पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/जॉन सोबेस्की
जॉन सोबेस्की
जॉन सोबेस्की हा ई० सन १६२९ साली जन्मला. शिवाजी इ० सन १६३० साली जन्मला. सोबेस्कीच्या मागोमाग शिवाजीचें नांव सांगण्यांत मुद्दा आहे. शिवाजीचा जीवितहेतु म्हणने दक्षिण हिंदुस्थानांत आधींच माजलेल्या व हळुहळू सर्व दक्षिणेंत पसरत चाललेल्या मुसलमानी सत्तेचा विध्वंस हा होय. जॉन सोबेस्की याच्या जीविताचा हेतुही यूरोपांत पसरत चाललेल्या मुसलमानी आक्रमणाला जोराचा तडाखा देऊन यूरोप तुर्की अंमलांतून मुक्त करणें हाच होय. ज्या दोघांची कामगिरी इतकी सारखी, ते दोघे कालदृष्ट्या जुळे असावे हेंही मुसलमानी सत्तेच्या अभ्यासाच्या दृष्टीनें महत्त्वाचें ठरेल. पण जीवितांत समान हेतु असणे येवढेंच सारखेपण या उभयतांत नाहीं. जसे शिवाजीमहाराज तसा सोबेस्की सामान्य सरदार घराण्यांतीलच होता व आपल्या पराक्रमाच्या बळावर जसे शिवाजीमहाराज महाराष्ट्राचे राजे झाले तसाच जॉन सोबेस्की हा आपल्या बळावर पोलंड देशचा राजा झाला. लहानपणापासून खास गृहशिक्षणांतसुद्धां मुसलमानांचा द्वेष हा जसा महाराजांच्या रोमरोमी भिनला होता तसा तुर्कांचा म्हणजे मुसलमानांचाच द्वेष हा वारशाच्या रूपानें सोबेस्की यास बापाकडून मिळाला होता. असें सांगतात कीं, रोमन लोकांचा महान् द्वेष्टा हॅमिलकर यानें मरतांना आपल्या दहा वर्षांच्या मुलास म्हणजे हॅनिबॉल यास अग्निकुंडापुढे उभे केलें व शपथ ध्यावयास लाविली कीं, 'रोमन लोकांचा मी प्राणान्त द्वेष करीन'. हें जसें हॅमिलकर यानें केलें होतें व शिवाजीमहाराजांच्या घरीं जसें त्यांस शिकविलें गेलें, तसेंच जॉन सोबेस्की यास त्याच्या लहानपणींच बापानें शिकविलें होतें. हिंदुधर्माचा उच्छेद हें दक्षिणतील मुसलमानांच्या आक्रमणाचें शेवटचें रूप होतें. त्याप्रमाणेंच व्हिएन्ना शहर कबजांत घेऊन जर तुर्क लोक मध्ययूरोपांत उतरले असते तर ख्रिस्ती धर्माची इमारत खिळखिळी होऊन कदाचित् कोसळलीसुद्धां असती. परंतु शिवाजीमहाराजांनीं मुसलमानी आक्रमणाची लाट जशी दोन हातांनीं मागें परतविली, तसें सोबेस्की यानेंही तुर्कांनी चालविलेलें युरोपखंडाचें आक्रमण कायमचें बंद पाडिलें; इतकेंच नव्हे तर परत वळविलें. इ० सन १६७४ सालीं शिवाजी- महाराजांनीं स्वतःस राज्याभिषेक करून घेतला व त्याच सालीं जॉन सोबेस्की हा पोलंड देशाचा अधिपति झाला. शिवाजीमहाराज वारल्यानंतर इ० सन १६८३ साली मोठी प्रचंड सेना घेऊन औरंगजेब बादशहा दक्षिणेंत यावयास निघाला. त्याप्रमाणेंच कान्स्टांटिनोपलचा वजीर इ० सन १६८३ सालींच व्हिएन्ना शहर घ्यावयास बाल्कन द्वीपकल्पांत शिरला. परंतु ह्या स्वारीचा सन व येथून पुढील हकीगत यांत महाराजांचें व सोवेस्कीचें सारखेपण राहिलें नाहीं. तें असो; परंतु आधीं दिलेली हकीगत एकमेकांशीं इतकी जुळती आहे कीं, ती खास मनोरंजक वाटेल.
