक्ष' तयार झाला आहे. हा पक्ष आणि इतर पक्ष - ५६५ आहेत का ६६५ गणती नाही - यांच्यात फार महत्त्वाचे फरक आहेत. स्वतंत्र भारत पक्ष हा उत्पादकांचा आहे, उद्योजकांचा आहे, प्रतिभाशाली विद्वानांचा आहे, शास्त्रज्ञांचा आहे. काहीतरी नवनिर्मिती करणारांचा आहे - सर्व सृजनशील व्यक्तींचा आहे; फुकटखाऊंचा नाही. हा शेषांचा पक्ष आहे, गांडुळांचा पक्ष नाही; हा भीक मागणारांचा पक्ष नाही, हक्काचं घेणारांचा पक्ष आहे.
 स्वतंत्र भारत पक्ष निवडणुका लढवणार आहे. यात काही चोरून-लपवून ठेवण्याचं कारण नाही. चाकणला शेतकरी चळवळीचा जन्म झाला, तेव्हा मला असं वाटायचं, की चाकण पेटवायला ३ वर्षे लागली, तेव्हा ही चळवळ देशभर पसरायला निदान १०/१५ वर्षे तरी लागतील; पण चाकणच्या आंदोलनानंतर केवळ १८ महिन्यांत मला वाघा सीमेवरील पंजाबमधील शेतकऱ्यांसमोर भाषण करावं लागलं. इतकी स्वातंत्र्याची तहान लोकांना लागली आहे. आज 'स्वतंत्र भारत पक्षा'ची घोषणा आपण करतो आहोत, माझी मनोदेवता असं सांगते, की ज्याला ज्याला प्रतिभा आहे, ज्याला ज्याला बुद्धी आहे, आपल्या प्रतिभेचा, बुद्धीचा अभिमान आहे आणि शिंग मोडून विनाकारण, ज्यांच्याकडे प्रतिभा नाही, ज्यांच्याकडे कर्तृत्व नाही अशा लोकांच्याबरोबर जाण्याची ज्यांची इच्छा नाही त्यांनी जर का आपला स्वाभिमान जपण्याचं ठरवलं आणि पृथ्वीचा भार पेलणाऱ्या 'पोशिंद्या' शेषानं ठरवलं, की यापुढं या ऐतखाऊ गांडुळांचा जाच आम्ही सहन करणार नाही, तर दीड वर्षाच्या आत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारत पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.
 घोषणाबाजी करणं हा माझा स्वभाव नाही, हा माझा धर्म नाही. १९९१ सालापासूनचं शेतकरी संघटनेचं साहित्य चाळून पाहिलं, तर या विषयावर किती प्रचंड अभ्यास केलेला आहे ते लक्षात येईल. वैचारिक मांडणीतलं लोकांना विशेष समजत नाही, समजणार नाही. कारण, सरकारशाहीनं त्यांना तेवढी फुरसत आणि बुद्धीची क्षमता ठेवलेलीच नाही. एकेकाळी रोममध्ये सत्ताधारी पोप म्हणायचा, की बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी स्थिर आहे आणि सूर्यादी तारे पृथ्वीभोवती फिरत आहेत. तेव्हा जनसामान्यांना असं वाटायचं, की यापलीकडे सत्य काही असू शकत नाही. एक कोपर्निकस निघाला आणि त्यानं सांगितलं, की हे धादांत असत्य आहे, आपल्या ग्रहमालेच्या केंद्रस्थानी सूर्य स्थिर आहे आणि आपण सर्व ग्रह त्याच्याभोवती फिरत आहोत. लोकांना पटलं नाही, कोपर्निकसचा छळ झाला. पण, आज त्याला नव्या विज्ञानयुगाचा महापिता मानलं जातं.
