Jump to content

पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/पीटर दि ग्रेट

विकिस्रोत कडून




 पीटर दि ग्रेट

पीटर दि ग्रेट हा इ० सन १६७२ मेच्या ३० तारखेला जन्मला. रोमॅनोव् राजवंशांतील हा चवथा पुरुष होय. प्रत्यक्ष शककर्ता जरी नव्हे, तरी रशियन इतिहासांत एका नव्या काळाचा कर्ता व पौर्वात्य रशियाला पाश्चिमात्य रशिया बनविणारा असा हा मोठा जबरदस्त वीर होऊन गेला. याचा आजा मायकेल रोमॅनोव् हा इ० सन १६१३ त रशियाच्या गादीवर बसला. याच्या आधींच्या काळांत या भिन्नवंशीय लोकांच्या देशांत अनेक उत्पात होऊन गेले होते. अगोदर सध्यांच्या रशियाच्या उत्तरेचा बहुतेक सगळा भाग उजाडच होता. खरी वसति काय ती पश्चिम व दक्षिण या दिशांसच होती. तेथेंही स्लाव जातीचे लोक मुख्यतः असत आणि आहेत. हे स्लाव कोणाच्या मतें मोगल व कोणाच्या मतें इराणी असे आहेत. शक, मेद इत्यादि जातींचा उल्लेखहि त्यांच्यासंबंधीं लिहितांना केला जातो. कसेही असले तरी चरित्रनायकाचा राजवंश स्थापित व्हावयाच्या वेळीं स्लाव हेच तेथें मुख्य लोक होते. तेराव्या शतकापासून तों पंधराव्या- पर्यंत या लोकांवर मोगल लोकांचें मोठें करडें राज्य चालू होतें. पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटीं त्यांचा अंमल अगदीं बसला. कोठें कोठें कांहीं नाकीं शिल्लक राहिली, इतकेंच. मोगली अम्मल म्हणजे इतका जाचाचा झाला होता कीं, सोय नाहीं. सर्व देशभर या रानवटांच्या टोळ्या बेदरकार हिंडत राहात व पिकें, मेंढरें, गुरें हांकून नेऊन शेवटी माणसेंही मुस्क्या बांधून हे दक्षिणेकडे पिटाळीत नेत व क्रिमिया द्वीपकल्पांत एका प्रचंड गुलामांच्या बाजारांत त्यांची विक्री करीत असत. असें अडीच तीन शतके चाललें होतें. शेवटीं एकदां त्यांचें बळ कायमचें मोडलें. तेव्हांपासून इ० सन १६०० पर्यंतच्या सुमारें दोनशे वर्षांच्या इतिहासांत रशियाचा विस्तार बराच झाला; भयंकर ईव्हॅन्, बोरीस इत्यादि पराक्रमी राजे झाले; सायबेरियाचीं वैराण अरण्यें रशियाला जोडलीं गेलीं; पोलिश राजांच्या स्वाऱ्या रशियावर

आल्या; स्वीडनशीं कटकटी माजून तहनामे झाले; शेवटी घरगुती भांडणे विकोपास जाऊन सिंहासन मोकळें पडलें. या सिंहासनावर कोणास बसवावें याबद्दलची भवति न भवति होऊन रोमॅनोवू आडनांवाच्या सरदार घराण्यांतील मायकेल नांवाच्या सोळा वर्षांच्या मुलांस सिंहासनावर बसविण्याचें ठरलें. या सरदार घराण्याचा व पूर्वीच्या झारचा शरीरसंबंध झालेला होता. येवढ्या बळावर या घराण्यास राजवंशाचे वैभव प्राप्त झालें.
 या मायकेलनें इ० सन १६४५ पर्यंत राज्य केलें व पुढे त्याचा मुलगा आलेक्झी हा गादीवर बसला. हा राजा सुधारणाप्रिय होता. त्याने पहिली गोष्ट केली, ती ही कीं, त्यानें कायद्याचें कोड वाढविलें. त्याच्या अनेक कायद्यांपैकी एक असा होता, कीं जो कोणी चिलीम ओढील त्याचें नाक कापून टाकलें जाईल! चिलीम ओढणारे लोक नाकांतून धूर सोडतांना पाहून राजा फार चिडत असावा असें दिसतें. पण हा राजाचा चिडखोरपणा व हा निर्बंध चिरंजीवांनी अतिरेक करूनच घालविला. कारण पीटर हा अतिशय तमाखू ओढूं लागला! राजाला कामांची हौस फार असे, स्वतः तो स्वस्थ बसत नसे व दुसऱ्यास बसू देत नसे. वाड्यापुढें एक तक्रार अर्जाची पेटी ठेविलेली असे. अर्ज पाहून राजा रोजच्या रोज त्यांचा निकाल लावी. रात्रींच्या वेळीं तो प्रधानांच्या टेबलांचे खण उघडून पाही व कांहीं कामें शिल्लक राहिली असल्यास त्यांस जाब विचारी.
 शेजारच्या लोकांशी मिळतें घेऊन राज्य वाढविण्याचीही त्याची मोठी खटपट असे. पुढें रशियाच्या इतिहासांत शौर्याबद्दल नांवाजलेले जे कोसॅक स्वार त्यांचे पूर्वज जरी स्वतंत्र टोळ्या करूनच रहात असत, तरी पोलंडच्या राजानें आपणांस आपले म्हणावें अशी त्यांची फार खटपट असे. पण त्याला आपले हित कळेना. तो त्यांच्यावरच जबरदस्ती करूं लागला. शेवटी या लोकांनी आलेक्झीकडे आश्रय मागितला. त्यांचे धैर्यशौर्यादि गुण पाहून राजाने त्यांस आपल्या अमलाखालीं घेतलें. तेव्हांपासून रशियन फौज शौर्याच्या बाबतींत चांगलीच समृद्ध झाली. नीपर नदीच्या पलीकडीलपर्यंतचा प्रान्त व स्लाव लोकांचें सुप्रसिद्ध नगर कीव् हींहि त्यानें युक्तिप्रयुक्तीनें मिळविली.
 याच्याच राजवटींत ख्रिस्ती धर्मग्रंथाची म्हणजे बायबलाची उजळणी करण्यांत आली. निकन नांवाच्या आचार्यानें ही गोष्ट मनांत आणिली. कारण कीं, नकला करणारांच्या हातून साहजिकच होणाऱ्या चुका शतकानुशतक बायबलांत इतक्या सांचत आल्या होत्या कीं, मूळ शुद्ध पाठ कित्येक ठिकाणीं भलतेच होऊन बसले होते. वास्तविक असली संस्करणें हवींच असतात. पण निकननें हें काम सुरू करतांच लोकांचा विरोध सुरू झाला! लोकांना येवढे माहीत कीं, जुनें जपावें. निकन तरी जुनें खरें कोणतें तेंच सांगत होता, पण तें त्यांस पटेना. ग्रीक बायबलावरून शुद्ध भाषांतराच्या नकला त्यानें करविल्या व ठिकठिकाणच्या प्रार्थनामंदिरांतील जुनीं बाडें परत मागवून तेथें त्यानें हीं नवीं पुस्तकें धाडून दिली. पण एवढ्यावरून रशियन धार्मिकांत दोन पंथ झाले, एक जुनेवाले म्हणजे चुक्यावाले व दुसरे नवेवाले. या निकनला राजाचा मोठा पाठिंबा होता. याशिवाय राजाने राज्याची व राजधानीची शोभा वाढविण्यासाठीही पुष्कळ खटपटी केल्या. बाहेरच्या देशांतील एकादा शेलका माणूस कामापुरता नोकर म्हणून ठेवण्याचीहि त्याची तयारी असे. एकंदरीने आलेक्झी हा बऱ्यापैकीं राजा झाला. हा इ० सन १६४८ त वारला. याच्या पहिल्या राणीला फेओदर व इव्हॅन असे दोन मुलगे आणि सोफिया नांवाची मुलगी अशीं तीन अपत्यें होतीं व दुसरीला पीटर नांवाचा एकच मुलगा होता.