सोबेस्कीच्या रक्तांतच तुर्कांचा द्वेष उतरला होता. त्याची आई म्हणजे पोलंडांतील महाविख्यात सेनापति झोल्किस्की याची नात होय. या झोल्किस्कीनें रशियन लोकांचे भडाभड पराभव केले होते आणि थोड्यांत चुकलें, नाहीं तर मास्कोच्या सिंहासनावर पोलंडचा राजा बसविण्यास तो चुंकताना. शेवटीं शेवटीं तुर्क लोकांशीं त्याचें भांडण जुंपलें आणि इ० सन १६२० साली एका हातघाईच्या लढाईत हा तुर्कांच्या हातून मारला गेला. तेव्हांपासून त्याच्या घरांत तुर्कांचा द्वेष हा सांचत चालला होता. आईनें माहेराहून तुरुकद्वेषाच्या अनेक कथा आणिल्या होत्या. त्याचा बाप जेम्स सोबेस्की हा मोठा विद्याभिलाषी व भला मनुष्य होता. जमीनजुमला आणि जंगम मिळकत ही जवळ रगडून असल्यामुळें त्या दिवसांत जें जें म्हगून नागर रहाणीचे असे तें तें त्याने घरीं जमा केलें होतें. मुलांच्या शिक्षणाकडेही तो फार बारकाईनें पहात असे. त्याचा जमीनजुमला त्याला
बायकोकडूनच आला होता. तेथें तो आपल्याइकडले छोटे राजेमहाराजे असतात त्यांच्यासांरखें राज्य करीत असे. त्यानें थोडासा फौजफाटाही बाळगला होता. कोणीं विचारलेंच तर सांगे कीं, 'हे माझे हुजरे आहेत'. घोड्यांच्या पागा, शिकारीचे कुत्रे, मेजवान्यांसाठीं बांधलेले दिवाणखाने, सोन्यारुप्यांची ताटेंवाट्या, किनखाबी पडदे, गाणारांचे ताफे आणि एकंदरीनें जीवित सुखाचें बनविण्यास ज्या कांहीं बारीक- सारीक सोयी आपण उत्पन्न केल्या आहेत, त्यांचीसुद्धां त्यानें आपल्या घरांत समृद्धि केली होती. दरबारी व कांहीं विलासी असा जरी घरचा थाट होता तरी मुलांच्या शिक्षणासंबंधानें मात्र बाप सक्त काळजी घेई. त्यानें मुलांस कित्येक भाषा शिकविल्या. घोड्यावर बसणें, दांडपट्टा खेळणें ह्या विद्याही जॉननें उत्तम अभ्यासिल्या होत्या. त्याप्रमाणेंच कोणच्याही दिलेल्या विषयावर ताबडतोब वक्तृत्व करण्याचा सरावसुद्धां त्याला चांगला झाला होता. शिकार करण्यांतही हा मुलगा बांका होता. आई आणि मुलें एकत्र बसलीं म्हणजे आपला आजा तुर्कांशीं कसा लढला याचीं वर्णनें ती चांगलीं तिखट-मीठ लावून मुलांना सांगे. अर्थात् तुर्कांच्या हातून त्याचा प्रत्यक्षच घात झाला असल्यामुळे मुलांच्या मनांत तुर्कांविषयीं कायमची अढी बसून होती. सोबेस्कीस वाटे कीं, आपण मोठे केव्हां होऊं आणि आपल्या पोलंड देशाच्या जिवावर उठलेल्या ह्या तुर्कांचा नायनाट कसा करूं. शिक्षण पुरतें व्हावें म्हणून युरोपांतील चालीप्रमार्णे बापानें त्यास देशाटन करावयास पाठविलें. पॅरिस शहराकडून पोलंड देशांत सोबेस्की परत येतो तों तेथें बरीच बजबज माजली आहे असें त्यास दिसलें. इतिहासांत प्रसिद्ध असलेले जे कोसॅक लोक त्यांनी या वेळी रशियाचा पक्ष घेतला होता व बरोबर रशियन आणि तार्तार फौजा घेऊन ते मजल दरमजल पोलंड देशावर चाल करून येत होते. पोलंडचा राजा त्यांस आडवा झाला. दोन दिवसपर्यंत घनचक्कर लढाई झाल्यावर पोलिश फौजा किंचित् घाबऱ्या झाल्याचे दिसूं लागलें. राजानें आपल्या भीति खाल्लेल्या फौजांना थोपवून धरण्याची शिकस्त केली; पण जो तो रणमैदानांतून काढता पाय घेऊं लागला. अशा वेळीं या चरित्राचा नायक जो सोबेस्की तो त्वरेनें पुढें झाला आणि पोलिश लोकांच्या देशाभिमानास हांक देऊन त्यानें त्या पळपुट्यांस परत वळविलें. जी गोष्ट राजाच्या तपानेंसुद्धां साधली नाहीं ती ह्या जहागिरदाराच्या नवीन मुलानें घडवून आणली यामुळे लोकांस मोठा अचंबा वाटला. राजाने त्यास एकदम एका प्रांताचा सुभेदार नेमिलें. येथून सोबेस्की हा पोलिश लोकांच्या डोळ्यांपुढे नवा राष्ट्रवीर म्हणून नांदू लागला. दरम्यान पोलंड देशांत अनेक उलथापालथी झाल्या. इ० सन १६७० सालीं कोसॅक लोकांनी पोलंडवर पुन्हा एकदां स्वारी केली. या वेळी थोडेसे जर्मन शिपाई फौजखात्यांत होते. त्यांच्या अंगावर कुडतींसुद्धां चांगली नव्हती. आणि इतर हत्यारें म्हणजे नुसती खळपाटणीं होतीं. त्यांचा पगार तर कित्येक वर्षे थकला होता; पण असलेच हे लोक हाताशी घेऊन सोबेस्कीनें कोसॅकांची स्वारी मारून काढिली व त्यांस नीस्टर नदीपलीकडे पिटाळून दिलें.