 स्वातंत्र्याचं महत्त्व जाणायचं असेल, तर प्रथम बुद्धीची झेप पाहिजे. आठ वाजता कारखान्यात जायचं, जी काही चाकं, दांडे हलवायचे असतील ते हलवायचे, जो काही पगार मिळेल तो घेऊन घरी यायचं, स्टॅलिनच्या कृपेनं आठवड्यात एक अंडे खायला मिळालं, तर 'स्टॅलिन झिंदाबाद' म्हणायचं आणि जर दोन अंडी मिळाली, तर दोनदा झिंदाबाद म्हणायचं यातच ज्यांनी पुरुषार्थ मानला आणि आपली बुद्धी गंजू दिली अशा माणसांना 'स्वतंत्र भारत पक्षा'चा विचार उमगणार नाही. समाजवादाच्या कालखंडात ज्यांची बुद्धी बुरसटलेली आहे, त्यांना हा स्वातंत्र्याचा विचार आकलन होणार नाही, त्यासाठी एका नव्या शैलीनं, नव्या धाटणीनं विचार करण्याची आवश्यकता आहे.
 समाजवादी व्यवस्थेचा जगभर पराभव झाला आहे, तिचा अंत झाला आहे. स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जिवंत असलेल्या व्यक्तीला समाजवादी गुलामगिरीच्या पिंजऱ्यातून सुटका करून घेण्याची संधी समोर आली आहे. कितीही काळ पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या वाघाला पिंजऱ्याचे दार उघडे दिसले, तर तो बाहेर पडल्यानंतर आपल्याला काही खायला मिळेल की नाही, याचा विचार करीत बसत नाही, उघड्या दारातून छलांग मारून तो मोकळ्या जगात येतो; हिमतीनं शिकार करून, भूक भागवण्यासाठी. साखळीला बांधून ठेवलेल्या कुत्र्याची साखळी मोकळी केली, तरी तो विचार करतो, की बाहेर गेलो तर भाकरी मिळेल का? आणि खरंच बाहेर कुठं भाकरी मिळाली नाही, तर तो कुत्रा पुन्हा पुन्हा साखळीनं बांधलेल्या जागी येऊन भाकरी घातली आहे का, हे आशाळभूतपणे पाहतो. स्वतंत्र भारत पक्षाचा विचार कोपर्निकसचा विचार आहे, फार गहन विषय आहे; तो सहज आकलन होणारा विषय नाही. स्वतंत्र भारत पक्षाचा स्वातंत्र्याचा विचार हा वाघाच्या हिंमतवान मानसिकतेचा विचार आहे, बेगडी वाघांची चित्रं काढून, केकाटणाऱ्यांचा नाही आणि आशाळभूत कुत्र्यांचा तर नाहीच नाही.
 स्वतंत्र भारत पक्षाने या अधिवेशनात फार थोडे ठराव केले. या ठरावातील अनेक मुद्द्यांवर वादविवाद होणार आहेत. या ठरावांच्या मागे जे थोडक्यात सूत्र आहे, ते लक्षात घ्यायला हवं. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्यांच्यापेक्षा चांगल्या गोष्टी बनवणारा मनुष्य अजून निर्माण व्हायचा आहे. जो जो निसर्गाच्या या व्यवस्थेत हात घालायचा प्रयत्न करतो, तो तो चांगल्या सुरळीत चाललेल्या गोष्टींचं वाटोळं करतो. त्याप्रमाणे, सरकारने समाजजीवाच्या विविध स्वाभाविक, नैसर्गिक अंगांमध्ये हात घातल्यामुळेच त्यात अनेक बिघाड झाले आहेत. ही बाब सहज समजावी म्हणून आपण एक उदाहरण पाहू. आपलं शरीर हा देश आणि आपला मेंदू हे सरकार आहे असं समजा. आपला श्वास, उच्छ्वास कायमचा चालू असतो. आपण पोटामध्ये अन्न घेतो, त्याचं पचन होतं, त्यातला उपयुक्त भाग पोषणासाठी शरीरात वापरला जातो, साठवला जातो, निरुपयोगी भागाचं उत्सर्जन होतं. श्वास घे, उच्छ्वास सोड असं मेंदूनं सांगावं लागत नाही, या क्रिया निसर्गनियमाने चालत राहतात. खा, खाल्ल्यानंतर पोटामध्ये अमुक अमुक रसायने स्रवू दे, पचन होऊ दे असं मेंदू सांगत नाही, त्या क्रिया आपोआप होत असतात. या सर्व प्रक्षिप्त क्रिया असतात; पण जेव्हा मेंदू या प्रक्षिप्त क्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो आणि तोंडाला सांगतो, की अरे पोट भरलं असलं, तरी ही भजी चुरचुरीत चवदार आहेत. थोडी खाऊन घे आणि आवश्यकता नसतानाही शरीराने मेंदूचं म्हणणं ऐकलं, तर पोटाला तडस लागून अपचन, आम्लपित्त यांचा त्रास होणार. म्हणजे निसर्गतः सुरळीत चालणाऱ्या देहक्रियांत सरकार- मेंदूनं हस्तक्षेप केल्यास बिघाड होतो. हे साधंसुधं उदाहरण समाजजीवनातील सरकारचा हस्तक्षेप कसा विनाशकारी आहे, हे समजावून घेण्यास पुरेसं आहे.
