Jump to content

पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/ऑलिव्हर क्रॉम्वेल

विकिस्रोत कडून




 ऑलिव्हर क्रॉम्वेल

लिव्हर क्रॉम्वेल याचा जन्म इ० स० ११९९ साली झाला. चुलत्याचेंच नांव याला मिळालें. चुलता थोडा प्रसिद्ध माणूस होता व नामकरणविधीच्या वेळेस ख्रिस्ती लोकांत जो एक गॉडफादर म्हणून करावा लागतो तोही त्याचा चुलताच झाला असल्यामुळें त्याचेच नांव त्याला दिलें गेलें. क्रॉम्वेलचा बाप मात्र आपली शेतीभाती संभाळून असे. पदरीं चार पोरेंबाळे असल्यामुळे तेवढ्या शेतीवर चालेना म्हणून तो दारू गाळण्याचाही धंदा करी. आपला धंदा बरा कीं आपण बरे अशी त्याची प्रवृत्ति असल्यामुळे तो शहराकडे वगैरे फारसा फिरकत नसे. मुलें पुढें मोठीं निवटलीं म्हणजे त्यांच्या त्या भावी मोठेपणाच्या खुणा लहानपणच्या वयांत कांहीं सांपडतात काय याची चौकशी माणसें करतात; व चौकशीसच निघाल्यानंतर त्यांच्या हातीं कांहींना कांहीं तरी लागतेच. असें सांगतात कीं, ऑलिव्हर हा अगदीं लहान असतांना एके दिवशीं एका वानरीनें, त्याच्या आईचा डोळा चुकवून, घरांत पाळण्यापर्यंत शिरकाव केला व बाळंत्यांत निजलेल्या या मुलास पोटाशी घेऊन तिनें दूर उड्डाण केलें. कोठें कौलाघरावर बसून त्या भांबावलेल्या माणसांना खिजविण्याचे काम या वानरीनें चालू केलें. सगळ्या आळींतील माणसें गाद्या, ब्लॅकेटें, पासोड्या घेऊन तेथें धावली; अशासाठीं कीं, वानरीनें जर कदाचित् बाळ खालीं टाकून दिलें तर तें अल्लाद झेलतां यावें. वानरीने मुलाच्या आईचें दुःख पाहून आणि आळीकरांचा कल्लोळ पाहून मूल हलकेच खालीं आणिलें व यत्किंचितही न दुखवितां रस्त्यावर ठेवून दिलें.

सर्वांस आनंद झाला हें सांगणें नकोच; पण पुढे त्याच्या जीवितात त्याच्यावर जीं मोठमोठाली संकटें आलीं व तसेंच त्याचा जो उत्कष झाला त्याचें हें पूर्वचिन्ह होतें असें मागील आठवण उकरून काढून, म्हातारे लोक पुढें मानूं लागले.
 ऑलिव्हर हा लहानपणीं चांगला बलदंड होता. शेतवाडीवर

राहणें, बक्खळ खाणेपिणें आणि उघडी हवा यांमुळें तो लहानपणापासून चांगला सकत किंबहुना अडदांडसुद्धां बनला. शहरच्या वस्तीत प्राप्त होणारें नागर वळण त्याला लहानपणीं मुळींच लाभले नाहीं; आणि मोठेपणी जेव्हां तें लाभण्याची संधि आली तेव्हां तो इतका निबर झाला होता व गांवढ्या राहाणींत इतका खारून गेला होता कीं, शहरांतील वागणुकीची सफाई आणि टापटीप हीं त्याला केव्हांच उचलतां आलीं नाहींत. लहानपणीं तो चुलत्याचा बराच लाडका असावा असें दिसतें. चुलता लहानसा जहागीरदार आणि मोठा तालेवार गृहस्थ होता. प्रत्यक्ष राजघराण्याशीं कांहीं संबंध नसला तरी आपण तितक्याच खानदानीचे आहों व म्हणून प्रसंग-विशेषीं राजघराण्यांतील माणसांशीं आपली थोडीबहुत घसट असल्याचा देखावा दाखवितां आला तर तो केवळ आपल्या पोकळ डौलाचें लक्षण आहे असें कोणीं मानण्याचें कारण नाहीं असें त्यास वाटे. इंग्लंडांतून स्कॉटलंडकडे जावयास त्या वेळीं जो एक मोठा हमरस्ता होता त्यावरच या सर ऑलिव्हर क्रॉम्वेलचा मोठा जमीनजुमला होता. त्यावर त्यानें एक चांगला बंगलाही बांधला होता. अर्थात् जेव्हां जेव्हां राजघराण्यांतील मंडळी या रस्त्यानें स्कॉटलंडमध्ये जात येत तेव्हां त्यांनीं आपल्या या बंगल्यांत एकादा मुक्काम टाकलाच पाहिजे असा त्यानें शिरस्ता घालून टाकला होता. पहिला चार्लस या नांवानें इंग्लंडच्या गादीवर बसलेला राजपुत्र ड्यूक ऑफ यॉर्क हा स्कॉटलंडहून लंडनकडे जात असतां एकदां या ठिकाणीं मुक्कामास उतरला. ड्यूक हे बडें नांव असलें तरी राजपुत्र अगदीं दुबळा होता. आपल्या घरीं राजपुत्र मुक्कामास आला यामुळे सर ऑलिव्हर याला मोठा अभिमान वाटला. त्यानें राजपुत्राची उत्तम बडदास्त ठेविली व त्याच्याशीं खेळावयास म्हणून त्यानें आपल्या पुतण्यास म्हणजे आपल्या चरित्र- नायकास तेथें मागवून घेतलें. दोघांची गट्टी बरी जमली; पण कांहीं वेळानें कोठेंसें बिनसलें. होता होतां प्रकरण हातघाईवर आले आणि जवळपास तर दुसरें कोणीही नव्हतें. ऑलिव्हर यानें फार मस्ती केली, आणि राजपुत्राच्या नाकावर असा ठोंसा दिला कीं, तें रक्तबंबाळ झालें. पुढें देशांत बखेडे माजून ज्या वेळेस चार्लस यास पलायन करावें लागलें व ऑलिव्हर सर्वसत्ताधीश झाला त्या वेळीं ही जुनी आठवण काढून, वृद्ध लोक आपापसांत पुटपुटले कीं, "या गोष्टीचें भाकीत आम्हीं पूर्वीच केलें होतें."