दरम्यान तिकडे तुर्कांनीं पोलंडवर स्वारी करण्याचा मांड मांडिला होता. तयाऱ्या होतांच त्यांच्या शिपायांचें पेंव पोलंडवर फुटलें. या प्रसंगींसुद्धां देशाच्या संरक्षणाचें काम सोबेस्कीनें आपल्याच शिरावर घेतलें. त्याचा पराक्रम व काम करण्याची हातोटी ही राजास पहावेना. तो त्याचा मत्सर करूं लागला. फौजेस लागणारा दाणागोणा आणि गवतकाडी तो त्यास मिळू देईना. पण राजाचा हा मूर्खपणा ओळखून सोबेस्कीनें पदरमोड करून तयारी चालविली. तुर्कांचें बळ फार, 'घे घे मार' करीत त्यांच्या फौजा देशांत शिरल्या. व लोकांस वाटूं लागलें कीं, हे उंडारलेले तुरुक लवकरच राजधानी गांठणार. त्या तुर्की फौजांचे तांडेच्या तांडे चोहोंकडे शिरतांना पाहतांच लोकांचे डोळे उघडले व हजारों लोक सोबेस्कीच्या नांवाचा जयघोष करीत त्याच्या निशाणाखालीं जमा झाले. पण हें सगळें झालें तरी बंधारे आधीच फुटले होते आणि म्हणून तुर्कांचा जमाव सोबेस्कीच्या नवशिक्यांना आवरेना. राजानें तहाचें बोलणें लाविलें व भल्या मोठ्या खंडणीचा गोळा तुर्कांच्या पदरांत टाकून त्यानें त्यांस माघारी लाविलें. पण इस्तंबूलचा सुलतान बडा महत्त्वाकांक्षी तुर्कांच्या राज्याची हद्द बाल्टिक समुद्रांत जाऊन भिजली पाहिजे अशी त्याने उमेद धरिली होती. म्हणून पुढील वर्षी बादशहा चवथा महंमद याने सेनापतिपण पत्करून फौजा बाहेर काढल्या. नीस्टर नदीवर त्यानें भराभर कित्येक पूल तयार केले. पुन्हा सोबेस्कीस पुढें व्हावें लागलें. हालचालीस तोंड लागलें तें ऐन पावसाळ्यांत. पुढें लगोलग हिंवाळ्याचें बर्फ पडूं लागलें. सोबेस्कीच्या शिपायांस हा थंडीचा कडाका अतिशय बाधला. वास्तविक पहातां सरकारांतून या फौजांची सर्व तयारी व्हावयास हवी होती; पण राजा मत्सरी बनला होता, तो कांहींच करीना. शेवटी आपल्याच देशांत लुटालूट करून फौजांना हव्या त्या गोष्टी सोबेस्कीनें ओरबाडून आणल्या. तुर्कांनीं कामिनी नांवाचा किल्ला हस्तगत केला.
जवळ फौज नसल्यामुळें तो सोडविण्याचा प्रयत्न सोबेस्कीस करता येईना. म्हणून भर मैदानांत तुर्कांशीं गांठ घालावी असा त्यानें निश्चय केला. शेवटीं कोशीम नांवाच्या किल्ल्याखाली नीस्टर नदीच्या उजव्या तीरावर उभयतांची गांठ पडली. तुर्कांची तयारी दांडगी होती. तेवढ्यांतल्या तेवढ्यांत त्यांनी मोठमोठाले खंदकसुद्धां खणले. सोबेस्कीनें बाजूबाजूनें हल्ला करण्याचा अनेक ठिकाणी देखावा केला; अशासाठीं कीं, तुरुक बोटचेंपा कोठें आहे हे कळावें. तुर्कांना असल्या थंडीची संवय नव्हती. अर्थात् ते थोडे गाफीलच राहिले होते. संधि साधून सोबेस्कीनें एकाएकी असा नेटाचा हल्ला चढविला कीं, तुर्कांची फळी एकदम फुटली. त्यांच्या तळाभोंवतीं कोठें कोठें मोठे कडे होते. सोबेस्कीचे कांहीं घोडेस्वार शिड्या लावून वर चढले. हा अचानक छापाही तुर्कांना नीट अजमावतां येईना. फौजांतले नोकरचाकर आणि सरदारांचे जनाने यांच्यांत भयानें एकच आरोळी उठली, सरदारांनीं आवर घालण्याचा खूप यत्न केला; पण कांहीं केल्या माणसांची धांवपळ थांबेचना. त्यांनीं प्रतिकाराचाही थोडा डौल घातला पण सोबेस्कीनें तो हां हां म्हणतां मोडून पाडला. तुर्कांचा पराभव झाला. आणि शत्रु पाठीवर घेऊन ते बारा वाटा पळत सुटले. सोबेस्कीनें नुसती लांडगेतोड केली.
पोलीश लोकांना वाटलें देवानें आपल्याला नवा रक्षक दिला. मध्यंतरी राजा कोणास निवडावें म्हणून वॉरशॉ शहरीं पुष्कळ खळबळी चालू होत्या. तुर्कांनी पुन्हा एकदां डोके वर केलें. यावेळी सोबेस्कीपाशीं केवळ वीस हजार फौज होती. पण या लहानशा फौजेची फिरवाफिरव त्यानें इतक्या हिकमतीने चालविली होती कीं, तुर्कांस नामोहरम होऊन पुन्हा परतावें लागलें. वॉरशॉ शहरची गादी कोणा द्यावी याची भवति न भवति होऊन या रणधुरंधर व खानदानीच्या घराण्यांतील शूर शिपायास लोकांनीं गादीवर बसविलें. सोबेस्कीच्या चरित्रांतील हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होय. तुर्कांशी झुंजतांना जगावयाचें कीं मरावयाचें हा प्रश्न केवळ पोलंडपुढेच काय, पण अवघ्या युरोपखंडापुढे उभा होता. आणि तुर्कांचा नायनाट करण्याचा चंग बांधलेला सेनापति गादीवर आणून पोलंडने या तुर्की झगड्याचा कायमचा सोक्षमोक्ष करण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली.