 काही बाबतींत अभ्यासपूर्वक हस्तक्षेपाने चांगला बदल घडण्याची शक्यता मी नाकारत नाही. स्वतंत्र भारत पक्षानेसुद्धा सरकार ही कल्पना संपूर्ण नाकारलेली नाही. काही देखरेखीची व्यवस्था आवश्यकच आहे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु 'ङशीं सींशीशी ळी लशीीं सींशीशी' म्हणजे 'कमीत कमी शासन हेच सर्वोत्तम शासन.' गुजराथीमध्येसुद्धा सरकारी हस्तक्षेपाचे मूल्यांकन करणारे एक वाक्य आहे - 'जहाँ राजा बेपारी, वहाँ प्रजा भिखारी.' स्वतंत्र भारत पक्षाची ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. जी कामे आपली नाहीत, ती सरकारने करायला जाऊ नये. आज मुंबईसारख्या शहरांत गुंड भर दिवसा खून पाडत आहेत, जराही कोणाला सुरक्षितता नाही, प्रवासात सुरक्षितता नाही. नागरिकांना सुरक्षितता देण्याऐवजी पर्यटकांकरिता पंचतारांकित हॉटेलं चालवण्याचा धंदा सरकारनं करण्याचं काही कारण नाही. जे काम सरकारचं आहे, ते सरकारनं करावं. एकदा तुम्ही देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करून दाखवा; मग आम्ही तुम्हाला बढती देऊ आणि नवीन कामं तुमच्यावर सोपवू. जोपर्यंत तुमची नेमलेली कामं तुम्ही व्यवस्थित पार पाडीत नाही तोपर्यंत समाजजीवनात निसर्गनियमानं चालणाऱ्या कामात हस्तक्षेप करून, देशाला बुडवायचे उपद्व्याप करू नका.
 आम्हाला शासन कशा प्रकारचे हवे? आम्हाला शासन एकेरी नको, आम्हाला शासन बहुआयामी पाहिजे. आजच्या शासनप्रणालीमध्ये मतदानकेंद्रं लुटली जातात, खोटी मतं टाकली जातात, खून होतात, गुंड निवडून येतात, बिहारच्या पद्धतीच्या निवडणुका होतात आणि त्यातून निवडून आलेले लोक गरिबाचं पोट कसं भरावं या नावानं योजना काढायला जातात आणि जनावरांची पोटं कशी भरावी याच्या योजना काढतात; गरिबांचं रेशन किंवा जनावरांचा चारा स्वतःच खाऊन जातात. स्वतंत्र भारत पक्षाची मांडणी साधी आहे. गरिबांचं कल्याण करायचं काम ज्यांच्या मनामध्ये करुणा जागृत झाली आहे अशा मदर टेरेसांसारख्या लोकांनी केलं पाहिजे, गरिबांचं कल्याण करायचं काम लालूप्रसादांचं नाही, सोनिया गांधींचं नाही आणि शरद पवारांचंही नाही. विद्यापीठ कोठे काढावं, महाविद्यालय कोठे काढावं याचे निर्णय जे, आम्ही म्याट्रिकसुद्धा पास नाही याचा अभिमान बाळगतात, ते घेतात याच्याइतकी चेष्टा दुसरी कोणती असू शकत नाही. ज्यांना विद्याक्षेत्रात काही अधिकार आहे, ज्यांचा काही व्यासंग आहे अशा मंडळींचं सरकार वेगळं असावं आणि त्यांनी ज्ञानदानाच्या संस्था काढाव्यात आणि चालवाव्यात. जे लोक 'एक डोकं, एक मत'च्या माध्यमातून राज्यावर बसतात, त्यांना देशात शांतता आणि सुरक्षितता राखण्यापलीकडे दुसरं कोणतंही काम करण्याचा नैतिक अधिकार नाही हे स्वतंत्र भारत पक्षाचं धोरण आहे.