 पण खुद्द ऑलिव्हर याससुद्धां आपल्या भावी उत्कर्षाचीं स्वप्ने आधीच पडूं लागलीं होतीं असें म्हणतात. मोठा झाल्यावर तो नेहमी सांगत असे कीं, लहानपणी माझ्या मच्छरदाणीचा पडदा बाजूस सारून एक मोठा धिप्पाड पुरुष माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला कीं, तूं या देशांत सर्वश्रेष्ठ माणूस होशील. त्याला हा झालेला दृष्टान्त त्यानें लहानपणींच आईबापांस व शेजाऱ्यापाजाऱ्यांस सांगितला होता. पण तेव्हां त्याला कोणी बोलून देईना. कारण त्यामुळे राजाचा अवमान होतो असें सर्वांचें मत पडलें. नातेवाईकचसे काय पण त्याचे पंतोजीसुद्धां त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकतांच त्याच्यावर तावदारून उठले! पण ऑलिव्हर मात्र शेवटपर्यंत या दृष्टान्ताबद्दल बोलत असे. असो. वानरीनें त्यास उचललें नसतें, त्यानें चार्लसचा घुणा फोडिला नसता किंवा त्याला हा दृष्टान्त झाला नसता तरीही तो मोठा व्हावयाचा तो झालाच असता. पण लहानपणच्या हकीगतींवरून भावी मोठेपण अजमाविण्याचें अथवा भावी मोठेपणावरून लहानपणच्या सामान्य गोष्टींचेही अनुकूल अर्थ बसविण्याचे प्रयत्न कसे होतात त्याचें हें एक गमतीचें उदाहरण आहे, इतकेच.
 गांवच्या इतर मुलांप्रमाणेंच ऑलिव्हर शाळेत जाऊं लागला, परंतु तेथें त्यानें कांहीं बुद्धीची विशेष चमक दाखविली असें मुळींच नाहीं. यानें लहानपणीं विद्येचा अभ्यास झटून केला नाहीं हें भावी काळांत तो जीं भाषणे वगैरे करी त्यांवरून श्रोत्यांच्या ध्यानी येई. खेडेगांवचे मास्तरही बरेच कडक असावेत असें दिसतें. बायबल वाचावयास शिकविणें आणि तें न आलें तर चांगल्या छड्या मारणे एवढ्या दोनच गोष्टी ते करीत असत. सन १६१६ सालीं तो केंब्रिज येथे कॉलेजमध्ये दाखल झाला. तेथें थोडेंसें लॅटिन, व ग्रीक आणि रोमन इतिहास यांचे ज्ञान त्यानें पैदा केलें. त्यानें प्रत्यक्ष विद्या अशी जरी फारशी हस्तगत केली नाहीं तरी विद्येविषयीं मोठी आदरबुद्धि त्याच्या मनांत येथें उत्पन्न झाली. पुढें मोठा झाल्यावर त्यानें स्वतःकरितां जो पुस्तक- संग्रह केला, पंडित आणि शास्त्रवेत्ते यांची जी तो संभावना करीत असे, आणि केंब्रिज येथील विद्यापीठाबद्दल त्याला जो शेवटपर्यंत आदर वाटत राहिला त्यावरून हें दिसून येतें. फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती खेळणें यांच्यापायींच त्याचा सगळा वेळ गेला. तसा गेला असता तरी इतकीशी हरकत नव्हती; पण याच्या जोडीला हेंही सांगावयास हवें कीं, एकंदर हकीगतींवरून पाहातां वर्तनानेंसुद्धां तो कांहीं विशेष चांगला असेल असें वाटत नाहीं. असो.
 लौकरच त्याचा बाप वारला. आई मोठी शहाणी व दक्ष बाई होती. तिनें मुलाची चाल आतांपर्यंत ओळखलीच होती; म्हणून आतां कोणीतरी घरचें पहावयास हवें या निमित्तानें तिनें त्याला कॉलेजांतून काढून घरीं आणलें. तेथें आल्यावर व घरीं कोणी अडपतेंदडपतें नसल्यामुळे तो अगदींच ताळ सोडून वागूं लागला. पुन्हा एकदां त्याला अभ्यासाची हुक्की आली व आपण वकील बनावें असें ठरवून तो लंडन शहरास आला. त्याच्या स्वच्छंदी वर्तनाला येथे चांगलीच जागा सांपडली. तरी कायद्याचें जुजबी ज्ञान संपादन करून क्रॉम्वेल आपल्या गांवीं परत आला. त्यानें लौकरच लग्न केलें. येथून पुढे त्याची वृत्ति चांगली निवळली. आपण बहकत चाललों होतों हें त्याच्या ध्यानीं आलें. आतां त्यानें संसारांत चांगलें मन घातलें. तो टापटिपीनें राहू लागला; त्याच्या बुद्धींत धर्मप्रवणता उत्पन्न झाली, तो आसपासच्या लोकांच्या फार उपयोगी पडूं लागला व अशा रीतीनें थोडा नांवलौकिक संपादून सुखाने कालक्रमण करूं लागला. दरम्यान त्याच्या या सुखवस्तु वृत्तीस अचानक निराळें वळण मिळेल अशा प्रकारें देशांतील राजकारण फिरत चाललेलें होतें.