तुर्कानें पुढें मोठें कारस्थान केलें. धाकदपटशा दाखवून त्यानें मोठी मसलत रचली. पोलंड आणि तुर्क यांच्यामध्ये ऑस्ट्रिया देशाचा हॅप्सबूर्ग राजा होता. भोवतालचे अनेक स्वकीय तुर्कांस मिळालेले पाहून तो भयानें अगदीं गांगरला. तुर्कांची तयारी फार मोठी चालू होती. लक्षावधि फौजा व मोठा पोक्त सरंजाम त्यांनी जमा केला. आणि इ० सन १६६३ सालच्या जून महिन्याच्या तिसाव्या तारखेस तुर्क लोकांचें प्रचंड लष्कर आपल्या अवाढव्य लवाजम्यासह सध्यां च्या सर्व्हिया देशाचें राजधानीचे शहर जें बेलग्रेड त्यावर चाल करून निघालें. वाटेनें लुटालूट व जाळपोळ हीं मनसोक्त चाललेलीं होतीं. शत्रूनें लवकर शरण यावें, त्याला चांगला धाक बसावा किंवा आपण पुढे गेलो असतां मागें लोकांनी बंड उभारू नये अशांसारखे अनेक चांगले हेतु, लुटारू लोकांना जे तत्त्वज्ञान पुरवितात त्यांच्या ग्रंथांत दाखल असतीलच; परंतु तुमच्याआमच्यासारख्या सामान्य लोकांना ही लूट म्हणजे केवळ लोभ आणि हांवरेपणा होय असेंच वाटतें. तुर्कांच्या फौजा जरी अधूनमधून भोवतालचा मुलूख ओरबडण्यासाठीं रेंगाळत चालल्या असल्या तरी त्यांचें कूच व्हिएन्ना शहरच्या रोखानेंच चाललें होतें. येवढी मोठी प्रचंड नगरी हस्तगत झाली आणि तेथील इतिहासप्रसिद्ध हॅप्सबूर्ग घराणें उध्वस्त करतां आलें म्हणजे युरोपचा आग्नेय कोपरा केवळ तुर्कांचा होणार आहे हें त्यास माहीत होतें. वास्तविक पाहतां सोबेस्की यानें बादशहास आधींच सूचना दिलेली होती. त्यानें आपले बातमीदार तुर्की दरबारांत चांगले पेरून ठेविले होते. त्याप्रमाणेंच तुर्की सरदारांची एकमेकांस जाणारी येणारी पत्रे छापे घालून त्यानें धरिलीं होतीं. अर्थात् तुर्कांच्या स्वारीचा सुगावा त्याला चांगला लागलेला असल्यामुळे व्हिएन्ना शहरावर काय घोरपड येत आहे याची जाणीव त्यानें राजास दिली होती. तुर्क लोक झपाट्यानें पुढें येऊन व्हिएन्ना हस्तगत करणार हें तर ठरलेच होतें. पण राजानें त्यांना हें सर्व सुखासमाधानानें करूं द्यावें कीं काय हाच केवळ प्रश्न होता. म्हणून सोबेस्की यानें राजास कळविलें कीं, शहरच्या भिंतीखालच्या वाड्या उठवा व वेढा बसणार असल्यामुळे बचावाच्या तरतुदीस लागा.
लिओपोल्ड हा 'ऐकावे जनाचें व करावें मनाचें' ही म्हण फारच चांगली पढला होता असें दिसतें. त्यानें मनाशीं हिशेब बांधला कीं, तुरुक एकदम व्हिएन्नावर येणार कसा? त्याच्या वाटेंत दोन प्रचंड किल्ले उभे आहेत. व त्यांपैकीं एक एक घ्यावयाचा म्हणजे तुर्कांना एकेक स्वतंत्र स्वारी काढावी लागेल, इतके ते बलाढ्य आहेत. अर्थात् तुर्कांच्या आणखी दोन स्वाऱ्या होईपर्यंत खुशाल झोंपा काढावयास हरकत नाहीं. असा मनसुबा करून लिओपोल्ड राजे आपल्या नगरींत खुशाल होते. इतक्यांत ३० जूनला तुर्कांच्या स्वारीची हूल उठली. ती ऐकतांच राजा पराकाष्ठेचा भांबावला. सोबेस्कीचें ऐकलें नाहीं म्हणून त्यास वाईटही वाटले असेल; पण बिचारा करतो काय? काय करावें आणि काय न करावें याच्या धांदलींत शेवटी लोकांचे लोक काय वाटेल तें करोत; आपलें शीर सलामत ठेवण्याच्या हेतूनें त्यानें पळून जाण्याचा अगदी साधा इलाज ठरविला व तो ताबडतोब अमलांत आणला. राजाच पळाला मग प्रजेची गत काय झाली असेल हें दिसतच आहे. 'महाजनो येन गतः स पन्थाः' या न्यायानें सरासरी साठ हजार लोक राजाबरोबर जीव घेऊन पळाले. या पळणारांची फार कठीण अवस्था झाली. इकडे शहरांत शिल्लक राहिलेले लोक मात्र या पळपुटया- राजांवर केवळ खवळून गेले. उद्यां काय होणार याची त्यांना नीट कल्पना येईना. त्यांनीं तुर्कांच्या स्वाऱ्यांचीं भयानक वर्णने ऐकलेली होतीं. त्यामुळें तुर्की फौजांचा लांब उठलेला धुरोळा त्यांनी आकाशांत पाहिला तेव्हां त्यांना धडकीच भरली. कांहीं सरदारांनी थोडी जमवाजमव केली; परंतु तुर्की फौजांचें जगड्व्याळ रूप पाहून लोकांच्या चित्तानें ठाव सोडला. लोक पहातात तों, तुर्कांनी एका नवीन शहराची वसाहत करावयासच आरंभ केला आहे असें त्यांस दिसलें. लक्षावधि शिपाई जमले होते. सांडणीस्वार, उंट, हत्ती, घोडे यांना तर गणती नव्हती. खुद्द वजीरसाहेब ज्या किनखाबी तंबूत आपल्या झनान्यासह उतरले होते त्यानें कित्येक एकर जागा व्यापिली होती. तुर्कांच्या तळावर निदानपक्ष तीन लक्ष माणूस्त असावें. एवढें हें अरिष्ट पाहतांच शहरांतील उरल्यासुरल्या लोकांची गाळण उडाली यांत काय नवल? पण भिऊन भागण्यासारखें नव्हतें.