 इतका विणलेला विचार घेऊन आम्ही तुमच्यापुढे, स्वातंत्र्यानंतर ५६ वर्षांनी आलो आहोत. स्वातंत्र्यानंतर ४४ वर्षे समाजवादाचा अंधकार माजला, गांधीजी बाजूला राहिले. आता समाजवादही पडला. आता कोणत्या दिशेनं जायचं हे कोणाला समजत नाही. अशा अवस्थेमध्ये कोणी वाटेल ते उपद्व्याप करून, गुंडगिरी करून, भ्रष्टाचार करून हजारो कोटी रुपये जमा करतात आणि त्यांचा वापर करून निवडणुका जिंकतात. ज्यांना या पद्धतीने पैशावर निवडणुका जिंकणे शक्य नाही त्यांनी दुसराच उद्योग काढला. धर्माच्या नावाने भांडणं लावली, दुसऱ्या धर्मांविषयी द्वेष पसरवला, दुसऱ्या जातींविषयी द्वेष पसरवला किंवा आरक्षणासाठी चळवळ करून आपले बांधीव मतदारसंघ निर्माण केले. अशा तऱ्हेने आपल्या हाती सत्ता यावी, सत्तेचे उपभोग आपणास मिळावे एवढाच हेतू; देशाचे काय व्हायचे ते होवो, त्याबद्दल त्यांना काही सोयरसुतक नाही. त्यामुळे आज आपण अशा परिस्थितीत आहोत, की देशाला काही मार्ग नाही, दिवा दाखविणारा कोणी नाही आणि सामान्य नागरिक मोठा त्रस्त झाला आहे. कारण सुरक्षा नाही, सर्व वस्तूंच्या किमती प्रचंड वाढत आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही. आणि लोकांकडे जे काही थोडकं आहे त्यावरसुद्धा गुंडांची नजर असल्यामुळे त्यांना जगणं कठीण झालं आहे. घरातील मुलीला जर घरी यायला उशीर होऊ लागला तर ती सुखरूप घरी येईल किंवा नाही याबद्दल शंका वाटू लागते अशी परिस्थिती तयार झाली आहे. या परिस्थितीमध्ये काही किचकट सिद्धांत मांडून लोकांना मार्ग दाखविण्यात काही अर्थ नाही. मार्ग एकच आहे -
 साऱ्या जगामध्ये श्रेष्ठ कोणी नेता नाही, कोणी धर्मात्मा नाही, कोणी पुढारी नाही. या जगामध्ये व्यक्तीइतकं पवित्र कोणी नाही. श्रीमद् शंकराचार्यांच्या भाषेमध्ये 'मी (=व्यक्ती) आणि ब्रह्मांड' यांच्यामध्ये तिसरं कोणी नाही, ही भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजली पाहिजे. व्यक्तीला जे योग्य वाटतं तेच राष्ट्राला योग्य आहे, व्यक्तीच्या पलीकडे राष्ट्राचं मोठेपण याला काही अर्थ नाही. व्यक्तीला वाव मिळाला तर व्यक्ती वाटेल ती कर्तबगारी करून दाखवते. हिंदुस्थानातील मनुष्य अमेरिकेत गेला, तर कर्तबगारी गाजवून धनाढ्य होतो, नाव कमावतो; पण तोच हिंदुस्थानात राहिला तर त्याचा कचरा होतो. याचा अर्थ असा, की हिंदुस्थानातील कर्तबगार, स्वातंत्र्यप्रिय नागरिक आणि पराक्रम व विकास यांच्यामध्ये एक मोठा अडथळा उभा आहे, तो म्हणजे भारतीय शासन व्यवस्था. या शासनव्यवस्थेचा उच्छेद करण्याची प्रतिज्ञा घेऊन, स्वतंत्र भारत पक्ष तुमच्यापुढे आला आहे. त्याला सक्रिय मदत करणे हे प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमी नागरिकाचं कर्तव्य आहे.