 राजा जें राज्य करितो तें तो देवाच्या मर्जीनें करतो, तें त्याला देवानें दिलें आहे, जीं कांहीं बरींवाईट कृत्यें त्याच्या हातून होतील त्याबद्दलचा जाब त्याला विचारण्याचा एका परमेश्वराशिवाय कोणासही अधिकार नाहीं, हें तत्त्व अजूनसुद्धां जगांत कोठें कोठें घुटमळत राहिलेलें सांपडतें. दोनतीनशे वर्षांपूर्वी तर सर्वच देशांत या तत्त्वाचा अंमल जारी होता. आम्ही देवाचे प्रेषित आहों हें परमार्थानें खरे मानणारे राजे जर परवांपर्यंत राज्य करीत होते आणि जर त्यांच्या प्रजा त्यांची ही वचनें खुशीनें ऐकून घेत होत्या तर दोनतीनशे वर्षांपूर्वी राजा आणि प्रजा या सर्वांनाच प्रस्तुत तत्त्वाचा अंमल चालविणें आणि चालवून घेणें हें अगदीं योग्य आहे असें वाटणें केवळ साहजिक होतें. कॉम्वेलच्या आधीं थोडीं वर्षे या तत्त्वाच्या उच्छेदास प्रारंभ झाला होता. पण भावी काळांत हास्यास्पदतसे प्राप्त झालेल्या या तत्त्वाचा संभावितपणा अजूनपर्यंत सर्वमान्यच होता. राजांना वाटे आम्ही प्रजांचें काय लागतों! आणि प्रजांना वाटे कीं, राजा आपल्याकडून पैका उकळतो यांत तो तरी गैर काय करतो? परंतु परमेश्वराच्या इच्छेचे अर्थ आपल्याला हवे आहेत तसे बदलण्याची इच्छा इंग्लंडांत प्रादुर्भूत झाली होती व तेथील लोकांच्या पुढे असा प्रश्न उभा होता कीं, मोकाट सुटलेल्या गुराप्रमाणें राजाला राज्य करूं द्यावयाचें का या त्याच्या प्रवृत्तीस पायबंद घालण्याचा प्रजांना कांहीं अधिकार आहे? हें भांडण उत्पन्न होऊन कित्येक वर्षेपर्यंत इंग्रज लोकांच्या जीवितांत चरत चाललें होतें. आपल्या श्रमाने आपण पैसा उत्पन्न करावा आणि 'राजा' नांव पावलेल्या कोणा बेजबाबदार व्यक्तीनें त्याची वाटेल तशी उधळपट्टी करावी हा विचार मानी इंग्रज लोकांना असह्य होऊं लागला. बरें, आपण कोण आहों याचें ज्ञान राजे लोकांना नव्हतें असें मुळींच नाहीं; पण आशीर्वाद देणारा भिक्षुक आणि दक्षिणा देणारा यजमान यांना आपापल्या नैतिक अधिकारांची जाणीव असूनसुद्धां ते जसे एका स्वाभाविक परमार्थसूत्राच्या धोरणाने वागत राहातात तसेंच हें राजांचें व प्रजांचें वागणें चालू होतें. हा परस्परांच्या हक्कांचा झगडा चालू होतांच उभयपक्ष आपल्या पदरी असलेल्या साधनांचा या झगड्यांत यथास्थित उपयोग करूं लागले. या झगड्यामुळे प्रजांचे हक्क जरी दिवसेंदिवस जास्त प्रस्थापित होऊ लागले तरी त्याची गति फारच मंद होती. याच्याच जोडीला दुसरें एक भांडण येऊन मिळालें.
 रोमन कॅथॉलिक पंथाचा पाडाव इंग्लंडांत आगाऊच झाला होता; तरीपण तो पंथ पुनः पुन्हा आपले डोके वर करी. खुद्द चार्लस राजा या पंथाचाच कडवा अभिमानी असे. लोकांतही अनेक पंथ पसरले होते. त्यांत प्यूरिटन लोकांचें बंड फार मोठें होतें. इंग्रजी इतिहासाच्या सामान्य वाचकालासुद्धां प्रॉटेस्टंट लोक म्हणजे कोण हें माहीत आहे. त्या प्रॉटेस्टंट पंथांतील जे अगदी कडवे ते हे प्यूरिटन लोक होत. क्रॉम्वेलही प्यूरिटनच होता. राजा रोमन कॅथॉलिक व आपल्याला राज्य करण्याची सनद देवानें दिली आहे असें मानणारा आणि प्रजेपैकी लक्षावधी लोक जुना रोमन कॅथॉलिक पंथ झुगारून देऊन निरनिराळीं नवीं मतें पत्करलेले व जसे राजाला तसें प्रजांनाही कांहीं स्वतंत्र हक्क आहेत हे तत्त्व घेऊन उठलेले; यामुळे राजकारण आणि धर्ममतें यांचा संकर झाला. जे राजकारणाच्या ओढीनें राजाशी भांडावयास उठले त्यांना पोटांतून रोमन कॅथॉलिक पंथाची आवड असली तरी राजकारणासाठी त्यांना नवमतवादी लोकांशी एक व्हावे लागे. या मतामतांच्या संकरामुळे स्पष्ट आणि आखीव असे पक्ष देशांत उत्पन्नच होईनात. कोणाशी थोडेसें जमावें तो एकदम मतभेद उत्पन्न होऊन त्या पक्षाच्या चिरफळ्या व्हाव्या, असें सारखें चालू होतें. राजाही आपलें स्थान कायम टिकविण्याच्या कामी खूप खटपट करून राहिला होता. पण हट्टामुळें म्हणा, कीं त्याच्या अंगीं पुरेंसें चातुर्य नव्हतें म्हणून म्हणा, त्याचें सिंहासन डळमळू लागलें. कोठेही मोठी रक्कम खर्चावयाची झाली तर पार्लमेंटकडून पैशाची मंजुरी मिळाल्याशिवाय त्याला खर्च करतां येत नसे. यामुळे लोकप्रतिनिधींची याचना करणें हें त्याला भागच पडे. बरें, पार्लमेंट बोलवावें व पैशाची मागणी करावी तर प्रतिनिधि म्हणत कीं, तुम्ही गेल्या कांहीं दिवसांत जीं कांहीं अपकृत्यें केलीं असतील तीं जर दुरुस्त करीत असाल तर आम्ही पैशाची मंजुरी देऊ. राजाला हेंही अवमानाचे वाटे म्हणून तो पार्लमेंटसभा पुनः पुन्हा बरखास्त करी. त्याला फूस देण्याच्या कामी प्युरिटन लोकांचा वैरी जो आर्चबिशप लॉड तो फार मेहनत घेई. राजाचें राजकीय भांडण राजानें लढावेंच; पण धर्मविषयक बाबतींत त्यानें आपल्या तंत्रानें वागावें व प्युरिटन मतपंथाचा उच्छेद करावा असा त्याचा यत्न अहर्निश चालू होता. या लडथडी सुमारें १०।१२ वर्षे चालू होत्या. एवढ्या मुदतींत तिकडे क्रॉम्वेल हा आपल्या बाजूच्या मुलुखांत चांगली प्रसिद्धि पावला होता व लोकांच्या विश्वासास पात्र बनून, या वरचेवर बरखास्त होणाऱ्या पार्लमेंटांत त्यानें आपला प्रवेशही करून घेतला होता.
 हंटिंग्डन हें त्याच्या उत्पन्नाचें गांव. पण तेथें त्यास चैन पडेना; कां कीं, तेथील लोक फारच राजनिष्ठ होते आणि वर नांव आलेला त्याचा चुलता सर ऑलिव्हर क्रॉम्वेल हाही उठल्याबसल्या राजाशिवाय कसल्याच गोष्टी बोलत नसे. म्हणून त्यानें हें उत्पन्न विकून टाकून सेंटईव्हज् येथे मळेतळे खरेदी केले. परंतु तेथील कामाची त्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे सगळा धंदा आंतबट्टयाचा होऊं लागला व त्याची थोडी कुचंबणाच झाली. दरम्यान त्याचा मामा मृत्यु पावला व त्याची सर्व इस्टेट क्रॉम्वेलला मिळाली. अर्थात् सेंटईव्हज् हें ठिकाण सोडून देऊन ईलाय येथे कायमचें ठाणें करून तो राहूं लागला. हें उत्पन्न फार मोठे असून तेथील कुळाडाळांची संख्याही फार मोठी होती. या उत्पन्नाचा जो मालक असेल तो भोंवतालच्या शेतकऱ्यांचा आपोआपच पुढारी बनावयाचा असें ठरलेलें होतें. त्याप्रमाणें क्रॉम्वेलकडे भोंवतालच्या गांवांचें पुढारीपण आलें. इतक्यांत तेथील आसपासची एक मोठी दलदल नाले काढून कोरडी करण्याचे व अशा रीतीनें लागवडीला नवी जमीन पैदा करण्याचें काम एका कंपनीला सरकारांतून मिळालें. आपल्या शेजारची दलदल जाणार हें ऐकून भोवतालच्या खेडेगांवांतील लोक अगदीं रागावून गेले. ते म्हणाले, गुरें चारावयास व लागेल त्या वेळीं मासोळी धरावयास आम्हांला या जागेचा उपयोग अतिशय होतो. सरकारने ही जमीन कां घ्यावी?