 आलेक्झीच्या मृत्यूनंतर फेओदर गादीवर बसला. पण त्यानें अवघें सहा-सात वर्षेच राज्य केलें. तो प्रकृतीने अगदीं दुबळा असून कर्तबगारहि नव्हता. त्याला मूलबाळहि कांहीं झालें नाहीं. पण कुळांत सुरू झालेली सुधारणाप्रियता त्याच्या दुबळ्या शरीरांतहि उतरली होती. ती त्याने एका बाबतींत चमत्कारिक रीतीनें जगास दाखविली. पूर्वी रशियन लोकांतील प्रतिष्ठित लोकांच्या वंशावळ्या दरबारांतच ठेवीत असत. मोठमोठाले अमीरउमराव, सरदार, दरकदार, इनामदार, कीं ज्यांच्या वाडवडिलांनी सरकारची बहुत सेवाचाकरी केली आहे, अशांचे वंशवेल दरबारांत असून प्रत्येक पिढीच्या कोणच्या पुरुषानें कोणचीं कामें केलीं याचीहि नोंद त्यांत असे. तेथपर्यंत सर्व ठीक झालें. पण पुढे पुढें असें होऊं लागलें कीं, ज्यांच्या शूर, बुद्धिवान पूर्वजांनीं सरकारचीं मोठमोठीं कामें केलीं असतील, ते स्वतः कितीहि नामर्द व मूर्ख असले तरी त्यांच्या पूर्वजास सरकारने सांगितलेल्या कामांहून कमी दर्जाचीं कामें करावयास ते नाखुषी दाखवूं लागले. ते म्हणत येवढ्या थोरांच्या वंशजांनी कमी दर्जाचीं कामें कशी करावीं? यामुळें नालायक व ऐदी प्रतिष्ठितांचा लोंबाळा दरबारामध्ये फारच माजला. ही एक अडचण झाली. दुसरी अशी कीं, एक चमत्कारिक पीठिका उत्पन्न होऊन बसली. कोणास किती पूर्वज मोजतां येतात यावर लायकी नालायकी ठरावी, असा आग्रह सुरू झाला. म्हणजे असें कीं, आपले दहा पूर्वज ओळीनें सांगतां येणाऱ्या एकाद्या जमाबंदी खात्यांतल्या नोकरानें सेवान्तवेतन घेतलें व त्याच्या जागीं नेमावयासाठीं जर राजानें दुसऱ्यास बोलाविलें तर तो नवा माणूस प्रथम ही चवकशी करी कीं, पेन्शनीत निघालेल्या नोकरास स्वतःचे किती पूर्वज सांगतां येत होते? जर आढळून आलें कीं, त्यास दहा पूर्वज सांगतां येत असत; पण याला मात्र जर स्वतःचे पंधरा सांगता येत असले तर तो राजासच परत टाफरून विचारी कीं, माझ्याहून आंखूड वंशवेलाच्या माणसाने हाताळलेली नोकरी मला करावयास सांगणें तुम्हांस शोभतें काय? असल्या या मानापमानाच्या कल्पनांमुळें राजाची मोठी कुचंबणा होत असे.
 तेव्हांचें राजयुग होतें. अर्थात् राजाचें कुल, त्याचे आप्तइष्ट व अमीर उमराव अगर तत्सम तालेवार लोक यांच्यांतूनच त्याला माणसें काढावी लागत. समाजाच्या वाटेल त्या थरांतून माणसें उचलून घेणें अजून इतकेंसें सुरू झालें नव्हतें. अर्थात् राज्यकारभार चालवावयाचा म्हणजे वरील मंडळींतूनच लोक काढावे लागत व त्यांची अपेक्षाही तशीच असे. जर करतां राजानें यांना दूर सारून वाटेल तेथलीं माणसें भोंवतीं जमविलीं असतीं तरी तिकडूनहि फुकटमानी लोक राजाच्या नांवानें खडे फोडीत बसले असते. ज्याला जें करतां येईल तेंच त्यानें करावें असें म्हटलें म्हणजे त्यांच्यांतील एकाद्या ठोंब्यानेसुद्धां म्हणावें, माझा खापरपणजा सरफडणीस होता आणि मीं आतां कारकुनी कशी करावी? किंवा दुसऱ्या एकाद्यानें म्हणावें ज्याला दहाच बापजादे सांगतां येतात त्याची जागा मी पंधरा सांगणारानें कशी भरावी? या अडचणीमुळे राजा अगदीं किकून गेला. कुलपरंपरेचा अखंडपणा हा अभिजातपणा आणि गुणवृद्धि करतो हा विचार व त्याप्रमाणेंच राजसत्ता जशी तशी, राजसत्तेचा अंशरूप असलेली जी सरकारी नोकरी तीहि, भोगवट्याच्या दृष्टीनें त्या त्याच कुळांत चालावी हा विचार, हे अतिरेकास गेले.
 परंपरा आणि पीठिका कालगतीनें झिजून जाऊं शकतात हें माणसांच्या ध्यानांत येईना; पण जें सामान्यांस दिसेना अगर पटेना तें द्रष्ट्यांस दिसलें. फेओदर राजा एरवीं दुबळा खरा पण बेसिल गोलित्सिन या मुत्सद्द्याच्या संगतींत ही गोष्ट त्याच्या मनांत फार भरली व अगदीं कदरून गेल्यामुळे त्यानें एक घाव दोन तुकडे करून टाकण्याचें मनांत आणिलें. या वंशावळ्यांचे शेंकडों रुमाल सरकारी दप्तरांत असत. एके दिवशीं चुकलेल्या वंशावळ्या दुरुस्त करण्यासाठी सर्वच तपासून पहाणें जरूर आहे तर दप्तरें राजवाड्यांत हजर करावी असा हुकूम त्यानें दप्तरदारास काढिला. हुकमाप्रमाणें दप्तरें येऊन पडतांच तीं एकमेकांवर रचून ठेवावयास त्यानें सांगितले व हातांत चुडी घेऊन त्यानें तो ढिगारा पेटवून दिला. क्षणार्धात सर्व परंपरा व पीठिका भस्मसात् झाल्या. नालायकांत हलकल्लोळ उडाला. लायक लोकांस कांहीं वाटलें नसावें. कारण मनःशक्तीचा दम त्यांच्या अंगीं होता. याप्रमाणें सहस्रावधि धष्टपुष्ट माणसें या किचकट राजानें देशसेवेस मोकळीं केलीं! ही कथा बोधप्रद आहे. शरीरशुद्धि, धर्मग्रंथांची जपणूक, व्यवसायपरंपरा, वंशशुद्धि, आचारशुद्धि, संस्कारांची आवश्यकता, विधींची उपयुक्तता या व एतत्सदृश गोष्टी खरोखर केव्हांहि उपहास्य अथवा निंद्य ठरावयाच्या नाहींत, निदान ठरवू नयेत; कारण त्या तसल्या प्रयत्नानें मानवी मनाच्या वाढीचाच आपण उपहास अगर तिची निंदा करतों असा त्याचा अर्थ होईल. पण त्या त्या गोष्टी खरोखरी विद्यमान असल्या तरच त्यांचा अभिमान बाळगणें व त्यांची कड घेऊन बोलणें रास्त होईल. पण त्यांची सावलीसुद्धां जर शिल्लक राहिली नसली व वृथाभिमानानें व हट्टानें, विशेषतः लोकांच्या सामुदायिक जीवितांत कुचंबणा उत्पन्न झाली तर असला जालीम तोडगा करण्याची वासना करड्या प्रवृत्तीच्या माणसास होते; व मग त्याला उगाच शिव्या खाव्या लागतात. असो.