 आणखी एक मुद्दा आहे. हिंदुस्थानातले अनेक सुजाण लोक म्हणतात, की राजकारण म्हणजे घाण, गटार झालं आहे. हे सत्य आहे आणि गेली वीसपंचवीस वर्षे शेतकरी संघटना आणि शेतकरी महिला आघाडीच्या निमित्ताने आणि त्याआधीही सरकारी नोकरीच्या निमित्ताने समाजात वावरताना माझ्यावर अजून कोणी चिखलाचा एक कणसुद्धा टाकलेला नाही; तरीसुद्धा आपल्या अंगावर डाग पडतील याची भीती न बाळगता, भारतीय राजकारणाचं हे गटार उपसण्याचा मी निर्णय केला आहे आणि माझी तुम्हा सर्वांना आणि देशातील सर्व सुजाण, कर्तबगार, स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांना विनंती आहे, की तुमच्या अंगावरील हे निष्कलंक पांढरेशुभ्र परीटघडीचे कपडे आहेत, त्यांच्यावर डाग पडतील म्हणून फार काळजी करू नका. कपडे मळले तर धुता येतील, डाग गेले नाहीत, तर बदलताही येतील; पण या घाणीत देश बुडाला तर तो पुन्हा वाचवता येणार नाही. तेव्हा स्वतंत्र भारत पक्षाला केवळ मतं नकोत; आर्थिक मदत तर लागेलच; पण प्रत्यक्ष पुढे येऊन स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली जी काही कर्तबगारी आहे, आपली जी काही आभा आहे तिचा समाजामध्ये उपयोग करून स्वातंत्र्याच्या पक्षाला, व्यक्तीच्या हातापायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडणाऱ्या पक्षाला हिंदुस्थानाला दोनशे वर्षांच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी विजयी करून दाखवावं.
 १९९४ मध्ये मुंबईच्या भारतीय विद्याभवनामध्ये स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना झाली. त्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून माझा उल्लेख केला जातो. खरी गोष्ट आहे. राजकारणामध्ये पडण्याची माझी, शेतकरी नेता म्हणून इच्छा नव्हती. पण, चक्रवर्ती राजगोपालाचारीचे पट्टशिष्य आणि नजीकचे सहकारी श्री. मिनू मसानी यांनी आग्रह धरला, की सगळ्या हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन पुढे जाण्याचा नैतिक अधिकार शेतकरी नेता म्हणून तुम्हालाच आहे, तुम्ही ही जबाबदारी नाकारू नये. मोठ्या नाइलाजाने मी ते पद स्वीकारलं. पक्षाच्या पहिल्याच सभेत कायदातज्ज्ञ राम जेठमलानी यांनी एक अजब गोष्ट लक्षात आणून दिली, की हिंदुस्थानातील कायद्याप्रमाणे कोणताही पक्ष स्थापन करायचा असेल आणि त्याला मान्यता मिळवायची असेल तर त्याला तीन शपथा घ्याव्या लागतात. पहिली, लोकशाहीवर विश्वास आहे, दुसरी, निर्धार्मिकतेवर विश्वास आहे आणि तिसरी, माझा समाजवादावर विश्वास आहे. अशी अट तर स्टॅलिनच्या काळामध्ये स्टॅलिननेसुद्धा घातली नव्हती. लोकशाहीवर माझा विश्वास आहे अशी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकऱ्यांनी शपथ घेतली आणि