 क्रॉम्वेलनें त्यांचा पक्ष उचलला. वास्तविक पाहतां ही जमीन कोरडी होऊन जर शेतकामाला मिळाली असती तर गांवकऱ्यांचे सुद्धां बरेंच झालें असतें; पण आपल्या कुळांचा कल पाहून क्रॉम्वेलने खूप जोराचा वाद चालविला; इतका कीं, कामे सुरू करावयास आलेल्या कंपनीला आपला गाशा लवकरच गुंडाळावा लागला. क्रॉम्वेलने मिळविलेल्या विजय- परंपरेतील हा पहिला विजय होय. त्याची चोहोंकडे मोठी वाहवा झाली व लोकपक्षाचा पुढारी म्हणून त्याची लोकांमध्ये प्रतिष्ठा वाढली.
 पण या वेळेपर्यंतसुद्धां त्याच्या मनांत धार्मिक मतांची खळबळ सारखी चालत असे. खुद्द राजाचें व आर्चबिशप लॉड याचें प्रतिगामी धोरण पाहून, व आपल्या मनाप्रमाणे आपल्याला धर्माचार करतां येत नाहीं हें पाहून त्याने देशत्याग करावयाचें ठरविलें. मोठमोठाले उत्पन्नदार व श्रीमंत असे प्युरिटन लोक परदेशीं जाण्यास सिद्ध झाले. जहाजें ठरली; बांधाबांध झाली व देशत्यागामुळे येणारी उद्विग्नता त्यांच्या घरांत पसरली. इतक्यांत चार्लस राजाला ही वर्दी लागली. एवढे मातबर लोक आपल्या जिंदगीसह देशांतर करणार ही गोष्ट त्याला मानवेना. त्याने जहाजांना दिलेले परवाने काढून घेतले! अर्थात् क्रॉम्वेल इत्यादिकांचे सर्व बेत जागच्याजागीं जिरले व पुन्हा ईलाय गांवीं येऊन तो घरचें काम पाहूं लागला. पण या अपयशामुळें व तेंही धार्मिक मतभेदामुळें आलें असल्यामुळें तो अगदीं चिडून गेला. वर सांगितलेंच आहे कीं, आसपासच्या लोकांनीं त्याला पार्लमेंट सभेमध्ये निवडून दिलं होतें. अर्थात् तेथें गेल्यावर धार्मिक अवमानानें चिडलेल्या या खेडेगांवच्या बड्या इनामदारानें तेथें राजाच्या राजकीय मागण्यांचा कितीसा पुरस्कार केला असेल हें ओळखतां येण्यासारखे आहे.
 चार्लस राजानें जशा इंग्रज लोकांबरोबर तशा तिकडे स्कॉटिश लोकांबरोबरही कटकटी चालू केल्या; राजाला फौजा सिद्ध कराव्या लागल्या; पैसा उभा करण्याची जरुरी त्याला जास्त भासू लागली. पार्लमेंटचे व त्याचे अगदीच जमेना. शेवटीं राजाच्या मनानें घेतलें कीं, या पार्लमेंटचीं हाडें मोडल्याशिवाय आतां आपल्याला तरणोपाय नाहीं. म्हणून नॉटिंगहॅम येथें त्यानें पार्लमेंटविरुद्ध उघडपणें युद्ध पुकारलें. इकडे पार्लमेंटनेंही तयारी चालविली व अर्ल ऑफ इसेक्स यास आपला सेनापति नेमिलें. क्रॉम्वेल मोठ्या इर्षेनें या युद्धांत सामील झाला. तो म्हणाला, माणसाला माणूस म्हणून जे कांहीं हक्क असावयासच हवेत व ख्रिस्ती माणसाला ख्रिस्ती म्हणून जे कांहीं हक्क असावयास हवेत ते मिळविण्यासाठीं मी युद्धांत दाखल होत आहे. क्रॉम्वेलच्या घरांत मोठी फाटाफूट झाली. चुलता व चुलतभाऊ हे राजाच्या अंगास मिळाले व क्रॉम्वेल पार्लमेंटची बाजू घेऊन उठला. एकदां कामांत पडल्यावर मग त्यानें मागें पाहिलें नाहीं. फौज उभारण्यासाठीं त्यानें ५०० पौंडाची पहिली वर्गणी दिली. मग तो तडक केंब्रिज येथें गेला व दोन लाख रुपये किंमतीचें राजाचें सोनेनाणें त्यानें जप्त केलें. एवढ्या बळावर त्यानें घोडेस्वारांची तुकडी तयार केली व या सुरू झालेल्या झगड्यांतील पहिली जी 'एज हिल' येथील लढाई तीत त्यानें मोठा पराक्रम गाजविला. कांहीं नवीन करावें, व तें फलदायी व्हावें तेव्हां माणसाचें नांव होतें. आजपर्यंत इंग्लंडांत लढाया झाल्याच होत्या; पण हाती असलेल्या फौजेंतील कांहीं तुकड्या वगळून ठेवून, शत्रूची व आपली हातघाई सुरू होऊन बरोबरी होत आहे असें दिसलें कीं, ही शिलकी ठेविलेली फौज शत्रूवर आणून आदळावी हे कुणाच्या मनांत फारसें आलें नव्हतें व अमलांत तर कुणीच आणलें नव्हतें. पण या 'एज-हिल'च्या लढाईंत, कोणी न शिकवितांच क्रॉम्वेलने हें करून दाखविलें. यांत आणखी एक नवी बाब दिसली. जी फौज शिलकी ठेवावयाची, तिला फार शिस्त लावलेली असावयास हवी; अमुक वेळ थांबा म्हटलें तर तिनें थांबलें पाहिजे. अमुक वेळी चाल करा असें म्हटलें तर त्याच वेळीं तिनें चाल केली पाहिजे; घाई करता उपयोगाची नाहीं. हे सर्व वळण क्रॉम्वेलने आपल्या लहानशा फौजेस