पान:Samagra Phule.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने महात्मा जोतीराव फुले यांची स्मृतिशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी आपण साजरी करीत आहोत. महात्मा फुल्यांना बाबासाहेबांनी गुरू मानले होते. म. फुल्यांच्या वाङ्मयातून आणि चळवळींमधून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे बाबासाहेबांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केलेले आहे. डॉ. आंबेडकरांप्रमाणेच अनेक महापुरुषांना ज्या वाङ्मयातून मार्गदर्शन लाभले ते फुले वाङ्मय समाजक्रांतीची, व्यापक परिवर्तनाची, परिभाषा सांगणारे वाङ्मय आहे. हे साहित्य महाराष्ट्राला आणि भारतीय समाजजीवनाला समतेची दिशा देणारे साहित्य आहे. गेली काही वर्षे अनुपलब्ध असणारे साहित्य शताब्दी वर्षात विशेष सवलतीत उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र शासनाने खास निर्णयाद्वारे ठरविले होते. या वाङ्मयाचा इंग्रजी व हिंदी या भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी 'महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीची' स्थापनाही शासनाने केली आहे. म. फुले यांच्या वाङ्मयाचे आणि कार्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. य. दि. फडके यांनी संपादित केलेला हा ग्रंथराज अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. या खास आवृत्तीमध्ये आजवर इतरत्र विखुरलेले फुल्यांचे सर्व लेखन एकत्रित करण्यात आलेले आहे. त्याची कालानुक्रमे मांडणी केलेली आहे. म. फुले यांच्या जीवनाचे व वाङ्मयाचे विविध पैलू प्रकाशात आणणारे समकालीनांचे लेखन, म. फुले यांचा पत्रव्यवहार, त्यांनी स्थापन केलेल्या शाळांविषयीचे मौलिक दस्तावेज आणि आजवर फुल्यांचे अप्रकाशित राहिलेले साहित्य या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आले आहे. डॉ. फडके यांनी ग्रंथाच्या सुरुवातीस दिलेल्या संपादकीय टिपा आणि शेवटी दिलेल्या संदर्भ टिपा यांच्यामुळे फुले समग्र वाङ्मयाच्या नेमक्या आकलनाला मौलिक हातभार लागणार आहे. संपादक व त्यांचे सर्व सहकारी यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल वाचक आणि अभ्यासक त्यांचे ऋणी राहतील.