 दुसऱ्याही एका तऱ्हेनें ही कथा बोधप्रद ठरते. पुढें येणारा पीटर राजा बडा सुधारक म्हणून गाजला; पण पीटर काय आभाळांतून पडला काय? त्याच्या मनांत भूतकाळची मगरमिठी झिंजाडून देण्याची व नवीनांचा स्वीकार करण्याची आणि करविण्याची इच्छा कशानें उत्पन्न झाली? याला एकच जबाब आहे. त्याचा आजा मायकेल या राज्याची घडी बसवितां बसवितांच मेला. त्याच्या कल्पनेतील विधायकपणा पीटरच्या बापाच्या म्हणजे आलेक्झीच्या अंगांत पूर्ण उतरला होता, हें वर दाखविलेंच आहे. आलेक्झीनें जें आरंभिलें तेंच त्याच्या थोरल्या मुलानें म्हणजे फेओदरनें कडकपणे चालू ठेविलें व पुढें धाकटा मुलगा पीटर यानें तें कळसास नेलें. घरांत ते ते विचार हजारदां बोलले जातात, आचरिले जातात व त्यामुळे त्यांसंबंधीं आवड व अभिमान उत्पन्न होतात आणि त्यांच्यासाठीं पराकाष्ठा करण्याची बुद्धि उत्पन्न होते. ही खरी परंपरा अगर पीठिका होय. कारण तींत विधायकत्व व जिवंतपणा आहे. ही असावयासच हवी, नाहींतर गुणोत्कर्ष होणार नाहीं. तिचा अभिमानही हवा, कारण त्या अभिमानाच्या बळावर ती टिकून राहाण्याचा संभव असतो. पण तिचें अस्तित्व निपटून निघाले असले तरी व अंगीं काडीचाह नसला तरी जुनी टरफलें चाटीत बसणें वाईट आहे. हें सांगावयासाठींच रामदासांनीं आपली प्रसिद्ध ओंवी लिहिली असावी कीं, 'सांगे वडिलांची कीर्ति तो एक पढतमूर्ख'. असो. म्हणजे या रोमॅनोव् नांवाच्या नव्या राजवंशांत नव्या परंपरेचें धारण व पोषण आणि जुनीचें निर्दालन बरोबरच चाललें होतें असें दिसेल. हा फेओदर इ० सन १६७२त मरण पावला व गादीवर कोणीं बसावे याविषयीं घरांत तंटे सुरू झाले. फेओदरचा भाऊ इव्हॅन हाहि नेभळाच होता. तो कांहीं आटोप दाखवील असें दिसेना. पीटर तर लहानच होता. अर्थात् कारभारी लोकांचें राज्य सुरू होईलसें दिसूं लागलें.
 पण या मुलांची बहीण जी सोफिया ती गप्प बसणारी नव्हती. कोणी कोणी कुजबुजत कीं, ज्याअथीं ईव्हॅन कसाबसाच आहे त्याअर्थी पीटरला गादीवर बसवावें. पण सोफियास तें मान्य होईना. मोठा भाऊ असतां, धाकट्या सावत्र भावास गादी देण्यास ती राजी नव्हती. येवढ्याशा वयांतही मोठी खबरदार बायको म्हणून ती राजकुलांत व सरदारमंडळांत प्रसिद्ध होती. ती बारभाईंच्या कारभारास संमति देईना. शेवटीं वादविवाद होऊन दोघांहि भावांस गादीवर बसवावें व कारभारीपण सोफियाकडे रहावें असें ठरलें. कारभार सुरू झाला, पण सोफिया एरवीं खबरदार असली तरी पुरुषविषयक भावनेंत ती जितकी कडवी असावयास हवी होती तितकी नव्हती. मागें सांगितलेला गोलित्सिन हा अजून प्रधानकीवर होताच. त्याच्यापुढे या बाईचें सगळें शहाणपण लटपटूं लागलें. शेवटीं ती त्याच्या इतकी आहारी गेली कीं, ही दोघें आतां लगीन लावणार असेंही लोकांस वाटू लागले. पीटर लहान होता, तरी आपल्या नांवावर या दोघांनीं मन मानेल तसा राज्यकारभार करावा हें त्यास पसंत पडेना. हळुहळू कुरबुरी होतां होतां सोफिया का पीटर असा हा वाद आहे हें सर्वांच्या ध्यानांत आलें. गॉर्डन नांवाचा एक स्कॉच सरदार रशियन फौजेंत नोकरीस होता, त्यास पीटरने आंतून वश करून घेतलें. सोफियाशीं म्हणजे रीतसर नेमल्या गेलेल्या कारभाऱ्याशी उघड कलागत सुरू होतांच तो पीटर यास जाऊन मिळाला. पीटरनें बहिणीस पकडून दूरच्या एका मठांत रहावयास पाठवून दिलें. तेथे ती पंधरा वर्षे कुजून शेवटीं मेली. गोलित्सिन यास हद्दपारी सांगितली. या प्रमाणे या दोघांचा निकाल लावल्यावर पीटरला सगळें रान मोकळेंच झालें. कारण जोडवारस जो ईव्हॅन् तो केवळ वेडसर व अजागळ होता. पीटर तरी अवघा १७ वर्षांचा होता; पण इतक्या लहानपणींसुद्धां त्याच्या अंगांत बरीच आवरशक्ति व हें करीन, तें करीन असा हव्यास होता. लवकरच हा ईव्हॅनही मरण पावला आणि पीटरचा मार्ग निष्कंटक झाला.