दिलेलें होतें. म्हणून क्रॉम्वेल यांस हटकून यश प्राप्त झालें. घोडदळाची जरूर किती असते हेंही या प्रसंगीं त्यानें सर्वांस दाखवून दिलें. त्यावेळेस पायदळाचें काम थोडे अवघड असे. उडवावयाची बंदूक ही बाभळीच्या चोपण्याप्रमाणें अतिशय जड असे; तिच्यांत दारू ठांसावयास फार वेळ लागे आणि शिलगावल्यापासून गोळी उडावयासही त्याच्याहून जास्त वेळ लागे. हा सर्व व्यापार स्वस्थपणे व्हावयाचा तर दोन्ही बगलांकडे घोडदळाचें संरक्षण जरूर होतें. हें या घोडदळाचें महत्त्व क्रॉम्वेलनें लढाऊ लोकांच्या ध्यानांत आणून दिलें. क्रॉम्वेलचा नातेवाईक जो इतिहास- प्रसिद्ध हॅम्पडन त्यास त्यानें एकदां लिहिलें, "तुमची फौज म्हणजे सगळीं मोडावलेलीं बुद्रुकें, खानावळींतील वाढपी आणि खटपट्ये असल्या लोकांची बनलेली आहे. तेंच राजाच्या फौजांकडे पाहा; त्याचे शिपाई मोठे मानी, निश्चयी आणि धैर्यवान् असे दिसतात. अशा लोकांच्या पुढे आपल्या या भिकारटाकार लोकांचें भरताड काय करणार?" पार्लमेंटच्या पक्षास खानदानीचे आणि कुलीन असे लोक फारसे कोणी येऊन मिळेनात; ते सर्व राजाच्या फौजांत येऊन दाखल होत. पण कोणत्या तरी अभिमानाचीं माणसें पदरीं असल्याशिवाय लढण्याचें काम नीट व्हावयाचें नाहीं म्हणून त्यानें राजाच्या विरुद्ध असलेला जो धार्मिक मतपंथ त्या पंथांतील माणसें आपल्या पलटणींत भरलीं; अशासाठीं कीं, त्यांनी कोणत्या तरी एका आवेशानें लढावें. यावरून ध्यानांत आलें असेल कीं, युद्धाच्या अगदीं पहिल्या तोंडालासुद्धां, पूर्वीचा कसलाही अनुभव नसतां क्रॉम्वेल यानें चांगल्या मुरलेल्या सेनापतीसारख्या कांहीं कांहीं गोष्टी केल्या.
 पुढील वर्षी राजाच्या बाजूचें पारडें जरा जड झालें; व याचें कारण अगदीं उघड होतें. सामान्य लोकांत सुद्धां वागणारी राजाविषयींची पूज्यबुद्धि, मोठमोठाल्या अमीरउमरावांचे पाठबळ, आणि द्रव्यबळ यांचा पाठपुरावा चार्लस यांस चांगला होत असल्यामुळे फौज उभारणें आणि ती चालविणें त्याला फारसें जड जात नसे. पण पार्लमेंटची गोष्ट तशी नव्हती. कांहीं बळकट अशी संघटना करून ठेवल्याशिवाय व शिपाई लोकांचा पगार थकूं न देण्याची तजवीज केल्याशिवाय आपला गाडा नीट चालावयाचा नाहीं हें क्रॉम्वेल यानें ओळखलें होतें. म्हणून नॉर्फोक, सफोक, इसेक्स, केंब्रिज इत्यादि पूर्वेकडील परगण्यांचा त्याने एक मोठा बळकट संघ तयार केला व सगळ्यांनी मिळून आपल्या फौजांचा खर्च सोसावयाचा असें ठरविलें. पगाराची व्यवस्था अशा रीतीनें होतांच फौजेंत दाखल करावयाची माणसे मात्र प्युरिटन पंथाचींच घ्यावीं असें त्यानें निश्चित ठरवून टाकलें. यामुळें असें झालें कीं, शिपायाशिपायांत कांहीं एक प्रकारचें नातें उत्पन्न झालें व पगार महिन्याच्या महिन्यास मिळाल्यामुळे त्यांना प्रपंचाची काळजी मुळींच उरली नाहीं. वास्तविक पाहतां समान कल्पनांचे लोक एकत्र आणणें आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणें या कल्पना म्हणजे न सुचण्यासारख्या होत्या असें मुळींच नव्हतें. घरी बसल्या त्या अनेक लोकांना तेव्हां सुद्धां सुचल्या असतील. पण मनांत आल्याबरोबर, कामास लागून त्या अंमलांत आणून दाखवणें, एका क्रॉम्वेलवांचून तेव्हां इतर कोणाच्यानें झालें नाहीं. तसेंच वर उल्लेखिलेलें जें शिस्तीचें कलम तेंही त्यास फार उपयोगी पडलें. लोकांना जें नवें दिसून आलें तें हें कीं, राजाच्या फौजा जोराने चाल करून जात, शत्रूंची फळी फोडीत व विजय मिळवीत; पण हें झाल्यावर त्यांची अगदीं पांगापांग होऊन जात असे व त्याच दिवशीं दुसरा हल्ला करावयाचें त्यांच्या सेनापतीने ठरविल्यास तें अगदीं अशक्य होई. कारण शिपायी लोकांचा पुन्हा जथ पडावयास फार वेळ लागे. पण क्रॉम्वेलनें मात्र शिपायांस अशी शिस्त लाविली होती कीं, शत्रूवर विजय मिळवून त्यांचा पाठलाग करीत ते कितीही दूर गेले असले तरी पुन्हा परत वळून पहिल्याप्रमाणे सेनापतीच्या हाताखालीं त्यांचा जथ हटकून पडे व पुन्हा हल्ला करावयाचा असला तरीही ते तयारी दाखवीत.