नंतर ते म्हणाले, "हिंदुस्थानात लोकशाही काय घेऊन बसलात, इथे गरज आहे ठोकशाहीची." त्यांनी शपथ घेतली, की आपण निधार्मिक आहोत आणि नंतर त्यांनी सांगितलं, की पक्षाला मान्यता मिळविण्यासाठी मी खोटं बोललो, मी निधार्मिक नाही. मी थोडा कठोर माणूस आहे. मी अशी खोटी शपथ घ्यायला नकार दिला. माझा समाजवादावर विश्वास नाही, समाजवाद हा मनुष्यजातीला लागलेला कलंक आहे, शाप आहे असं मी एक उद्योजकतावादी म्हणून म्हणत असताना 'माझा समाजवादावर विश्वास आहे,' अशी खोटी शपथ घेण्याचे नाकारले. परिणामी, १९९४ मध्ये स्वतंत्र भारत पक्षाचं बीज लावलं गेलं; पण त्याला पक्ष म्हणून मान्यता मिळवता न आल्यानं त्याला खतपाणी घालणं कठीण होऊन गेलं. नंतर अध्यक्षपदाची धुरा मी डॉ. मानवेंद्र काचोळे यांच्या खांद्यावर दिली. तेव्हा त्यांनी ॲड. वामनराव चटप आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने समाजवादाच्या वेगवेगळ्या शब्दकोशांतील व्याख्यांचा अभ्यास केला आणि थोडक्यात असं दाखवून दिलं, की 'समाजवाद' या शब्दाची नेमकी व्याख्या कोठेच दिलेली नाही. तेव्हा 'समाजवादावर विश्वास असल्याची' शपथ घेण्यात काही फार मोठा गुन्हा ठरणार नाही. त्यांनी तशी शपथ घेतली, हे योग्य केलं का अयोग्य, ते नंतर ठरवू; पण एक गोष्ट खरी, की दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या 'स्वतंत्र भारत पक्ष' या माझ्या सहकाऱ्यांच्या हुशारीमुळे मान्यताप्राप्त रजिस्टर्ड पक्ष झाला आहे. या पक्षातर्फे आपण अजून खरीखुरी निवडणूक लढविली नाही, समान चिन्ह नसताना निवडणूक लढविल्यामुळे आवश्यक ती मतांची संख्या आपल्याला मिळवता आली नाही आणि ती संख्या जमा करता आली नाही म्हणून चिन्ह मिळत नाही अशा दुष्टचक्रात हा पक्ष सापडला आहे. पण, या पक्षाला एक चिन्ह प्राधान्याने वापरण्याचा अधिकार मिळाला आहे आणि योगायोगाची गोष्ट अशी, की ज्यावेळी या चिन्हावर आपल्याला अधिकार मिळाला त्याच सुमारास ओसामा बिन लादेनचं विमान अमेरिकेच्या जागतिक व्यापार केंद्रावर धडकलं होतं. त्यामुळे 'विमान' हे चित्र एक क्रांतीचं प्रतीक बनलं. स्वतंत्र भारत पक्षाला 'विमान' या चिन्हावर प्राधान्याने अधिकार मिळाला आहे. मला अशी आशा आहे, की पुढच्या निवडणुकीमध्ये जी काही ४ टक्के मते लागतात, त्यापेक्षा अधिक मते मिळवून त्याला अखिल भारतीय पक्ष म्हणून मान्यता मिळून, 'विमान' हे त्याचं अधिकृत चिन्ह म्हणून मान्य होईल, दुसऱ्या टप्प्यात, हिंदुस्थानातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आणि तिसऱ्या टप्प्यात भारताच्या उज्ज्वल भवितव्याच्या वाटेवर आणणारा एकमेव पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यात यशस्वी होईल.

(६ जून २००३)

◆◆