पान:Samagra Phule.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा फुले : समग्र वाङ्मय ३८ "अधम", "फितुर" असे शब्द वापरलेले आहेत, तर अफझलखानास "भोळा यवन" म्हटले आहे आणि त्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या सय्यद बंडाच्या स्वामीनिष्ठेची जोतीरावांनी प्रशंसा केली आहे. हिरडस मावळचे बाजी प्रभू देशपांडे, चाकणचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, दिलेरखानांशी त्वेषाने लढता लढता मृत्यूला मिठी मारणारे मुरारबाजी देशपांडे, कोंढाणा काबीज करताना धारातीर्थी पडलेले तानाजी मालुसरे वगैरेंच्या शौर्याबद्दल व स्वामीनिष्ठेबद्दल ग्रॅण्ट डफप्रमाणे जोतीरावांनीही गौरवाने लिहिले आहे. शाहिस्तेखानाने पुण्यातील आपला वाडा कबजात घेतला असताना त्याच्यावर चढवलेला हल्ला, मिझा राजे जयसिंगाबरोबरची भेट, आग्रा येथून स्वतःची केलेली सुटका, कर्नाटक दिग्विजय, व्यंकोजीस केलेला उपदेश वगैरे शिवचरित्रातील अन्य घटनाही जोतीरावांनी ग्रॅण्ट डफच्या इतिहासाच्या आधारेच लिहिल्या आहेत. मात्र जोतीरावांनी लिहिलेला पवाडा म्हणजे ग्रॅण्ट डफच्या गद्याला त्यांनी दिलेले फक्त पद्यरूप मानणे चुकीचे होईल. त्यांनी पवाड्याच्या आरंभी रेखाटलेले पाळण्यातील शिवाजीचे चित्र, जिजाबाईच्या मुखातून शिवाजी राजांना ऐकवलेला इतिहास, शिवाजी राजांचे त्यांनी पवाड्याच्या अखेरीस केलेले गुणवर्णन हा भाग त्यांच्या स्वतःचा असून त्यासाठी त्यांनी ग्रॅण्ट डफच्या पुस्तकाचा बिलकुल आधार घेतलेला नाही. दादोजी कोंडदेवासंबंधी ग्रॅण्ट डफने विस्ताराने लिहिलेले आहे. या उलट "दुसरा 'भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा । दादोजी कोंडदेवाचा ।। मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा ।" असे तीन चरण लिहून जोतीरावांनी दादोजी कोंडदेवांची बोळवण केलेली आहे. हिंदू धर्मविषयक लोकसमजुतीवर असलेल्या विश्वासामुळे तसेच धोरण म्हणूनही कदाचित शिवाजीने प्रतापगडावर भवानी देवीचे मंदिर बांधले असावे आणि रामदास स्वामींचा महापुरुष किंवा आध्यात्मिक गुरू म्हणून स्वीकार केला असावा असे ग्रॅण्ट डफने म्हटले आहे, तर "लोकप्रितीकरिता करी गुरू रामदासास । राजगडी स्थापी देवीस ॥" असे जोतीरावांनी या घटनांचे स्पष्टीकरण दिले आहे. शिवछत्रपतींचे कर्तृत्व हे त्यांचे स्वतःचे होते, त्याचे श्रेय रामदास स्वामींना अगर दादोजी कोंडदेवास देण्यास जोतीराव तयार नव्हते. पवाड्याचे पालुपद "कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा" असे आहे. त्यातील “कुळवाडी-भूषण" हे वर्णन शिवाजी राजांचे की जोतीरावांनी "भूषण' या शब्दावर श्लेष साधून ते स्वतःच्या संदर्भात केले आहे? भूषण या कान्यकुब्ज ते ? ब्राह्मण कवीप्रमाणे आपणही शिवाजीचा पवाडा गाऊन कुळवाड्यातील भूषण होत आहोत असे जोतीरावांना म्हणावयाचे आहे असा त्याचा अर्थ लावण्यात एक अडचण आहे. पवाड्याच्या अखेरीस त्यांनी "जोतीराव फुल्याने गाईला पूत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा" असा स्वतःचा स्पष्ट शब्दात नामनिर्देश केलेला असल्यामुळे “कुळवाडी-भूषण" या शब्दात त्यांनी शिवछत्रपतींचाच गौरव केला आहे असे मानणे अधिक योग्य होईल.