 विन्सबी गांवीं क्रॉम्वेल याने राजाच्या सेनापतीचा लवकरच फार मोठा पराभव केला. यामुळे पार्लमेंटनें त्यास शाबासकी दिली व त्याच्या नांवाचा मोठा दरारा उत्पन्न झाला. पुढें लवकरच मार्स्टनमूर येथें मोठें घनचक्कर युद्ध झालें. चारहजार फौजेनिशीं तो राजाचा सेनापति रूपर्ट यांजवर जाऊन पडला व त्याच्या फौजा पराभूत करून पिटाळून दिल्यानंतर त्यानें आपली फौज पुन्हा मागें आंवळून घेतली व मोहरा फिरवून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका यशस्वी फौजेवर त्यानें पुन्हा हल्ला केला व फार मोठे यश मिळविलें. या लढाईंत त्याच्या फौजेला 'लोखंडी फौज' असें नांव मिळालें. कारण तिच्यावर शत्रूंनीं कितीही धडका दिल्या तरी ती भंगेना. आपल्या स्वतःच्या यशासंबंधानें क्रॉम्वेलनें जें लिहिलें आहे त्यावरून त्याच्या मनाची धार्मिक ठेवण ध्यानांत येते. तो लिहितो, "देवानें फार मोठे यश दिलें; युद्ध सुरू झाल्यापासून असें यश कोणाला लाभलें नव्हतें; तें आम्हांस मिळालें; कारण आम्ही परमेश्वराचे भक्त आहों; आम्ही चढाई केली आणि जय मिळाला नाहीं असें झालेच नाहीं; अहो, आमच्या तरवारीपुढें ते जोंधळ्याच्या ताटासारखे तटातट तुटत असत; हें सर्व परमेश्वराचें देणें आहे." दरम्यान मुख्य सेनापतीशीं त्याची हुजत चालू झाली. हा गृहस्थ क्रॉम्वेलइतका शूर नव्हताच पण शिवाय क्रॉम्वेलच्या धर्ममताचें त्याला भारीच वावडें असे. तरी पण राष्ट्राच्या कल्याणाकडे लक्ष देऊन क्रॉम्वेलने हें भांडण विकोपास जाऊं दिलें नाहीं. इ० सन १६४५ सालीं नेस्वी येथे फार मोठा संग्राम झाला. मार्स्टनमूर येथे त्यानें ज्या हिकमती योजल्या त्याच येथेही योजल्या. राजाचा पूर्ण पराभव झाला व त्यानें अगदीं हातपाय गाळले. याचा अर्थ असा झाला कीं, ही यादवी संपून इंग्लंड देशाची भावी राज्यव्यवस्था कशी करावी याचा विचार क्रॉम्वेलपुढे येऊन पडला.
 चार्लस मोठा शिपाईगडी नव्हताच; पण आत्मसंरक्षणाच्या बुद्धीनें कोणालाही सुचणारें कुत्सित शहाणपण मात्र त्याच्या अंगीं बरेंच होतें. आतां पुढें नेमके काय व्हावयाचे याची कोणासच कल्पना होईना. तरी पार्लमेंटच्या पक्षांत कांहीं भांडणे लावून देण्याची खटपट राजानें चालू केली. शिपाई लोकही आतां कंटाळून गेले होते. प्युरिटन पंथांतच आणखी जे कांहीं पोटपंथ होते त्यांतील एक शिरजोर झाला व त्याने मताधिक्याच्या बळावर क्रॉम्वेलचें उच्चाटन करण्याचें ठरविलें. तसेंच फौजांनाही रजा देण्याची युक्ति या मंडळींनी काढली. पण त्यांच्या पगाराची बाकी थकलेली होती त्यामुळे मुख्य सेनापतीसाहेबांनी निरोप दिला तरी ते जागचे हलेचनात. क्रॉम्वेलनें यांतील मर्म ओळखले. त्याचें शौर्य शिपायांनी पाहिले होते व त्याजवर त्यांची निष्ठा बसली होती. क्रॉम्वेल यानें ही फौज झट्कन् आपल्या हातीं घेतली. याचा अर्थ असा झाला कीं, क्रॉम्वेल व त्याची फौज आतां जें काय करील तें व्हावयाचें.
 पण कोणी कोणी असें म्हणतात कीं, चार्लससंबंधानें क्रॉम्वेलच्या मनांत कायमची अढी बसलेली होती. जर फौजेंत भरती करावयाची वेळ आली, तर राजाच्या विरुद्ध वाटेल तें करावयास सांगितलें असतां जे कोणी नाकारणार नाहीत, त्यांचींच नांवें तो दाखल करीत असे. क्रॉम्वेल हें एक पुढें मोठें डोईजड प्रकरण होऊन बसेल, हें मुख्य धर्मगुरु जो वुइल्यम्स यानें मागेंच ओळखलें होतें. त्याचा राजाला असा सारखा आग्रह चालू असे, की या माणसाला एकादें मोठें अवदान चारून कायमचा आपलासा करून ठेवा, किंवा मारेकरी घालून कायमचा नाहींसा तरी करून टाका. पण हें त्याचें बोलणें, राजा केवळ हंसण्यावारी नेई. पण पुढें पुढें जेव्हां क्रॉम्वेल हा त्याचा जबरदस्त प्रतिपक्षी बनला, तेव्हां वुइल्यम्सच्या जुन्या इशारतीची त्याला पुनःपुन्हा आठवण होऊं लागली.
 चार्लस राजा महत्त्वाकांक्षी असला तरी, ती महत्त्वाकांक्षा सफल व्हावयास जे गुण लागतात, ते त्याच्या अंगीं नव्हते. उलट तो मोठा संशयी, दगलबाज व कारस्थानी असून अमुक एक गोष्ट हटकून करावी की न करावी हें त्याचें ठरतच नसे; त्यामुळे त्याला विश्वासू मित्रसुद्धां फारसे लाभले नाहींत. क्रॉम्वेलच्या बाबतींत पुढे पुढें त्याची सारखी कुरकूर चाललेली असे; पण त्याचा निश्चय म्हणून होईना. त्यानें राणीस लिहिलेल्या पत्रांत क्रॉम्वेलविरुद्ध पुष्कळ लिहिलेलें आहे. पण लिहिण्याच्या पलीकडे त्याच्यानें जाववलें नाहीं. इकडे, राजवाड्यांत आपल्याविरुद्ध चाललेल्या हालचालीवर क्रॉम्वेल याची सारखी पाळत होती. त्या हालचालींचें धोरण पाहून त्याचें मन राजाविरुद्ध अगदीं भडकून गेलें व प्रसंग येतांच या राजाला फांशीं देण्याचें आज्ञापत्र काढण्यास तो मुळींच कचरला नाहीं. असो.
