Jump to content

पान:Samagra Phule.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा

५५

रात्री जाऊन एकाएकी लुटी जुन्नरास ।
पाठवि गडी लुटीस ॥
आडमार्ग करी हळूच गेला नगरास ।
लुटी हत्तीघोड्यांस ॥
उंच वस्त्रे, रत्ने होन कमती नाहीं द्रव्यास ।
चाकरी ठेवि बारगिरांस ॥
समुद्रतीरी किल्ले घेई पाळी गलबतांस ।
चाकरी ठेवि पठाणास ॥
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास ।
उदासी लाभ शिवाजीस ॥
आवजूलखान शूर पठाण आला वांईस ।
शोभला मोठा फौजेस ॥
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस ।
कमी नाहीं दारूगोळीस ॥
कारकुनाला वचनी दिलें हिवरें बक्षीस ।
फितिवले लोभी ब्राह्मणांस ।।
गोपीनाथ फसवी पठाणा आणि एकांतास ।
चुकला नाहीं संकेतास ॥
माते पायीं डोई ठेवी, लपवी हत्यारास ।
बरोबर आला बेतास ॥
समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास ।
कमी करी आपल्या चालीस ।।
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास ।
भ्याला तुमच्या शिपायांस ॥
त्या अधमाचे ऐकुन शिपाई केला बाजूस ।
लागला भेटू शिवाजीस ॥
वर भेटभाव वाघनख मारी पोटास ।
भयभित केलें पठाणास ॥