 सोफिया अंमलदारीण असतां पीटर बहुतेककरून राजधानीत क्वचित् एकाद्या वेळीं येत असे. एरवीं तो दुसरीकडे राहात असे. कारण त्याच्या शिक्षणाची व्यवस्था तिकडेच केलेली होती. नेमलेले शिक्षक मोठे बोजड, आळशी व आपला धंदा नीट न जाणणारे असे होते. शिक्षकांच्या हातून असें पीटरचें कांहींच बरें झालें नाहीं; पण जात्याच त्याचा अंकुर फार जोराचा होता. पीटर म्हणजे मूर्तिमंत जिज्ञासा होता असे म्हणावयास हरकत नाहीं. तरी कांहीं प्रास्ताविक शिक्षण म्हणून हवेंच असतें. पण चार ओळीसुद्धां व्याकरणशुद्ध लिहावयास त्यास शिकविलें नव्हतें! जहाजें बांधावयाची विद्या त्याला एका डच माणसाने शिकविली. लष्करी शिक्षण वर सांगितलेल्या गॉर्डननें दिलें. थोडें जुजबी अंकगणित त्यास शिकविलें होतें. इतर युरोपियन भाषांपैकी फक्त डच भाषाच काय ती त्यास बोलतां येत असे. तेव्हांच्या राजपुत्राच्या मानानें हें शिक्षण कांहींच नव्हतें. रशिया म्हणजे एक भला अडदांड, अर्बुज, असंस्कृत व चर्बट लोकांचा देश होता. सगळेच लोक केवळ गांवढे असत. कायदे फार थोडे; देशांत हालचाल काय जी चोर- दरवडेखोर करतील ती. इतकाच प्रकार होता. राजघराणे व कांहीं सरदारांची घराणीं यांचेच लक्ष काय तें वरिष्ठ प्रकारच्या हालचालींत गुंतलेलें असावयाचें. बाकी सर्व आपापल्या व्यवसायांत गुंतलेले. राजकारणाच्या उलाढाली करणारे तरी कांहीं विशेष फिरलेले, नव्या कल्पना आणणारे, ज्ञानाचे लोभी, देशाचे कडकडून अभिमानी असे होते म्हणाल तर तसेही नाहीं. कांहीं आडाख्यावर कामे करणारे व हळुहळू मिळत जाणाऱ्या अनुभवानें शहाणे होत जाणारे, असे लोक असतात; त्यांतलेच हे लोक असत. मोगल, तार्तार, कोसॅक इत्यादि बिलंदर भामट्यांशी नित्य वागण्याचा प्रसंग असल्यामुळे त्यांच्या वृत्तीतही रानवटपणा भरला होता. माणसांचीं नाकें कापणें, हात तोडणें, जीव घेणे, वगैरेंत विशेष उग्र असें त्यांस कांहींच वाटत नसे.
 असल्या लोकांतच पीटर वाढलेला होता. अर्थात् त्या मानानें तोही असला जंबूशेरी वळणाचाच माणूस होता. राजाचा मुलगा म्हणून त्याच्यावर कांहीं अभिजातपणाची तकतकी दिसे असें मुळींच नाहीं. बोलणें चालणें, निदान लहानपणचे मनाचे व्याप, करमणुकीचीं साधनें, थट्टामस्करी यांच्या पद्धति, यांवरून हा माणूस केवळ जाडाभरडा व राकट संवयीचा असा दिसे. राजा झाल्यावर टकरी लावणें, लटक्या लढाया लावणे यां वाटेल तितका वेळ तो घालवी. रक्तपात झाला तरी त्याच्या मतानें ती खोटी लढाई असावयाची! शोभेची दारू उडवावयाची म्हटली कीं, इतकी बेसुमार उडवावयाची कीं, गांवांतल्या घरादारांना आगी लागल्या तरी याची हौस चाललेलीच असावयाची. पण इतकेही असले तरी हें ध्यानांत हवें कीं, या वेळीं तो केवळ पोरसवदा माणूस होता.
 मास्को शहराच्या शेजारी एक सरोवर आहे. तेथे नावा बांधण्याचें काम सुरू होतें. त्याकडे पीटरचें लक्ष फार असे. अर्थात् एकदां समुद्र तरी कसा असतो हें पहावें म्हणून तो वयाच्या २१- २२ व्या वर्षी आर्केजल येथें आला. तेथील समुद्राचा तो गंभीर घोष ऐकून व अफाट विस्तार पाहून त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. इतर देशांच्या नाविकांच्या नवलकथा, इंग्लंड, हॉलंड, स्पेन इत्यादि देशांतील शूर दर्यावर्दी तांडेलांचे पराक्रम व त्यांनी केलेले इतर देशांचे आक्रमण यांविषयीं पुष्कळ गोष्टी त्यानें ऐकिल्या होत्या. समुद्र पाहून त्याला उल्हास वाटला आणि हा दर्या हस्तगत झाला तर आपले वैभव वाढेल व इतर यूरोपीय राष्ट्रांशीं आपली बरोबरी होईल असें त्याच्या मनानें घेतलें. त्यानें आपले कांहीं स्नेही परदेशीं धाडिले, अशासाठीं कीं, त्यांनी नव्या विद्या रशियांत आणाव्या. पण तेवढ्यानें त्याचें समाधान होईना. आपण स्वतःच जाऊन सर्व देश पहावे, राजकारणी लोकांशीं बोलावें, व विशेषतः निरनिराळ्या विद्या शिकाव्या अशी त्यास इच्छा झाली. दरम्यान अझोबच्या अंगास कांहीं युद्धप्रसंग निघाला. राजा म्हणून हाही लढाईंत होता. तेथें शत्रूंनीं याच्या फौजेस चांगलें चोपलें. पुढील वर्षी तयारी करून तो पुन्हा गेला व त्यानें तें ठाणें घेतलें. येथें त्याच्या ध्यानांत आलें कीं, राजा होणें फुकटचे काम नाहीं. इतउत्तरकाळांत शेजाऱ्यांशीं व युद्धांत तरबेज असलेल्या स्वीडन देशाशीं युद्धे करावी लागणार हेही त्यास दिसत होतें. अर्थात् सगळ्या युरोपभर फिरून नाना कला व हरतऱ्हेच्या विद्या या स्वतः अवगत करून घेतल्या पाहिजेत असें ठरवून तो परदेशीं जावयास निघाला. ही गोष्ट दिसावयास साधी वाटते; पण सर्व इतिहासांत हिला जोड नाहीं. आपल्या देशाच्या उत्कर्षासाठीं स्वतः शहाणें झालें पाहिजे व आपण विद्यार्थीपण पत्करून, क्षुल्लकपणा घेऊन, प्रजांना धडा लावून दिला पाहिजे ही वासना राजालाच झाल्याचीं उदाहरण इतिहासांत इतरत्र सांपडणार नाहींत.
 आपण विद्या व कला शिकावयास परदेशीं जात आहों असें पीटरने आपल्या प्रजेस केव्हांही सांगितलें नाहीं. इतर राजेलोकांशी राजकारण करण्याकरितां आपण जात आहों असें सांगून व पीटर मिहिलो टोपणनाव धारण करून तो बाहेर पडला. रिगा, लिबो या गांवांवरून तो कोनिंग्जबर्गकडे गेला. त्या वेळीं स्वीडन देशाची हद्द बाल्टिक समुद्राच्या अलीकडे मुख्य भूप्रदेशावर पुष्कळच पसरली होती; व बाल्टिक समुद्र म्हणजे स्वीडिश राज्याच्या पोटांत असलेल्या प्रचंड सरोवरासारखा होता. स्वीडिश लोक मोठे भांडखोर होते; त्यांचा उपद्रव रशियाला फार होई. म्हणून पीटरने जातां जातां त्यांच्या विरुद्ध इतरांशीं कांहीं करारनामे करण्याची खटपट केली, पण तिचा उपयोग झाला नाहीं. रशियाला समुद्रकिनारा नाहीं ही गोष्ट त्यास येथे फार जाणवली व तो मिळविणें म्हणजे बाल्टिकच्या दक्षिणेस असलेला स्वीडिश अम्मल कायमचा उठविल्याशिवाय भागावयाचें नाहीं ही बाब त्याच्या मनांत कायम ठसली.
