पान:Samagra Phule.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(चार) महात्मा फुले : समग्र वाङ्मय चौथ्या आवृत्तीत छापलेल्या जोतीरावांच्या रंगीत छायाचित्रांऐवजी या पाचव्या आवृत्तीत श्री. गोपीनाथराव पालकर या सत्यशोधक चळवळीतील नामवंत कार्यकर्त्यांच्या खासगी संग्रहातून डॉ. बाबा आढाव यांनी मिळवलेले कृष्णधवल छायाचित्र छापले आहे. ते अस्सल असण्याची जास्त शक्यता वाटते. पुणे येथील शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक श्री. अ. चाँ. सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी संचालक श्री. प्रकाश मोरे आणि श्री. प्र. ल. पुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत परिश्रम घेऊन मुद्रणाचे काम पुरे केल्यामुळे ही पाचवी आवृत्ती २८ नोव्हेंबर या महात्मा फुल्यांच्या स्मृतिदिनापूर्वी प्रकाशित करणे शक्य झाले आहे. ग्रंथाचे मुद्रण चालू असताना श्री. हरि नरके यांनी पुण्यात तळ देऊन मुद्रित शोधनाच्या कामात साहाय्य केले नसते तर ही आवृत्तीही वेळेवर प्रसिद्ध करता आली नसती. त्याबद्दल त्यांचे ऋण शब्दामध्ये व्यक्त करणे कठीण आहे. 'महात्मा फुले : समग्र वाङ्मय' या ग्रंथासारख्या ग्रंथाचे संपादन करण्याचे काम परिपूर्ण होत नसते. नवीन संशोधनामुळे यापुढेही या ग्रंथात जशी भर पडत जाईल त्याप्रमाणे सर्वसाधारण वाचकांची सोय, प्रतिक्रिया आणि त्यांच्या सूचना लक्षात घेऊन कालांतराने नव्या संदर्भ टिपांचीही भर घालावी लागेल. याखेरीज ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर आढळलेले मुद्रणदोष दूर करण्याचा प्रयत्नही सतत करावा लागतोच. तो यापुढेही केला जाईल. नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००३२, दि. २८ ऑक्टोबर १९९१ य. दि. फडके अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