 विचाराच्या एका प्रणालींतून दुसरींत पोहोंचेपर्यंत जी कांहीं बजबज माजावयाची ती सर्व या प्रसंगी माजली. नुसत्या कल्पना काढणारे, असें कां व्हावें, तसेंच कां होऊं नये असें म्हणणारे, व कायदाकानू इत्यादिकांचीं ज्ञानें सांगणारे अनेक लोक होते. पण एक घटना ढासळत चालल्यामुळे लोकांना तत्त्वांपेक्षां माणसाचा आधार जास्त चांगला वाटूं लागला. आणि या प्रसंगीं तो माणूस म्हणजे ऑलिव्हर क्रॉम्वेल हा होता. बरीच भवतीनभवती झाल्यावर क्रॉम्वेलच्या अगदीं निभ्रांतपणें ध्यानांत आलें कीं, चार्लस हा अगदीं कुचकामाचा माणूस आहे; कोणतीही नवी घडी बसविली तरी त्यांत हा कांहीं जमून बसावयाचा नाहीं. वास्तविक पाहतां खुद्द त्याला व बहुजन- समाजाला जे हवें होतें तें इतकेंच कीं, राजा असावा पण कर बसविणें आणि न्याय देणें या बाबतींत पार्लमेंटची हुकमत त्यानें पाळली पाहिजे, पण चार्लस हें पत्करील असें दिसेना. बरें, सवाईसोट फौजेच्या हातीं देशाचा कारभार सोपवावा हेंही बरोबर नव्हतें. पुन्हा यादवी माजली, पार्लमेंट सभेंतून राजाचे उरलेसुरले पक्षपाती होते त्यांची तेथून हकालपट्टी झाली. खुद्द चार्लस यांस कैद करून न्यायाधिशापुढे उभे करण्यांत आलें. लवकरच तो फांशीं गेला. या घडामोडी फार प्रचंड स्वरूपाच्या होत्या. जाऊं द्या, आपल्याला काय करावयाचें आहे, असें धरसोडीचें बोलणें पुढारी जर आयत्या वेळीं बोलूं लागले असते तर देशांत याहीपेक्षां कल्लोळ माजला असता; पण क्रॉम्वेलने डोके शांत ठेवलें होतें. राजाशीं मिटतें घेण्याचा यत्न करूनही तें जमेना व म्हणून ओघाओघानेंच गोष्टी या थराला आल्या आहेत, तेव्हां त्याचें वाईट वाटू देतां उपयोगाचें नाहीं, हें त्यानें पक्के ठरवून टाकलें होतें असें दिसतें. वर सांगितल्याप्रमाणें राजाची वासलात लागल्यानंतर पार्लमेंट-संस्था सर्वस्वी क्रॉम्वेलच्या हातीं गेली व तेंच बरें झालें. कारण त्याच्या फौजेच्या साहाय्यावांचून या पार्लमेंटचें कोणीही ऐकलें नसतें.
 खुद्द इंग्लंडांत आपलें कांहीं चालत नाहीं असें पाहून राजपक्षीय लोकांनीं, आयर्लंड व स्कॉटलंड इकडे धामधूम चालू केली. या वेळीं क्रॉम्वेल हा केवढा जबरदस्त असामी आहे आणि तो म्हणेल त्याच्यापुढें मान लववणें कसें जरूर आहे हें सर्वांच्या ध्यानांत आलें. आपण केलेल्या कामाचा नाश करण्यासाठींच ही बंडाळी उपस्थित झाली आहे असें हेरून तो मोठ्या त्वरेनें आयर्लंडमध्ये दाखल झाला आणि ड्रोघेडा व वेक्सफोर्ड येथें त्यानें या बंडखोरांवर इतकें निष्ठुरपणे हत्यार चालविलें कीं, त्या प्रसंगाच्या स्मरणानें सुद्धां पुढे कित्येक वर्षे माणसें भयभीत होत होती. स्कॉटलंडचेंही असेंच झालें. एक चार्लस गेला तर तेथें कांहीं लोकांनीं दुसऱ्या चार्लसच्या नांवानें द्वाही फिरविली. पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असा प्रकार येणार हे ओळखून क्रॉम्वेल स्कॉटलंड देशांत उतरला आणि डन्बार्क व वूस्टर येथें त्यानें बंडखोरांची अशी लांडगेतोड केली कीं, त्यांनीं पुन्हा माना काय वर कराव्या! वूस्टर येथें मिळविलेल्या यशासंबंधानें क्रॉम्वेल म्हणाला, "परमेश्वरी कृपेचें माप एवढे मोठें आहे कीं, माझ्या मनांत तें मावत नाहीं; खरोखर येथे अगदीं कळस झाला;" आणि हें अगदीं खरें आहे. कारण यानंतर पुन्हा त्याला तरवारीस हात म्हणून घालावा लागला नाहीं.
 छें यश मिळविल्यानंतरही आपापसांतील कटकटी चालू होत्याच. नानाप्रकारच्या कल्पना, ध्येयें, योजना, संघटना सुचविल्या जात. शेवटीं पार्लमेंटच्या कांहीं तडफदार मेंबरांनीं बाकीच्यांना गप्प बसवून सर्व सत्ता क्रॉम्वेलच्या हवाली केली. 'राजशासन' लिहून काढलें व त्याच्या बळावर कॉम्वेल 'लॉर्ड प्रोटेक्टर' हें नांव देऊन त्यांनीं त्यास बहुतेक सर्व सत्ता दिली. नवे कायदे करणें व नवे कर बसविणें या कामी मात्र त्यानें पार्लमेंटसभेस विचारावें असें ठरविण्यांत आलें. हातीं आलेल्या सत्तेचा क्रॉम्वेलनें फार चांगला वापर केला. ही जी नवीन घटना बनली आहे तिला सर्व जनतेची संमति आहे असें नव्हे व म्हणून फौजेच्या बळावरच हा सर्व गाडा सुरळीत चालणार हे ओळखून, त्यानें सर्व कामें मोठ्या धूर्तपणानें चालू ठेविली. वरचें 'राजशासन' सर्व पार्लमेंटनें मान्य केलें होतें असेंही नाहीं; तरी पण लोकांना आतां कांहीं स्थिरस्थावर व्हावयास हवीच होती व म्हणून अधिकाराच्या सनदशीरपणाचा फाजील हट्ट त्यांनी धरला नाहीं. तिकडे क्रॉम्वेलनें आणखी एक युक्ति योजिली. देशांतील लोकांचें लक्ष दुसरीकडे कोठेतरी गुंतविलें पाहिजे हें त्यानें ओळखलें. म्हणून फारसें कारण नसतां त्यानें एकदां स्पेन देशाशीं व एकदां फ्रान्सशीं युद्धाचा पुकारा केला.