 एके जागीं त्यानें एक अपराध्यांस फांशीं देण्याचें चक्र पाहिलें. त्यावर बांधून घालून गरगरा भोवंडून अपराध्यास कसे मारतात हें त्यास पहावयाचें होतें. कारण आपल्या देशांतही ही पद्धत त्यास सुरू करावयाची होती. पण त्या वेळीं कोणी फांसाचें गिऱ्हाईकच तेथें मिळेना! तेथून तो पोलंडकडे वळला व मग बर्लिन शहरीं बँडेन्बुर्गच्या राणीसाहेबांची मुलाखत घेऊन हॉलंडकडे वळला. वाटेनें त्याची सुधारणाप्रियता ऐकून लिबनिज नांवाच्या तत्त्ववेत्त्याने एक मोठीथोरली योजना त्याजपुढे हजर केली. पीटर म्हणाला, 'मला इतक्या भानगडी नकोत; तुला जहाजें कशी बांधावयाचीं हें शिकवितां येत नाहींना? मग तुझें काल्पनिक कोळ्याचे जाळे ठेवून दे'. आमस्टरडॅमच्याजवळ समुद्रकांठच्या एका खेड्यास तो पुढे गेला. तेथें बोटींत बसून वल्हवणें, मच्छीमार लोकांशी सारखें. बोलत राहाणें यांत तो गुंग होऊन गेला. पण त्याच्या जिज्ञासेला डोळे फार होते. सडकेनें फिरतांना कोठें पूल दिसला कीं, गाडींतून उतरून त्यानें त्याची लांबी रुंदी मोजावी; कोठें गिरणी दिसली कीं, ती कशी चालते हें बारकाईनें पहावें किंवा विशेष बरी वसती कोठे दिसली कीं, तेथें शिरून त्या घरांची पहाणी करावी, असा त्याचा शिरस्ता असे. आपण राजे, तेव्हां या गोष्टी कशा कराव्या असा विचार त्याला शिवलाही नाहीं. यंत्रे पाहिलीं कीं, पराकाष्ठेचा मोह त्याला पडे व त्यांच्या गतीची व जोराची त्यास कल्पना नसल्यामुळे तो भलतेच कांहींतरी करी. एकदां एक रेशमाची गिरणी पाहात असतां तिचें झपाटयानें गरगरणारें चाक हाताने थांबविण्याचा प्रयत्न यानें केला! थोड्यांत चुकलें नाहीं तर तेथेंच सगळा ग्रंथ आटपावयाचा! तो छापावयाची कला शिकला; खोदकाम शिकला; शरीररचनाशास्त्र व वस्तुधर्मशास्त्र यांचाही त्यानें अभ्यास केला. रेखा कला म्हणजे ड्रॉइंग तेंही येत असलें पाहिजे असें त्यास दिसलें. कारण त्याशिवाय सुतारकाम नीट यावयाचें नाहीं, व सुतारकाम आल्याशिवाय जहाज बांधण्याची कला यावयाची नाहीं हें त्यानें ओळखिलें होतें. या सर्वांचें ज्ञान मिळविण्याची त्याची अहर्निश खटपट चालू होती! शेवटीं आपल्या हाताने त्यानें एक जहाज बांधिलें, तेव्हां त्यास पराकाष्ठेचा हर्ष झाला. आणि हीं कामें करीत असतां स्वतःची हंडी तो स्वतःच उकडीत असे. पण इतकें झालें तरी आमस्टरडॅम येथील जहाजाची कला त्यास इतकीशी पसंत पडेना, म्हणून त्याने इंग्लंडास जावयाचें ठरविलें तेथें जातांच टंकशाळा, वेधशाळा, रॉयल सोसायटी इत्यादि संस्था त्यानें पाहिल्या. कारखान्यांत तो एखाद्या हमालासारखा राबू लागला. हातांत घण, हातोडा, करवत घेऊन कामाच्या बारीकसारीक खोचाखांचासुद्धां त्यानें माहीत करून घेतल्या. एकदां असाच हमालकामाचा झपाटा चालू असतां इंग्लंडचा राजा त्यास पहावयास कारखान्यांत आला होता. याप्रमाणें सर्व सामुद्रिक माहिती करून घेतल्यावर पीटर परत फिरला व स्वदेशांत मोठें बंड उद्भवल्याचें ऐकून कोठेही न रेंगाळतां त्वरेनें राजधानीस प्राप्त झाला. ही पीटरच्या ज्ञानार्जनाची हकीगत थोडक्यांत सांगून झाली आहे, पण येवढ्या वेळांत तो पहिल्या प्रतीचा नावाडी बनला. जहाजाचे बांधकाम करण्यांत पटाईत झाला. व शिवाय गोलंदाजीची विद्याही पढला. पुढील वीस वर्षांत त्याला या सर्वांचा अतोनात उपयोग झाला.
 पीटरने आपल्या कारकीर्दीत केलेल्या अनेक युद्धांची हकीगत थोड्यांतच द्यावयास हवी, कारण तो त्याचा मुख्य पेशा नव्हे. त्यानें स्वीडनशीं सारखा झगडा चालू ठेविला. तेथील राजा बारावा चार्ल्स् हा मोठा आडदांड योद्धा होता. सर्व जन्मभर तो मारामारी करीत होता. एकादे वेळीं झालेल्या पराभवानें केव्हांही न खचतां तो पुनः पुन्हा उसळून उठे व बाल्टिक समुद्रापासून तों थेट दक्षिणेकडे आजोवच्या समुद्रापर्यंत अ घ्या राजांस व मुलखास त्यानें हैराण केलें. पीटरलासुद्धां हा अनावरच होता. तरी त्यानें फिन्लंडवर स्वारी करून त्याचा एक लचका तोडून घेतला. पीटरला हें माणिक पचणें शक्य नव्हतें; कारण चार्ल्स महाधाडसी आणि वाटेल तें अनन्वित आचरणारा होता. पण पीटरच्या नशिबानें चार्ल्स मृत्यु पावला. लागलीच पीटरनें थोडी देवघेव करून बाल्टिक समुद्राच्या दक्षिणेकडील व लाडोगा सरोवराच्या सभोवारचा सर्व प्रदेश हस्तगत केला. यामुळें असें झालें कीं, फिन्लंडच्या आखातापासून पूर्वेकडील सर्व समुद्रकिनारा पीटरला मिळाला व रशियास समुद्रकिनारा पाहिजे ही त्याची हौस पूर्ण झाली. मग त्यानें पीटर्सबर्ग म्हणजे पेट्रोग्राड म्हणजेच आतांचें लेलिनग्राड सुशोभित केलें व रशियन आरमाराच्या बांधणीस आरंभ केला. वायव्येकडे जसा त्यानें मुलूख संपादिला तसा आग्नेयीकडे कास्पियन समुद्रांतून खालीं इराणात शिरूनही कांहीं प्रदेश त्याने मिळविला. तो थोडाच होता. पण भावी काळांत 'ईस्टर्न क्वश्चन' (प्राचीकडील प्रकरण) म्हणून ज्या प्रकरणास नांव मिळालें त्याचा प्रारंभ अशा रीतीनें पीटरनेच केला. म्हणजे त्याच्या युद्धांचा टिकाऊ परिणाम काय म्हणून विचारलें तर असें सांगतां येईल कीं, रशियाच्या आरमारास समुद्र प्राप्त करून देणें व पूर्वेकडील रशियन साम्राज्याचा इतर लोकांशी निकट संबंध सुरू करणें हा होय.