जुलै १६ ला वजीरसाहेबांनीं आपला तोफखाना सुरू केला. शहरावर गोळ्यांचा वर्षाव होऊं लागला. शिखरें, देवळें, मनोरे यांवर गोळे टिचून येऊं लागले. इतपत धडकी लोकांत उत्पन्न करून वजीरसाहेबांनी गांवकऱ्यांस सांगून धाडिलें कीं, शहर खाली करावें. कौन्ट स्टारेनबर्ग या नांवाचा एक सरदार खूप धडपड करून राहिला होता व लोकांच्या मनांत त्यानें बराच विश्वास उत्पन्न केला होता. पण खुद्द त्यालाच मोठी जखम झाली. त्यामुळे गांवचे लोक अधिकच घाबरले. गांवकुसवाला भराभर भगदाडें पडत होतीं. तीं बुजवावयास जावें तों तुर्कांचे नवे नवे हल्ले येत. यामुळे लोकांची मोठी तारांबळ झाली. एकदां तर एक मोठा थोरला मोहोलाचा मोहोला गोळ्यांच्या आगीनें भडकला. तुर्कांनी सुरुंग लावले म्हणजे यांनीं उरफाटे सुरुंग लावावे. केव्हां केव्हां तर भराव टाकणाऱ्या कामकऱ्यांनीं खोरींटिकावांनींच एकमेकांस मारावें असें चाललें होतें. आपल्या शहरची दैना लिओपोल्ड याला ऐकवेना. त्यानें युरोपांतील सर्व राजांकडे निकडीच्या विनवण्या केल्या. ऑगस्टच्या ९ व्या तारखेस त्याचा वकील व पोपमहाराजांचा प्रतिनिधि असे सोबेस्की यांस येऊन भेटले व हातींपायीं पडून 'कसेही करा आणि आतां लाज राखा' असें म्हणून त्यांनी मदतीची याचना केली. 'पोल लोकांनीं जर आपल्या मदतीला धांव घेतली तर त्यांना मी काय वाटेल तें देईन', असें लिओपोल्डचें सांगणें होतें. सोबेस्कीच्या मनांत तुर्कांविषयीं अगोदरच पराकाष्ठेचा तिटकारा होता; त्यांत लिओपोल्डची ही गयावया ऐकल्यावर त्यानें एकदम निघण्याचे ठरविलें. तुरुक कुठें आहे, काय आहे, व तो हंगेरींत कसा पसरला आहे याची बारीकसारीक माहितीसुद्धां त्यानें काढली होती. अर्थात् आपलें क्रॅको शहर सोडून प्रत्यक्ष स्वारी सुरू करण्यापूर्वी त्यानें स्वारीचा नकाशा कायम केला होता. सोबेस्की म्हणजे काय प्रकरण आहे हें तुर्की वजिरास ऐकून तरी माहीत होतें. पण तो मोठ्य गुमानीतच होता. त्याला वाटले आपल्या पदरी एवढी प्रचंड फौज असल्यावर सोबेस्कीचा काय पाड लागला आहे? म्हणून सोबेस्कीची कांहींच क्षिति न बाळगतां त्यानें व्हिएन्ना शहराला हळुहळू वेढा भरला. लिओपोल्डची राजधानी मात्र आतां अगदी टेंकीस आली होती. शहरची शिबंदी अगदी खंगून गेली; रोगराई पसरली आणि जिकडे तिकडे उपासमारीनें माणसें पटापट मरूं लागली. खरोखरच सर्व व्हिएन्ना शहराचा प्राण डोळ्यांत आला होता. 'कोणी आपल्या मदतीस येईल का?' म्हणून शहरांतले लोक चारी दिशांना डोळे लावून बसले होते.
