पान:Samagra Phule.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन 'महात्मा फुले : समग्र वाङ्मय' या ग्रंथाची सुधारित चौथी आवृत्ती एप्रिल १९९१ मध्ये जोतीरावांच्या स्मृति-शताब्दीच्या निमित्ताने विशेष सवलत म्हणून महाराष्ट्र शासनाने अवघ्या दहा रुपये किंमतीस उपलब्ध करून दिली. चौथ्या आवृत्तीच्या दहा हजार प्रती दोन दिवसात संपल्या. वाचकांचा हा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन पन्नास हजार प्रतींची ही नवी सुधारित पाचवी आवृत्ती शक्य तितक्या कमी किंमतीस वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी कोणतीही विशेष सवलत अगर खास अनुदान घेतलेले नाही. मुख्यतः मुद्रणाचा खर्च लक्षात घेऊन प्रत्येक प्रतीस पन्नास रुपये ही किंमत निश्चित केली आहे. चौथ्या आवृत्तीत प्रथमच समाविष्ट करण्यात आलेला सर्व मजकूर विस्तृत संदर्भ टिपांसह या पाचव्या आवृत्तीतही छापलेला आढळेल. मात्र ही आवृत्ती म्हणजे केवळ पुनर्मुद्रण नाही. चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर दिसलेले मुद्रणदोष दूर करण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे. तसेच चौथ्या आवृत्तीतील मजकुराच्या मांडणीतही आवश्यक वाटले तेथे काही बदल केलेले आहेत. याखेरीज महात्मा फुल्यांच्या मृत्युपत्राच्या दस्तावेजाची छायाचित्रे आणि त्यांची आणखी तीन पत्रे यांचा पाचव्या आवृत्तीत प्रथमच समावेश केलेला आहे. जोतीरावांच्या मृत्युपत्राची छायाचित्रे श्री. हरि नरके यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने प्रथम मिळवली. मराठी व इंग्रजी हस्ताक्षरातील फुल्यांच्या पत्रांच्या छायाप्रती श्री. विजय सुरवाडे आणि श्री. गौतम शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार. जोतीरावांचे तिसरे पत्र डॉ. आर. एम. पाटील यांच्या संग्रहातील 'इशारा' पुस्तिकेत छापलेले मला आढळले होते. ते मी माझ्या 'व्यक्ती आणि विचार' या लेखसंग्रहात (श्रीविद्या प्रकाशन, पुणे, पहिली आवृत्ती, १९७९, पृ. ५६) उद्धृत केले होते.