 पण पीटरचें खरें वैभव हें नव्हे. त्यानें आपल्या अर्धरानटी राज्यांत सुधारणा करण्यासाठी स्वतः जे अपरिमित कष्ट केले त्यांमुळे त्याचें नांव रशियाच्याच काय पण अवघ्या युरोपच्या इतिहासांत अजरामर आहे. पीटर पुढें येण्याच्या आधीं प्रगति घडवून आणण्यासाठीं खटपट करणारे लोक अगदींच नव्हते असें नाहीं; पण त्यांच्याहून जाणता आणि कष्टाळू असा एखादा म्होरक्या त्यांस हवा होता. पीटरच्या रूपानें तो त्यांस मिळाला. या लोकांच्या मदतीनें पीटरनें अनेक उलाढाली केल्या.
 पहिल्या सपाट्याला त्यानें राज्यांतील सुभेदारपद्धति मोडून टाकली. रशियादेश अवाढव्य आहे. त्याचे अनेक सुभे पाडून त्यांवर कारभारासाठी सुभेदार नेमलेले असत. या सुभेदारांना मोठमोठ्या जहागिरी असत; पण पगार मात्र मुळींच नसे. आपल्या इकडेही हाच प्रकार पूर्वी होता. आपल्या जहागिरीचें उत्पन्न खाऊन सुभ्याचा कारभार चालविणें हें वास्तविक यांचें काम होतें. पण कारभारांत टंगळमंगळ करून आपल्या उत्पन्नाबरोबर सुभ्याचे उत्पन्नही खाण्यास हे लोक सोकावलेले होते. पीटरनें ही जहागिरदारी बंद केली व प्रत्येक कामगाराला त्या त्या जागेचा पगार नेमून दिला. सुभेदारांच्या प्रांतांचीही गुंतागुंत झालेली होती. एकाच गांवावर अनेकांनी आपापला हक्क सांगावा असें झालें होतें. त्या वांटण्या त्यानें नीट आंखून दिल्या. या सुधारणा करतांना कित्येक अमीर उमरावांचा रोष त्याला सहन करावा लागला पण तो रोष झाला तरी बेहेत्तर असें म्हणणारा पीटर होता. याप्रमाणे रशियाचे ४३ प्रांत पडून प्रत्येक सुभेदारास वरिष्ठाकडे कारभाराचा जाब देणें प्राप्त झालें.
 पुढें पीटरने अष्टप्रधान अथवा दशप्रधानपद्धति सुरू केली व परदेशी राजकारण, युद्ध, आरमार, खजिना, कायदा इत्यादि दहा खात्यांवर दहा मंत्री नेमिले. ही वरील कारभाराची व्यवस्था झाल्यामुळे सरदारांचा लुटारूपणा थांबून प्रजेस हायसें झालें आणि कामाची वांटणी खातेवार झाल्यामुळें, एकेका प्रकरणाचा निकाल जलद होऊं लागून प्रजेस सुख होऊं लागलें. प्रजेच्या अंगी लागण्यासारख्या आणखी दोन सुधारणा त्यानें केल्या. परदेशाशी लढाई चालू नसणें म्हणजे शांतता आहेसें मानणें अशी चाल असे. पीटरने हा अर्थ बदलला. प्रजेला आपल्या व्यवहाराला सोपेपणा व निर्धास्तपणा प्राप्त झाला तरच ती खरी शांतता हें पाहून त्याने पोलिसखातें चांगलें बलिष्ठ केलें आणि सर्व देशभर चोऱ्या, मारामाऱ्या करीत फिरणाऱ्या उचल्या उडाणटप्पूंच्या मागें शिपायांचा ससेमिरा सारखा लाविला; इतका कीं, देशांत चोऱ्या, मारामाऱ्या बंद झाल्या. खोटी नाणी पाडणारे व चोर यांच्या बातम्या प्रजेनें सरकारांत ताबडतोब कळविल्या पाहिजेत असा सक्त दंडक त्याने घातला. या सुधारणेनें एकंदर जनसमूहाची पीटरवर विलक्षण भक्ति बसलीः धार्मिक बाबतींतही त्यानें हात घातला. धर्मगुरूंच्या मठाकडे मोठमोठाली उत्पन्नें होतीं. प्रत्येक घराचा एक धर्मोपदेशक असे. यामुळे मठांत उपदेशकांची म्हणजे जोगी आणि जोगतिणी यांची गर्दी जमलेली असे. पीटरने ओळखलें कीं, धर्मोपदेशकांची जरुरी असली व त्यांचे चालावें म्हणून उत्पन्ने हवीं असली तरी घरटी एक उपदेशक असण्याची जरुरी नाहीं; व मग इतक्या उत्पन्नावर इतके लोक पोसण्याचीही जरुरी नाहीं. त्यानें एक आचार्यमंडळ नेमून उपदेशकांचें स्वतंत्र खातें बनविलें. व त्यांच्या द्वारा सरकारी उत्पन्नें फुकट खाणारे हजारों ऐदी लोक मठांतून पिटाळून लावले.
 याप्रमाणें हातीं असलेल्या उत्पन्नाची शिस्तवार वांटणी, त्याच्या सुयुक्त विनिमयावर राज्यकारभाराची घडी, व प्रजेच्या सुखाची वाढ ही कायम करतांना, उत्पन्न वाढविल्याशिवाय नवीन गोष्टींचा उपक्रम करतां येत नाहीं, हें पीटर ओळखून होता. रशियाच्या बाजारपेठा तेव्हां परदेशी मालानें भरलेल्या असत. पीटरने सर्वत्र प्रवास केला तेव्हांच कोणकोण परके लोक रशियांतील पैका खाऊन गबर होत आहेत, हे त्याच्या ध्यानांत येऊन चुकलें होतें. म्हणून देशी उद्योग- धंद्यांना त्यानें हरतऱ्हेनें उत्तेजन दिलें. उगाच इकडे तिकडे भटकून लोकांच्या दातृत्वाचा गैरफायदा घेणारे सहस्रावधि लोक त्यानें धनोत्पादक धंद्यांत राबावयास लाविले. खाणींचे शोध लावून लोखंडाचा व्यापार त्याने सुरू केला. परदेशी कारागिरांच्या पगारी मदतीनें त्यानें उंची कापड, पायमोजे, कातडी सामान इत्यादि धंदे उभारून शेतकऱ्यांच्या हितासाठीं आउतें व जनावरांची पैदास या कामांकडेही लक्ष पोंचविलें. या उद्योगाचें माप पंधरा वर्षांच्या अवधींत त्याला उत्तम काढतां आलें. कारण राज्याचें मूळचें तीस लक्षांचें उत्पन्न येवढया अवधींत एक कोटींवर गेलें!
