Jump to content

पान:Samagra Phule.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महात्मा फुले : समग्र वाङ्मय

५०

शुद्र म्हणती तुम्हा हृदयीं बाण टोचले ।
आज बोधाया फावलें ॥
गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले ।
बोलीं नाहीं मन धालें ॥

॥ चाल ॥

क्षेत्र क्षत्रियांचे घर, तुझे पितृ माहावीर ।
सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचें माहेर ॥
शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ॥
दरीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर ।
झाडा फुलें झाला भार, सुंगधी वाहे लहर ।
पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार ।
भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीका फार ॥
धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।
दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनीं गार ॥
लोभी मेले येथे फार, विध्वा झाल्या घरोघर ।
उपाय नाहीं लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ॥
दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ।
मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ।
क्षत्रिय केले जरजर, भयें कांपे थरथर ।
दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥
बहु केले देशापार, बाकी राहि मांगमाहार ।
निःक्षेत्री झाल्यावर, म्लेंच्छ केलें डोके वर |
आले सिंधुनदीवर, स्वाऱ्या केल्या चारोंवार ।
गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावार ॥