 सुदैवानें क्रॉम्वेलच्या आरमाराने स्पेनच्या आरमाराचा चांगलाच पराभव केला आणि त्यावरील सर्व चांदीचे पाट त्यानें लुटून इंग्लंडास आणिले. इकडे घरीं उरल्यासुरल्या पार्लमेंटशीं क्रॉम्वेल याचीं भांडणे चालूंच होतीं. त्यानें म्हणावें, "नवी स्वारी काढावयाची आहे, पैसा द्या." पार्लमेंटनें म्हणावें, "लोक आधींच गांजले आहेत, पैसा द्या कुठला?" पण इतक्यांत ही लुटून आणलेली चांदी अडतीस गाड्यांवर भरून जेव्हां राजधानीच्या शहरांत वाजतगाजत आली तेव्हां विरोधकांचा विरोध अगदीं वितळला आणि राजकीय वातावरण त्याला सर्वथा अनुकूल असें होऊं लागलें; पण असें झालें तरी राज्यघटनेची एक घडी उसकटून टाकण्यांत त्याला यश आलें एवढेच काय तें खरें व फौजेच्या बळावर आपला अंमल जरी त्यानें सडकून चालविला होता तरी राज्यघटनेची नवीन घडी कोणती याचा जाब त्याचा त्यालाच देतां येण्यासारखा नव्हता. बरें, कांहीं नवीन कल्पावें व बळजबरीनें अमलांत आणावें तर आतां त्याला तें वयाच्या मानानें शक्य दिसेना.
 वयाची पहिलीं त्रेचाळीस वर्षे त्यानें संथ रोजगारांतच घालविलीं होतीं. जवळ जवळ पंचेचाळिशीला आल्यावर तो युद्धाच्या धामधुमीत सांपडला व पुढें तेराचवदा वर्षे अहोरात्र दगदग करावी लागल्यामुळे आपलें शरीर आपल्या हातीं राहात नाहीं असें त्यास दिसूं लागलें. तो कित्येकदां म्हणे, "माझी शेतवाडी सोडून या राजकारणाच्या जंजाळांत मी कशाला येऊन पडलों कोणास माहीत." या काळांत प्रपंचांत लक्ष घालावयाससुद्धां त्याला वेळ सांपडत नसे. आपण दिवसेंदिवस थकत चाललों हें त्याला दिसून आलें; त्यांतच त्याला उद्विग्नता आणणारी एक गोष्ट घडून आली. त्याला मुलेबाळें पुष्कळ होती; पण त्यांतील एका मुलीवर त्याचें निरतिशय प्रेम असे. तीच एकदम मृत्यु पावली. त्या दुःखानें क्रॉम्वेल झपाटयानें खचू लागला.
 क्रॉम्वेल यानें जो राजसत्तेचा उच्छेद केला त्यावरून इंग्लंड राष्ट्राला इतकेंच ज्ञान झालें कीं, देशांत लोकसत्तात्मक राज्य स्थापन व्हावयास हवें; निदान राजसत्ता इतकीं संकुचित व्हावयास हवी कीं, आपला कारभार आपणच पहात आहों ही जाणीव लोकांना प्राप्त व्हावी. हीच काय ती त्याची कामगिरी होय. त्यानें स्थापन केलेली घटना त्याच्याबरोबरच मरून गेली आणि त्यानें फांसावर चढविलेला राजा जरी पुन्हा परत आला नाहीं तरी राजसत्ता मात्र परत आलीच आली. इतकें खरें कीं, त्यानें दिलेल्या या तडाख्याचा वण राजसत्तेच्या अंगावर कायमचा राहिला. राजसत्ता परत आली इतकेंच नव्हे तर क्रॉम्वेलनें जें कांहीं घडवून आणलें होतें त्यामुळे चिडून गेलेले कांहीं कांहीं लोक पुन्हा अधिकाराच्या जागीं येतांच, तो जिवंत नव्हता म्हणून, त्यांनीं त्याच्या प्रेतावरच सूड उगविला. ज्या तारखेस त्यानें चार्लस राजास वधस्तंभाकडे धाडिलें होतें ती तारीख येतांच त्यांनीं वेस्टमिन्स्टर ॲबे येथे पुरलेलें त्याचें प्रेत उकरून काढिलें व गाड्यावर घालून तें टायबर्न येथें नेलें. पुढें संध्याकाळपर्यंत त्यांनीं तें शव तसेंच वधस्तंभावर लोंबत ठेविलें व शेवटीं त्याचा शिरच्छेद केला. धड वधस्तंभाच्या खाली एका खबदाडांत खुपसून ठेविलें आणि शीर एका कळकाच्या टोकाला बांधून त्यांनीं तो वेस्टमिन्स्टर ॲबेच्या कौलाघरावर उभा करून ठेवला. अशा रीतीनें ही फिटासफीट झाली. ही रागलोभाची देवघेव कशीही झाली असली तरी क्रॉम्वेलनें केलेल्या क्रान्तिविषयक कामगिरीचें महत्त्व तिनें कमी होत नाहीं. असो.
 क्रॉम्वेल हा शरीरानें भला घट्टाकट्टा असून वागणुकींत साधारणतः गांवढ्यासारखाच असे. शहरांतील राहणीनें आणि मोठमोठ्या लोकांच्या संगतीत वागल्यानें जरी त्यास थोडें मार्दव आलें होतें तरी एकंदरीनें तो शेवटपर्यंत थोडासा असंस्कृतच दिसे. वर वर्णिलेल्या राजकारणाच्या घडामोडी चालू असतांच तो अतिशय आजारी पडला. त्याचे वैरी म्हणूं लागले; "या माणसाला सद्गति कधीही मिळावयाची नाहीं; याचा आत्मा सैतानाच्या तावडींत जाणार." परंतु खुद्द क्रॉम्वेल याचें नेहमींचे श्रद्धाळू मन, मरण नजीक येऊन ठेपल्यानंतर, अधिकच लीन झालें. आपण आज खास जाणार हें पाहून त्यानें उघडपणें म्हटलें कीं, "हे प्रभो, मी तर एक साधा पामर आहें. पण माझ्या द्वारां तूं या लोकांचें कल्याण केलेंस; माझ्या हस्ते आपली स्वतःची सेवा करून घेतलीस. पुष्कळ लोक म्हणतात, हा फार मोठा माणूस आहे; पण दुसरे कांहीं म्हणतात कीं, हा मेला तर बरें होईल. पण प्रभो, तूं माझी वासलात कशीही लावलीस तरी या माझ्या बांधवांचें बरेंच करीत रहा. त्यांनी परस्परांवर प्रेम करीत राहावें, त्यांनीं एकविचारें राहावें आणि त्यांची बुद्धि कधीं भ्रंश पावूं नये असेंच तूं कर. कोणाचा कसाही अपराध असो, तीं तुझींच लेकरें आहेत; हें जें मीं तुझें थोडेंसें स्तवन केलें आहे तें येशूच्याद्वारां तुला पावूं दे आणि तुझी मर्जी असेल तर आतां मला सुखाची कायमची झोंप लागूं दे." श्रद्धाळू ख्रिस्त्याला चांगले शोभतील अशा तऱ्हेने हे उद्गार काढल्यानंतर तीन दिवसांनीं ऑलिव्हर क्रॉम्वेल मृत्यु पावला. ही गोष्ट इ० सन १६५८ त घडली.