इतक्यांत एके दिवशी संध्याकाळीं दूरच्या डोंगरावर उजेड दिसूं लागला व थोड्याच वेळांत हें स्पष्ट झालें कीं, तुर्कांचा हाडवैरी जो सोबेस्की तो झपाट्यानें मदतीसाठी येत आहे. दूरची मैदानें त्याच्या घोडेस्वारांनी गजबजून गेलेली दिसूं लागली. वजिरानें निराळाच नकाशा आंखला. त्यानें आपल्या फौजेच्या तीन तुकड्या केल्या. एकीनें सोबेस्कीवर चालून जावें; दुसरीने शहरावर शेवटचा निकराचा हल्ला चढवावा; आणि तिसरीनें पदरांत पडलेली लूट घेऊन हंगेरीच्या मैदानाकडे कूच करावें असें त्यानें ठरविलें. शहरच्या तटाच्या आंत सारखा झगडत असलेला जो स्टारेनबर्ग त्याला सोबेस्कीचें निशाण पहातांच वाटलें कीं, 'मोक्षाची म्हणजे सुटकेची वेळ जवळ आली' आणि पुन्हा एकदां बळ बांधून त्यानें तमाम लोक तटावर जमा केले. सोबेस्कीनें डान्यूब नदीवर मोठा पूल तयार केला. व मदतीस आलेल्या चार्लसच्या फौजेस तो येऊन मिळाला. वजीर हें सर्व निमूटपणें पहात होता. उभय दळें सिद्ध झाल्यावर सरासरी सत्तर हजार फौजेनिशीं सप्टेंबर १२ तारखेस सोबेस्कीनें युद्धाची गर्जना केली. सोबेस्कीचे पोलंडांतील घोडेस्वार विलक्षण पराक्रमी होते. त्यांच्या दौडीपुढें वजीरसाहेबांचे मिजासी मुसलमान उभे राहीनात. सोबेस्की स्वतः सर्व रणांगणावर मारामारी करीत आणि तुर्की फौजा मागें चेंपीत सारखा चालला होता. पुढे मोठा रणगाजी म्हणून प्रसिद्धीस आलेला जो प्रिन्स युजीन तो या वेळीं सोबेस्कीच्या हाताखालीं उमेदवारी करीत होता! असें सोबेस्कीचें वैभव होतें. बराच वेळ रणधुमाळी उडाल्यानंतर तुरुक हळुहळू कच खाऊं लागला. सोबेस्कीने शेवटीं त्यांची फळी फोडली; इतकें होतांच सर्व तुर्की शिपाई जीव घेऊन दाही दिशा पळाले. त्यांनीं सामानसुमान किती टाकलें याला तर गणतीच नाहीं. वर सांगितलें आहे कीं, वजीरसाहेबांचा व एकंदर तुर्की लष्कराचा डामडौल फार मोठा होता. तुर्कांच्या या हबेलंडीचं वर्णन खुद्द विजय मिळवणाऱ्या सोबेस्कीनें आपल्या राणीस लिहिलेल्या एका पत्रांत फार सुंदर तऱ्हेनें दिलें आहे. तें पत्र असेंः-
"माझ्या चित्तास सदैव आनंदविणारी रमणीय प्रियकरणी मेरी ईस—
"परमेश्वराची स्तुति माझे मुखांतून सदैव होवो. आपल्या राष्ट्राला देवानें यश दिले आहे. असें यश पूर्वी कोणास कधीं लाभलें असेल कीं नाहीं, असें मला वाटतें. मुसलमान लोकांचा बडा तोफखाना, त्यांची अपार संपत्ति, इतकेंच नव्हे, तर त्यांची सगळी छावणीच्या छावणी आपल्या हाती लागली आहे. राजधानीला जाणारे सर्व रस्ते आणि भोवतालचें सगळें रान तुर्की शिपायांच्या प्रेतांनीं भरून गेलें आहे. जे कोणी आमच्या तावडीतून सुटले ते जीव घेऊन घाबरटपणानें पळून जात आहेत. तलवारीची टिपरघाई ऐन रंगांत आली असतांना, शत्रूने एकदम कच खाल्ली. जयश्री येवढी मोठी व इतकी अकल्पितपणें प्राप्त झाली कीं, राजधानींत व आमच्या शिबिरांतसुद्धां 'मुसलमान परत येणार! परत येणार!' म्हणून सारख्या भुमका उठत आहेत; पण ते आतां कसचे येतात? हे पळपुटे कोट्यवधी रुपयांचा दारूगोळा छावणीत टाकून पळाले आहेत.