 रशियाला शत्रु बरेच होते. स्वीडनच्या चार्ल्सचा उल्लेख मागें आलाच आहे. त्याच्याशी झुंजतांना त्याच्या ध्यानांत आलें कीं, आपली फौज म्हणजे केवळ बाजारबुणगे होत. पण तेही पुरेसे मिळत नसत. म्हणून त्यानें लष्करी नोकरी सक्तीची केली. तिचें रूप मात्र असें होतें कीं, प्रत्येक परगण्यानें अमुक इतके शिपाई सरकारांत पुरविलेच पाहिजेत. प्रत्येक धडधाकटाने लष्करी शिक्षण घेतलेच पाहिजे असें मात्र नव्हे. हळुहळू त्याची फौज बलिष्ठ झाली. व तिच्या बळावर इतरांना त्याचा वचकही जास्त बसूं लागला. ३२००० पासून १००००० पर्यंत त्यानें फौजेची वाढ केली. तिच्या बळावर वर उल्लेखिलेला बाल्टिकचा दक्षिणकिनारा व लाडोगा सरोवराच्या भोवतालचा सर्व किनारा त्यानें हस्तगत केला. फौजेला शिक्षा देण्याच्या कामी पीटर काळासारखा करडा होता. जो शिस्त मोडील त्याचें 'डोंके मेक्सूखालीं' सडकलें जाईल, असा त्याचा नियम असे.
 शिक्षणाकडेही पीटरचा ओढा अतिशय होता. ज्या माणसाला लिहिण्यावाचण्याचा गंधही नाहीं, त्याला सरकारी नोकरी देतां कामा नये, असें त्याचें मत असे. तसेंच ज्या सरदारांना सहीसुद्धां करतां येत नाहीं, त्यांच्या पदव्या काढून घेतल्या पाहिजेत असें तो स्पष्ट म्हणे. तो गादीवर बसला तेव्हां मठांतून शाळा असत, नाहीं असें नाहीं; पण तेथे शिक्षण म्हणजे इतकेंच कीं, र ट फ करीत बायबल वाचतां यावें व राजांची आणि पृथ्वीवरील देशांची जुजबी माहिती व्हावी. इ० सन १७१४ सालीं प्रांतोप्रांतीं अमुक एक तऱ्हेच्या शाळा उघडण्यांत याव्या असा त्यानें हुकूम सोडला. पण अनेक खटपटी होऊन पांच वर्षांच्या मुदतींत मोठ्या मारामारीनें एक शाळा सुरू झाली आणि तिच्यांत अवघे सव्वीस विद्यार्थी दाखल झाले! सुधारणा करणारा असेल मोठा आकांक्षी आणि हिम्मतवान्, पण त्या सुधारणा तो कोणच्या लोकांत करीत आहे यावर पुष्कळच अवलंबून आहे. पीटरच्या ज्या अनेक सुधारणा केवळ मुंगीच्या पायानेंच चालू झाल्या त्यांतील शिक्षण ही एक होती. कित्येक लेखकांनी त्याला दोषसुद्धां दिला आहे कीं, नाहीं त्या लोकांपुढे हा भला गृहस्थ विनाकारण डोकेफोड करीत बसला होता. पीटरने देशाटन फार केलेलें असल्यामुळे हजारों गोष्टी त्यानें पाहिल्या होत्या. अर्थात् त्यास वाटे कीं, आपल्या देशांत त्या त्या सर्व असाव्या. पण त्याचे ते सहस्रावधि वर्षांच्या ज्ञानविन्मुखतेंत आणि आळसांत खारलेले 'देशबंधू' नव्या गोष्टी भराभरा पत्करीनात. स्थापत्त्य, नौकानयन व गणित यांच्या अभ्यासासाठीं पाठशाला जरूर आहेत असें ठरवून सरकारांतून जी काय हरतऱ्हेची तरतूद करावयास हवी होती ती त्यानें केली. मोठमोठे पगार देऊन जर्मनी, इंग्लंड इत्यादि देशांतून प्रोफेसर लोकही त्याने आणविले. पण प्रश्न हा पडला कीं, त्यांच्यापुढें बसावयाचें कोणी? स्थापत्त्याच्या कॉलेजमध्ये मोठ्या मिनतवारीनें १३ विद्यार्थी आले. शेवटीं पीटरचा खरा स्वभाव प्रकट झाला. हे लोक बऱ्या बोलानें आपलीं मुलें शाळेत धाडावयाचे नाहींत, हें पाहून स्वतःचीं आश्रित अशीं जीं कित्येक घराणीं होतीं त्यांतील ८० मुलगे त्यानें निवडून काढले आणि त्यांनीं शिकलेच पाहिजे अशी सक्ति आरंभिली. अर्थात् येवढ्या अवाढव्य देशांत हा प्रयत्न म्हणजे 'दर्यामे खसखस' असाच होता. पण पीटरच्या या धडपडीमुळे इतकें मात्र झालें कीं, विद्येसंबंधानें समाजांत जी उपहासबुद्धि होती ती नष्ट झाली आणि लिहितां वाचतां न येणें म्हणजे मोठी नामुष्कीची गोष्ट आहे इतकें त्यांस वाटूं लागलें. सन १७०७ सालीं एक छापखाना आणि कांहीं कंपॉझिटर असें साहित्य त्यानें मास्को राजधानीस आणविलें व तेथें छापण्याचे काम सुरू केलें. भाषा कोणची वापरावी असा प्रश्न पुढे निघाला. तेव्हां दरबारची भाषा हीच छापखान्यांत सुरू करावी असा निकाल देऊन त्यानें सर्व रशियाची एकच भाषा अथवा बोली करून टाकली. कारण जी भाषा छापली जाईल, तीच शेवटीं लोक पत्करणार हे त्यास माहीत होतें. त्यानें लायब्ररी, पदार्थसंग्रहालय व कलाभुवन अशासारख्या संस्थाही चालू केल्या. व सन १७०३ सालीं मास्को शहरी पहिलें रशियन वर्तमानपत्र सुरू केलें. त्यावेळेपर्यंत सृष्टीच्या आरंभापासून कालगणना करण्याची व वर्षारंभ सप्टेंबरांत धरण्याची चाल रशियांत होती. ती त्यानें बंद करून इतर ख्रिस्त्यांचा प्रघात उचलला. यावरून दिसून येईल की, पीटरची दृष्टि फार फांकली होती व स्वदेश कल्याणाची त्याची इच्छा केवळ अनिवार होती.
 घरगुती व व्यक्तिविषयक आचारांत आणि चालीरीतींतसुद्धां त्यानें उलथापालथी केल्या. त्याच्या कालापर्यंत बायकांनीं म्हणजे झांकून- पाकूनच राहिलें पाहिजे अशी सक्ति असे. पीटरनें ही चाल साफ मोडून टाकली व वागणुकीचे नवे दंडक घातले. म्हणजे असें कीं, पूर्वेकडील चाली मोडून पश्चिमेकडील सुरू केल्या. पूर्वीचा पोषाखसुद्धां त्यानें फेंकून दिला आणि जरा तरतरीत दिसेल असा नवा पेहेराव कसा करावा हें त्यानें लोकांस शिकविलें. फ्रान्स इत्यादि देशांतील सोज्ज्वल, दिसण्यांत ठाकठिकीची व शारीरिक सौंदर्याकडे बारीक लक्ष देणारी माणसें त्यानें पाहिलीं होतीं. पण घरीं पहावें तों हजामती वाढलेले, बोकडासारख्या दाढ्या पिंजारलेले, असले घामट, गबाळशाही, आणि घाणेरड्या पिवळ्या दांतांचे सगळे लोक! शेवटीं चिडून जाऊन त्यानें कायदा केला कीं, सर्वांनीं दाढ्या केल्या पाहिजेत, जो करणार नाहीं त्याला दंड ठोठावण्यांत येईल! ही तऱ्हा पाहून एकदां हॉलंडचा वकील म्हणाला, "सरकार, हे काय चालू आहे!" पीटरने उत्तर केलें. "गाढवांचीं माणसें बनवीत आहे."
 परंतु सगळ्या जगाला सुधारावयास निघालेल्या या प्रचंड पुरुषास घरांतली दोन माणसें मात्र सुधारतां आली नाहीत. एक त्याची बायको व दुसरा त्याचा मुलगा. बायकोचें आणि त्याचें पहिल्यापासूनच फारसें कधीं जमलें नाहीं. ती घरबसल्या याच्या धोरणाविरुद्ध कटकटी उत्पन्न करी. शेवटी कंटाळून त्यानें तिला एका मठांत राहावयास पाठवून दिलें. तेथे तर ती मोकळी होऊन अधिकच कारस्थानें करूं लागली. चिरंजीव अलेक्झी हेही त्याच्याविरुद्ध लावालावी करीत. सुधारणेस विन्मुख असलेल्या मठवाल्यांनीं आणि पुराणमतवाल्यांनी या घरभेदाचा फायदा चटकन् घेतला आणि या मायलेकांच्या पुरस्कारानें पीटरच्या सुधारणाविषयक चळवळीस विरोध सुरू केला. पण अलेक्झी येवढयावरच थांबला नाहीं. तो बापापासून पळून परदेशीं शत्रूंच्या आश्रयास गेला व तेथून जमवाजमव करून पीटरला सतावण्यासारख्या बाता बोलूं लागला. पीटर त्याच्या बारशाला खरोखरीच जेवला होता. तो जात्याच महा तामसी, क्रूर आणि आडदांड असा होता. त्यांत मुलाची ही सुधारणाविध्वंसाची आणि आपल्या अंगावर उठण्याची प्रवृत्ति पाहून तो चवताळून गेला. अलेक्झीस त्यानें हिकमतीनें परत आणविलें आणि एकाद्या कैद्याप्रमाणे त्याच्यावर खटला भरून गादीवर आपला कसलाही वारसा नाहीं असें त्याजकडून कबूल करून घेतलें. पण तेवढ्यावर तृप्त न होतां त्यानें त्यास शेवटीं ठार मारविलें. या भयानक कृत्यानंतर, आपल्या मागें मुलगा नाहीं म्हणून रिकाम्या पडणाऱ्या गादीसाठीं पुन्हा मारामाऱ्या होऊं नयेत म्हणून त्यानें वारसाचा कायदाच बदलला व ठरविलें कीं, गादीवर बसावयास झारला मुलगाच पाहिजे किंवा असला तर त्यास गादी मिळालीच पाहिजे असें नसून तो गादीचा मालक ज्यास ठरवील त्यानें राजा व्हावें! असा हा कर्ता राजा केलेली गोष्ट जपावयास वाटेल तें आचारावयास न भिणारा असा होता.
 या त्याच्या कर्तबगारीमुळें त्याच्या वैगुण्याकडे आपले लक्ष इतकेंसें जात नाहीं. अपराध्यांना शिक्षा काय कराव्या किंवा करूं नयेत याचा कसलाही विवेक तो करीत नसे. कोठें बंडें उठली तर बंडखोरांची कसलीही गय न करता, त्यांचा बीमोड करून, तो त्यांस इतकें हैराण करी कीं त्यांस 'त्राहि भगवन्' होत असे. नीतीविचारही त्याला अगदीं वावडा होता. रोजच्या रोज दारू ढोसून झिंगून पडण्यांत त्याला कांहींच विशेष वाटत नसे. एरवीही स्वभावानें उथळ, उतावळी, किंबहुना पोरकट असे. एकादें कांहीं चांगलें वर्तमान आलें तर मोठमोठ्याने घसा फोडून भोंवतालच्या सर्व लोकांना तो सांग असे. कोणच्याशा एका युद्धानंतर त्याला हवा होता तसा तह ठरल्याचे ऐकल्याबरोबर भर चवाड्यावर तो प्रत्यक्ष नाचूं- उडूं लागला! राजधानीत नेहमीं आगी फार लागत. त्यांतूनच त्याने एकदां करमणूक करून घेतली. एके दिवशीं आग लागल्याचीं शिंगें गांवभर उगीचच्या उगीच वाजवावीं म्हणून त्यानें बंबवाल्यांना सांगितलें. लगोलग बोभाटलेल्या ठिकाणीं लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटल्या; त्यांजकडे पाहून डोळे मिचकावून पीटर म्हणाला, आगबीग कांहीं नाहीं. तुमची थोडी गंमत केली!' पण खुद्द राजेसाहेब व प्रजा या सांस्कृतिक दृष्ट्या एकाच तोलाच्या असल्यामुळे असल्या गोष्टीचें कोणास कांहीं वाटत नसे. हें सर्व खरें असले तरी त्याला कामाचा मात्र कंटाळा नसे.
 रोज पहांटे पांच वाजतां उठून, सर्व विधि उरकून तो शिरस्तेदारास कामाला बोलवी. सात वाजतां अठरा कारखाने तपासावयास निघे. परत येऊन एक वाजेपर्यंत टपाल रवाना करी. मग जेवणखाण इत्यादि होई. जेवणांतही फारसा खादाडपणा नव्हता. उगाच शंभर- हजार वाढपे आणि आचारी तो मुदपाकखान्यांत बाळगीत नसे. कामें उरकणारा जबरदस्त असे. एक परराष्ट्रीय वकील लिहितो: "हा राजा म्हणजे राशियांत उभ्या असलेल्या एकाद्या उंच शिखरासारखा आहे. शहाणपणा, बारकाई, अवलोकन, विचारांचा स्पष्टपणा आणि मनाची बळकटी या गुणांत याला तोड नाहीं." खरोखर सध्यांच्या रशियन जीविताचें असें एकही अंग नाहीं कीं, ज्यावर पीटरच्या हाताचा ठसा उमटलेला नाहीं. त्याच्या कल्पनेला विधायकपणा व हाताला यश विलक्षण होतें. सुधारणेपुढें आपलें शरीरसुख, नाजुक नाती आणि विरोधाचें बुजगावणें हीं त्यानें कःपदार्थ मानिलीं. त्याचें सर्व आयुष्य म्हणजे कर्तबगारीनें खेंचून भरलेलें एक ५३ वर्षे उंचीचें एक लहानसें पोतें होतें. अहोरात्र कष्टांनीं त्याच्या शरीराला झीज येऊन नव्या रशियाला जन्म देणारा हा कर्मशूर राजा वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी म्हणजे इ० सन १७२५ साली मरण पावला.