"सध्यांच माझ्या डोळ्यांपुढे असा देखावा दिसत आहे कीं, ज्याची तहान मला फार दिवस लागली होती. शत्रूचीं हीं दारूगोळ्याचीं कोठारें आमचे शिपाई धडाधड उडवून देत आहेत. त्यांचे आवाज तर येवढे होय आहेत कीं, 'पृथ्वी गेली रे गेली' असें देव ओरडल असतील. पण आभाळांत उठलेले हे धुराचे लोट पाहून जरी मनाला समाधान वाटलें तरी होत असलेले नुकसान पाहून वाईट वाटतें. वजीरसाहेब घोड्यावर स्वार होऊन एका वस्त्रानिशीं पळून गेले; उरलेल्यांनी आपापले पहावें. आतां त्यांच्या वस्तूंचा वारसा मी आपल्याकडे घेतला आहे. कारण त्यांची बहुतेक दौलत माझ्या हातांत पडली आहे. या वजिराला चेंपीत चेंपीत बिनीच्या फौजेवर मी पुढे जात असतां त्याच्या एका नोकरानें मला त्याचे तंबू आणि खाजगी रंगमहाल दाखविला. हे तंबू इतके मोठे आहेत कीं, त्यांच्यांत सगळी वॉरशॉ राजधानी मावली असती. वजिराच्या पुढें डौलानें चालणारी सर्व निशाणें आणि तोरणें मीं हस्तगत केलीं आहेत; पण बादशहानें त्याजबरोबर दिलेलें महंमदाचें प्रचंड निशाण मात्र मीं मजपाशीं न ठेवतां रोमला पाठवून दिलें आहे. सांपडलेल्या सामानांत भरगच्ची तंबू, सुंदर कनाती आणि हजारों मोलवान् गमतीच्या चिजा आहेत. मी अजून त्या सगळ्या पाहिल्याही नाहींत; पण तुला एवढेंच सांगतों कीं, ह्या लुटीला दुसरी तोड नाहीं. बाणांचे चार पांच भाते माझ्या हातीं लागले आहेत. त्यांजवर बसविलेलीं रत्ने व इंद्रनील मणि लाखालाखांचे असतील. तार्तरी मुलुखांतला मर्द मुलुखगिरी करून परत आला; पण तो जर कां हात हालवीतच परत आला, तर त्याची बायको त्याला म्हणते, 'तुम्ही शूर मर्द नव्हांत; तुम्हीं मला कांहींच आणिलें नाहीं; जो शूर असतो तो जोराने तुरमुंडी देतो व लूट पैदा करितो'. प्रिये मेरी, मला मात्र तूं असें खास म्हणणार नाहींस.
"हे तुरुक म्हणजे घमेंडखोर आणि चढेल. त्यांना वाटलें डाव स्वस्तांत पडेल. म्हणून निम्या फौजेनें आमच्याशीं मारामारी सुरू केली आणि निम्मीनें राजधानीवर घाला घातला. त्याचें माणूसबळ फार मोठें! करोल तीन लाख शिपाई वजिरापाशीं होता. मदतीस घेतलेल्या तार्तरांच्या फौजा निराळ्या. नुसते तंबू मोजले तर थोडे कमी एक लक्ष भरले ! दोन दिवस झाले, अहोरात्र लूट चालली आहे. ज्यास जें आवडेल तें तो उचलीत आहे. राजधानींतले गांवकरीसुद्धां हात मारून घेत आहेत. आणखी पांच सात दिवस लुटीचें काम ह्या लोकांना सहज पुरेल. तुर्कांनीं शेंकडों कैदी मागें टाकले. त्यांत बायका फार होत्या; पण जितक्या मारतां आल्या तितक्या त्यांनीं मारिल्या. हे कैदी आणि बायका कोठल्या म्हणशील तर या देशांत तळ दिल्यापासून त्यांनीं भोंवतालच्या जमा केलेल्या. वजिरापाशीं एक सुंदर शहामृग होता; पण पळून जावयाच्या आधीं आम्हां ख्रिस्त्यांच्या हातीं तो पडूं नये म्हणून त्यानें त्याची मान उडविली. वजिराच्या तंबूंत सुखोपभोगाचीं विविध साधनें काय मनमुराद जमविलीं होतीं तें सांगतां पुरवत नाहीं. जलविहारासाठीं लहान लहान तडाग केले होते. जिकडे तिकडे बगिचे पसरले असून त्यांत शेंकडों कारंजी थुइथुइ करीत होतीं. एक राघूसुद्धां मोठा गमतीचा होता. पण तो आम्हांस गवसला नाहीं. आज मी शहरांत गेलों होतों. तेथील स्थिति पाहून मला वाटलें, तुरुक जर पळाला नसता तर चार पांच दिवसांहून जास्त दम धरतां येता ना. राजाच्या वाड्याला गोळ्यांनीं भगदाडें पाडिलीं आहेत आणि ते प्रचंड बुरूज फाटून जाऊन कोसळावयास ठेपले आहेत. वजिराला जेव्हां दिसलें कीं, आपली आतां धडगत नाहीं तेव्हां त्यानें आपल्या सर्व मुलांस बोलाविलें आणि पोरासारखा गळा काढून तो रडूं लागला. तो तार्तरीच्या राजास म्हणाला, 'मला आतां ताराल काय?' खान खट्टू होऊन उद्गारला, 'हें कसें होईल? प्रसंग पोलंडच्या राजाशी आहे. त्याच्याशी टक्कर देणें आतां व्हावयाचें नाहीं. आतां काढता पाय घेऊं या'.
"हंगेरीची स्वारी सुरू करण्यासाठीं रिकिबीत पाय घालावयाच्या आधीं हें पत्र मी तुला लिहीत आहें. राजानें लिहावें आणि राणीनें वाचावें अशाच थाटाचें हें पत्र आहे ना? बव्हेरिआ आणि सॅक्सनी येथील मांडलिक मजबरोबर वाटेल तिकडे यावयास कबूल आहेत. मेलेलीं माणसें, उंट आणि घोडीं यांच्या दुर्गंधींतून तुर्कांच्या पाठीवर आम्हांस दौडत जावयाचें आहे."
तुर्कांची पांगापांग होऊन तळ ओस पडल्यावर सोबेस्कीनें व्हिएन्ना शहरांत प्रवेश केला. आपल्या पराक्रमी उपकारकर्त्याचें दर्शन होतांच त्या दीनावलेल्या प्रजेला अश्रूंचें भरतें आलें. हर्षनिर्भर होऊन त्यांनीं त्याचें स्वागत केलें व आनंदाच्या टाळ्यांनीं आणि आरोळ्यांनीं गांवचे रस्ते दणाणून सोडले. सर्व लोक शहरच्या मुख्य देवळांत जमले. त्या ठिकाणीं धर्मोपदेशकांनीं धर्मपुस्तकांतील एक आख्यान लाविलें. त्याचा आरंभही असाच होता:— 'मग परमेश्वरानें दयाळु होऊन एक त्राता पाठविला. त्याचें नांव जॉन'. वास्तविक बायबलांतील मूळचा जॉन हा निराळाच होता; पण हरिदासबुवांनीं त्या जॉनशीं हा जॉन मोठ्या खुबीने जुळवून घेतला. असो. सर्व शहराला हायसें झालें. आपणांस मारावयास आलेल्याचा तळ लुटावयाचें काम आतां त्यांना करावयाचें होतें. डिसेंबर ता. २३ ला हा बाजीराव व्हिएन्नाच्या छत्रसालाचा गजेंद्रमोक्ष आटोपून आपल्या क्रॅको शहरास परत आला.
सोबेस्कीच्या या विजयाची वार्ता सर्व युरोपभर झपाझप पसरली. आजपर्यंत तुरुक म्हणजे एक बंडच बनून राहिलें होतें. त्याच्या नांवाची दहशत अवघ्या युरोपखंडांत अशी बसली होती कीं, ख्रिस्ती लोकांचा जीव सारखा धाकधूक करीत असे. वर्षामागें वर्ष लोटलें कीं, तुर्काचा पाय मध्ययुरोपाकडे अधिकाधिक येत चालला असें सारखें होत होतें. कोणाच्यानें मान उंच करवेना. येवढे देशोदेशींचे शूर योद्धे खरे, पण सगळे आपापल्या ठिकाणीं चिडीचीप बसले होते. परंतु सोबेस्की यानें हा जबरदस्त टोला दिल्यानंतर मुसलमानी सत्तेच्या पसरत चाललेल्या लाटा परत वळल्या. ख्रिस्ती लोकांना जीव भांड्यांत पडल्यासारखें झालें. तुर्कांचा अंमल म्हणजे काय हें ते पहातच होते. अर्थात् ख्रिस्तीधर्म या त्याच्या पराक्रमामुळे कायम टिकला; इतकेंच नव्हे तर प्रत्येक राष्ट्रांत नवजीवनाचें वारें पुन्हा मोकळेपणानें वाहूं लागलें.
पण सोबेस्कीसारखा धुरंधर नेता मिळूनसुद्धां पोलंडदेशाची व्हावी तशी प्रगति झाली नाहीं. कारण पोलंड म्हणजे भांडखोरीबद्दल मोठें नाणावलेलें राष्ट्र आहे. लोकांनीं जसें त्याच्या श्रमाचें चीज केलें नाहीं तशीच त्याची बायको जी मेरी तीही त्याची कीर्ति कमी करण्यास कारण झाली. तीं दोघें परस्परांस जरी अत्यंत प्रिय असत, तरी ती मोठी महत्त्वाकांक्षी आणि घरबसल्या अनेक खेकटी उत्पन्न करणारी होती. सोबेस्की हा रणांगणावर मोठा कर्दनकाळ होता; पण बायकोचा शब्द डावलणें त्याच्या मोठें जिवावर येत असे. राजा जिवंत आहे तोंच त्याच्या घरीं, गांवांत व सगळ्या युरोपभर हें राज्य आतां कोणाच्या हातीं जावें या यासंबंधानें सारखी बाचाबाच चालू होती. राजा शेवटी जिवाला कंटाळला. शरीरही त्याच्या स्वाधीन राहिलें नाहीं. सोबेस्कीचें वर्णन लंडनच्या एका उपाध्यानें केलें आहे. तें असें— 'हा राजा मोठा भला माणूस आहे, अतिशय सभ्य आहे, कोणासही त्याजकडे जाण्याची बंदी नाहीं. समरांगणा वरची विद्या तर तो जाणतोच जाणतो; परंतु फ्रेंच भाषेचा अभ्यास करून त्याच्या द्वारा त्यानें फार मोठें ज्ञानार्जन केलें आहे. लॅटिन, फ्रेंच, इटालियन, जर्मन या परकी भाषासुद्धां तो स्वतःच्या पोलिश भाषेसारख्याच बोलतो. पदार्थविज्ञान इत्यादि शास्त्रांचाही त्याला मोठा शोक आहे. राजा खूप उंच असून त्याचें पोट बरेंच सुटलें आहे; तोंड बरेंच जाड असून डोळे मोठे आहेत. गांवचे लोक जसा पोशाख करतात तसाच राजासुद्धां करतो. तो कोठेही जावो, एक भली मोठी समशेर त्याच्या कमरपट्याला लोंबत असावयाची' असो. सोबेस्की विद्येचा मोठा अभिलाषी, कुशल सेनापति व शूर शिपाईगडी होता. तो आपले शेवटचे दिवस या ठिकाणीं घालवीत असतां काळज्यांनीं वगैरे तो अगदीं खंगून गेला आणि शेवटीं मुसलमान आणि ख्रिस्ती हे शब्द युरोपांत जोपर्यंत चालू राहतील तोंपर्यंत ज्याच्या नांवाला मरणाचें भयच नाहीं तो हा नवीन काळाचा उत्पादक पराक्रमी जॉन सोबेस्की १६९६ सालीं आपल्या वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी स्वर्गवासी झाला.